कसे सजावे ? कुठे निघावे ?

Submitted by भारती.. on 4 December, 2012 - 08:48

कसे सजावे ? कुठे निघावे ?

तू अरे विचित्रा परमस्वार्थ ना माझा
की उद्ध्वस्तीची जुनी अनाहत ओढ
तू लळे पुरविसी मम ओठातून अपुले
की आत्मछळाची मला लागली खोड

मी प्रखर रोखली सर्वस्वाची ऊर्जा
अन वैराणातून तुला घातली साद
मी सख्य कल्पिले तुझे कधी शत्रुत्व
तुज समीप समजून स्वतःशीच संवाद

बघ समोर पुस्तक अर्धे उघडे पडले
ओळींतून अस्फुट जरी गवसले काही
ही भाषा माझ्या श्वासांची रहदारी
हृदयाचे स्पंदन रक्ताची लय नाही .

तम भरे भोवती आणिक अंतर्यामी
व्यामिश्र तुझा नक्षत्रव्यूह नि:संग
अणुअणू पालवे फसव्या पर्यायांनी
मी कसे सजावे ? कुठे निघावे? सांग.

भारती बिर्जे डिग्गीकर

('मध्यान्ह' मधून.)

असे काहीसे म्हणायचेय-

ही कविता माझे परमेश्वराशी असलेले तत्कालीन love hate नाते चितारते..
तो कोण आहे ?माझा परमस्वार्थ (परमार्थ कुठला माहीत असतो आपल्याला ) की माझ्या आत्मपीडनाचं एक रूप ? तो माझ्याकडून स्वतःचे लाड करून घेतोय की मी स्वतःला उद्ध्वस्त करतेय त्याच्या अफवेशी झुंजत?
मी माझे सर्वस्व एकवटून त्याला घातलेली साद माझ्या वैराण एकांतात का विरून जाते ?मग मी त्याचे कधी सख्य धरते, कधी शत्रुत्व,परम उत़्कटतेने,त्याला काहीच फरक पडत नाही..त्याला जवळ कल्पून माझे हे असे स्वतःशी संवादणे ..
ही पुस्तके, हे धर्मग्रंथ, शास्त्रे पुराणे मला अंधुकसे काही सांगतात पण ती मला माझ्या अस्तिवाची भाषा वाटत नाही..माझ्या जित्याजागत्या चेतनांना ते शब्द पुरे पडत नाहीत.
भोवताली अन अंतर्यामी काळोख आहे तुला शोधताना दाटलेला अन आकाशात तुझी नि:संग गूढ (व्यामिश्र- आकलनास कठीण ) नक्षत्रलिपी एखाद्या अभेद्य व्यूहासारखी फक्त तुझे अस्तित्व सूचित करतेय.
अणुअणू गजबजलाय तुझ्या फसव्या पर्यायांनी.
मी कसे सजू तुझ्यासाठी ? काय करू म्हणजे तू मिळशील ?
कुठे निघू ? कुठून कुठे असतो हा आत्मशोधाचा प्रवास ?
सांगशील ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या कवितेला चार प्रतिसाद? याला दुर्लक्ष म्हणावे का काय म्हणावे!

प्रतिसादांसाठी लिहिली जात नाही हे मान्य आहेच, पण मायबोलीवर गहनाहून गहन चर्चा करणारे केव्हातरी अश्या धाग्यावर का फिरकत नसावेत लक्षात येत नाही. ही मागे मागे पडल्यामुळे माझ्याकडूनही निसटली हे लक्षात आल्यामुळे यापुढे भारतींच्या लेखन पाऊलखुणा तपासायच्या असे ठरवत आहे.

शब्दश्रीमंती, प्रतिमाविश्व, आशय, गांभीर्य सर्वच कसोट्यांची परिमाणे बदलणारे किंवा ठरवणारे काव्य!

सध्या तरी माझ्यासाठी फारच दुर्बोध काय आहे हे मी मान्य करते. अजून खूप पल्ला गाठावा लागेल मला. Happy
कदम कदम बढाये जा! Happy

भारती ताई, तुम्ही कवितेत वापरता ते शब्द फार जड पण सुरेख असतात. कळली नाही तरी कविता त्या शब्दांच्या उच्चारांसाठी परत परत वाचावीशी वाटते. Happy

खूप गोड ,निंबुडा, बच्चा. थोडी कवितेची सवय असण्याचा भाग आहे.व्यसनही :))
धन्स शशांकजी,सावरकरांच्या 'अज्ञेयाचे..' लिहिण्याआधी अगदी त्याच विषयावर मी फार पूर्वी लिहिलेली ही कविता इथे द्यावीशी वाटली

बेफिकीर,किती खरे लिहिलेत. आभार. मी आता तक्रारींपलिकडे गेलेय. अगदी हेच मध्यान्हचे झाले..

दैववादी शब्दात मला सांगितले गेले की प्रत्येक लिखाणाचे एक नशीब असते. चांगले लिखाण उचलले जाते म्हणून तर आपले वाचनविश्व समृद्ध आहे. मान्य, पण,

साहित्याचे वास्तव असेही की मौन पाळणे अन अनुल्लेखाने मारणे ही एक रणनीती असते हे डोळ्याआड करता येत नाही...

रणनीती<<<

भारती, मायबोलीवर वाचनाने आणि स्वतःच्याही कलाकृतींनी समृद्ध झालेले अनेकजण आहेत. अनेक जण परदेशस्थही असल्याने ते आपल्या रात्री वाचू शकतात. अनेकजणांकडून लॉग ईन मध्ये गॅप पडत असल्यामुळे काही वेळा उत्तम लेखन वाचायचे राहून जाते. अनेकवेळा एखाधा धागा मागे गेल्यानंतर तेथपर्यंत जाण्याचे कष्ट काही जण घेत नाहीत. पण रणनीती म्हणून आपल्या कवितेचा अथवा लेखनाचा कोणी अनुल्लेख करत असेल असे निदान मला तरी वाटत नाही कारण तुम्ही उत्तम व प्रतिभाशाली कवयित्री व लेखिका आहात. अनेकदा काही इतर चर्चांचे धागे स्पॉट लाईटमध्ये राहतात कारण तेथे अनेकांना सहभागी व्हावेसे वाटत असते व होता येते. कविता, गझल, कथा यावर सहसा 'आवडली किंवा आवडली नाही' अश्याच प्रकारचे प्रतिसाद देता येतात व खास अशी चर्चा होत नाही (सहसा).

तरीही, ही कविता समोर आल्यानंतर ज्यांनी प्रतिसाद न देता पुढचा धागा उघडला असेल त्यांना उद्देशून मी आधीचा प्रतिसाद दिला होता.

Happy

धन्यवाद!

बघ समोर पुस्तक अर्धे उघडे पडले
ओळींतून अस्फुट जरी गवसले काही
ही भाषा माझ्या श्वासांची रहदारी
प्राणांचे स्पंदन रक्ताची लय नाही .

अप्रतिम कविता, वरील कडव्यासाठी उभा राहून वंदन.

प्रतिसादांचे इतके मनावर घेऊ नका हो, खास करून आंतरजालावरच्या.

रणनीतीवरच्या बेफिकीर ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत.

सन्माननीय अपवाद वगळता हल्ली कविताच काय गझलेच्या विभागातही निराशा पदरी पडते त्यामुळे प्रत्येक धागा उघडायचे धाडस होत नाही. त्यामुळे अशा अप्रतिम रचना वाचायच्या राहून जातात.

मायबोलीपासून कितीही दूर राहिले, कितीही दिवसांनी मायबोलीवर आले आणि कचरा पाहून वैतागले तरी थोडक्या का होईना नवनवीन लिखाणांचे आवाके बघून (तुम्ही नवीन आहात असं नाही तर मला इथे नवीन असलेल्या लिखाणाबद्दल म्हणतेय) कायम "आईशप्पत" व्हायला होतं.
ताकदीची कविता..
>>की उद्ध्वस्तीची जुनी अनाहत ओढ
>>ही भाषा माझ्या श्वासांची रहदारी
>>अणुअणू पालवे फसव्या पर्यायांनी
या ओळी आल्यानंतर तुम्हाला स्वतःलाही "आईशप्पत" झालं असेल हे नक्की..
लिहीत रहा..

मी वाचली होती ही कविता जेव्हा स्वातीने पार्ल्यात ह्या कवितेचं कौतुक केलं होत> पण माझं पण निंबुडासारखच झालं Uhoh
मला कविता फारच साध्या सोप्या असतील तरच समजतात(पूर्णपणे माझा बुद्धीदोष) त्यामुळे प्रतिसाद नव्हता लिहिला. पण समजली असती तर किती बरं झालं असतं असं मात्र नक्कीच वाटलं.

सुंदर कविता.
तुमचा काव्यसंग्रह मला हवा आहे.
भेट मिळाला नाही तरी चालेल्..कुठे मिळेल ते नक्की सांगा....मला त्यातुन बरच काही मिळेल ...नक्की सांगाल हे अपेक्षीत आहे..

बेफिकीर,थोडं कटूतेने लिहिलं ते माबोकरांसाठी नाही. काही पूर्वानुभव.'रणनीती' चा संदर्भ बाहेरचा होता.
तसे वाटले असल्यास क्षमस्व. इथे तर मी खूप रमले आहे, 'आपने याद दिलाया तो मुझे याद आया 'सारखं काहीतरी झालं :))

बाकी तुम्ही म्हणता तेही खरेय की 'आवडली ' व समानार्थी त्रोटकच असतात प्रतिक्रिया..

मला इथे आता हेही उमगतेय की कवितेच्या प्रांतात बर्‍याच जणांची प्रतिक्रिया निंबुडा किंवा शूंपीसारखी असू शकेल. माझा शैलीदोष ? पण ते शैलीचं नैसर्गिक सौंदर्यही आहे म्हणून गंभीर कविता अधिक मननपूर्वक वाचायची या सुहृदांना फक्त विनंती करू शकते.

स्वतःला सोपे करण्याचा शक्य तेव्हा प्रयत्न करेन.
स्वाती,संघमित्रा,शाम, विदिपा,वेदन,खूप आभार. ही कविता अक्षरशः मर्मबंधातली ठेव आहे..

शशांकजी,
ही कविता माझे परमेश्वराशी असलेले तत्कालीन love hate नाते चितारते..
तो कोण आहे ?माझा परमस्वार्थ (परमार्थ कुठला माहीत असतो आपल्याला ) की माझ्या आत्मपीडनाचं एक रूप ? तो माझ्याकडून स्वतःचे लाड करून घेतोय की मी स्वतःला उद्ध्वस्त करतेय त्याच्या अफवेशी झुंजत?
मी माझे सर्वस्व एकवटून त्याला घातलेली साद माझ्या वैराण एकांतात का विरून जाते ?मग मी त्याचे कधी सख्य धरते, कधी शत्रुत्व,परम उत़्कटतेने,त्याला काहीच फरक पडत नाही..त्याला जवळ कल्पून माझे हे असे स्वतःशी संवादणे ..
ही पुस्तके, हे धर्मग्रंथ, शास्त्रे पुराणे मला अंधुकसे काही सांगतात पण ती मला माझ्या अस्तिवाची भाषा वाटत नाही..माझ्या जित्याजागत्या चेतनांना ते शब्द पुरे पडत नाहीत.
भोवताली अन अंतर्यामी काळोख आहे तुला शोधताना दाटलेला अन आकाशात तुझी नि:संग गूढ (व्यामिश्र- आकलनास कठीण )नक्षत्रलिपी एखाद्या अभेद्य व्यूहासारखी फक्त तुझे अस्तित्व सूचित करतेय.
अणुअणू गजबजलाय तुझ्या फसव्या पर्यायांनी.
मी कसे सजू तुझ्यासाठी ? काय करू म्हणजे तू मिळशील ?
कुठे निघू ? कुठून कुठे असतो हा आत्मशोधाचा प्रवास ?
सांगशील ?

नितान्त सुंदर! अनादि कालापासून मानवतेला पडलेल्या एका गहन प्रश्नाचे वर्णन आपण फार सहजपणे केलेत भारतीजी! आणि तेही केवळ मोजक्या ओळीतच !!

अभिनन्दन !

वा भारतीजी, तुमचे हे रसग्रहणही अप्रतिमच आहे - हे कृपया त्या कवितेखालीच हलवणार का ? वाचकांना ते सोयीचे होईल असे वाटते.

शशांकजी, कवितेखालीच हलवलंय रसग्रहण.
आभार बिनधास्त, अंजली..
अंजली, व्यामिश्र- आकलनास कठीण , गुंतागुंतीचा .

तात्त्विक विचारांची बैठक असलेली ही कविता आता कुठे समजली...तुमच्या खुलाश्याने मनातला गोंधळ दूर झाला.
मी कोणतीही कविता वाचतांना माझ्या सहजप्रवत्तीमुळे इतर बाबींबरोबर त्यातली गेयता पाहतो...ही कविता गेयतेच्या दृष्टीने तेवढी आकर्षक नाही वाटली...स्पष्ट मताबद्दल क्षमस्व!

भारती ताई, __/\__

अर्थे लिहूनही मला जराजराशीच उमगली. Happy त्या भावनेशी रीलेट करता येत नाहीये मला कदाचित!

बघ समोर पुस्तक अर्धे उघडे पडले
ओळींतून अस्फुट जरी गवसले काही
ही भाषा माझ्या श्वासांची रहदारी
हृदयाचे स्पंदन रक्ताची लय नाही . >> आयुष्याचं अर्ध पुस्तक कुठल्याश्या खोट्या आशांच्या स्टूलावर उघडं पडलंय जणू.. वाचता येण्या न येण्याच्या पलीकडली आपलीच स्थिती, सारं कळतंय पण आपल्यापर्यंत न पोहोचण्याजोग्या सून्न स्थितीत आपणच असताना कसं भान रहावं गोंधळलेल्या श्वासांच्या असण्याचं... आपण अर्थहीन जिवंत असल्याचं

कवितेचा तुम्ही केलेला खुलासा वाचला नाही भारती, कविता वाचून झाल्यावर खुलासा वाचावाच वाटला नाही.
कविता वाचकाची झाली समजून अर्थ लागला तो आवडला..

भारती ताई __/\__

मलाही कवितेतले फारसे कळत नाही.
पण मी एवढी आशयगर्भ कविता आधी बहुतेक शाळेतच वाचली असेल.

ही भाषा माझ्या श्वासांची रहदारी
प्राणांचे स्पंदन रक्ताची लय नाही .............क्या बात है !!

मला सुद्धा सहज सोप्या कविताच समजतात. खूप गूढ असलेलं काव्य समजत नाही त्यामुळे वाचायचाही कंटाळा येतो. पण हे तुमचं काव्य मात्र तुम्ही अर्थ उघडून सांगितल्यामुळे अक्षरशः आतपर्यंत पोचलं.

शब्द श्रीमंती आणि त्यावरचं प्रभुत्व .......मान गये उस्ताद Happy

देवावर विश्वास नाही पण कविता अतिशय आवडली.
एखादी ओळ प्रकर्षाने सांगू शकत नाही कारण ओळ न ओळ नितांत सुंदर!
मला का कोण जाणे पृथ्वीचे प्रेमगीत आठवले. किंवा एखादं सूफी भजन!

समर्थ हातांतून उतरलं की गद्य आणि पद्य तितकंच सुंदर उतरतं हेच खरं.

अगो, माधवी, जयवी, सर्वांचे खूप आभार..
तुमच्यामुळे, मी माझ्या कवितेबद्दल मोकळेपणाने बोलतेय, .

कौतुकाबरोबरच आशयाच्या गहनतेबद्दल मला ऐकावे लागणे अगदी क्रमप्राप्त.
पुनः एकदा, निंबुडाच्या '' त्या भावनेशी रीलेट करता येत नाहीये मला कदाचित' ' या शब्दात तो अडसर दडला असावा.

कवीचे अग्रक्रम हे त्याच्या आयुष्यात दडले असतातं. निंबुडाच्याच वयात एका तळमळत्या परिस्थितीत, मनस्थितीत लिहिलेली ही कविता. आपल्या सर्व दु:खांचं निदान फक्त ईश्वर आहे आणि तो तर हाती येत नाही या जाणिवेतून केलेली. अश्विनी, तुला हे जड जाऊ नये, माझे शब्द जरा बिचकवत आहेत तुला .:))

बागेश्री, खरे आहे, मी का म्हणून माझा अर्थ लादावा ? पण थोडंसं एका वेगळ्या अर्थबंधाकडे सर्वांना नेण्याचा हा प्रयत्न.. तिथून पुढे कविता माझी नाही.

साती, कवितेवर अन सूफी भजनांवर प्रेम करणं हेही अध्यात्मच , प्रत्येकाचं स्वायत्त.

प्रमोदजी, दुसर्‍या अन चौथ्या ओळींचं यमक असलेली ही रचना गेय नाही, मान्य. तिची अति वैचारिकताही गेयतेला मारक आहे,

'

Pages