श्वास उरलेला..

Submitted by रसप on 18 February, 2013 - 03:39

समजून मनाला घेत
दिलासा देत
सराव्या राती
शब्दांत जुनीशी ओल
जिला ना मोल
तरीही गाती

खिडकीत चंद्र हो दंग
शुभ्रसा रंग
दु:ख उजळावे
डोळ्यांतुन येई गाज
खोल आवाज
कुणी ऐकावे ?

हा रोज चालतो खेळ
सरे ना वेळ
हताशा वाटे
अज्ञात व्यथांचे पूर
वृथा हुरहूर
भोवती दाटे

'देवास दया नाहीच'
म्हणावे मीच
तुला ना कळते
जपणे श्वासांची वीण
जीर्ण अन् क्षीण
मला ना जमते

तू बद्ध दूर दगडात
स्वत:च्या आत
कधीचा असशी
आठवते, केले मीच
असा मी नीच
म्हणुन तू नसशी

हा भोग भोगणे भाग
कपाळी डाग
मीच लिहिलेला
मृत्यू न मिळे दानात
आर्त प्राणात
श्वास उरलेला..

....रसप....
१८ फेब्रुवारी २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/blog-post_18.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !
सर्वच कडव्यांतून मनाची आर्तता व्यक्त झाली आहे.

रणजितदा,
राती गाती हे छान जुळलं आहे ,
पण कोण कोण गाती हे स्पष्ट झालं नाही.
समजून घेण्यात मी कुठेतरी कमी पडतो आहे बहुतेक.

मनाला समजून न घेता न सरणाऱ्‍या रातीच, जुनीशी पण मोल नसलेली ओल असणाऱ्‍या शब्दांचं गीत गात आहेत असा अर्थ मला जाणवला.

मस्त रे... लावणी , सवाल- जबाबत, यात हे मिटर खूपदा वापरलेलं आहे. पण याची मजा औरच.

सरता सरता मनाला दिलासा देण्यासाठी, जुन्या निरर्थक किंवा बिनमहत्वाच्या भावनांना ह्या राती गात आहेत.
- असे काहीसे.