छिद्र

Submitted by उमेश कोठीकर on 5 February, 2013 - 07:50

आई,
ए आई,
ऐकतेस ना?
मी रूजलेय गं आई
तुझ्यातून
अगदी पहिलेवहिले, सुरक्षित घर माझे
तेथे
आई, फ़क्त एक करू नकोस
देउ नकोस जन्म मला ..कधीच
मी मुलगी आहे ना गं; मुलगी
म्हणून
असू दे फ़क्त नउ महिन्यांचेच आयुष्य माझे
तुझ्या सुरक्षित उदरात
खुप भिती वाटतेय गं, खुप भिती
असलेल्या फ़क्त एका नाजूक आणि कोमल छिद्रामुळे; शरीराला
झिरपतेय भिती तुझ्या मनातली
पार.. तेथपर्यंत
जन्म घेतात ना गं तेथून आई लोक?
ती आईची जागा ना?
आईचे ओठ जणू...
मग का होतेय सुरू वखवख या जनावरांची
माझ्या पहिल्या स्पर्शापासून तेथे डोकावण्याची?
का?
खाटकाने सोलून काढावे कोवळे तडफडणारे रेशमी कोकरू
तसे ती जागा छिन्नभिन्न करण्याची?
का गं?
भिती वाटतेय मला खरंच खुप
जन्मानंतर पहिल्या पुरूषी स्पर्शापासून अगदी डॉक्टरकाकांच्या
ते
प्रत्येक स्पर्शाची; पौरूषी...खुप भयंकर भिती
बघ, जाणवलीय ना तुला माझी थरथर?
अगदी बसकाकांच्या हात देउन मला शाळेत नेतांना स्पर्शापासून ते
मी सू सू ला बसल्यावर अजाणतेपणे; आजूबाजूच्या
घाणेरड्या नजरेपर्यंत,
जवळ घेउन हात फिरवणा-या आजोबांच्या स्पर्शापासून ते
माझ्या जिवलग वर्गमित्राच्या हातात हात घेतल्याच्या जाणिवेपर्यंत
काकांच्या कुशीत विश्वासाने जाण्यापासून ते
कुण्या पुजारीकाकांच्या आशिर्वादाचा हात पाठीवरून फिरेपर्यंत
जाणवत जाईल तोच थरकाप.. त्याच भयंकर पिळवटून टाकणा-या
वेदना....निर्भयाच्या!
आई..आई... कसे सहन केले असेल गं तिने? कसे?
किती गुरासारखी किंचाळली असेल, हातापाया पडली असेल ती?
भितीने उडून जाण्याऐवजी डोळ्यांतली चिमणी पाखरे
थिजून थरथरत असतील तेथेच ते पाशवी हिंस्त्र क्रौर्य
बघत
आई, मला खरंच खुप भिती वाटतेय
आणि माहिती आहे मला, माझ्यापेक्षा तुला
तू मनात म्हणतेस, माहित आहे मला
'माझं बाळ...माझं बाळ
नको असायला... मुलगी !
होय आई, नाही जगायचय मला खरंच
पण निदान नउ महिने तरी..
जगू दे गं मला, तुझ्या अस्तित्वाचा भाग होउन..आई
निदान,
बघू दे फुटू लागणारे चिमणे डोळे उघडून निदान
माझे पहिले घर, पिउ दे निदान तेथून स्त्रवणारा पहिला अमृतथेंब
पसरू दे माझे चिमणे इवलुशे बोटभर हात... तू घ्यावेस म्हणून
फक्त म्हणू दे, उमललेल्या अस्फुट, अर्धवट ओठांतून निदान
एक शब्द
'आई..आई..' एक शब्द..मा़झ्या स्पंदनाच्या बोबडबोलीत!
आई, नसते मला ते छिद्रच तर?
सांग ना? मला नसती वाटली ना भिती आई?
नसत्या विरल्या ना त्या गुरासारख्या किंकाळ्या कित्येक निर्भयांच्या
तेथेच, त्याच छिद्रात ?
पण कसे आले असते जन्माला हेच लोक तेथून?
जगातली कुठलीच आई पण?
म्हणून आई, नकोस देउ जन्म मला खरंच!
नउ महिने नउ जन्मासारखे आहेत, माझे तुला बिलगून
जाईन नंतर करून रिते ..तुला आणि तुझ्या भितीला
फक्त गेल्यावर देवबाप्पाकडे एकच करायचे आहे गं
तिचे, माझ्या ताईचे
निर्भयाचे... अजूनही तसेच रक्ताळलेले डोळे
भरभरून पुसायचे आहेत,
फुटलेले!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

SSSSSSSSSssssssssssssssssssssrrrrrrrkan kata aala re......purn vachuch shakle nahi umesh...sorry Sad

आजच्या स्रीच विदारक वास्तव चित्रण फारच प्रभावीपणे प्रतिभेत प्रकटलय !खूपच खोलवर मनाला भिडणारे !

तीव्र भावना!! व्यवस्थित पोचल्यात...

फक्त कविता म्हणून मत विचाराल तर लांबी थोडी कमी चालली असती असं वाटलं..

उद्विग्नता, चीड , व्याकूळ स्थिती छान प्रकट झाली आहे.
छिद्र ही प्रतिमा वापरून कुठेही लैंगिकतेला उथळ न बनवता एक तिव्र मांडणी करण्याचं धैर्य दाखवल्याबद्दल अभिनंदन !

आनंदयात्री आणि विदिपांशी सहमत .

मला कवितेतले काही कळत नाही पण मायबोलीवर मी अनेक वर्षे आहे.

आजकाल कवितांची, गझलेची शीर्षके लांबलचक असली तर जास्त लोकांचे लक्ष तिकडे जाते. तेंव्हा मी असे सुचवतो की कवितेचे शीर्षक '
नसत्या विरल्या ना त्या गुरासारख्या किंकाळ्या कित्येक निर्भयांच्या

असे ठेवा.
Light 1 Happy

धन्स. विजय, राजीव व आनंदयात्री..एकदम मान्य. जे विचार आले ते तसेच मांडलेत.

तीव्र भावना!! व्यवस्थित पोचल्यात...
फक्त कविता म्हणून मत विचाराल तर लांबी थोडी कमी चालली असती असं वाटलं.. >>> आनंदयात्रीशी सहमत
असलो तरी; लांबी जास्त असूनही वाचता वाचता शेवट कधी आला ते कळलंच नाही हेही तितकंच खरं.
जबरदस्त लिहिलंय.

विषय जुना आहे, मांडणी अनाकर्षक!

कवींनी नैमित्तिक कविता का कराव्यात असे वाटते. कोठीकरांच्या अनेक उत्तम कविता आजवर पाहिल्या. ही फिकी वाटली. त्याचे कारण या विषयावर खूप लेखन वाचनात आले असणे, हेही असू शकेल. वैयक्तीक मत दिले.

भावना किवा वास्तव करच विदारक आहे. पण कविता म्हनून नाही आवडली. एखादा लेख म्हणून नक्कि छान झाला असता. अगदी मुक्तछंद म्हणून देखील नाही आवडली. सॉरी तुम्हाला दुखावण्याचा हेतू नाही.