चारचौघी - ७

Submitted by बेफ़िकीर on 22 January, 2013 - 05:51

एक सिक्युरिटी गार्ड, जो आणि जया रिक्षेतून परत येत असताना जया जो शी काही बोलली नाही. गार्डची मात्र तिने राहुलशी ओळख करून दिली होती आणि राहुल हा भावी नवरा आहे हे त्याला नीट समजलेले आहे हे एन्शुअर केलेले होते. नाहीतर गार्डने अधिकार्‍यांना आणखीन तिसरेच काहीतरी सांगितले असते.

मात्र रूमवर आल्यानंतर जयाने सगळ्यांना सगळे सांगितले. सिमही उठून बसलेली होती.

जयाने जे सांगितले त्यात अविश्वसनीय किंवा फार काही विपरीत नव्हते. पण तरी विचित्र अवघडलेपण जाणवत राहील असे मात्र होते.

संध्याकाळी भेटल्यानंतर राहुलने कोणत्यातरी रेस्टौरंटमध्ये तिच्यासोबत नाश्ता केला होता आणि जेवणाचे पार्सल तिथूनच घेऊन तो तिला घेऊन त्या रूमवर गेला होता. राहुलसाठी ही भेट म्हणजे जयाच्या शरीराशी खेळण्याची एक संधीच असावी जणू! कारण तो फक्त त्याच विषयावर बोलत होता, तेवढेच करू पाहात होता. त्याच्या त्या झोंबाझोंबीने जया वैतागलेली होती. त्या भेटीमध्ये भविष्याबद्दल काही चर्चा होत नव्हती. काही नियोजन होत नव्हते. इतर कोणताही विषय पकड घेऊ शकत नव्हता. जेवण करण्यात गेलेला अर्धा तास सोडला तर राहुल सारखा जयाला जवळ ओढण्याचाच प्रयत्न करत होता आणि जया त्याच्यापासून सुटण्याचा. जयाचा तो विरोध राहुलला अपसेटही करत नव्हता. म्हणजे त्याला तिच्या त्या विरोधाचा रागही येत नव्हता. तो अधिक प्रयत्न करू लागत होता इतकेच.

जयाची अपेक्षा होती की काहीतरी चर्चा होईल. लग्न कसे करायचे, त्याच्या घरच्यांच्या एकंदर अपेक्षा काय असतील, खर्च किती होणार आहे, नंतर मुंबईत घर कसे घेता येईल, कोणत्या प्रकारची नोकरी करता येईल वगैरे!

काहीही विषय झालेला नव्हता. हपापल्यासारखा राहुल तिच्याशी झोंबत राहिला आणि एका क्षणी जयाने निक्षून नाही म्हंटल्यानंतर त्याने 'मग आपण भेटलो आहोत कशाला' असे विचारले. त्यावर जयाने अनेक विषयांचा उल्लेख करून त्याला जाणीव करून दिली की सहजीवनाला सुरुवात करण्यापूर्वी कित्येक गोष्टी अश्या आहेत ज्यांच्यावर विस्तृत चर्चा करणे आवश्यक आहे. पण राहुलला त्यात स्वारस्य नव्हते. तो तिला तेथेच थांबायचा आग्रह करू लागला. जर ती तिथे थांबली असती तर रात्रीच्या चेकिंगमध्ये होस्टेलवर ती कुठे आहे याचे एक्स्प्लनेशन जो ला द्यावे लागले असते. जो ने ते दिलेही असते एक अपवाद म्हणून! तेही खोटे एक्स्प्लनेशन दिले असते की एका नातेवाईकांच्या कुटुंबाबरोबर ती आहे म्हणून! तिची त्याउप्पर चौकशीही झाली नसती. पण एकदा जर जया तिथे थांबली असती तर राहुलने ती रात्र अजिबात वाया घालवली नसती. त्यामुळे जयाने तातडीने मेसेज करून जो ला तेथे बोलावून घेतलेले होते.

एक प्रकारे जयाच्या मनातील कोवळ्या स्वप्नांचा चुराडाच झालेला होता. पण राहुलची ही शारीरिक भूक कधीतरी संपेल हे तिला माहीत होते. कधीतरी तो शरीरापलीकडे आपल्याशी एक लाईफ पार्टनर म्हणून बोलणारच हे तिला माहीत होते. त्यामुळे आजचे राहुलचे वागणे मनावर घेण्यासारखे असले तरी लग्नच त्याच्याशी ठरलेले असल्यामुळे ती फार काही काळजी करत नव्हती. पण असे अनेक अनुभव असलेली नीलाक्षी मात्र हा प्रकार ऐकून अंतर्मुख झालेली होती. मात्र ती अबोल झालेली आहे हे कोणीच नोटिस केले नाही. नीलाक्षीला राहुलचे इतके पिसाट वागणे कसलीतरी सूचना देत होते. पण तो विषय आत्ताच काढून जयाचा विरस करण्याची तिची इच्छा नव्हती. अजून लग्न व्हायचेच होते. नीलाक्षी अबोलपणे झोपून गेली.

चारचौघी!

जीवनातील विविध टप्प्यांवर आपापल्या परीने विचार करत झोपी जात होत्या. नीलाक्षीच्या मनात सिमचे आणि जयाचे विचार होते. जयाच्या मनात राहुलबद्दल अढी बसलेली होती. जो कुलश्रेष्ठ भसीनच्या मुलांचा आणि पत्नीचा विचार करत होती. आणि सिमेलिया जैन नावाचे वादळ वादळापूर्वीची शांतता भेसूर बनवत निद्रिस्त असल्याचा बहाणा करत होते.

उद्याचा दिवस वेगळाच असणार होता. नेहमीप्रमाणे जे आज झाले ते उद्या होणार नव्हते. उद्याची प्राधान्ये, उद्या होणार असलेली मनस्थिती, उद्याचे अनुभव, सगळे वेगळेच असणार होते. पण 'आजवरचा काळच' पाठीशी नसलेला 'उद्या' मात्र कधीही येत नाही कोणाच्याही आयुष्यात! तान्ह्या मुलाचा जन्मानंतरचा पहिला दिवस सोडला तर असा 'उद्या' कोणालाही मिळत नाही, ज्या 'उद्या' ला 'काल'च नाही. माणूस जगतो आज, राबतो उद्यासाठी आणि रमतो कालमध्ये! पण सिमेलिया जैन.....

.... सिमेलिया जैनचा उद्या मात्र असा असणार होता की... जणू आजवर काही झालेलेच नव्हते... उद्याचा दिवस सिमेलियाचा होता... उद्यानंतर सिमेलिया जैन हे नाव उच्चारताना अनेक चेहर्‍यांवर कडवटपणा येणार होता... अनेक चेहरे थुंकायला लाळ जमवत तापट डोळ्यांनी पाहत राहणार होते... अनेक चेहरे करुणपणे भविष्यावर हवाला ठेवून उदासीच्या रंगात रंगणार होते.. आणि अनेक चेहरे .... मान खाली घालून जनक्षोभापासून स्वतःला वाचवण्यात अपयशी ठरणार होते... क्षितीज नावाच्या दैनिकाची विक्रमी विक्री होणार होती... होळ्या होणार होत्या.. मुलवानी होस्टेल भूकंपात थरथरावे तसे थरथरणार होते... सिमेलिया जैनची टीचभर कपड्यातील बेफिकीर अदा असलेला एक फोटो नव्वदीच्या म्हातार्‍यालाही चळवणार होता.... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे.... सर्वाच्या पलीकडे पोचून निव्वळ एक शरीर ठरलेली सिमेलिया जैन... या घटनांवर खदाखदा हासत आपल्या लावण्याची भुरळ पाडत परंपरेच्या ठिकर्‍या उडवणार होती... तिला जितका विरोध होणार होता.. त्याच्या शंभरपटीने तिचे फॅन्स निर्माण होणार होते...

==================

एकदाही येण्याजाण्याची वेळ न पाळणारा, ऑफीसमध्ये अत्यंत बेशिस्तपणे वागणारा आणि बहुतेक काही दिवसातच हाकलला जाणार असलेला पै चार वाजता ऑफीसमध्ये शिरलेला पाहून स्टाफने तोंडात बोटे घातली. हा आला? हा का आला आत्ता? ह्याने तर सकाळी आठला यायला पाहिजे आणि तीनला जायला पाहिजे. हा आलाच चारला. आता बेरी चढणार याच्यावर. आणि आजच बहुतेक पै हाकलून दिला जाणार!

पण पै चे कुठे लक्षच नव्हते. तो आला तो बेरीच्या केबीनचे दार उघडून 'येऊ का' असेही न विचारता बेरीसमोर जाऊन बसला. बेरीला शक्य असते तर त्याने पै ला अक्षरशः उचलून फेकून दिले असते, इतका बेरी पैवर संतापलेला होता. एका सभेच्या कव्हरिंगला पै गेलाच नव्हता. ऑफीसचे अकरा कॉल्स त्याने घेतलेच नव्हते. मेसेजेस वाचले तरी होते की नाही कोण जाणे! ऐनवेळी एका वेगळ्या स्टाफला ती सभा कव्हर करायला धावावे लागले होते. त्या सभेचा वृत्तांत दुपारी दोनला फायनल होऊन दोन कॉलम्स अडवून बसलेलाही होता. आणि आता दोन तासांनी पेपर स्टॉलवर लागणार तर पै आपल्या बापाचे ऑफीस असल्यासारखा बेरीसमोर बसला होता. बेरीने आत्यंतिक संतापाने आलेल्या शांतपणातून समोरचे सगळे कागद बाजूला केले, एक कोरा कागद आणि एक पेन पै समोर ठेवले आणि म्हणाला...

"रिझाईन.. "

पै ने तो कागद आणि पेन सरळ बाजूला उचलून ठेवले आणि स्वतःजवळचा एक कागद बेरीसमोर ठेवला.

स्वतःच्याच खुर्चीत बसल्याबसल्या चार लाख चाळीस हजार व्होल्ट्सचा शॉक बसू शकतो आणि आपण चार फूट उडल्यासारखे आपल्यालाच वाटू शकतो हे बेरीला आजवर माहीतच नव्हते. समोरच्या कागदाचा परिणाम होता तो!

"हे काय आहे?"

"मुलगी"

काय वाट्टेल ते प्रयत्न करूनही बेरीची नजर त्या फोटोवरून हटेना! स्वतःच्या पत्नीकडेही वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत नसलेल्या बेरीला शक्य असते तर त्याने त्या फोटोलाच मिठी मारली असती. अगदी पै समोर असूनही. पण फोटोला मिठी मारून काहीच होणार नाही याचे भान त्याला उरलेले होते हेच खूप होते.

लाजलज्जाही न बाळगता बेरी मोजून वीस सेकंद त्या फोटोकडे बघत राहिला. एकविसाव्या सेकंदाला त्याने पै कडे मान वर करून पाहिले तेव्हा पै तोंडातून धूर सोडत बेरीकडे पाहात होता.

"कोण आहे ही?"

"आजचे फ्रंट पेज आहे ते"

"हू सेज?"

"हर फ्रँकनेस सेज"

"शी इज फ्रॉम हिअर?"

"येस्स्स्स्स... मुलवानी लेडिज होस्टेल..."

"आर यू किडिंग?"

"......"

"हा फोटो... असा कसा काय काढू दिला तिने?"

"असा म्हणजे?"

"शी इज वेअरिंग... जस्ट... टू पीसेस"

"माझ्याकडे आत्ता तिचे तीन आणखीन फोटो आहेत ज्यात ती हे दोन कपडेही काढत असल्याच्या पोझेस आहेत"

"पै... तू मरणारेस"

"सगळेच मरतात शेवटी"

"तू मला आणि स्टाफला घेऊन या क्षितीजसकट मरणारेस... जर हे खोटे निघाले तर"

"चल बेरी... मी निघतो"

पै बेरीला बेरीच म्हणायचा. बेरीला बेरी म्हणण्याची हिम्मत संस्थापकांचीही झालेली नव्हती आजवर! बेरीला धोका जाणवला. पै फोटो घेऊन निघून गेला तर उद्या सकाळी कोणतातरी मोठा पेपर तोच फोटो छापणार आणि जे आपल्याला आज मिळू शकते ते उद्या दुसर्‍याच कोणालातरी मिळणार!

"ए... ए पै... बस इथे... चहा घेतोस ना?"

"कमी साखर"

"अरे बिनसाखरेचा घे बाबा... पण बस इथे..."

पै आत जाऊन बसल्यानंतर मारामारीची वेळ येणार आहे हे माहीत असलेल्या स्टाफला चहाची ऑर्डर देण्यात आली हे ऐकून घेरी यायची वेळ आली होती. चहा देणारा प्यून आपण जे करत आहोत त्यावर आपलाच विश्वास बसत नाही आहे अश्या मनस्थितीत आत चहा घेऊन गेला तेव्हा फोटो बेरीने ड्रॉवरमध्ये लपवलेला होता. बेरीला त्या ड्रॉवरचे तापमान दिडशे अंश सेल्सियस असल्यासारखे वाटत होते. आज घरी लवकर जायचे हे बेरीने केव्हाच ठरवून टाकलेले होते. जाताना बायकोसाठी फुले वगैरे न्यावीत अश्या विचारापर्यंतही तो पोचलेला होता. फक्त मुले लवकर झोपायला हवीत साली.

एक तास!

एक तास बेरीच्या केबीनमध्ये बसण्यास आजवर एकही स्टाफ लायक ठरलेला नव्हता. पण पै एक तास बेरीच्या समोर असा बसलेला होता, जसे भाजली जात असलेल्या कोंबडीसमोर तंदूर चालवणारा शीख बसावा. आणि एक तासाने संस्थापक त्या केबीनमध्ये शिरले तेव्हा त्यांना पाहून बेरी उठून उभा राहिला तर पै ने बसूनच त्यांच्याशी हँडशेक केला. संस्थापक आउटी स्वतःच्याच ऑफीसमध्ये चुळबुळल्यासारखे बसले. बेरीने हळूच तो फोटो त्यांच्यासमोर सरकवला. आउटींनी फोटो पाहून कपाळावरचा घाम पुसला.

"हे? हे छापणार आहात?"

बेरीला त्यांनी विचारले. बेरीने चाचरत उत्तर दिले.

"हो सर"

"अहो हे नका छापू... हे काय छापताय?"

पै शून्यात बघत होता. शून्यात बघतच त्याने आउटीची पिसे काढली.

"प्रौढेचे मंगळसूत्र पळवले. मुख्यमंत्री आज नाशिकला. कॅनॉलला आता चोवीस तास पाणी. गाढवांचा बाजार या शुक्रवारी. आबांच्या बॉलवर दादांची सिक्सर. यान मंगळावर पोचले. हुंड्यासाठी छळ. मटाराची आवक. पोपई महागली. विहिरीत पडून बिबट्या जखमी. हेच छापत आयुष्य बरबाद करायचे का आउटीसाहेब?"

"म्हणजे?"

आउटी आणि बेरी दचकलेले होते.

"गावातल्या होस्टेलवर राहणारी एक आम मुलगी. एक दिवस अचानक कपडे काढते आणि कॅमेर्‍यासमोर उभी राहून आरामात पोझेस देते. डोळ्यांमध्ये दगडी निश्चलता असते तिच्या. कुठेही पश्चात्तापाचे चिन्हही नाही चेहर्‍यावर. आणि कपडे तरी किती घालते? तर पूर्ण काढलेले नाहीत असे म्हणण्याइतकेच. ती असे का करते? तिच्यावर असे करण्याचे प्रेशर कोणी आणले? की तिने हे स्वेच्छेने केले? की पैशासाठी केले? की प्रसिद्धीसाठी? मग आपल्या महान संस्कृतीचे आता काय होणार? मुलीबाळी रस्त्यावरून कश्या फिरणार? बायाबापड्या बाहेर कशा पडणार? आता बलात्कार झाले तर दोष कोणाचा? मुलींना हवे तसे फोटो द्यायला कोणाची हरकत आहे? का आहे? नसली तर का नाही आहे? होस्टेलचे यावर काय म्हणणे आहे? महिला संघटनांचे काय म्हणणे आहे? तरुण मुलांचे काय म्हणणे आहे? राजकीय नेत्यांचे काय म्हणणे आहे? ही मुलगी असेच फोटो देत राहिली तर काय होईल?"

"आ... आगी लागतील आगी" - भान हरपलेले आउटी स्वतःच्याही नकळत उद्गारले.

गेल्या सव्वा तासात प्रथमच पै हासला. गदगदून, खदखदून आणि सात मजली हासला. केबीन थरथरली बेरीची.

हळूहळू पै चा मुद्दा डोक्यात शिरला. एका रात्रीत क्षितीजची इमारत जमीनदोस्त होऊ शकणार होती. पण ती इन्श्युअर्ड होती. प्रश्न असा होता की फोटो आहे म्हणून क्षितिजने तो छापला. क्षितिजने पत्रकारितेची भूमिका वठवली. पण मुळात फोटो आहे म्हणूनच ना? म्हणजे दोष कोणाचा? तर जिचा फोटो आहे तिचा आणि ज्याने काढला त्याचा! क्षितिजचा काय संबंध? क्षितिज तर म्हणते की बघा बुवा हल्लीच्या मुली कश्या वागायला लागल्यायत.

आउटींच्या चेहर्‍यावर बावळट पण फर्म असे एक हास्य पसरले आणि बेरीने फोन करून लास्ट मिनिट चेंजेस कळवले. त्या दिवशी क्षितिजचे पहिले फ्रंट पेज छापून बाहेर पडले तेव्हा प्रेसमधील स्टाफ कामे सोडून ते बघत बसला होता. दररोज सहा वाजता क्षितिज विकत घेणार्‍यांना स्टॉलवाले आज क्षितिज आलाच नाही म्हणून सांगत असतानाच पावणे सातला शहरात पहिला बाँब पडला.

एक हाफ पेज साईझ फोटो. खाली कोटेशनः 'मला इतकेही कपडे नकोसे होतात'! आणि त्याखाली नांव - सिमेलिया जैन! सगळ्यात खाली हेडिंग! काय शब्द आहे, हेडिंग म्हणे! ते तर सगळ्यात खाली होते. आणि काय होते हेडिंग?

'सिमेलिया जैनने महाराष्ट्र हादरवला'

पुढच्या दोन तासांत जे झाले त्याचे वर्णन करणे अशक्य होते. धरण फुटावे तश्या घटना घडत सुटलेल्या होत्या. कोणाची भूमिका काय हेच समजेनासे झालेले होते.

सर्वप्रथम मुलवानी होस्टेलला पोलिस संरक्षण पुरवण्यात आले. पाठोपाठ वृत्तपत्रांच्या पत्रकारांचा आणि छायाचित्रकारांचा ओघ सुरू झाला. सिमला मॉडेल म्हणून स्वीकारणार्‍या सीरीन एजन्सीचे टॉपचे तीन अधिकारी एका महिला अधिकार्‍यासोबत होस्टेलवर धावले होते. महिलांचा एक मोर्चा नुकताच निघालेला होता. उद्या मात्र एक फारच मोठा मोर्चा काढण्याचे ठरत होते. गोयलची बसल्या जागी गांड फाटलेली होती. कारण सीरीन एजन्सीला सिम गोयलने सजेस्ट केल्याचे पब्लिकला समजलेले होते. महिलांचा एक गट गोयलच्या घराकडे घोषणा देत सरकू लागला होता. कोणीतरी सिमविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केलेली होती. काही पोलिस चौकशीसाठी महिला पोलिसांसकट होस्टेलवर येऊन बसलेले होते. अनेक स्थानिक संघटना निषेधाचे फलक घेऊन रस्तोरस्ती फिरू लागले होते. मुलवानी होस्टेलचाही निषेध करण्यात येत होता. आणि या सगळ्या गदारोळात एक विचित्रच बातमी कर्णोपकर्णी होत हळूच सिमेलियाच्या कानात शिरली.

'गावातल्या काही तरुणांनी एकत्र येऊन सिमेलिया मंदिर बांधायचे ठरवलेले आहे.'

होस्टेलचे अधिकारी, पोलिस स्टाफ, सीरीन एजन्सीचे अधिकारी आणि दोन वकील अश्या जवळपास चौदा जणांच्या ग्रूपच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड देताना घाबरलेली चिमणी बनलेल्या सिमला ही बातमी कोणीतरी एस एम एस वरून कळवली आणि सिमच्या चेहर्‍यावर कडवटपणा, संताप, मस्करी आणि धाडस यांच्या मिश्रणातून आलेले एक अत्यंत आत्मविश्वासपूर्ण स्मितहास्य पसरले. पसरतच राहिले. प्रश्न विचारणार्‍यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. सिममधील बदल चाणाक्ष पोलिस स्टाफला जाणवला.

होस्टेलच्या प्रमुख सोहनी घशाच्या शिरा ताणत म्हणत होत्या.

"सिम... हाऊ डेअर यू? होस्टेलवर राहून हे प्रकार? लाजलज्जा नाही? होस्टेल बदनाम झाले याची जाणीव आहे तुला? एका तासाच्या आत ही जागा सोडायची आहेस तू"

"मॅम... मला स्वतःकडे कायमची घेऊन जायला आत्ता महाराष्ट्रातील तीन कोटी तरुण एका पायावर तयार आहेत. पण शोषित तरुणीला होस्टेलनेही सहकार्य नाकारले ही बातमी वाचून तुमचे काय होईल?"

"शोषित तरुणी स्वतःहून कपडे काढून कॅमेर्‍यासमोर उभ्या राहतात?"

"एरॉटिका लाँजरीची अ‍ॅड मॉडेलला नऊवारी नेसवून केली जाईल अशी तुमची कल्पना आहे का?"

"आय डोन्ट केअर... आय वॉन्ट यू आऊट"

"लेखी द्या"

"तू कोणी महाराणी नाहीस... होस्टेलमध्ये सद्वर्तनाच्या अटींची नियमावली आहे.. त्यानुसार तुझे वर्तन नसल्याने तुला हाकलणे माझ्या अधिकारात आहे"

"होस्टेलवर मी काय केले?"

"जे बाहेर केलेस त्याचे परिणाम होस्टेलवर होत आहेत"

"कसे काय?"

"कसे काय??? तू मला विचारतीयस कसे काय? हे बाहेर मोर्चे आलेत ते दिसत नाहीयेत तुला?"

"ते मोर्चे घेऊन येणार्‍यांचे म्हणणे काय आहे मॅम, हेच मला समजत नाहीये? कपडे काढणार्‍या मुलीही कुठेतरी राहत असतातच ना? मी येथे राहते. त्यात होस्टेलवरच्या सगळ्या मुली आणि स्टाफ का बदनाम व्हावा?"

"ही उत्तरे तू दे त्यांना... मला त्यांना फेस करण्याची आवश्यकताच पडता कामा नये.. ते लोक इथून जायला हवे आहेत मला"

"त्यांना कसे घालवायचे ते तुम्ही बघा... होस्टेलच्या संचालिका या नात्याने ते तुमचे काम आहे... "

"आणि अश्लील फोटो देणे तुझे?"

"मग मी अंगभर कपडे घालून हातात एरॉटिकाची ब्रा घेऊन जाहिरात करू?"

"तोऽऽ माझा प्रश्न नाहीऽऽ"

"होस्टेलवर राहणार्‍या मुलीने उदरनिर्वाह कसा करावा याच्याशी होस्टेलचा संबंध काय?"

"उद्या धंदा करशील"

"तुमच्या मिस्टरांना डिस्काऊंट देईन"

सोहनी मॅडम ऑफ झाल्या. उठून उभ्या राहून किंचाळत म्हणाल्या..

"गेट लॉ ऽऽ स्ट"

सीरीन एजन्सीच्या एका अधिकार्‍याच्या चेहर्‍यावर मात्र मिश्कील हास्य आलेले होते. त्याचे नांव गोसावी. गोसावीने मधे एक पिल्लू सोडले.

"आमच्या मॉडेलला इथून असे काढून टाकण्यात आले तर होस्टेलवर मी सीरीनतर्फे केस करेन आणि महागडा वकील देईन, प्लस पब्लिसिटी करेन ती वेगळीच"

एक पोलिस महिला अधिकारी बरळली.

"सिमेलिया होस्टेलवर सुरक्षित आहे सोहनीबाई... बाहेर आली तर अवघड होईल आमच्यासाठी"

मात्र एक पोलिस अधिकारी ताठ्यात म्हणाला..

"सार्वजनिक ठिकाणी देहप्रदर्शन करणे हा गुन्हा आहे"

त्याच्याकडे वळत सिम त्याच्याच टोनमध्ये म्हणाली...

"म्हणूनच मी इनडोअर शॉट्स दिले... सार्वजनिक ठिकाणी चित्रे छापून येणे हा गुन्हा माझा नाही.... आणि सार्वजनिक ठिकाणी देहप्रदर्शन करणे हा गुन्हा असला तर रस्त्यावर लघवी करणार्‍या पुरुषांना पकडायला लागा आधी"

"सिम... मी तुझ्याशी सीरीनतर्फे दोन वर्षांचे काँट्रॅक्ट करण्यासाठी आलो आहे" - गोसावीचे तिसरेच चाललेले होते.

"मिस्टर गोसावी, मी फक्त तीन महिन्याचा करार करेन... फीस अ‍ॅडव्हान्समध्ये"

"ऑफकोर्स... पण तीन महिन्यात काय होणार? फार तर अजून एक असाईनमेन्ट"

"आय डोन्ट केअर... मॅक्स थ्री मन्थ्स... सिक्स लॅख्स"

तेवढ्यात क्षितिजचा पै तिथे कसातरी येऊन बसला. तो पै आहे हे पोलिसांशिवाय कोणालाच माहीत नव्हते.

"तुझ्या रूममेट्सना माहितीय का हे?" - सोहनीबाई

"तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील नाही... नाहीतर होस्टेलवरच माझे शोषण व्हायचे म्हणून पेपरला देईन... आणि मीहून माझे कपडे काढले तर माझे भाऊ आणि आईही काही म्हणू शकत नाहीत तिथे तुमचे नियम मी टॉयलेट पेपर म्हणून वापरते"

"ही काय बोलण्याची तर्‍हा आहे?" - सोहनीबाई हातवारे करत महिला पोलिस अधिकार्‍यास म्हणाल्या.

ती अधिकारी सिमला दमात घेऊ पाहू लागली.

"ऐ सिमेलिया... शान्पन करायचं नाही... आत घेईन तुला.. "

"कोणत्या आरोपाखाली?"

हा आवाज कोणाचा हे समजेना कोणाला! पै ने तो प्रश्न विचारला होता. पै ला ती महिला अधिकारी वचकून होती. पै चे रेप्युटेशन भलतेच होते. पै कोण आहे हे माहीत नसल्याने सोहनीबाईही जरा वचकल्याच. पै ने संधी साधून भाषण ठोकले.

"होस्टेलवर राहणारी एक सामान्य मुलगी! दिसायला उजवी. फॅशन क्षेत्रात नाव कमवू पाहणारी. तिला पहिलीच असाईनमेन्ट मिळते अंतर्वस्त्रांची. तीन तीन चार चार वर्षे स्ट्रगल केल्यावरही इंडस्ट्री तिची दखलच घेत नाही आणि आता परत फिरणेही शक्य नाही आणि उपाशी राहणेही शक्य नाही अश्या अवस्थेत ती सामान्य मुलगी ती असाईनमेन्ट मजबूरीने स्वीकारते.. तिच्या क्वॉलिफिकेशनवर तिला कोणी नोकरी देत नाही.. तिच्या टॅलेंटवर तिला कोणी काम देत नाही.. मिळाले ते काम बिचारीने केल्यावर तिला हाकलून द्यायला बघतात... पोलिस अटक करण्याची धमकी देतात... गावात मोर्चे निघतात... जाळपोळ होऊ लागते.. बिचारी ती मुलगीच बदनाम होते.. फोटो काढणारे बदनाम होत नाहीत.. फोटो बघणारे बदनाम होत नाहीत.. मुलीला हॅरॅस करणारे बदनाम होत नाहीत.. करायचे काय एका असहाय्य शोषित तरुणीने अश्या वेळेस? सिमेलिया... हे माझे कार्ड... अर्ध्या रात्री मला फोन करत जा कोणतीही अडचण आली तरी... आणि या होस्टेलवरून तुला काढण्याची धमकी परत दिली गेली तर होस्टेलचे सगळे गैरप्रकार पेपर आऊट होतील... नावासकट... आणि एक वकील सुचवत आहे मी तुला.. त्याच्या सल्ल्याने वाग.. पोलिसांनी काही अ‍ॅक्शन घ्यावी असे तू काहीच केलेले नाहीस... जे केलेस तो तुझा व्यवसाय आहे.... शेव्हिंग लोशनच्या जाहिरातीत पुरुषाचे स्मूथ गाल दाखवतात.... हिरो हाँडाच्या जाहिरातीत मोटर सायकल दाखवतात... आयडिया फोनच्या जाहिरातीत सेलफोन दाखवतात.. मग एरॉटिकाची मॉडेल काय बुरख्यात वावरणार काय? सगळे नियम बायकांनाच का म्हणून? कोणाला माहीत तरी आहे का की सिमेलियाचे मंदिर बांधण्याची घोषणा झालेली आहे आपल्या शहरात एका संस्थेकडून... शी इज द लेटेस्ट सेन्सेशन... शी इज द सेक्स गॉडेस ऑफ महाराष्ट्रा"

सीरीनचा गोसावी अ‍ॅडव्हान्स म्हणून दिड लाखाच्या अ‍ॅट पार चेकवर सही करत होता......

बाहेरचे आवाज कमी कमी होत चाललेले होते... टीव्हीवाल्यांनी या बाबीकडे फारसे लक्ष दिलेले नव्हते... पण सीरीनचा तो फोटो अनेकांच्या काळजात घुसलेला होता.. गप्पा मारायला बसलेले पेन्शनर्सचे ग्रूप्सही मिटक्या मारत हळूच फोटो पाहात होते.. बायका फोटो पाहून नाक मुरडण्याआधी असूयेने सिमचे शरीर नजरेने टिपत होत्या... तरुण मुलांनी क्षितिजचा स्वतःसाठी अस एक खास अंक विकत आणून आपापल्या बेडखाली ठेवलेला होता... तरुण मुलींनी एरॉटिका ब्रँड डोक्यात ठेवलेला होता.. महिला संघटना उद्याच्या जोरदार मोर्चाचे प्लॅनिंग करण्यात गुंतलेल्या होत्या... पोलिस खाते ढवळून निघाले होते आणि कुठेकुठे संरक्षण द्यावे लागणार हे ठरत होते.. क्षितिजची अभूतपूर्व विक्री झाली होती.. इतर न्यूज पेपर्सनी तिला अप्सरा, दिलकी धडकन , निर्लज्ज, समाजकंटक अशी काय काय नांवे देऊन योग्य त्या पानावर तिचा फोटो टाकून तिला कव्हरेज दिलेले होते.. आउटीसाहेब खूप वर्षांनी हासत होते... बेरीने बायकोच्या हातावर मोगरा ठेवून मुलांना लवकर झोपव असे सांगितले होते.. जो, निली, जया आणि प्रियंका कपाळाला हात लावून रूममध्ये बसलेल्या होत्या.. होस्टेलच्या अधिकार्‍यांनी त्यांचीही चौकशी केली होती की हे त्यांना माहीत होते की नव्हते आणि माहीत असल्यास त्यांनी ते थांबवले का नव्हते... होस्टेलवरच्या इतर मुलींच्या गॉसिपला उधाण आलेले होते.. पै उद्यासाठी लेख लिहीत होता.. सिम अंतर्बाह्य बिनधास्तच आहे या अर्थाचा एख होता तो.. एरॉटिकाची फ्रॅन्चाईझी हरणासारखी घाबरून बसली होती... सीरीन एजन्सीने वकील लावलेले होते... गोयल त्याच्या घर नावाच्या बिळात लपला होता...

आत्ता या भयानक तापलेल्या वातावरणात जर सिमने तिच्यावर झालेल्या रेपची कहाणी ओपन आऊट केली तर आपली खैर नाही हे गोयल आणि वारिया दस्तूरच्या अतिशय नीट लक्षात आलेले होते... आणि त्याबाबत त्यांना काही करताही येत नव्हते... पूर्ण चॉईसच सिमचा होता.. आशिषच्या ग्रूपला तर त्यांनी पिटाळूनच लावले होते गावातून...

आणि रूममधील चौघींकडे पूर्ण दुर्लक्ष करत थेट टेरेसमध्ये जाऊन उभी राहून सिमेलिया नेमका हाच विचार करत होती... रेप झाला म्हणावे तर केस होणार... ती कोण जिंकणार हे वेगळेच... पण तोवर करिअर बोंबलणार .... रेपचा उल्लेखच नाही केला तर गोयल, आशिष आणि वारिया आरामात जगणार... शेवटी व्यवस्थित विचार करून तिने सावकाश पै ला फोन लावला..

"सिमेलिया बोलतीय..."

"...... बोलाऽऽऽ.. "

"एखाद्याचे हात पाय मोडायचे असतील तर... काय करावे लागेल?"

कितीतरी वेळ पै हासतच होता.

शेवटी म्हणाला..

"कोण तो भाग्यवान ज्याचे हात पाय तुझ्या हातून मोडले जाणार आहेत?"

"माझ्या नव्हे... अशी माणसे मिळतात का?"

"मी पत्रकार आहे मॅडम"

"सॉरी... मला सध्या काहीच समजत नाही आहे"

"हरकत नाही... पण अशी माणसे मिळतात..."

"आणि पोलिस?"

"पोलिस केस होतच नाही... "

"कशी काय?"

"अशी मॅटर्स हॅन्डल करणारी माणसे नेतालोकांनी पाळलेली असतात"

"मग माझे काम ते का करतील?"

"तू पैसे देशीलच ना?"

"किती द्यावे लागतील?"

"तुला मी सुपारी घेणारा वाटत आहे का?"

"सॉरी... "

"इट्स ओक्के.. मला अश्या माणसांबाबत काही माहीत असले तरी ते मी तुला सांगणार नाहीच... कारण मी पत्रकार आहे हाडाचा... फक्त... एक इंटरेस्टिंग इन्फर्मेशन ऐकून ठेव.. "

"... काय?"

"सीरीन एजन्सीने तुझ्यासाठी दोन बॉडीगार्ड्स नेमलेले आहेत उद्यापासून"

"... ओह..."

"आणि एक सल्ला ऐकून ठेव"

"... काय??"

"सीरीनविरुद्ध आजवर कोणीही एकही केस केलेली नाही... सीरीन इज व्हेरी स्ट्राँग इन लीगल मॅटर्स"

बराच वेळ सिमेलिया यात सल्ला काय आहे याचा शोध घेत बसली... शेवटी तिच्या डोक्यात प्रकाश पडला..

स्वसंरक्षणार्थ असे दाखवून त्या बॉडीगार्ड्समार्फत तिने एखाद्याचे हात पाय मोडले... तर तिला काहीच होणार नव्हते..

टेरेसमधून अंधारामध्ये बघताना सिमेलियाच्या चेहर्‍यावर हट्टी, निग्रही आणि सूडभावनेतून आलेले कडवट हास्य पसरले...

त्या अंधारात तिला चार चेहरे दिसत होते... गोयल, वारिया दस्तूर, आशिष आणि देव... ते चेहरे भेसूर झालेले होते... किंचाळत होते... कारण त्यांचे हातपाय मोडलेले होते... पण सिमचे हे सुखद स्वप्न भंगले... कारण मागून जयाचा आवाज तिला ऐकू आला..

"सिमेलिया..."

एरवी 'सिम, सिम' म्हणून हाक मारणार्‍या जयाने आज तिचे पूर्ण नांव रुक्षपणे उच्चारले होते.... बदल खाडकन सिमच्या लक्षात आला... मागे पाहात ती म्हणाली...

"काय?"

"आजपासून तू प्रियंकाच्या रूममध्ये शिफ्ट हो... प्रियंका येथे राहील आमच्याबरोबर"

गेले काही तास घणाघाती वागणार्‍या सिमच्या हातापायांना प्रथमच हे वाक्य ऐकून घाम आला... तिने विचारले..

"प... पण... का?"

"तुझं..... तुझं कॅरॅक्टर चांगलं नाहीये... इथे... चांगल्या मुली राहतात"

==============================================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणूस जगतो आज, राबतो उद्यासाठी आणि रमतो कालमध्ये!

जबराट... १०० % सत्य... ! क्या बात है!...! सहिच...

खर तर पहिल्या भागापासून वाचायचा मोह होतोय पण मी आवरतोय स्वतःला.
ह्या माणसाचा भरवसा नाही. ह्यांचे भाग कधीच लवकर येत नाहीत. त्यामुळे ज्या वेळेस अंतिम अस दिसेल तेंव्हाच पूर्ण वाचेल.
परमेश्वरा मला शक्ती दे.... Wink

नुसतं टु पीस मधे फोटो दिले तर एवढ गहजब होण्याचं काय कारण? कोणत्या काळातली कथा आहे ही? गंभीरपणे विचारतेय.

नुसतं टु पीस मधे फोटो दिले तर एवढ गहजब होण्याचं काय कारण? कोणत्या काळातली कथा आहे ही? गंभीरपणे विचारतेय.

मलाही हिच शंका आहे