कुणी सांगा ना कसे करावे...

Submitted by हर्षल_चव्हाण on 8 January, 2013 - 13:07

दुलईमध्ये बिलगून निजले,
गोड गोजीरे एक तान्हुले,
स्वप्नांच्या दुनियेत हरवले,
बघ ना आई तुझे सानुले...

करीसी माया अपार त्यावर,
दुखता नख; तुज अश्रू अनावर,
सदासर्वदा त्याजपाशी,
का गं आई इतका वावर?

आज तुझ्यावर रुसलो आहे,
इथे एकटा बसलो आहे,
असे वाटते मागून छोटा;
भाऊ मी तर फसलो आहे...

जा आई मी कट्टी फू,
भेदभाव जो केला तू,
काय करू मी कळेचना,
वेळ कसा मज देशील तू?

बाबांना हे सांगून द्यावे?
नकोच भाऊ असे म्हणावे;
की आईसच बदलून घ्यावे?
कुणी सांगा ना कसे करावे...
------------------------------------------------------------------------------
हर्षल (८/१/१३-रात्री ११.३०)
------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानग्याच्या भावना अचूक पकडल्या आहेत. Sad

शेवटचे कडवे चटका लावणारे आहे. Sad लहानग्याला आपल्या आई-बाबांबरोबरच्या हक्काच्या वेळात आलेला एक वाटेकरी अशी भावना धाकट्या तान्हुल्याबद्दल होणे स्वाभाविक आहे. अश्या वेळी आई-बाबांना लहान मुलांच्या मनोविश्वाशी रममाण होऊन संवाद साधण्याचे कसब अंगी बाणवावे लागते.

छान्....अगदी अचूक वर्णन.... Happy

पण मला वाटते शिर्षक : कुणी सांगा ना कसे करावे... हे असायला हवे होते... Happy
सॉरी हे आवडले नसेल तर.... राहु दे.....तशीही छान आहे.

निंबुडा : बरोबर आहे तुझं. पण हे लगेच लक्षात येत नाही, मोठा असला तरी वयाने लहानच असतो तो हे विसरल्याने आणि त्याचं वागणं बदलल्याने मगच हा विषय समोर येतो.
योगुली : शीर्षक बदललंय Happy
मानसी, रिया, शोभा, अनिल आणि वत्सला : सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार Happy
वत्सला : खूप काळजी घ्यावी लागेल, तिला असे वाटू न देण्याबद्दल Sad

किती सुंदर. लहानगं आलं की मोठ्याला "मोठं" व्हावं लागतं... मग वय काहीही असूदे Sad
अतिशय सुंदर शब्दांत व्यक्तं झालय, हर्शल