आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुजराती ब्राह्मण, कोकणी मराठा, कर्नाटकी ब्राह्मण, ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांमधे मी देसाई आडनाव पाहिलेलं आहे >> देसाई 'जैन'सुध्दा आहेत. तसेच 'जैन' पाटील.. लिंगायत, मुस्लिम यांच्यात पण ही आडनावं दिसतील. हुद्यावरून ती आडनावं पडल्यानं बहुतेक सर्व जाति-धर्मात या आडनावांचे लोक दिसतात.

दिनेश, रोहन, सुशांत, यो...गिरिश, नताशा, प्रिंसेस....जरूर लिहितो, खूप माहिती आहे आणि तितकीच लोभसही वाटू शकेल....आडनावाचा इतिहासदेखील किती रोचक होऊ शकतो त्याचे उदाहरण म्हणजे रोहनचा हा धागा.

@ दिनेश :

'फिरोझ गांधी' यांचे मूळ आडनाव दारुवाला नसून 'दस्तूर' असे होते. महात्मा गांधी फिरोझ याना आपले शिष्य मानत म्हणून राजकारणात सक्रिय झाल्यावर खुद्द फिरोझ यानीच आडनावासाठी 'गांधी' हा विकल्प घेतला.

त्यांच्या सासरेबुवांचेही 'नेहरू' हे काही खरे आडनाव नव्हते, ते होते 'कौल'... काश्मिरी ब्राह्मण. मोतिलाल कौल यांच्या वडिलांनी {गंगाधर कौल} व्यवसायातील भरभराटीनंतर जम्मू येथील कालव्याच्या किनारी एक भव्य अशी हवेली बांधली. 'कौल' त्या भागात भरपूर असल्याने आपले वेगळेपण दाखविण्यासाठी त्यानी 'नेहर = कालवा' आणि अशा कालव्याच्या ठिकाणाचे मालक म्हणजे 'नेहरू' असे आडनाव पत्करले. तेच सर्वतोमुखी झाले.

तिच गोष्ट 'बच्चन' आडनावाची. हरिवंशराय श्रीवास्तव हे मूळ नाव. पण हरिवंश यांची आजी त्याना लाडाने 'बच्चू...बच्चन' म्हणजेच आपल्या मराठीत 'बारक्या, छोट्या'. पुढे हरिवंशराय कविता लिहू लागल्यावर त्यानी मग हिंदीतील उपनामाच्या प्रथेनुसार 'बच्चन' हेच टोपणनाम स्वीकारले....तेच मग आडनाव म्हणूनही प्रसिद्ध पावले.....पुढे त्याना झालेला 'बारक्या' एकदमच सार्‍या देशात 'मोठा' झाला.

@ सुशांत आणि ~ "प्राणिवाचक आडनावे...." थोड्यावेळाने खुलासा देतो.

@ नंदिनी ~ मी देखील कर्नाटकी "देसाई" च आहे. पाटील हे त्या वतनदारी वा नियुक्तीपणामुळे पडलेले आणि रुढ झालेले नाव. धारवाड आणि मिरज इथे तर चक्क
मुसलमान 'देसाई'....त्यातही खाटीक काम करणारे जास्त....सापडतात.

अशोक पाटील

मी देखील कर्नाटकी "देसाई" च आहे. >> मामा माझ्या आईचे आडनाव पण देसाई.. आणि ते सुद्धा कर्नाटकातले (रायबाग, बेळगाव साईड्चे ) आहेत. तुम्ही कुटल देसाई म्हनायच?

धारवाड आणि मिरज इथे तर चक्क
मुसलमान 'देसाई'....त्यातही खाटीक काम करणारे जास्त....सापडतात.>> यावरून आठवलं. अशोकमामा, आमची आत्या धारवाडच्या देसायांना दिलेली. त्यांच्या वाड्याच्या एका कहाणीवर कानडी सीरीयल बनवली होती म्हणे (नंतर ती सीरीयल मराठीत आलेली म्हणे)

कुलकर्णी म्हणजे कुलाधिकरणिक चा अपभ्रंश ना? आमचे मूळ आडनाव माहीत नाही. काही पूर्वज कर्नाटक - विजापुराच्या साईडलाही होते म्हणे. कुलकर्णीच्या अगोदर केंजळकर असेल आडनाव असे काही नातेवाईक अंदाज वर्तवतात, पण नक्की माहीत नाही. गांधीजींच्या खुनानंतर गावात जी जाळपोळ झाली त्यात गावातला वाडा जाळला गेला व जी काय संदर्भाची कागदपत्रे होती तीही त्यात स्वाहा झाली असे ऐकले आहे.
सध्या हयात असलेल्या ज्येनांना एकदा-दोनदा विचारले पण त्यांनाही काही माहीत नाही असे त्यांनी सांगितले.

आजोळी श्रीरामपूरजवळ नगर जिल्ह्यातील पुणतांबे हे मूळ गाव म्हणून पुणतांबेकर हे आडनाव. पण त्या अगोदर कोळविशे असे आडनाव होते हे कळाले. त्याबद्दल अधिक माहिती नाही.

वडीलांचे आजोळी जोशी हे आडनाव... तेही व्यवसायावर आधारित असावे, कारण वैद्यकी - भिक्षुकी व ज्योतिषी हे सर्व तिथे होते.

आईच्या आजोळी पुन्हा कुलकर्णीच आडनाव.

कुलकर्णी - कुळकर्णी अर्थात कुळाचे करणारे असाच अर्थ होतो.

नंदिनी.. तामिळनाडुत नाड चा अर्थ देश / प्रांत असा काहिसा आहे का?

नाडकर्णी हे आडनाव तिथूनच आले आहे का बहुदा?

आम्ही मुळचे व्याळा जिल्हा अकोला म्हणुन व्याळेकर पुढे कुळकर्णी केव्हा झाले माहीत नाही पण व्याळेकर कुळकर्णी म्हटले जाते !

@ लंपन....

माझा जन्म कोल्हापूरात झाला....त्यामुळे मी त्या रेकॉर्डच्या आधारे स्वतःला 'महाराष्ट्रीयन' म्हणवून घेण्यास पात्र आहे. वडीलही इथेच नोकरीत होते.....त्यांचे आजोबा संकेश्वर, चिकोडी भागातील शेतकरी. म्हसोबा हिटणी [जे आता बेळगाव जिल्ह्यात गेले आहे] हे कुलदैवत. इथले आम्ही 'देसाई' कूळ. जमीनजुमला .. चार विहिरीसह....खाऊची पाने आणि तंबाखू प्रमुख पीक......चांगल्यापैकी असणार, त्यामुळे गावात पणजोबाचा बर्‍यापैकी दरारा असेल. सबब गावपाटीलकी चालून आली. पुढे आजोबाच्या जन्माचेवेळी कोतवाली दप्तरी 'पाटील' हेच आडनाव लिहिले गेल्याची शक्यता....अर्थात त्यावेळच्या कर्नाटकी प्रथेनुसार 'देसाई-पाटील' असेच म्हटले जात...[जसे आपल्याकडील वळसे-पाटील, कोळसे-पाटील, विखे-पाटील...इत्यादी]; पण कालौघात सुटसुटीतपणाच्या धोरणानुसार शाळादप्तरी त्याकाळातील मास्तरांनी 'देसाई' ला गोळी घातली आणि फक्त 'पाटील' हेच आडनाव कॅटलॉगी नोंदविले....जे चिकटलेच कायमचे....पाटीलकी गेल्यानंतरही.

काप गेले भोके राहिले...त्यातील गत !

अशोक पाटील

पण सांगली सातारा कोल्हापुर , खांदेशात जस पाटील हे आडनाव सर्रास लावल जात तस महाराष्ट्रातल्या ईतर भागात कमी लावल जात. बर्याचदा ते जोडनावातच येत.

आमचे आडनाव जगदाळे-सरपाटील....मुळ घराणे मध्य प्रदेशातील धार संस्थांनचे पवार.पवार घराण्याची जगदाळे,नाईक-निंबाळकर,पोकळे-पाटील हि उपघराणी आहेत.जगदाळे सुमारे ८०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थलांतरित झाले.नंतरच्या सुलतानी काळात मसूर-कराड भागातील सुमारे १६८ गावाची देशमुखी मिळाली.जगदंबेचे उपासक असल्याने लोक जग्धने म्हणू लागले त्याचा अपभ्रंश होऊन नंतर जगदाळे आडनाव झाले.
मसूर च्या देश्मुखीतील काही गावाचा मोकासा शहाजी महाराजांनी घेतला त्यामुळे देशमुखी ९१ गावाची झाली.नंतरच्या काळात स्वराज्य निर्माण झाले आणि देशमुखी वतनदारी संपुष्टात आली.तसेच जगदाळे घराण्याच्या शाखा पुरंदर आणि दौंड-फलटण येथे विस्तारल्या.आम्ही गराडे (पुरंधर) येथील जगदाळे.यांना शिवकाळात १३७ गावाची सरपाटीलकि होती.

पाटील- म्हणजे गावाचा वतनदार, शिवकाळापूर्वी पाटलाकडे फारशी सरकारी कामे नसायची.शिवकाळात यांचे स्वायत्त अधिकार थोडे कमी झाले आणि सरकारी कामे वाढली.

देशमुख - म्हणजे अनेक गावाचा वतनदार.शिवकाळापूर्वी आपल्या अमलाखालील गावांचा कारभार स्वायत्त पद्धतीने पहायचे.शिवकाळात यांचे सर्व स्वायत्त हक्क काढून घेतले आणि देशमुखी संपुष्टात आली.

सरपाटील- म्हणजे जवळजवळ देशमुखच.पण यावर राजाचा पूर्ण control असे.तसेच चौथाई आणि इतर बरेच खंड सरकारात जमा करावे लागत असे.तसेच युद्ध-प्रसंगी आपले सैन्य राजासाठी तैनात करावे लागत असे.

देसाई - कोकण, कोल्हापूर,उत्तर कर्नाटक,गोवा भागात. देशमुख आणि देसाई जवळपास सारखेच फक्त देसाई लोकांकडे जास्त Administrative जबाबदार्या असत
करप्रणाली,पत्रव्यवहार इ.च्या

अशोक.,

उत्तम संदेश! 'आडनावं लावणं' पेशवीय/इंग्रजी आमदानीत सुरू झालं असलं तरी आगोदरपासून कुळनावं अस्तित्वात असावीत. मनुष्यास कुळाबरोबर गोत्रदेखील जन्मासोबातच लाभत असे. काही आडनावे (विशेषत: उत्तर भारतात) थेट ऋषींवरून वा गोत्रांवरून पडलेली दिसतात. उदा. : भारद्वाज (भरद्वाज), वसिष्ठ, भार्गव (भृगु), जमदग्नी, गर्ग, अत्रे (अत्री), इत्यादि.

ऋषींची आडनावे हा प्रकार युरोपात देखील दिसून येतो. इंग्लंडमधील ससेक्स परगण्यातील atree हे नाव मूळ इंग्रजी नाही (अत्री ऋषींशी साम्य चटकन ध्यानी यावं). अश्वलायन ऋषींवरून जॉर्जिया व युक्रेनमधील आडनावांत -अश्विली असा प्रत्यय दिसून येतो. उदा. : द्युगाश्विली, शकाश्विली, इत्यादि.

आ.न.,
-गा.पै.

>>>> ही माहिती कुठल्याही इतिहास तज्ञाने सांगितलेली नाही. <<<<
कृपयाच, वर जशी जातपातीबद्दलची सूचना आहे, तशीच सूचना, "इतिहासतज्ञ (इन्क्लुडीन्ग जमिनीत खोदकाम करुन पुरावे शोधणारे पुराणवेत्ते) यान्नाही इथे प्रवेशबन्दी घाला" Proud
तसे न केल्यास ही जमात, तुमच्या प्रत्येक विधानाबदल्यात, काहीतरी पिवळा जुनापुराणा कागद म्हणा, ताम्रपट म्हणा, गेला बाजार शिलालेख वा उत्खननात सापडलेल्या जुन्यापुराण्या खापर्‍या/कवट्या हाडे इत्यादी मागतील, जे तुमच्यापैकी कुणाकडेच असणार नाही! यान्च्या अशा असण्याचा फायदा उठवुन इथे जी लोक गीता कृष्णाने सान्गितली याला पुरावा काय असे विचारतात, आरत्या संतान्नी रचल्या व त्याच वाचतोय याला पुरावा काय याची चिकित्सा करण्यात धन्य मानतात, ते लोक तुमच्या कथान्ना "गावगप्पा/बाजारगप्पा" ठरवणार नाहीत कशावरून? अन ठरवलेच अन नेमके त्यावेळेसच अ‍ॅडमिन टीमला डुलकी लागलेली असली तर मग आली का बला! Wink
सबब, वरील इतिहास संशोधक/तज्ञ/उत्खनन वाले यान्नाही इथे बन्दी घाला! Proud

अशोक काका Happy आमचेही असेच झाले. आम्ही मूळचे साबळे/ साबे - पाटील. आता मात्र पाटीलकी नसलेले पाटील.

साबळे / साबे नावाचा काय इतिहास आहे ? ़कुणालामाहिती आहे का?

गामा.. मी मगाशी लिहिणार होतो.. सध्या इंग्रजी आणि मराठी / भारतीय अश्या दोन्ही ठिकाणी आढळणारी आडनावे कुठली?

उदा. पारकर...

सहा जणांचे बळ असणारा - सहाबळे उर्फ साबळे.

आमचे एक सर होते साबळे नावाचे त्यांच्याकडून साबळे हा सहाबळे या आडनावाचा अपभ्रंश आहे असे ऐकले होते.

तसेच एक उदा. माणकोजी दहातोंडे... १० जणांना एकावेळी तोंड देणारा म्हणून मिळालेली पदवी.

शिवकाळात यांचे सर्व स्वायत्त हक्क काढून घेतले आणि देशमुखी संपुष्टात आली.
>>> नाही. महाराजांच्या काळात देशमुखी पद्धत पुर्णपणे अस्तित्वात होती.

मालोजीराव. जरा वाक्य बदलुया. संपुष्टात नाही आली तर तिचे स्वरुप बदलले. अर्थात तुम्हालाही हेच म्हणायचे आहे हे मी जाणतो. Happy

धन्यवाद गा.पै....आणि इंद्रधनुष्य....

मी वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे हा विषय फार मोठ्या व्याप्तीचा आणि तितकाच रंजकदेखील होऊ शकतो. 'आडनाव' वा 'कुळनाम' लावणे हे पेशवाई तसेच इंग्रजी अंमलापूर्वीही चालू झाले होते...विशेषतः समाजाने 'बारा बलुतेदारी' स्वीकारली आणि लोकांना त्यांच्या धंद्यानुसार थेट पुकारले जाऊ लागले.....कुंभाराला 'अरे ए कुंभारा...' असे गावकामगार पाटलाने वाड्याच्या दरवाजातून मोठ्याने हाक मारली तरी त्या कुंभाराला तो अपमान वाटत नसे.....मला लोकांनी 'आडनावाने'च हाक मारली असाच अर्थ बलुतेदार मंडळी घेत.

सामाजिक दर्जाला प्रतिष्ठेला महत्व प्राप्त झाले ते पेशवाईच्या काळात. शाहू सातार्‍याला गेल्यावर आणि पुणे हे मराठ्यांचे राजधानीचे शहर बनल्यावर तिथे छत्रपतींच्या आशीर्वादाने आणि परवानगीने राज्यकारभार हाकणारे पेशवे हे खर्‍या अर्थाने राज्याचे मालक बनले. बाळाजी विश्वनाथ कोकणस्थ असल्याने त्यानी देशावरील 'देशस्थां'चे वर्चस्व कसे कमी होत जाईल हेच पाहिले [अर्थात राज्यकारभारही पाहिलाच, यात शंका नाही]. साहजिकच जी मंडळी सत्ताधिशांच्या कृपेने 'वरचढ' झाली त्यांच्या आडनावांनाही मग भलतेच महत्व प्राप्त होऊ लागले, असा इतिहास सांगतो.

ऋषींच्या गोत्रांचा तुम्ही चांगला उल्लेख केला आहे. मात्र उत्तर भारतात त्या गोत्राव्यतिरिक्त अन्य कुणी [म्हणजेच अपात्र समजल्या जाणार्‍यांनी] वापर केल्याचे आढळल्यास त्याला समाज बहिष्कृत करण्याइतपत ज्येष्ठांची तयारी असे. त्यासाठी 'खाप' सदृश्य स्थितीही त्या त्या प्रांतात होती...आजही आहे.

महाराष्ट्र प्रांत हा तसा उदारमतवादी असल्याने आडनावे बदलण्याची प्रथा इथल्या राज्यकर्त्यांनी लागलीच स्वीकारली होती आणि मग गॅझेटद्वारा नोंद करून जातीदर्शक आडनावे बदलून घेण्याची परवानगीही मिळाली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बरेचसे कांबळे आता 'प्रधान...परांजपे...जगताप...जाधव' झाल्याचे दिसून येते. गडहिंग्लज तालुक्यात मला तर एक 'दशरथ गर्ग' ही भेटला जो एस.सी. होता. पण असो....सरकारने अनुमती दिली आहे, त्याचा उपयोग संबंधित करून घेत आहेत असेच म्हणावे लागेल.

कार्यालयातील माझ्या एका ज्युनिअर सहकार्‍याचे नाव होते "बाबासाहेब कुलकर्णी". नाव आडनावावरून तो ब्राह्मण असल्याने सूचित होत असे. पण त्याचा सी.आर. लिहिण्याचे काम माझ्याकडे जेव्हा आले त्यावेळी त्याच्या सर्व्हिस बुकावरून समजले की पठ्ठ्या चक्क "मुस्लिम" आहे. बाबासाहेब हे नाव मुसलमानात आहे, अन् त्याचे आजोबा रेठर्‍याचे कुलकर्णी वतनदार...वसुली कारकून.

अशोक पाटील

दहिभाते, भाजीखाये, भातसांडे, ताकलवंडे, इ. आडनावे कशी आली असतील ?

आडनाव ही संकल्पना जपानमधे पण आहे आणि बरीचशी आडनावे ही निसर्गावर आधारित आहेत.
उदा. तानाका (शेताच्या मधे असलेले)
यामादा (डोंगरावर शेती असलेले)
हायाशी (जंगलातले)
कोबायाशी (छोट्या जंगलातले)

आपल्याकडचे दाते हे आडनाव जपानमधे पण आहे जसेच्या तसे. Happy

राजे-महाडीक, राजे-शिर्के या आडनावांचा इतिहास काय असावा? नुसते राजे असेही आडनाव लावले जाते ते कसे आले असेल?

अशोक मामा
(इतरांनी वरती मामा म्हटले आहे म्हणून मी ही मामा म्हणतेय)
सगळ्याच पोस्ट मस्त. देसाई हे आडनाव पारसी लोकांमधे पण आहे.

रोहन माझे सासरचे आडनाव काते जे ईंग्रजी मध्ये स्पेलींग बघितले तर केट होते.. Happy बाकी इतिहास माहित नाही.
माहेरचे चिले. कोल्हापुर-पन्हाळा भागात एक महाराज होते "चिले महाराज" मुळचे जेऊर चे ..त्यांच्या वरुन चिले आडनाव पडले.. आम्ही जातीने नंद- गवळी . कृष्णाचे वंशज असे सांगण्यात आलेय.. समाज पण हिंदु-गवळी.. त्या वरुन आजीचे ( आईच्या आईचे) माहेरचे आडनाव गवळी आणी सासरचे खेतल .. त्याचे पण काही माहित नाही..
तसेच कोल्हापुर साईडला आमच्यातली पंदारे, खटाटे , बुराण ही आडनावं ईकडे कोकण-मुंबई साईड ला आली की अनुक्रमे पंदेरे, खताते, भुरण अशी बदलेली आढळली..

काही आडनावे (विशेषत: उत्तर भारतात) थेट ऋषींवरून वा गोत्रांवरून पडलेली दिसतात. > अनुमोदन
खंडाग्न मुनी हे गोत्र सांगितले जाते खताते आडनावा साठी... बाकी इतिहास माहित नाही.

नमस्कार काते आम्ही खताते :p

>>> संपुष्टात नाही आली तर तिचे स्वरुप बदलले. अर्थात तुम्हालाही हेच म्हणायचे आहे हे मी जाणतो.

होय रोहन असंच म्हणायचं होतं ! एकप्रकारे नाममात्र राहिली देशमुखी

मी असे नाही म्हणणार मालोजीराव. त्यांना अनेक हक्क होते तेंव्हाही. फक्त ते केंद्रशासीत पद्धतीने वळवले गेले.

Pages