२०१२चे दिवाळी अंक

Submitted by हर्ट on 8 November, 2012 - 23:41

इथे २०१२च्या दिवाळी अंकातील साहित्याविषयी लिहा जेणेकरुन इतरांना माहिती होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच मेनका चा अंक घरी आला.
सध्या नुसता चाळला आहे. अंक मस्त वाटतोय एकदम. खूप आहे वाचायला..
नवीन मेनकाचं संपादकीय मला कधीच आवडत नाही.. ह्या ही वेळचं नाही आवडलं.. !

परदेशातल्या चित्रपटांच्या पटकथा कथा रूपाने सांगितल्या आहेत. 'परदेशरंग' की काहितरी नाव आहे विभागचं. कल्पना चांगली वाटली. त्यातली जपानी कथा वाचली. चांगली आहे.

विभावरी देशपांडेची गेल्या अंकातली कथा छान होती. ह्यावर्षी पण आहे.. वाचायची उत्सुकता आहे. शिवाय मेनका कथा स्पर्धेतल्या विजेत्या कथा पण आहेत.

कथाश्रीचा अंक आत्ताच चाळला. ललीची कथा आहे त्यामधे. नंतर निवांत बसून वाचायला हवी अशी कथा आहे.

किस्रीमची अनुक्रमणिका बघितल्यावर माबोवरच्या अनेक बीबीन्ची आठवण आली. आता लेख वाचायला घेते.

माझ्याकडे यंदा भारतातून मेनका, लोकसत्ता, मिळून सार्‍याजणी, हंस, नवल हे अंक आले आहेत. नुसते वरवर चाळले आहेत वाचायला सुरवात केली नाही अजून. काल फक्त बेड टाइम रीडिंग म्हणून राखीची लोकसत्तेतली मुलाखत वाचली. यथातथाच होती.
त्याच अंकात डॉ. माधवी ग्रेस (ग्रेस यांची कन्या) यांचा ग्रेस यांच्या झाडा/पाना/पावसा/चिमण्यांबद्दलच्या प्रेमाविषयी लेख आहे आणि एक लेख ग्रेस बद्दल आहे. ते दोन्ही वाचले. बरे होते.

माझ्याकडे लोकसत्ताचा दिवाळी अंक आहे. वाचनीय वाटतोय. पूर्ण वाचला नाही. गुलजारांची अक्षरचित्रे वाचलीत फक्त!

बालकुमारांसाठी माऊस दिवाळी कथा विशेषांक २०१२ प्रकाशित झालाय. माझ्या भाचेकंपनीला भेट म्हणून देण्यासाठी त्याच्या ७-८ प्रती घेतल्या आहेत. मुख्यपृष्ठालाच ओरिगामी माऊस करण्यासाठी घड्या घालता येतील अशा तुटक रेषा असलेला कागद जोडलाय. तो स्वतंत्र करून त्याचा मुलांना उंदीर बनवता येईल. ही कल्पना तर आवडलीच. आत दिलीप प्रभावळकर, राजीव तांबे, सोनाली नवांगुळ यांच्या कथा दिसल्या. अजून वाचायचाय. Happy मूल्य १०० रुपये आहे.

'ऋतुरंग'चा अरूण शेवते संपादित ह्या वर्षीचा दिवाळी अंक स्मरणविशेषांक आहे. अनेक माहितीतल्या नावांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुरेख अंक आहे. प्रत्येक लेख वाचनीय. पत्रकार, कलेक्टर, मंत्र्याचे स्वीय सचिव अशा लोकांनी त्यात्या वेळच्या आठवणी/ कामं ह्याबद्दल लिहीलं आहे ते अतिशय रोचक आहे.

'छात्र प्रबोधन' हा लहान मुलांचा दिवाळी अंक निघतो. ज्ञान प्रबोधिनीतर्फे हा अंक निघतो. मस्त अंक आहे. भरपूर रोचक माहिती आहे. लहानांबरोबरच मोठ्यांनादेखील आवडेल असा Happy

मागच्या अनुभवावरून यन्दा एकही दिवाळी अंक विकत घेउन फसवणूक करून घ्यायची नाही असे ठरवले होते. पण एखाद्या दारुड्याप्रमाणे स्टॉलवर गेलो आणि जरा अनुक्रमणिका पाहून बघु घ्यायचा काय ते अशी मनाशी तडजोड केली. सवयीप्रमाणे पहिलाच मौज उचलला आणि अनुक्रमणिका पाहताच मस्तकात तिडीक गेली . मधुकर धर्मापुरीकर आणि भारत सासणे ही दोन(व इतरही) नावे वाचून. मौज ह्या धर्मापुरीकर नावाच्या साहित्यसम्राटाला का दरवर्षी आमच्या टाळक्यावर बसवते कळत नाही. मौजेचे अंक इतके प्रेडिक्टेबल, टिपिकल , आणि कालबाह्य झालेत की कोणत्याही वर्षाचे लेबल त्याला चिकटवले तरी फरक जाणवणार नाही. तेच दीपावली, हंस, इत्यादी अंकांचे.प्रत्येक अंकाने आपल्या नेहमेच्याच 'पाळीव' लेखकांना नाचविले आहे...
आवाज'' चा अंक पाहून तर धक्कच बसला एखाद्या मोठ्या वहीच्या आकाराचा व नेहमीच्या आकारापेक्षा लाम्बीरुन्दीला कमी असा अंक दीनवाणा वाटला. श्रेयात पाटकर कुटुम्बियांपैकी कधी न पाहिलेली नावे. केवळ परम्परा चालावी म्हणून दुबळा अट्टाहास. दर्जा तर मधुकर पाटकर असतानाच खालावला होता. एकेकाळे आवाज मध्ये पुलं, वसन्त सबनीस, गंगाधर गाडगीळ, ज्ञानेश्वर नाडकर्णी लिहीत असत (म्हणे !)
बहुतांश अंक पठडीतले असल्यानेच यंदा दिवाळी अंकाशिवाय साजरी करून पैसे वाचवले.
विशाखा चे मुखपृष्ठावर (बाईऐवजी)कवी ग्रेस यांचा इतका उत्तम फोटो आहे की केवळ तेवढ्या फोटोसाठी अंक विकत घ्यावा....
विशाखाने दिवाळी अंकासोबत ग्रेस यांचेवर एक पुरवणी काढली आहे. द भिंनी संकल्पित केली आहे ती. अधाश्यासारखी अंक आणून वाचून काढली. ग्रेस वर एवढे थर्ड क्लास लेखन कोणी केले असेल असे वाटत नाही. ग्रेसच्या प्रत्येक पुस्तकावर एकेका 'लेखका'ने लेख लिहिला आहे. बहुतेक मंडळी पी एच डी साठी प्रबंध लिहिणारी आहेत. सिद्धहस्त लेखक नव्हेत. अतिशय रटाळ. नाही म्हणायला हृदयनाथ मंगेशकरांचा लेख आहे तो व्यक्तिगत संबंध जागवणारा आहे. साहित्यमय कमी आणि ते साहजिकच आहे.
दभि एवढे भरताड लिहितील अशी अपेक्षा नव्हती.
दिवाळी अंक हे हिन्दी चित्रपटाइतकेच भम्पक आणि गल्लाभरू झाल्याचे जाणवले आणि या प्रकारापासून फारकत घेण्याचा विचार निश्चितच झाला....

अक्षर : मलाला युसुफझाईच्या डायरीतली काही पानं (ही मला याआधीही वाचल्यासारखी वाटली....तिच्यावर हल्ला होण्याच्या खूप आधी)
चंद्रसेन टिळेकरांचा पुलंच्या बुद्धिप्रामाण्यवादाबद्दल लेख, सत्यजित भटकळ- 'प्रवास सत्यमेव जयतेचा', सुबोध जावडेकर- माणसे परोपकारी का असतात?

अक्षरमधले बरेचसे लेख आवडले. सत्यजित भटकळचा लेख वाचताना त्या कार्यक्रमामाचे परिश्रम लक्षात येतात.

अनुभवमधचे सर्वच लेख उच्च आहेत. त्यातही न्युज मॉल हा मिलिंद चंपानेरकर आणि देश आणि कार्पोरेट हा किशोर चौकर यांचे लेख खास वाचनीय. गिरीश कुलकर्णी यांचं श्रीरामपूर वेश्यावस्तीतल्या "स्नेहालय" या संस्थेची ओळख करून देणारा लेख पण चांगला आहे. गोधडीवाली बाई हा मॅगेसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांवरचा लेख अगदीच टिपिकल झाला आहे. दूरदृष्टीत सारे हा गोपाळ बोधे या हवाईछायाचित्रकारावरचा लेख ठिक; पण लेखामधे ज्या क्वीन्स नेकलेसच्या फोटोचे कौतुक आहे तो फोटो लेखासोबत द्यायला हवा होता. आय डिस्लाईक हा अवधूत डोंगरे यांचा फेसबूकवरचा लेख अति एकांगी आहे. का ही ही गृहितकं धरून लिहिलेला लेख आहे. या माणसाने कदाचित फेसबूक हे कधी नीट वापरलंच नसावं असं म्हणायला वाव आहे.

बाकी, "ग्रेस" गेल्यावरचा एक लेख आणि "पुल, कुमारगंधर्व, इत्यादि इत्यादि" लोक आमच्या घरी माझ्या लहान्पणी यायचे तेव्हाच्या आठवणी या दोन्ही लेखांना माझा पास.

मुशाफिरीच्या अंकातला ऑस्ट्रेलियातल्या मोटरबाईक भटकंतीचं प्रवासवर्णन मस्त आहे ! तसचं त्यातले इंदौर, कलकत्ता, बंगलोर इथल्या खाद्यसंस्कृतीबद्दलचे लेखही मस्त आहेत ! कलकत्त्यावरचा जरा रटाळ आहे कारण नुसतीच पदार्थांची भली मोठी यादी वाचल्यासारखं वाटलं. मीना प्रभुंचा कन्याकुमारीच्या अनुभवावरचा लेखही ('चमकीले' समुद्रकिनारे सारखे काही शब्दप्रयोग वगळता) चांगला आहे.
बाकी वाचतोय हळूहळू.

माहेरच्या अंकातली ललिताची कथा खूप उत्सुकतेने वाचली पण ह्यावेळी पहिल्यांदाच असं झालं की ललिताची कथा नाही आवडली. Sad उत्तम डिटेलिंग ही तिच्या शैलीची मुख्य ताकद (वै.म.) पण ह्या कथेत काही ठिकाणी भलत्याच प्रसंगांचं डिटेलिंग झालय असं वाटलं. किंवा मग मला त्या प्रसंगांचं कथानकातलं महत्त्व कळलं नसेल. पण एकंदरीत 'बात कुछ जमी नही' असं वाटलं.

श्रध्द्दाचं माहेर कथास्पर्धेत दुसरं बक्षिस मिळाल्याबद्दल अभिनंदन. Happy तिची कथा ठिकठाक वाटली. शेवट वाचकांवर सोडून न देता काहितरी ठोस केला असता तर जास्त आवडली असती कदाचित. तसच शेवट अचानक झाल्यासारखाही वाटला. वातावरणनिर्मिती नेहमीप्रमाणेच उत्तम!

माझ्याकडे १५ दिवाळी अंक येऊन पोचले.

"मारी कॉल्वन अशी जगली. आयुष्यभर आपल्याला हवं तशी. व्यक्तिगत आयुष्यातही आणि कामाच्या बाबतीतही. आपल्या पत्रकारितेशी कायम प्रामाणिक राहीली. आणि पत्रकारिता करतानाच मृत्युला सामोरी गेली. तिच्यासाठी एकच शब्द मनात येतो. सलाम!"

मारी कॉल्वन हिच्यावर अक्षर दिवाळी अंकात एक छान लेख आला. लेख वाचता वाचताच हा तिच्यावरचा एक व्हिडीओ पाहिला.

http://www.youtube.com/watch?v=NRFRJGl6sH8

मुशाफिरीच्या अंकातला 'उदरातील हाका' हा Xion नॅशनल पार्क वरचा लेख फारच भारी आहे !!!!! गेल्या लेबर डे ला फ्लाईटची डील्स न मिळाल्याने ब्राईस कॅनियन, आर्चेस आणि Xion नॅशनल पार्कची ट्रिप कॅन्सल करावी लागली होती त्याबद्दल फारच हळहळ वाटते आहे आता.. Sad
हा लेख वाचून मागे नंदनने लिहिलेलं न्यू मेक्सिकोचं प्रवासवर्णन आठवलं..

श्री व सौ-च्या दिवाळी अंकाचा खास विभाग स्नानगृहांवर आहे. यात शर्मिला फडके यांचे दोन लेख आहेत. मायबोलीवर प्रकाशित झालेली मोहना जोगळेकर यांची अधांतरी ही कथा आहे. आर्किटेक्ट शशिकांत जागिरदार यांनी आपल्या क्लाएंट्सचे तर्‍हेवाईक अनुभव 'माझी नक्शेबाजी' या लेखात सांगितले आहेत. आपल्या कारकीर्दीत आलेले सगळेच मासलेवाईक अनुभव त्यांनी निग्रहाने नोंदवलेत की काय असे वाटावे इतका लांबलचक लेख आहे.
ताक-पाणी-वाईन इ. हा डॉ वर्षा जोशी यांचा स्वयंपाकघरातील विज्ञान सांगणारा लेख माहितीत भर घालतो.
अंकाच्या श्रेयनामावलीत मुद्रितशोधकाचे नाव दिसले नाही.

गेल्या वर्षी अनिल अवचटांनी कमल देसाईंबद्दल लिहिले होते. यंदाच्या ललितमध्ये कमल देसाईंनी अवचटांबद्दल सांगितलेले वाचायला मिळेल. रविप्रकाश कुलकर्णी यांचा, त्यांनी रमाबाई रानडे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकासंबंधीचा 'एका पुस्तकाची दुसरी गोष्ट' हा लेख विंट्रेस्टिंग आहे.

'कथाश्री'चा दिवाळी अंक कथा विशेषांक आहे. कथा आणि काही कथाकारांना त्यांच्या लेखनप्रवासाचा मागोवा घेणारे लेख हे दोनच प्रकार आहेत मासिकात. बर्‍याचशा कथा वाचनीय आहेत. कथाश्रीने कथास्पर्धा घेतली होती.. त्या बक्षिसविजेत्या कथा आहेत. शिवाय प्रस्थापित कथाकारांच्या कथाही आहेत. काही प्रस्थापितांच्या कथा बोअर करतात चक्क, तर काही नवोदितांच्या कथा प्लेझन्ट सरप्राईझ आहेत Happy सहसा कथा'लेखिका' जास्त असताना, कथा'लेखकांच्या' कथा भरपूर आहेत आणि चांगल्या आहेत. बक्षिसविजेत्या ' आऊट्सायडर' आणि 'रात्रंदिन आम्हा..' आणि 'मोती शिजत नाहीत' ह्या कथा खूप आवडल्या. एकूणात वाचनीय अंक.

'माहेर'चा अंकही भरगच्च आहे. त्यांचीही कथास्पर्धा होती. त्यातली सुप्रिया अय्यर यांची पहिलं बक्षिसविजेती कथा आवडली. 'चलन' म्हणून एक कथा आहे ती आवडली, छान लिहीली आहे. तसंच साजिराची कथाही एकदम मस्त आहे. शर्मिला फडके आणि वरदाचे लेख नेहेमीप्रमाणेच छान आहेत. उत्तरा बावकरांचा लेख अतिशय आवडला. योगेश दामलेचा लेख डोळ्यात अंजन घालेल असा- अर्थातच आवडला. मंगला गोडबोलेंनी शैली बदलली आहे; पण त्यांची कथा ओके. प्रवीण दवणे, राहुल सोलापूरकरांचे लेख नाही आवडले. सुधीर गाडगीळांचा लेख 'क्लिशे' वाटू शकेल, पण प्रामाणिक आहे, म्हणून मला आवडला. भरपूर लेख आहेत आणि बरेचसे वाचनीय. कथा विभाग मात्र ओकेओके.

मीही वाचला कथाश्री. मला पहिलीच कथा - नीरजाची आहे बहुतेक - अजिबात आवडली नाही, खुप पाल्हाळ लावले असे वाटले. त्यामानाने स्पर्धेतल्या कथा ब-या वाटल्या. आपल्या ललिता-प्रितीची कथा बहुतेक १ ली का दुसरी आलीय स्पर्धेत. तीने याआधी इथे पोस्ट केलेली वाटते. वाचल्यासारखी वाटली.

इतर दिवाळीअंक अजुन पाहिले नाहीत. माहेरबद्दल नेहमीसारखी उत्सुकता आहे. बघु कधी मिळतोय ते.

काही प्रस्थापितांच्या कथा बोअर करतात चक्क, तर काही नवोदितांच्या कथा प्लेझन्ट सरप्राईझ आहेत <<<<
+१
कथाश्री संपूर्ण वाचून झाला नाहीये अजून पण प्रस्थापितांच्या ज्या एक दोन वाचल्यात त्या बर्‍यापैकी बोअर झाल्यात.
ललीची कथा मस्त. बाकीच्या वाचतेय अजून.

मला पहिलीच कथा - नीरजाची आहे बहुतेक - अजिबात आवडली नाही, खुप पाल्हाळ लावले असे वाटले. <<
+१
मला एरवी त्यांचे लिखाण खूप आवडते पण ही कंटाळवाणी झाली. तेच योगिनी वेंगुर्लेकरांच्या कथेचे. एरवी बिझनेस, शेअरमार्केट, अर्थकारण अश्या एकदम वेगळ्या विषयांवरच्या आणि अतिशय सफाईदारपणे, तपशीलांसकट लिहिलेल्या त्यांच्या कथा वाचून मी फ्यान बिन झाले होते त्यांची.

कथाश्री : "काही प्रस्थापितांच्या कथा बोअर करतात चक्क". हे वाचून नवल वाटले नाही. आवडीने कथा वाचणार्‍यांची क्षमा मागून सांगतो की कथाश्री, सुगंध या अंकांना कधीच पास दिलेला आहे.
आत्ताच 'अंतर्नाद'चा अंक हाती आला. आरंभीच 'शोध स्वामी विवेकानंदांचा' या दत्तप्रसाद दाभोळकरांच्या पुस्तकाच्या जाहिरातीत पुस्तकातला काही मजकूर आहे. तो वाचल्यावर जरासा धक्का बसला. जाहिरात यशस्वी.
'मी आणि माझे लेखन' या विशेष विभागात राजेन्द्र बनहट्टी, नागनाथ कोतापल्ले, आशा बगे, अरुण साधू, भारत सासणे, नीरजा, अरुणा ढेरे, विश्वास पाटील, मोनिका गजेंद्रगडकर, कविता महाजन इत्यादींनी लिहिले आहे. ग्रेसबद्दल निशिकांत मिरजकर यांनी लिहिले आहे. जैतापूर्‍अची बत्ती या पुस्तकाबद्दल मधु मंगेश कर्णिक : "हेच पुस्तक मी अणुउर्जेला विरोध करण्यासाठी लिहिले असते, तर मी प्रसारमाध्यमांच हीरो ठरलो असतो. नकार, निषेध, वोरोध हे सर्वांनाच प्रिय असतात."
"बरं मग..." हा अवधूत परळकरांचा लेख वाचल्यावर "बरं मग" असं नाही म्हणता येत.
पानपूरकांच्या रूपात डॉ. उमेश करंबेळकर यांनी लिहिलेल्या शब्दांसंबंधीची माहिती गंमतीशीर आहे.
"अंकातील अनिल अवचट, निशिकांत मिरजकर, मधु मंगेश कर्णिक आणि मिलिंद बोकील या इतर लेखकांचे लेखनही गुणवत्तापूर्ण आहे." हे मी नव्हे, तर संपादकीय म्हणतेय.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र चा दिवाळी अंक हा दिवाळी अंक न म्हणता वार्षिक विशेषांक म्हटले जाते. बोलीभाषेत मात्र सर्व याला दिवाळी अंकच म्हणतात. दिवाळी अंक म्हटले तर प्रतिगामी वा अंधश्रद्ध ठरु अशी भिती त्यामागे असावी.
अंकात सुमन ओक यांचा लेख आहे. विषय आहे जोहॅनिस क्वॅक (जॉन) या जर्मन तरुणाने " भारतीय बुद्धीवादी,त्यांच्या अश्रद्धेचे स्वरुप आणि श्रद्धेबाबत भ्रमनिरास" या विषयावर केलेले एक संशोधन.ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस ने प्रकाशित केले आहे. त्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कार्य यावर प्रकाश टाकला आहे.
पुष्पाताई भावे यांची राजीव देशपांडे यांनी घेतलेली विशेष मुलाखत अंकात आहे. कार्यकर्ता मुलाखत म्हणुन प्रा प रा आर्डे यांची तिमिरातून तेजाकडे अशी मुलाखत आहे.
धर्मस्थळ चिकित्सेत मुंबईचा मिरा दातार दर्गा, बुलढाण्यातील चिखलीचा सैलानी बाबाचा दर्गा, रत्नागिरीतील शहानूर बाबाचा दर्गा, सांगलीजवळ ख्वाजा कबीर दर्गा, नंदूरबार जवळील गुलामअली चिश्ती दर्गा अशा पाच दर्ग्यातीळ अघोरी उपचाराबद्दल माहिती देणारे लेख आहेत. मनोरुग्णांना दर्ग्याची नव्हे तर मानसमित्रांची गरज या डॉ प्रदीप जोशी यांचा लेख ही आहे.
ओळख प्रेरणादायी कामाची अंतर्गत अंनिस च्या कोल्हापूर व लातूर येथील आंतरजातीय विवाह केंद्राच्या भुमिका व अनुभव या बद्दल माहिती आहे.
गर्भ संस्कार एक थोतांड- डॉ चंद्रकांत संकलेचा ; हिंदूत्ववादी संघटनांनी हिंदुंच्याकरिता केले तरी काय? - डॉ शरद अभ्यंकर हे लेख आहेत.
"वाढती दैववादी मानसिकता व आजचे समाज वास्तव' हा परिसंवाद आहे. यात कॉ. गोविंद पानसरे, संध्या नरे-पवार, सुभाष थोरात, तारा भवाळकर, डॉ रावसाहेब कसबे, डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा सहभाग आहे.
एकंदरी अंक अर्थातच वैचारिक मेजवानी आहे.

चिन्ह २०१२ वार्षिक कोणाला मिळाले आहे का?

छात्रप्रबोधनचा अंक वाचला. छान आहे. या मासिकातले लेखन आजकाल पाठ्यपुस्तकांत लावले जाते.

मुंमग्रंसं आता यंदाचे दिवाळी अंक १०रुपयाला एक या भावाने मिळणार आहेत.
यंदाचे कोणते अंक संग्राह्य वाटले?
अंतर्नाद, अक्षर, पद्मगंधा हे यादीत आहेत.
मौज, शब्द विकत घेतलेले आहेत.
दीपावली पाहायलाही मिळालेला नाही.

हे राम! चिन्हच्या संकेतस्थळावर २०१३च्या अंकाची जाहिरात सुरू झालीय.
२०१२च्या अंकाचे प्रकाशन लांबल्याचे त्यांनी डिसेंबरात कळवले होते, पण सध्या ते इनक्म्युनिकेडो झालेत.

कथालेखक/वाचक मंडळींना कथाश्रीचा दिवाळी अंक उपयुक्त वाटला नाही का? स्पर्धकांचे वर्कशॉप, सध्याच्या बिनीच्या कथालेखकांनी सुचवलेले वाचावेतच असे कथासंग्रह...
अंतर्नादमधला मिलिंद बोकीलांचा लेख मला आवडला. लेखनप्रवासापैकी संमेलनाध्यक्षांचे मनोगत आवडले.