संघर्ष करावा की संयम

Submitted by भारती.. on 5 February, 2013 - 02:47

संघर्ष करावा की संयम

''संघर्ष करावा की संयम?'' तिने विचारले

सहस्त्र आठवणींच्या काठावरून

कित्येक अन्यायांचे वण लपवून

आतले आकांत शांततेत गोठवून

''संघर्ष कर की संयम - अलिप्त रहा ''

ते म्हणाले किती सहज हसून

आशयाच्या अथांग किनार्‍यावरून

दोन्ही पर्यायांना छेद देऊन.

''अलिप्त रहा -अलिप्त रहा-'' समजावले
त्यानंतर तिने अनेकदा स्वतःला

कधी कुरुसभेतल्या द्रौपदीला

कधी अशोकवनातल्या सीतेला.

तेव्हा कळले ते किती अशक्य

अव्यक्त आक्रोशातले शाप आवरणे

घुसमटत्या घटनांचे माप काढणे

कोंडलेल्या ऊर्जेची वाफ जिरवणे.

जो करतो युद्ध त्यानेच व्हावे बुद्ध.

तिने मात्र मर्यादेत संघर्ष करावा

तिने अमर्याद संयम पाळावा

तिने अलिप्त रहाण्याचा संभ्रम जोपासावा..

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीताई, नेहमीसारखीच चिंतनप्रवण! आवडली.
हे अलिप्त राहाणंच तर असाध्य वाटतं ना... तसं जमलं तर संघर्षाची गरजच वाटणार नाही आणि संयम आपोआपच येईल मग.. म्हणूनच "तिने अलिप्त रहाण्याचा संभ्रम जोपासावा.." हे असंच.
अनेकदा वाचली जाणारच ही आता.

जो करतो युद्ध त्यानेच व्हावे बुद्ध. >>>>> उत्तम सुभाषितमुल्य आहे या ओळीत
ही ओळ तुम्हाला ही कविता होत असताना नवीन सुचलीय की जुनीच आहे?

कविता खूप छान आहे

सर्वांचे आभार..
वैभव, एका प्रत्यक्ष संवादातून स्फुरलेली ही कविता. यातली 'संघर्ष कर की संयम,अलिप्त रहा' ही ओळ माझी नाही.बाकी सगळे एकसंध साकारलेले..

आवडली ,

भारतीजी,
"तिने अलिप्त रहाण्याचा संभ्रम जोपासावा."

हे थोडे विस्ताराने समजावून सांगाल का?

आभार रसप, ही कविता मौजच्या 'मध्यान्ह'मध्ये नाहीय,पण पूर्वप्रकाशित आहे ..
मी भास्कर
>>भारतीजी,
"तिने अलिप्त रहाण्याचा संभ्रम जोपासावा."

हे थोडे विस्ताराने समजावून सांगाल का?>>

ही ओळ आधीच्या ओळीला जोडून वाचायचीय. ती ओळ आहे,'जो करतो युद्ध त्यानेच व्हावे बुद्ध'.इथे असे म्हणायचेय की ज्याने अन्यायाच्या प्रतिकारासाठी युद्ध केले, त्यातले विजय/पराजय आणि अंतिमार्थाने वैयर्थ अनुभवले, तोच 'बुद्धत्व' - परम ज्ञान अन शांती अनुभवू शकतो. प्रत्यक्ष समाजजीवनात अनेकदा स्त्री अन्यायाचा असा पराकोटीचा प्रतिकार करत नाही, अर्धवट संघर्ष अन अर्धवट संयमाचे प्रयोग तिच्या आयुष्यात दिसतात, म्हणूनच ती खर्‍या अर्थाने अलिप्तही होऊ शकत नाही, आंतरिक भोवर्‍यातून बाहेर येत नाही.तिचा अलिप्त रहाण्याचा पवित्रा एक संभ्रमच असतो..म्हणून तिला अलिप्त होण्याचा दिलेला सल्लाही म्हणूनच व्यर्थ ठरतो..

सहस्त्र आठवणींच्या काठावरून
कित्येक अन्यायांचे वण लपवून
आतले आकांत शांततेत गोठवून
अव्यक्त आक्रोशातले शाप
जो करतो युद्ध
त्यानेच बनावे बुद्ध !

हे फार आवडलं .
कविता आवडली .