संध्या.

Submitted by प्राजु on 25 January, 2013 - 04:29

तेजस बैरागी जाताना क्षितीज विस्कटले
लाल जांभळे तांबुस केशर रंगच फ़िस्कटले
घणघण घंटा निनादली अन झांज किणकिणली
पाण्यावरचे हलके नाजूक तरंग भरकटले

परत चालली गुरे, उजेडा ओहोटी लागली
धूळ माखली सांज तिरावर विश्वाच्या वाकली
अबोल झाल्या झाडेवेली, अबोल गोठा, घरटे
कुठे तिहाई जोगीयाची दिशातुनी वाहिली

भरतीवेड्या चंद्रासोबत चांदणकणही आले
दंगुन त्यांना पाहू जाता हळूच पाऊल भिजले
बुडून जाणार्‍या गोलाला पाहुन डोळे भरता
नमन कराया नकळत माझे हात जुळोनी आले

- प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान छान छान!

मोहक शब्दांनी कातरवेळ नटवलेली आहेत आपण. आपल्या काव्यप्रवासास आमचे अनेक आशीर्वाद.

लयदार ओळी रचल्या आहेतच तर एखाद दोन ठिकाणी र्‍हस्व दीर्घ बदलायल हवे आहेत तेही पाहून घ्या वाटले तर.

कळावे

गंभीर समीक्षक

अतिशय सुरेख, चित्रदर्शी....... खूपच आवडली ही रचना...

प्राजु,
प्रथमपासूनच सुंदर...

भरतीवेड्या चंद्रासोबत चांदणकणही आले
दंगुन त्यांना पाहू जाता हळूच पाऊल भिजले
सुंदर ओळी...