प्रतिसृष्टी

Submitted by मी मुक्ता.. on 20 November, 2012 - 04:01

"छ्या.. आपण नसतं बुवा असं जग बनवलं..."

नेहमीप्रमाणे तो स्वतःशीच विचार करत बसलेला.. हे त्याचं नेहमीचंच होतं. जग जितकं दिसायचं तेवढीच त्यातली विषमता आणि विरोधाभास अस्वस्थ करत रहायचा त्याला. आणि मग आपल्या मनात आपल्याला हवी तशी सृष्टी निर्माण करत रहाणं छंद बनून गेलेला त्याचा.

"म्हणजे, माणसाच्या आयुष्यात आनंद-दु:ख, राग-लोभ, आशा-निराशा सगळं काही हवं, पण इतकं एक्स्ट्रीम काही नको. इतकं पराकोटीचं दैन्य नको, इतका आंधळा सूड नको, ऐश्वर्याची पराकाष्ठा नको आणि असा दु:खाचा गर्ता पण नको.. थोडा फार बॅलन्स हवाच हवा. का म्हणून देवाला असं सुचलं असेल? का त्याला इतकी टोकाची विषमता निर्माण करावी वाटली असेल? आपण जग बनवलं असतं तर असं तरी नक्कीच बनवलं नसतं.."

त्याच्या विचारांची साखळी चालूच होती.

"मग तू बनवून पहा जग.."

कोणाच्यातरी आवाजाने त्याची तंद्री भंग पावली.

"कोण ते.."

"तोच.. ज्याचा तू आत्ता विचार करत होतास.. देव.. सृष्टीचा निर्माता.."

"बरं झालं भेटलास. मला आधी सांग तू जग हे असं का बनवलंस? मला मान्य आहे माणसाच्या आयुष्याचं चित्र पूर्ण करायला सगळ्या चांगल्या वाईटाची गरज आहे पण इतकी पराकोटीची टोकं का बनवलीस तू? मध्यम मार्ग का नाही निवडलास?"

देव किंचितसा हसला, म्हणाला, "अर्रे म्हणून तर मी आलोय तुला भेटायला. बघावं तेव्हा तू हाच विचार करत असतोस की तू असं निर्माण केलं असतंस, तसं निर्माण केलं असतंस. तर आज म्हटलं तुला संधी देऊनच टाकावी. आता तूच निर्माण कर तुला हवं तसं जग."

देवाचं बोलणं ऐकतच राहिला तो. काही वेळ तर त्याचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. पण नक्की कळालं तेव्हा मात्र चांगलाच खूष झाला तो.

"हो तर.. नक्कीच.. का नाही. मी तुला बनवूनच दाखवतो समतोल अशी प्रतिसृष्टी."

देव पुन्हा हसला आणि मग गंभीरपण अर्घ्य त्याचा हातावर सोडून त्याने त्याची निर्मितीक्षमता त्याला दिली. अर्थात तो काही जगात दु:ख, राग, लोभ नसावेतच या मताचा नव्हता. आयुष्य पूर्ण व्हायला सगळं हवंच हे त्याला ही माहितीच होतं. त्याप्रमाणे त्याने माणूस बनवायला घेतला. सगळ्या चांगल्या गुणांसोबत त्याने वाईट गोष्टीही घातल्या. सर्व काही प्रमाणात. काही कमी नाही की जास्त नाही. आणि बघता बघता सगळ्या सृष्टीचा डोलारा उभा राहिला. माणसाला - त्याच्या निर्मितीला त्याच्या कर्मावर सोडून तो आणि देव दोघेही नवीन जगाच्या उलाढाली बघण्यात व्यस्त झाले. त्याला खात्री होती, सगळ्या गोष्टी प्रमाणात घातल्यामुळे अशा टोकाच्या गोष्टी घडणारच नाहीत त्याच्या जगात.

पण मग कळलंच नाही कुठे कसं आणि काय झालं? काही समजायच्या आत तो एका विरोधाभासाने भरलेल्या आणि टोकाच्या भावना आणि गुंतागुंत असलेल्या जगाचा निर्माता बनला होता. गोंधळून तो ईश्वराकडे पहातच राहिला. देवाच्या चेहर्‍यावर आताही तेच मंद स्मित होतं. तो निरखून निरखून पाहू लागला, पुन्हा पुन्हा आठवू लागला. पण सर्व काही प्रमाणातच घातलेलं त्याने. मग इतक्या एक्स्ट्रीमीटीज् कशा आल्या?

सगळं काही प्रमाणात घालूनही आलेली गुंतागुंत पाहून पुरता वैतागून गेला तो. आणि तोच त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याला बोलावतंय. तो लक्ष देवून पाहू लागला. त्याचीच निर्मिती असलेला एक माणूस त्याला आळवत होता. विचार करत होता, "छ्या.. आपण नसतं बुवा असं जग बनवलं..., माणसाच्या आयुष्यात आनंद-दु:ख, राग-लोभ, आशा-निराशा सगळं काही हवं, पण इतकं एक्स्ट्रीम काही नको. इतकं पराकोटीचं दैन्य नको, इतका आंधळा सूड नको, ऐश्वर्याची पराकाष्ठा नको आणि असा दु:खाचा गर्ता पण नको.. थोडा फार बॅलन्स हवाच हवा. का म्हणून देवाला असं सुचलं असेल? का त्याला इतकी टोकाची विषमता निर्माण करावी वाटली असेल? आपण जग बनवलं असतं तर असं तरी नक्कीच बनवलं नसतं.."

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साखळी निरंतर राहणार तर मग!

ललित आवडलं असं नाही म्हणता येणार, पण कल्पनेची भरारी आवडली.

पण मग कळलंच नाही कुठे कसं आणि काय झालं? काही समजायच्या आत तो एका विरोधाभासाने भरलेल्या आणि टोकाच्या भावना आणि गुंतागुंत असलेल्या जगाचा निर्माता बनला होता. गोंधळून तो ईश्वराकडे पहातच राहिला. देवाच्या चेहर्‍यावर आताही तेच मंद स्मित होतं. तो निरखून निरखून पाहू लागला, पुन्हा पुन्हा आठवू लागला. पण सर्व काही प्रमाणातच घातलेलं त्याने. मग इतक्या एक्स्ट्रीमीटीज् कशा आल्या?
>>>
हे सर्व कसं झालं ह्याचा कल्पनाविस्तार जरा अजून खुलवला असता तर मजा आली असती असं वाटलं.

निंबुडा,
ह्म्म्म... त्याचा विस्तार करायचा नाही असंच ठरवलेलं. म्हणजे तिच समजून घ्यायची गोष्ट आहे असं वाटलं मला. माणूस म्हणून आपल्यात असलेल्या चांगल्या वाईट गोष्टींचं प्रमाण सारखच आहे तरी पण माणसाला मन, बुद्धी आहे, भावना अनुभवण्याची तीव्रता वेगळी आहे, आणि यामुळेच इतका मोठा फरक पडतो असं..

छान आहे.

हे सर्व कसं झालं ह्याचा कल्पनाविस्तार जरा अजून खुलवला असता तर मजा आली असती असं वाटलं.

+१

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार.. Happy

हर्षल,
ह्म्म.. पण एक्स्ट्रीमीटीज विषयी किंवा भावनांच्या कोणत्याही तीव्रतेविषयी लिहिणे हा हेतू नव्हताच. सगळे गुण समप्रमाणात असूनही भावनांमध्ये असंख्य छटा दिसतात हे फोकस करायचं होतं.. असं वाटतय की ते पोचलं नाहीये.. Sad

येस, असं झालंय खरं. कारण या लिखाणाचा उद्देश पोचला. पण तो स्वतःशीच समजून घेऊन. तुझ्या लिखाणातून पहिल्यांदा असं झालं की निसटल्यासारखं वाटलं. Happy