मातृदिन : माझ्या आईच्या पध्दतीचा आंब्याचा शिरा

Submitted by दीपांजली on 10 May, 2010 - 02:58
shira

आंब्याचा शिरा:

लागणारा वेळ:
अर्धा तास

साहित्यः
१ वाटी जाड रवा
पाऊण वाटी सजुक तूप
१ वाटी साखर
२ वाटी हापुस अंब्याचा पल्प ( फ्रेश किंवा कॅन मधला)
दीड वाटी गरम दूध
काजु, भिजवलेले साल काढलेले बदामाचे काप, बेदाणे. (प्रमाण आवडी प्रमाणे)
सजावटः
ड्राय फ्रुट्स थोडे मिक्स करायला आणि थोडे सजावटीसाठी ठेवावे.
आंब्याचा सिझन असेल तर आंब्याच्या फोडी.

क्रमवार पाककृती:

१.अर्धी वाटी तूपावर रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
त्यात दीड वाटी गरम दूध घालून रवा छान फुलवून घ्यायचा.
२. फुललेल्या रव्यामधे एक वाटी साखर मिक्स करून रवा नीट हलवून घ्या.
३. साखर मिक्स झाल्यावर हापुस आम्ब्याचा आमरस घाला आणि मग उरलेलं तूप त्यात घालून रवा, आमरस सगळं नीट मिक्स करायचं, गॅस बारीक करून झाकण ठेवायचं.
४. दोन तीन मिनिटांनी वाफ आली कि त्यात काजु, बदाम तुकडे आणि बेदाणे घालून मिक्स करा.
शिरा तयार.
सर्व्ह करताना:
सजावट करताना छान अकाराच्या साच्यातून तूप लावून मुदी कराव्यात आणि फोटोत दाखवल्या सारख्या किंवा आवडी प्रमाणे काजु-बदाम-बेदाण्यांचं डिझाइन बनवून सजावट करावी.

वाढणी/प्रमाण:
खाणार्‍यावर अवलंबून
अधिक टिप्सः
* आंब्याच्या शिर्‍यामधे स्वाद फक्त हापुस आंब्याचाच ठेवावा.
वेलदोडा, केशर अशा गोष्टी अजिबात घालु नये.
* यु.एस मधल्या स्टोअर्स मधे मिळणारा केसर मँगो पल्प अजिबात वापरु नये, त्या पेक्षा रत्नागिरी हापुस, देसाईंचा पल्प मिळतो तो वापरावा.
* कॅलरी कॉन्शस लोकांने पोरशन कंट्रोल करावा पण कमी तूपात अजिबात करु नये, गचगचीत शिरा होईल !
माहितीचा स्त्रोतः
आई :)

हा आईने बनवलेल्या शिर्‍याचा फोटो :
shira2.jpg

Much requested video, finally on my channel ,
माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ +grocery vlog : आंब्याचा शिरा ( आईची रेसिपी):

आवडला तर लाइक करा आणि शेअर करा :)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल आंब्याचा शिरा केला. भारतीय गोड पदार्थांच्या नावाखाली नेहमी गुलाबजाम, खिरी आणि बंगाली मिठाया खाणार्‍या सगळ्या अभारतीयांना प्रचंड आवडला. ब्रिट आणि अमेरिकन जनतेला या पदार्थाचं काय नाव सांगावं हा प्रश्न होता. (Mango gruel? :P)

पुन्हा एकदा, थँक्स डीजे आणि डीजेची आई!

aambyaachaa-shiraa-punhaa-maayboli.jpg

वा मस्तं , मृ !
मी 'मॅन्गो हलवा' च सांगते ़अमेरिकन लोकांना , कारण 'गाजर का हलवा' वगैरे प्रकार माझ्या तरी भारताळलेल्या अमेरिकन फ्रेंड्स ना माहितेय.
टर्किश डिलाइट मधला ' हेलवा' प्रकरण पण माहित असतं लोकांना.

वा मृ! रंग छान दिसतो आहे ..

इकडे (त्या बाळ बटाट्यांच्या भाजीप्रमाणे) सगळ्यांचे शिरे वेगळे दिसत आहेत .. Happy

काल असाच्या असा याच मापाने कृतीने शिरा केला. लईच भारी झाला होता. मस्त रंग आणि मस्त चव!
फक्त मी जरा एक आगाऊपणा केला, तो नडला. शिरा होत आल्यावर त्यात आंब्याचे तुकडे घालून पुन्हा एक वाफ येण्यासाठी झाकण ठेवलं. तर त्या फोडींना रस सुटला, त्यामुळे मला मूदी पाडता आल्या नाहीत Proud
पण नंतर पानात वाढताना वाफ जिरून शिरा छान मुरला होता, आंब्याचा मस्त घमघमाट आणि चव अगदी अवर्णनीय! आमरसापेक्षा शिरा केला ते बरं झालं असं सगळ्यांनी म्हटलं.

आज दुसर्‍यांदा केला हा शिरा. वयोमानानुसार टेस्ट बड्स बदलतात की स्वयंपाक कौशल्य सुधारतं कल्पना नाही पण आज अगदीच ऑस्सम लागतो आहे शिरा. पहिल्यांदा केला तेव्हा फारसा आवडला नव्हता. फोटु काढला आहे. संबंधितांना नैवेद्य दाखवला आहे.

मी ही काल पॉटलककरता हा शिरा ट्राय केला. मस्त झाला एकदम, सगळ्यांना आवडला खूप.
सगळं घालून झाकण घालून शिजवल्यावरही थोडा पातळच वाटत होता. वाटलं बहुतेक बिघडणार पण मग हळूहळू हवेने आळला आणि एकदम मऊ झाला.

मी आज केला होता. सगळ्यांना आवड्ला, कृतीसाठी धन्यवाद. पण आंब्याचा स्वाद मात्र मला कमी वाट्ला, मी देसाई चा पल्प वापरला, पुढच्या वेळी वेगळा पल्प वापरुन बघीन.

मी आज केला. आंब्याचा रस थोडा (कमी होता म्हणुन) कमी घातला. पण मस्त झाला आहे. पुढच्यावेळी प्रमाणात आमरस घालुन करुन बघेन.
रेवाबाईंना तर खुपच आवडला आहे.

धन्यवाद Happy
.

photo(23).JPG

प्रत्येक समरमध्ये ठरवत होते करूया म्हणून, शेवटी काल मुहुर्त लागला. आमच्याकडे जनरली विकेंडला "आम्ची चॉइस" म्हणून जो ब्रेफाला काय करायचं याचा कल्ला असतो त्या पब्लिकला इतका आवडला की त्यांना चॉइस दिली नाही हे कळलंच नाही. मापं आणि कृती तंतोतंत फॉलो करून केल्यास अतिशय सोपी पाकृ आहे. दीपांजली आईला आणि मुख्य आईची पाकृ शिकून इकडे आणल्याबद्द्ल असे तुम्हा दोघींचे आभार्स. Happy

Ambyachasheera.jpg

वेका, फोटो मस्त आहे .. Happy

>> हॅलोविनी लुक

आधी मला वाटल< काय गणपती वगैरे करायचा प्रयत्न केलाय की काय .. पण परत नीट बघितलं तर एकूण थ्रीडी एमोट चांगला आहे, फक्त थोडं डोळे आणि नाक ह्यांचं काय ते बघा असं वाटलं .. Happy

आज ओफीसमध्ये डायवर्सिटी & इंक्लुजन डे सेलेब्रेशन आहे त्यामुळे डायवर्सिटी इन शुगर अशी थीम आहे.
मग परत मँगो शीरा केला आहे

Mango Sheera.jpg

ही रेसिपी बहुदा माझ्यासारख्या स्वयंपाकमठ्ठ व्यक्तीला जमेल असं वाटतंय. अर्थातच एकदा ट्रायल रन घेणारे Proud

तर ४० लोकांसाठी किती प्रमाणात रवा, साखर, दूध, तूप आणि मँगोपल्प लागेल ते कृपया सांगावे. इतरही काही टिप्स देता येत असल्या तर स्वागतच आहे. तसंच एवढ्या मोठ्या प्रमाणात घाट घातला तर कुठे चुकू शकते, काय काय झोल होऊ शकतात तेही सुगरण लोकांनी सांगा कृपया.

आधीच धन्यवाद देऊन ठेवते Happy

Pages