"हडसर" सविस्तर..

Submitted by Yo.Rocks on 21 January, 2013 - 04:59

ठरलेले 'सातमाळा' डोंगररांगेला भेट देण्याचे.. नाताळची सुट्टी धरून २३ ते २५ डिसेंबर अशी मस्त सुटटी टाकलेली.. पण मग फासे फिरले.. सुट्टी फुकट जाउ लागली.. अगदीच काही नाही तर जवळपासच्या 'कलावंतीण -प्रबळगडा'वर जाउन दिवस-रात्रीचा ट्रेक करण्याचे ठरले.. तेही बारगळले नि शेवटी प्रबळगडच्या एकदिवसीय ट्रेकवर येउन ठेपलो.. पण अचानक संध्याकाळी फोनाफोनी झाली आणि मायबोलीकर इंद्राने (इंद्रधनुष्य) 'हडसर' व 'निमगीरी' चा प्रस्ताव मांडला.. 'आडवाटेवर आहेत.. गाडीने जातोय.. फारशे उंच नाहीत वा कठीण नाहीत तेव्हा जातोच आहोत तर रात्रीच निघून दोन्ही गड करुन घेउया' इति इति... आम्हाला (मी व रोहीत एक मावळा) काय कुठलातरी ट्रेक होतोय हेच फारसे असल्याने लगेच राजी झालो.. मग गाडीत उरणार्‍या दोन जागा 'सौ. रॉक्स' व रो. मा चा एक मित्र 'सुरेंद्र' यांनी बळकावल्या.. नि आम्ही ख्रिसमसच्या आदल्या रात्री कल्याण-मुरबाडच्या रस्त्याने माळशेज घाटाच्या दिशेने मार्गी लागलो..

रात्रीच्या चांदण्यात माळशेज घाटाला मागे टाकले.. पुढे गणेश खिंड लागली.. आणि नंतर उजवीकडे येणारा फाटा (मढ गाव- पारगाव) अंधारात नजरेआड झाला.. वाटेत पूल लागला आणि तिथेच क्षणभर गाडी थांबवून मावळत्या चंद्राचे दर्शन घेतले.. त्या पिवळसर सोनेरी रंगाच्या चंद्राचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब न्याहाळण्यात थोडावेळ दंग झालो.. मग पुन्हा उजवीकडच्या फाटाच्या शोधात.. आता येइल म्हणेस्तोवर आम्ही अगदी जुन्नरजवळ येउन पोहोचलो..बाहेर अगदी गारेगार थंडी.. रात्रीची वेळ.. वर्दळ फारच कमी...आम्ही चुकल्याचे कळलेच होते.. पुढे एकाठिकाणी चौकशी केली आणि मग फेरा मारुन नारायणगाव मार्गे जावे लागले..(जवळपास ५०किमीचा अधिभार) मग अगदी शिवनेरीच्या जवळूनच आम्ही हडसरचा मार्ग अवलंबला.. रात्री पावणेबाराच्या सुमारास प्रवास चालू केला होता नि आता हडसरवाडीत पोहेचोस्तोवर पहाटेचे पाच वाजत आले होते.. मग गाडीतच तासभराची वामकुक्षी झाली..

डांबरी रस्त्याच्या कडेलाच एका ठिकाणी गाडी लावली आणि विहीरीच्या मागून जाणार्‍या वाटेने आम्ही ट्रेकारंभ केला.. इथे मात्र थंडीचा फारसा प्रभाव नव्हता.. पण गार वारे अधुन मधून वाहत होते.. सुरवातीची वाट अतिशय सोपी.. थोडेसे चढले की उजवीकडे हडसरची अवाढव्य आकृती समोर उभी..

प्रचि १:

तर डावीकडे पसरलेल्या डोंगराच्या मागे क्षितीजावर तांबडी किनार उमटलेली..
प्रचि २:

तर एका बाजूस धुक्यामध्ये शहाजीसागर जलाशय (माणिकडोह) आणि सभोवतालची डोंगररांग एकमेकांमध्ये गुरफटलेले दिसत होते... दहा पंधरा मिनीटांतच आम्ही घळीच्या वाटेला येउन मिळालो.. ही वाट खरेतर गावकर्‍यांनी आपल्या सोयीसाठी बनवलेली.. वेळ वाचवणारी... दुसरी एक पायर्‍यांची वाट आहे त्यासाठी हडसरला उजवीकडे ठेवून वळसा घेत चढाई करावी लागते.. आणि अजुन एक तिसरी वाट आहे ती थोडी खडतर म्हणजेच खुटयाची वाट !

प्रचि ३ :

प्रचि ४: घळीतून दिसणार्‍या तटबंदीवरून एक गावकरी आमची ट्रेकींग बघताना.. Happy

प्रचि ५ : वाट अगदीच सोप्पी पण इथे एका ठिकाणी थोडी कसरत करताना..

घळीत पोहोचलो नि खर्‍या अर्थाने चढण सुरु झाले.. पण दमछाक होण्यापुर्वीच घळीतून दिसणार्‍या तटबंदीपर्यंत पोहोचलोदेखील.. इथूनच वरती पाहिले तर नेहमीचा आव्हान देणारा बुरुज उभा दिसला नि त्यावर दिमाखात फडकणारा भगवा म्हणजे तर नेहमीच उत्साहवर्धक.. पुढे उजवीकडे कोरलेल्या जेमतेम पायर्‍यांवर सोप्पे कातळारोहण करुन अगदी घळीमध्ये येउन तटबंदीच्या वर येउन पोहोचलो..

प्रचि ६ :

तटबंदीच्या वर आलो की आतापर्यंतची घळीतून केलेली वाटचाल नजरेस पडते.. तर विरुद्ध बाजूस डोकावून पाहीले की पायर्‍यांचा राजमार्ग दिसतो.. ह्या घळीमुळेच दोन डोंगर जोडले जाउन 'हडसर' चा एकच अवाढव्य डोंगर बनला आहे.. राजमार्गाकडे तोंड करुन उभे राहीले तर डावीकडच्या डोंगरावर पाण्याची टाकी, वीरगळ/समाधी सोडली तर विशेष काही नाही.. पण इथून पायथ्याच्या गावचा पसारा आणि समोरील 'माणिकडोह' (शहाजीसागर जलाशय) छान दिसतो..

प्रचि ७: राजमार्ग (इथून उतरणार होतो)

आम्ही या डोंगरावर तर बाकीचे हाकेच्या अंतरावर असणार्‍या समोरच्या डोंगरावर.. !
प्रचि ८:

आमच्या इथून घळीच्या उजवीकडचा म्हणजेच हडसर किल्ल्याचा भाग असणारा डोंगर मात्र तेथील बांधकामामुळे गुढमय भासत होता.. आतापर्यंत रोहन चौधरी, जिप्सी या मायबोलीकरांच्या लेखामधून हे गुढ उमगले होते.. पण आता प्रत्यक्षात अनुभव घेण्याची संधी होती..

प्रचि ९:

( 1. साठी प्रचि क्र.१० पहावा, 2. साठी प्रचि क्र.११ , 3 साठी प्रचि क्र.१२ , 4 साठी प्रचि क्र.१३ )

इथून काही फोटो टिपले नि आम्ही घळीमध्ये उतरलो.. नि एक अस्सल कारागिरी पाहण्यास सुरवात केली.. तोंडात बोटे घालण्यास भाग पाडेल असे उत्कुष्ट बांधकाम.. पाय ठेवल्याशिवाय नजरेस पडणार नाही अशा एकसंध पाषाणालाच फोडून केलेल्या भल्यामोठया पायर्‍या... असे बघितले तर पाषाणारुपी डोंगरावर नागमोडी वळण कोरलेले.. पण सहजासहजी नजरेला न दिसणारे...याच पायर्‍यांनी पुढे वळण घेउन पुढे सुंदर वलयांकीत असा दरवाजा उभा.. मग पुन्हा वळण घेत डोंगराच्या वरती आणणार्‍या तशाच पायर्‍या.. जणू छप्पर नसलेला बोगदाच म्हणावा... जल्ला डोक्याला खरच शॉट होतो.. कशी युक्ती सुचली असेल नि प्रत्यक्षात कसे उभारले असेल.. !

प्रचि १०:

---
वरील भगदाडातून पायर्‍यांद्वारे आत शिरले की खालील दरवाजा दिसतो.. याला लागूनच व्यवस्थितपणे कोरीव काम केलेली पहारेकर्‍यांची देवडी आहे

प्रचि ११:

प्रचि १२:

प्रचि १३:

हे सगळे बघण्यात दंग झालो होतो.. पण भूकेची चळवळ सुरु झाली.. सो सॅक उघडली आणि स्टोव्ह चालू करुन स्वयंपाक सुरू केला ! एकीकडे सौ. रॉक्स पोह्यांची तयारी तर एकीकडे आम्ही बटाटा-कांदे कापाकापी करत बसलो.. पहिलाच ट्रेक जिथे गॅसस्टोव्ह आणला होता (इंद्राची गाडी होती म्हणून घेतला)

काही मिनीटांतच पोहे रेडी झाले नि खातापिता फोटोशूट उरकून घेतले.. या परिसरात खालच्या गावांमधून गुरे चरायला येत असल्याकारणाने जागोजागी शेण पडलेले दिसते.. आमची खादाडी सुरु असताना खाली पडलेल्या पोह्यांमुळे अचानक मुंग्यांची जत्रा भरली.. तोच रो.मा चा भारी डायलॉग.. 'खा.. खा.. रोज शेण खाता.. आज पोहे खा..' Lol

प्रचि १४: कांदेपोहेss

खादाडी झाली आणि आम्ही (इंद्रा सोडून) पुन्हा पायर्‍या चढून वरती गेलो... समोरच टेकडी दिसते त्या दिशेने गेले असता एकीकडे महादेवाचे मंदीर आहे.. तर तिथेच बाजूला तलाव आहे.. त्या तलावाच्या मध्ये खोदीव टाके दिसते.. आजुबाजूला परिसरात अवशेष विखुरलेले दिसतात.. महादेवाचे मंदीर खूपच छान.. बाहेरुन पांढरा रंग मारलेले नि मंदीरासमोर पांढर्‍या रंगातील बर्‍यापैंकी मोठया आकाराचा नंदी ! मंदीर आतून बर्‍यापैंकी स्वच्छ.. छोटया दरवाज्यातून आत शिरले की छोटा सभामंडप.. तिथेच मग गणपती, मारुती, गरुडदेव अश्या मुर्ती आहेत..अजुन एक भग्नावस्थेतील मुर्ती आहे पण कुठली ते समजू शकले नाही.. पुढे गाभार्‍यात तर शिवलिंग ! गाभार्‍याच्या दरवाज्यातून जेमतेम आत शिरणार्‍या प्रकाशात ते शिवलिंग मस्तच वाटत होते.. गडावरील आवडलेल्या मंदीरापैंकी हे एक मंदीर.. अगदी छोटे पण दर्शन मात्र भव्यदिव्य वाटणारे..

प्रचि १५: तलाव परिसर

प्रचि १६: महादेवाचे मंदीर

- - - -

इथूनच मग आम्ही संपुर्ण टेकडीला प्रदक्षिणा मारण्याचे ठरवले.. उद्दीष्ट होते गुहा ( धान्याची कोठारे) शोधण्याचे.. तिथे इंद्राने राजमार्गाने एकटयाने उतरायला सुरवात केलेली.. सो धावतपळतच प्रदक्षिणा सुरु केली.. आजुबाजूचा परिसर डोळ्यांनाच सुखावह वाटत होता.. धुक्यामुळे कॅमेर्‍यात मात्र अस्पष्टच दिसत होता.. ही प्रदक्षिणा मारताना ह्या गडाचा आवाका समजून येतो.. शिवाय ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या, अवशेष दिसून येतात.. इथे त्या काळात मोठ्या प्रमाणावर राबता होता असे म्हणतात त्याचीच खूण होती.. टेकाडाच्या मागे गेले की समोर मोठाच्या मोठा पडदा उघडला जातो ज्यावर पायथ्यालगतची गावं, शेती, मंदीरे आणि त्यांना कुशीत बारगळणारी सह्याद्रीची डोंगररांग !! डोळ्यांनी नुसते बघत रहायचे... फोटो नीटसे काढणे काही जमले नाही.. इथून जाणारी वाट देखील मोकळी... डोंगराच्या कडेला अगदी सपाट होणारी.. तंबू टाकून बसायचा मोह करणारी.. याच पार्श्वभूमीवर उडया मारून घेतल्या नि वाटेला लागलो..

प्रचि १७: उडीबाबा !

प्रदक्षिणा संपली पण ती गुहा/ कोठारे चुकलेच.. शेवटी नाद सोडून आम्ही परतीची वाट धरली.. कारण इंद्रा पुढे एकटा गेला होता.. सुमारे अकराच्या सुमारास आम्ही राजमार्गाने म्हणजेच पायर्‍यांच्या वाटेने उतरायला सुरवात केली.. ह्याच वाटेला पुढे डावीकडे फाटा फुटतो.. इथे वळलो नाही तर ती वाट सरळ खाली पेठेची वाडी ह्या दुसर्‍या गावात जाते.. नि आमची गाडी हडसरवाडीत उभी होती..

येथील वाटतर अगदी सोप्पी.. कसलेही चढउतार न घेता एका रेषेत जाणारी.. वळसा संपल्यावर मात्र उतराकडे वळते.. ही वाट जितकी लांबून नेता येइल तशी नेलेली आहे.. सो साहाजिक शॉर्टकट फेम रो.मा सुरेंद्रला घेउन सरळ आडवाटेने उतरायला लागला.. नि खरच तसे उतरणे पण धोक्याचे मुळीच नाही.. फक्त थोडे फरफटत बुड टेकवत उतरावे लागेल इतकेच.. पण एक्सपोझर हा प्रकार नसल्यामुळे जल्ला कुठूनही उतरा.. घसरा.. खालीच पोहोचणार.. आम्ही मात्र लांबलचक पल्ल्यानेच उतरणे पसंत केले.. केवळ तिसराच ट्रेक असला तरी आमच्या सौ. ने एक दोन ठिकाणी सुक्या मातीवरुन घसरण्यापलिकडे कच खाल्ली नव्हती.. थांबली नव्हती.. ! आमचे मार्गाक्रमण सुरु असताना झाडीझुडूपे फारशी नसल्याने अगदी खालापर्यंतचा परिसर दिसत होता.. पण इंद्रा काही दिसत नव्हता.. पाठीवर एक नि पोटावर एक अश्या दोन सॅक घेउन म्हाराज खाली उतरले होते तेव्हा थोडी काळजी वाटत होती.. पण वाटेचे स्वरुप बघता हा नक्कीच गाडीपर्यंत पोचला असणार याची खात्री होती..

खाली पुर्णपणे उतरलो नि एक नजर वरती मारली तर पहाटेच्या मंद प्रकाशात सौम्य वाटणारा हडसर आता तळपत्या उनात भीषण वाटत होता.. शिवाय ही वाट पुर्णतः खाली उतरत असल्याने उंचीलाही खूप वाटतो..

प्रचि १८:

आता उनाने आपले वर्चस्व दाखवायला सुरवात केली होती.. दुपारचे बारा वाजून गेले होते.. तिथेच पंपावर फ्रेश झालो आणि पुन्हा खाण्याची शिदोरी उघडली.. डांबरी रस्त्याखेरीज अजुन कुठे सावली दिसत नव्हती.. रस्ताही आडवाटेचा आतल्या गावचा असल्याने अगदी तुरळक वर्दळ.. सो रस्त्यावरच ठाण मांडले.. !! असे क्षण ट्रेकमध्येच उपभोगले जातात..

प्रचि १९:

अगदी पोटभर खाल्ले नि दुपारच्या लख्ख उनात त्याच रस्त्याने आम्ही हडसरला उजवीकडे ठेवून पुढे निघालो.. आता लक्ष्य होते निमगीरी किल्ला !

क्रमश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय कौतुक या यो रॉक्याचे !!!
भन्नाट माणुस
अन लकी सौ रोक्स!

ते जेथे तेथे उडी मारण्याच्या फोटो ची कल्पना आणि execution [प्रत्यक्षात आमलात आणाणे] मस्त आहे

मस्त मस्त.. Happy माणिकमोती गाजवून आले शेवटी Wink

अरे ती गुहा-कोठारे एकदम डाव्या कड्यालगत आहेत. मंदिरासमोर उभी राहिलात की जिथे तोंड येते त्या दिशेला कड्यापर्यंत जायचे आणि मग कड्यालगत उजव्या दिशेला जात रहायचे. ५ एक मिनिटात दिसतात.

त्या जमिनीखाली कोरलेल्या आहेत. तुम्ही त्यावरून चालत गेला असाल. Happy

धन्यवाद Happy

त्या जमिनीखाली कोरलेल्या आहेत. तुम्ही त्यावरून चालत गेला असाल. >> हो तसेच वाटतेय.. तिकडे आम्ही बर्‍यापैंकी वरती होतो.. मग मात्र कडयाने फिरत गेलो..

झक्या.. खाल्लेत रे आधी..
ज्यो.. आमचा पण सहभाग असतोच.. पण जास्त खाताना.. Wink

इंद्रा.. हो जाये !

ऐ मस्त वृत्तांत ..मजा आली वाचायला..
फोटू ही मस्त.च आलेत..
'अपरात्री जाता... बरोबर GPS तरी असूद्या'+१००
आणी हो.. नेहमीच विचारायचा अस्तो हा भाप्र पण विसरते..
'हवेत इतकी उंच उडी मारल्यावर त्या टणक खडकांवर लँड होताना कस्काय वाटतं रे????????

मस्त रे यो Happy
पोहे मस्तच झाले होते.. पोह्यासाठी परत ट्रेक करायला हरकत नाही. Wink
'हवेत इतकी उंच उडी मारल्यावर त्या टणक खडकांवर लँड होताना कस्काय वाटतं रे???????? >> वर्षुताई एकदा ट्रेकला या आमच्याबरोबर मग समजेल .. Happy

धन्यवाद
वर्षूताई.. काहीच वाटत नाही.. तिथे लक्षच जात नाही.. कारण लँड झाल्यावर थेट कॅमेर्‍याकडे धावतो फोटो कसा आला ते पहायला. Happy