"तुझे वैभव"

Submitted by अमेय२८०८०७ on 23 February, 2013 - 12:08

अशी एक सय येते
तुझा सांगावा घेऊन
जाते कुशीत मनाच्या
डंख उरीचा पेरून

तुझ्यापरी चांदण्यांचे
हात नाचती गळ्यात
शुभ्र प्रीतीचे उखाणे
चंद्र वहातो खळ्यात

झाड-वेली फूल-पाने
सर्व तुझाच उत्सव
चराचरा लाभलेले
तुझ्या नेत्रांचे आर्जव

दारापुढे घरामागे
सगळ्याची आठवण
तुळशीच्या बागेपाशी
जुने बोटांचे गोंदण

जरि वाटावे जगणे
तुझ्याविना असंभव
तुझ्यासाठी जगवतो
तुझ्याकाळचे वैभव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतके क्लासिक सुंदर शब्द असे अप्रतिसादित कसे राहिले कोण जाणे !
कदाचित त्या ''शुभ्र प्रीतीचे उखाणे'' न सुटल्याने असे झाले असेल.
'नेत्रांचे आर्जव,'जुन्या बोटांचे गोंदण','तुझ्याकाळचे वैभव' यातून सूचित होणारं ते शुभ्र सात्विक प्रेम मातृसंवेदनांचं आहे असं जाणवतंय..
पु.ले.शु.

" तरिही मनात अंधुक आशा
हलुच येऊन फुलवशील निशा
पुर्ण होईल माझी मनिशा
बेधुंद होईन मी दाही दिशा "

विजय जोशी
डोंबिवली

श्री .विजय जोशी , डोंबिवली.. जाहिरात नका करू सरळ कविताच पेश करा नवीन धाग्याच्य स्वरूपात

आम्ही वाचूच जाहिरातीची गरज नाही

धन्यवाद सर्वांचे

भारती,
आपल्यासारखा एकच प्रतिसाद आला तरीही (घाबरू नका या शब्दाला) कविता करण्याचा उत्साह टिकून राहील.