कालचक्र

Submitted by हर्षल वैद्य on 29 January, 2013 - 01:32

पिवळी झालेली पिकली पाने
गळून जातात निःसंगपणे
अन् झाडही तसेच उभे
साजरा करीत सोहळा खोडावर एक वलय वाढल्याचा

अन् पुन्हा अवतरतो वसंत
तीच जादू घेऊन हिरवाईची
पोपटी पालवी अंगभर लेऊन
झाडही डवरलेले नवीन उत्साहाने

काही घटकांपूर्वीच तर इथे शिशिर होता दुःखी, उदास, मरगळलेला
झाड उभे निस्तब्ध, कवीही तसाच
अन् आता हा फुलोरा
झाडाच्या तनावर, कवीच्या मनावर

गातोय कवी आनंदाची गाणी
नाचतोय देहभान हरपून
निर्विकार, निर्हेतुक झाडापुढे
आपलीही झालीय पानगळ
अन् तनूवर पडलाय काळाचा अजून एक विळखा
याची जाणीवच नाहीये त्याला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपलीही झालीय पानगळ
अन् तनूवर पडलाय काळाचा अजून एक विळखा
याची जाणीवच नाहीये त्याला >>>>> क्या बात है........