परत का आलात?

Submitted by सई केसकर on 18 February, 2013 - 10:42

सध्या मी माझं भारतातील "फॉर गुड" आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. मला "भारतात परत का आलात?" हा प्रश्न हमखास विचारला जातो. याला बरीच वैयक्तिक आणि नॉट-सो-वैयक्तिक करणं आहेत. त्यातील दुस-या श्रेणीतील सगळी महत्वाची आणि पहिल्या श्रेणीतील एकच मी सांगणार आहे Happy

त्या आधी मला इथे आवर्जून असं सांगायचं आहे की हा लेख अमेरिकेत (किंवा परदेशात) राहणाऱ्यांच्या विरोधात अजिबात लिहिलेला नाहीये. कधी, कुणी, का आणि कसं परत यावं, किंवा का येऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भारतात परत येण्याच्या निर्णयात "ऐसा देश हैं मेरा", किंवा "आय लव्ह माय इंडिया" वगैरे गाण्यांचा अजिबात हात नव्हता. आणि माझं परदेशातील वास्तव्य आणि मित्र मंडळ अतिशय आनंदी आणि मजेदार होतं. एकटेपणा किंवा एकटेपणाची भीती हेही माझ्या निर्णयामागचं कारण नाही. मी अजूनही माझ्या ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत झालेल्या काही परदेशी मित्र-मैत्रिणींशी अगदी रोज बोलते. आणि त्यातील काही लोक मला भेटायला भारतात यायचे बेतही करतायत.

पण परदेशात आणि खास करून अमेरिकेत न राहण्याचं एक कारण म्हणजे तिथलं वास्तव्य कायम व्हिसावर अवलंबून असतं. आणि ९/११ नंतर दोन वेळा अमेरिकेच्या व्हिसा प्रक्रियेतून गेल्यावर मला तिसऱ्या वेळी त्यातून जायची अजिबात इच्छा नव्हती. माझी शैक्षणिक शाखा आणि माझा भारतीय पासपोर्ट मला अमेरिकेच्या TAL (Technology Alert List ) मध्ये समाविष्ट करतो. या यादीत आतंकवादी ज्या ज्या तांत्रिक माहितीचा वापर करू शकतो त्या सगळ्या शाखा येतात (केमिकल, बायोमेडिकल, बायोलॉजी इत्यादी). त्यात जर तुम्ही ठराविक देशाचे नागरिक असाल तर सहा ते सात महिनेसुद्धा लागू शकतात. त्यामुळे अमेरिकन व्हिसा मिळवताना नेहमी मला २२१ g, हा फॉर्म देऊन चार ते सहा आठवडे थांबावं लागतं (यात व्हिसा मिळेल याची हमी नसते. काही लोकांना सहा महिन्यानंतर नकार आल्याच्या केसेस आहेत). पहिल्यांदा जेव्हा मी या २२१ च्या चक्रात अडकले होते तेव्हा मी ऑस्ट्रेलियात होते. माझ्या बरोबर व्हिसा साठी आलेल्या माझ्या युरोपियन सहकार्याला एका दिवसात व्हिसा मिळाला. मला तब्बल अडीच महिन्यांनी माझा पासपोर्ट परत मिळाला. तोपर्यंत माझे सगळे सहकारी कॉनफरन्स उरकून परतही आले होते. तेव्हा मला अमेरिकेला जाता येत नाही यापेक्षा मी परदेशात पासपोर्टशिवाय राहते आहे याचाच जास्त राग येत होता. काही दिवसांनी "मला व्हिसा नको पण माझा पासपोर्ट परत द्या" म्हणून त्यांना फोन केला तेव्हा मला अतिशय उद्धटपणे, "तुमचा पासपोर्ट FBI कडे देण्यात आलाय आणि आम्ही काहीही करू शकत नाही" असं सांगण्यात आलं.

या २२१ g मुळे गेल्या काही वर्षांत कित्येक शास्त्रज्ञ ठरवलेल्या कॉनफरंसला वेळेत पोहोचू शकले नाहीत. काही काही लोकांची व्हिसा रिन्यू करताना अडकल्यामुळे परिवारापासून सहा सहा महिने ताटातूट झाली आहे. काही विद्यार्थ्यांचे एक सेमिस्टर वाया गेले आहे. सुट्टीला परत आलेले विद्यार्थी ऐन पी.एच.डी च्या मधेच भारतात अडकून राहिलेले आहेत. काही विषयांच्या कोन्फरंस आता दुस-या देशांमध्ये आयोजित केल्या जातात. कारण मान्यवरांना व्हिसा मिळून वेळेत पोहोचायची हमी देत येत नाही.

कित्येक युरोपियन देशांच्या नागरिकांना विना व्हिसा ३ महिन्यापर्यंत अमेरिकेत राहता येते. यात असे बरेच देश आहेत जिथे त्याच देशातील नागरिकांनी आतंकवादी हल्ले केलेले आहेत (उदा. ब्रिटन, फ्रांस). अशा देशांतील लोक कधीही विमानात बसून कुठल्याही तपासणीशिवाय अमेरिकेत दाखल होऊ शकतात. मध्यंतरी अशा एका ब्रिटीश नागरिकाच्या बुटात स्फोटक पदार्थ सापडले होते (तेव्हापासून एयरपोर्टवर बूट काढायचा नियम निघाला). या नियमांमध्ये तुमचं नाव जर इस्लामिक वाटत असेल तर तुम्हाला जास्त वेळ थांबावे लागते. ब्रिटीश पासपोर्टवर जन्माला आलेले असे किती इस्लामिक नावाचे लोक असतील? फ्रांसमध्ये कित्येक अरबी लोक वर्षानुवर्षं स्थाईक झालेले आहेत. त्यांचा फ्रेंच पासपोर्ट त्यांना विना इंटरव्यू अमेरिकेत येऊ देतो. पण अरबी देशातून आलेल्या अरबी लोकांना कित्येक महिने थांबावे लागते. २२१ मधून जसे तपासणी नंतर माझ्यासारखे लोक सुटतात तसेच कित्येक पाकिस्तानी, अरबी, चीनी लोकही सुटतात. पण ज्यांची काहीच तपासणी होत नाही त्या लोकांमध्ये एखादा आतंकवादी नसेल असे कशावरून?

मला अमेरिकेत पोस्ट डॉक मिळाल्यावर पुन्हा त्या प्रक्रियेतून जावं लागणार याचा विचार करूनच अंगावर काटा आला. दुसऱ्यावेळी देखील चार आठवडे लागले आणि व्हिसा ऑफिसरनी, "You are smart and single. what if you find yourself an American husband? You are just paying the price of being so smart." असा शेरा मारला होता. पोस्ट डॉक चे काही महिने संपल्यावर मी हा व्हिसा रिन्यू करायचा नाही हे पक्कं ठरवलं होतं.

अमेरीकेनी ही प्रक्रिया आमच्यासारख्यांसाठी सुखद करावी असं माझं अजिबात मत नाही. त्यांनी त्याच्या देशात कुणाला थारा द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. आणि अमेरिकन नागरिकांचं संरक्षण करण्याचे सगळे मार्ग त्यांनी वापरले पाहिजेतच. त्यात आमच्यासारख्या लोकांची गैरसोय होणे ही तशी छोटी बाब आहे.अमेरिकेतील वास्तव्यात मला स्वत:बद्दल आणि माझ्या कामाबद्दल खूप काही शिकायला मिळालं आहे. आपण तिथे उगीच गेलो असं मला अजिबात वाटत नाही. पण आपण उगीच परत आलो असंही वाटत नाही.

खरं सांगायचं तर मला परदेशात राहून फेसबुकवर किंवा ट्विटर वर "भारतातील राजकारण, भारतातील अत्याचार, भारतातील भ्रष्टाचारावर मतं व्यक्त करायची हळू हळू लाज वाटू लागली होती. मी अमेरिकेत राहून अमेरिकेच्या राजकारणाचा अभ्यास करायचे पण तिथे मला नेता निवडता यायचा नाही. आणि भारतातील राजकारणाचा उहापोह करून, फेसबुकवर मित्रांशी वाद घालताना त्यांच्यावर लिंका फेकून, खूप सारा दंगा करूनही मला भारतात मतदान करणं जमेलच याचीही खात्री नव्हती. मग आपण नुसतेच पेपर टायगर आहोत असं वाटू लागलं होतं. आणि अशी आयुष्यभर नोकरी करत करत कदाचित आपल्यातली ही टोचणारी सुई बोथट होईल याचीही काळजी वाटू लागली होती.

माझी निर्णय प्रक्रियेचा ढाचा "आधी ठरवा मग विचार करा" हा आहे. माझे सगळे निर्णय नेहमी असे एखाद्या सकाळी, अचानक उद्भवतात. त्यामुळे हा निर्णय झाल्यावर जवळपास आठ महिने माझी नोकरी बाकी होती. त्या काळात मी खूप लोकांशी बोलले. काही तिथे राहणाऱ्या काही परत आलेल्या, काही तिथलं नागरिकत्व मिळवलेल्या, माझे अमेरिकन आणि युरोपियन मित्र मैत्रिणी. काही लोक माझा आदर्श बनले. त्यातलीच एक गायत्री नातू. मला तिचं नाव आवर्जून घ्यावासं वाटतं कारण माझ्यासारखा लेख बिख लिहायच्या भानगडीतही ती कधी पडली नाही. तिचा निर्णय सुरवातीपासूनच पक्का होता. आणि नुकतंच तिचं प्रसाद बोकीलशी लग्न झालं. त्या लग्नाची गोष्ट तर म.टानी देखील उचलून धरली. तिच्या लग्नाचा एक छोटा भाग बनल्याचा मला अभिमान आहे.

परत येताना मला दिल्या गेलेल्या सल्ल्यांमध्ये पुन्हा व्हिसा ऑफिसरचाच मुद्दा निघाला -- लग्नाचा. भारतात जाऊन तुझ्यासारख्या उच्च शिक्षित, जग बघितलेल्या मुलीसाठी नवरा शोधणं अवघड आहे. अर्थात, हा प्रश्न वयक्तिक आहे. आणि खूप दिवस मी त्यावर ठरवून लिहिलेलं नाही. पण परत येऊन तीन महिने झाल्यावर माझे याबद्दलचे विचार अजून ठाम झाले आहेत. एखाद्या देशात जाताना किंवा तिथून परत येताना दोन्हीवेळी हा लग्नाचा प्रश्न का उपस्थित व्हावा? लग्न होणार नाही, हा आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या निर्णयातील अडसर का व्हावा? आणि नाही झालं तर असा कोणता मोठा गहजब होणार आहे? हे आवर्जून लिहायचं कारण असं की मी खूप वर्षं या "सामाजिक अपेक्षेच्या" ओझ्याखाली राहून माझ्या आयुष्याला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. आणि माझी खात्री आहे की माझ्यासारख्या इतर मुलीदेखील "आपलं लग्न झालं नाही तर?" या भीतीपोटी त्यांच्या आयुष्यातील काही निर्णय पुढे ढकलत असतील किंवा रद्द करत असतील. अर्थात इथे पुन्हा विरोध लग्न करण्याला नाही. पण न मिळालेल्या जोडीदारासाठी हातात असलेलं उच्च शिक्षण, नोकरी, प्रवास करायची संधी दवडणंदेखील बरोबर वाटत नाही. आणि ही भीती फक्त भारतीय मुलींची नाही हे ही लक्षात आलं. ही सगळ्या देशांतील मुलींना सतावणारी भीती आहे. पण भारतात परत येण्याच्या निर्णयातील सगळ्यात समाधानाची बाजू ही, की अशी भीती, काळजी पोटात असतानाही मी परत येऊ शकले. आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय माझ्या आई बाबांचे आहे. त्यांनी माझ्या प्रत्येक प्रवासात माझी पूर्ण साथ दिली आहे. आणि या बाबतीतही कुठल्याही प्रकारची चिंता, चिडचिड, दु:ख, असंतोष कधीही व्यक्त केलेला नाही. माझा परत येण्याचा निर्णय पूर्णपणे माझा होता. अर्थात आई बाबांना त्याचा प्रचंड आनंद झाला. पण मी नसल्याची त्यांना खंत होती हे त्यांनी मला कधीही दाखवून दिले नाही.

इतरही खूप छोटी छोटी करणे आहेत. जसं की, रविवारी फुले मंडईत जाणे, हक्काची बेकारी उपभोगणे, रिक्षातून फिरणे, रोज सकाळी अंजीर खाता येणे, माझ्या भाचरांचे लाड करता येणे. पण सगळ्यात महत्वाचं कारण हेच की मला भारतात परत यायचं होतं आणि माझ्या डोक्यात कोण्या एका शनिवार सकाळी लक्ख प्रकाश घेउन आलेला तो विचार कधीच कमजोर झाला नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हाला राहायचय हो, पण आमचं घोंघडच काय आम्हा स्वतःला सुद्धा भिजत ठेवलय ह्या प्रोसेस नी. Proud इबि ३ला ९-१० आणि एबि २ ला ४-५ तरी वर्ष लागत आहेत (अंदाजे) ग्रीन कार्ड व्हायला.
बाकी माझी तक्रार काहीच नाही. आता लँड ऑफ ऑपॉरचुनिटीच आहे म्हंटल्यावर रांग तर लागणारच त्यात पुढे सिक्युरिटी वगैरेची लफडी आहेतच.
स्वतः बर्‍याच वेळा त्या विजा इंटरव्यु प्रकारतून गेल्यामुळे दर वेळी कशाला ही झकमारी करायची? हा विचार येतोच (त्रासापायी) तेव्हा आपला देश, सकाळचे अंजीर, फुले मंडईत शॉपिंग, हक्काचे बेकारी हे सगळं आठवतं. मग पुढे विजा मिळतो आणि मग हे विसरायला होतं ही माझी वैयक्तिक प्रोसेस झाली. Proud पण एकंदरित विचार म्हणून आणि मुख्यतः स्वतःच्या डोक्यात बर्‍याच वेळा येऊन गेलेले विचार दुसर्‍या कोणाच्याही डोक्यात येऊन गेले आहेत हे वाचून बरं वाटलं. Happy

नाहीतर कुंपणावरुन उड्या मारुन येणारे लोक बामाकृपेने रांगेत तुमच्या आधी उभे असतील.>>>>>>> Lol

विमानाचं तिकीट काढताना नाव, पासपोर्ट नंबर द्यावा लागतो की नाही? Happy प्रत्यक्ष इंटरव्ह्यू घेऊनच तपासणी व्हायला पाहिजे असे काही नाही.
बुवा, करा झकमारी. वाळूचे कण रगडा. Wink
मीपण हेमाशेपो!

@ लोला
आता तुम्ही बळंच वाद घालताय. भारतीय लोकांची केलेली करकचून तपासणी कुठे! आणि तो कस्टमचा जुजबी इंटरव्यू कुठे!
बिचारे मुलीच्या बाळंतपणाला जाणारे आई-वडील सुद्धा इन्कम tax चे कागद, सगळ्या property चे agreements, आणि आम्ही परत येऊ अशी हमी देणारे खंडीभर दस्तावेज घेऊन जातात. आणि कितीतरी वेळा काहीही कारण न देता अशा लोकांचे व्हिसे रिजेक्ट होतात. आणि हे व्हिसे तर २२१ मधले देखील नसतात. जिथे त्रुटी आहे तिथे ती मान्य करायलाही हरकत नसावी. बाकी माझ्या इतर मतांवर तुम्ही जे तोंडसुख घेतलाय त्या बद्दल आम्ही काहीच बोलत नाही.

>>जिथे त्रुटी आहे तिथे ती मान्य करायलाही हरकत नसावी.
त्रुटी नव्हे हो, तशीच प्रोसिजर आहे. Wink
आहे हे असे आहे, टेक इट ऑर लीव्ह इट.. आपण सोडायचं नाही, जायचं सारखं इंटरव्ह्यूला.

लेख आवडला.
प्रामाणिक. Happy

कुठलाही निर्णय घेताना N+1 गोष्टी मनात असतात.
त्यातलीच एक गोष्ट जी सर्वांसोबत शेअर करणे शक्य आहे अशी शेअर केली आहे.

@ लोला

त्रुटी शब्द चुकीचा होता. अनफेअर बरोबर आहे. प्रोसीजर तुमच्यासाठीच अनफेअर आहे! आम्ही फक्त ते दाखवून देतोय.
आम्ही आलो की परत. आणि आतंकवादी कुठल्याही देशाचा असू शकतो हा मुद्दा आहे. आम्हाला तिकडे काम करायचं पण करायला मिळत नाहीये हा नाहीये.
आता "david coleman headly" नाही का झाला दाउद सैद गिलानी चा? २००६ मध्ये नाव बदललं त्यानी! आणि जरी तो भारताच्या हल्ल्यात पकडला गेला असला तरी त्याचे अमेरिकन नागरिक असूनदेखील पाकिस्तानी टेरर ग्रुप्सशी संबंध होतेच ना?

सई,

तुम्हाला आलेले अनुभव शेकडोना येतात्/आलेले आहेत पण त्यामुळे सगळे सोडुन परत येण्याचा निर्णय मलातरी बराच धाडसी वाटला. आपल्या भौगोलिक भागातील लोकांकडुन अमेरिकेला आलेला अनुभव सर्वश्रुत आहे. पण अमेरिकन्स इतराना काय वाटेल यापेक्षा आपल्या "देशासाठी" सुरक्षित काय असेल याचा विचार करुन निर्णय घेतात. आता त्यांच्या प्रोसेस मधे विलंब लागतो, कसुन तपासणी होते यात तुमच्या विरुद्ध पर्सनल काहीच नसते.

आणखी एक गोष्ट म्हणजे परत भारतात येउन फुले मडईत फिरणे, चितळ्यांच्या दुकानासमोर ते उघडायची वाट पाहत तिष्ठत उभे राहणे यात मजा आहेच पण ती तुम्ही कधिही घेउ शकता पण तेच मनात आले तर तुम्ही परत जाउन न्युयॉर्क सिटीत फिरायची किंवा डिस्नेलँड पहायची मजा अनुभवु शकता का?

तुम्ही हुशार आहात स्किल्ड आहात, जरा थोडासा पेशन्स ठेवलात आणि इगो बाजुला ठेवलात तर तुम्हाला ईबी१ मधे सहा महिन्यात ग्रीनकार्ड मिळु शकते (नुकतच माझ्या एका नातेवाईकांना मिळाले). आपली इतर काही कारणे असतीलही पण जर या प्रोसेसचा क्लिष्टपणा किंवा तथाकथित त्रुटी हे जर कारण असेल तर आपल्या निर्णयाचा जरुर एकदा फेरविचार करावा असे मला वाटते.
(आणि परत का आलात किंवा परत का चाललात असे विचारणार्‍याना काही सांगायची गरज नाही..त्याना ना तुमच्या जाण्याने काही फरक पडतो ना येण्याने Happy हे या बाफवरील काही पोस्ट्स नी आपल्याला कळले असेलेच.. )

ईबी१ मधे सहा महिन्यात ग्रीनकार्ड मिळु शकते >>> हे खरे आहे, आम्हाला देखील मिळाले ६ महीन्यात, म्हणून मला नक्की माहीत आहे, तुम्हालाही मिळाले असते. Happy
बाकी लेखाबद्दल, ज्याची त्याची कारणे, यायची/जायची , सगळी योग्यच असतात. चुकीचे काहीच नाही. Happy

छान लिहिले आहे सई.
निर्णय स्वतःला पटला म्हणजे झाले. बाकी तो अमेरिकेत जो 'माज' व्हिसा बाबत आहे तो आहेच.
आणि देशातील साधे पारपत्र/ आधारकार्ड वगैरे मिळवण्यासाठी करावी लागणारी यातायात ही सत्य आहेच.

मानस्मि- निर्णय तिच्यासाठी बरोबर का चूक हे आपण कसे सांगणार आणि का सांगावे ?
त्यामुळे मृण्मयी +१.

मनस्मी पहिल्या पॅरा बद्दल +१. लोलाचाही मुद्दा बहुतेक तोच आहे.
शेवटी देशानी तयार केलेली ही एक प्रोसेस आहे, त्यात आपल्याला कधी त्रास झाला तर आपल्याला वाईट वाटणे, राग येणे सहाजिक आहे पण ते आपण पर्स्ननली घेऊन काही उपयोग नाही.

हा हा. मी हे पर्सनली अजिबात घेतले नाहीये. भारतात माझ्या करिअरला छान स्कोप आहे हा ही परत येण्यामागचा हेतू आहे. पण त्यावर इथे लिहिले नाही इतकेच. व्हिसा वर नसणे हाच करिअर साठी खूप मोठा फायदा आहे. भारतात राहून जग भरातल्या लोकांशी collaboration करणं आता खूप सोपं झालय. आणि माझ्या फिल्डमधील बरेच दिग्गज आता भारताकडेच डोळे लाऊन आहेत. भारतात गेल्या काही वर्षांत टाटा, बजाज, रिलायंस या सा-या मोठ्या उद्योगांनी साखर कारखान्यात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. साखरेचा आणि इंधनाचा आता खूप जवळचा संबंध झाला आहे. आणि भारतात या क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक सुरु आहे. तो भाग तर नक्कीच आहे.

पुन्हा "सुरक्षेचा" मुद्दा निघाला म्हणून पुन्हा एकदा मी सांगते,
आपण तुलना करताना नेहमी आपल्या आपल्यात करतो. याचा जे १ त्याचा H १ इत्यादी. आपल्याला पेशन्स असतो कारण आपली स्वप्न अमेरिकेशी जोडलेली असतात. पण अमेरिकेच्या व्हिसा प्रोसेस ची तुलना इतर कुठल्याही देशाशी करा (जिथे भारतीय जायला उत्सुक असतात) त्या सगळ्या देशांचे इमिग्रेशनचे नियम अमेरिकेपेक्षा खूप सुसह्य आहेत. ही एक तुलना.

दुसरी तुलना आपली आणि इतर राष्ट्रांच्या लोकांची केली तर असं लक्षात येईल की "टेररीझम" चा potential धोका इतर देशांकडूनदेखील आहे. आणि इथे मी फक्त TAL list आणि visa mantis बद्दल बोलते आहे. ज्यांना तिथे राहायची मनापासून इच्छा आहे त्यांनादेखील या नियमांचा खूप त्रास होतो. आणि त्यांना झालेला उशीरामुळे त्यांच्या रिसर्चचे देखील नुकसान होते. अशा वेळेस आपल्या बरोबरीचा एखादा युरोपियन विद्यार्थी आपल्या पुढे जातो याचा त्रास नक्कीच होतो. "आहे हे असे आहे" असे प्रत्येक वेळी नाही म्हणता येत. कारण एकदा या व्हिसाच्या प्रोसेस मधून पुढे गेलो की सगळे सारखेच असतात. मग तिथे आपण या एका गोष्टीमुळे मागे पडतो याचा राग नक्कीच येतो.

आणि पेशन्स ठेवावासा वाटला असता तर ठेवला असता. पण इथे परत येण्यातल्या करणांमध्ये भारतात उद्योजक बनणे/ बाहेरचे तंत्रज्ञान इथे रुजवणे आता पूर्वीपेक्षा जास्त सोपे आहे हा ही एक आहे.

@ सई - तुम्हाला ह्या विषयावर लिहावेसे वाटले ह्यावरुनच दिसते आहे की तुम्हाला थोडा तरी पश्चाताप होत आहे परत येण्याचा. नाहीतर तुम्ही परत आलात ह्यात विषेश ते काय? तुम्हालाच विषेश वाटते आहे म्हणुन तुम्ही लिहिता आहात.

अमेरिकन विसा ऑफिसरला मठ्ठ म्हणणार्‍यांसाठी - तुम्ही एकदा भारतीय अँबसी मधील ऑफिसर चा अनुभव घ्या.

@सर्वांना - हे लक्षात घ्या - गरजवंत आपण आहोत. अमेरिका किंवा युरोप ला तुमची ( म्हणजे आपली ) गरज नाही. तुम्ही आलात काय कींवा गेलात काय, त्यांना काही फरक पडत नाही. ( कदाचित आलात तर पडत असेल ). आणि मराठीतल्या म्हणी प्रमाणे "गरजवंताला अक्कल नसते" हे समजुन घ्या म्हणजे मनाला त्रास होणार नाही.

प्रसाद१९७१ | 19 February, 2013 - 01:53

त्रिवार सहमत आहो. आपले मंगल असो.

Happy
मला पश्च:ताप नाही हो झालेला. आणि मला तिकडे गेल्यामुळे देखील नव्हता झाला. मी ते लेखातही नमूद केलय तसं.
आणि जसं तिथे गेल्यानी काही फरक पडत नाही तसा इथे आल्यानी तरी काय पडणारे? तुमचे मुद्दे बरोबरच आहेत. आणि त्या असम्शन वरच हा लेख लिहिला आहे. भारताला तरी माझी काय गरज आहे? एका माणसाच्या परत येण्यानी असा काहीच फरक पडत नाही. आणि परत येउन मी इथे काय करते यावरही माझा भारताला उपयोग आहे की नाही हे अवलंबून आहे.

पण मला आलेल्या अनुभवांतून मला ही प्रोसेस फक्त काही लोकांसाठी जास्त जाचक आणि बाकीच्यांसाठी कमी जाचक वाटली. ते जर मी निदर्शनास आणून दिलं तर त्यात एवढं काय बिघडलं? आणि तुम्ही म्हणता ते देखील बरोबर नाही. या २२१ g च्या विरुद्ध अनेक अनिवासी भारतीयांनी अमेरिकन सरकारचे मत बदलायचा प्रयत्न केलेला आहे. तिथे राहून तिकडची सिस्टीम बदलणारे लोकही आहेत. मी फक्त परत यायचा पर्याय निवडला. आणि माबो वर नसतील कदचीत पण या प्रोसेसशी छान ओळख झालेले खूप लोक आहेत.

पण मला आलेल्या अनुभवांतून मला ही प्रोसेस फक्त काही लोकांसाठी जास्त जाचक आणि बाकीच्यांसाठी कमी जाचक वाटली. ते जर मी निदर्शनास आणून दिलं तर त्यात एवढं काय बिघडलं?>>>> ज्या लोकांसाठी ही प्रोसेस कमी जाचक होती ती लोक कुठल्या देशातुन आली होती? तुम्हाला उत्तर माहीती आहे. तुम्ही भारतातुन गेला होता. बाकीचे लोक त्यांच्याच ( अमेरिकेसारख्या ) संस्कृतीच्या देशातुन गेले असणार ( जसे युरोप, ऑस्ट्रेलिया ). त्यांना preference मिळणारच.
तुम्हाला हे भारतीयत्वाचे ओझे जन्म भर वागवावेच लागणार. त्याला पर्याय नाही. तुमच्या पेक्षा जास्त ओझे पाकिस्तानातील कोण्या "सलमा" ला वाहावे लागणार. हे ही तितकेच खरे आहे.
हे स्वीकारुन च पुढे जायला लागणार आहे.

प्रसाद आपण इमिग्रेशन प्रोसेस मधून गेला आहत का?
सई छान लिहिलेस ... निर्णय घेतलास हे महत्वाचे ... अभिनंदन... तुझ्या पुढच्या संशोधन / उद्योग वाटचालीस शुभेच्छा ...

असं कसं? तुम्ही तिथे काम करता. तुम्हाला वाटतं का की तुमची बुद्धी एखाद्या युरोपियन माणसापेक्षा कमी आहे?
भारतीय आणि चीनी लोक काम करताना या सगळ्या बाकीच्या देशांना मागे टाकतात. मान मोडून काम करणारे, खूप पेपर लिहिणारे, कष्ट करणारे, अमेरिकेच्या संकृतीत महत्वाची भर घालणारे, शांत, सुसंस्कृत असे किती भारतीय अमेरिकेत काम करतात. तुम्हाला जी मुलं होतात ती पुढे जाऊन अमेरिकेचच भविष्य उज्ज्वल करतात. आणि अशा स्किल्ड पालकांना झालेली मुलंपण बुद्धिमान आणि कष्टाळू असतात. आज अमेरिकेत श्रीमंतीत सुद्धा भारतीय लोक अग्रणी आहेत. भारतीय लोक तिथे बहुधा युरोपियन लोकांपेक्षा जास्त investment करतात. तुमचा त्या देशाला खूप आधार आहे. आणि कुठल्याही व्हिसा वर असलात तरी तुमची त्या देशाला किंमत खूप आहे. या पार्श्वभूमीवर मला भारतीय माणूस/महिला युरोपियन महिले इतकीच महत्वाची वाटते.

छान लेख... प्रामाणिक विचार... आवडले!

'परतोनी पाहे' चा अनुभव घेऊन पुन्हा 'परतोनी जाये' असेही माबोकर आहेत Happy

शेवटी 'दुरून डोंगर साजरे'. प्रत्येक ठिकाण/समाज/काळ याचे फायदे तोटे आहेतच.. काळाची पावले ओळखून वाटचाल करणारे लोकं विरळे!

अमेरिकन व्हिसा: हा हा हा! (मिळालेले हसतात, नाकारलेले रडतात) random probability- go figure!ईद्र व ब्रह्मदेव आणि नरेंद्र मोदी यांचाही अमेरिकन व्हिसा नाकारला जाऊ शकतो यातच सर्व काही आले. पण मुळात 'दाता' हा 'याचका' पेक्षा मोठा आहे हे मान्य केलं की फार त्रास होत नाही.. its all relative. भारतात fdi ची कंत्राटे मिळवायला सगळ्याच देशांचे व्हिसा नॉर्म्स थोडे शिथील केले जात आहेत हे 'लक्षात' घ्यावे. Happy
एखाद्याला मात्र वैश्विक व्यावसाय, ऊद्योग वगैरे करायचा असेल तर मात्र असे अडथळे त्रासदायक असतात हे मान्य! आणि हा विषय 'झक्की मटेरियल' आहे तेव्हा मी ईथेच थांबतो. Happy

[आम्ही तूर्तास 'दुबई' मध्येच आहोत, ईथे येऊन ४ वर्षे 'ऊलटली' यावर विश्वास बसत नाही. पण भारतातून ईथे अक्षरशः मुंबई पुण्या सारखे, शॉपिंग साठी व फिरायला येणारे लोंढे व गर्दी बघितली की आता जग खरेच 'फ्लॅट' टिव्ही सारखे 'फ्लॅट' झाले आहे हे पटते. फरक फक्त एकीकडून दुसरीकडे जाण्यातील विमान प्रवासाचा ऊरला आहे. अन्यथा लोक, समाज, संस्कृती यांचे सार्वत्रिक संमिश्रण दिसून येते. या वैश्विक 'संमिश्रणातून' अनेक 'मूळ' प्रश्ण निकालात निघण्याची आणि नविन जटील प्रश्ण तयार होण्याची लक्षणे दिसत आहेत.]

शांत, सुसंस्कृत असे किती भारतीय अमेरिकेत काम करतात. >>> Happy
@सई - तुम्ही फक्त तुमच्याच आजुबाजुच्या लोकांशी relate करता आहात माझा मुद्दा.
टॅक्सी चालवणारे ( आणि भारता प्रमाणेच उर्मट पणा दाखवणारे ), illegally भारतीय होटेल्स मधे काम करणारे. English बोलता सुद्धा न येणारे पटेल, पंजाबी आणि हैद्राबादी असे कीतीतरी आहेत युरोप, अमेरिकेत विसा साठी apply करणारे. अमेरिकन इमिग्रेशन तुमच्यात आणि त्यांच्यात कसा फरक करणार? आणि ते संख्येनी जास्त आहेत. IT सारख्या इंग्लिश मधल्या क्षेत्रात सुद्धा प्राथमिक पातळीचे इंग्लिश बोलता न येणारे लोक मी UK मधे पाहिले आहेत.

अशा स्किल्ड पालकांना झालेली मुलंपण बुद्धिमान आणि कष्टाळू असतात.>>> मान्य पण बाकिच्या ( वर उल्लेखलेल्या ) लोकांचे काय?

लंडन ला वेंबली वगैरे भागात जावुन या, भारतात आल्यासारखे वाटते ( वाईट अर्थानी ).

अजुन एक मुद्दा - भारतात ल्या शासकीय यंत्रणा, विद्यापिठे यांनी आपली विश्वहार्रता गमावली आहे. पासपोर्ट वरती जे नाव आहे, तेच खरे आहे का त्याची गॅरेंटी नाही. पदवी, मार्कलिस्ट खरी आहे का गॅरेंटी नाही. गुन्हेगारी background आहे का ? गॅरेंटी नाही.

दहा वर्षा पूर्वी UK WP साठी तुम्ही दिलेली माहिती आणी प्रमाणपत्रे पुरेशी असायची. आता ते स्वतंत्रपणे background verification करतात. याचे कारण आपल्या लोकांनी दिलेली खोटी माहिती.
मी ह्या ओझ्या बद्दल बोलत होतो. भारताबद्दल जी जगात प्रतिमा आहे त्याचे ओझे तुम्हाला वाहायलाच लागेल. ह्या मुळे तुम्हाला वाईट अनुभव येत आहेत.
कदाचित १० वर्षांनी ते भारतीयांना पुर्णपणे ban पण करतील.

मला लेख वाचून सुरुवातील असे वाटले, नक्की काय कारण हेच कळले नाही.
(नंतर सईचे प्रतिसाद वाचून थोडा प्रकाश पडला.. :))

१) विसा प्रोसीजर कठिण म्हणून व त्या दिव्यातून जाणं वैताग झाला म्हणून 'परत' आले.
२) राजकारण इथले पटत नाही पण इथे येवून राजकारणात काहितरी करु शकतो, तिथे(अमेरीकेत) बसून बाता मारण्यापेक्षा.. म्हणून 'परत' आले.
३) लग्नाची भिती मला मुळ्ळीच कशी नाहीच आहे .. म्हणून 'परत' आले.

Happy

पण, असे आहे ना?
पुर्वी गोष्ट वेगळी होती, पुर्वी परत गेला असता तर भारतातल्या ज्या लोकांना जायला मिळत न्हवते त्यावेळी व जरा कठीण होते म्हणून अश्या कोल्ह्यांनी, काय करता आले नाही म्हणून 'आले परत' म्हणणे ट्रेंड होती. आता बरेच जणं येतात/जातात; व भारतात सुद्धा चांगले स्कोप आहे माहितीय त्यामुळे 'परत' आले ह्याची चिंता तशी कमीच असते लोकांना. अजून असतील काही 'कोल्हे' टाईप तर त्यांना हि चिंता भेडसावते व ते विचारु शकतात. Happy
दुसरे म्हणजे, तुम्हाला कसलीच भिती जर नसेल तर लोकांनी , 'परत का आलात' विचारले तर ठोकून द्यायचे, इथली कल्याण भेळीच्या आठवणीने आले परत हो? किंवा तुमचे गोड बोलणे न्हवते एकायला मिळत म्हणून आले असे द्यायचे ठोकून ,.. त्यात काय? Happy ए. फु. स.
बाकी, असाच विषय निघालाय म्हणून सांगते, तुम्हाला उपयुक्त नाहीये पण माहीतीसाठी म्हणून; देशात उच्चशिक्षित मुलांची कमी नाही सध्या तरी. मार्केट तसे बरेय, मध्ये जरा रीसेशन होते ह्या बाबतीत असे विवाह मंडळ चालवणारी एक मावशी म्हणाली.
Happy

तुमच्या भारतातील वास्त्व्यास शुभेच्छा! इथे फुले मंडईत कुजकी फुले मिळतात,ताजी फुले मिळणे जिकरीची प्रोसेस आहे पण तिकडची लिली खूप सुंदर असे न होवो.

गंमतीने लिहिलेय हां. पण खरेच शुभेच्छा!

@ झंपी

हो लेखाचा जर घोळच झालाय. ते खरंय. फक्त व्हिसा वर लिहायला हवं होतं. म्हणजे नीट कळला असता.
मेन प्रोबेल तोच आहे आमचा. पण आता परत लिहायला बोर झालंय.

@ प्रसाद

मी २२१ लागू होणा-या स्कील्ड व्हिसाबद्दलच बोलतीये. त्यात h १ B, j १ आहेत. पण software वाल्यांना कशी पद्धत असते माहित नाही. काही रिपब्लिकन नेत्यांचा असा प्लान होता की प्रत्येक स्किल्ड immigrant ला लगेच green card द्यायचे. जेव्हा रिपब्लिकन राजकारणी immigrants बद्दल असे उद्गार काढतात तेव्हाच तुमची तिथली किंमत काय आहे हे दिसून येतं! असो.

>> हो लेखाचा जर घोळच झालाय.
मलापण तेच वाटलं Happy
बाकी, वैयक्तिक अनुभव असाय की.... फुले मंडई, हक्काची बेकारी, रिक्षा, अंजीर वै महिनाभराची करमणूक नंतर... जाउदे आता काय करू शकतो Sad

.

पण इथे परत येण्यातल्या करणांमध्ये भारतात उद्योजक बनणे/ बाहेरचे तंत्रज्ञान इथे रुजवणे आता पूर्वीपेक्षा जास्त सोपे आहे हा ही एक आहे.>>>>>>>
हे जर कारण असेल तर अतिशय उत्तम.
ऑल द बेस्ट!

Pages