बरसुनी आले रंग सह्याद्रीचे ....

Submitted by रोहित ..एक मावळा on 7 December, 2012 - 05:29

चिंब भिजलेले ...रुप सजलेले...
बरसुनी आले रंग सह्याद्रीचे .....

नुसत पाऊस म्हंटल की... मन कस मोरावानी थुईथुई नाचायला लागत ना ...
पावसात चिंब भिजल्यावर पाऊस कसा रोमारोमात भिनतो ना... खर म्हणजे तो कैफ वेगळाच असतो ..
घराच्या खिडकीत उभे राहुन गरमागरम चहाचा आस्वाद घेत पावसाचा आनंद तर सगळेच घेतात.पण खरा पाऊस प्यायचा असेल तर तो चहाच्या बशीत नाही तर निसर्गाच्या सानिध्यात.. सह्याद्रीच्या कुशीत .... अन ही नशाच आपल्याला सहयाद्रीकडे ओढुन घेऊन जाते.

नाणेघाटाच्या वेळी पावसाने टांग मारली होती. नंतर महिनाभर कुठेही ट्रेक झाला नव्हता.जुलै महिन्यात मायबोलीकरांसोबत वर्षाविहार केला.ज्येष्टात रुसलेल्या पावसाने आषाढ चांगलाच गाजवला होता.अन बरेच दिवस माझ्या सख्याला म्हणजे सह्याद्रीला भेटलो नव्हतो.त्याच्या भेटीसाठी मन आतुर झाले होते.झिम्माड पावसामुळे सह्याद्रीने आपल रुपड पालटल होत. आषाढात जसे वारकरी पांडुरंगाच्या वारीला जातात.तसेच पावसाळ्यात प्रत्येक ट्रेकरला सह्याद्रीवारीची आस लागलेली असते.

या वेळी श्रावणाचा नुर काही औरच होता. गेली दोन वर्षे ज्या ट्रेकने हुलकावणी दिली होती.त्याची आयतीच संधी चालुन आली होती.जस हरिश्चंद्रगड म्हणजे प्रत्येक भटक्यांची पंढरी तस भटक्यांची काशी म्हणजे भिमाशंकर म्हंटल तर वावग ठरणार नाही.

भिमाशंकर ... बारा ज्योतिर्लिंगापैकी एक .... भिमा नदीच उगमस्थान.. उडणार्‍या खारींसाठी म्हणजे शेकरुसाठी प्रसिद्ध असलेले ...निसर्गसंपत्तीने नटलेल घनदाट अभयारण्य ...अन पावसाळ्यातल ढगांच माहेरघर जणु..
अशा या सह्यशिखरावर जाण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत.गणेश घाट,शिडी घाट,आहुपे घाट तसेच भीमाशंकरला वर गावापर्यंत रस्ता बांधलेला आहे. या साठी मुंबई अथवा पुणे येथुन, तळेगाव - चाकण - घोडेगाव मार्गे भीमाशंकरला जाता येते.
" ऑफबिट सह्याद्री " ... आडवाटांनी दुर्गभ्रमंती करणार्‍या मायबोलीकर सुन्याच्या या ग्रुपबरोबर ट्रेक करण्याची हि पहिलीच खेप होती.साधारणतः भाविक अन भटके गणेशघाट किंवा शिडी घाटाने चढाई करतात.पण ऑफबिटवाल्यांनी आपल्या नावाला जागुन भिमाशंकरला जाण्यासाठी वेगळी वाट निवडली होती. वाजंत्री घाट ... नाव जरा वेगळच आहे ना .. पण या वाटेची तीच तर खरी गंमत आहे.
सोमवारी १५ ऑगस्ट असल्याकारणाने रविवार- सोमवार अशी सलग सुट्टी जोडुन आली होती.नारळी पुनवेचा यथासांग आस्वाद घेऊन बहिणीकडुन हातात राखी बांधुन घेतली अन आम्ही मोहिमेसाठी सज्ज झालो.इंद्रा,गिरि,सुन्या व सौ सुन्या असे मायबोलीचे शिलेदार ,माझा मित्र सुधिर,विकास अन माझा चुलतभाऊ अधिक सोबतीला होते.दुसर्‍या दिवशी श्रावणी सोमवार असल्याने गर्दी खुप असणार असा मनाशी कयास करुन आम्ही रविवारी ८ वाजता कर्जतला दाखल झालो.जवळ-जवळ २५-३० जणांचा आमचा ऑफबिट ग्रुप कर्जत स्टेशनच्या पुर्वेला असलेल्या एस.टी स्टँडला खांडस मार्गे जामरुखला जाणारी एस.टी पकडण्यासाठी रवाना झाला.पण एस.टी स्टँड वरील गर्दी पाहुन आम्ही यष्टीचीत झालो.मग कर्जतच्या पश्चिमेला असलेल्या टमटमवाल्यांकडे आम्ही मोर्चा वळविला.डुक्करगाडीतुन आमची सफर सुरु झाली.
पावसामुळे आजुबाजुच सगळ कस हिरव हिरव झाल होत.त्यातुन जाणार्‍या ओल्याचिंब डांबरी रस्त्याने मजल दरमजल करत तासाभरानंतर आम्ही जामरूख मधील कामथ पाडयात येऊन पोहचलो.पावसाची रिमझिम चालु होती.येथुन पेठचा किल्ला अन भिमाशंकरचा द्वारपाल पदरगडचे दर्शन झाले.कौलारु घर ...हिरवेगार शेत अन समोर ढगांत हरवलेली सह्याद्रीची रांग पाहुन मन हरखुन गेले.

हिरवी शेत फुलुन आली होती.शेतकरीदादा लय खुशीत दिसत होता.

ऑफबिटचे ट्रेक लिडर प्रिती पटेल,सुन्या,राजस,विशाल,परब अन बाकीचे आम्ही भटके यांची ओळखपरेड झाली.पोहे अन चहाची पोटात रवानगी करण्यात आली.ट्रेकचा बिगुल वाजला.पावश्याच्या रिमझिम संगीताबरोबर आमची वाटचाल सुरु झाली.
गाईडमामा...

सह्याद्रीच्या कुशीत राहायला कुणाला आवडणार नाही ... सांगा बघु ..

गुरांच्या वाटेने पंधरा-वीस मिनिटे चालल्यानंतर हा नजारा समोर आला.
एरव्ही रांगडा,कणखर भासणार्‍या आपल्या सह्याद्रीच रुपड पावसाळ्यातच कस खुलत याचि प्रचिती आली.
सह्याद्रीने हिरवी शाल पांघरली होती.दुधाळ कोसळणार्‍या मोत्यांच्या लटा त्याने परिधान केल्या होत्या.धुक्याच्या दुलईचा जिरेटोप त्याने घातला होता.

थंडगार पाण्याचा ओढा आडवा आला.पायातले शुजसुद्धा त्या पाण्याला रोखु शकले नाहीत. त्या थंडगार जलस्पर्शाने अंगावर रोमांच उभा राहिला.गाईडमामाकडुन कळल की त्यांच्या गावाची हद्द या ओढयापर्यंतच आहे.येथुन पुढला परिसर भिमाशंकर वनविभागाच्या अखत्यारीत येतो.
ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास...

शुजमधले पाणी रिते करून आम्ही गावाची वेस ओलांडली.सह्याद्रीच्या कड्यावरुन कोसळणार्‍या एका अजस्र धबधब्याचे दर्शन आम्हाला झाले. जंगलातल्या राजासारखा म्हणजे सिंहगर्जनेसारखा तो धबधबा रोरावत होता.जणु काय आपणच या घाटाचे राजे आहोत असे आमच्या डोळ्यांना अन कानांना ठासुन सांगत होता.जवळजवळ एक ते दोन कि.मी अंतर असेल त्याच्यात अन आमच्यात...
हो तोच तो ... रणतोंडीचा धबधबा..

पण आम्ही रणतोंडीला उजवीकडे ठेवुन दरीकडे जाणारी वाट पकडली. चढाईला सुरुवात झाली. ग्रुप मोठा असल्याकारणाने आमची वारी हळुहळु पुढे सरकत होती.मध्येच रानफुलांचे अन काही छोट्या प्राण्यांचे दर्शन होत होते.

दोन्ही बाजुला झाडांची दाटीवाटी वाढली होती.वरतुन आभाळ झिरपत होत अन बाजुला दरीतुन वाहणारा खळखळाट होताच.पहिला चढ थोडा दमविणारा होता. पहिल्यांदाच ट्रेकला आलेली एक महिला मात्र त्या चढावर डळमळु लागली.खर म्हणजे तिने जी सॅक आणली होती तिला रशीचे बंद होते.अन अजुन एक पहिलटकर गडयाने आपली हत्यारे टाकली होती.मग काय ऑफबिटच्या एका लिडरला विशालला त्यांना परत न्यावे लागले.
आम्ही मात्र निसर्गाचा आस्वाद घेत मार्गक्रमण करत होतो.दरीच्या माथ्यावरुन कोसळणारे छोटे छोटे धबधबे डोळयात साठवत होतो.

आतापर्यंत याला वाजंत्री घाट का म्हनत्यात याची कल्पना तुम्हाला आली असेलच.ढगांनी त्या दरीत ठाण मांडल होत.चारी बाजुंनी असंख्य जलधारा सह्याद्रीच्या कातळावरुन कोसळत होत्या.जणु काय त्या ढगांनी नळ खुले सोडले होते.

आम्ही एका माचीपर्यंत येऊन पोहोचलो अन येथुन गाईडमामा परत जाणार होता.ऑफबिटवाल्यांनी पायलट ट्रेक केला असल्याने पुढची वाट त्यांना माहित होती.मागे राहिलेल्यांची वाट बघत आम्ही तेथे थोडावेळ थांबलो.आता निसर्गाने आमच्यासाठी खेळ चालु केला होता.मध्येच पावसाचे ढग दरीत यायचे अन धुक्यात पुर्ण दरी हरवुन जायची.जोराचा वारा त्या धुक्याला गदागदा हलवु लागायचा.पावसाचा शिडकाव व्हायचा.धुक बाजुला सरल की धवल रेषा सह्याद्रीवर उमटायच्या.वार्‍याची गाज,धबधब्यांचा आवाज,पावसाच रिमझिम संगित अन सुर आळवायला आम्ही भटके अशी अनोखी मैफल सजली होती.

त्या माचीवरची पुढची वाट जंगलातुन जाणारी होती.उंचच उंच झाडे अन त्या जंगलात पसरलेल धुक..

पंधरा मिनिटे त्या जंगलातुन चालल्यानंतर परत चढण सुरु झाली.पण त्या चढणीवर जात असताना दोन जण मागे राहिलेले आढळले.पाऊस चालुच होता .एओ ... एओ करुन पण काही प्रतिसाद येत नव्हता.मग परत सुन्याची रपेट त्यांना शोधण्यासाठी सुरु झाली.फोटो काढण्याच्या नादात मागे राहिलेले जगदिश ( हे खास गुजरातहुन या ट्रेकसाठी आले होते.पण मराठी छान बोलत होते.) अन अजुन एक ट्रेकगडी त्या जंगलात वाट चुकले होते.शेवटी ते दोघे सुन्याला भेटले.
खालच माचीवरच पठार अन जंगल...

या चढणीवर गवत खुप वाढल होत.
लवलव करी पात... जीव नाही थार्‍याला..
समोरचा नजारा बघुन अशीच आमची अवस्था झाली होती.

एक,दोन,तीन... ते शेवटी अशी गणती वरुन खालपर्यंत झाली.परत आमची सफर सुरु झाली.जसजस वर जात होतो तसतसा पावसाचा जोर वाढला होता.आता तर पायाखालुन सुद्धा पाणी वहात होत.
आता पुढचे पुढे गेले होते अन मागचे मागे राहिले होते.मध्ये गिरी,इंद्रा अन मी ती चढन चढत होतो.वाट पाणाळलेली होती. इतक्यात बाजुला कडकड आवाज झाला. मुख्य वाटेपासुन वीस फुट अंतर असेल तेथे दरड कोसळली.आम्ही जागेवरच स्तब्ध झालो.

नशीब ती दरड खुप लांब कोसळली होती.बराच वेळ चालल्यानंतर एक शिळ कानावर पडली.जी मला प्रबळगडला अन नाणेघाटला सुद्धा ऐकु आली होती.घाटमाथा जवळ आलाय हे ओळखण्याची एक खुण म्हंटल तर वावग ठरणार नाही.हो तो पक्षी त्या दरीत विहार करत होता. पण धुक्यामुळे काय नजरेस पडला नाही.
आम्ही जेव्हा घाटमाथ्यावर पोहोचलो तेव्हा वाटल होत येथुन मस्त नजारा बघायला भेटेल पण कसल काय धुक्यामुळे दहा फुटापुढच काहीच दिसत नव्हत.आम्ही ढगात वावरत होतो.वारा भन्नाट सुटला होता.पावसाचे थेंब अंगाला चांगलेच झोंबत होते.
वाजंत्री घाटातुन वरती आलो की आपण लोणावला-भिमाशंकरच्या पायवाटेला येऊन मिळतो.आता फक्त सरळ चालायच होत.पण धुक्यामुळे आजुबाजुच जास्त काय दिसत नव्हत मग मात्र आम्ही ट्रेकलिडरच्या मागुन चालणच पसंत केल.त्या धुक्यातुन पायपीट केल्यानंतर एक मंदिर दॄष्टीक्षेपात आल.

दर्शन घेऊन आम्ही पुढे कुच केलो.आता सपाटुन भुक लागली होती.आमच्यातले बरेचजण पुढे गेले होते त्यांना गाठुन एका ठिकाणी थांबुन पोटात काहितरी ढकलुया असा प्रस्ताव मांडला गेला.
चालत असताना हे सुंदर दृष्य नजरेस पडल.पावसाचे ढग जणु काय या झाडीत अडकुन पडल्याचा भास झाला.

आम्ही पुढे जाऊन बघतो तर काय ...पावसाची तमा न बाळगता ,एका खडकावर पुढे आलेल्या ट्रेकसवंगडयांनी आपआपल्या शिदोर्‍या उघडल्या होत्या.अन जेवणावर तुटुन पडले होते.त्यांना पण सपाटुन भुक लागली होती.आम्ही पण त्यात शामिल झालो.सुधीरने मस्त खरडा आणला होता.पुलाव,ब्रेड-बटर्,चपाती भाजी .. सगळ्यांच्या डब्ब्यात हात घालुन पोटाच्या आगीला शमवित होतो.चिंब पावसात भिजल्यानंतर जेवायची मजा न्यारीच नाही का.. ?
मस्तपैकी वनभोजन उरकल्यानंतर पुढच्या प्रवासास कुच केले.आता फक्त पठारावरुन चालायच होत.पाण्याचे छोटे छोटे ओढे मध्येच गळ्यात गळे घालुन फिरताना दिसले.

घाटमाथ्याच्या एका पाड्यात राहणारे ... त्या मंदिराच्या मागे कुठेतरी यांच घर असेल..

तासभर पायपीट झाल्यानंतर मोठा ओढा नजरेस पडला.मुक्कामाच्या ठिकाणाच्या जवळ आलो होतो.पण भिमाशंकर अजुन लांब होत.सकाळी अकराच्या सुमारास कामथपाडयापासुन मोहिमेस सुरुवात केल्यानंतर आता साडे-चार वाजता आम्ही घाटमाथ्यावरच्या एका पाडयावर पोहोचलो होतो.त्या पाड्यावरच्या एका घरात आमचा मुक्काम होता.गरमागरम अमृततुल्य चहाच्या दोन फेर्‍या झाल्या तेव्हा हायस वाटल.
दिवसभर पावसात चिंब भिजलो होतो तरीही संध्याकाळी अंघोळ करायला आम्हाला खुमखुमी आली. गिरी,सुधीर,सुधिरचे मित्र,अधिक,सुन्या अन आस्मादिकांनी पाण्यात पोटभर डुबक्या मारल्या.इतर ट्रेकगडयांप्रमाणे इंद्राने मात्र काठावरच राहणे पसंत केल. धुक अजुन तसच होत.ओढयाच पाणी चांगलच गार होत.

संध्यास्नान उरकल.पावसामुळे दिवसभर सुर्यदर्शन काय झाल नव्हत.त्यामुळे लवकर अंधारुन आल.बाहेरुन कुडाने झाकलेल त्यांच घर मस्त होत.आजचा दिवसभराचा प्रवास आठवत होतो.वाजंत्री घाटाने आपल नाव सार्थ केल होत.आतापर्यंतचा ट्रेक फुल पैसावसुल झाला होता.उद्या श्रावणी सोमवार असल्यामुळे वरती भिमाशंकराच दर्शन मिळणार नव्हत.गुप्त भिमाशंकर अन नागफणी बघुन गणेश घाटाने उतरायचा इरादा होता.इंदा अन गिरी मात्र गणेश घाटाने आले असल्याकारणाने एस.टी ने परतीच तिकिट कापणार होते.
बैल घाट ...पाडयावरच्या काकांनी घाट उतरायचा अजुन एक मार्ग सुचविला. फारशा ओळखीच्या नसलेल्या या घाटवाटेने जायचा प्रस्ताव ट्रेकलिडर प्रिती आणि सुन्याने मांडला.सगळ्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केल.मग काय ... या नवीन वाटेने जायला गिरी अन इंद्रा सुद्धा तयार झाले.
गरमागरम डाळ भात अन भाजी खाऊन पाठ टेकविली.बाहेर पावसाने पुन्हा बॅटिंग सुरु केली होती.चिंब पाऊस रोमारोमात भिनला होता.उद्या उतरायची ... बैल घाटाची वाट कशी असेल याचा विचार करत निद्रादेविला शरण गेलो.

क्रमशः

बरसुनी आले रंग सह्याद्रीचे ....... भाग २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages