माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

Submitted by तुमचा अभिषेक on 2 February, 2013 - 02:54

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खरे तर नावातच ऑर्कुट असल्याने हे वेगळे सांगायला नकोच, तरी साधारण २००७ सालाची असावी. नक्की महिना आठवत नाही पण वातावरणनिर्मितीसाठी थंडीचा पकडून चला. मी २००६ साली कॉलेज पासआउट होऊन माझा पहिलाच जॉब करत होतो, ज्याला साधारण वर्ष झाले होते आणि आयुष्यात बर्‍यापैकी आर्थिक स्थिरता आल्याने सामाजिक गरजा भागवायला म्हणून ऑर्कुटवर पदार्पण केले होते. त्यामुळे तसा मी ऑर्कुटवर अगदी नवाकोराच होतो. आज मी काही मराठी ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे म्हणून ओळखला जातो, पण तेव्हा दोन कवडीचा सामान्य ऑर्कुटर्सही नव्हतो. ज्या शाळा कॉलेजच्या मित्रांना फ्रेंडलिस्टमध्ये जमा केले होते ते औपचारिकता म्हणून एखाद दुसरा स्क्रॅप करून पुढे बोलायचे नावच घेत नव्हते. ऑर्कुट समूह नावाचा प्रकारही माहीत नव्हता. दोनचार फोटो अपलोड केले, चारचौघांचे अपडेट्स चेक केले, पण आता पुढे या ऑर्कुटवर करायचे काय हा एक यक्षप्रश्न..! आणि ऑर्कुट नाही वापरायचे तर नेटचे बिल कसे वसूल करायचे हा होता दुसरा प्रश्न..!! या दोघांवर तोडगा म्हणून मग नेट फ्रेंडस जमवायला सुरुवात केली आणि अंदाजापेक्षा भरभर जमतही गेले. काय कसे जमवायचे याचीही काही खास स्ट्रॅटेजी नव्हती, मात्र या आभासी जगात ज्यांच्याशी माझी मोडकीतोडकी का होईना ओळख व्हायची त्यांच्याशी चॅटवर माझ्या खर्‍या मित्रांपेक्षाही जास्त बोलणे व्हायचे. काही दिवसांतच मी एक गोष्ट समजून चुकलो की भिन्नलिंगी आकर्षणाचा फंडा इथेही आपले काम करतो. मुलामुलांची किंवा मुलीमुलींची मैत्री होण्यापेक्षा मुलांची मुलींशी अन मुलींची मुलांशी इथे जास्त जमते. तसेही प्रत्यक्ष आयुष्यात पोरींशी खुलून बोलायला मी लाजायचोच, म्हणून मग इथे येऊन ऑर्कुट मैत्रीणी जमवायला सुरुवात केली. अनोळखी मुलींना त्यांचे प्रोफाइल्स (अर्थात फोटोच) बघून रॅंडम फ्रेंड रीक्वेस्ट पाठवायचो. खोर्‍याने पाठवलेल्या रीक्वेस्टपैकी बर्‍याचश्या रीजेक्टच व्हायच्या पण कधीतरी एखादी अ‍ॅक्सेप्ट झाली की आनंदाला पारावार नाही उरायचा. त्या मुलीला लगेच वेलकम केले जायचे आणि तिचा रीप्लाय येऊन ती आपल्या मैत्रीखात्यात जमा झाली की त्या महिन्याचे नेटचे बिल वसूल झाल्यासारखे वाटायचे.

झाले.... वैतागलात हे पारायण वाचून... चला थेट मुद्द्यालाच येतो...!

अश्यातच एका महिन्यात बोनस लॉटरी लागल्यासारखेच वाटले जेव्हा हेतल शाहने (मुलीचे नाव बदलले आहे, पण होती ती गुज्जूच) माझी रीक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली. माझ्या स्क्रॅप्सनाही तुरंत रीप्लाय आले, एवढेच नव्हे तर दुसर्‍याच दिवशी प्रॉपर चॅट ही सुरू झाली. ओळख-पाळख, आवडीनिवडी सारख्या फॉर्मॆलिटी भराभर उरकत आमची गाडी कधी मुक्त फ्लर्टींगवर घसरली माझे मलाच समजले नाही. कारण समोरून देखील पावले दणादण पडत होती. आठवड्याभरातच फोन नंबर एक्सचेंज झाले. तसे त्या आधीही मी ऑर्कुटवरून चार-पाच मुलींचे फोन नंबर मिळवले होते, (कधी फोनवर बोलायची हिंमत झाली नव्हती ती गोष्ट वेगळी) पण त्यामुळे या गोष्टीचे एवढे अप्रूप वाटले नाही. तरीही आठवड्याभरातच ही कामगिरी बजावल्याने या "केस"बाबत आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. (खरे तर आधी मी "केस" च्या जागी "शिकार" हा शब्द वापरायचो पण पुढे दोन-तीन ठिकाणी माझीच शिकार झाली असल्याने तेव्हापासून मी हा शब्द वापरणे सोडून दिले. असो, त्याबद्दल पुन्हा कधीतरी..)

तर, आमची ओळख झाल्यापासून दहा-बारा दिवसांनंतरचीच गोष्ट. एके दिवशी चॅटवर बोलताना तिने दुसर्‍या दिवशी मी बहीणींबरोबर सिनेमाला जातेय असे सांगितले. मी तिला सिनेमाचे नाव विचारले आणि सहजच म्हणालो, "क्या बात है, मलाही बघायचा आहे हा सिनेमा. मलाही ने की मग बरोबर...." खरे तर तो कोणता सिनेमा होता हे आता आठवतही नाही. कारण तो कुठे खरेच माझ्या आवडीचा होता, पण चॅट ही अशीच केली जाते. आपल्या आवडीनिवडी जुळतात हे सांगायचा एकही मौका इथे सोडला जात नाही.

(इथे आणखी एक गोष्ट वेळीच नमूद करतो - मुलगी गुजराती असूनही अगदी अस्सखलित नसली तरी एकदम फाकडू मराठी बोलायची. आमची सारी चॅट मराठीतच चालायची. त्यामुळे मी सुद्धा मातृभाषेत चॅट करत असल्याने बेफाम सुटायचो आणि मुलींना ईंम्प्रेस करायचे माझे सारे पैतरे आजमावू शकायचो.)

असो,
तर ती म्हणाली, "अरे बरोबर सिस्टर आहेत ना, त्यांच्याबरोबर नाही नेऊ शकत रे. समजा करो यार. त्यापेक्षा आपण रविवारी भेटूया ना. बोल, क्या बोलता है." .........अन मी खल्लास.

मला ती सिनेमाला नाही बोलणार याची खात्री होतीच, नव्हे या व्यतीरीक्त तिने काही बोलावे अशी अपेक्षाही नव्हती... पण चक्क रविवारी भेटूया असे म्हणेल हे कल्पनेच्या बाहेर काय अगदी आरपार पल्याड होते. गोड धक्का होता तो एक. धक्क्याच्या पलीकडेही एक शॉक होता तो ज्यातून पुढची पंधरा मिनिटे मी स्टेप बाय स्टेप सावरतच होतो. कारण हे ती केवळ मला टाळण्यासाठी किंवा औपचारीकता म्हणून म्हणाली नव्हती. पुढच्या पंधरा-वीस मिनिटांच्या चॅटींगमध्ये आमचा येत्या रविवार भेटीचा प्रोग्राम नुसता फिक्सच नव्हता झाला, तर काय कुठे अन कसे याची सारी रुपरेषाही ठरली होती.

तर मित्रांनो,
येत्या रविवारी ती..., माझी गुज्जू ऑर्कुट फ्रेंड..., मिस हेतल शाह..., मला ठीक संध्याकाळी साडेपाच वाजता..., वडाळा-माटुंगा जवळच्या..., फाईव्ह गार्डनला..., भेटणार्रच होती..!

फाईव्ह गार्डन म्हणजे माझी डिप्लोमाची चार अन डीग्रीची तीन वर्षे ज्या वी.जे.टी.आय. मध्ये गेली त्याच कॉलेजला लागून असलेला परीसर. कॉलेज बंक करून किंवा सुटल्यावर संध्याकाळी किंवा स्टडीनाईट मारायला म्हणून हॉस्टेलला जायचो तेव्हा अभ्यास करून वैताग आला की आमची जी काही फिरण्याची ठिकाणे वा अड्डे होते त्यातील सर्वात वरच्या नंबरवर हे फाईव्ह गार्डन. रात्रीचे जेवण जिरवण्यासाठी म्हणून याला दोन चकरा मारणे हा आमचा नेहमीचा शिरस्ता कारण याचवेळी आजूबाजुच्या काही अप्सराही इथे याच कारणासाठी अवतारायच्या. त्यामुळे या परिसराचा चप्पा चप्पा मला ठाऊक होता. याचा फायदा असा की निदान जागा तरी माझ्या सवयीची असणार होती.

तिथून पहिला आम्ही एका हॉटेलमध्ये जाणार होतो, जे जवळच होते, पण कॉलेजच्या दिवसांत महागडे वाटत असल्याने फारसे जाणे व्हायचे नाही. तिथे अर्थातच खाणेपिणे होणार होते आणि ते उरकल्यानंतर पुढे आपण काय करणार असे मी भोळेपणाचा आव आणत चॅटवर विचारताच ती म्हणाली, "अरे फाईव्ह गार्डन पडा है ना इतना.. वही घूमेंगे, फिरेंगे... बाकडे पे बैठेंगे... बाते करेंगे... और क्या...!"

बस्स.....! ती, मी अन फाइव्ह गार्डन परीसरातील सुनसान अंधेर्‍या गल्ल्या क्षणभरासाठी डोळ्यासमोर तरळून गेल्या..! अन त्या "और क्या" च्या जागी "और बहुत कुछ" दिसायला लागले..!!

माझ्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या होत्या. ऑफिसमध्ये मित्रांना सांगून झाले होते.. काय काय मी करू शकतो आणि त्यातले काय काय खरेच मला करता येईल याच्या रोजच्या रोज चर्चा झडत होत्या.. तिला भेटल्यावर काय गिफ्ट देता येईल याच्या याद्या बनत होत्या.. भेटीच्या दिवशी घालायचे कपडे वेळीच धुवायला टाकले होते.. दर दीड दिवसांनी उगाचच्या उगाच दाढी करून क्लीन शेव राहण्याची सवय करत होतो.. तिचा एक फोटोही तिच्या ऑर्कुट अल्बममधून डाऊनलोड करून मोबाईलवर घेतला होता. जो अधूनमधून बघत राहायचो जेणे करून तिला भेटल्यावर एका जुन्या ओळखीच्याच व्यक्तीला भेटत आहे असे वाटून कम्फर्टेबल फील करेन..... अजूनही काय काय केले त्या धुंदकीत आठवत नाही पण जवळपास हवेतच तरंगत होतो काही दिवस.. पहिल्यांदाच जे मी अश्या ऑर्कुटच्या माध्यमातून एका मुलीला भेटायला जाणार होतो..!

भेटीचा रविवार उजाडला. भेट संध्याकाळची असली तरी सकाळीच बिछान्यात उठून बसलो. इतक्यात आठवले की पुरेशी झोप नाही झाली तर चेहरा फ्रेश नाही दिसणार म्हणून पुन्हा चादरीत घुसलो. मग मात्र सुर्य डोक्यावर आल्यावरच उठलो. आंघोळपाणी नाश्ता जेवण एकेक करत सारे उरकून घेतले. अधूनमधून टेबलवर उघडूनच ठेवलेल्या कॉम्प्युटरवर नजर टाकत होतो.. पण ती ऑनलाईन दिसत नव्हती.. भेटायचा टाईम संध्याकाळी सहाचा होता.. घरच्या घड्याळात पाच वाजत आले पण तरीही ती ना ऑनलाईन येत होती ना तिचा फोन येत होता....

..........आणि अचानक सव्वा-पाचच्या ठोक्याला रींगच वाजली आणि मोबाईलच्या स्क्रीनवर तिचे नावच बघून माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला..!!

फोन उचलता समोरून तिचा चिडलेला स्वर, "सो गये थे क्या? फोन क्यू नही लग रहा था?? कबसे ट्राय कर रही हू..."
मला समजले नाही, खरेच तिचा फोन लागत नव्हता की आणखी काही... म्हणजे... विचार वगैरे तर बदलला नव्हता तिचा...
पण नाही मित्रांनो... तसे काही नव्हते...
"चल ये आता लवकर ठरलेल्या ठिकाणी...." असे ती म्हणाली आणि मी फोन उराशी कवटाळून थेट कपाटातच शिरलो..!

तेव्हाची माझी फेवरेट कडक ब्लॅक जीन्स आणि नवीनच घेतलेले ब्ल्यू रंगाचे डेनिमचे शर्ट, त्याला शोभेलसे सिल्वर डायलचे घड्याळ एका हातात अन चांदीचा कडा दुसर्‍यात, बारीकशी सोनसाखळी गळ्यात अन वूडलॅडचे शूज पायात. उन्हे उतरली असल्याने आता उगाच शायनिंग मारायला घेतल्यासारखे वाटू नये म्हणून गॉगल तेवढा अनिच्छेने घेतला नाही, मात्र अंगभर परफ्यूम फुसफुसवायला विसरलो नाही.
एकंदरीत, पेहराव एका मुलीला प्रथमच भेटायला जातोय, जिला आता इम्प्रेस होण्यावाचून पर्याय नाही अगदी अस्साच..!!

वडाळा स्टेशनवर ट्रेनने उतरण्याची ही माझी पहिलीच वेळ नव्हती. कॉलेजची कित्येक वर्षे तीच ट्रेन, तेच प्लॅटफॉर्म आणि तोच येण्याजाण्याचा रस्ता. पण आज मात्र त्याच्या दोन्ही बाजूंनी फुलांचे ताटवे उगवल्यासारखे वाटत होते आणि मी भर फूटपाथवरून आमीरखान सारखे पहला नशा करत चाललोय असे स्वतालाच वाटत होते. मध्येच आठवण झाली, अरे चॉकलेट घ्यायचे राहिलेच की...

रविवारचा दिवस, एखादे चॉकलेटचे दुकान उघडे सापडेल तर शप्पथ. नशीबाने एका छोट्याश्या पानाच्या गादीवर नजर पडली जिथे छोट्यामोठ्या कॅडबर्‍या लटकवलेल्या दिसल्या. मोठ्या दिमाखात त्या पानवाल्यासमोर उभा राहून ठाकलो आणि चुटकी वाजवतच त्याला ऑर्डर केली, "जो भी सबसे मेहंगावाला चॉकलेट होगा, एक दे देना..."

त्याने कुठून आत हात घालून एक चॉकलेटचा सजवलेला रंगीबेरंगी पुडका काढला देव जाणे. स्वताला बिडीकाडीचा शौक नसल्याने त्या पानवाल्याची पोहोच कुठवर आहे याची मला कल्पना नव्हती, मात्र आता स्वताच्या शब्दाची किंमत राखायला मला तो रंगीबेरंगी पुडा तब्बल २३५ रुपये खर्चून स्विकारावा लागला. आयुष्यात कधी गर्लफ्रेंड असतीच तर तिला वॅलेंटाईन डे’ला गिफ्ट द्यायलाही मी एवढा खर्चा केला नसता जो मी आंतरजालावर सापडलेल्या मैत्रीणीच्या पहिल्या भेटीवर करत होतो. पण हौसेला मोल नसते आणि मलाच हौस होती असे एखाद्या ऑर्कुट फ्रेंडला भेटायची. अर्थात, ही तर फक्त सुरुवात होती, अजून खिश्याला बरीच फोडणी बसायची बाकी होती.

चालता चालता तिला फोन लाऊन बोलता बोलता मी इच्छित स्थळी पोहोचलो. ती तिथे आधीच माझी वाट पाहत उभी होती. अत्यंत साधीसुधी वेशभुषा. जीन्स अन शॉर्ट टॉप घातलेली मात्र जराही नट्टापट्टा नाही किंवा नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसावे यासाठी विशेष मेहनत घेतल्यासारखे जाणवत नव्हते. माझ्या अगदी उलट. तरीही तिचा वावर सराईत अन माझा मात्र किंचित गळपटलेला. तिनेच हात पुढे करून माझ्याशी हस्तालोंदन केले तसे मी काहीतरी बोलायचे म्हणून ठरवूनच आलेले वाक्य पुटपुटलो, "खूप छान दिसत आहेस.."

"ए बस, अभी यहा पे भी मराठी नही हा." तिची पहिलीच प्रतिक्रिया अनपेक्षित.

तिला हिंदी अपेक्षित असावी, मात्र मराठी नाही हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर पहिला इंग्लिश आली आणि आता सारी भेटच बोंबलणार असे वाटू लागले.

"क्या हुआ? गुजराती मे बात करनेको नही बोल रही हू, हिंदी नही आती क्या?"

हिंदीचे नाव काढताच जरासे हायसे वाटले खरे, मात्र लहानपणापासून कितीही रोमॅंटीक हिंदी सिनेमे बघितले असले तरीही जेव्हा एका मुलीशी हिंदीत बोलायची वेळ येते तेव्हा एका मराठी मुलाची कशी तंतरते याचा अनुभव मला पुढच्या काही क्षणातच आला. सुदैवाने माझ्या हालत पे तरस खाऊन तिनेच स्वत: पुन्हा अधूनमधून मराठी सुरू केले अन्यथा आज यापुढे लिहिण्यासारखे माझ्याकडे काहीच नसते. अगदीच एकतर्फी सामना झाला असता.

...............................पण तसाही तो होणारच होता म्हणा.

कधी तिच्या पुढेपुढे, तर कधी तिच्या मागेमागे, तिच्यासाठी हॉटेलचा दरवाजा ढकलणे, तर लेडीज फर्स्ट करत खुर्चीवर तिला पहिले बसू देणे. याप्रकारचे सारे शिष्टाचार कसेबसे काटेकोरपणे पाळत मी तिच्या जोडीने हॉटेलच्या एका कमी गजबजलेल्या कोपर्‍यात स्थिरावलो. वेटरेने मेनूकार्ड आणून दिले तेव्हा मी त्याच्या हातून घेऊन ते तिलाच देणार होतो (अर्थात हा ही एक शिष्टाचार मी रटूनच आलो होतो) मात्र तिनेच थेट झडप घातल्यासारखे ते खेचून घेतले अन तिची नजर झरझर करत मेनूवर फिरू लागली. कधी डावीकडचे जिन्नस तर कधी उजवीकडच्या किंमती चाळू लागली. ते पाहून मी सुखावलो. या विचाराने की एखादी लग्नाची बायकोच अशी नवर्‍याच्या खिशाची काळजी घेऊ शकते. पण हा माझा भ्रम होता हे मला लवकरच समजणार होते. तिच्या डोक्यात नेमका उलटा हिशोब चालू होता की आता याला जास्तीत जास्त कसे कापायचे. मध्येच तिने मेनूकार्डमध्ये खुपसलेले डोके वर काढले, माझ्याकडे बघून एकदा गोडूस हसली आणि पुन्हा आत खुपसले.

"स्पेशल चीज पनीर पावभाजी हंड्रेड रुपीज, स्पेशल कॉर्न-चिल्ली-मशरूम पिझ्झा वन फोर्टी रुपीज, अ‍ॅंड वन वर्जिन पिनाकोलाडा मॉकटेल हंड्रेड एंड टेन रुपीज... टोटल थ्री हंड्रेड अ‍ॅण्ड फिफ्टी ओनली... इतने पैसे है ना, वैसे कार्ड भी चलता है यहा पे." आत खुपसलेल्या तोंडातून आवाज आला.

तिच्या या व्यावहारीकपणाचे कौतुकच वाटले मला. चार दिवसांपूर्वी झालेली आमची चॅट आठवली ज्यात तिने माझा पगार किती हे विचारला होता आणि मी माझे अ‍ॅन्युअल पॅकेज (वार्षिक उत्पन्न) सांगताच दर महिन्याला ईंकम टॅक्स आणि प्रॉविडंट फंड कापून हातात किती पडत असतील याचा तिने चटदिशी हिशोब लावला होता. मात्र तो पगार तिने का विचारला होता ते मला आता समजत होते.

"कार्ड तो है ही, लेकीन पार्सल नही लेके जाओगी तो उतनी कॅश भी है मेरे पास.." काहीतरी पाणचट विनोद मारायचे म्हणून मी बोललो खरे, पण नंतर असे बोलायला नको होते असे वाटून पटकन जीभ चाऊन घेतली. तिला चिडवतोय असे वाटल्याने नाही तर उगाच पार्सलची आयडीया तिच्या डोक्यात भरायची चूक केली म्हणून..

तिला मात्र याचे काहीच पडले नव्हते. तिचे यापेक्षा अजून काही महागडे कॉम्बिनेशन बनवता येईल का याचेच गणित चालू होते. ते सुचण्याआधी मी पटकन वेटरला बोलाऊन तिच्या लिस्टमध्ये माझ्यासाठी एक टोस्ट सॅंडवीच अ‍ॅड करून ऑर्डर दिली. तसे तिनेही मोठ्या जड अंतकरणाने ते मेनूकार्ड बाजूला ठेवले.

"सर, मिनरल वॉटर चाहिये या साधा वॉटर?" वेटरच्या या प्रश्नाने मी चपापलोच.

हल्ली मिनरल वॉटर पिण्याची फॅशन वगैरे आली आहे हे सारे ठिक, पण म्हणून ज्या पाण्यावर आपण आजवर वाढलो त्याला लगेच साधा वॉटर बोलायची काय गरज. मुंबईसारख्या शहरात एवढ्या मोठ्या हॉटेलमध्येही शुद्ध पाणी मिळत नसेल तर हा बृहनमुंबई महानगरपालिकेचा अपमान नाही का झाला. पण तुर्तास हा अपमान गिळण्याव्यतिरीक्त माझ्याकडे पर्याय नव्हता. आता तिच्यासमोर कसे त्या वेटरला ‘हमको साधा वॉटरहीच मंगता है’ बोलणार. लाज राखायला म्हणून मग मी,
"हा हा बिनधास्त.. मिनरल क्या डबली मिनरल वॉटर ला.." पुन्हा असेच काहीतरी बरळलो. ज्याचा फटका मला ३० रुपयाला पडला जेव्हा तो दोन बाटल्या पाणी घेऊन आला.

आता ऑर्डर येईपर्यंत वेळ होता. एकदा आली की ही त्यावर अशी तुटून पडणार की माझ्याकडे जराही लक्ष देणार नाही हे मी तिच्या तोंडाला सुटलेल्या पाण्याकडे बघून समजून चुकलो होतो. ती मेकअप न करता, लिपस्टीक न लावता का आली होती या एकेक गोष्टींचा आता हळूहळू उलगडा होत होता. तरी मी घातलेले नवीन कोरे शर्ट तिच्या नजरेस पडावे म्हणून मुद्दाम तिच्या समोर हात नाचवत त्याचे बटण उगाचच्या उगाच काढून लावल्यासारखे केले.

"नया शर्ट?" लक्ष गेलेच तिचे.

"हा.. नही... म्हणजे हा.. तसा नवीन पण तसा जुना पण नाही .. " मी नक्की काय उत्तर द्यावे या गोंधळात. नवीन बोलावे तर आपल्याला भेटायला खास नवीन शर्ट घालून आला असे मला तिला वाटू द्यायचे नव्हते आणि मुद्दाम जुने बोलावे तर मला भेटायला जुनेच शर्ट घालून आला असेही तिला जाणवू द्यायचे नव्हते.

"ओके ओके, जो भी है, अच्छा है. जच रहा है तुमको. पर पता नही सब लडके डेट पे ब्लू शर्ट ही पहन के क्यू आते है..."

डेट पे... अईई ग्ग... पुनश्च काळजात धस्स... म्हणजे मी हिच्याबरोबर, म्हणजे आता आम्ही जे हॉटेलात खायला बसलो होतो ते, म्हणजे ही डेट होती तर.... मन पुन्हा एकदा फाईव्ह गार्डनच्या अंधेर्‍या गल्ल्यांमध्ये फिरून आले.. त्यातील "सब लडके" हा शब्द सोयीस्कररीत्या दुर्लक्षून.

इतक्यात ऑर्डर आली आणि ती खाण्यामध्ये तर मी खयालोमे गुंग झालो.

"मुझे बच्चे बहोत पसंद है.. आय लव किडस.." बाजुच्या टेबलवर गोंधळ घालणार्‍या लहानग्यांकडे बघत तिला ईम्प्रेस करायच्या हेतूने काहीतरी विषय काढायचा म्हणून मी बोललो.

"दुसरोके है ना इस लिये.. खुद के होंगे ना, तो पता चलेगा.." तिने मला उडवूनच लावले. हि बाई माझी सारी गणिते चुकवत होती. चॅटवरून मी हिच्याबद्दल जो अंदाज बांधला होता त्यापेक्षा सारे वेगळेच घडत होते.

"तो तुम को क्या पसंद है?" मी विषय पुढे रेटला.

"डार्क चॉकलेट चिप्स विथ वॅनिला आईसक्रीम.... एटी रुपीज प्लस टेन रुपीज वॅफल कोन.." पुन्हा एकदा माझे गणित चुकले होते. उगाच नको तो विषय काढून फसलो होतो.

मिनिटभराची शांतता..........

"मंगाऊ" .... "मंगाओ" ... आमच्या दोघांच्याही तोंडून एकत्रच बाहेर पडलेले समानार्थी विरुद्द शब्द.

ती याचसाठी आली होती आणि माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आतापावेतो एक गोष्ट समजून चुकलो होतो ती म्हणजे मराठी मुलाला गुजराती मुलीबरोबर "डेट" वर जायचे असल्यास आपली मध्यमवर्गीय वृत्ती घरीच ठेऊन यायला हवी.

तिचे खाणेपिणे एकदाचे आटोपले तसे मला अर्धवट पोटी असूनही जरा तरतरी आली. अजून काही ऑर्डर व्हायच्या आधी मी बडीशेप तिच्या तोंडी कोंबून तिला हॉटेलच्या बाहेर काढले. एव्हाना बाहेर छानसा अंधार पडला होता. जमेची बाजू ही की चांदणे देखील नव्हते. फाईव्ह गार्डनच्या दिशेने जाणार्‍या त्या अंधार्‍या गल्ल्या आणखी काळ्याकुट्ट भासत होत्या. यापेक्षा रोमॅंटीक वातावरण ते काय.. मी माझी पावले नकळत अशी जाणूनबुझून त्या दिशेने वळवली. आमचे चॅटवर ठरल्याप्रमाणे ती देखील पाठोपाठ येणारच होती.... मात्र तेवढ्यातच माशी शिंकली.. आय मीन कुत्री भुंकली... आणि आमचा अबाऊट टर्न..!

पण मी इतक्यात हार मानणारा नव्हतो. एकदा मूड तयार झाल्यावर आता पीछे मूड.. छ्या शक्यच नाही. माझ्याच कॉलेजचा परीसर होता तो. तेथील कुत्रे भले मला विसरले असतील, पण रस्ते माझ्या ओळखीचे होते. दुसर्‍या रस्त्याने आम्ही फाईव्ह गार्डन गाठले. पंचउद्यानाच्या मध्यभागी आम्ही दोघे. पांच ही उद्याने आम्हाला हाका मारून मारून बोलवत आहेत असा भास मला होऊ लागला. कोठे अंधार जास्त आहे तर कोठे माणसे कमी आहेत, तर एकीकडचा बाकच जेमेतम दोघे बसतील एवढा छोटा आहे. मी कुठे जावे आणि कुठे नको या गोंधळात असताना तीच म्हणाली, "यहा पे नही, मामा उठा लेंगे"
"मामा? किसके मामा?"
"तेरे मामा, मेरे मामा, हम सबके मामा.. मुझे नही चाहिये ये सब ड्रामा.."
मी काय ते समजलो. पोरगी फारच पोहोचलेली होती. मी आता या परिस्थितीत नक्की उतावीळ व्हावे की घाबरावे हे न समजल्याने गोंधळून कसेबसे उसने अवसान आणून तिला विचारले, "फिर....., अब कहा?"
"वहा......" मानेला हलकासा झटका देत, पापण्यांची अलगद फडफड करत तिने मला दिशा दाखवली. त्याच वेळी तिने खालचा ओठ ही दातांमध्ये चावल्याचा मला भास झाला खरे, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत तिने दाखवलेल्या दिशेला नजर टाकली तर पुन्हा एक अंधेरी गल्ली.. आणि मन पुन्हा एकदा.. पुन्हा एकदा..

प्रकाशातून काळोखाकडे प्रवास करताना फक्त एकच अपेक्षा मनात होती ते आता परत इथे ही कुत्रे निघू नयेत. आली तर एखादी घूसच यावी जिला घाबरून हिने टुनकून उडी मारावी आणि...... पण घूस काही यायची नव्हती. आम्हीच हळूहळू गल्लीत घुसत होतो. काहीही न बोलता. माझी घूसमट वाढू लागली तसे मीच तिला म्हणालो, "और कितना अंदर घसीटोगी? वो भी इतने अंधेरेमे, मेरा पैर घसर गया तो?" काही तरी "घ" ला "स" जोडून बोलायचे म्हणून बोललो. तसे ती म्हणाली, "अरे रस्ते पे पाणी थोडी ना है, नही घसरेगा पाव." .... माझे तिच्याबद्दलचे मत पुन्हा बदलले. मुलगी तेवढीही पोहोचलेली नव्हती.

अखेर एका टुमदार घराशी थांबलो. दारात मिणमिणता दिवा. अंगणाचे बंद फाटक ज्याला रेलून ती उभी राहिली. माझ्या डोक्यात आम्ही कुठेतरी बाकड्यावर बसून बोलणार असे होते, या पोजिशनचा मी विचारच करून आलो नव्हतो. आता कसे उभे राहायचे याच विचारात मी दोनचार वेडेवाकडे अंगविक्षेप दिले. तसे ती म्हणाली, "अरे ऐसे मत करो, वरना मम्मी देख लेगी."

"मम्मी?" मी किंचाळलोच, "इकडे कुठे मम्मी? अग डेटला आलोय ना आपण"

"अरे ऐसे मत चिल्लाओ, बंटी जाग जायेगा"

"आता हा बंटी कोण? जागतोय तर जागू दे", हा बंटी नक्कीच तिचा भाऊ असणार, कारण ज्या घरासमोर आम्ही उभे राहिलो होतो ते तिचेच होते हे एव्हाना मला उमजले होते.

बंटी मात्र त्याचे नाव ऐकताच जागा झाला. त्याच्या गुरगुरण्याचा आवाज त्या भयाण शांततेचा भंग करत माझ्या कानात शिरला तेव्हा या अंधार्‍या गल्लीत शिरताना या मुलीला कुत्र्यांची भिती का नाही वाटली याचा उलगडा मला झाला. कारण हा तिच्या बंटीचा इलाका होता.

गुजराती कुत्र्याला कसे चुचकारतात याची मला काहीच कल्पना नव्हती. ‘केम छे’ अन ‘सारू छे’ हे माझ्या शब्दकोषातील दोन शब्द तरी नक्कीच पुरेसे नव्हते. उलट "छे" च्या जागी त्याने "छू" ऐकले तर आणखीनच मागे पडण्याची शक्यता होती. हळूहळू गुरगुर-ए-बंटी वाढू लागली तशी डोक्यात धोक्याची घंटी वाजू लागली. गुर्रगुर्र गुर्रगुर्र ठणठण ठणठण........ ठणठण ठणठण गुर्रगुर्र गुर्रगुर्र..... धूम ठोकण्याआधी मी शेवटची नजर मागे टाकली ते फाटकाला ओलांडून बाहेर यायच्या प्रयत्नात असलेल्या बंटीचे दोन भलेमोठे पाय नजरेस पडले. त्यानंतर अध्येमध्ये थांबण्याचा प्रश्नच नव्हता.

ज्या पानवाल्याकडून चॉकलेटचे पुडके घेतले होते त्याच्यासमोरच मी धापा टाकत उभा होतो. या नादात खिशात ते पुडके तसेच राहिले होते. निम्म्या किंमतीत तो ते परत घेतो का म्हणून विचारायचे होते. पण धावण्याच्या नादात त्याचा पार चेंदामेंदा झाला असल्याने आता तो प्रश्नच उदभवत नव्हता. मी निराश हताश असा आता यापुढे या प्रकारचा गेम कधीच खेळायचा नाही असा कानाला खडा लाऊन तिथून निघालो. पाठीमागून पानवाल्याने रेडीओवर लावलेल्या गाण्याचे सूर कानावर पडत होते.... जिस गली मे तेरा घर जो हो बालमा... उस गली से मुझे तो गुजरना नही...

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपा चव्हाण,
धन्यवाद
माझ्यासाठी हे नवीन आहे, यात माझे काही नुकसान नसल्याने दुर्लक्ष करणेच उत्तम, मात्र तिथे ही कथा माझी आहे म्हणून मायबोलीच्या या धाग्याची लिंक तेवढी टाकून आलो.
असो, आपण हे निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी आहे. Happy

ती तर घरी त्या दिवशी सांगूनच आली असावी की मला आज जेवायला नकोय.
donald-duck-022007-3.gif

ऑर्कुट, याहू मॅसेंजर..... जुन्या आठवणी ताज्या झाल्या

अभी साल्या..... प्रत्येक वाक्याला पोट धरून हसताना (एकदा-दोनदा तर हाफीसात सीट वरून उठलो सुध्दा) तुला शीव्या घालत होतो, भाड्याने... काय जबरदस्त लिहीले आहे... प्रत्येक सीन डोळ्यासमोर उभा राहत होता...
आणी हो शीव्या खुपच प्रेमाने आणी मैत्रीच्या नात्याने घालत होतो Wink (i hope ki tulaa RAAG nahi yenaar) कारन तुला न भेटता ही तु एक chaan मित्र झाला आहेस... Happy

अरे येथील प्रतिसाद वाढले, लक्षच नव्हते माझे...
सर्वांचे आभार.. Happy

प्रसाद __ समजते तेवढे, राग येण्याचा प्रश्नच नाही.. आणि भेट तर कधी ना कधी होईलच Happy

Hi Abhishek,
loved this story. I have my YouTube channel where I read Marathi stories. Can I read this in it? Please search "Aarati Marathe" on YouTube and you will find all the playlists.

हो चालेल काही प्रॉब्लेम नाही. ईनफॅक्ट आवडेल मला Happy
ती लिंक ईथेही शेअर करू शकता.

(जर तुम्हाला कल्पना नसेल तर - ऋन्मेष = अभिषेक - एकच आहेत.)

मस्त लिहिलयं.. लेखावरून मला माझी ऑर्कुट भेट आठवली. ज्याच्या बरोबर भेट झाली तो आयुष्याचा जोडीदार हि झाला. मेट्रोमोनियल साइट वरून त्यानेच मला ऑर्कुट वर शोधलं होतं. खूप गोड आठवणी आहेत ऑर्कुट साइटच्या. पण पहिल्या भेटीतल्या ज्यूसचे बिल मी दिलं होतं बरं का..

ज्याच्या बरोबर भेट झाली तो आयुष्याचा जोडीदार हि झाला.
>>>
सेम हिअर.
हि पहिली मुलगी होती मला ऑर्कुटवरून भेटलेली.
पण जी सातवी मुलगी भेटली तिच्याशी लग्नही केलेय Happy

Abhishek/Rinmesh- will do - will post a YouTube link here. I will take a print out of this story as it becomes easy to read that way. Thanks a ton Happy

Hi Abhishek,
First of all thanks for allowing me to read your story on my YouTube Channel. Please find link to your story
https://youtu.be/4-5uXCVR93Q
https://youtu.be/oIU0b7G0454
I divided it into two parts. Let me know your feedback. Also share it with your family and friends as this is such a historical story about Orkut.
Best wishesh
- Aarati Marathe

मस्त
दोन्ही भाग पुर्ण ऐकले
काही संवादाच्या जागा voice modulation / आवाजाच्या बदललेल्या टोनमुळे छान वाटल्या.
मूळ कथा असे स्टोरीटेलिंग करण्यासाठी लिहीली नसल्याने काही बदलही चालले असते. अर्थात तुम्ही ते टाळत असाल.
पण ओवरऑल छान वाटले. त्यात स्वत:चीच कथा असल्याने एक्स्ट्रा छान. मित्रमंडळींना पाठवतो या यूट्यूब लिंक्स Happy
धन्यवाद Happy

फीडबॅक - व्हिडीओ मध्ये स्टोरी सांगतानाच तुमचा क्लोज अप न ठेवता स्टोरी शी रिलेटेड फोटोज टाकता येतील का? सिम्पल फोटोज... एक मुलगा.. मुलगी... रेस्टारंट ...फूड.. कॉफी.. वगैरे...

व्हिडीओ मध्ये स्टोरी सांगतानाच तुमचा क्लोज अप न ठेवता स्टोरी शी रिलेटेड फोटोज टाकता येतील का? सिम्पल फोटोज... एक मुलगा.. मुलगी... रेस्टारंट ...फूड.. कॉफी.. वगैरे...

+१००

पण जी सातवी मुलगी भेटली तिच्याशी लग्नही केलेय
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 02:07

हे मी आधी चुकून असं वाचलं ...

पण जी सातवी मुलगी भेटली तिच्याशीही लग्न केलेय

व्हिडीओ मध्ये स्टोरी सांगतानाच तुमचा क्लोज अप न ठेवता
>>>>>
मला क्लोज अप बाबत काही बदलावे असे वाटले नाही.
पण प्रॉब्लेम ती स्टोरी पाठ नसल्याने सारखी वाचावी लागते. आय कॉन्टेक्ट तुटतो. नुसते समोर बघूनच आपण जेव्हा एखादी स्टोरी सांगतो तेव्हा ती जास्त परीणामकारम वाटते.
पण अर्थात याला ईलाज तो काय.

Thanks for the feedback on video. My 2 cents
1. @Runmesh/Abhishek - yes story path naslyane khali war baghav lagat. I haven't taken any professional training on this also due to Covid, I don't have any set up at home other than my mobile. :). I wanted to do alternations but hadn't taken your permission so didn't feel it right but added "Jay Shrikrishna" at the end when Hetal calls. Generally Gujjus say that instead of Hello but this girls talks in an angry tone so didn't feel to add it in the beginning.
2.@chrupsa, @Manimau, @Dhanudi and others - adding photos, background music takes a lot of time and editing. I am a full time working person. Believe me they are wonderful suggestions but due to time constraint it is not possible and I do this right now just as a hobby Happy and I enjoy this process but will definitely think of all these suggestions in near future. Thanks a ton. Also I can read your stories too if you are ok. I need to check them though.
3.@Manav - thanks a ton Happy
Guys, this is my office laptop and don't have Marathi font installed so I need to type in English pan maz marathi hi uttam aahe Happy
All the best to all of you and waiting to read more material from Maayboli as there are hardly any authors in Marathi or books get published. One more thought behind reading the stories from Maayboli is to get more audience here and appreciate the talent this website has , we have lot of amazing authors here

< there are hardly any authors in Marathi or books get published.? खरंच?

@Bharat - I mean to in last 5 years. All the books which got published are the translations

Pages