तिची लेक

Submitted by अमेय२८०८०७ on 24 February, 2013 - 01:01

घर निराळे गावाबाहेर, आम्ल उठती नित्य वावड्या
दारापुढती पोर धाकटी शांत खेळसे काचा कवड्या
कुणास भासे घर राणीचे; राज्य जिचे खालसा ठरले
कुणी म्हणे आश्रय विधवांचे; पती जयांचे रणात मेले
हलती लोलक स्निग्ध दिव्यांचे, प्रकाश झरतो नित्य खरासा
सरळ बापडा रस्ता देखील तिथेच चोरून वळे जरासा
लेक एकटी अपुल्या रंगी, रमून दंगून रिझवी चित्ता
कधी मांडते भातुकली अन् कधी गिरवते पुस्तक कित्ता
लांब होती संध्या-छाया, रात्र उतरे हलक्या हाते
बालजिवाला गूढ तमाचे, आकारांचे भय वाटे
चुचकारूनी तिज कुशीत घेण्या, लाड पुरवण्या कोणी नाही
गच्च दाटूनी येती डोळे तरी हुंदका काढत नाही
स्वतःस बिलगुनि म्लान हासते ; ही तिची रोजची लढाई
ठाऊक तिजला पोटासाठी कुठली खळगी भरते आई

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्व्वा , अगदी तद्रुप होऊन लिहिल्यासारखं वाटलं .

दिव्यांचे, प्रकाश झरतो नित्य खरासा
सरळ बापडा रस्ता देखील तिथेच चोरून वळे जरासा
लेक एकटी अपुल्या रंगी, रमून दंगून रिझवी चित्ता
कधी मांडते भातुकली तर कधी गिरवते पुस्तक कित्ता

गच्च दाटूनी येती डोळे तरी हुंदका काढत नाही
स्वतःस बिलगुनि म्लान हासते ; ही तिची रोजची लढाई
ठाऊक तिजला पोटासाठी कुठली खळगी भरते आई

खूपच आवडली कविता !

हलती लोलक स्निग्ध दिव्यांचे, प्रकाश झरतो नित्य खरासा
सरळ बापडा रस्ता देखील तिथेच चोरून वळे जरासा..

अंगावर येणारी वातावरणनिर्मिती.. त्या बालजीवाला नीटसं न कळलेलं वास्तव अचूक शब्दात पकडलंय.
खूप अपेक्षा निर्माण करणारी कविता.ले.शु.

थेट!!