वीकेन्ड

Submitted by ट्युलिप on 10 May, 2009 - 16:03

स्वतःच्याच तंद्रीत भरभर पावलं टाकत पुढे गेलेल्या त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात ती हसली. चालण्याचा वेग वाढला की ह्याचा एक खांदा नेहमीच किंचितसा वर उचलला जातो.
तिच्या नजरेच्या सरळ टप्प्यात त्याची उंच पाठ दिसत होती.
आपण चालायचा वेग वाढवला नाहीतर लवकरच हरवून नाहीसा होणार हा.
वेगात चालत अजूनच दूर जात चाललेल्या त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात असताना तिच्या मनात उगीचच आपण मुद्दाम अजून हळू चालावं असा एक खोडसाळ विचार डोकावला. बोलताना मधेच रिकामा पॉज काय आला दोघेही विचारात गुंतलो आणि गेला की हा तंद्रीत पुढे निघून.
आपण बरोबर आहोत ह्याचे भान विसरुन. नेहमीप्रमाणेच.
रस्त्यावरच्या इतर अनोळखी चेहरे आणि पाठींची गर्दी दोघांच्या मधे आता वाढायला लागली आणि तिने चक्क कंटाळा केला त्याला भरभर पावलं उचलत गाठायचा किंवा हाका मारून थांबवायचा.
ती होती तिथेच रेंगाळली. रस्ता संध्याकाळच्या सोनेरी उन्हाने न्हाऊन निघाला होता. आत्तापर्यंत त्याच्याशीच बोलण्यात गुंतून गेल्यामुळे आजूबाजूला लक्ष गेलं नव्हतं.
छान रंगिबेरंगी होतं की आजूबाजूला!

शॉप डिस्प्ले मधल्या त्या अप्रतिम निळ्या लेदरच्या शू पेअरकडे नजर गेली आणि तिचा श्वासच रोखला गेला. अगदी हाच रंग हवा होता किती दिवस. अभावितपणे त्याचा हात धरुन दाखवायला ती मागे वळली आणि तो नाही हे तिच्या लक्षात आलं.
ती काही क्षण थबकली.
पण आता तो खूपच दूर गेलाय. हाक सुद्धा ऐकू जाणार नाही असा विचार करत ती खांदे उडवत दुकानात शिरली. त्याच्या जेव्हा लक्षात येईल आपण बरोबर नाही किंवा मागेही नाही तेव्हा वळेल आणि येईल परत. किंवा थांबेल वाट पहात. अस्वस्थपणे तिची वाट पहात रस्त्याच्या कडेला उभा राहीलेला तो डोळ्यांपुढे दिसल्यावर ती जरा खुशच झाली.

पंधरा मिनिटांनी दुकानातून बाहेर पडल्यावर तो परत आला नाही अजून हे तिला जाणवलं.
कुठपर्यंत पोचला असेल हा? आपण मागोमाग येत नाही हे त्याच्या अजून लक्षातच आलं नसेल कां? शक्यता आहे.
त्याच्या त्या एकाग्र विचारातल्या मन:स्थितीत आपण प्रत्येक पावलागणिक तिच्यापासून जास्तच लांब जात चाललो आहोत हे त्याच्या लक्षातही न येणं अगदी शक्य आहे.
किंवा कदाचित तो रस्त्याच्या कडेच्या एखाद्या कॅफेमधे तिची वाट पहात बसला असेल. तसंच असेल. मगाशी ते जात होते त्याच दिशेला बाजूला नजर टाकत ती जायला लागली.
तिच्यासारखाच एखाद्या दुकानात तर शिरला नसेल काही घ्यायला? तिने ती शक्यता अगदीच झटकून टाकली. त्याला शॉपिंग हा प्रकार अजिबातच आवडत नव्हता. तिच्यावाचून तर नाहीच.
कुठे गेला असेल हा? चालायला बाहेर पडले तेव्हा कुठे खास ठिकाणी जायचं असं काही ठरवून ते निघाले नव्हते.
ह्या शहरात वीकेन्ड घालवायला म्हणून ते आले होते. किती दिवस ऐकून होते दोघेही या सुंदर शहराबद्दल. आज सकाळी लवकरच्या ट्रेनने ते इथे पोचले तेव्हा रस्त्यांवरचं निळसर पांढरं धुकं अजून पुरतं निवळलही नव्हतं. गप्पा मारत शहरात चिक्कार भटकून झालं. शहराच्या दोघेही प्रेमातच पडले. गेल्या अनेक महिन्यांत निवांतपणा असा नव्हताच. सततची धावपळ, व्यवसायांचा ताण, रुटिनची पुटं हे सगळे थर अलगद धुक्यात विरघळायला लागले.
दुपारी एका उतरतं लाल छप्पर असलेल्या रेस्टॉरन्टमधे ते जेवले आणि परत फिरायला बाहेर पडले. त्यांच्या बॅकपॅकमधे फक्त रात्रीपुरते कपडे होते बाकी काही फापटपसारा अगदी सेलफोनही त्यांनी मुद्दामच घेतला नव्हता. मित्राने रेकमेन्ड केलेल्या कोणत्यातरी हॉटेलात ते संध्याकाळी जाणार होते आणि ते चांगलं वाटलं असतं तर तिथे रहाणार होते.

तो चिडला असेल बहुतेक. तिच्या ह्या अशा मधेच आवडलेल्या दुकानात शिरण्याच्या सवयीवर तो नेहमीच वैतागायचा. रागवून रस्त्याच्या रेलिंगला टेकून उभा राहीलेला तो कुठे दिसतोय का म्हणून तिने दोन्ही बाजूला निट पाहीले.रस्त्याच्या मधोमध थांबून.
नव्हता.

आता मात्र ती चिडली. संताप पोटातून उन्मळून ओठांपर्यंत आला. एक दोन झणझणीत शब्दांवाटे तो बाहेर पडल्यावरही तिला समाधान वाटेना.
आपल्याला रस्त्याच्या मधोमध टाकून गेला हा? ते सुद्धा अशा अनोळखी शहरात? वेल, टु हेल विथ हीम देन. काही गरज नाही त्याला शोधत बसायची. मागच्या खिशात त्याच्या नकळत खुपसून ठेवलेले सिगरेटचे पाकिट उपसून काढत रस्त्याच्या कडेच्या रेलिंगला टेकून उभं रहात तिने भसाभस दोन चार झुरके मारले आणि आता थोडा सुसंगत विचार करता येईल अशा खात्रीने ती रीलॅक्स झाली.
छान गार वारा सुटला होता, ओलसर धुक्याचे पुंजके इथे तिथे लहरत होते आणि पहिल्यांदाच तो आजूबाजूला नाहीये ह्याचं हायसं वाटून तिने हातातली सिगरेट संपवल्यावर शांतपणे दुसरी पेटवली. तो नक्की चिडला असता आत्ता आणि अशा सोनेरी धुकाळ संध्याकाळचा शेवट त्यांच्या भांडणाने झाला असता.

अजून पुष्कळ उजेड होता. शहर अजून खूप पहायचं शिल्लक होतं. चालल्याखेरीज तिचं डोकं शांतही झालं नसतं.
म्युझियम. तिच्या डोक्यात अचानक विचार आला की आता हा नाहीये तर निदान ते बघता तरी येईल निट. तिला सकाळीच ते पहायचं होतं पण त्याने साफ नकार दिला होता. ही हेटेड म्युझियम्स.

पटकन फुटपाथवरुन उतरुन तिने टॅक्सीला हात केला.

पायाचे तुकडे पडेपर्यंत तिने म्युझियम पाहीलं आणि ते बंद व्हायची वेळ आली तेव्हा बाहेर पडली.
पायर्‍या उतरताना तिच्या दोन गोष्टी लक्षात आल्या. चांगलाच अंधार झालाय आणि मित्राने सुचवलेल्या ज्या हॉटेलात ते रहाणार होते त्याच नाव ती साफ विसरलीय. काहीतरी हील की पॅराडाईज होतं शेवटी?
तिने आठवायचा प्रयत्न सोडून दिला. असल्या गोष्टी तिच्या कधीच लक्षात नसायच्या. ते त्याचं काम.

दोन तिन रस्ते पार करत, दुकानदारांना, स्टॉलवाल्यांना विचारत दुपारी ते जेवले त्या चौकापर्यंत ती पोचली. मग तो नाहीसा व्हायच्या आधी ज्या रस्त्यावरुन ते फिरत निघाले होते त्यावरुन ती परत एकदा फिरुन आली.

खूप थकली. भूक लागली आणि डोळे मिटल्यासारखे व्हायला लागले तेव्हा चौकातल्या पोलिसाला विचारुन एका जवळच्याच हॉटेलात शिरली. हॉटेलचं रेस्टॉरन्ट फुल होतं तेव्हा अजून वाट पहायचं नाकारुन क्रेडीट कार्डावर रात्रीसाठी रुम बुक करुन वर गेली. गरम सूप आणि पिझ्झा मागवला.
जेवली आणि इतकी दमलेली होती की सरळ झोपून गेली.

सकाळी जाग येताना पहिला विचार मनात आला की आता ह्याला कसे आणि कुठे शोधायचे? रिसेप्शनला कॉल करुन तिने शहरातल्या हॉटेल्सची नावं असलेली डिरेक्टरी मागवून घेतली. पण त्यातल्या कोणत्याच नावाने काही क्लिक होईना. मित्राला फोन करुन नाव विचारावे कां असा विचार मनात आला आणि तिने तो झटकून टाकला. तो कुठे आहे असं त्याने नक्की विचारलं असतं आणि रस्त्यात हरवला सांगणं फारच खुळचटासारखं वाटलं असतं.

शिवाय तो हरवलाय की ती हेही निटसं क्लिअर नव्हतं अजून तिच्या मनात.
--

रेस्टॉरन्ट अगदी रिकामे होते आत्ता पण ब्रेकफास्ट करायचा अजिबात मूड नव्हता. तेव्हा चेक आउट करायला ती सरळ रिसेप्शनवर गेली. कोणी काही मेसेज सोडून गेलं आहे का विचारण्याचा वेडेपणा तिने मनात नसतानाही केलाच.
बिल खिशात घालताना मात्र तिला जरा टेन्स वाटलं. इतका अजिबात संपर्क नाही म्हणजे काही अपघात वगैरे तर नसेल झाला? नसेलच. नाहीतर रिसेप्शनमधल्या स्थानिक वर्तमानपत्रात तरी ती बातमी पहिल्या पानावर असती.
तो काहीही कारणाने कायमचा सोडून जाऊ शकतो किंवा कदाचित त्याने हे मुद्दामही केलं असेल ही त्याच्या स्वभावाशी पूर्ण विसंगत शक्यता तिला नवीच होती तरी अतर्क्य वाटेना म्हणून मग ती नर्व्हसही झाली.

परतच जावं आता असा विचार रस्त्यावर येईपर्यंत तिने पक्का केला.

स्टेशनचा रस्ता कुठच्या दिशेने आहे ते न विचारताच तिने एक दिशा पक्की केली.
कालच्या रस्त्यांची दिशा कटाक्षाने टाळून.
इतक्यांदा त्यावरुन गेली होती काल ती की आता तो रस्ता मान वळवत भलत्याच दिशेला निघून जाईल परत एकदा त्यावर पाय ठेवला तर.

नवा रस्ता चढावाचा होता आणि आपल्या पोटात काही नाही याची जाणीव तिला थोडंच अंतर चालून गेल्यावर झाली.

कॅफेत बसल्यावर तिने आधी स्टेशन नक्की कोणत्या दिशेला आहे आणि परतीची ट्रेन किती वाजता आहे याची चौकशी केली. सकाळची गाडी निघून गेलीय आणि आता आहे ती संध्याकाळची हे ऐकून ती हताश झाली खरी पण मग एकदम तिच्या मनात आलं की दिवसभरात भेट नाहीच झाली आज, तर संध्याकाळच्या त्यांच्या ठरलेल्या ट्रेनला तो नक्कीच येणार.
त्या विचाराने तिला चांगल उत्साही वाटलं.
उगीच टेन्शन घेतलय आपण सकाळपासून. हा तर साधा संपर्क तुटण्याचा प्रकार. आणि त्या दोघांच्या बाबतीत हे नवं कुठे होतं? कम्युनिकेशन, टच मधे रहाणे वगैरे शब्दांचे अर्थ ते दोघेही आळीपाळीने विसरतच आले होते त्यांच्या नात्यात.
मग आत्ता काय वेगळं झालय?

हात मागे लांबवत तिने एक मोठ्ठा आळस दिला आणि समोरच्या खुर्चीवर आपले पाय टेकवत ती खुशाल मागे रेलून बसली. किती दिवसांनी इतका निवांत वीकेन्ड मिळालाय आणि काय या गोंधळात आपण तो एंजॉय करायचच विसरुन जातोय.

नेहमीसारखा चहा न मागवता तिने त्याच्या आवडीची ( खरं तर तिच्याही) काळी कॉफी मागवली. आणि बोलमधे जास्तीची साखर. तिला चहा अगदी अगोड चालायचा पण कॉफी खूप काळी आणि खूप गोड. खूप म्हणजे खूपच. जास्तीत जास्त कडू आणि जास्तीत जास्त गोड असं तिचं कॉफीचं रसायन त्याला डिस्गस्टींग वाटायचं आणि तिला तो बघत असताना दोन, तिन कधी कधी तर चार सुद्धा एक्स्ट्रा सॅशे मागवताना एम्बरॅसिंग. मग ती चहाच मागवायची.
पण खरं तर काळी आणि कडू कॉफी पिताना तिला खूप विचारी, परिपक्व वाटायचं. जितकी जास्त कडू तितकं जास्त विचारी. फक्त तिला तो कडूपणा गोड करुन प्यायला आवडायचा आणि हे त्याला समजावून सांगणं किती गुंतागुंतीच होतं! म्हणजे काहीजणं ऑपेराला जातात आणि मग तिथे झोपून जातात किंवा क्लासिक्सच्या पायरेटेड, पेपर बॅक आवृत्त्या वाचतानाही खुश वाटून घेतात तसं काहीसं आपलं कॉफीबाबत होतय हा तिला संशय होता. एक्स्पिरियन्स मॅटर्स, इव्हन इफ यू डोन्ट एन्जॉय इट.
आपल्याला तसं वाटायला नकोय हे ती मनात म्हणत असताना तो त्याच्या त्या एकाग्र नजरेने तिच्या जास्तीतजास्त कडू आणि जास्तीतजास्त गोड कॉफी पिण्याकडे बघायला लागला की त्याला ते कळत का नाहीये हा तिला राग.
त्याला काही कळू नये असं नाहीच फक्त तिने न सांगता त्याने ते कळवून घ्यावं या तिच्या मनातल्या अनेक अस्वस्थ आग्रहातलाच हा एक.
मग हे सगळं टाळायला शेवटी चहाच.

आत्ता दाट, काळ्या कॉफीच्या मगात साखरेचा तिसरा चमचा घालून ढवळताना तिला वाटलं एकदा त्याला सांगून टाकायलाच हवा तिच्या डोक्यातला हाही गुंता. सोपं होऊन जाईल कदाचित. जसं अगदी सुरुवातीला नाही कां विचित्रपणे अंगाखाली हात घेऊन वेडवाकडं झोपण्याच्या तिच्या सवयीबद्दल तो काय म्हणेल या धास्तीने ती त्याच्याबरोबर झोपायलाच नको नको करायची? आपण अगदी डीफॉर्म्ड दिसतो तसं झोपलं असताना ह्याची तिला इतकी खात्री होती की चुकून झोप लागून गेली प्रेम करुन झाल्यानंतर तर? ही काळजीच तिच्या डोक्यात. म्हणजे झोपेत काय जागेपणीही आपण स्टायलिश दिसायला पाहिजे असा तिचा आग्रह नव्हता कधी, तरी इतर मुली सेक्सी वगैरे दिसतात झोपल्या असताना आपण निदान नॉर्मल तरी दिसायला हवं इतकंच. लग्न झालं नाहीये तर एकत्र वगैरे काही नको रहायला असा तिने हट्टच केला. त्याने मानला मुकाट पण तरी एका पावसाळी दुपारी त्याच्या शेजारी नंतर झोप लागून गेलीच. त्यानंतरचा बराच काळ जाग आल्यावर दचकून अंगाखालचा हात काढून निट सरळ बिरळ होऊन झोपायची ती. पुढे समजलं कधीतरी की तिचं तसं झोपणं त्याला तिच्या इतर सगळ्याच गोष्टीप्रमाणे वेगळच वाटलं विचित्र नाही. ते कळेपर्यंत त्याच्या काही वाटण्या न वाटण्याचं मनातलं टेन्शन ती विसरुनही गेली होती.

सहज समजून घेणं त्याला कठीण वाटत नाही हा त्यावरचा निष्कर्श मनात यायला मात्र ही आत्ताची अनोळखी शहरातली तो हरवून गेल्यानंतरच्या सकाळची वेळ यावी लागली!
उशिरच म्हणायचा हा की केवळ वेळ यावी लागते हेच म्हणून टाकायच परत? तिला ठरवता आलं नाही.

बाहेर खूपच ढगाळ होतं आणि आकाश राखाडी मळकट दिसत होतं.

कॉफीच्या कडू गोड घोटा दरम्यान मग तिच्या मनात येत गेलं की काय करत असेल तो आत्ता?
त्याच्या आवडत्या ढगाळ हवेत एंजॉय करत फिरण्याऐवजी भटकत असेल तिला शोधत काळजी वाटून इकडे तिकडे? तिला थोडं गिल्टी वाटलं पण या हवेत त्याचा मूड फार काळ उदास रहायचा नाही तिला माहित होतं.
ती समोरच्या खुर्चीवरचे पाय खाली घेत सरळ बसली.
अशा हवेत तिला अंगाचं मुटकुळ करुन फक्त झोपावसं वाटे. किंवा पुस्तक वाचत बसावसं, कधी त्याची गाणी ऐकावसं. अर्थात वीकेन्डला अशी हवा पडली की तो तिला हमखास बाहेरच ओढून नेई आणि लांब लांब फिरत जाण्याच्या नादात ती गाण्याबिण्याचं विसरुन जाई.
किंवा हवा ढगाळ झाली की मग तिला तो सिनेमांच्या स्टोर्‍या ऐकवी. अगदी सविस्तर संवादांमधल्या पॉजेससहीत सांगायचा तो ते तिला आवडायचं. पण मग त्याची बोलण्याची गाडी तार्कोस्कीवर गेली की ती कंटाळून मुद्दाम लव्ह स्टोर्‍या ऐकायचा आग्रह धरायची. तो गोंधळूनच जायचा. त्याला काही त्या आठवायच्या नाहीत बहुतेक आणि मग प्रेम आणि नाती यात गल्लत करत हमखास तो बर्गमनवर यायचा. आयुष्य बर्गमन फिल्म्स सारखीच असतात बहुतेक असं वाटून ती नंतर बराच वेळ उदास गप्प रहायची. गुंतागुंत नसणारी (आणि म्हणूनच) आनंदी, सुखी असणार्‍या नात्यांची आयुष्य याच्या आवडत्या सिनेमांतूनही कशी दिसत नाहीत हा विचार ती पुढचा सगळा वेळ करत रहायची.
मग फिरणं थांबवत मधेच झाडाखालची पाच फुलपाखरांची सलग उडणारी माळ पहाण्याचा (त्याच्या मते) बालिश हट्ट तिने त्यानंतर केला की तो मानायचा(ती गप्प झाल्यावर?)काहीच न बोलता.
रिकाम्या पोकळ्यांची भिती त्यालाही भेडसावत असणार बहुतेक.

काल कोणत्या विषयावर बोलत होते ते नक्की ..
चालत असताना तिने आठवायचा प्रयत्न करुन पाहीला पण काहीच आठवेना. हरवण्याआधीचा यावेळचा रिकामा पॉज जास्तच मोठा होता का? तुटून अलग होण्याची प्रक्रिया ती त्या दुकानात शिरायचा खूप आधीपासून सुरु झाली असणार.
खूप आठवायचा प्रयत्न करुनही त्या रिकाम्या पोकळीच्या आसपासच ती भिरभिरत राहिली.आणि मग तिला त्यांच्यात काय बोलणं चाललं होतं हे आठवून पहाणं महत्वाच वाटेना. परत भेटल्यावर तुटला होता तिथून संवाद सुरु व्हायला शेवटच्या शब्दाच्या जोडणीची काहीच आवश्यकता नव्हती त्यांना.

लांबलचक रस्त्यांवरुन फिरत रहाताना ते दोघे ज्या विषयांवर बोलत रहायचे ते विषय कधीच महत्वाचे नव्हते बहुतेक.
त्याच्याशी बोलत रहाताना तिचा आतमधल्या स्वतःशी जो संवाद सुरु व्हायचा तो महत्वाचा. भलेही ती त्याला तेव्हा रिकामे पॉजेस म्हणत असेल.
नात्यांमधले नकळत्या अज्ञानाचे प्रदेश किती विस्तीर्ण असतात.
ते चालून पार करत इथपर्यंत पोचायला इतका वेळ जावा लागला.

मग त्यांच्यातल्या सार्‍याच संवादांमधल्या असंख्य तुटक ठिपक्यांची रेष सांधत सलग रेषेत उडत रहाणारी ती जुनी फुलपाखरं या ढगाळ हवेत नव्याने शोधून काढायला ती कॅफेबाहेर पडली.

बराच वेळ उलटून गेला.
पावसाळा नसूनही हिरवागार होता रस्ता. त्यावरुन निरुद्देश एकटं भटकताना तिला अजिबात कंटाळल्यासारखं झालं नाही. कंटाळा आलाच तेव्हा तिने तो खुशाल अंगावर पांघरला आणि मोकळ्या आभाळाखालच्या गवतावर झोपून गेली.
जाग आली तेव्हा दुपार संपत आली होती.

रस्त्याचा शेवटचा चढाव चढून जाताना तिला आता स्टेशनचा रस्ता समोर दिसायला लागला.
वीकेन्ड संपला त्याच्याशिवायच.
चढावावर उभं राहील्यावर खाली एक तिरपं वळण घेऊन पुढे जाणारा तो कालचा रस्ता पहाताना त्यावर तो मागे काहीतरी सांडून पुढे जात चाललाय आणि आपण त्याच्या मागून जात ते गोळा करुन ठेवतोय हरवून जायच्या भितीने असा काहीतरीच भास तिला झाला.
त्या चढावावरुन त्याला एक आर्त हाक मारावीशी वाटली आणि तिला आश्चर्य वाटलं.
एकमेकांवाचून कित्येक वीकेन्ड दोघांनी वेगवेगळे घालवले होते. कधी कंटाळुन, बरेचदा मजेत.
जीव तुटेपर्यंत केलेल्या भांडणांनंतरच्या वीकेन्ड्सना तर एकमेकांचं अस्तित्वही अमान्य करत स्वतंत्रपणे.
पण मग हे वेगळं का होतं?
की स्वतंत्रपणे म्हणता म्हणता कायम एकमेकांबद्दलच्या अपेक्षांची, पुर्‍या न झालेल्या मागण्यांची, नकारांची, आनंदी होण्याच्या, दिलेल्या होकारांच्या अशा सगळ्या ओझ्याची नाळ कायम जोडूनच होती दोघांना त्या सार्‍या वेगवेगळ्या आणि एकत्र घालवलेल्या वीकेन्ड्सला?
आज हरवून गेलय ते त्यापैकीच एक किंवा सारंच.
मग राहिलय ते काय आहे?
की दोघांमधला तुटलेला संपर्क अजून एक पोकळी निर्माण करतोय.आणि संपर्कांपलीकडचाही तो उरलाय त्या पोकळीत.

चढाव कधीच आवडले नव्हते तिला. एकदम गळून गेल्यासारखं वाटायला लागलं. सांगायलाच पाहीजे त्याला भेटल्यावर की नेहमी चढाव टाळून लांबच्या असेना का पण सपाट रस्त्यावरुन चालायचा आग्रह धरणारी ती आ़ज तो नाहीये तरी इतका चढाव चढून आलीय.

याच शहराच्या एका भागात तो आहे आणि जवळच कदाचित विरुद्ध बाजूलाही, पण त्याच शहरात ती आहे. दोघेही आपापल्या पावलांनी रस्ते धुंडाळताहेत. आणि आज संध्याकाळी स्टेशनवर नक्कीच भेटणार आहेत ते. भेटल्यावर कितीतरी असेल आज तिच्याकडे त्याला सांगायला.

दुपार उलटून जाताना आकाश अगदी काळ दिसायला लागलं. पाऊस सुरु होणार ही वाट उतरुन आपण स्टेशनवर पोचेपर्यंत. ती जराशी धावतच रस्ता उतरायला लागली. उतरताना तिला स्टेशनवर शेडखाली चिंब भिजलेला तो तिची वाट पहात असल्यासारखा समोर दिसायला लागला. कोसळणार्‍या सलग धारांच्या मागून तिच्याकडे पहाणारा.
एकमेकांसमोर बसून आपापल्या विचारांच्या तंद्रीत रमून जाण्याच्या त्या त्या वेळी अवघड आणि नकोशा वाटलेल्या वेळा अनेक आल्या आत्तापर्यंत. आज त्यांचा अर्थ असणार आहे तिच्याजवळ त्याला सांगायला.

कसा घालवलास वीकेन्ड? विचारायचं का त्याला?
कदाचित नाही विचारणार कुणी आणि सांगणारही नाही.

फक्त तो यायला हवा.

बंद मुठीतल्या लोलकासारखा हा वीकेन्ड. हरवायची भिती वाटलीच कधी तरी तळहाताच्या स्पर्शातून ओळखून काढता येऊ शकणारा.
पुन्हा पुन्हा यावा आणि हरवून टाकावं त्याने दोघांनाही वाटेवरुन.

तिला त्यांची स्टेशनवरची भेट डोळ्यापुढे आणताना उगीच रोमॅन्टिक वाटलं.
त्यानेच सांगितलेल्या कॅसाब्लान्का मधल्यासारखं कदाचित.
फक्त रिव्हर्स.
दे वुड नेव्हर हॅव पॅरिस.

गुलमोहर: 

छान...

आहेच का क्रमशःचं शेपूट मागे?

ट्युलीप,
मस्त गं , आवडली.
मला तुझी लिहीण्याची स्टाईल फार आवडते. संपुर्ण प्रसंग, ठिकाण जशेच्या तसे डोळ्यासमोर उभे रहाते आणि ते देखिल नयिकेच्या नजरेतून. म्हणजे वाचतांना आपणच नायिका आहोत असे समजुन कथा वाचली जाते आणि माझ्यामते ते खुप मोठे तूझे सक्सेस आहे.

तुझी कथा वाचतांना पुस्तक वाचतांना मिळणारी अनुभुती(आनंद) आणि प्रत्यक्ष एखादा चित्रपट बघतांना मिळणारी अनुभुती (आनंद) असे दोन्ही एकत्र मिळते, तुझी कथा अथवा ललीत म्हणजे ह्या दोन्हीचा सुरेख संगम असतो. Happy

मस्त आहे.. पुढच्या भागाची खुप वाट बघते आहे.
----------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

मस्त सुरुवात.

छान आहे. नविन भाग केव्हा?????

एवढी मस्त कथा वाचुन खूप छान वाटत असतांनाच मध्येच क्रमशःची पाटी दिसल्यामुळे फार म्हणजे फार म्हणजे फारच चिडचिड झाली. (माझी चिडचिड is directly proportional to कथा आवडण्याचे प्रमाण).

मस्त सुरुवात. लवकर लिही गं.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.....! Happy

>>>एवढी मस्त कथा वाचुन खूप छान वाटत असतांनाच मध्येच क्रमशःची पाटी दिसल्यामुळे फार म्हणजे फार म्हणजे फारच चिडचिड झाली.

बघ की. आता दुकान बंद करुन ट्यु काही काळाकरता गायब होईल.
लवकर लिही. नाहीतर अर्धवट गोष्टी लिहिणार्‍यांच्या यादीत तुझं नाव ३ किंवा ४ थ्या क्रमांकावर येईल. Wink

छान सुरुवात. पुढला भाग लवकर टाकणे Happy

तिच्या ह्या अशा मधेच आवडलेल्या दुकानात शिरण्याच्या सवयीवर तो नेहमीच वैतागायचा. >>> हे आवडलं Happy

लिहीण्याची स्टाईल आणि गोष्टीतले बारकावे रंगवण्याची हातोटी, दोन्ही आवडले.
आणि कथा तर आवडलीच.

पहिला भाग वाचून (क्रमशः इरिटेट झाल्याच्या : P ) प्रतिक्रिया देणार्‍या आणि दुसर्‍या भागाची वाट पहाणार्‍या आणि तो वाचायला पेशन्स ठेवून येणार्‍या अशा सार्‍यांचे आभार. कथा खूपच पसरट झालीय याची कल्पना आहे. पण एडिट करायला नाही जमलं निट.
धन्यवाद!

मस्तच ग ट्युलीप. आवडली कथा. तुझी लिखाणाची हातोटी मस्तच आहे. Happy
संपूर्ण टाकल्याबद्दल धन्यवाद.

ट्यू, मस्त. Happy

>> त्याच्याशी बोलत रहाताना तिचा आतमधल्या स्वतःशी जो संवाद सुरु व्हायचा तो महत्वाचा. भलेही ती त्याला तेव्हा रिकामे पॉजेस म्हणत असेल.

आणि मग एका वळणावर कळून चुकेल की त्या रिकाम्या पॉजेसचंच नातं सगळ्यात घट्ट बांधून आहे त्यांना. Happy

>> इतक्यांदा त्यावरुन गेली होती काल ती की आता तो रस्ता मान वळवत भलत्याच दिशेला निघून जाईल परत एकदा त्यावर पाय ठेवला तर.
>> मग त्यांच्यातल्या सार्‍याच संवादांमधल्या असंख्य तुटक ठिपक्यांची रेष सांधत सलग रेषेत उडत रहाणारी ती जुनी फुलपाखरं या ढगाळ हवेत नव्याने शोधून काढायला ती कॅफेबाहेर पडली.

खास ट्युलिप टच्. Happy

कथा आवडली. आणि पसरट वगैरे काही वाटली नाही. पण एकत्रित वाचायला जास्त मजा आली असती.

मलाही पसरट वाटली नाही पण चिनूक्सशी सहमत. कथा सलग आली नाही की सगळी लिंक आणि इंटरेस्टही तुटतो.
स्वातीशीही सहमत की कथेत भरपूर ट्यु टच आहेत.

BTW 'चढाव' शब्द खटकला मला. 'चढ' हवं तिथे. हिंदीत 'उतार-चढाव' म्हणतात, मराठीत 'चढाव'चा अर्थ विशिष्ट प्रकारची पादत्राणे असा होतो ना?

छान ... अत्यंत सुन्दर!आत्ता कुठे उकलतय म्हणताना नातं संपू नये ह्याची ओढ!

>>>नात्यांमधले नकळत्या अज्ञानाचे प्रदेश किती विस्तीर्ण असत>>><< सह्हीच!

नात्यांमधले नकळत्या अज्ञानाचे प्रदेश किती विस्तीर्ण असतात. >>
अगदी अगदी!!
असं तपशीलात अन इतकं वेगवेगळ्या अँगलने विश्लेषण 'तो' कधी करतो का Happy

खासच!
ट्यु ....मस्त जमलय !
Happy

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

खुप आवडली.
--------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

खुप आवडली...... शब्द न शब्द छान आलाय्..पसरट वैगरे नाहीये.... उलट असं ऐसपैस लिहिल्यामुळेच छान वाटतेय.

आवडली. फक्त तो यायला हवा >> वर सगळ्यांनी लिहीलय ते सर्व आणि हे ही.

खूप आवडली. एकत्र वाचली असती तर अजून मजा आली असती. Happy

कुठ्ल्याही कथेत क्रमशः वाचलंच की हिरमोड होतोच... पण ही कथा अगदी हलकेच मनात उतरत गेली. डोळ्यासमोर पूर्ण चित्र उभं राहतं.
--------------
नंदिनी
--------------

Pages