येते खुशाल माझ्या मागे मला छळाया.....

Submitted by सतीश देवपूरकर on 5 February, 2013 - 11:05

गझल
येते खुशाल माझ्या मागे मला छळाया.....
माझीच सावली का बघते मला गिळाया?

इतकेच फक्त होते नशिबात श्वास माझ्या;
का लागला सकाळी हा सूर्यही ढळाया?

आले तुझ्या असावे ओठात नाव माझे....
का लागला स्मृतींचा निशिगंध दरवळाया?

आधीच लगबगीने होतेस जायचे तू;
बघ लागला फुलांचा पाऊस कोसळाया!

वस्ती समोर आहे, पायात त्राण आहे!
बघतो कुणीकडे हा रस्ता असा वळाया?

घायाळ एवढा मी, रक्तात नाहलो मी!
कोणी प्रयत्न केला मजला न साखळाया!!

करतात लोक थट्टा, पण, ती जपून आता;
थट्टा कशी करावी मज लागले कळाया!

आकांत मी जिवाचा करुनी प्रयत्न केला.....
पण, लागलाच अंती गळफास आवळाया!

होते तळ्याप्रमाणे, झाली तुझी कृपा अन्;
बघ लागले कसे हे आयुष्य झुळझुळाया!

डोळ्यासमोर माझ्या, मी बेचिराख झालो!
काही करू न शकलो, आले न कळवळाया!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

करतात लोक थट्टा, पण, ती जपून आता;
थट्टा कशी करावी मज लागले कळाया!

होते तळ्याप्रमाणे, झाली तुझी कृपा अन्;
बघ लागले कसे हे आयुष्य झुळझुळाया!<<<

शेर आवडले