कचऱ्याचा डब्बा

Submitted by vandana.kembhavi on 26 December, 2012 - 20:50

लाजेने, शरमेने, अपमानाने मिनुचा चेहेरा लालबुंद झाला, तिथे थांबणे तिला अजिबात शक्य नव्हते, सगळ्यांपासून कुठेतरी लांब पळून जावे असा विचार करून ती धावतच शाळेच्या प्रसाधन गृहात शिरली. तिथे कुणीच नवह्त, त्यामुळे मिनुच्या अश्रूचा बांध फुटला आणि ती ओक्साबोक्षी रडू लागली.....मिनू या नवीन शाळेत आल्यापासून अस नेहेमीच होऊ लागल होत पण आज जरा जास्तच...
मिनुच्या बाबांची या गावात नुकतीच बदली झाली होती. मिनुची शाळा बदलण्याची हि तिसरी वेळ होती. मिनुला खरतर आधीच्या दोन शाळा सोडताना खूप त्रास झाला होता पण आई म्हणते कि अग तुला नवीन मित्र मैत्रिणी जोडता येतात, तू सोडून गेलीस तरी हे मित्र मैत्रिणी तुझी आणि तू त्यांची आठवण काढताच आणि वर तुला नवीन मित्र मैत्रिणी पण मिळतात...आई च म्हणण अगदीच काही खोट नव्हत, मिनूने आता पर्यंत खूप मित्र मैत्रिणी जोडले होते. या शाळेत ती त्याच उत्साहाने आली होती.

मिनुला शाळेचा पहिला दिवस डोळ्यासमोर आला.....वर्गात सगळ्यांनी तीच छान स्वागत केल होत त्यामुळे मिनू अगदी खुश झाली. सगळ्यांनी तिला पटकन सामावून घेतलं. मधल्या सुट्टीची घंटा झाली, इतर मुलामुलीं बरोबर ती सुद्धा मैदानावर आली आणि मैदानाची अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटलं, मैदानावर खूप कचरा झाला होता आणि सगळे त्या वातावरणाला सरावले होते. मिनूने नाकावर रुमाल धरला. आणि त्याच क्षणी ती सगळ्यांच्या नजरेत आली. तिच्या मैत्रिणी पटकन तिच्या पासून लांब जाऊन बसल्या. मिनूने पुन्हा एकदा मैदानावर नजर फिरवली, त्या कचऱ्या कडे बघून तिला उलटी होईल कि काय असे वाटू लागले. त्या कचऱ्याच्या आजूबाजूने मुल खेळत होती, तिथेच कडेला बसून जेवत देखील होती. मिनूने मागे वळून इतर मैत्रिणींकडे पाहिले तर त्या देखील डबा उघडून जेवत होत्या. मिनू त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली," तुम्ही सगळे या घाणीत कसे बसलात? तुम्हाला हा कचरा दिसत नाही का?" नकळत मिनुचा स्वर उंच झाला होता. आजूबाजूच्या सगळ्यांनी थांबून तिच्याकडे पाहिले आणि मग खांदे उडवून पुन्हा त्यांच्या कामाकडे वळले. कोणीच काही बोलत नाही, कोणालाच काही वाटत नाही हे पाहून मिनुच्या रागाचा पारा चढला. ती पोटतिडकीने स्वच्छते बद्दल बोलू लागली पण सगळ व्यर्थ....कोणी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. मिनू नुसती रागाने धुमसत राहिली....

म्लान होऊन आलेल्या मिनुकडे पाहून आईने काळजीने विचारलं आणि मिनुचा बांध फुटला, ती ओक्साबोक्षी रडू लागली. आईला तिच्या बोलण्यातून कळल कि मिनू जेवलीच नाही तेव्हा तिने आधी मिनूला जेवू घातल. जेवल्यावर मिनू शांत झाली मग तिने आईला पुन्हा सगळ सांगितलं. आईने तिला समजावल कि तू प्रयत्न कर, आणि हळूहळू त्यांना स्वच्छतेच महत्व पटेल, एका दिवसात त्यांना बदलायचा प्रयत्न करू नकोस. त्यांना आहे तसं स्विकार...आणि तसच बरच काही...मिनूने खूप विचार केला आणि मग तिने ठरवलं कि आई म्हणते ते करून पाहू....
दुसऱ्या दिवशी मिनूने वर्गात गेल्यावर काही मुलींशी बोलायचा प्रयत्न केला पण व्यर्थ...कुणीही तिच्याशी बोलले नाही...मधल्या सुट्टीत ती मैदानावर गेलीच नाही, तिने वर्गात बसूनच डबा खाल्ला. जेवताना तिने वर्गाकडे निरखून पाहिले तर बाकांखाली सुद्धा भरपूर कचरा झाला होता, मिनू खूप अस्वस्थ झाली. तिने सरळ बाईंच्या कानावर घालायचे असा विचार केला आणि ताडताड ती शिक्षकांच्या खोलीकडे निघाली, अर्ध्या रस्त्यात आली तोच तिला आईचे म्हणणे आठवले कि एका दिवसात सगळ बदलत नाही...मिनू परत मागे फिरली, तिने स्वतः च प्रयत्न करायचे ठरवले.

दिवसांमागून दिवस जात होते, मिनुच्या असण्याची कुणीही दखल घेत नव्हत, कुणीही तिच्याशी बोलत नव्हत आणि तिच्याकडे बघत देखील नव्हत. एक दिवस मिनूने एक मोठी पिशवी घेतली आणि वर्गातला सगळा कचरा त्या पिशवीत गोळा केला, ती कचरा गोळा करत असताना काही मुले मुली वर्गात आले. ती काय करते आहे ते पाहून कुणीतरी वात्रटपणे ओरडलं "कचऱ्याचा डब्बा" आणि सगळे हसू लागले. मिनूने काही न बोलता तो गोळा केलेला कचरा कचऱ्याच्या डब्ब्यात नेऊन टाकला आणि धावतच ती हात धुवायला प्रसाधन गृहात शिरली. आत शिरल्यावर तिचे डोळे वाहू लागले पण हात धुवून चेहेरा कोरडा करून ती वर्गात शिरेपर्यंत मधली सुट्टी संपली होती आणि सगळे वर्गात आले होते. मिनू वर्गात शिरताच मुलांनी "कचऱ्याचा डब्बा" असा गलका सुरु केला. मिनुची मान शरमेने खाली गेली, मान खाली घालूनच ती जागेवर जाऊन बसली. बाई वर्गात आल्यावर मात्र सगळ सुरळीत झालं. पण त्यानंतर हे रोजच झालं, मिनू कुठेही दिसली कि मुल मुली तिला चिडवू लागले, आज कहरच झाला, ती मैदानाकडे गेली तर सगळ्यांनी आपला खेळ थांबवून टाळ्या वाजवून "कचऱ्याचा डब्बा" असा आरडओरडा केला, मिनू धावतच प्रसाधनगृहात शिरली..

"ए मिनू" कुणाची तरी हाक ऐकू आली, मिनू दचकली, मान वर करून तिने आजूबाजूला पाहिले, आत तर कुणी नव्हते...पुन्हा हाक ऐकू आली, आता मिनू आवाजाच्या दिशेने पाहू लागली, आवाज मोठ्या कचऱ्याच्या डब्याच्या मागून येत होता, मिनूने डब्याच्या मागे जाऊन पाहिले, तिथेही कुणी नव्हते. मिनुला वाटले बाहेरून कुणी हाक मारते आहे, ती दाराकडे निघाली तोच तिला आतूनच हाक ऐकू आली, ती मागे वळली आणि तिच्या मागे उभ्या असलेल्या छोट्या मुलाला पाहून ती दचकलीच. त्याने तिला विचारले,"मिनू, तू का बरे रडत होतीस?" मिनू त्याच्या प्रश्नाने भानावर आली, तिने त्याला विचारले, "तू कोण आहेस? आणि आत कसा आलास? मी आत आले तेव्हा तर इथे कुणी नव्हत, तू आत येताना मला दिसला कसा नाहीस?" , त्या छोट्याच्या हसऱ्या चेहेऱ्याकडे लक्ष जाताच मिनूने तिचे प्रश्न आवरते घेतले...आणि मग त्याने बोलायला सुरुवात केली.."मिनू, तू खूप गुणी मुलगी आहेस, मी तुला तू इथे आल्यापासून पाहतो आहे, ही शाळा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची तुझी धडपड त्यात आलेले अपयश आणि त्यातून झालेली तुझी निराशा मी खूप जवळून पाहतो आहे.." मिनू त्याला थांबवत म्हणाली,"अरे, पण तू आहेस तरी कोण? मी तर तुला कधीच पाहिलं नाही.." त्यावर हसून तो म्हणाला,"अग, मी आहे "कचऱ्याचा डब्बा", खरोखरचा कचऱ्याचा डब्बा...तुझी धडपड वाया जाऊ नये म्हणून तुला मदत करायच्या इच्छेने आलो आहे, मी फक्त तुलाच दिसेन, आणि तुला मदत करेन, काळजी करू नकोस मिनू, तू हे करू शकतेस...मी तुला साथ देईन." मिनू बुचकळ्यातच पडली..तिने स्वतः ला एक चिमटा काढला आणि आपण स्वप्नात तर नाही न हे तपासून बघितले, खसाखसा डोळे चोळले, भराभरा डोळ्यांची उघडझाप केली तरीही समोरचा तो "कचऱ्याचा डब्बा" हसतमुखाने तिच्याचकडे पाहत होता..."खरच का रे तू आहेस?" या प्रश्नावर तो मंदस हसला आणि म्हणाला,"मिनू, आता तू जेव्हा स्वच्छता करणार तेव्हा मी तुझ्याबरोबर असणार आहे त्यामुळे तू बिनधास्त तुझ काम चालू ठेव, मुलं हसली, त्यांनी चिडवलं तर अजिबात रडू नकोस, चांगल काम करणाऱ्या लोकांना नेहेमी टीकेला सामोर जावं लागतं हे लक्षात ठेव, जा लाग कामाला, मी आहेच तुझ्या बरोबर.." मिनूने पुन्हा एकदा अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं, "खरच...."असं काहीसं पुटपुटत ती बाहेर पडली, मान झटकून "भास असेल" अस म्हणत गपचूप वर्गात येऊन बसली..

दिवसभर ती त्या "कचऱ्याचा डब्बा" चा विचार करत होती, तो दिसला हे तिला अजूनही पटत नव्हते, पण त्याने जे सांगितलं ते मात्र तिला पूर्ण पटले होते आणि तिने तसेच करायचा निश्चय केला..दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीत तिने संपूर्ण वर्ग स्वच्छ केला, मुलांच्या चिडवण्याकडे तिने लक्ष दिले नाही, गोळा केलेला कचरा डब्ब्यात नेऊन टाकताना तिला डब्ब्याच्या मागे हसऱ्या चेहऱ्याचा तो मुलगा पुन्हा दिसला, आणि त्याने मिनुला शाबासकीही दिली. आणि मग मिनुचा तो रोजचा दिनक्रम झाला, मधल्या सुट्टीत ती मिळेल तेथे स्वच्छता करू लागली, चिडवण्याकडे ती लक्ष देत नाही हे पाहिल्यावर मुलांचा चिडवण्याचा आवेश देखील कमी झाला होता, इतर काही मुलं मुली हळूहळू तिच्या बरोबर मदतीला देखील येऊ लागले..लवकरच शाळा स्वच्छ दिसू लागली, मग मिनूने बरोबरच्या मुलामुलींना त्यांच्या मित्रमैत्रिणीना देखील घेउन यायची विनंती केली आणि पहाता पहाता भरपूर मुलेमुली या स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी झाले... संपूर्ण शाळेत मिनुची चर्चा होऊ लागली, सगळे शिक्षक तिच्या या पुढाकाराने भारावून गेले आणि मग सगळ्या शाळेने तिला मदत करायची ठरवले,.सगळ्यात आधी शाळेने तिच्या या कष्टांची दखल घेऊन एक छोटासा समारंभ करून मिनुचा सत्कार केला...मिनू साठी हा एक आश्चर्याचा धक्का होता, मुख्याध्यापकांनी त्यांच्या भाषणात मिनुचे खूप कौतुक केले, आणि मुलांना समजावून, शिक्षा करून जे साध्य झाले नसते ते मिनूने स्वतः करून दाखवले आणि त्यात सगळ्यांना सामावून घेतले अश्या शब्दात तिचा गौरव केला. आणि आता हेच या सगळ्या मुलामुलींनी गावासाठी देखील करावे असा सल्ला दिला. आता मुले गाव स्वच्छ कसे करावे या विचारात गढून गेली, त्यात मिनू सुद्धा होती...तिने सभोवार पाहिले आणि तिला कोपऱ्यात उभा असलेला "कचऱ्याचा डब्बा" दिसला आणि त्याच्या चेहेऱ्या वरच हसू आणि आश्वासक भाव यांनी आपल्याला गावासाठी देखील हे काम करता येणार याचा विश्वास मिनुच्या डोळ्यात स्पष्ट दिसू लागला...."कचऱ्याचा डब्बा" समाधानाने भरून गेला....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे सिडनी मध्ये माझ्या मुलाला शाळेत कचरा गोळा करायची ड्युटी दिली तेव्हा तो चिडला होता, मग त्याच्या मुख्याध्यापकांनी त्याला स्वच्छतेचं महत्व आणि शाळेतले सगळे शिक्षक व मुले आळीपाळीने शाळेचा परिसर कसा स्वच्छ ठेवतात हे दाखवले होते.... त्यानंतर माझ्या मुलाने त्या कामाला कधीच खळ्खळ केली नाही, ते त्याचं आवडीचे काम झाले...."कच-याचा डब्बा" हा मिनुला मानसिक आधारासाठी आहे.. गोष्ट आवडल्याचा मला खुप आनंद झाला आहे...तुम्हा सगळ्यांना खुप धन्यवाद!