रस्त्यावरची दैवी चित्रकला!!!

Submitted by Sarang Lele on 5 February, 2013 - 05:55

रस्त्यावरची दैवी चित्रकला!!!

रस्त्याच्या शेजारच्या स्टाँलवर विकली जाणारी चित्रं बघणे हा एक चांगला प्रकार असतो. परवाच एका स्टेशनच्या बाहेर देवाधिकांचे फोटो लावलेला स्टाँल बघितला. सर्व प्रकारच्या देव देवतांची चित्रं तिकडे होती. ही चित्रं म्हणजे वेळ घालवायला चांगलं साधन आहे.

मुळात निर्गुण परमात्म्याला सगुण साकार रूप माणसाने दिलंय. त्यातही माणसाच्या मनातला देव प्रत्यक्षात मूर्ती वा चित्र रुपात आणायचं काम कलाकारांनी केलयं. फारशी आर्टीस्टीक लिबर्टी न घेता रीयलीस्टीक वा आर्टीस्टिक मूर्ती बनवण्याकडे शिल्पकारांचा वा मूर्तीकारांचा कल असतो. चित्रकार मात्र ही लिबर्टी एकदम घसघशीत घेत असतात. त्यांचं व्यक्त होण्याचे माध्यम सोप्पं असल्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे वेगवेगळ्या चित्रकारांची इमँजिनेशन कुठपर्यंत जाऊ शकते हे आँब्झर्व करणं मजेशीर अनुभव असतो!

गणपतीबाप्पा हा बर्याचशा चित्रकारांचा हाँट फेवरेट असतो. त्याची चित्रं कोणत्याही आकारात, रंगात काढली तरी चालतात म्हणून असेल कदाचित! पिंपळाच्या पानाचा गणपती, जास्वंदीच्या फुलांचा गणपती, अक्षरांचा गणपती, उगाच वेटोळ्या लाईन्सचा गणपती!! काहीही!! ओढून ताणुन बाप्पच्या सोंडेचा, पोटाचा आकार कुठून तरी आणायचा!! गणपतीबाप्पा विद्येची देवता आहे म्हणून चित्रकारांची ही विद्या तो कशीही खपवून घेत असावा!

चित्रांमधल्या बर्याचशा देवांचे चेहरे हे पुरुषी वाटतंच नाहीत. म्हणजे देवांना दाढी मिशा (ब्रह्मदेवासारखे काही अपवाद वगळता) नसाव्यात हा सिद्धांत मान्य केला तरी दाढी मिशा नसलेले चेहरे पुरुषीही नसावेत असं कदाचित बर्याच चित्रकारांनी ठरवलंय!

ह्या लडीवाळ चेहर्याच्या घोटाळ्यात दत्तगुरु बर्याचदा सापडेलेले दिसतात. योगीया दुर्लभ असा हा योगी, पण चित्रकारांना तो अशाच रुपात का बरं दिसत असावा? ह्याला अपवाद एस. एम. पंडितांचा दत्त आहे. त्यांचा दत्त व्यवस्थित रांगडा आहे.

लडीवाळ चित्रकलेच्या कचाट्यात सापडलेला दुसरा देव म्हणजे भगवान गोपालक्रुष्ण!! म्हणजे राधाक्रुष्ण तादात्म्य पावले होते हे कबूल पण चित्रातही राधेच्या चेहर्याशी परफेक्ट साम्य असलेलाच क्रुष्णाचा चेहरा असावा असं काही जरूरीचं नाहीये ना! क्रुष्णाची शरीरयष्टी, चेहरा त्याच्या पराक्रमाच्या गाथांच्या कुठेच जवळ जात नाही!

गीतोपदेशाच्या प्रसंगाची चित्रही बरीच असतात. त्यात मोस्ट काँमन म्हणजे भगवंत क्रुष्ण अर्जुनाला गीता सांगताहेत आणि मागे रणधुमाळी चालू आहे. गीता असो आणि काही 'शो मस्ट गो आँन' च्या धर्तीवर 'युद्ध मस्ट गो आँन' असं चित्रकाराला वाटत असावं!

कधीतरी ह्याच क्रुष्णार्जुनाचा रथ भरधाव धावत असलेला दिसतो. आजुबाजूचं सैन्य, हत्ती, घोडे मात्र शांत स्तब्द असतात! कमालच असते इतरांची आणि चित्रकारचीही!!

अनेकदा योगेश्वर क्रुष्ण हातात सुदर्शन घेऊन उभा असतो! सुदर्शनाचं आवाहन भगवंत असं उगाच का करतील ह्याची चिन्ता चित्रकाराला नसते, किन्वा आवाहीत चक्र अवतरल्यावरही भगवंत शांत हसतमुख कसे राहतील हाही प्रश्ण त्याला पडत नाही!

भगवान रामही तसाच! राम सीतेबरोबर एकांती असतानाही त्यांचे बाण आणि भाता काही त्यांची पाठ सोडत नाही. रामायणातल्या कोणत्याही प्रसांगात चित्रकार त्यांना कोदंडधारीच रंगवतात.

शिवशंकरांची शरीरयष्टी ही पिळदारच का असते हे न उलगडणारे आहे. स्रुष्टीचा विनाश आणि प्रलयाची जवाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्यामुळे त्यांना कदाचित मजबूत तब्येतीचे दाखवत असतील. जटेतला चंद्र, मानेभोवतीचा नाग, डमरू, गंगा हे सर्वही कोणत्याही प्रसंगी शंभूना सोडत नाही!

शंकरांची फँमिली फोटो सारखी चित्रंही अनेक! शंकर, पार्वती, गणपती, कार्तिकेय, नंदी, उंदीर सर्व कैलासाच्या बर्फात एकदम फोटो पोझसाठी तयार असलेली!!

शंकरांचा अवतार एकादश रुद्र हनुमंत! व्यायामपटूंचा आवडता देव! व्यायामपटूंसारखीच ह्याचीही चित्रं असावी अशी चित्रकारांची अपेक्षा असावी. मागे एका चित्रात माँर्फीन्ग करून वर हनुमंताचा चेहरा आणि खाली एका बाँडी बिल्डरची तेल लावून चकचकणारी बाँडी आणि पोझ असंही चित्र बघायला मिळालं होतं. हनुमंताने त्या चित्रकाराला बुद्धी बल यश आणि असं चित्र काढण्यासाठीच धैर्य एकत्रच दिलं असावं!

आई महिषासूरमर्दीनी असो वा कालिका माता! त्यांच्या अवतारात त्यांच्या रुद्र रुपामुळे देवांचेही त्यांच्या जवळ फिरकायचेही धारीष्ट्य झाले नाही! मातलेल्या दैत्यांचा पाडाव सर्व शस्त्र धारण करून देवीने केला! तिच्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला, तिला भानावर आणायला महादेव सामोरे गेले! ह्या सर्व क्रोधाचा, वधाच्या भीषण प्रसंगाचा चित्राशी काहीही संबंध नसतो. चित्रात देवी सर्वशस्त्रधारीणी, राक्षसाच्या अंगाव धावून गेलेली मात्र शांत हसतमुख असते!! कसं काय हे चित्रकारच जाणे!!

देवांनंतर असणारे संतही ह्या असल्या चित्रकारांच्या तडाख्यात सापडतात. रामदास स्वामी शिवथरघळीत दासबोध लिहायला बसले असतानाही त्यांच्या खांद्यावरची झोळी बाजूला ठेवत नाहीत. तुकाराम महाराज कोणत्याही प्रसंगी चिपळ्या आणि एकतारी पासून लांब होत नाहीत!! शिवाजी महाराज अवघ्या सोळाव्या वर्षी कोवळ्या वयात रोहीडेश्वराला स्वराज्याची शपथ घ्यायला जातात तरीही त्यांना भरघोस दाढी असते!

जानव्याचे खांदे बदलायचीही चित्रकारांना फ़ार आवड... सव्य- अपसव्याचा काहीच गंध, त्यामागच्या प्रसंगाचे गांभीर्य बिचार्यां चित्रकारांना नसतं.. विशेषत: कार्टून्स वा टीव्ही सीरीयल्समध्ये हा खांदेपालट हमखास होत असतो!!

ह्या सर्व गोष्टी चित्रकारांनाच जमू शकतात. मात्र त्या शोधणे ही एक गंमत असते.
तुम्हीही शोधा, तुम्हालाही आढळतील!!

डिस्क्लेमर: वरील लेख हा केवळ निरिक्षणाधारीत आहे, त्यात कोणाच्याही चुका काढायचा वा कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायचा हेतू नाही!!
-- सारंग लेले, आगाशी (वसई)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीलय. अचूक निरीक्षण. खरयं, बिचार्‍या गणपतीबाप्पांना कायम वेठीस धरतात लोक. गणपतीबाप्पा यांचे अपराध कायम पोटात घेतात की काय?

आणी साईबाबांना विसरलात का? काही हौश्या,नवश्या गवश्यांनी तर त्यांना कुठेच नाही सोडलं. चित्रात काढा नाहीतर रांगोळीत साईबाबा यांचे जणू पेटंटच असावेत. एकदंरीत आपले देव, देवी आणी संत साधु जन क्षमाशील वृत्तीचे असल्याने असे होत असावे.

आवडले लिखाण विचार निरीक्षण
मात्र विनोदी मध्ये का? ललितमध्ये हलवायला हरकत नसावी.

छान लिहिलंय, मला आवडलं. निरिक्षण जबरी आहे.
पण शेवटी ते एक 'चित्र'च आहे असं म्हणून बघ्यांनी काही गोष्टी सोडून दिलेल्या असतात बहुतेक Happy

छान लिहीलय. Happy
एस्.एम्.पंडितांनी साकारलेले श्री दत्ताचे चित्र कुठे मिळू शकेल काय?
(मी एस्.एम. पंडितांचा नुस्ता चाहता नाही, तर त्यान्चे रंगकौशल्य बघून स्तिमित झालेला असा त्यांचा भक्तही आहे)

सारंग लेले, अगदी समर्पक निरीक्षण. देवतांचे चित्र काढण्याची स्वतंत्र कला आहे. सध्या तिचा लोप झाला आहे. तिचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे हा सकारात्मक निष्कर्ष आपल्या लेखातून निघतो. Happy
आ.न.,
-गा.पै.

खरे आहे अनेक देव विष्णू, राम, कृष्ण, इ. हे दाढी किंवा मिशी अजिबात नसलेलेच का असतात हे मलादेखील पडलेले कोडे आहे. Happy
मध्यंतरी औंध येथील देवालयात (राजवाड्यात किंवा त्याच्या जवळ असावे) अनेक चित्रे पाहिली रामायण, महाभारतावर आधारित त्यामधल्या सर्व पात्रांची शरिरयष्टी, चेहरेपट्टी आणि वेषभूषा ही फारच वेगळी आहे. बरेच लोक अगदी कुटूंबवत्सल दिसतात.

महेश,
दाढी मिशी ही जनरली सहसा माणसाच्या वयाशी संबंधित असतात आणि देवांना वय नसतं असा एक सिद्धांत असल्यामुळे चित्रकार देवांना दाढी मिशा दाखवत नाहीत!!

गा.पै.
खरंय! थोडा वेगळा विचार चित्रकारांनी करायला हरकत नाही! सर्वच चित्रकार असे नसतात! वास्तवाचे, इतिहासच्या पुराणाच्या काळाचे भान ठेवून काम करणारेही आहेत, मात्र ते थोडकेच आहेत!!

मस्त निरिक्षण व लिखाण !
छाती फाडून आंतला राम दाखवणारा हनुमान हा आणखी एक अशा चित्रकारांचा 'फेव्हरिट' .
पण गंमत अशी कीं खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही या चित्राना भरपूर खप असावा - अगदीं नट/नट्या व क्रिकेटरांच्या फोटोंपेक्षांही !

मस्त लेख.

माझही एक निरिक्षण, महान योध्दे असलेल्या देवांचे दंड अगदी सामान्य माणसांप्रमाणे सरळ दांड्या असतात.

झकासच राव. फारच छान लेख आहे.

पण एक मात्र ही सर्व चित्रे सर्व चित्रकारांनी मनापासून श्रद्धापूर्वक काढली असतात त्यामुळे त्या चित्रांविषयी तरीही आपलेपणा वाटतो नाहीतर...

देवांच्या मस्तकामागे उजेड दाखवितात, ते सान्गायच राहुनच गेल की हो!
शीर्षक वाचल्यावर प्रथम वाटले होते की हा धागा त्या चित्रकारांबद्दलचा असेल, जे खरोखरीच्या रस्त्यावर निव्वळ रन्गित खडूने पूर्णाकृती बारा/पंधरा फूट उंचीची चित्रे काढित व लोक येताजाता त्यावर पैसे टाकीत. आमचे लहानपणी असे चित्रकार सर्रास दिसायचे. गेल्या दहापन्धरा वर्षात मात्र कुठे कोणी दिसले नाही. त्या अनाम चित्रकारांन्चा जमेल तेव्हडा सन्मान करायचे राहूनच गेलय ही बोच कायम रहाणार. किती झाले तरी ते देखिल त्यान्च्या रस्त्यावरील चित्रान्द्वारे आमच्या "गुरूस्थानीच" होते.

लेबूदा, अगदी डोळ्यापुढे आले ते रस्त्यावर खडूने चित्र काढणारे, अनेकदा साईबाबा पाहिल्याचे आठवते.
"डोंबिवली फास्ट" चित्रपटात दाखवला आहे असा एक रस्त्यावर चित्र काढणारा.

अजुन एक वाचलेले+निरिक्षण -
अनेक ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचे चित्र म्हणजे शाहू मोडक यांचा फोटो
आणि संत तुकारामांचे चित्र म्हणजे विष्णुपंत पागनीस यांचा फोटो Happy

मस्त. जबरी निरीक्षण आहे आणि अगदी प्रत्येक देव डोळ्यासमोर उभा राहिला.
कमळातली लक्ष्मी सोन्याची नाणी पाडत असते. आता कमळ पाण्यात मग हा पैसा पाण्यात नाही का जाणार? पण नाही. त्याशिवाय ती लक्ष्मी नाहीच. Happy