छप्पर सुद्धा उडून गेले इमारतीचे..

Submitted by प्राजु on 3 January, 2013 - 06:56

सारेच गेले निघून माझ्या सोबतीचे
छप्पर सुद्धा उडून गेले इमारतीचे

----------------------------------------

उगाच देऊ नको मुलामे सजावटीचे
वरवरचे बस रूप बदलेल इमारतीचे

कशास द्यावे इतरांचे तू मला दाखले
माझे आहे सारेच माझ्या पद्धतीचे

व्यस्त असते प्रमाण नेहमी तुझे नि माझे
योग्य उदाहरण असू आपण विसंगतीचे!!

माझ्या प्रश्नावरती पाहुन मौन तुझे मग
उत्तर सुद्धा मीच दिलेले तुझ्यावतीचे

विचारायचे प्रश्न न काही कुणी कुणाला
करार होते तुझ्या नि माझ्या मुलाखतीचे

शिकवण्याची आवड होतीच, शिक्षक झाले!
काम मिळाले मला परंतू शिरगणतीचे

महागाईची झाली आता सवय अशी की
स्वस्तामधले जगणे वाटे हलक्या प्रतीचे??

समाज बदलणे सोपे नाही जाण 'प्राजू'
वाणच आहे खडतर भलते जणू सतीचे

-प्राजु

(तळ्टीप : वरील दोन मतले सुचले. पण कोणता घ्यावा हे समजेना. म्हणून दोन्ही टंकले आहेत. आपण सुचवावे कोणता बरा आहे ते. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही मतले वाचताना तसेच खाली दिलेले मिसरे वाचताना अडखळायला होतंय. (मात्रा बरोबर आहेत). सबब, मला दोन्ही मिसरे बदलावेच असं वाटतंय.

व्यस्त असते प्रमाण नेहमी तुझे नि माझे
शिकवण्याची आवड होतीच, शिक्षक झाले!

गझल ठीकठाक वाटली.

विचारलं म्हणून.. पहिला छान वाटला. गझल आवडली.

विचारायचे प्रश्न न काही कुणी कुणाला
करार होते तुझ्या नि माझ्या मुलाखतीचे .. करार हा शब्द नात्यांसाठी येतो तेव्हां गहरे अर्थ घेऊन येतो.

महागाईची झाली आता सवय अशी की
स्वस्तामधले जगणे वाटे हलक्या प्रतीचे?? ... खरंय अगदी.

समाज बदलणे सोपे नाही जाण 'प्राजू'
वाणच आहे खडतर भलते जणू सतीचे...... जावे त्याच्या वंशा ! भिडला.

यात्रीजींशी सहमत !!

माझे आहे सारे माझ्या पद्धतीचे >>असे वाचले

प्राजू तुला असे वृत्त हवे होते का ?<<<<गागागागा गागागागा गागागागा>>> मला तसे वाटले !!
अशा वृत्तात एक "गा" हा "ल्+ल" असा बहुधा एकाच नाहीतर अगदीच गरज्ञ असेल तर लगोलग असलेल्या शब्दात विभागावा असे माझे वैयक्तिक मत /निरीक्षण आहे चुकीचेही असू शकेल !!

काही (बरेच ;)) बदल करावे लागले मला वाचताना ते असे होते

वरवरचे बस रूप बदलते इमारतीचे

कशास देशी इतरांचे तू मला दाखले (द्यावे पेक्षा देशी योग्य वाटते आहे वै म)

प्रमाण असते व्यस्त नेहमी तुझे नि माझे
उदाहरण आपण उत्तम बघ विसंगतीचे (बघ भरीचा वाटतोय क्षमस्व )

आवड होती शिक्षक होण्याची ...मी झाले!!

झाली सवय महागाईची अता अशी की
स्वस्तामधले जगणे वाटे उण्या प्रतीचे
>>> >>> उण्या हा शब्द माझ्यावतीने आगाउपणा म्हणून अ‍ॅड केला आहे Wink

"समाज बदलुन टाकिन" ..?? ...प्राजू ; सोपे नाही !!

टीप : पर्यायी शेर तुला आवडत नाहीत हे माहीत आहे म्हणून पर्यायी मिसरे देण्याचे धाडस केले आहे खपवून घ्यावे ही विनंती Happy

आनंद यात्री.. धन्यवाद. पण मला मिसरे बदलण्याची गरज आहे असे वाटत नाही. दोहोंपैकी एक कोणतातरी मी फायनल करेन. खूप खूप आभार, Happy

जर्दा जी... धन्यवाद.

वै व कु ,

माझ्याच पद्धतीचे... आवडला.
रूप बदलते... हा ही आवडला.
पण बाकीचे मिसरे हे माझे जास्ती चांगले आहेत असे वाटून गेले. गै.स.न.
आपण लिहिलेले बाकीचे मिसरे वाचताना अडखळायला होतय.
आपलेही मनापासून आभार. Happy

प्राजु,
सुंदर गझल..!

उगाच देऊ नको मुलामे सजावटीचे
वरवरचे बस रूप बदलेल इमारतीचे
...व्वा..! हा मला आध्यात्मिक वाटला..

कशास द्यावे इतरांचे तू मला दाखले
माझे आहे सारेच माझ्या पद्धतीचे
... व्वा.. सारेच मधील च मुळे व्यापकता...आणि ठोसपणा

व्यस्त असते प्रमाण नेहमी तुझे नि माझे
योग्य उदाहरण असू आपण विसंगतीचे!!
छानच.

माझ्या प्रश्नावरती पाहुन मौन तुझे मग
उत्तर सुद्धा मीच दिलेले तुझ्यावतीचे
व्वा..!

विचारायचे प्रश्न न काही कुणी कुणाला
करार होते तुझ्या नि माझ्या मुलाखतीचे
व्वा..!

शिकवण्याची आवड होतीच, शिक्षक झाले!
काम मिळाले मला परंतू शिरगणतीचे
Happy

महागाईची झाली आता सवय अशी की
स्वस्तामधले जगणे वाटे हलक्या प्रतीचे??
खरे आहे..

समाज बदलणे सोपे नाही जाण 'प्राजू'
वाणच आहे खडतर भलते जणू सतीचे
व्वा..! सतीचे....

फक्त एक,
सजावटीचे आणि इमारतीचे घेतल्यावर ईचे असा काफिया होवू शकला असता. मात्र आपण पुढील शेरांत अतीचे घेतला आहे. तो चालेल नक्कीच. पण दुसराही घेता आला असता ईचे वापरून...
म्हणजे ..... म्हणीचे, तुटीचे, चुकीचे, इत्यादी...

अजय जोशी सर,
मनापासून आभार.

आपण सांगितल्याप्रमाणे, सजावटीचे आणि इमारतीचे .. असे घेऊन ईचे काफिये घेऊनही लिहिलि असती गझल आणि त्यामध्ये मग चॉईस रेंज वाढली असती. आता आणखी एक दुसरी गझल लिहून बघावी असे वाटते आहे... हे काफिये घेऊन.

दुसरा मतला घेतला तर ही गझल.. पूर्ण होईल असे वाटते. ब्लॉग वर लिहिताना दुसरा मतला घेऊनच पोस्ट करेन.

पुन्हा एकदा धन्यवाद सर. Happy

विचारायचे प्रश्न न काही कुणी कुणाला
करार होते तुझ्या नि माझ्या मुलाखतीचे

शिकवण्याची आवड होतीच, शिक्षक झाले!
काम मिळाले मला परंतू शिरगणतीचे

महागाईची झाली आता सवय अशी की
स्वस्तामधले जगणे वाटे हलक्या प्रतीचे??

हे तीन शेर आवडले...

'महागाईची...' मध्ये मात्रा गडबड आहेत का ?