येऊन जा तू

Submitted by श्रावण१८ on 30 November, 2012 - 09:08

आठवांच्या महाली आज येऊन जा तू
पावलांची निशाणी भेट देवून जा तू

घाव राहो उराशी लाख दुखरे ऋणाचे
आसवांची उधारी रोख फेडून जा तू

तोल ढळता जरासा सावरावे कसे मी
एकदा फक्त हाती बोट देऊन जा तू

स्पर्श थंडावलेला शब्दही गोठलेले
आग माझ्या चितेची आज शेकून जा तू

खेळ नवखाच तुजला, कुशल सारे विरोधी
'श्रावणा' हारलेला डाव जिंकून जा तू
@ 'श्रावण' - ३०/११/२०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा
बेफीजीन्शी सहमत ! मला ; 'शेकून जा तू'...... हा शेरही फार आवडला

ही मात्रावृत्तात आहे ना ? मला मात्रावृत्तात गझला करायला जास्त जमत नाही. एक तर मात्रा बरोबर आल्यात का हे मोजत बसावे लागते त्याचा कन्टाळा येतो अन मला यतीही पाळता येत नाहीत फारसे
असो; गझल छान आहे

श्रावण!
खयाल छान! वृत्त कोणते आहे हे?

सानी मिसरे आवडले!
तुझी ही गझल आम्ही अशी वाचून पाहिली..........

एवढी कर कृपा....स्वप्नात येवून जा तू!
पावलांची निशाणी एक ठेवून जा तू!!

काळजातील जखमा प्यार सा-या ऋणांच्या;
आसवांची उधारी रोख फेडून जा तू!

तोल ढळतोच माझा, तो कसा सावरू मी?
एकदा फक्त मजला हात देवून जा तू!

पेटली छान शेकोटी किती, ते तरी बघ......
आग माझ्या चितेची आज शेकून जा तू!

हारणे, जिंकणे खेळात चालायचे रे.....
'श्रावणा' हारलेला डाव जिंकून जा तू!

.............प्रा.सतीश देवपूरकर

बेफि सर , वैभव सर, चौधरी सर जी, देव सर ...... सर्व जाणकारांचे मनापासून आभार! हे वृत्त कोणते आहे हे मला माहित नाही. आनंदकंद पासून थोडीशी फारकत घेऊन थोडं वेगळं लिहायचा विचार आला आणि भाव जमले म्हणून लिहिली. आता याला मान्यता देणे न देणे आपणा सर्वांच्या हातात.

मान्यता देणे न देणे आपणा सर्वांच्या हातात.>>>>>>>>>>>>>

मान्यता वगैरे व्यर्थ मुद्दा आहे !!
गझल एक साधन आहे साध्य नाही
तुम्हाला आयुष्यात जे मिळवायचे आहे म्हणून तुम्ही गझल करता ते मिळाल्याशी मतलब राखा
शेर /गझल पेक्षा आयुष्य कामियाब होणे महत्त्वाचे

मला सर म्हणू नका

तोल ढळता जरासा सावरावे कसे मी
एकदा फक्त हाती बोट देऊन जा तू

वाह !!

-----------------------------------------------

वैवकु,
गालगागा लगागा गालगागा लगागा - असे गण आहेत..