अरुणा ढेरेंची "विस्मृतीचित्रे" !

Submitted by शोभनाताई on 23 December, 2012 - 00:19

( उंच माझा झोका' मालिकेमुळे त्या काळाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात कर्तृत्वाने गाजवलेल्या पण आज विस्मृतीत गेलेल्या या स्त्रियांना डॉ. अरुणा ढेरे यांनी विस्मृती चित्रे द्वारे उजेडात आणले आहे.या पुस्तकाचा परिचय स्वरूपातील सदर लेख येथे देत आहे.यापूर्वी "१९व्या शतकातील त्या थोर स्त्रिया"' या नावांनी जुलै २००१च्या "विकल्पवेध"मध्ये सदर लेख छपून आला होता'.)

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रांच्या जडणघडणीचा खूप मोठ श्रेय १९व्या शतकातील सुधारकांच्या कार्याला त्याकाळात बिजारोपण केलेल्या चळवळींना,संस्थानां द्यावे लागेल.या झपाटलेल्या काळाचा अभ्यास करु पाहणा-या कोणत्याही व्यक्तीला हे शतक खिळउन ठेवत. डॉ. अरुणा ढेरे सारख्या सवेदनाशील लेखिकेला या काळानी झपाटून टाकल्यास नवल नाही. त्यांच हे झपाटलेपण विस्मृती चित्रे या श्रीविद्याप्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून माझ्यापर्यंत पोचल. त्याच ओझरत दर्शन घडविण्याचा हा एक प्रयत्न.

आपल्याकडील लोकांची इतिहासाबद्दलची अनास्था पाहता हि 'विस्मृती चित्रे' जिवंत करणे सोपे नव्हते. यासाठी स्वत:च्या घरातील ग्रंथ संग्रह ,नातेवाईक स्नेही यांच्याकडून मिळालेली सामग्री,जुनी नियतकालिके संस्थांचे अहवाल,स्मरणिका असा साधनांचा धांडोळा घेतला आहे. याशिवाय इंग्लंड मधे जाउन तेथील ब्रिटिशा लायब्ररी ,विविध अभ्यासक यांच्याकडूनही माहिती मिळवली आहे.

यासर्वातून त्याना विकासोन्मुख स्त्रीचे दर्शन झाले. ही स्त्री प्रचंड निर्बंधावर कौटुंबिक दडपणाच्या अजस्त्र पंजातून निसटून मोकळा श्वास घेऊ पाहणारी,स्वत:कडे व भोवतालच्या समाजाकडे साजगपणे पाहू लागलेली,बौद्धिक कर्तव्य मानून आंतरिक तळमळीने सामाजिक सेवेचे व्रत स्वीकारणारी, झेप घेण्याची शक्ती असणारी आणि सहकार्य संधी आणि उत्तेजन मिळताच उत्तुंग झेप घेणारी अशी होती.या सार्वाना जोडणारा समान धागा आहे तो अर्थातच स्त्री शिक्षणाचा.

सुरुवातीच्या प्रकरणात येतो विस्मृती चित्रांचा पार्श्वपट. शासन, ख्रिश्चनमिशनरी,सुधारक यांचे शिक्षणविषयक कार्य. अनेक संस्था वृत्तपत्रे यांचा साधन म्हणून केलेला वापर. त्यातून निर्माण झालेले विचारप्रवाह,चळवळी या सर्वातून स्त्रिशिक्षणाची वाढलेली गती. यासर्वांचे दर्शन येथे होते.

पुणे मुंबई हि या सर्वांची मुख्य केंद्रे होती.येथे निर्माण झालेले प्रगतीचे वारे हळूहळू छोट्याछोट्या गावापर्यंत पोचले व उच्चवर्णीयापर्यंत मर्यादित न राहाता तळागाळात हि पसरू लागले.

अर्थात सुधारकाना स्त्रिशिक्षण म्हणजे केवळ औपाचारिक शालेय शिक्षण अपेक्षित नव्हते.लेखीकेच्यामते स्त्रीला मोठ्या समाजाशी,राष्ट्राशी आणि एकूणच जगाशी जोडून देण्याची ती सुंदर प्रक्रिया होती.या प्रक्रियेत उतरलेल्या स्त्रियांनी सहकारी पुरुषांचा हात धरून जगाकडे जाणतेपणे पाहिले.आपणच आपली ओळख करून घेतली.आपल्या मर्यादांची आणि सामर्थ्याची त्याना जाण येत होती सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याच आत्म्याला त्याना स्पर्श करता आला.या स्पर्शाने ज्याना नवचैतन्य मिळाले अशा स्त्रिया समाजाच्या विविध क्षेत्रात जेंव्हा आत्मविश्वासाने वावरू लागल्या तेंव्हा स्त्रीत्वाच्या या दर्शनाने समाजमन भारले गेले.अशा अनेक स्त्रियांचे दर्शन पुढील वीस प्रकरणातून होते.

यातील बहुसंख्य स्त्रियांच्या मागे पुरूष भक्कमपणे उभी राहिलेले दिसतात.वेणू ताई नामजोशिंच्या मागें आगरकरान्सारखे सक्खे भाउ, नागुताई जोशींच्या मागे वडील मोरोपंत,कृष्णाबाई गरुडांच्या मागे पती वामनराव,लक्ष्मिबाई वैद्या यांच्या मागे वडील पटवर्धन, इंदुमती राणीसाहेबांच्या मागे सासरे शाहूमहाराज,गंगुताई खेडकरांच्या मागे सासर माहेरची सर्वच माणसे होती

पुरुषांचा भक्कम पाठींबा असला तरी काहींच्या बाबत नियती मात्र काहीशी क्रूरपणे वागते आणि अनंत ध्येये असणार्या या स्त्रिया अल्पायुषी ठरतात,मनाला चटका लाऊन जातात.

आवडाबाई भिडे या हुजुरपागेच्या पहिल्या विद्यार्थिनी. ११व्या वर्षी विवाह झाला. पाच वर्षात वैधव्य आले. सासूसासरे,नवरयाला खाणारी,पांढ-या पायाची म्हणून माहेरी परत आल्या.मोरेश्वर भिडेन्सारखे न्यायमूर्ती रानडेंचे सहकारी असणारे वडील,त्यामुळे सुधारक माहेरात इतर विधावान्प्रमाणे भोग मात्र तिच्या वाट्याला आले नाहीत.लहान वयात उत्तम समज असलेली,अत्यन्त बुद्धीमान अशी हि मुलगी आयुष्यभर विद्याव्यासंग करावा,.कलावंत म्हणून जगावे,खूप प्रवास करावा अशी आकांक्षा बाळगून होती.समकालीन विविध घटनांवर आपल्या लिखाणातून नेमके भाष्य करणार्या,प्रगल्भ स्वतंत्र विचार माडणार्या आवडाबाइन्चे १९व्या वर्षी झालेले निधन मन व्यथित करते.

१४व्या वर्षी सीताशुद्धी हे नाटक लिहिणार्या पहिल्या नाटककार काशीताई यांच्या मृत्युला नियतीला दोषी धरायचे कि तत्कालीन समाजव्यवस्थेला असा प्रश्न पडतो.

जिच्या नावामुळे शारदासदन हे नाव पडले ती शारदा सदंनची पहिली विद्यार्थिनी शारदा गद्रे हि विवाहानंतर एका वर्षातच बाळंतपणात मरण पावली अल्पवयीन लग्न झालेल्या मुलींचे बाळंतपणात मृत्यू हि त्या काळातील नित्याचीच बाब होती.शारदा गद्रेला स्वकर्तुत्व दाखवण्यास अवसरच मिळाला नाही परंतु तिच्यावरून शारदा सदनात धर्मांतर होते असे वादळ उठल्याने तिचे नाव इतिहासात नोंदले गेले.

क्षणभर चमकून गेलेली वीज असे जिचे वर्णन केले गेले त्या कृष्णाबाई गरुडहि अल्पायुषी ठरल्या.वामनराव गरुड हे तीचे पती स्त्रिशिक्षणाच्या वेडाने झपाटलेले होते तिने शिकून मोठे व्हावे या ध्येयापोटी सांसारिक सहजीवनाकडे,कृष्णाबाइन्च्या कोमल भावनांकडे दुर्लक्ष करीत होते गोपाळराव आणि आनंदीबाई जोशी यांच्या सहजीवनाची आठवण व्हावी अशी हि जोडी होती.

काही स्त्रियांनी मात्र स्वत:च्या विकासाबरोबर उत्तम सहजीवनही उपभोगले.रेबेका सिमियन आणि सिमियन बेन्जामिन हे बेने इस्त्रायली जोडपे त्यातील एका ज्यू धर्मीय असल्याने हिंदू स्त्रीयानइतका धर्मबन्धनान्चा अतिरेकी जाच तिला नसला तरी त्याच्या आजूबाजूलाचा समाज तोच होता रेबेकाचे परिचारिकेचे शिक्षण व त्यानंतर व्यवसाय आणि बेन्जामिनचे नीती प्रसारक मंडळाचे कार्य प्रामाणिक व मानवकेंद्री भूमिकेतून या दोघांनी केले.परिचारिकांनी फ्लॉरेन्स नाइटिन्गेलप्रमाणे तिचा आदर्श ठेवावा असे तिचे कर्तुत्व होते.परंतु शिक्षण घेतल्यापासून व त्त्यांनतरही तिला लोकनिंदेला तोंड द्यावे लागले.
'जात्या नाजूक शरीराच्या आणि कमी बुद्धीच्या असल्याने स्त्रिया वैद्यकीय क्षेत्रात काम करू शकणार नांहीत"असे केशवचंद्र सेनान्सारख्या सुधारकानाही वाटत होते.तर इतर अंधश्रद्ध अज्ञानी समाजाला तोंड देणे तिला किती कठीण गेले असेल याची कल्पना येते.पुरुष डॉकटरानच्या हाताखाली ,स्त्रीच्या जननेन्द्रीयांसंबन धी विषय शिकणारी स्त्री म्हणून लोकांनी टीका केली.प्रसंगी प्रेताला शिवण्याचे काम करते म्हणून नातेवाईकानी बहिष्कार घातला तरी ती आपल्या ध्येयापासून विचलित झाली नाही.संवेदनाशील मनाची,गारीबांची कैवारी असणारी अनेक भाषेत रोग्यांशी बोलू शकणारी,आधुनिक तंत्र आणि पारंपारिक शास्त्र यांचा मेळ घालणारी रेबेका बालवयात अनेक बाळंतपणातनां तोंड देणार्या स्त्रीयांना दैवतच वाटली धन्वन्तरीच
नैसर्गिक वात्सल्य अनुभवण्यासाठी स्त्रीजन्म घेऊन रेबेकाच्या रूपाने अवतरला आहे कि काय असे वाटते असे तिचे वर्णन पाध्ये गुर्जर नावाच्या एका शास्त्राज्ञाने केले हे विशेष.दुखा:ची गोष्ट म्हणजे ४५ व्या वर्षी ती के न्सरने मृत्युमुखी पडली.

गंगुताई खेडकर व डॉ.खेडकर या ब्राम्हणेतर जोडप्यांनी एकमेकाना सतत साथ दिली युरोप ,अमेरीकेत हिंदू धर्म व वेदान्त यावर व्याख्याने देण्याचे काम या जोडप्याने केले.तेथील वर्तमानपत्रातहि त्यांची वाखावणी झाली. अन्यधर्मियाना त्यांच्या इच्छेनुसार हिंदू करून घेण्याचे संस्कारहि त्यांच्या कडे केले जात.मुलाप्रमाणे मुलीनाही शिक्षण सक्तीचे हवे यालढयासाठी लोकमान्य टिळकांशीही झुंज दिली.

अवंतिका गोखले व बबनराव गोखले यांचे वर्णन,कुटुंबाची व्याख्या देशाईतकी विस्तारणारेजोडपे असे लेखिका करते.'संसाराची व्याख्या करायची तर या दोघावरून करावी असे आयुष्य हि दोघे जगली.गेल्या शतकात नव्हे तर याही शतकात अगदी आधुनिक काळातही हे चित्र दुर्मिळ आणि पुढेही दुर्मिळ असेल असे लेखिकेला वाटते.भरपूर मुले असणे हि परमेश्वरी कृपा असे मानण्याच्या काळात ,निपुत्रीकेला समाजात असणारी अप्रतिष्ठा माहित असतानाही कुटुंबाच्या अडचणी लक्षात घेऊन धाकट्या दिराला स्वत:चा मुलगा मानून स्वत:ला मुल होउ न देणारे जोडपे लोकवीलक्षणच म्हणावे लागेल.महात्मा गांधीच्या अनेक चळवळीत सामील झालेल्या अवंतिकाबाई पती र्हुदय विकाराने आजारी पडल्यावर राजकीय क्षेत्रातुन बाजूला झाल्या.अगदी १९३५च्या कायदेमंडळात जाण्याची संधीही त्यांनी सोडली.

रखमाबाई केळकर आणि दवाखान्याची वेळ संपल्यावर पत्नीला साहित्य, भूगोल,प्राणीशास्त्रशिकवणारे त्यांचे पती कृष्णाजी दादाजी हे जोडपेही असेच लक्षात राहणारे पतीच्या आजारपणानंतर शिकून करवीर संस्थानात 'लेडी सुप्रीटेन्डंट ऑफ द मेन स्कूल हे पद भूषवणारया पहिल्या भारतीय महिला होत्या.संमती वयाचा वाद चालू असण्याच्या काळात मुलीचे लग्नाचे वय १८ते२० आणि मुलाचे २५ ते ३० असावे असे रखमाबाइनि धीटपणे सांगितले.

रखमाबाइची मुलगी कृष्णाबाई.लग्न न करता शिकावे अशी वडिलांची इच्छा पूर्ण करणारी.तिचेही व्यक्तिचित्र येथे रेखाटले आहे.फर्ग्युसन कॉलेजची हि पहिली विद्यार्थिनी.अनेकांचा तिच्या शिकण्याला विरोध होता.सुरुवातीला सुरुवातीला प्राध्यापकांच्या टेबलाशेजारी चिकाच्या पडद्याआड राहून शिकावे लागले.पण कृष्णाबाईनी स्वकर्तुत्वाने हा पडदा बाजूला केला.ईंग्लंडमधून प्रसुतीशास्त्राचे शिक्षण घेऊन आलेल्या या मुलीने कोल्हापूरच्या इ.इ हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम केले.

कृष्णाबाईचा आदर्श ठेवणाऱ्या काशीताई नवरंगे यांनी हि वैद्यकीय व्यवसाय केला.तो केवळ चरितार्थासाठी न करता सेवा म्हणून केला.त्या काळात विधवा पुनर्विवाह करणारे प्रार्थनासमाजाचे सदस्य वासुदेव नवरंगे यांची ती कन्या.वैद्यकीय व्यवसायाबरोबर स्त्रियांची आरोग्यविषयक जागृती करण्याचे काम त्यांनी आपल्या लेखनातून केले.विस्मृतीचीत्रातील बहुतेक स्त्रिया शहाणे करून सोडावे सकलजन या बाण्याने लेखन करताना दिसतात.जस्टीस ऑफ पीस हा सन्मान मिळवणाऱ्या काशीताई प्रार्थना समाजातर्फे चालविल्या जाणारया पंढरपुरच्या आनाथआश्रमातील मुलांच्या आई बनल्या.गर्भवती स्त्रिया व मुलांचे कुपोषण थांबावे म्हणून मोफत दूधवाटप,मोफत गर्भवती चिकित्सालय,परीचारीकांकारीता शिष्यवृत्ती असे अनेक उपक्रम केले.बिहार भूकंपाचे वेळीही त्या डॉकटर व परीचारीकांचे पथक घेऊन गेल्या

कृष्णाबाई आणि काशीताई यांच्या विकासात पुरोगामी माहेराचा वाटा होता.केशवसुतांची मानलेली बहिण काशीताई हेर्लेकर याना मात्र पुरोगामी आईवडील मिळूनही संशयी आणि कमी बुद्धीच्या पतीमुळे प्रतिकूल परिस्थितीस तोंड द्यावे लागले.परंतु लेखिकेच्या मतानुसार चौकट स्वीकारून ती लवचिक करीत पुढे जाण्यासाठी लागणारे धैर्य त्यांच्याकडे होते.आणि संसाराच्या प्रतिकुलतेबरोबर,संसाराच्या विसंगतीबरोबर त्यांचे व्यक्तिमत्व धीरोदात्त होत गेले.म्हणून र.धो.कर्व्यांच्या 'संततीनियमन विचार वं आचार' या त्या काळात खळबळ उडविणार्या पुस्तकावर त्या अनुकूल प्रतिक्रिया देऊ देतात.विचारशील मातृत्व हे स्त्रियांच्या शिक्षणा चे व जन्माचे सार्थक होय असे मत व्यक्त करतात.

या सर्व स्त्रियांच्या कार्यात सतत अडथळे आणण्याचे खलनायकी काम कोणा व्यक्तीचे म्हणण्यापेक्षा तत्कालीन ताठर समाज व्यवस्थेचे असे म्हणता येईल या विस्मृती चित्रातून १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून २० व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या समाजाचे दर्शन होते.सुधारकांचे कार्य हळूहळू झिरपत होते.हे विविध स्त्रियांच्या जीवनावरून दिसते.

वेणूताई जोशी बालविधवा झाल्या तेंव्हा आगरकरांसारख्या सुधारक भावाला तिला शिकावावे हे पटविण्यास त्रास पडला.परंतु नंतरच्या काळात वेणूताईची चुलत बहिण मनुताई बापट विधवा झाल्यावर घरच्या लोकांनीच त्याना पुण्यातील हुजुरपागेत पाठविले.
लग्नाचे वय ओलाडल्यावारही कुमारिका राहिलेल्या नमुताई जोशीवर टीका करणार्या त्याच समाजानी त्या परदेशातून डॉकटर होऊन आल्यावर आनंदोत्सव साजरे केले.
व्यक्तिगत जीवनातील विकासाबाबाहि हेच म्हणता येईल मासिकपाळी च्या काळात अंकगणिताची परीक्षा आल्यावर लक्ष्मिबाई वैद्यांनी पुस्तकाची शिवण उसवून पुस्तक वापरले.त्याच लक्ष्मिबाई नी सोवळेओवळे स्पृश्यास्पृश्याता हे सर्व मागे टाकले माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याइतका विचारांचा पल्ला गाठला.

यासर्व स्त्रियांनी शिकून मुली स्वैराचारीणी होतात हि समजूत खोटी करून दाखवली.अर्थात सर्व महाराष्ट्रात या सुधारणा एकाच गतीने झाल्या नाहीत.या काळातील सर्व सुधारणाचे केंद्र पुणे वं मुंबई होते.सुधारकांची ती कर्मभूमी होती.परदेशगमन,घटस्फोट,पुनर्विवाह,स्त्रियांचा सार्वजनिक जीवनातील प्रवेश या सर्वांची सुरुवात येथेच झाली.येथे रुजलेला स्फुल्लिंग या स्त्रियांनी नाशिक,अमरावती,रत्नागिरी असा जातील तेथे पसरविला.

याशिवाय सुधारकांच्या,नेत्याच्या कार्याची मर्यादा स्वत:च्या प्रान्तापुरती मर्यादित नव्हती.मुंबई,कलकत्ता,मद्रास येथील विविध नेत्यांचा परस्पर संबंध असे.उदाहरणार्थ परदेशातून उच्च्य शिक्षण घेऊन आलेल्या पी.के.रॉय कमला राव यांचा हात धरून सार्वजनिक जीवनात प्रवेश करणारया बंगालच्या सरलादेवी रॉय आपल्यातल्याचा वाटतात.महाराष्ट्राशी त्या अधिक जोडल्या गेल्या ते नां.गोपाळकृष्ण गोखलेमुळे.गोपालकृष्ण गोखले मेमोरियल स्कूलची त्यांनी स्थापना केली.सरलादेविनी उभारलेल्या या स्मारकाविषयी लेखिका म्हणते,'स्त्रीपुरुष भेद ओलांडून गेलेल्या एका सर्जक,आश्वासक आणि शक्तिवर्धक मैत्रीचे ते स्मारक आहे. अशी स्मारके फार दुर्मिळ असतात.
या सर्व स्त्रियांपेक्षा वेगळी पार्श्वभूमी असलेल्या मेरी काजटर ,मनोरमा मेधानि याही विस्मृती चित्रात हजेरी लावतात.आपला देश दुसरा देश,आपला धर्म दुसरा धर्म अशा कल्पना न मांनता सर्व मानवजातीला कवेत घेणारा मानवतावाद पाळणार्या या दोघी होत्या.भारतात चाललीच आहेस तर पलेसटाइनला जाऊन ये हे स्नेह्याचे म्हणणे धुडकाउन लाऊन स्त्री शिक्षण हेच ध्येय मानून कार्य करणार्या मेरी,आणि इंग्लंडमध्ये ख्रिस्चन सन्यासीणी मध्ये बालपण गेलेली पंडीता रमाबाइची कन्या मनोरमा मेधानी यांचा स्त्रिशिक्षणातील वाटा विसरून कसा चालेल?
या सर्व स्त्रियाबरोबर त्यांच्या आजूबाजूच्या अनेक व्यक्तीरेखा मनात ठसून जातात.उदा.९ वर्षांच्या काशिताइला शिक्षण दिले म्हणून तिच्या अन्नात काचा कुटून घातल्या व तिचा क्रूर बळी घेतला गेला.तरीही दुसर्या मुलीला शिक्षण देणारे विश्रांम रामजी..विस्तार भयास्तव येथेच थांबावे लागेल
पुस्तकातील या स्त्रियांची दुर्मिळ चित्रे,परीशिष्ठातील या स्त्रियांच्या विविध नातेवाईकानी,स्नेह्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया,संदर्भग्रंथ यादीतून जाणवणारे लेखिकेचे कष्ट या सर्वासाठी मुळातून पुस्तक पहावे लागेल ,वाचावे लागेल.
जिला हे पुस्तक अर्पण केले आहे ती असंख्य शोधप्रकल्पाना जन्म देण्याची क्षमता असलेली लेखिकेची समृद्ध ग्रंथ शाळा तिला अधिकाधिक संशोधन करण्यास प्रवृत्त करो हि सदिच्छा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद शोभनाताई!
तुमच्या या लेखामुळे हे पुस्तक वाचायलाच हवे असे वाटतेय! Happy
विस्तारही आवडला असता वाचायला! Happy

काय सुंदर ओळख करुन दिलेली आहे. या सर्व तेजस्वी अग्निशलाकांना तसेच त्यांना मदत करणार्‍या अन्य समाजसुधारकांना नम्र अभिवादन. यांच्यामुळे समाजात कासवाच्या गतीने का होइना बदल घडत गेले.