अन्नं वै प्राणा: (३)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट. भांडारकर संशोधन मंदिरावर काही गुंडांनी हल्ला करून ग्रंथालयाची नासधूस केली होती. तिथल्या कर्मचार्‍यांना मदत करायला आम्ही काही विद्यार्थी गेलो होतो. ग्रंथालयाची अवस्था अतिशय वाईट होती. कपाटं फोडलेली, पुस्तकं इतस्ततः फेकलेली. अनेक जुन्या, दुर्मिळ पुस्तकांची पानं निखळून वार्‍याबरोबर उडत होती. पोलीस, छायाचित्रकार, दूरचित्रवाणीचे छायाचित्रणकार ती पुस्तकं अगदी सहज तुडवत होते. एरवी सर्वत्र पोपटपंची करणार्‍या डगलेवाल्यांना, दाढीवाल्या समाजसेवकांना या ग्रंथालयात येऊन पुस्तकं आवरण्याचं काम करणं परवडण्यासारखं नव्हतंच. मुळात त्या घटनेचा निषेध करण्याची हिंमतही फार थोड्यांनी दाखवली होती. आम्ही काही विद्यार्थी व पुस्तकांच्या ओढीने आलेल्या काही गुजराती गृहिणी त्या पुस्तकांची कलेवरं उचलण्याच्या कामी लागलो. त्या पुस्तकांच्या ढिगात मला काही सुटी निखळलेली पानं सापडली. तिथेच बसून मी त्यांतील काही पानं वाचली. विड्याच्या पानासंबंधी ते सारे श्लोक होते. पुस्तकाचं नाव कळायला मात्र मार्ग नव्हता. बेवारस पानांच्या गठ्ठ्यात ती पानं ठेवून मी कामाला लागलो. त्याच दिवशी संध्याकाळी मानसोल्लास या ग्रंथाची काही सुटी पानं मला सापडली आणि एकदम काहीतरी लख्ख आठवून गेलं.

दुर्गाबाई एकदा दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीबद्दल सांगत होत्या. इडली, दोसा, वडे या पदार्थांचा उगम, त्यांचे बौद्ध साहित्यातील उल्लेख यांविषयी बराच वेळ त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी मानसोल्लासाचा उल्लेख केला होता. राज्यकारभार आणि समाजजीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणार्‍या या अफलातून ज्ञानकोशाबद्दल बोलताना दुर्गाबाई अगदी रंगून गेल्या होत्या. त्याच ओघात त्यांनी ताम्बूलमञ्जरी या ग्रंथाचाही उल्लेख केला. विड्याच्या पानांविषयी भारतीय ग्रंथांत असलेले सर्व श्लोक या ग्रंथात एकत्रित करण्यात आले आहेत, असं काहीसं दुर्गाबाई म्हणाल्या होत्या. मग ही निखळलेली पानं ताम्बूलमञ्जरीचीच तर नसावीत?

पराकोटीची चीड, उद्विग्नता यांमुळे त्यावेळी ताम्बूलमञ्जरीचा शोध तसाच राहिला. गेल्या वर्षी चेन्नईला काही कामासाठी गेलो असता एका ग्रंथालयात ताम्बूलमञ्जरीची जुनी प्रत सापडली, आणि भांडारकर संस्थेत सापडलेली पानं याच पुस्तकाची होती, याची खात्री पटली. त्या वास्तव्यात मग ताम्बूलमञ्जरी वाचून काढला, आणि खाद्यसंस्कृतीच्या एका वेगळ्याच पैलूशी ओळख झाली.

idli1.jpg

चालुक्य वंशाने सुमारे ६०० वर्षं दक्षिण व मध्य भारतावर राज्य केलं. इसवी सनाचं सहावं ते बारावं शतक हा त्यांचा कार्यकाळ. बदामी, कल्याणी आणि वेंगी अशा तीन गाद्या या वंशाने स्थापन केल्या होत्या. त्यांपैकी बदामीचे चालुक्य हे आद्य. दुसर्‍या पुलकेशीच्या मृत्यूनंतर वेंगीच्या चालुक्यांनी आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं आणि दहाव्या शतकात कल्याणीचे चालुक्य उदयास आले.

दहाव्या शतकात दख्खनेचा बराच भाग राष्ट्रकुटांनी व्यापला होता. चालुक्य राजांनी त्यांचा पराभव करून आपला भूभाग परत मिळवला, आणि कल्याणी (हल्लीचे बसवकल्याण) येथे राजधानी स्थापन केली. सहावा विक्रमादित्य हा या वंशातील सर्वांत पराक्रमी राजा. आपल्या पन्नास वर्षांच्या राजवटीत त्याने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. शक संवत्सर रद्द करून विक्रम संवत्सराची सुरुवात केली. चोल साम्राज्याचा पराभव करून संपूर्ण दख्खन आपल्या आधिपत्याखाली आणले. कन्नड व संस्कृत साहित्याला चालना दिली. अनेक सुंदर मंदिरं बांधली.

chalukya.jpg

(सोमेश्वराचं राज्यारोहण झालं त्यावेळी चालुक्यांच्या आधिपत्याखाली असलेला भाग. लाल बिंदू राजधानीचं ठिकाण दर्शवतो. स्रोत : विकि)

राजा सोमेश्वर (तिसरा) हा सहाव्या विक्रमादित्याचा पुत्र. भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक या उपाधी त्याला मिळाल्या होत्या. एक शूर लढवय्या आणि प्रजेचं हित जपणारा निष्णात राज्यकर्ता अशी त्याची ख्याती होती. संस्कृत भाषेवर त्याचं अफाट प्रभुत्व होतं. कल्याणी येथे ११२६ साली त्याचा राज्याभिषेक झाला आणि ११३१ साली त्याने अभीलषितार्थचिन्तामणि अर्थात मानसोल्लास हा ग्रंथ रचला. अनेकांच्या मते हा जगातला पहिला ज्ञानकोश. अनेक विषयांचा थोडक्यात, पण सखोल आढावा या ग्रंथात घेतला आहे. लेखकानं या ग्रंथाचं वर्णन जगदाचार्यपुस्तकः, म्हणजे जगाला शिकवणारा ग्रंथ, असं यथार्थ केलं आहे. राजघराण्यातील व्यक्तींनी उत्तम राज्यकर्ता होण्यासाठी व सामान्य जनतेने आरोग्यपूर्ण, शांततामय जीवन जगण्यासाठी या ग्रंथाचा अभ्यास करावा, असं सोमेश्वरानं सांगितलं आहे.

ज्ञान, आरोग्य, धन आणि मोक्ष मिळवण्याच्या लालसेतून आपल्या पूर्वजांनी अनेक विषयांचा अभ्यास केला. सृष्टीचे नियम समजावून घेण्याचा प्रयत्न केला. विज्ञानाची कास धरली. यातूनच दर्शन, व्याकरण, कोश, ज्योतिष, गणित, विज्ञान, धर्म, राजनीति, हस्तिविद्या, अश्वविद्या, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, योग, वाणिज्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, नृत्य, नाट्य, काव्य व इतर अनेक विद्या आणि कलांचा वेध घेणारे ग्रंथ निर्माण झाले. बरेच कष्ट, अभ्यास, विचार या ग्रंथनिर्मितीच्या मागे होते. या सार्‍या ग्रंथांतील ज्ञान एकत्रित करण्याच्या हेतूने मानसोल्लासाची रचना झाली. शिवाय, त्यात सोमेश्वराचे स्वतःचे अनुभव व राजवाड्यातील जीवन बेमालूमपणे मिसळले गेले. खरं म्हणजे, सोमेश्वराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याने रचलेला हा ग्रंथच त्याच्या अफाट बुद्धिमत्तेची, शिक्षणावरील प्रेमाची ग्वाही देतो.

अनुष्टुभ छंदात रचलेल्या या ग्रंथात काही गद्य रचनाही आहेत. भाषा अतिशय सोपी आणि ओघवती आहे. ग्रंथात प्रत्येकी वीस अध्याय असलेली पाच प्रकरणं आहेत. पहिल्या प्रकरणात समाजात वावरताना पाळावयाचे नियम, नीतिशास्त्र, समाजसेवा, धार्मिक विधी, मूर्ती तयार करण्याचे नियम, रोग व त्यांवरील उपचार यांचा आढावा घेतला आहे. कायदा, शेजारच्या देशांशी करावयाचे व्यवहार, युद्धकला, किल्ल्यांची रचना, मित्रराष्ट्र व शत्रुराष्ट्रांशी संबंधित कायदे व नियम हे राजकारणाशी संबंधित विषय दुसर्‍या प्रकरणात हाताळले आहेत. तिसर्‍या प्रकरणात स्थापत्यकला, चित्रकला, सुलेखनकला, नृत्यकला इ. कलांचा अभ्यास केला आहे. चौथे व पाचवे प्रकरण दैनंदिन आयुष्य आनंदात घालवण्यासाठी लागणार्‍या मनोरंजनाच्या साधनांशी संबंधित आहे. गणित, दशमान पद्धती, ज्योतिष, खगोलशास्त्र, भूगोल, इतिहास, तीर्थक्षेत्रांची माहिती, अश्वविद्या, हस्तिविद्या, जादू, धातूशास्त्र, रसायनशास्त्र, किमया (alchemy), दागिने व रत्न, लग्न, शृंगार, पाककला, मदिरा, संगीत, सुगंधी द्रव्ये, शेती, मनोरंजनाची साधने, वाहतुकीची साधने असे असंख्य विषय या प्रकरणांत हाताळले गेले आहेत. प्रत्येक अध्यायात राजासाठी व राजघराण्यातील व्यक्तींसाठी काही नियम व दंडक सांगितले आहेत. उदाहरणार्थ, राजाने व राणीने कोणते अलंकार परिधान करावेत (भूषोपभोग), राजाची वस्त्रे कशी असावीत (वस्त्रोपभोग), राजाने स्नान कसे करावे (स्नानोपभोग), राजाचं चित्र कसं काढावं, राजवाड्याची रचना कशी असावी, रथ कसे असावेत (यानोपभोग), छत्रचामरे कशी असावीत (चामरभोग), राजवाड्यातील धार्मिक विधी कसे असावेत, राजपुत्रास शिक्षण कसे द्यावे, प्रणयाराधन कसे करावे (योषिदुपभोग) इ. गोष्टींचं मार्गदर्शन सोमेश्वराने केलं आहे.

अन्नोपभोग या अध्यायात सोमेश्वराने अन्न कसं शिजवावं, भांडी कोणती वापरावीत, उत्तम धान्य कसं निवडावं याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. शिवाय अनेक पाककृतीही दिल्या आहेत. यात वर्णन केलेले बहुतेक पदार्थ हे राजवाड्यात रांधले जात. त्यामुळे मानसोल्लासातील हा अध्याय खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आठ शतकांपूर्वीची दक्षिण भारतातील खाद्यसंस्कृतीची झलकच या अध्यायात पाहायला मिळते.

सोमेश्वराच्या राजवाड्यात म्हशीच्या दुधात शिजवलेला भात अनेकदा केला जाई [१]. गव्हाचा वापरही भरपूर होई. दुधात भिजवलेल्या कणकेच्या पुर्‍या तळून साखरेत घोळत. त्यांना सुहाली असं म्हणत [२]. या पुर्‍या जरा कडक झाल्यास त्यांना पाहलिका असं नाव होतं [३]. पोळीका या कणकेपासून केलेल्या पदार्थाचे सविस्तर वर्णन मानसोल्लासात आहे. यालाच मांडक (मांडे) असंही म्हणत [४]. गहू धुऊन उन्हात वाळवत. हा गहू दळल्यावर कणीक अगदी बारीक चाळणीतून चाळत. तूप, मीठ घालून कणीक भिजवून, छोटे गोळे करून निखार्‍यांवर ठेवलेल्या खापरावर भाजत. बरेचदा हे गोळे लाकडी लाटण्याने पोळीसारखे लाटून मग निखार्‍यांवर भाजत.

कडधान्यांचा वापर करून अनेक शाकाहारी व मांसाहारी पदार्थ केले जात. राजमा, मसूर, मूग आणि अख्खे उडीद धुऊन, कांडून मंदाग्नीवर शिजवत. त्यात हळद, हिंग, मीठ घालत. विदलपाक नावाचा हा पदार्थ शोरब्याचाच एक प्रकार होता [५]. विदल म्हणजे शिजवणे, आणि दालन म्हणजे दळणे, या शब्दांवरून विदलपाक हा शब्द तयार झाला होता. हिरवे मूग, हिंग, आल्याचे तुकडे, चारोळी आणि तेलात तळलेली कमळाची देठं घालूनही सूप केले जाई. त्यास प्रियाल असं म्हणत. बरेचदा त्यात तळलेली वांगी किंवा शेळी अथवा कोल्ह्याचे शिजवलेले मांस घालत. चवीसाठी वरून मिरपूड किंवा सुंठ घेत [६]. डाळी व कडधान्ये वापरून वडे करत. तुपात तळून दुधात घातलेल्या उडदाच्या वड्यांना क्षीरवट असं नाव होतं. उडदाचं पीठ आंबवून, वाफवून इडरिका, म्हणजे इडल्या, तयार करत [७]. या इडल्या क्वचित तळत. वर हिंग, जिर्‍याची फोडणी देत. पाच-सात छिद्रं असलेल्या उडदाच्या वड्यांना घारिका म्हणत. वटक म्हणजे छिद्र नसलेले वडे. मीठ, आलं, कोथिंबीर, जीरे, मिरपूड वगैरे घालून घुसळलेल्या दह्यात हे वडे मुरवून खात [८]. अख्खे उडीद भिजवून, साल वेगळं करून पाट्यावर वाटत. यात मिरपूड, जिरे मिसळून दोन दिवस आंबायला ठेवत. या पिठाचे छोटे गोळे करून उन्हात वाळवत. या वटिका, म्हणजे वड्या, हव्या तेव्हा शिजवून भाज्यांत वापरत [९] .

वट्टाणक, म्हणजे वाटाणे पाण्यात भिजवून पाट्यावर वाटत. वरून तुपाची फोडणी देत. त्यात मुगाचे पीठ, मीठ घालून या मिश्रणाचे लहान गोळे तळत. या वड्यांना कटकर्ण म्हणत [१०]. वेगवेगळ्या कडधान्यांची पिठं किंवा वेगवेगळी पिठं एकत्र करून, त्यात मीठ, मिरपूड, हिंग, साखर घालून पूरिका, म्हणजे पुर्‍या तळत [११]. मुगाचं पीठ, मसाले एकत्र करून कणकेत घोळून शिजवत. या पदार्थाला वेष्टिका असं नाव होतं [१२]. उडदाचं व मुगाचं पीठ एकत्र करून त्याची धिरडी करत. हे दोसक, म्हणजे दोसे, दह्याबरोबर खात [१३].

कणीक व तांदुळाच्या पिठीपासून काही गोड पदार्थही करत. भाजलेल्या कणकेत दूध, तूप, वेलदोड्याची पूड व पिठीसाखर घालून केलेल्या पदार्थाला काशार असं म्हणत [१४]. काशाराचं सारण भरून तळलेल्या पुर्‍यांना उदुंबर म्हणत [१५]. उकडीच्या मोदकांना (ते पावसाळ्यात पडणार्‍या गारांप्रमाणे शुभ्र दिसतात म्हणून ) वर्षोपलगोलक असं नाव होतं [१६]. चिरोट्यांना पत्रिका असं नाव होतं [१७]. पातळ कागदांचे थर एकमेकांवर रचल्याप्रमाणे हे चिरोटे दिसतात, म्हणून हे नाव. नाव वेगळं असलं, तरी करण्याची पद्धत मात्र तीच होती.

सोमेश्वराच्या राजवाड्यात दूधदुभत्याचा मुबलक वापर होई. दूध प्यायच्या अगोदर ते तापवत. यासाठी खास भांडी ठरली होती. भरपूर उकळून अर्धं भांडं दूध उरल्यावर ते प्यायला (पानपाक), व एक-षष्ठांश दूध उरल्यावर (घुटीपाक) मिठाई करण्यासाठी वापरत. एक-अष्टमांश भाग उरल्यावर त्यास शर्करापाक (खवा) म्हणत [१८]. या दुधांत फळं किंवा फुलांच्या पाकळ्या घालून खात. रेडकू मोठं झाल्यावरच म्हशीचं दूध पिण्यासाठी वापरले जाई. याच दुधाचं दही करत. अजिबात पाणी न घातलेल्या दह्याला मथित असं म्हणत. समप्रमाणात पाणी घातलेल्या दह्याला उदस्वित, तर भरपूर पाणी घातलेल्या दह्याला तक्र म्हणत [१९]. दही घुसळून त्यात साखर व कापूर घालून खात [२०]. दह्यात फळांचे तुकडे घालून शिकरण करत. शिवाय दह्याचे श्रीखंडही आवडीने खाल्ले जाई. सैंधव मीठ, सुंठ व जिरेपूड घालून साय खात [२१]. लोण्यापासून उत्तम तूप व्हावं यासाठी लोणी कढवताना त्यात विड्याचं पान घालत [२२]. उकळलेल्या दुधात ताकाचं पाणी घालून पनीर तयार करत. त्यात तांदळाचं पीठ घालून साखरेच्या गरम पाकात सोडत. वेगवेगळ्या आकाराच्या या मिठायांना क्षीरप्रकार असं नाव होतं [२३]. हल्लीच्या चमचम व रसगुल्ल्याचीच ही प्राथमिक आवृत्ती होती.

सामिष पदार्थ तयार करण्याच्या विधी आणि त्यासाठी उत्तम प्रतीचं मांस कसं तयार करावं, याचं सविस्तर वर्णन मानसोल्लासात आहे. उदाहरणार्थ, डुकराची त्वचा व केस कसे काढावेत याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत. डुकराच्या शरीरावर पांढरं फडकं टाकून त्यावर थोडा वेळ सतत गरम पाणी ओतावं. असं केल्याने डुकराचे केस व त्वचा लगेच हाताने वेगळे करता येतात. किंवा, डुकराला मातीने लिंपून गवताच्या शेकोटीत ठेवावं. त्वचा लगेच विलग होते.

अख्ख्या डुकराला मंदाग्नीवर भाजून मांसाचे छोटे तुकडे करत. हे तुकडे परत एकदा कोळशावर भाजून त्यांवर सैंधव मीठ, मिरपूड घालत. या पदार्थाला सुंठक असं म्हणत [२४]. निखार्‍यावर भाजलेल्या सुंठकांचा केशर, मिरपूड, वेलदोडा हे मसाले घालून रस्साही करत [२५]. सुंठकाच्या अन्य एका प्रकारात भाजलेल्या मांसाचे पातळ काप करून मसाला घातलेल्या दह्याबरोबर खात. मसाल्याची धुरी देत. या पदार्थाला चक्कलिका असं नाव होतं [२६]. मांसाचे हे पातळ काप 'पंचांगाच्या पानांप्रमाणे पातळ असावेत', असा दंडक होता. डुकराच्या काळजात मसाले भरून कोळशावर भाजून मसाल्यात घोळवून केलेले सुंठकही राजदरबारात प्रिय होते. या पदार्थाला मांडलिय असं नाव होतं [२७]. हिरवे मूग भिजवून मसाल्यांबरोबर वाटत. त्यात मांसाचे तुकडे घालून तळत. हे वडे कुस्करून त्यात फळं, कांदा, लसूण घालत व मसाल्याची धुरी देत [२८].

बरेचदा मांसाच्या तुकड्यांना फळांचा आकार देत. शेळीच्या मांसाचे मोठ्या बोराच्या आकाराचे तुकडे, मसाले आणि मुगाचं पीठ एकत्र करून वांग, मुळा, कांदा, मोड आलेले मूग यांबरोबर तळत. कवचन्दी असं या पदार्थाचं नाव [२९]. मसाले घालून आवळ्याच्या आकाराचे मांसखंड शिजवत. नंतर त्यात आम्लधर्मी फळं, सुंठकं, मसाले व मीठ घालून परत शिजवत. वरून हिंग व लसणाची फोडणी देत. या पदार्थाला पुर्यला असं म्हणत [३०]. मांसाच्या तुकड्यांना छिद्र करून त्यात वाटलेले मसाले भरत. हे तुकडे नंतर निखार्‍यांवर भाजत. उरलेला मसाला वरून घालत. भडित्रक नामक हा पदार्थ उन्हात वाळवून तुपात तळलाही जात असे [३१]. शेळीच्या मांसाच्या सुपारीच्या आकाराच्या तळलेल्या तुकड्यांवर थोडं रक्त शिंपडलं जाई. कृष्णपाक असं या पदार्थाला म्हणत [३२]. हे तळलेले तुकडे मसाल्यांमध्ये मुरवून फेसलेल्या मोहरीसकट दह्यात घालत [३३]. खिमा आणि मांसाचे अतिशय बारीक तुकडे व मसाले एकत्र करून वडे तळत. या वड्यांना भूषिका म्हणत. क्वचित या वड्यांना तांदुळाच्या दाण्यांसकट निखार्‍यांवर भाजले जाई. तळून भाजलेल्या या वड्यांना कोशली म्हणत [३४]. वांग्यात मसाले घातलेला खिमा घालून तळत [३५]. मसाला घातलेला खिमा तळूनही वडे करत. शेळीचं काळीज केशर, वेलदोडा, लवंग या मसाल्यांसकट शिजवत व दह्यात मुरवत ठेवत. पंचवर्णी असं या पदार्थाचं नाव होतं [३६]. आतडी, जठर इ. अवयवांचेही सुंठक करत [३७]. याशिवाय ताजे मासे, खारवलेले मासे, खेकडे, कासव इ. प्राणीही खाल्ले जात. कासव व खेकड्याचे सूप करत [३८]. नदीकाठच्या शेतातील मोठे, काळे उंदीर खाण्यासाठी वापरत. हे उंदीर पकडून, गरम तेलात तळत. त्यामुळे त्यांची त्वचा, केस विलग होई. उंदराच्या मांसाचे मग वेगवेगळे पदार्थ केले जात.

हे सर्व मांसाहारी पदार्थ मंदाग्नीवर शिकवले जात. मांस लवकर शिजावं, व शिजवल्यावर चिवट होऊ नये, म्हणून शिजवताना त्यात आंबट फळं घालत. मानसोल्लासात उल्लेखलेल्या पदार्थांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हिंगाचा केलेला वापर. शिवाय, हिंग कायम पाण्यात विरघळवून वापरले जात असे.

खार्‍या व गोड्या पाण्यातील एकूण पस्तीस प्रकारच्या माशांचा मानसोल्लासात उल्लेख आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात सापडणारे हे मासे आहेत. या माशांचं वर्गीकरण, त्यांचं खाद्य, मासेमारीची कला, आणि हे मासे वापरून करायचे पदार्थ यांविषयी मानसोल्लासात विस्ताराने लिहिलं आहे. मासे व मासेमारीबद्दल माहिती देणारे ५२ श्लोक आहेत, तर मासे वापरून केलेल्या पाककृती १३ श्लोकांत सांगितल्या आहेत. सोमेश्वरानं माशांची दोन गटांत विभागणी केली आहे. खवले असलेले मासे (शल्कज), व खवले नसलेले मासे (चर्मज). यांची परत आकारमानानुसार लहान व मोठे अशी प्रतवारी करता येते. खार्‍या पाण्यातले व गोड्या पाण्यातले अशीही विभागणी होऊ शकते. उदाहरणार्थ, सोर (Galeocerdo tigrinus N. H., मोरी), संकुचक (Dasyatis sephen Forsk), शृंगसोर (Sphyrna blochii C.), बल (Carcharhinus macloti), चंविलोच (Pristis microdon Latham), कण्टकार (Plotosus canius Ham.) हे खवले नसलेले समुद्रातील मासे; कोवासक (Mystus seenghala Sykes), खिरीड (Rita gogra), पाठीन (Wallago attu Schn.), सिंहतुण्डक (Bagarius aagarius Ham.) हे खवले नसलेले नदीतील मोठे मासे; रोहित (Labeo rohita ham.), स्वर्णमीन (Barbus sarana Ham.), खण्डालिप (Mastacembelus armatus Lacel) हे खवले असलेले नदीतले मध्यम आकाराचे मासे; महाशील (Tor tor Ham.), वटगी (Channa leucopunctatus), कह्लव (Catla catla), नडक (Barbus curmuca Ham.), वडिश (Acrossocheilus hexagonolepsis McClell) हे खवले असलेले नदीत राहणारे मोठे मासे, इत्यादी. हे मासे कुठे वास्तव्य करतात, त्यांना पकडण्यासाठी योग्य ठिकाण व वेळ कोणती, हेसुद्धा सोमेश्वराने सांगितले आहे. कौरत्थ (घोळ) मासे नदीतून अथवा समुद्रातून ४-७ योजने पोहत येऊन शांत तळ्यात वास्तव्य करतात. त्यांना समुद्रात न पकडता तळ्यात पकडावे. खवले असलेले खोवाकीय मासे नदीत, भरपूर दगड असलेल्या उथळ जागी राहतात, तर कोरक मासे नदीत खोल पाण्यात राहतात.

राजास आवडणारे मासे सहज उपलब्ध व्हावेत म्हणून मत्स्यपालन करत. त्यासाठी खास तळी, नदीचा काही भाग राखून ठेवला जाई. या माशांना तिळाचं कूट, कणीक, कडधान्यांची पिठं, बेलफळं, करडईची पानं, मांस इ. खायला देत. कोणत्या माशाला काय खायला द्यायचे, याची सविस्तर नोंद सोमेश्वराने केली आहे. मासेमारीसाठी सुपारीच्या पानांपासून गळ बनवावा. कापसाच्या दोर्‍याचा गळ मुळीच वापरू नये. तीन दोर्‍यांचा पीळ असलेला गळ वापरावा. गळाची लांबी जास्तीत जास्त शंभर हात व कमीत कमी आठ हात असावी. घोड्याच्या शेपटीच्या केसापेक्षा गळाची जाडी कमी नसावी. आंब्याच्या देठापेक्षा ती जास्त नसावी.

माशांचे पदार्थ करण्यासाठी कायम ताजे मासे वापरावेत. माशांना उग्र दर्प येत असल्यास ते वापरू नयेत. माशांना खवले असल्यास ते काळजीपूर्वक काढावेत. माशाचा आकार मोठा असल्यास त्याचे लहान तुकडे करावेत. माशाचं डोकं व पोटातील अवयव खाऊ नयेत. मासे शिजवण्यापूर्वी त्यांना तेल व मीठ लावावे. असं केल्याने त्यांना येणारा वास नाहीसा होतो. त्यानंतर हे मासे हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. अगोदर करून ठेवलेल्या मसाले घातलेल्या पाण्यात हे शिजवावेत. मासे फार काळ शिजवू नयेत. माशांचे लहान तुकडे चिंचेच्या पाण्यातही शिजवता येतात. या शिजवलेल्या तुकड्यांवर कणीक भुरभुरवून तुपात तळावे. खाताना वरून मीठ, वेलदोड्याची पूड व मिरपूड घ्यावी. मासे निखार्‍यांवर भाजूनही खाता येतात. किंवा माशांचे लहान तुकडे करावेत. प्रत्येक तुकड्याची लांबी चार अंगुळं एवढी असावी. या तुकड्यांना मीठ लावून मडक्यात ठेवावे. हे खारखण्ड अनेक दिवस टिकतात, व ताजे मासे न मिळाल्यास निखार्‍यांवर भाजून खाता येतात.

सोमेश्वराच्या मते, राजाने आपल्या पुत्र, पौत्र, नातेवाईक, सरदार, अंगरक्षक आणि खास मर्जीतील सेवक यांच्यासमवेत जेवावे. राजासाठी जेवायला व वाढायला सोन्याची भांडी वापरावीत. जेवताना कायम पूर्वेकडे तोंड असावे. पाटावर मऊ आसन असावे. बेंबीपासून गुडघ्यापर्यंतचा भाग स्वच्छ, पांढर्‍या कपड्याने झाकून घ्यावा [३९]. जेवणाची सुरुवात भात, मुगाची आमटी (मुद्गसूप) आणि तुपाने करावी. त्यानंतर गोड पदार्थ, फळं, गोड पेयं, दही व सरतेशेवटी ताकभात. यानंतर इच्छा असल्यास साखर घालून गार दूध प्यावे [४०]. राजाने आपल्या जेवणात ऋतुमानानुसार बदल करावा. वसंतात तुरट चवीचे पदार्थ, उन्हाळ्यात गोड व गार पदार्थ, पावसाळ्यात खारट अथवा खारावलेले पदार्थ, हेमंतात गरम व तळलेले पदार्थ आणि थंडीत गरम पदार्थांचं सेवन करावं [४१]. शक्यतो मातीच्या भांड्यांत स्वयंपाक करावा. कारण मातीच्या भांड्यांत केलेल्या पदार्थांची चव अधिक चांगली असते. राजवाड्यातील आचारी असंभेद्य (लाच देऊनही फितूर न होणारे) व कृतान्नस्य परीक्षक (विषबाधा होऊ नये म्हणून अन्नाची परीक्षा घेऊ शकणारे) असावेत.

सोमेश्वराने पाण्याच्या वापरासंबंधी काही नियम पानीयभोग या अध्यायात घालून दिले होते. पावसाच्या पाण्याला दिव्य असं म्हटलं जाई. शरद ऋतूत हे दिव्य पाणी प्यावे. हेमंत ऋतूत नदीचे पाणी, शिशिरात तलावातील पाणी, भरपूर कमळं असलेल्या तळ्यातील पाणी वसंतात, झर्‍याचे पाणी ग्रीष्मात आणि पावसाळ्यात विहिरीचे पाणी प्यावे. दिवसा सूर्यप्रकाशात व रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेल्या पाण्याला हंसोदक म्हणत. हे पाणी पिण्यास मात्र ऋतुमानाचं बंधन नसे [४२]. नारळाच्या पाण्याला वर्क्ष्य म्हणत [४३]. हे पाणी पिण्यासही ऋतुमानाचं बंधन नव्हतं. साठवलेल्या पाण्यास कोणताही वाईट गंध नसावा. सकाळी भरलेलं पाणी रात्री व रात्री भरलेलं पाणी सकाळी पिऊ नये. पाणी कायम उकळूनच प्यावे. पाणी सुगंधी करण्यास लवंग व कापराचा वापर करावा [४४]. जाई, मोगरा ही फुलंही त्यासाठी वापरू शकता [४५]. कोरफडीची पानं जाळून निघणारा धूर पाणी शुद्ध करण्यास वापरावा. त्रिफळा चूर्णाने शुद्ध केलेलं पाणी सर्वांत चांगले. हे पाणी माठांत भरून सोन्याच्या फुलपात्राने प्यावे. जेवताना सतत पाण्याचे घोट घ्यावेत. यामुळे प्रत्येक पदार्थाची चव नीट कळते व पचनास मदत होते. तहान लागली असता लगेच पाणी प्यावे. अगदी मध्यरात्रीसुद्धा पाणी पिण्याचा आळस करू नये [४६].

दुधापासून तयार केलेलं एक खास पेय सोमेश्वरास अतिशय आवडे. जेवणानंतर हे पेय तो आपल्या अधिकार्‍यांसमवेत घेत असे. उकळलेल्या दुधात आम्लधर्मी फळाचा रस घालत. दूध फाटल्यावर त्यातील पनीर बाजूला काढून पाण्यात साखर व वेलदोड्याची पूड घालत. हे पाणी स्वच्छ, सुती फडक्यातून अनेकदा गाळलं जाई. नंतर त्यात भाजलेल्या चिंचेची पूड व फळांचा रस घालत [४७].

त्यानंतरचं प्रकरण पादाभ्यंगोपभोग. जेवणानंतर राजाने वामकुक्षी घ्यावी. कुशल सेवकाकडून पाय चेपून घ्यावेत. पायाला सुगंधी द्रव्ये लावावीत. वसंतात शुद्ध तूप, दही किंवा गार दूध, ग्रीष्मात लोणी, पावसाळ्यात चरबी, किंवा ताक, शरदात चंदनाच्या पाण्याने शंभर वेळा शुद्ध केलेले तूप, आणि हेमंतात व शिशिरात शुद्ध तिळाचे तेल पायांना लावावे.

सोमेश्वराने मानसोल्लास लिहिले तेव्हा सर्वत्र बदलाचे वारे वाहू लागले होते. अनेक मोठी साम्राज्ये कोसळू लागली होती. परकीय आक्रमणे वाढीस लागली होती. बौद्ध व जैन धर्म लोकप्रिय होत होते. डोळे मिटून रुढी स्वीकारण्यास लोकांनी नकार दिला होता. आपली मतं निर्भयपणे मांडण्यासाठी नवनवीन साहित्य निर्माण होत होतं. मात्र, या सार्‍या कल्लोळातही उत्तम राजा व सुदृढ प्रजा निर्माण व्हावी म्हणून कोणतीही तडजोड न करता सोमेश्वराने लिहिलेले नीतिनियम, त्याच्या उत्तम मूल्यांवरील विश्वासाचं, व्यापक दृष्टिकोनाचं दर्शन घडवतात. जीवनावरील त्याचं विलक्षण प्रेम प्रत्येक अध्यायात दिसून येतं. मनुष्यस्वभावाचा जबरदस्त अभ्यास, अद्भुत निरीक्षणशक्ती, सुंदर भाषा यांच्या मदतीने सोमेश्वर 'मस्त जगावं कसं' हेच जणू आपल्याला शिकवतो. चहुबाजूंनी साम्राज्यास धोका असूनही प्रजा आनंदी राहायला हवी, हे त्याला पक्कं ठाऊक होतं. प्रजा सुखी, सुदृढ असेल, तरच राजा आनंदी राहू शकतो, हे त्याला ठाऊक होतं. मानसोल्लास हा ग्रंथ रचून सोमेश्वराने राजा व प्रजा यांच्यासाठी एक नीतिपाठच जणू घालून दिला.

अशाच संक्रमणकाळात, अठराव्या शतकाच्या सुरुवातीस, शिवतत्त्वरत्नाकर हा ग्रंथ रचला गेला. केलादी साम्राज्याचा राज्यकर्ता असलेल्या बसवराजाने १७०९ साली हा ग्रंथ रचला. एकूण अठरा राजे-राण्या केलादी साम्राज्याला लाभल्या. त्यांपैकीच एक पहिला बसवप्पा नायक. बसवराज अथवा केलादी बसवभूपाळ या नावांनेही हा ओळखला जाई. इ.स. १६९६ ते १७१४ हा याचा कार्यकाळ. एक उत्तम राज्यकर्ता म्हणून बसवराजाची सर्वत्र ख्याती होती. न्यायप्रिय, सत्यवचनी ही विशेषणं त्याचे प्रजाजन त्याच्यासाठी वापरत. आपल्या शासनकाळात त्याने सर्व कलांना उत्तेजन दिलं. लेखक, कवी, गायकांना दरबारी आसरा दिला. धर्माच्या आधारे कोणत्याही स्वरुपाचा भेदभाव त्याने कधी केला नाही. तो स्वतः वीरशैव असला तरी त्याच्या राज्यात सर्व पंथांना स्वातंत्र्य होतं. संस्कृत, कन्नड या भाषांवर त्याचं विलक्षण प्रभुत्व होतं. शिवतत्त्वरत्नाकर, सुभाषितसुरद्रुम आणि सुक्तिसुधाकर हे तीन ग्रंथ त्याने रचले. त्यांपैकी पहिले दोन ग्रंथ हे संस्कृतात असून तिसरा कन्नड भाषेत लिहिला आहे. दुर्दैवानं सुक्तिसुधाकराची एकही प्रत आज शिल्लक नाही.

बसवराजाने लिहिलेला शिवतत्त्वरत्नाकर हा ग्रंथ संस्कृत वाङ्मयातील एक मानदंड समजला जातो. ३५,००० श्लोक असलेला हा ग्रंथ त्याकाळी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या सर्व विषयांचा सखोल आढावा घेतो. इतिहास, प्रशासन, तत्त्वज्ञान, विज्ञान व कला या सार्‍यांचा समुच्चय या ग्रंथात झाला आहे. भारतीय विद्वानांनी कायमच विविध शाखांतील ज्ञान एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. भोजराजाने रचलेले चतु:शक्तिकला आणि विश्रांतीचिन्ताविनोद हे ग्रंथही समग्र ज्ञानकोशासारखेच होते. पण या ग्रंथांमध्ये त्या काळात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या सर्वच विषयांचा अभ्यास नव्हता. त्यादृष्टीने, मानसोल्लासशिवतत्त्वरत्नाकर हे दोन ग्रंथ अजोड ठरतात. अर्थात, शिवतत्त्वरत्नाकराची मानसोल्लासाशी तुलना केली जातेच. पण मानसोल्लासापेक्षा चौपट श्लोकसंख्या असलेला हा ग्रंथ त्यातील भाषेच्या विलक्षण सौष्ठवामुळे व शास्त्रीय विवेचनामुळे एकमेवाद्वितीय मानला जातो. हा ग्रंथ लिहिताना बसवराजाने मानसोल्लासाचा आधार घेतला असण्याची शक्यता मात्र आहे. मानसोल्लासाप्रमाणेच या ग्रंथातही कोणत्याही धर्माचा प्रचार अथवा तिरस्कार केलेला नाही. वैदिक धर्मालाही महत्त्व दिलं गेलं आहे. ग्रंथाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक विषयांची माहिती देताना त्या माहितीचा स्रोतही देण्यात आला आहे. अनेक प्राचीन ग्रंथांची माहिती तर त्यातून मिळतेच, पण बसवराजाच्या व्यासंगाचीही खात्री पटते.

ज्ञान मिळवण्यासाठी आतुर असणार्‍या सर्वांसाठी हा ग्रंथ एक भांडार आहे, हे बसवराजाने सुरुवातीलाच सांगितलं आहे.

नीतिं नीतिपरा विलोक्य सुकलाभेदान्विनोदार्थिन-
स्तन्त्रण्यत्र च् तान्त्रिका: सुमहितान् योगांश्च योगेप्सवः |
मोक्षं चापि मुमुक्षवो बत जना जानन्त्विति प्रेक्षया
ग्रन्थः सोयमुदाररीतिरधुना निर्मातुमारभ्यते ||

ग्रंथात नऊ कल्लोळ असून, प्रत्येक कल्लोळात काही तरंग आहेत. तरंगांची एकूण संख्या १०१ आहे. ग्रंथाचं नावच रत्नाकर असल्याने, प्रकरणांची व उपप्रकरणांची नावं कल्लोळतरंग असणं अतिशय सयुक्तिक ठरतं. ग्रंथाचं स्वरूपही अतिशय रोचक आहे. विषयांची विभागणी करून निव्वळ माहिती दिलेली नाही. बसवराजाचा मुलगा, सोमशेखर, प्रश्न विचारतो आणि बसवराजा सविस्तर उत्तरं देतो. या संवादांत अधूनमधून काही विनोद, दंतकथा, पूर्वजांच्या पराक्रमांच्या कथा येतात. शिवतत्त्वरत्नाकरात अर्थातच पाककलेचाही सांगोपांग विचार केला आहेच. तत्कालीन पाककृती, पद्धती आणि पाकसिद्धीचे नियमही अनेक ठिकाणी डोकावून जातात.

बसवराजाच्या मते राजवाड्यातील स्वयंपाकघर ३२ फूट लांब आणि ८ फूट रुंद असावे. धुराड्याची चांगली सोय असावी. पूर्वेला लोखंडाच्या नऊ चुली असाव्यात. या चुलींवर मोठी भांडी ठेवता यायला हवीत. आग्नेय दिशेला चुलींसाठी लागणारे जळते निखारे ठेवावेत. दक्षिणेला सरपण, पश्चिमेला पाण्याचे घडे, आणि उत्तरेला फळं, भाज्यांसाठी लागणार्‍या टोपल्या व कुंचे ठेवावेत. वायव्येला उखळ, खलबत्ता, विळ्या या वस्तू ठेवाव्यात. नैऋर्त्येला स्वयंपाकाची तयारी करायला मोकळी जागा असावी. स्वयंपाकासाठी लागणारी उपकरणे व भांडी कशी असावीत? खवणी फूटभर लांब असावी. मूठ सोन्याची किंवा चांदीची असावी. सुपाचा आकार हत्तीच्या कानासारखा असावा. उखळ चौकोनी असावे. ४ फूट लांब, ३ फूट रुंद आणि २४ इंच खोल.

स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असावीत. ही भांडी कोणत्या धातूची आहेत, यावर त्या पदार्थाचा गुणधर्म व त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. उदाहरणार्थ, तांब्याच्या भांड्यात शिजवलेला भात वातशामक असतो. हा भात खाल्ल्याने जठराचे विकार नाहीसे होतात. तपश्चर्या करणार्‍या योगींनी कायम तांब्याच्या भांड्यात शिजवलेला भात खावा. कांस्याच्या भांड्यात शिजवलेला भात कफ, वात व पित्त या तिन्ही दोषांचा नाश करतो. सोन्याच्या भांड्यात शिजवलेला भात खाल्ल्यास विषबाधा होत नाही. हा भात वातशामक व कामोद्दीपक असल्याने राजाने कायम सोन्याच्या भांड्यात शिजवलेला भात खावा. चांदीच्या भांड्यात शिजवलेला भात पचनास हलका असतो, आणि पोटाचे विकार दूर करतो.

मातीच्या भांड्यांचाही भरपूर वापर केला जाई. अतिशय कोरड्या जागेवरील मातीपासून तयार केलेल्या भांड्यात स्वयंपाक केल्यास रक्तदोष नाहीसे होऊन त्वचाविकार दूर होतात, पाणथळ जागेवरील मातीपासून तयार केलेली भांडी वापरल्यास कफविकार दूर होतात आणि दलदलीच्या जागेवरील माती वापरल्यास पचनसंस्था मजबूत होते, असा समज होता. जेवताना बसायला राजासाठी सोन्याचा नक्षीदार पत्रा ठोकलेला खास लाकडी पाट असे. जेवताना पूर्वेकडे तोंड असल्यास दीर्घायुष्य, दक्षिणेकडे कीर्ती, पश्चिमेकडे वैभव आणि उत्तरेकडे तोंड असल्यास उत्तम आरोग्याचा लाभ होतो, असा समज होता. राजास वाढण्यासाठी सर्व भांडी सोन्याची असत. ताटवाटीही सोन्याचीच. आमटी, ताक, दूध असे पदार्थ डावीकडे वाढत. भात ताटाच्या मध्यभागी आणि हिरव्या व फळभाज्या पानात खालच्या भागात वाढत. जेवणाची सुरुवात गोड पदार्थांनी होई. नंतर खारट व आंबट पदार्थ आणि शेवटी तिखट व तुरट पदार्थ.

राजासाठी रोज शाकाहारी व मांसाहारी पदार्थ रांधले जात. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे धान्य, भाज्या व मांस वापरलं जाई. शिवतत्त्वरत्नाकरात तांदळाच्या आठ जातींचा उल्लेख आहे. समिधान्य म्हणजे डाळी. निष्पव (अवराई, hyacinth bean, Lablab Purpureus ), कृष्णधाक (काळे तूर), मूग अशा वेगवेगळ्या डाळी वापरून आमटी करत. पालेभाज्या, फळभाज्या, कंद, फुलं, मुळं यांचा भाजी करण्यासाठी वापर होई. दूध, दही, ताक रोजच्या आहारात असत. साखरेचा पाक वापरून वेगवेगळे पदार्थ केले जात. मृदू, मध्यम, खर, सरिक असे पाकांचे प्रकार होते. खर पाकात दूध, वेलदोड्याची पूड, केशर आणि कापूर घालून वर्सेलपाक हा पदार्थ केला जाई. बसवराजाचा हा अत्यंत आवडीचा पदार्थ होता. उपदंश, म्हणजे तोंडीलावणी, निरनिराळ्या प्रकारांनी करत. कोशिंबिरींना तेलाची फोडणी देत, वाफेवर शिजवत, किंवा कच्च्याच ठेवत. पिण्याचं पाणी ऋतुमानानुसार वेगवेगळ्या स्रोतांतून आणलं जाई. ते शुद्ध करण्याच्या काही पद्धती होत्या. मडक्यात वाळू व सुगंधी द्रव्यं घालून (पिण्डवास), औषधी चूर्ण घालून (चूर्णादिवास) किंवा फळं व फुलं घालून (पुष्पवास) पाणी शुद्ध व सुगंधी केलं जाई.

राजास आवडणार्‍या काही खास पाककृतींचा उल्लेख शिवतत्त्वरत्नाकरात आहे. दर पन्नास वर्षांनी फुलणार्‍या बांबुची फुलं घालून केलेला भात बसवराजास अतिशय आवडे. राजान्नअक्की असं त्यास म्हणत. केशर, वेलदोड्याची पूड व दूध घालून एरवी भात केला जाई. साध्या भातावर हिंगाची फोडणी व तळलेली चिंच घालत. तोंडी लावण्यास पापड, लाल भोपळ्याचे सांडगे, भाजलेली उडदाची डाळ असे. सणासुदीला काही खास पदार्थ केले जात. पोहे व मुगाची डाळ भाजून त्यात कापूर, पिठीसाखर व वेलदोड्याची पूड घालत. या मिश्रणाचे सुपारीएवढे लहान गोळे करून तांदुळाच्या पिठात घोळून तळत. पूरीविलंगायी असं या पदार्थाचं नाव होतं. मसाले घालून तुपात शिजवलेले फणसाचे बारीक काप दह्यात घालत. मग या मिश्रणाचे लहान गोळे करून तळत असत. तळलेल्या भाज्यांना हळदीच्या पानात गुंडाळून वाफवण्याची पद्धत होती. याप्रकारे रांधलेल्या सार्‍या पदार्थांना पुडे असं म्हणत. उदाहरणार्थ, वांग्याचे काप, बारीक चिरलेला कांदा व पोहे तेलात तळून मग वाफवत असत. दही घालून वांग्याचं भरीतही केलं जाई. बांबुचे कोंब घालून भाज्या, भात करत. त्यांतील विषाक्त पदार्थ काढून टाकण्यासाठी अगोदर दोन दिवस ते पाण्यात भिजत ठेवले जात. मसाले घालून दह्यात शिजवलेल्या भाज्यांना पालिध्य म्हणत. या भाज्यांना तुपाची फोडणी देत.

पिकलेली फळं घालून शिकरण केले जाई. महाळुंगाचे फळ (Citrus medica) म्हशीच्या दुधात शिजवत. वर वेलदोड्याची पूड पेरत. उडदाच्या लाडवांना मनोहरद म्हणत आणि तांदुळ-उडदाच्या लाडवांना पियषपिण्ड. ओल्या नारळाचं सारण घालून करंज्या केल्या जात. तांदुळाच्या पिठीत दूध आणि साखर घालून तळलेल्या लाडवांना हालुगडिगे म्हणत. रबडी (केनेपायस) शक्यतो दुपारच्या भोजनासाठी केली जाई. भोजनाधिकरोटी आणि मधुनाल नावाची दोन वेगळीच पक्वान्नं शिवतत्त्वरत्नाकरात आढळतात. पुरणाच्या मांड्याचे तुकडे, म्हशीचं दूध, आमरस आणि साखर एकत्र करून या मिश्रणाचे लहान गोळे करत. फुलांच्या पाकळ्या घातलेल्या कणकेच्या उंड्यात हे सारण भरून निखार्‍यांवर भाजत. ही भोजनाधिकरोटी तूप आणि साखरेबरोबर खाल्ली जाई. कणीक, तांदुळाची पिठी आणि हरभर्‍याच्या डाळीचं पीठ समप्रमाणात घेऊन त्यात पिकलेली केळी आणि भरपूर लोणी घालत. हे सरसरीत मिश्रण बांबुच्या काठीवर लिंपत. वाळल्यावर या नळीत पिठीसाखर भरून तुपात तळत. या पदार्थास मधुनाल असं नाव होतं.

बांबू अथवा सोन्याचांदीपासून राजासाठी दातकोरणी करत. त्यांना वटि किंवा घुटिका म्हणत. बांबू किंवा धातुच्या पातळ काड्या गोमूत्र आणि हरितकी चूर्णाच्या मिश्रणात आठवडाभर भिजवून ठेवत. त्यानंतर फुलांनी सुगंधित केलेल्या पाण्याने धुऊन, मसाल्यांच्या पाण्यात दिवसभर बुडवून वाळल्यावर या दातकोरण्या वापरत. वेलावर्ण, ईश्वरपूर, कोटिकपूर, वनवास आणि राष्ट्रराज्य या ठिकाणांहून राजासाठी खास सुपारी आणली जाई. वनवास आणि राष्ट्रराज्य येथील विड्याची पानंही प्रसिद्ध होती. महाराष्ट्रातून गंगेरी आणि रामटेकी या जातींची विड्याची पानं आणली जात. चिक्कणी, श्रीवर्धन रोठा आणि फुलभरडा या सुपार्‍याही महाराष्ट्रातून येत. १२ विड्याची पानं, सुपारी, काथ, चुना, वेलदोडा, जायफळ, अक्रोड, पिस्ता आणि खोबरं घातलेला कुलपीविडा बसवराजास खास आवडे. पानाच्या मध्यभागी लक्ष्मी, पाठीमागे ज्येष्ठा, उजवीकडे वाग्देवता, डावीकडे पार्वती, कडेला शंकर, पानाच्या आत चंद्र आणि देठात यमाचा वास असतो, असा समज होता. म्हणूनच पान खाण्याअगोदर देठ काढून टाकलं जात असे.

खरं म्हणजे प्राचीन वाङ्मयात विड्याचे अनेक उल्लेख आढळतात. नागवेलीच्या पानांना काथ, चुना लावून विडा तयार करणं ही दाक्षिणात्य परंपरा आहे, हे अनेक ग्रंथांत सांगितलं आहे. बौद्ध जातककथांत विड्याच्या पानांचा उल्लेख आहे. उत्तर भारतीय वाङ्मयात असलेला हा आद्य संदर्भ. मंदसोरच्या विणकरांनी केलेल्या शिलालेखांत (इ.स. ४७३), वराहमिहीराच्या बृहत्संहितेत (इ.स. ५३०) आणि चरक, सुश्रुत व कश्यपाच्या ग्रंथांत तांबूलसेवनाचे उल्लेख आहेत. कालिदासाच्या रघुवंशात तांबूलसेवनाची प्रथा मलय देशातून आली असल्याचे म्हटले आहे, तर शुद्रकाच्या मृच्छकटिकात वसंतसेनेच्या राजवाड्यात कापूर घातलेले विड्याचे पान खाल्ले जात असल्याचं वर्णन आहे. तामिळ वाङ्मयातही विड्याचे भरपूर संदर्भ सापडतात.

मात्र प्राचीन भारतीय वाङ्मयातील विड्याचे संदर्भ ताम्बूलमञ्जरीच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहेत. किंबहुना ताम्बूलमञ्जरी हा ग्रंथ म्हणजेच तांबूलसेवनाचा भारतीय इतिहास आहे. या ग्रंथात एकूण २३० श्लोक आहेत. आयुर्वेदाशी संबंधित संस्कृत ग्रंथांतून हे श्लोक संकलित केले आहेत. यांपैकी पहिले ७८ श्लोक हे तांबूलसेवनाचे फायदे व नियम सांगतात. उर्वरित श्लोक हे तांबूलात वापरल्या जाणार्‍या पदार्थांबद्दल आहेत. अच्युत, काशिराज, बोपदेव, भारद्वाज, वसिष्ठ, हेमाद्रि, चरक इ. विद्वानांनी लिहिलेल्या अमरमाला, चूडामणि, द्रव्यगुणनिघण्टु, योगमाला, योगरत्नम्, रत्नमालामञ्जरी, राजनिघण्टु, रूचिवधूगलरत्नमाला, वैद्यरत्नम्, वैद्यामृतम् यांसारख्या ग्रंथातील हे श्लोक आहेत. ताम्बूलमञ्जरीचा लेखक कोण, हे अज्ञात आहे. हा ग्रंथ नक्की कधी लिहिला गेला याचीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, हा लेखक मराठी असून इ.स.१८१९ नंतर हा ग्रंथ लिहिला गेला हे नक्की. कारण यात दोन मराठी श्लोक तर आहेतच, शिवाय नाशिकच्या अच्युतराय मोडकांच्या सौभाग्यकल्पद्रुम (इ.स. १८१९) या ग्रंथातील एक श्लोकही समाविष्ट केला आहे.

ताम्बूलमञ्जरीत संकलित केलेल्या श्लोकांतून तांबूलसेवनाच्या प्रथेबद्दल बरीच माहिती मिळते. तांबूलाचे एकूण घटक २१. विड्याचं पान, चुना, सुपारी, लवंग, वेलदोडा, जायपत्री, जायफळ, खोबरं, अक्रोड, कापूर, कंकोळ, केशर, दालचिनी, कस्तुरी, सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख, सुंठ, चंदन, तंबाखू, नखी (Helix asperaa या गोगलगायीच्या कवचाचे चूर्ण) आणि कूलकुट (Casearia esculenta). विडा हा त्रयोदशगुणी असावा, असा संकेत आहे. म्हणजेच विड्याच्या पानासकट एकावेळी १३ पदार्थ वापरावेत.
विड्याचे हे तेरा गुण असे -

ताम्बूलं कटुतिक्तमुष्णमधुरं क्षारं कषायान्वितम् I
वातघ्नं कृमिनाशनं कफहरं दुर्गन्धिनिर्णाशनम् II
वक्त्रस्याभरणं विशुद्धिकरणं कामाग्निसन्दीपनम् I
ताम्बूलस्य सखे त्रयोदश गुणा: स्वर्गेSपि ते दुर्लभा: II (योगरत्नाकर)

अर्थ - तांबूल हा कटू (कडवट), तिक्त (तिखटसर), उष्ण, मधुर, खारट व तुरट आहे. तो वातहारक, कृमिनाशक, कफहारक असून दुर्गंधी नाहीशी करणारा आहे. तसंच तो मुखाची अशुद्धी नाहीशी करून मुखाला शोभा आणतो आणि कामाग्नी उद्दीपित करतो. हे मित्रा, तांबूलाचे हे तेरा गुण तुला स्वर्गातसुद्धा दुर्लभ आहेत.

तांबूल केव्हा सेवन करावा, याचे काही संकेत आहेत. सकाळी, जेवल्यानंतर, संभोगापूर्वी व नंतर, तसंच, राजसभेत व मित्रांबरोबर विड्याचं पान खावं. वाग्भटाच्या मते स्नानानंतर व ओकारीनंतर विडा खाणं हितावह असतं. स्मृतिप्रकाश या धार्मिक ग्रंथात ब्रह्मचारी, विधवा, रजस्वला यांनी पान खाऊ नये, असं सांगितलं आहे. तसंच, विड्याचं पान उपवासाच्या दिवशीही खाऊ नये.

तांबूलाचं गुणवर्णन करताना वराहमिहिराने बृहत्संहितेत म्हटलं आहे की, 'तांबूल काम उद्दीपित करतो, रूप खुलवतो, सौंदर्य व प्रेम यांची वाढ करतो, मुख सुगंधित करतो, जोम निर्माण करतो आणि कफाचे विकार नाहीसे करतो.'

स्कंद पुराणात नागवेलीला अमृतोद्भव मानलं आहे. मोहिनीने अमृताची वाटणी केल्यानंतर उरलेलं अमृत इंद्राच्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ ठेवून दिलं. कालांतराने त्या अमृतातून एक अद्भूत वेल उगवली. त्या वेलीच्या प्रभावाने सर्व देव धुंद झाले. विष्णूने धन्वंतरीकडून त्या वेलीची तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की, त्या वेलीची पानं अतिशय मादक आहेत. मग विष्णू आपल्या आवडत्या लोकांना ही पानं भेट म्हणून देऊ लागला. सर्वांनाच ही पानं आवडू लागली.

तांबूल कामोद्दीपक आणि मुखसौंदर्यवर्धक असल्याने प्रणयाराधनातत तांबूलाचं विशेष महत्त्व मानलं गेलं आहे. भारतातील कामशास्त्रीय ग्रंथांत आणि काव्यनाटकांतील शृंगारवर्णनांत तांबूलाच्या या प्रणयास हातभार लावणार्‍या प्रभावाचा उल्लेख वारंवार आढळतो. एका प्रेमिकाने आपल्या प्रेयसीकडे तांबूल मागताना तांबूलाचं वर्णन केलं आहे, ते असं -

त्वन्नेत्राञ्चलवत्प्रदीपितमदं त्वन्मध्यवन्मुष्टिना I
ग्राह्यं त्वत्कुचकुम्भवन्नखमुखव्यापारलीलास्पदम् II
त्वच्चेतोवदमन्दरागजननं त्वन्मूर्तिवत्कामदम् I
स्वादिष्टं च तवौष्ठवत् तरुणि मे ताम्बूलमानीयताम् II

म्हणजे, तुझ्या नेत्रकटाक्षाप्रमाणे मद उद्दीपित करणारा, तुझ्या कंबरेप्रमाणे मुठीत मावणारा, तुझ्या कुचकुंभाप्रमाणे नखाग्रांच्या चाळ्याला योग्य, तुझ्या हृदयाप्रमाणे उत्कट राग निर्माण करणारा, तुझ्या अंगयष्टीप्रमाणे कामोद्दीपक आणि तुझ्या ओठांप्रमाणे स्वादिष्ट असा तांबूल, हे तरुणी, तू घेऊन ये.

प्रणयाराधनाशिवाय अन्य सामाजिक व्यवहारांत आणि धर्माचारांतही विड्याचं महत्त्व आहे. राजवाड्यात तांबूल करंकवाहिनी (तांबूलाचं साहित्य असलेला डबा वाहणार्‍या) सेविका नेमलेल्या असत. अशा सेवक-सेविकांचे उल्लेख प्राचीन संस्कृत व प्राकृत वाङ्मयात शेकड्याने सापडतात. तसंच, राजाला, राज्याधिकार्‍यांना, गुरूजनांना आणि अन्य आदरणीय व्यक्तींना सन्मानदर्शक विडा देण्याची पद्धत होती. मंगल कार्यात निमंत्रितांना तांबूल देत. पानसुपारी देण्याची ही पद्धत अजूनही रूढ आहे. पूजोपचारांत देवतेपुढे नागवेलीच्या दोन पानांवर अखंड सुपारी ठेवतात. देवाला तांबूल समर्पित करताना पुढील मंत्र म्हणतात -

पूगीफलं महद्दिव्यं नागवल्ल्या दलैर्युतम् I
कर्पुरैलासमायुक्तं ताम्बुलं प्रतिगृह्यताम् II

म्हणजे, नागवेलीची पाने आणि त्यांत महादिव्य अशा सुपारीबरोबर वेलची आणि कापूर टाकून तयार केलेला हा तांबूल (हे देवा) तू ग्रहण कर.

मूल अडीच महिन्यांचं झाल्यावर त्याला विडा खायला देण्याचा एक लौकिक संस्कार आहे. एखादं अवघड काम करून दाखवण्याची प्रतिज्ञा करताना पैजेचा विडा उचलण्याची प्रथा इतिहासकाळात आढळते. प्रिय व्यक्तीच्या मुखातील विडा खाण्याचं महत्त्व जसं प्रणयात आहे, तसंच गुरूच्या मुखातील विडा प्रसाद म्हणून ग्रहण करण्याचं महत्त्व गुरूशिष्यसंबंधांत आहे. महानुभावांच्या लीळाचरित्र या ग्रंथात चक्रधरांनी आपल्या शिष्यांना प्रसाद म्हणून उष्टा विडा दिल्याचे अनेक उल्लेख आहेत.

विडा खाण्याची पद्धत भारतात कुठून आली, ते कळायला मार्ग नाही. काही संशोधकांच्या मते दक्षिण भारतातून ती जगभरात गेली. मात्र, भारतातील प्राचीन ग्रंथांत सापडणार्‍या उल्लेखांचा आधार घेतल्यास त्यापूर्वी अनेक शतकं ही पद्धत आग्नेय आशियात प्रचलित होती हे लक्षात येतं. इ.स.पूर्वी २००० मध्ये लिहिलेल्या एका व्हिएतनामी पुस्तकात विड्याच्या पानांचा उल्लेख आहे. इंडोनेशिया, मलेशिया या देशांतही या प्रथेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या देशांतूनच विड्याचं पान दक्षिण भारतात आलं, असा सार्वत्रिक समज आहे. इंग्रजी व संस्कृत भाषांत विड्याचं पान व सुपारीसाठी वापरले जाणारे शब्दही दाक्षिणात्य व मुंडा भाषांतून घेण्यात आले आहेत. Betel या शब्दाचं मूळ वेत्रिलाई (मलयालम) व वेथ्थिले (तामिळ) या शब्दांत आहे. Areca nut (सुपारी) हा शब्द अडक्का या मलयालम शब्दावरून आला आहे. ताम्बूल आणि गुवाक हे अनुक्रमे विड्याचं पान व सुपारीसाठी वापरले जाणारे संस्कृत शब्द मुंडा भाषेतून आले आहेत. ब्लु, बलु, म्लु या शब्दांतून ही व्युत्पत्ती झाली आहे. मात्र परकीय भाषांतून संस्कृतात प्रचलित झालेले अनेक शब्द हे मूळ संस्कृतच असल्याचं दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न केला जातो. तम् (इच्छा करणे) या धातूवरून ताम्बूल हा शब्द आला आहे, असं काही विद्वान मानतात. पञ्चपदी उनडिसूत्र या भोजाने लिहिलेल्या ग्रंथात ऊलच्ने अंत होणारे काही शब्द दिले आहेत. त्यात ताम्बूल या शब्दाचाही समावेश आहे (कसूलकुकूलदुकूलताम्बूलवल्लूललाङ्गूल्शार्दूलादयः). मात्र, ताम्बूल या शब्दाचं मूळ संस्कृत भाषेत नाही, हे नक्की.

विडा खाण्याची प्रथा उत्तर भारतात कधी व कशी रूढ झाली, याबाबत निश्चित माहिती नाही. संहिता, ब्राह्मणं, स्मार्त व धर्मसूत्रांत तसंच मनुस्मृती आणि याज्ञवल्क्यस्मृतीत तांबूलाचा अजिबात उल्लेख नाही. रामायण व महाभारतातही तांबूलसेवनाचे उल्लेख नाहीत. हे सारे ग्रंथ वैदिक परंपरेत लिहिले गेले होते. याचा अर्थ, वैदिक काळात विड्याच्या पानाचा धार्मिक विधींत किंवा खाण्यासाठी वापर केला जात नव्हता. पण अकराव्या-बाराव्या शतकांत लिहिल्या गेलेल्या अनेक ग्रंथांत तांबूलाचा उल्लेख तर आहेच, पण अनेक धार्मिक विधींतही तांबूलाचा समावेश केल्याचं दिसून येतं. तांबूलाला धार्मिक कार्यांत एकाएकी मान्यता का मिळाली असावी?

अकराव्या व बाराव्या शतकांत अनेक बदल होत होते. समाजव्यवस्था बदलली होती. हिंदू धर्म कमकुवत होतो आहे, अशी अनेकांची धारणा होत होती. अशा परिस्थितीत धर्मव्यवस्थेत काही बदल करणं अत्यावश्यक झालं होतं. वैदिक धर्मांतील रुढी अधिक लोकाभिमुख करण्यासाठी धार्मिक विधींत लोकांना परिचित असणार्‍या, आपलंसं वाटणार्‍या अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला, आणि अशाप्रकारे आग्नेय आशियातून द्रविड संस्कृतीत दाखल झालेल्या नागवेलीच्या पानाने उत्तर भारतीय धार्मिक संस्कारांत प्रवेश केला. आज विड्याच्या पानाशिवाय एकही धार्मिक विधी पूर्ण होत नाही.

विड्याच्या पानाप्रमाणेच अनेक रुढी, प्रथा, संस्कार आणि अर्थातच, खाद्यपदार्थ हे द्रविड संस्कृतीची देणगी आहेत. इडली, दोसा, वडा हे पदार्थ तर आता संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले आहेत. या खाद्यपदार्थांचा इतिहासही अतिशय रंजक आहे. त्याविषयी पुढील भागात.

bet.jpg

क्रमशः
------------------------------------------------------------------------------------

अन्न वै प्राणा: (१) - http://www.maayboli.com/node/2802

अन्न वै प्राणा: (२) - http://www.maayboli.com/node/3055

------------------------------------------------------------------------------------

संदर्भ :

[१]. श्यामाक क्ङ्गुनीवार गन्धशालि सुतण्डुलै |
सरवेष्टित सेवाकैर्दिवसै लघुविस्तृतै: |
चिरप्रसूतमहिषीपयसा पायसं पचेत् |

[२]. तैलपूर्णकटाहेतुसुप्तते सोहलांपचेत् उत्तानपाक संसिद्धा: कठिना सोहला: मता: |

[३]. तैल मग्ना: मृद्वयः पाहलिका: स्मृता: |

[४]. गोधूमा: क्षालिता शुभ्रा: शोषिता रविरश्मिभि: |
घरट्टैश्चूर्णिता:श्लक्ष्णाश्चालन्या वितुषीकृता: |
गोधूमचूर्णकं श्लक्ष्णं किञ्चितघृत विमिश्रितम् |
लवणेन च संयुक्तं क्षीर नीरेणपिण्डितम् |
सुमहत्यां काष्ठपात्र्यां करास्फालैविमर्दयेत् |
मर्दितं चिक्कणीभूतं गोलकान् परिकल्पयेत् |
स्नेहाभ्यक्तै: करतलै: शालिचूर्नैर्विरूक्षितान् |
प्रसारयेत् गोलकांस्तान् करसञ्चारवर्तनै: |
विस्तृतामण्डका:श्लक्ष्णा: सितपट्टसमप्रभा: |
प्रयत्नान्निक्षिपेत्तज्ज्ञस्तप्तखर्परमस्तके |
पक्वाश्चापनयेच्छीघ्रं यावत्कार्ष्ण्यं न जायते |
चतस्रश्च चतस्रश्च घटिता मण्डका वरा: |
गोलान् प्रसारितान् पानावङ्गारेषु विनिक्षिपेत् |

[५]. चणका राजमाषाश्च मसूरा राजमुद्णका: |
घरट्टैर्दलिता कार्या: पाकार्थं हि विचक्षणै: |
किञ्चिद्भ्रष्टास्तथाढक्यो यन्त्रावर्तै र्द्विधाकृता: |
विदली च कृता: सम्यक् शूर्पकैर्वितुषीकृता: |
स्थाल्यां शीतोदकं क्षिप्त्वा विदलै सममानतः |
आवपेद्विदलान्पाश्चाच्चुल्यामारोपयेत्ततः |
मृद्वग्निपच्यमानेSन्तं हिंगुतोयं विनिक्षिपेत् |
वर्णार्थं रजनीचूर्णमीषन्तत्र नियोजयेत् |
मुहुर्मुहुर्क्षिपेत्तोयं यावत्पाकस्य पूणता |
सुश्लक्ष्णं सैन्धवं कृत्वाविंशत्यंशेन निक्षिपेत् |

[६]. प्रक्षालितान् वरान् मुद्गान् समतोये विनिक्षिपेतं |
चुल्यां मृद्वग्निनापाक: कर्त्तव्यः सूपकारकै: |
पच्यमानेषु मुद्गेषु हिङ्गुवारिविनिक्षिपेत् |
आर्द्रकस्य च खण्डानि सूक्ष्माणि च विनिक्षिपेत् |
वार्ताकं पाटितं तैले भृष्टं तत्र विनिक्षिपेत् |
तैलभृष्टा मृदूभूता:क्षिपेद् वा बिसचक्रिका: |
बीजानि प्रियालस्य क्षिप्त्वादर्व्याविवर्तयेत् |
.............................................
केचिदिच्छन्ति रुच्यर्थं मेषमांसस्य खण्डकान् |
वृक्कान् वापिद्विधाभिन्नान् मेदसः शकलानिवा |

[७]. अम्लीभूतम् माषपिष्टम् वटिकासु विनिक्षिपेत् |
वस्त्रगर्भाभिरन्याभि: पिधाय परिपाचयेत् |
अवतार्यात्र मरिचं चूर्णितं विकिरेदनु |
घृताक्तां हिंगुसर्पिभ्यां जीरकेण च धूपयेत् |
सुशीता धवला श्लक्ष्णा एता इडरिका वरा: |

[८]. तस्यैवमाषपिष्टस्य गोलकान् विस्तृतान् घनान् |
पञ्चभि: सप्तभिर्वापि छिद्रैश्च परिशोभितान् |
तप्ततैले पचेद् यावल्लौहित्यं तेषु जायते |
घारिका संज्ञया ख्याता भक्ष्येषु सुमनोहरा: |
निच्छिद्रा: घारिका: पक्वा मथिते शर्करायुते |
एलामरिचसंयुक्ते निक्षिप्ता वटकाभिधा: |
त एव वटका: क्षिप्ता: काञ्चिके काञ्चिकाभिधा: |
यत्र यत्र द्रवद्रव्ये तन्नाम्ना वटकास्तु ते |
आरनालेन सान्द्रेण दघ्ना सुमथितेन च |
सैन्धवार्द्रकधान्याकजीरकं च विमिश्रयेत् |
मरिचानि द्विधा कृत्वाक्षिपेत्तत्र तु पाकवित् |
दर्व्या विघट्तयन् सर्व पचेद् यावद घनीभवेद् |
उत्तार्य वटकान् क्षिप्त्वा विकिरेन्मरिचं रजः |
हिङ्गुना धूपयेत् सम्यग् वटकास्ते मनोभिधा: |

[९]. माषस्य विदलान् क्लिन्नान्निस्तुषान् हस्तलोडनै: |
ततः सम्प्रेष्य पेषण्यां संभारेण विमिश्रितान् |
स्थाल्यां विमर्द्य बहुशः स्थपयेत्तदा हस्ततः |
अम्लीभूतं माषपिष्टं वटिकासु विनिक्षिपेत् |

[१०]. वट्टाणकस्य विदलं च विदलं चणकस्य च |
चूर्णितं वारिणा सार्धं सर्पिषा परिभावितम् |
सैन्धवेन च संयुक्तं कण्डुना परिघट्टितम् |
निष्पावचूर्नसंयुक्तं पेषण्यां च प्रसारितम् |
कटाहे तैलसंपूर्णे कटकर्णान् प्रपाचयेत् |
यावद्बुद्बुद संकाशा भवन्ति कनकत्विषः |

[११]. उत्क्वाथ्य विदलान् पिष्ट्वा चणकप्रभृतीन् शुभान् |
हिङ्गुसैन्धवसंयुक्तान् शर्करापरिमिश्रितान् |
मरिचैलाविचूर्णेन युक्तान् गोलकवेष्टितान् |
किञ्चित् प्रसारिते तैले पूरिका विपचेच्छुभा: |
एवं ताप्यां पचेदन्या: पूरिकाश्च विचक्षणा: |

[१२]. हरिमन्स्थस्य विदलं हिङ्गुजीरकमिश्रितम् |
लवणेन च संयुक्तमार्द्रकेण समन्वितम् |
वेष्तयित्वा गोलकेन वेष्टिका खर्परे पचेत् |

[१३]. विदलं चणकस्यैवं पूर्वसंभारसंस्कृतम् |
ताप्यां तैले विलिप्तायां धोसकान् विपचेद्बुधः |
माषस्य राजमाषस्य वट्टाणस्य च धोसकान् |
अनेनैव प्रकारेण विपचेत् पाकतत्वितम् |

[१४]. गोधूमचूर्णादुद्धृत्य शूर्पेनाभ्याहतान् कणान् |
दुग्धाक्तान् घृतपक्वांश्च सितया च विमिश्रितान् |
एलामरिचचूर्णेन युक्तान् कासारसंज्ञितान् |

[१५]. गोलकेन समावेष्ट्य तैलनोदुम्बरान् पचेत् |

[१६]. शोधितायां सितायां तु क्षीरं संमिश्रयेत् समम् |
खरपाकावधिर्यावत् तत्क्वाथयेत् पुनः |
उतार्य नागरं तीक्ष्णमेलाकर्पूरकेसरै: |
निक्षिप्य गोलका: कार्या नाम्ना वर्षोलकास्तु ते |

[१७]. तनु प्रसारितान्गोलान् ताप्यां स्नेहेन पाचितान् |
उपर्युपरिनिक्षप्ता: पत्रिकाविपचेत् सुधी: |

[१८]. अर्धावशिष्टं पाने स्यात् त्रिभागं लेह्यकम् |
षड्भागं पिन्डतामेति शर्करा स्यादथाष्टमे |

[१९]. निर्जलं मथितं प्रोक्तमुदस्वित्याश्चजलार्धकम् |
पादाम्बु तक्रमुद्दिष्टं धूपितं हिड्गुजीरकै: |
आर्द्रकेण समायुक्तमेलासैन्धवचूर्णितम् |

[२०]. मथितं शर्करायुक्तमेलाचूर्णविमिश्रितम् |
कर्पूरधूपितंनाम्ना मज्जिकेत्यभिधीयते |

[२१]. स्रावितं यद्धृतं तोयं जीरकार्द्रकसैन्धवै: |
संयुक्तं हिङ्गुधूपेन धूपितं मस्तु कीर्तितम् |

[२२]. नवनीतं नवधौतं नीरलेशविवर्जितम् |
तापयेदग्निना सम्यक् मृदुनाघृत भाण्डके |
पाके सम्पूर्णतां याते क्षिपेद् गोधूमबीजकम् |
क्षिपेत्ताम्बूलपत्रं च पश्चादुत्तारयेद्घृतम् |

[२३]. दुग्धमुक्त्क्वाथ्य तन्मध्ये तक्रमम्लं विनिझिपेत् |
हित्वा तोयं घनीभूतं वस्त्रबद्धं पृथक्कृतम् |
शलितण्डुलपिष्टेन मिश्रितम् परिपेषितम् |
नानाकारै: सुघटितं सर्पिषा परिपाचितम् |
पक्वशर्करया सिक्तमेलाचूर्णेन वासितम् |
क्षीरप्रकारनामेदं भक्ष्यं मृष्यं मनोहरम् |

[२४]. आजानु सन्धि मूलाङिघ्रतृणै: प्रच्छाद्य तं दहेत् |
कठिनत्वमुपायातं क्षालयेन्निर्मलै: जलै: |
पाण्डुरं बिसस्ङ्काशं संस्थापितं कटे |
आमूर्धं प्रस्थापयति कार्त्रिकापरिपाटितम् |
सारिफलकरेखाभ्यांचित्तवच्चतस्यायाम् शुण्ठकान् |
चतुरस्रीकृताखण्डान् शूलप्रोतान् प्रतापयेत् |
अङ्गारेषु प्रभूतेषु घृत बिन्दुस्र्वावधि |
पश्चान्मरिचूर्णेन विकिरेत्सैन्धवंततः |
अथवाम्लपरिस्विन्नान् पूर्ववत् परिकल्पयेत् |
अथवा दारितान्कृत्वात्वक् शेषान्लवणान्वितान् |
भृज्जेदङ्गारपुञ्जेषु शुण्ठकानमृतोपमान् |

[२५]. प्रक्षिप्यशुण्ठकांस्तत्र मृदुकुर्याच्च पाकतः |
भावितांश्चरसै: सर्वै: सिद्वानुत्तारयेद् बुधः |

[२६]. स्विन्नाना् शुण्ठकानां च मेदोभागं प्रगृह्य च |
ताडपत्रसमाकारा: कृत्वा चक्कलिका: शुभा: |
मथिते शर्करायुक्ते दधन्येलाविमिश्रिते |
कर्पूरवासिते तत्र रुच्याश्चक्कलिला: क्षिपेत् |
मांसमेदोमयान्शुण्ठान् पूर्ववच्छकलीकृतान् |
मथिते राजिकायुक्ते मातुलिङ्गकेसरे |
धूपिते हिङ्गुना सम्यक् दध्निचक्कलिका: क्षिपेत् |
घृते वा चक्कलींभृष्ट्वा किरेदेला सशर्कराम् |
अथवा मातुलिङ्गस्य सुपक्वस्य च केसरै: |
सूक्ष्मैरार्द्रकखण्डैश्च केसराम्लैर्मनोहरः |
चूर्णितं मरिचं राजिसैन्धवैर्मिश्रयेत्ततः |
हिङ्गुना धूपिता:साम्ला हृद्याश्चक्कलिका वरा: |

[२७]. मेदसःश्लक्ष्णखण्डानि क्षिप्त्वा सर्वविलोडयेत् |
अन्त्रं प्रक्षालितं यत्नात्तेन रक्तेन पूरितम् |
पेटकाकृति युक्ता सुकम्रासु परिवेष्टयेत् |
कम्रामुखानि बध्नीयात् केवलैरन्त्रकैस्तथा |
तैरेव रज्जुसङ्काशैर्गृगीत्वोपरि तापयेत् |
अङ्गारै: किंशुकाकारैर्यावत् काठिन्यमाप्नुयु: |
मण्डलीयं समाख्याता राजवृक्षफलोपमा |

[२८]. चणकस्य समान् खण्दान्कल्पयित्वा विचक्षण: |
निशा जीरक तीक्ष्णाद्यै:शुण्ठीधान्यक हिङ्गुभी: |
चूर्णितैर्मेलयित्वा तांस्तप्ततैले विनिक्षिपेत् |
समानार्द्रकखण्डांश्च चणकान् हरितानपि |
श्लक्ष्णमांसै: क्षिपेत्कोलं निष्पावान्कोमलानपि |
पलान्डुशकलान्वापि लशुनंवाSपि विक्षिपेत् |
एवं पूर्वोदितं सूदः प्रयुञ्जीत यथारुचि |
शोषितेम्लरसे पश्चात् सिद्धमुत्तार्यधूपयेत् |

[२९]. बदराकारकान् खण्डान् पूर्वेवच्चूर्णमिश्रितान् |
आर्द्रकांस्तत् प्रमाणांश्च पक्वतैले विपावयेत् |
वार्ताकशकलांश्चैव मूलकस्य च खण्डकान् |
पलाण्ड्वार्दक सम्भूतान् मुद्गाङ्कुर विनिर्मितान् |
वटकान्निक्षिपेतत्र मेषकस्य च चूर्णकम् |
कासमर्देन संयुक्तं पलान्यनानि कानिचित् |
सुसिद्धं वासयेद्धुपैर्नानारसविमिश्रितम् |
नानाद्रव्यसमेता सा कवचन्दी भवेच्छुभा |

[३०]. स्थूलामलकसङ्काशान् शुद्धमांसस्य खण्डकान् |
क्वाथयेद्राजिका तोयैनगिरार्द्रकसंयुतै: |
आस्थापयेत्तज्जलं पात्रे रिक्ते चाम्लैर्विपाचयेत् |
तत्समाञ्शुण्ठकान् क्षिप्त्वा सैन्धवं तत्रयोजयेत् |
मेथाकचूर्णकं तत्र धान्याकस्य च पूलिकाम् |
निक्षिप्योत्तारयेत्सूदो घृतं वान्यतत्रापयेत् |
सुतप्ते च घृते पश्चाल्लशुनं हिङ्गुनासह |
प्रक्षिप्य संस्कृतं मांसं तस्यां स्थाल्यां प्रवेशयेत् |
पिहितं च ततः कुर्यात् किञ्चित् कालं प्रतीक्ष्य च |
उत्तारयेत्ततः सिद्धं पुर्यलाख्यमिदंवरम् |

[३१]. पृष्ठवंशसमुद्भूतं शुद्धं मांसं प्रगृह्यते |
घनसारप्रमाणानिकृत्वा खण्डानि मूलकै: |
विध्वातु बहुशस्तानि बहुरन्ध्राणि कारयेत् |
हिङ्गवार्द्रकरसैर्युक्तं सैन्धवेन च पेषयेत् |
शूलप्रोतानिकृत्वा तान्यङ्गारेषु प्रतापयेत् |
घृतेन सिञ्चेत् पाकज्ञो वारं वारं विवर्तयेत् |
सिद्धेषु मारिचं चूर्णं विकिरेत् सैन्धवान्वितम् |
नाम्ना भडित्रकं रुच्यं लघुपथ्यं मनोहरम् |
..........................................
शोषयित्वाद्रवं सर्व घृतेन परिभर्जयेत् |
क्षिपेच्च मरिचं भृष्टे सूदोहण्डभडित्रके |

[३२]. पूगीफलप्रमाणानि कृत्वा खण्डानि पूर्ववत् |
संस्कुर्यात् पूर्ववच्चूर्णैरम्लैश्च परिपाचयेत् |
स्तोकावशेषपाकेस्मिन् न्यस्तं रक्तं विनिक्षिपेत् |
पूर्णे पाके समुत्तार्य धूपयेद्धिङ्गुजीरकै: |
कर्पूरचूर्णकं तस्मिन् एल्पचूर्णेन संयुत्तम् |
विकिरेन्मरिचैर्युक्तं कृष्णपाकमिदं वरम् |

[३३]. अङ्गारेषु तथाभृष्ट्वा कालखण्डं विकृत्य च |
पूगीफलप्रमाणेन खण्डान् कृत्वा विचक्षण: |
तैलेनाभ्यञ्ज्य तान् सर्वान् मरिचाजाजिसैन्धवै: |
चूर्णितैर्विकिरेत् पश्चाद्धिंगुधूपेन धूपयेत् |
अनेन विधिना भृष्ट्वा राजिकाकल्पलेपितान् |
कालखण्डान् प्रकुर्वीत दघ्ना राजिकयाथवा |

[३४]. अङ्गारभृष्टकं मांसं शुद्धे पट्टे निधापयेत् |
कर्तयो तिलशः कृत्वा मातुलिङ्गस्य केसरै: |
आर्द्रकै: केसराम्लैश्च गृञ्जनैस्तत् प्रमाणिकै: |
जीरकैर्मरिचै: पिष्टै: हिङ्गुसैन्धवचूर्णकै: |
मिश्रयित्वा तु तन्मांसं हिङ्गुधूपेन वासयेत् |
आमं मांसं च पेषण्या हिङ्गुतोयेन सेचितम् |
..........................................
चूर्णीकृतं च यन्मांसं गोलकैस्तद् विवेष्तयेत् |
चूर्णगर्भांश्व वटकान् प्रक्षिपेदाणके शुभे |
ख्यातास्ते मांसवटका रुच्या दृश्या मनोहरा |
त एव वटकास्तैलपक्वा: स्युर्भूषिकाभिधा: |
तदेव चूर्णितं मांसं कणिकापरिवेष्टितम् |
अङ्गारेषु तथा भृष्टं कोशलीति निगद्यते |

[३५]. वार्ताकं वृन्तदेशस्य समीपे कृतरन्ध्रकम् |
निष्कासितेषु बीजेषु तेन मांसेन पूरितम् |
तैलेन पाचितं किञ्चिदाणके परिपाचयेत् |
पूरभट्टाकसंज्ञं तत्स्वादुना परिपाचयेत् |
कोशातकीफलेप्येवं मूलकस्य च कन्दके |
पूरिते चूर्णमांसेन तत्तन्नाम्ना तु कथ्यते |

[३६]. आमं मांसं सुपिष्टं तु केसरादिविमिश्रितम् |
वटकीकृत्य तैलेन तप्तेन परिपाचयेत् |
आणके च क्षिपेत्तज्ञस्तापयेद्वा विभावसौ |
नाम्ना वट्टिमकं तत्तु त्रिप्रकारमुदीरितम् |
अन्त्राणि खण्डशः कृत्वा कालखण्डं तथाकृतम् |
वारिप्रक्षालितं कृत्वा खण्डितान् समरूपतः |
राजिकाकल्कदिग्धांस्तांस्तोयमिश्रान् विपाचयेत् |
........................................
किञ्चिच्छेषं द्रवं तत्तु समुत्तार्य विधूपयेत् |
पय्चवर्णीति विख्याता नानारूपरसावहा |

[३७]. अन्त्राणि जलधौतानि शूलयष्ट्यां विवेष्टयेत् |
तापयेच्च तथाङ्गारैर्यावत् कठिनतां ययु: |
पश्चाद्विचूर्णितं श्लक्ष्णं सैन्धवं तेषु योजयेत् |
अन्त्रशुण्ठकमाख्यातं चर्वणे मर्मरारवम् |

[३८]. क्रोडदेशोद्भवं मांसंस्थना सह विखण्डितम् |
अंसकीकससंयुक्तं पार्श्वकुल्या समन्वितम् |
............................................
उत्क्वाथितमिदंसूपंख्यातं शास्त्रविशारदै: |
मत्स्यांश्च खण्डशः कृत्वाचतुरङ्गुल सम्मितान् |
लवणेन समायुक्तान् कुम्भेषु परिपूरयेत् |
..........................................
भोजनावसरे सूदो वन्हिना परिभर्जयेत् |
कच्छपान् वन्हिना भृष्ट्वा पादांश्छल्कांश्च मोचयेत् |
अम्लकैश्च विपच्याथ तैलेन आज्येन वा पुनः |
पाचयेच्च सुसिद्दांस्तान् चूर्णकैरवचूर्णयेत् |

[३९]. ऊरुनाभिप्रदेशान्तं सञ्चाद्य सितवाससा |

[४०]. पक्वान्नं पायसं मध्ये शर्कराघृतविमिशितम् |
ततः फलानि भुञ्जीत मधुराम्लरसानि च |
पिबेच्च पानकं हृद्यं लिह्याच्छिखरिणीमपि |
चूषेत् मज्जिका पश्चाद्दधि चाद्यात्ततो घनम् |
ततस्तक्रान्नमश्नीयात् सैन्धवेन च संयुतम् |
क्षीरं वापि पिबेत्पश्चात् पिबेत्वा काञ्जिकं वरम् |

[४१]. वसन्ते कटु चाश्नीयाद् ग्रीष्मे मधुरशीतलम् |
वर्षासु च तथा क्षारं मधुरं शरदि स्मृतम् |
हेमन्ते स्निग्धमुष्णं च शिशिरेSप्युष्णमम्लकम् |

[४२]. दिव्यं शरदि पानीयं हेमन्ते सरिदुद्भवम् |
शिशिरे वारि ताडागं वसन्ते सारसं पयः |
निदाघे नैर्झरं तोयं भौमं प्रावृषि पीयते |
हंसोदकं सदा पथ्यं वार्क्षं पेयं यथारुचि |

[४३]. दिव्यान्तरिक्षं नादेयं नैर्झरम् सारसं जलम् |
भौमं चौण्डं च ताडाकमौद्भिदं नवं स्मृतम् |

दशमं केचिदिच्छन्ति वार्क्षजीवनमुत्तमम् |
नारिकेलसमुद्भूतम् स्वादु वृष्यं मनोहरम् |

[४४]. कणामुस्तक संयुक्तमेलोशीरक चन्दनै: |
मर्दितं मृत्तिकापिण्डं खदिराङ्ङारपाचितम् |
निक्षिपेन् निर्मले तोये सर्वदोषहरे शुभे |
कथितः पिण्डवासोऽयं सलिलेषु विचक्षणै: |

[४५]. लवङ्गोशीरकर्पुरकान्तानलचन्दनै: |
सलिलामयकङ्कोलपथ्याकर्चूरसंयुतै: |
विचूर्णितै समैरेभि: सुशीतामलवारिणा |
चूर्णाधिवासिनः प्राह......|

[४६]. अत्यम्बुपानान्न विपच्यतेSन्नमनम्बुपानाच्च स एव दोषः |
तस्मान्नरो वह्निविवर्द्धनाय मुहुर्मुहुर्वारि पिबेदभूरि |

[४७]. शङ्कुद्वयं समास्थाप्य बध्नीयादुज्ज्वलाम्बरम् |
प्रसार्य यष्टिभि: किञ्चित् क्षीरमम्लेन भेडितम् |
सितया च समायुक्तमेलाचूर्णविमिश्रितम् |
क्षिपेत् प्रसारिते वस्त्रे स्रावयेत् पेषयेत् समम् |
पुनः पुनः क्षिपेत् तत्र यावन्निर्मलतां व्रजेत् |
पक्वचिञ्चाफलं भृष्टं वर्णार्थं तत्र निक्षिपेत् |
यस्य कस्य फलस्यापि रसेन परिमिश्रयेत् |
तत्तन्नम समाख्यातं पानकं पेयमुत्तमम् |

------------------------------------------------------------------------------------

प्रमुख संदर्भग्रंथ :

१. महाराष्ट्र ज्ञानकोश - संपा. पं. महादेवशास्त्री जोशी.
२. ताम्बूलमञ्जरी - Ed. J. S. Pade (Oriental Research Institute, Baroda, 1944)
३. शिवतत्त्वरत्नाकरः - Ed. Vidwan Dr. H. P. Malledevaru (Oriental Research Institute, Mysore, 1927)
४. अभीलषितार्थचिन्तामणि (राजा मानसोल्लास) - Ed. Shri. G. K. Shrigondekar (Gaekwad's Oriental Series, Oriental Research Institue, Baroda, 1945)
५. मानसोल्लास - Ed. Vidwan Dr. G. K. D. Sastry (Oriental Research Institute, Mysore, 1935)
६. A History of Karnataka - P. B. Desai, Dharwad, 1981
७. Betel Chewing - George Lebrun, Journal of Oriental Research, vol. 17, pt. 1, p. 165, 1949
८. Knowledge of the ancient Hindus concerning fish and fisheries of India. 3. Matsya-Vinoda or Chapter of angling in Manasollasa by King Somesvara (1127 AD)- S. L. Hora, Journal of Asiatic Society, Letters, Volume 27, No. 2, pp. 145-169

मानसोल्लास, शिवतत्त्वरत्नाकर व ताम्बूलम्ञ्जरीतील या लेखात समाविष्ट केलेले सर्व श्लोक श्री. आपटे व श्री. देवस्थळी यांनी संपादन केलेला संस्कृत-मराठी-इंग्रजी शब्दकोश वापरून भाषांतरीत केले आहेत.

------------------------------------------------------------------------------------
स्रोत :

भांडारकर प्राच्य-विद्या संशोधन मंदिर, पुणे, यांचे ग्रंथालय व M. S. Swaminathan Foundation, Chennai यांच्या ग्रंथालयातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा ग्रंथसंग्रह

------------------------------------------------------------------------------------

अन्नं वै प्राणा: (१) - http://www.maayboli.com/node/2802
अन्नं वै प्राणा: (२) - http://www.maayboli.com/node/3055
अन्नं वै प्राणा: (४) - http://www.maayboli.com/node/13569

Protected by Copyscape Online Plagiarism Detector
प्रकार: 

चिनुक्स जी, तुम्ही धन्य आहात. ..वर म्हटल्याप्रमाणे खरंच तुमच्या चरणांचा जरा क्लोज अप टाका हो..वाचन संस्क्रुति राबवणे म्हणजे काय याचं उत्तम उदहरण आहे, असे अभ्यासपूर्ण लेख आणि अक्षरवार्ता उपक्रम..मनापासून धन्यवाद !!

चिनूक्स, अत्यंत अभ्यासपूर्ण लेख!

तुझे तीनही लेख मी सलग वाचले Happy तुझे मुद्दे आणि संदर्भ अगदी अचूक असतात मात्र मांडणी करताना कधी कधी गिचमिड होतेय. तिसरा भाग मानसोल्लास आणि शिवरत्नाकरसाठी एक भाग आणि ताम्बुलमंजरीसाठी अजून एक भाग असे केले असते तर अधिक सुटसुटीत झाले असते. अर्थात हे माझे मत.

वरील लेखात स्पष्टपणे उकडीचे मोदकांचा उल्लेख येतो Happy अजून आजही आढळणारे काही पदार्थः दहीवडे, उडदाच्या वड्या, पॅटिस, दोसे आणि बासुंदी, श्रीखंड, आणि फ्रुट श्रीखंड (मला कायम हे हॉटेलवाल्याचे अपत्य वाटायचे)

केनेपयस आणि हालुगुडिगे हे कानडी शब्द आहेत. हालुगुडिगे म्हणजे दूधात केलेले लाडू. केने म्हणजे साय आणि पायस म्हणजे खीर.

मला भारतीय स्वयंपाकात तेलाचा वापर कसा सुरू झाला हे जाणून घ्यायला आवडेल. गोंड आणि द्रविड पद्धतीचा जसा आर्य लोकाच्या समाजावर परिणाम झाला तसेच आर्य संस्कृतीचे इतर संस्कृतीवर झालेले परिणाम तसेच ऋग्वेद आणि अवेस्ता मधल्या साधर्म्याबद्दल कुणी लिहू शकेल का?

झक्की काकाचा संस्कृतचा बराच अभ्यास आहे, त्यानी पण असे लेख लिहिले तर त्याचा बराचसा वेळ चांगल्या कामात जाईल ना? Proud

--------------
नंदिनी
--------------

नंदिनी,

धन्यवाद Happy

भारतात तेलाचा वापर मुसलमान आक्रमणकर्त्यांमुळे सुरू झाला, असा समज आहे. मात्र ते चूक आहे.

जैन धर्मग्रंथांमध्ये तळलेल्या पदार्थांना सुपक्व असं म्हटलं आहे. पाचव्या शतकात लिहिलेल्या या ग्रंथांत तळलेल्या मांसाहारी पदार्थांना तळीत असं म्हटलं आहे. सुश्रुत, अंगविज्ज, चरक या सार्‍यांनी लिहिलेल्या ग्रंथांतही तेलात तळलेल्या पदार्थांचा उल्लेख आहे. शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठी या ग्रंथांत वेगवेगळी नावं दिली आहेत. इ.पू. ३०० च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या धर्मसूत्रांत अपूप (अनारसे) व वड्यांचा उल्लेख आहे. अर्थात त्यासाठी तूप वापरले गेले होते.

हे व असे अनेक संदर्भ इथे देण्यापेक्षा स्वतंत्र लेखात देणं योग्य. म्हणून याबद्दल मी पुढे कधीतरी सविस्तर लिहिनच.

धुरी देण्याबद्दल -

मानसोल्लास व वद्दराधने या दोन्ही ग्रंथांत धुरी देण्याबद्दल लिहिलं आहे. तूप घालून मसाल्यांची धुरी देण्याने तो पदार्थ शुद्ध होतो, अशी भावना होती. शिवाय मसाल्यांची धुरी स्वादासाठीही वापरली जातच असे.

चिनूक्स, दंडवत.
तिसर्‍यांदा थक्क झाले. Happy

स्लार्टी, 'धुरी दिलेलं' मांस म्हणजे smoked meat सारखा प्रकार असावा. इथे मांसाव्यतिरिक्त काही नट्सही 'स्मोक्ड' स्वाद दिलेले खाल्ले आहेत आणि आवडलेत.

महान. केवळ महान, अशाच लेखांमुळे मायबोलीची उत्तरोत्तर प्रगती होते.

मस्त मेजवानी !!!! पुन्हा पुन्हा आस्वाद घ्यायला आवडेल अशी. अधिकाधिक लोकांना याचा आस्वाद घ्यायला मिळावा म्हणून एखाद्या दिवाळी अंकात नाहीतर मासिकात प्रकाशित व्हायला हवे हे लेख.

चिनूक्स... मानलं यार तुला... एवढा अभ्यास आणि एवढं टायपींग... (सगळं वाचायला आणि समजून घ्यायला एवढा वेळ लागतोय तर तुला लिहायला किती वेळ लागला असेल)
मस्त माहिती...

काय अचाट्-अप्रतिम आणि अ‍ॅप्रो आहेत ती सगळी प्राचीन खाद्यपदार्थांची नावं! वर्षोपलगोलक. सही देखणा शब्द आहे!

लेख केवळ ग्रेट आहे.

व्यासंगी म्हणावसं वाटतय तुलाही चिन्मय. नातू शोभतोस खरा.

तुझे पहीले दोन्ही लेख पुन्हा पुन्हा वाचायचोच, आता हा तिसराही त्यात समाविष्ट. फार महान अभ्यासपूर्ण लिहीतोस तू.

मस्तच लेख आहे. खुपच छान माहिति आहे उपयूक्त अशि...

ग्रेटच लिहिलय ! धन्यवाद तुम्हाला Happy
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू पुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....

बापरे..केवढा अभ्यास!..खुप माहितीपुर्ण लेख.. हा आणि आधीचे दोन्ही असे सगळे एका फाइलीत लावुन ठेवलेत.. Happy

चिन्मय... तू थोर आहेस.... दुसरा शब्दच नाही....
माझ्या पुढच्या पुणे भेटीत तुला भेटायचा पूर्ण प्रयत्न करीन !!
तुझे लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात आणि ज्ञानाचा खजिना घेऊन येतात.
लिहिता रहा !!

महान !
यापाठीमागच्या तुमच्या अभ्यासक वृत्तीला मनःपुर्वक प्रणाम!
एखादं Treasure गवसल्यासारखी, वाटली ही सारी माहीती...जबरदस्त!

पुढील लेखनाची वाट पाहू.खुप सार्‍या शुभेच्छा ! Happy

सुंदर लेख!!!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .

खूप छान माहिती..पुढचा भाग लवकर येऊ द्या...

छान!

नांदेड जिल्यात माहुरला रेणुका मातेचे मंदीर आहे. या देवीच्या दर्शनाला जाताना भक्तजन कुंटलेला तांबूल घेऊन जातात. मंदीराच्या बाहेर, दगडी खलबत्त्यात तांबूल कुटंणारी बरीच माणसे पोते टाकून बसलेली दिसतात. हा तांबूल प्रसाद म्हणून देखील तिथे देतात.

मी बालिला गेलो आहे पण मला विड्याची पाने तिथे आढळली नाही.

चिनुक्सा... अप्रतिम लेख.. अजून दोन तीन वेळा तरी वाचायला लागेल पूर्णपणे समजण्यासाठी...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

चिन्मय! अतिशय अभ्यासपुर्ण माहिति.. अतिशय मेहनीतीने मांडल्याबद्दल आभार.
smiley32.gif

अप्रतिम ..!
तुझ्या व्यासंगाला आणि अभ्यासाला सलाम!!!
Happy
पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख.
प्राजु
http://praaju.blogspot.com/

आपल्या व्यासंगाला व आपण वाचलेल इतकी मेहनत घेवून माझ्यांसारख्यांसाठीं वाढून समोर ठेवण्याच्या
मानसिकतेला त्रिवार मुजरा !!!
पूर्वजांचा तपशीलाविषईचा काटेेकोरपणा, खाद्यसंसर्कितला तीचं योग्य स्थान देण, हे सारं अभिमानास्पद. राजाला केंद्रस्थान देण समजण्यासारखं.
मातीच्या भांड्यांचा आग्रह वाचून वाटलं , खाद्यसंस्क्रितचा उगम गरिबीत होत असावा व श्रेय मात्र
उच्च्भ्रुना मीळत असावं. उदा. मोंगलांच्या जमन्यात मोठ्या बांाधकामावरच्या मजूराना दूसर्या दिवशीच्या जेवणासाठी मांस व तांदूळ मोठ्या हंड्यात मंद विस्तवावर रात्रभर शीजत ठेवत; तीच मग राजमान्य बीर्याणी झाली ! खंडाळ्याच्या घाटात अवघड जागीं रात्र-दीवस काम करताना सोईच म्हणून मजूर गूळ व शेन्ग्दाणे नेत.आज ती नखरेबाज लोणावळा चिक्की झालीय !
़खाण्याचाच विषय म्हणून तोंड उघडल, झालं !

आपल्या व्यासंगाला व आपण वाचलेल इतकी मेहनत घेवून माझ्यांसारख्यांसाठीं वाढून समोर ठेवण्याच्या
मानसिकतेला त्रिवार मुजरा !!!
पूर्वजांचा तपशीलाविषईचा काटेेकोरपणा, खाद्यसंसर्कितला तीचं योग्य स्थान देण, हे सारं अभिमानास्पद. राजाला केंद्रस्थान देण समजण्यासारखं.
मातीच्या भांड्यांचा आग्रह वाचून वाटलं , खाद्यसंस्क्रितचा उगम गरिबीत होत असावा व श्रेय मात्र
उच्च्भ्रुना मीळत असावं. उदा. मोंगलांच्या जमन्यात मोठ्या बांाधकामावरच्या मजूराना दूसर्या दिवशीच्या जेवणासाठी मांस व तांदूळ मोठ्या हंड्यात मंद विस्तवावर रात्रभर शीजत ठेवत; तीच मग राजमान्य बीर्याणी झाली ! खंडाळ्याच्या घाटात अवघड जागीं रात्र-दीवस काम करताना सोईच म्हणून मजूर गूळ व शेन्ग्दाणे नेत.आज ती नखरेबाज लोणावळा चिक्की झालीय !
़खाण्याचाच विषय म्हणून तोंड उघडल, झालं !

भाउ नमस्कार, छान सांगितली माहिती. चिक्कीचा उगम असा झाला हे आज कळले.

चिनूक्स
आज प्रिंट आऊट घेवुन हा लेख वाचला. पहिल्या दोन भागासारखाच हा पण एकदम दणदणीत जमला आहे. एक अत्यंत सुंदर माहितीपूर्ण रीसर्च पेपर वाचल्याचे समाधान दिल्याबद्दल धन्यवाद आणि तू यासाठी घेतलेले कष्ट अगदी उल्लेखणीय आहेत.

महापराक्रमी आहेस बाबा तू ! धन्य!!! _/\_
एवढा अभ्यास करायचा आणि तो मुद्देसुदपणे मांडायचा म्हणजे खूप मेहनत आहे. तू आम्हाला चमच्याने पक्वान्न भरवतोयस तर आम्हाला खाताना देखिल धाप लागतेय Happy

फेटे उडाले ! ठेव ते वर !!!
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

बापरे! हे एकदा वाचून कळणं कठीण आहे! केव्हढा अभ्यास आहे तुझा! आणि संस्कृतवर हुकूमत असल्याखेरीज हे शक्य नाही. ग्रेट आहेस.

(अहो) चिनूक्स, साष्टांग नमस्कार तुझ्या प्रयत्नांना, चिकाटीला! ह्यावेळी मी परत एकदा आधीचे दोन वाचून काढले.
खरच थोर!

चिनुक्स,केवळ महान आहेस रे!
आधीच्या २ भागांप्रमाणेच खूप माहितीपूर्ण लेख.
तुझ्या अभ्यासाला आणी मेहनतीला सलाम!

Pages