कविता म्हणजे..

Submitted by रसप on 9 February, 2013 - 05:12

कविता चूक किंवा बरोबर असत नाही
कविता म्हणजे कुठलं गणित नाही
कविता कुणा दुसऱ्यासाठी जन्मत नाही
कवितेशिवाय स्वत: कवीलाच करमत नाही
कविता नेहमीच एकमार्गी चालत नाही
कवितेला वळण घेतलेलंही कधी कळत नाही

कविता म्हणजे झुळझुळ पाझर
कविता म्हणजे अथांग सागर
कविता म्हणजे कोमल अंकुर
कविता म्हणजे वृक्ष मनोहर
कविता म्हणजे संध्या रंगित
कविता म्हणजे पहाट पुलकित

कविता म्हणजे रिमझिम रिमझिम वळिवाची सर
कविता म्हणजे कुंद धुके अन चंचल दहिवर

कधी कुणाची जुनी वेदना उमलुन आली कविता बनुनी
कधी कुणाच्या आक्रोशाने हाळ घातली कविता बनुनी

आकाशाची मान झुकू दे, असे लिही तू
धरणीला अभिमान वाटु दे, असे लिही तू

जी माझी कविता लिहून मज मिळे आनंद ऐसा खरा
ती माझी कविता जगी दरवळे व्यापूनिया अंतरा

....रसप....
७ फेब्रुवारी २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/02/blog-post_07.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सुंदरच...

त्या शेवटच्या दोन ओळी कुठल्या वृत्तातल्या आहेत ? - ती लहानपणी शिकलेली वृत्ते आता पूर्ण विसरायला झालीत.
कृपया, कोणी हे सर्व नीट समजाऊन / उलगडून सांगणार का ? मात्रा वृत्त, छंद, आर्या, साकी इ. सर्व काही....

वाह ! रणजितदा, क्या बात है ! रण जित लिया !

मांडणी तर अधिकच आकर्षून घेणारी !

मुक्तछंदाकडून छंदाकडे आणि छंदाकडून वृत्तबद्धतेकडे नेणारी ,
भाषेचा लळा लावणारी , सुरूवातीला कासवगतीने चालतांना रटाळ वाटत असतांनाच घेतलेलं वळण न कळताच (तिथे कवितेतही अशीच ओळ आहे हे विशेष) सश्याच्या वेगाने धावून इच्छित स्थळी पोहोचतांना हळूवारपणे ब्रेक दाबत सुखद अशा शार्दुलविक्रीडातातून
कवितेच्या प्रयोजनासह कवितेचा खरा भावार्थ अभिव्यक्त करणारी एक उत्कृष्ठ कविता.

कधी कुणाची जुनी वेदना उमलुन आली कविता बनुनी
कधी कुणाच्या आक्रोशाने हाळ घातली कविता बनुनी >>> हे छान आहे.

परंतु, प्रांजळपणे सांगतो.
बाकी कवितेत 'रणजित' सापडला नाही.
वै.म. गैरसमज/राग नसावा.

ही कविता जर रणजित नावाने नसती तर कदाचित शाळेत असतांना वगैरे केलेली वाटली असती. उल्हासजींशी सहमत. रणजित म्हटला की आता कवितेपल्याडची कविता वाचायला मिळेल अशी अपेक्षा असते. (कृ रा न)