मेरा सुंदर सपना बीत गया.....

Submitted by विशाल कुलकर्णी on 3 December, 2012 - 02:32

ती म्हणजे एक न उलगडलेलं कोडं होतं. एक अधुरी राहून गेलेली कविता होती. तीन दशक..., जवळजवळ तीन दशके तीने आपल्या नजाकतभर्‍या , मादक स्वरांच्या जोरावर रसिकांच्या मनावर अनभिषीक्त साम्राज्य गाजवलं.

तिच्यावर हिंदी सिनेसृष्टीबरोबरच तिच्या नशिबाने, तसेच जवळच्यांनीही खुप अन्याय केलेला आहे.
'सुजाता' मध्ये एक गाणं आहे. 'तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!"
सचीनदेव बर्मन यांनी हे गाणं तिच्याबरोबरच आशाबाईंकडुनही गाऊन घेतलं होतं. ऐनवेळी सचीनदांनी तिच्या आवाजातलं गाणं फायनल केलं. पण रेकॉर्ड बनवताना ग्रामोफोन कंपनीला 'आशाबाईंचं' नाव चुकून पाठवलं गेलं. आणि त्यानंतर जवळ जवळ सत्तावीस वर्षे हे गाणं आशाबाईंच्याच नावाने वाजत राहीलं. बर्‍याच वर्षांनी अमेरिकन रेडीओने घेतलेल्या एका मुलाखतीत तिथल्या निवेदकाने आशाबाईंना हे गाणं ऐकवलं आणि विचारलं ," हे गाणं कुणी गायलय? हा कुणाचा आवाज आहे?"

आशाबाईचं उत्तर होतं...

"गीता दत्त!"

2

एखादं गाण्याचं श्रेय, मुळ गायिका जिवंत असताना सत्तावीस वर्षे दुसर्‍याच गायिकेला मिळण्याचं हे एकमेव उदाहरण असेल.

'कागज के फुल' साठी गुरुदत्तने तिच्याकडून एक गाणं गाऊन घेतलं होतं. 'वक्तने किया..क्या हंसी सितम, हम रहें ना हम्....तू रहें ना तू..!" जणु काही या गीतातून 'गीता दत्त'ची वेदनाच व्यक्त झाली होती. गीताच्या बाबतीत काळाने खरंच खुप मोठा अन्याय केला आहे, तिच्या हयातीत आणि तिच्या मृत्युनंतरही. तीचं प्रचंड गाजलेलं, पहीलं लोकप्रिय गाणं होतं..." मेरा सुंदर सपना बीत गया" ...

ते गीत गाताना तिला तरी कुठे माहीत होतं की ही वेदना यापुढे आयुष्यभर आपली सोबत करणार आहे. १९७२ च्या जुलैमध्ये म्हणजे जवळ जवळ ४० वर्षांपूर्वी गीताने या आभासी जगाचा शेवटचा निरोप घेतला. पण आजही तिचे अस्तित्व तिच्या गाण्यातुन जाणवत असते. कुठे ना कुठे, एखादा रेडीओ , एखादा टेपरेकॉर्डर आर्तपणे तिची वेदना आळवत असतोच...

‘वक्त ने किया क्या हँसीं सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम...

सर्वात आधी गीता दत्तचे सुर कानावर आले ते १९४६ साली आलेल्या 'भक्त प्रल्हाद' या चित्रपटातील काही गाण्यांमध्ये. पण यात तिचा वाटा कोरसमधल्या दोन ओळींचा होता फक्त. त्यामुळे गीता दत्त (त्यावेळची गीता रॉय) पडद्यामागेच राहीली. १९४७ मध्ये गीताला महत्त्वाचा ब्रेक मिळाला. चित्रपट होता 'दो भाई' . या चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीला एका जबरदस्त ताकदीच्या गायिकेची ओळख करुन दिली. गंमत म्हणजे या चित्रपटात गीताने गायलेल्या गाण्याने सचीनदांनाही स्वत:ची अशी एक नेमकी ओळख मिळवून दिली. हे गाणं होतं...."मेरा सुंदर सपना बीत गया..."

राजा मेहंदी अली खान यांनी लिहीलेल्या या गाण्याने गीता दत्तला लोकप्रियतेचा उच्चांक गाठुन दिला.

मेरा सुंदर सपना बीत गया...
मै प्रेम में सब कुछ हार गयी
बेदर्द जमाना जीत गया..
मेरा सुंदर सपना बीत गया ( http://youtu.be/zaka9-uC0S4 )

जणु काही गीताचं भवितव्यच या गाण्याने सांगितलं होतं. या गाण्यातली वेदना पुढे आयुष्यभर तिची साथसंगत करत राहीली. सांप्रत काळात बांग्लादेशाचा भाग असलेल्या फरीदपुर या गावच्या एका गर्भश्रीमंत जमीनदाराच्या घरात १९३० साली जन्माला आलेलं हे सुंदर पण करुण स्वप्न पुढची कित्येक वर्षे रसिकांच्या काळजाला हात घालत राहीलं आणि यापुढेही घालत राहील. १९४२ साली जेव्हा गीता बारा वर्षाची होती, तेव्हा तिचं कुटूंब मुंबईतल्या दादर इथे स्थलांतरीत झालं. इथुन पुढे गीताचं आयुष्य एक वेगळा आकार घेणार होतं.

मग १९५० साली आला 'जोगन' !

दिलीप कुमार आणि नर्गीसच्या सर्वांगसुंदर अभिनयाने नटलेला 'जोगन' १९५० चा सर्वात हिट चित्रपट होता. या चित्रपटाने त्या काळी एक कोटीच्या वर व्यवसाय केलेला होता असे मानले जाते. पण चित्रपटाच्या यशाचे खरे शिल्पकार होते संगीतकार 'बुलो सी रानी' आणि गायिका 'गीता घोष रॉय चौधरी उर्फ गीता रॉय उर्फ गीता दत्त'. या चित्रपटातील गाण्यांनी गीताला एका उच्च स्थानावर नेवून बसवले. मीराबाईंची आर्त आळवणी गीताच्या स्वरातून रसिक श्रोत्यांच्या कानापर्यंत पोहोचली आणि जणु काही विरह भावनेलाच एक अतिशय उच्च स्थान देवुन गेली. 'घुंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे' (http://youtu.be/QRzES82UPyc ) तसेच 'मै तो गिरीधर के घर जाऊ, तसेच 'जरा थम जा तू..ऐ सावन..., मेरे साजन को आने दे' या गाण्यांनी गीताच्या आवाजाची ताकद रसिकांच्या मनापर्यंत पोचवली.

"'जरा थम जा तू..ऐ सावन...," मध्ये तर एकाच गाण्यात गीताने विरही मनाच्या अनेक अवस्थांचे इतके सुंदर दर्शन घडवून आणले आहे की पुछो मत. (http://youtu.be/gJ_CYMsQ84A)

ती मुक्त स्वरात गाऊन गेली... 'घूँघट के पट खोल रे तोहे पिया मिलेंगे' .., दुर्दैवाने तिचा पिया तिला तिच्या आधीच (१९६४ साली) सोडून गेला आणि गीता आर्तपणे गात राहीली... "

जोगी मत जा पाँव पड़ूँ मैं तोरी
मत जा मत जा मत जा जोगी (http://youtu.be/72a1dxaXdPw )

याबाबतीत तिचा पिया म्हणजे गुरुदत्तही दुर्दैवीच ठरला. गीता दत्त, पुर्वाश्रमीची गीता रॉय तिच्या आवाजातल्या आर्ततेमुळे त्याच्या आयुष्यात आली. काही दिवस गुरुदत्तचे आयुष्य गीताच्या सहवासाने आणि तिच्या गीतांनी सुंदर बनुन गेले आणि मग आली वहिदा. वेड्या गुरुने 'कागज के फुल' चं रुपांतर 'चौदहवी का चांद'मध्ये केलं, पण बिचारा शेवटपर्यंत 'प्यासा'च राहीला. कुठल्यातरी एका बेसावध क्षणी वहिदादेखील त्याच्या आयुष्यातून निघून गेली आणि शेवटी वहिदा आणि गीता दोघीही त्याच्या आयुष्यातून दुर-दूर होत गेल्या. बहुतेक त्या एकाकीपणालाच कंटालून त्या मनस्वी कलावंताने मृत्युला साद घातली असावी.

याच वर्षी आलेल्या 'बावरे नैन' मध्ये देखील गीताने संगीतकार रोशन यांच्यासाठी मुकेशच्या बरोबरीने एक निरतिशय सुंदर गाणे दिले होते.

खयालोंमे किसीके इस तरहा आया नही करते.. (http://youtu.be/6gDnijylB4k )

१९५१ साल तिच्या वैयक्तीक आयुष्यात एक नवं, सुंदर पर्व घेवुन आलं होतं. (ज्याचा अंत एका न संपणार्‍या विरहात होणार होता) 'बाजी' या चित्रपटाच्या दरम्यान तिची ओळख गुरुदत्तशी झाली आणि याच चित्रपटातील एका प्रचंड गाजलेल्या गीताच्या रेकॉर्डींगच्या वेळी गुरुदत्त तिच्या प्रेमात पडला. गाणं होतं...

"तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले.., एक दांव लगा ले" (http://youtu.be/cgwfvDh7cPc )

सर्वस्व गमावून बसलेला, निराश झालेला नायक (देव आनंद) आयुष्याप्रती एकदम उदासीन होवून हार मानून परत निघालेला असतो. तेव्हा गिटारच्या धुंद करणार्‍या साथीत अवखळ नायिका (गीता बाली) त्याच्यातल्या हिंमतीला कर्तुत्वाला आव्हान करते. स्वतःवर विश्वास असेल तर अजुन एक संधी घेवून बघायला प्रेरीत करते. 'बाजी' हा चित्रपट खरेतर गुरुदत्त आणि देव आनंद या दोघांसाठीसुद्धा एक जुगारच होता. त्या आधी दोघेही आपापल्या आयुष्यात खुप संघर्ष करुन थकले होते. असे म्हणतात की आपल्या संघर्षाच्या काळात या दोन मित्रांनी एकमेकांना वचन दिले होते की त्यांच्यापैकी जो कुणी प्रथम चित्रपट बनवेल , तो दुसर्‍याला आपल्या चित्रपटात संधी देइल. म्हणजे 'देव'ने चित्रपट केला तर दिग्दर्शक गुरुदत्त असेल आणि गुरुदत्तने चित्रपट केला तर नायक 'देव' असेल. संधी 'देव आनंद'ला मिळाली आणि त्याने आपले वचन पाळले. 'बाजी' हा चित्रपट व्यावसायिक यशाच्या पातळीवर देव आणि गुरुदत्त दोघांसाठी देखील एक पहिली आणि शेवटची संधीच होता. पण या संधीचे गुरुदत्तने सोने केले. या गाण्याने तर लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडले. आणि याच गाण्याच्या रेकॉर्डींग दरम्यान गीता त्याच्या आयुष्यात आली.

3

आपल्या नशिबावर आणि गुरुदत्तच्या प्रेमावर विश्वास ठेवून तिने हा डाव खेळला. कुठल्यातरी क्षणी ती देखील गुरुदत्तच्या प्रेमात पडली आणि १९५३ मध्ये तीने गुरुदत्तबरोबर विवाह केला. प्रथमदर्शनी तरी असेच भासले की तिने खेळलेला हा नशिबाचा डाव कमालीचा यशस्वी ठरला. बाजीच्या यशाने गीताला पार्श्वगायिका म्हणून पक्के स्थान मिळवून दिले. बाजीनंतर गुरुदत्तच्या बहुतेक सगळ्या चित्रपटात गीता गायली आणि जिव तोडून गायली. गुरुदत्त आणि गीताने या काळात एकाहुन एक सुंदर अशी अनेक कर्णमधुर गाणी दिली.

सचीनदा एकदा म्हणाले होते, "वो जब गुरुदत्तके लिये गाती है तो गलेसें नही, दिलसें गाती है!"

'बाजी' असो वा 'आरपार', 'प्यासा' असो वा 'कागज के फुल' , सी.आय.डी. असो वा 'चौदहवी का चांद' ! गीताने आपल्यापाशी जे काही सर्वोत़्कृष्ट गाणं होतं ते गुरुदत्तच्या पदरात टाकलं. या गाण्यांनी इतिहास घडवले. आजही भारतीय आणि अभारतीय रसिकसुद्धा गीताच्या आवाजातील या वैविध्याने भारलेले आहेत. तिच्या मनाचा अस्वस्थपणा, तिची वेदना, तिची तडफड, तिचा एकटेपणा तिच्या आवाजातून, तिच्या गाण्यातून थेंबाथेंबाने बरसत राहीला, झिरपत राहीला....

‘बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना...हाँsssss बड़े धोखे हैं...बड़े धोखे हैं, इस प्यार में’ ( http://youtu.be/A35PbjcKoBA) ती जिव तोडून गात राहीली. पण तिच्या नशिबात तेच होते. तिच्या वैयक्तीक आयुष्यात देखील तिला तिच्या प्रेमाने धोकाच दिला. ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, ज्याच्यासाठी आपलं सर्वोत्कृष्ट गाणं दिलं तो गुरुदत्तच वहिदाच्या नादाने तिच्याकडे पाठ फिरवून निघून गेला आणि तरीही गीता गातच राहीली...

‘ये लो मैं हारी पिया, हुई तेरी जीत रे।‘ ( http://youtu.be/piSnt5pj5XI )

गीताने आपल्या कारकिर्दीत जवळ-जवळ सगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत. पण तिच्या गाण्यांमध्ये जास्त प्राधान्य दिसून येतं ते प्रेम आणि विरहभावनेला. मग ते 'भाई-भाई' मधलं 'ए दिल मुझे बता दे..तू किसपें आ गया है' असो वा प्यासातलं 'आज सजन मोहे अंग लगा ले' असो, गीताने आपल्या प्रत्येक गाण्याला नेहमीच पुर्णपणे न्याय दिलेला आहे. पण 'गीता' स्वतः मात्र आयुष्यभर एकच गीत मनोमन गात राहीली असावी...

'कैसे कोइ जिये, जहर है जिंदगी' (http://youtu.be/oXLtgfjSAbQ )

त्या दु:खातच कधीतरी, कुठल्यातरी बेसावध क्षणी ती नकळता मद्याच्या आहारी गेली आणि त्यातच शेवटी बुडून गेली. 'साहिब, बीबी और गुलाम' हा चित्रपट जरी 'मीनाकुमारीच्या' अभिनयासाठी ओळखला जात असला तरी या चित्रपटाच्या गाण्यात खरं त्याचं यश सामावलं होतं. पतीने केलेला विश्वासघात, एकटेपणाची ती आर्तता, 'छोटी बहु'ची वेदना 'गीता'च्या आयुष्यात भरून सामावलेली होती. साहजिकच सगळा दर्द तिच्या गाण्यात उतरला नसता तरच नवल. आपली सगळी वेदना एकवटून गीता गायली...

"न जाओ सैय्या..., छुडाके बैय्या, कसम तुम्हारी मै रो पडूंगी...जाने ना दूंगी.." ( http://youtu.be/TCDbIT13MRY )

या गाण्याने मीनाकुमारीला हिंदी सिनेसृष्टीत आणि रसिकांच्या मनात अजरामर केले पण एवढी आर्त आळवणी करुनही गीताचा पिया काही तिच्याकडे राहीला नाहीच. तो आधी वहिदाकडे आणि नंतर काळाच्या गर्तेत दूर कुठेतरी तिला एकटीला सोडून निघून गेला.

त्यानंतर आलेलं १९५६ साल गीताच्या कारकिर्दीत अतिशय महत्त्वाचं ठरलं. 'हावडा ब्रीज' साठी ओ.पी. नय्यरने एक वेगळीच पण कठीण धुन तयार केली. त्याने गीताला हे गाणे देवु केले. खरेतर गीताला स्वतःलाच ती या गाण्याला न्याय देवु शकेल याबद्दल खात्री वाटत नव्हती. कारण पाश्चात्य संगीताबरोबर स्वतःचे सुर जमवून घेण्याचा प्रसंग आजवर कधी आलाच नव्हता. पण ओपीला पुर्ण विश्वास होता की या गाण्याला कोणी व्यवस्थीत न्याय शकेल तर फक्त 'गीता दत्तच'. ओपीवर विश्वास ठेवुन गीताने हे आव्हान स्वीकारले. त्यासाठी तीने अनेक पाश्चात्य गायिकांची गाणी अगदी बारकाईने ऐकली, अभ्यासली. पण ते बारकावे तसेच्या तसे आपल्या गाण्यात न आजमावता तीने ते आपल्या गायनशैलीनुसार बदलून घेतले आणि जन्माला आलं एक अफलातुन गाणं...

"मेरा नाम चुन चुन चू..., चुन चुन चू..., रात चांदनी मै और तू, हॅल्लो मिस्टर हाऊ डु यु डू?" ( http://youtu.be/lVKEMOenP-o ) आपण या पद्धतीची गाणीदेखील गाऊ शकतो ही गोष्टच तीला प्रचंड आत्मविश्वास देवुन गेली. ओपी ने खर्‍या अर्थाने गीता दत्तला तिच्या ताकदीची जाणिव करुन दिली असे म्हणायला हरकत नसावी. या जोडीने हिंदी सिनेसृष्टीला आणि आपल्यासारख्या सामान्य रसिकांना एकाहुन एक अजरामर गीते दिली...

सुन सुन सुन जालिमा, (रफीसाहेब आणि गीतादत्त http://youtu.be/Ws4_dxK3Q3A )
बाबूजी धीरे चलना, (http://youtu.be/A35PbjcKoBA )
ये लो मै हारी पिया ( http://youtu.be/piSnt5pj5XI )
मोहब्बत कर लो जी भर लो, (http://youtu.be/e1BsXULRl-U सहगायक रफीसाहेब),
ठंडी हवा काली घटा, (http://youtu.be/unxd92NgGm()
जाने कहां मेरा जिगर गया जी, (http://youtu.be/9mXnOybU3T0 सहगायक रफीसाहेब)
आंखो हीं आंखो मे इशारा हो गया, (http://youtu.be/6ialHMUFvlE )
जाता कहां है दीवाने (सीआईडी-1956),
मेरा नाम चिन चिन चु (हावड़ा ब्रिज-1958),
तुम जो हुये मेरे हमसफर (12ओ क्लाक-1958),

पण जरी ओपीने गीताला एक नवे रुप, एक नवे स्वरुप दिले असले तरी गीताचा आवडता संगीतकार सचीनदाच होते. सचीनदांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गीताने अनेक लोकप्रिय गाणी दिली. ही यादी खुपच मोठी आहे. तरी त्यातली माझी आवडती गाणी म्हणजे..

मेरा सुंदर सपना बीत गया (दो भाई- 1947 http://youtu.be/zaka9-uC0S4 )
तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना दे (बाजी-1951)
चांद है वही सितारे है वही गगन (परिणीता-1953 http://youtu.be/tffJfUEaT7M )
हम आपकी आंखों मे इस दिल को बसा लें तो ( http://youtu.be/8UkEcMxjGO8 प्यासा-1957)
वक्त ने किया क्या हसीं सितम ( http://youtu.be/MZ3S4-bm70s कागज के फूल-1959)

And last but not the least...

जाने क्या तुने कहीं जाने क्या मैने सुनी (http://youtu.be/mLGCAGHNTJU प्यासा ) हे गाणं पाहताना काय बघु आणि काय ऐकु असं होतं. गुरुदत्तचं अप्रतिम दिग्दर्शन, वहिदाच्या चेहर्‍यावरचे अवखळ तरीही लाजरे भाव, सचीनदांचं दुसर्‍याच विश्वात घेवुन जाणारं संगीत आणि गीताचा लाडीकपणे थेट हृदयाला हात घालणारा दैवी आवाज. हाय कंबख्त... इस एक गानेपें सारी जिंदगी निसार कर देनेको दिल करता है!

1957 नंतर मात्र गीताच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. गुरुदत्तने तिच्या वैयक्तीक आयुष्यात, तिच्या कामात फारच रस घ्यायला सुरुवात केली. स्पष्ट शब्दातच बोलायचे तर ढवळाढवळ करायला सुरुवात केली. गीताने फक्त आपल्याच चित्रपटात गायला हवे हा अतिशय अव्यवहारी आणि निर्दय हट्ट गाजवायला त्याने सुरुवात केली.गाण्यावर जिवापाड प्रेम असलेल्या गीताने आधी याला विरोध केला खरा, पण नंतर ती नशिबाला शरण गेली. मग हळु-हळु इतर दिग्दर्शक, संगीतकार तिला आपल्यापासून दूर करायला लागले. पण गुरुदत्तची ढवळाढवळ खुपच वाढली होती. संगीत आणि गायन हेच पहीलं प्रेम असलेल्या गीताच्या सहनशक्तीलाही काही मर्यादा होत्या. त्याच दरम्यान गुरुदत्तचं नाव वहिदा रेहमानबरोबर जोडलं जाऊ लागलं होतं. ते मात्र गीता दत्त सहन करु शकली नाही आणि शेवटी नाईलाजाने तीने गुरुदत्तला सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. पण मला वाटतं गीताने पण गुरुदत्तला ओळखण्यात चुकच केली होती. गुरुदत्त अतिशय मनस्वी कलावंत होता. वहिदाच्या प्रेमात पडण्याचं कारण तिचं सौंदर्य नसून तिच्यात त्याला गवसलेला त्याच्याच सारखा मनस्वी कलावंत होता. काही दिवसांनी वहिदाही त्याला सोडून गेली आणि गुरुदत्त आतुन तुटत गेला. मद्याच्या आहारी गेला. शेवटी १० ऑक्टोबर १९६४ रोजी झोपेच्या गोळ्या घेवुन त्याने स्वतःचे जीवन संपवले. गुरुदत्त गेला मात्र त्याबरोबर गीताही संपली. तीने अगदी मनापासुन प्रेम केले होते गुरुदत्तवर. त्या धक्क्याने ती ही तुटत गेली, आपलं एकटेपं, ते तुटलेपण लपवण्यासाठी तीनेही शेवटी दारुचाच आधार घेतला. गुरुदत्तच्या मृत्युनंतर मात्र तिची अवस्था खरोखर खुपच वाईट बनली. बाकी निर्माता-दिग्दर्शकांनी तर तिच्याशी संबंध तोडले होतेच. आता गुरुच्या मृत्युनंतर त्याची कंपनी त्याच्या भावांच्या हातात गेली. त्यानंतर गीताला तिथेही काम मिळणे बंद झाले. तेव्हा गीताला आपले कुटुंब, आपली मुले यांच्या अस्तित्वाची जाणिव झाली. गीता आणि गुरुदत्तला एकुण दोन मुले आणि एक मुलगी होती. तरुण, अरुण आणि नीना. गुरुदत्त गेला तेव्हा धाकटी नीना अवघी दोन वर्षाची होती.

5

आपल्या मुलांसाठी म्हणुन गीताने पुन्हा फिल्म इंडस्ट्रीचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली.

याच दरम्यान तीला बंगाली चित्रपटांतुन संधी मिळाली. काही प्रमाणात पुनश्च आपले बस्तान बसवण्यात ती यशस्वीही झाली. तीने गायलेली काही लोकप्रिय बंगाली गीते..

तुमी जो आमार (हरनो सुर-1957)
निशि रात बाका चांद (पृथ्वी आमार छाया-1957)
दूरे तुमी आज (इंद्राणी-1958)
एई सुंदर स्वर्णलिपि संध्या (हॉस्पिटल-1960)
आमी सुनचि तुमारी गान (स्वरलिपि-1961)

गीता दत्त : विकीवर (http://en.wikipedia.org/wiki/Geeta_Dut )

मी सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे गीता हे कधीही न उलगडलेलं एक कोडं होतं. कुठली गीता दत्त खरी मानायची? "मैं तो गिरिधर के घर जाऊं" म्हणणारी प्रेमविव्हळ प्रेमदिवाणी की "ओह बाबू ओह लाला" म्हणत एका लहान मुलाच्या, लाडिक आवाजात गाणारी एक गायिका. अगदी "आओगे ना साजन, आओगे ना" सारखं शास्त्रीय संगीतावर आधारीत गीत गातानाही गीताची मधुर लय हरवत नाही किंवा तीने मास्टर धनीरामसाठी गायलेली "बाट चलत नयी चुनरी रंग डारी" ही ठुमरीही तेवढीच वेड लावते. आणि हीच गीता दत्त "ना यह चाँद होगा ना तारे रहेंगे मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे" देखील गाते. व्हर्सटालीटी अजुन काय असते? जोगन मधलं "चन्दा खेले आँख मिचौली बदली से नदी किनारे, दुल्हन खेले फागन होली" तसंच साधना मधलं "तोरा मनवा क्यों घबराये रे" ही गाणी आठवताहेत? या गाण्यांमधुन गीताने आपला अनुभव आणि अधिकार जणु निर्विवादपणे सिद्ध केला होता.

1

अजुन बरीच गाणी आहेत. तिच्या मनापासून आवडलेल्या गाण्यांची यादी कधीही न संपणारी आहे. शेवटपर्यंत, अगदी गुरुदत्त गेल्यानंतर देखील ती नऊ वर्षे अजुन एक डाव आजमावत राहीली. पण आता तब्येतही साथ देइनाशी झाली होती. हळु हळु गीताने गाणं बंद करत आणलं. जवळ जवळ ३० वर्षे आपल्या रसिकांना वेड लावणारा हा जादुई आवाज २० जुलै १९७२ रोजी आसमंतात विलीन होवून गेला.

***************************************

तळटीप : छायाचित्रे आणि माहिती आंतरजालावरून साभार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलंय!!

गीता दत्त या सुरेल आवाजाच्या नशिबी शेवट मात्र इतका दु:खद आला असेल हे माहित नव्हतं...

बादवे, काल तुमचा ब्लॉग पाहिला.. मस्त संग्रह आहे!
अभिनंदन! Happy

खुप छान लिहिलयस विशाल.. आणि खुप जुन्या गाण्यांना उजाळा मिळाला.. मस्त वाटलं .
बहुतेक कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य हे कमी अधिक प्रमाणात विस्कटलेलच असतं नाही? Sad
पण गीताच्या गाण्याबद्दल तुझे आभार...

विशाल,छानच लिहिलयस. Happy
१९७१ सालच्या 'अनुभव' या सिनेमातली तिने गायलेली ३ गाणी पण उत्कॄष्ट आहेत.
कोई चुपके से आके....
मेरा दिल जो मेरा होता.....
मुझे जाँ ना कहो.....
या सिनेमाला संगीत गीत दत्तच्या भावाने, कनु रॉयने दिलं होतं.

गीता दत्त मला माझ्या बाबांमुळे माहित झाली. ती त्यांची आवडती गायिका होती.

छान लेख. वरील सर्वच गाणी अतिशय आवडती आहेत. अगदी लहानपणी एकलेली.

अतिशय सुरेख लिहिलंस रे विशाल.....
कसला युनिक आवाज लाभला होता गीता दत्तला ....
पण किती दुर्दैवी होती वैयक्तिक जीवनात....

छान लेख.. माझी पण आवडती गायिका..

पिया ऐसो जिया में पण छान आहे...त्यातली मीनाकुमारी खूप सुंदर आहे Happy

मराठीत सुद्धा तिची गाणी असावीत. एक 'जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला' हे तर आहेच, शिवाय 'उदे उदे ग उदे मागते अंबाबाईचा जोगवा' हेही असावे.

जुन्या हळव्या आणि काळाच्या ओघातही कधीही पुसून न जाणार्‍या आठवणीतील एक रसरशीत नाव म्हणजे "गीता दत्त". आत्ता विशालचा हा लेख वाचून....त्यातील एक-न्-एक गाणे माहीत असूनसुद्धा.....मन परत त्या "डाऊन मेमरी लेन" मध्ये जाऊन तिच्या आवाजाच्या जादूला शोधत राहिले....अन् हा प्रतिसाद लिहिताना तिचा तो गर्भरेशमी आवाजही सोबतीला हवाच म्हणून मग हार्डडिस्कमध्ये स्टोअर करून ठेवलेले.....'उसकी कहानी' मधील गाण्यातील तिचा दर्द हळुहळू उलगडत जात आहे :

"आज की काली घटा, मस्त-मतवाली घटा
मुझसे कहती है कि प्यासा है कोई
कौन प्यासा है, मुझे क्या मालूम ....."

~ कैफी आझमी याना माहीत नसेल कदाचित की 'कौन प्यासा है...' पण हृदय पिळवटून टाकत गाणे म्हणणार्‍या गीताला नक्की माहीत होते की प्यासी हरीण तिच आहे.....१९६६ चा पण पडद्यावर न आलेला "उसकी कहानी"..... गाणे चित्रीत झाले होते राजेश खन्नाची एके काळची जोडीदारीण अंजू महेन्द्रूवर. खरे तर या गाण्यातील वेदना सर्वार्थाने गीताच्याच, कारण या गाण्याअगोदरच गुरु दत्त निघून परत न येणार्‍या प्रवासाला गेला असल्याने '....मेरा सुंदर सपना बित गया' आळविण्याचे दिवस गीताच्या ललाटी आलेच होते....

"प्यासी आँखों में मुहब्बत लेके
लड़खड़ा जाने की इजाज़त लेके
मुझसे बेवजह शिकायत लेके
दिल की दहलीज़ तक आया है कोई
कौन आया है, मुझे क्या मालूम
आज की काली घटा ..."

~ तिची आँखे खरेच नेहमी प्यासीच राहिली होती.....प्रेम तर होतेच सख्यावर, पण तोच सखा आपल्या मनाची घालमेल घालविण्यासाठी दुसरीचे उंबरठे झिजवत होता आणि ते असहायपणे पाहाण्याची वेळे गीतावर आली होती....तिच्या 'दिलकी दहलीज तक आया है कोई...." ही फक्त आशाच राहिली होती....वाटत असणार नक्की तिला की तो परतेल....आणि 'आज की काली घटा....' कायमची दूर होईल. पण नियती हे घडू देणार नव्हती.

"...मेरे एहसास के आइने में
इक साया नज़र आता है कोई
किसका साया है, मुझे क्या मालूम
आज की काली घटा ..."

~ होय...'इक साया नजर आता है कोई....". कैफीनी ओळखला होता तो 'साया" जो गीतालाच नव्हे तर त्या सायेच्या मागे वेडापिसा होऊन धावणार्‍या गुरूलादेखील नाहीसा करणार आहे....'काली घटा....' कायमपणे गीताच्या आयुष्याला व्यापून राहिली होती....आणि त्यातच ती नाहीशीही झाली.

~ उरल्या त्या तिच्या सुंदर, मोरपिशी आठवणी...पुस्तकात जपून ठेवलेल्या. ग्रेसने एके ठिकाणी म्हटले होते...."गीता रॉयच्या आवाजातील चाकूचे रेशमी झळझळते पाते....", वाचताना नकळत उत्स्फूर्तपणे ओठावर आले होते..."व्वा ! क्या बात है !". असे जीवघेणे पाते की ऐकणार्‍याच्या काळजाच्या आरपार गेले तरी वेदना होणार नाही. लताने आमच्या संगीत जीवनात जरी बहार आणली असली तरी गीताविषयीच्या प्रेमाला कधीच ढाळ लागणार नाही याची मनोमन खात्री होतीच. आयुष्यभर अपेक्षांच्या वेदनेची ठसठस हृदयी घेऊनच गाणे म्हणणारी गीता मग "बुन रहे है दिल ख्वाब दम-ब-दम...." अक्षरशः जगली.....तिच्या स्वप्नातली शिवण कधीच पूर्ण झाली नाही आणि हताशपणे म्हणत राहिली :

"वक्त ने किया क्या हसीं सितम...."

~ थॅन्क्स विशाल.

अशोक पाटील

खुप छान लिहिलय. माझी पण अत्यंत आवडती गायिका. फार लवकर गेली. Sad
तिच्या मुलांबद्दल पुढे काही माहिती आहे का विशाल?

सुनिधी....

~ मला जी माहिती आहे त्या जोडप्यांच्या मुलांविषयी ती थोडक्यात देत आहे :

गुरु गीता याना तीन मुले झाली.....१. तरुण १९५४, अरुण १९५६ आणि नीना १९६२. झोपेच्या गोळ्यांचा अतिरेक डोस घेऊन १९६४ मध्ये गुरु दत्त यानी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मृत्युच्या आघाताने गीता इतकी सुन्न झाली होती की त्या भ्रमात पुढील सहा महिने तिने आपल्या मुलांना ओळखले नव्हते. गुरु दत्त यांच्या चितेला अग्नीही तरुणने नव्हे तर बंधू आत्माराम यानी दिला होता. पुढे १९७२ मध्ये गीताच्याही मृत्यूने ही तिन्ही मुले तशी उघडीच पडण्याचा धोका झाला होता, पण मामा {मुकुल रॉय} यानी तरुण आणि अरुण यांची जबाबदारी स्वीकारली तर छोटी नीना मग काका आत्माराम पदुकोण यांच्याच घरी लहानाची मोठी झाली. तिन्ही मुलांच्या दृष्टीने त्याना बाप असूनही नसल्यासारखाच होता, त्यामुळे या तिघांनीही आपल्या आईच्याच स्मृती जपून ठेवल्या. तरुणच्या मते तर "आम्हाला कधी गुरु दत्त दिसले न दिसले अशाच स्थितीत असायचे....फक्त आईकडेच आम्ही पाहात असू."

दुर्दैवाने थोरला तरुणही पुढे बापाच्याच वळणावर गेला आणि त्यानेही १९८० मध्ये एका नैराश्येपोटी आत्महत्या केली. मात्र अरुण आणि नीना यानी पुढे स्थैर्य मिळविले. नीनाने मुस्लिम धर्म स्वीकारला....तिने अभिनेता मेहमूद यांच्या भाच्याशी नौशाद याच्याशी {मिनू मुमताज यांचा मुलगा} प्रेमविवाह केला. अरूण हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत टेक्निशअन म्हणून काम पाहतो.

गुरु-गीताची नात नफिसा गायिका म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करीत आहे.

~ अशोक पाटील

अरे!
मस्त लेख.
तसा माझा अन चित्रपटांचा फारसा संबंध नाही. फार कमी सिनेमे पाहिलेत आयुष्यात. पण यानिमित्ताने आठवलं.
लहानपणी किर्लोस्कर, स्त्री अशी दोन मासिके असत. तिसरे मनोहर नंतर निघाले. त्यांत सिनेमांबद्दल, त्यातल्या नट-नट्यांबद्दल, किंवा नाटक/शास्त्रीय संगिताबद्दलचे असे लेख असत. मुंबईला पळून येऊन नशीब काढणार्‍या तार्‍यांचे. किशोरकुमारच्या झक्की घराचे. गळ्याएवढ्या पाण्यात संगमावर रियाज करणार्‍या भीमसेनांचे.. अलिबाबाच्या गुहेत गेल्यासारखे वाटत असे..
नव्याच आलेल्या कापसाच्या डोंगरएवढ्या ढिगार्‍यावर झाकलेल्या 'झोर्‍या'वर पडून दिवाळीच्या सुट्यांत ते अंक वाचण्याची गम्मत काही वेगळीच होती.
तितकाच छान लेख. ती सुंदर आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

अशोक काका,
ते जे "टिल्डे" म्हणवणारे चिन्ह आहे ना --> ~ असे?
त्याचा अर्थ 'रफ-ली', 'आदमासे' असा होतो.
तुम्ही तुमच्या नावाआधी नका लिहीत जाऊ बरे! पहिल्या वाक्यासमोर शोभले ते Happy

वाह.... आवड मेहनत लगन .... सारे काही लेखात झळकलेय...
आवडला लेख, बरीच माहितीही पदरी जमा झाली..

एक सहजच, अंड्याचे निरीक्षण - गीता दत्त वर लेख मात्र यातील गुरुदत्तचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो जाम भाव खाऊन जातोय राव. Happy

अतिशय सुरेख आढावा.
काही सुंदर गोष्टींच्या मागे इतका 'इतिहास' असतो, कहाणी असते हे माहीतच नसतं.
गीता दत्त माझी ही फेवरिट गायिका.
आशुतोषने उल्लेख केलेलं 'मेरी जाँ, मुझे जाँ ना कहो....' माझं विशेष आवडतं गाणं.

ऑल राईट डॉक्टर.....

ती सवय { ~ } कशी लागली याचा मागोवा घ्यायचा झाल्यास आमच्या ऑडिट खात्यातील काही सवयीचा उल्लेख करावा लागेल, पण इथे या सुंदर 'गीता' धाग्यावर त्या सवयींबद्दल लिहिणे अनावश्यक तर होईलच शिवाय त्या आकडेवारींचा विचारही अन्य वेळी नको वाटतो.

थोडक्यात ओल्ड हॅबिट डाय हार्ड असे जे म्हणतात त्या अनुषंगाने ती ~ सवय पडली असे म्हणतो. पण तुम्ही सांगितलेली सूचना इथून पुढे लक्षात ठेवीन हे नक्की.

[किस्त्रीमचा उल्लेख आवडला.....दत्ता सराफांनी 'मनोहर' कॉलेजकुमार/कुमारीत खूप लोकप्रिय केले होते त्याची आठवण झाली.]

अशोक पाटील

Pages