सर आर्थर कॉनन डॉयल - 'शेरलॉक होम्स' चे जनक

Submitted by निंबुडा on 15 November, 2012 - 02:03

सर आर्थर कॉनन डॉयल:
220px-Conan_doyle.jpg

'शेरलॉक होम्स' हे पात्र ज्यांना परिचित आहे त्यांच्यासाठी "सर आर्थर कॉनन डॉयल" (Sir Arthur Ignatius Conan Doyle) हे नावही तितकेच ओळखीचे आहे. लंडन स्कॉटलंड यार्ड च्या पोलिस खात्याच्या बरोबरीने लंडनमधील खुनांच्या व इतर गुन्हेगारी घटनांचे धागदोरे शोधण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या 'शेरलॉक होम्स' ह्या जगप्रसिद्ध गुप्तहेर व्यक्तिरेखेचे ते जनक! ह्या लेखकाचा जीवन परिचय करून घेण्यापूर्वी शेरलॉक होम्स विषयी थोडेसे! 'शेरलॉक होम्स' हा सर डॉयल ह्यांच्या कल्पनेतून जन्माला आलेला आणि नंतर त्यांच्या अनेकाविध गुप्तहेर व गुन्हेगारी साहसकथांमधून अभूतपूर्वरीत्या नावारुपास आलेला एक काल्पनिक गुप्तहेर! डॉयल ह्यांनी ह्या व्यक्तिरेखेत असे काही रंग भरले की एक सामान्य दिसणारा माणूस केवळ त्याच्या अलौकीक बुद्धीबळावर असामान्य म्हणून वाचकांमध्ये लौकीक पावला.

सर डॉयल ह्यांचा जन्म एडिनबर्ग, स्कॉटलंड येथे मे १८५९ मध्ये एका आयरीश वंशीय इंग्रज कुटुंबात झाला. वयाच्या नवव्या वर्षापासून सुरु केलेले शालेय शिक्षण त्यांनी १८७६ मध्ये पूर्ण केले. त्यानंतर १८८१ पर्यंत एडिनबर्ग विद्यापीठातून त्यांनी औषधशास्त्राचे शिक्षण घेतले. ह्याच कालावधीत इंग्लंडच्या अॅस्टन, शेफिल्ड ह्या भागांतील वैद्यकीय क्षेत्रांत उपजीविकेपुरते थोडेफार कामही करायला सुरुवात केली. जहाजांवरील शल्यविशारद, इस्पितळांमध्ये वैद्यकीय सेवा, एका जुन्या मित्रासोबत प्लायमाऊथ ह्या भागात चालू केलेली वैद्यकीय सेवा अशा विविध माध्यमांतून १८८२ पर्यंत ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहिले. अभ्यास व काम करून फावल्या वेळात ते अधून मधून लघुकथा (गूढ व साहसकथा) आणि काही वैद्यकीय लेख लिहू लागले. त्यातले काही लेख तेव्हाच्या ब्रिटिश वैद्यक जगतातील बातमीपत्रांमध्ये छापूनही आले होते.

सर आर्थर कॉनन डॉयल (तरुणपणी):
untitled.jpg

मित्राबरोबरची पार्टनरशिप बिनसल्यानंतर १८८२ मध्ये त्यांनी लंडनमध्ये वास्तव्य व स्वतंत्ररीत्या वैद्यकशास्त्राची सेवा सुरू केली. परंतु विशेष बस्तान न बसल्याने व रुग्णांची संख्या अधिक नसल्याने त्यांना पुष्कळ मोकळा वेळ मिळू लागला. ह्याच सुमारास त्यांनी लेखनास पुन्हा सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या लहान सहान कथांकरीता त्यांना प्रकाशकच मिळेनात. १८८६-८७ च्या दरम्यान त्यांनी गुन्हेगारी साहसकथांमधून शेरलॉक होम्स ह्या लाडक्या पात्रास जन्म दिला. ह्या पात्राला घेऊन त्यांची सर्वात प्रथम प्रकाशित झालेली कथा म्हणजे 'अ स्टडी इन स्कारलेट' (A Study in Scarlet). ह्या कथेचे सर्व हक्क (प्रकाशन व प्रसिद्धी) ब्रिटन च्या वॉर्ड लॉक अँन्ड कंपनी ह्या प्रकाशक कंपनीने २५ पाऊंड्स मध्ये विकत घेतले. ही कथा १८८७ च्या "बीटन्स ख्रिसमस अॅन्युअल" ह्या वर्षातून एकदा प्रसिद्ध होणार्‍या अंकात छापून आली. त्या काळच्या प्रसिद्ध 'ग्लासगो हेराल्ड' आणि 'द स्कॉट्समन' ह्या वृत्तपत्रांनी ह्या कथेची खूप वाहवा केली. ह्याच कथेत शेरलॉक होम्स च्या बरोबरीने जन्माला आलेले अजून एक प्रसिद्ध पात्र म्हणजे 'डॉ. जॉन एच. वॉटसन'. सर डॉयल ह्यांच्या नंतरच्या जवळपास सर्वच साहसकथांमधून ही जोडगोळी तुफान चालली. मुळात बर्‍याचशा कथांचे निवेदनच डॉ. वॉटसन ह्या पात्राच्या तोंडचे आहे. (फक्त २ कथांचे निवेदन होम्स ने स्वतः केले आहे व २ कथा निवेदकाने - तिसर्‍या व्यक्तीने सांगितलेल्या स्वरुपात आहेत.) ह्या कथेच्या सुरुवातीच्या प्रकरणांमधला डॉ. वॉटसन व शेरलॉक होम्स च्या प्रथमभेटीचा वृत्तांत फारच रंजक आहे. "२२१ बी, बेकर स्ट्रीट, लंडन" हा पत्ता असलेल्या घरात सह-भाडेकरू म्हणून राहणार्‍या होम्स व डॉ. वॉटसन ह्यांचे मैत्र सर डॉयल ह्यांनी प्रत्येकच कथेतून कमालीचे रंगवले.

होम्स च्या व्यक्तिरेखेत रंग भरताना सर डॉयल ह्यांनी त्यांचे विद्यापीठातील एक शिक्षक डॉ. जोसेफ बेल (ज्यांच्या हाताखाली सर डॉयल ह्यांनी काही काळ कारकुनी व उमेदवारी केली होती) ह्यांना डोळ्यांसमोर ठेवले होते. त्यांनी स्वतः आपल्या ह्या शिक्षकाला लिहिलेल्या पत्रात तसे नमूदही केले होते. परंतु कालांतराने डॉ. बेल ह्यांनीच डॉयल ह्यांना एका पत्रात लिहिले की "शेरलॉक होम्स म्हणजे दुसरे तिसरे कुणीही नसून स्वतः तूच आहेस आणि तुलाही ते चांगलेच माहीत आहे!". सर डॉयल स्वतः एक साहसी व वैविध्यपूर्ण घटनांनी भरलेले आयुष्य जगले. क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ हे खेळ तसेच वकीली, अध्यात्म ह्या विषयांतही त्यांना रुची होती. वैद्यकशास्त्राचा विविधांगी अभ्यास, कायद्याचा अभ्यास, गुन्हेगारी जगाबद्दलचे कुतूहल, वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने होणारा प्रवास व प्राप्त होणारा विविध रुग्णांचा तसेच गुन्हेगारांचा सहवास ह्या सर्वांतून त्यांना होम्स च्या कथा सुचत गेल्या व स्वतः त्याच्या जागी असतो तर समोरच्या घटनेचे कस-कसे संदर्भ लावले असते ह्या विचारप्रक्रियेतून त्यांच्या ह्या कथा वळणे घेत गेल्या. तार्कीक कारणमीमांसा व विश्लेषण करू शकण्याची हातोटी, अचूक निरीक्षणशक्ती, हुबेहूब वेषांतर करण्याची कला, जबरदस्त आकलनशक्ती, उपस्थित व्यक्ती, सद्य घटना व पुरावे ह्यांच्या नुसत्या निरीक्षणातून कालांतरापूर्वी घडलेल्या घटनांची तर्कसंगती लावण्याची कला, केवळ हुंगून रसायने ओळखता येण्याइतका वेगवेगळ्या रसायनांचा गाढ अभ्यास हे होम्स च्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू त्यांनी लेखनबद्ध केले. ह्याशिवाय ह्या व्यक्तिरेखेला त्यांनी थोडी विक्षिप्तपणाची, चळीष्टपणाची डूब दिली. अजागळपणा, सतत कसल्या ना कसल्या तंद्रीत राहणे, खाण्या-पिण्याच्या विचित्र सवयी, कधी कधी थोडा तुसडेपणा अशा होम्सच्या स्वभाव वैशिष्ट्यांची चित्रदर्शी वर्णने वॉटसनच्या तोंडी घालण्यात आलेली आहेत. मुळात वाचकांना होम्स ची ओळख होते तीच वॉटसन कडून आणि मग सगळ्याच कथांमध्ये आपणही होम्स ला वॉटसनच्याच चष्म्यातून वाचत, अनुभवत राहतो.

'शेरलॉक होम्स' - रेखाचित्र
180px-Sherlock_Holmes_Portrait_Paget.jpg

'अ स्टडी इन स्कारलेट' पाठोपाठ वॉर्ड लॉक अँन्ड कंपनी शी करार-मदार करून १८९० मध्ये 'द साईन ऑफ द फोर' (The Sign of the Four) हा 'अ स्टडी इन स्कारलेट' चा पुढील भाग अमेरीकेच्या 'लिपिनकॉट्स' ह्या मासिकात प्रकाशित झाला. 'द साईन ऑफ द फोर' ने प्रसिद्धीझोतात आल्यानंतर सर डॉयल ह्यांनी वैद्यकसेवेला कायमचा रामराम ठोकला व पूर्ण वेळ लेखन करू लागले. वॉर्ड लॉक अँन्ड कंपनी कडून अपेक्षेनुसार योग्य ते मानधन मिळू न शकल्याने त्यांनी ह्या कंपनीबरोबरचा करार मोडला व स्ट्रँड ह्या मासिक अंकातून ते शेरलॉक होम्सच्या लघु साहसकथा लिहू लागले. ह्या कथा कमालीच्या लोकप्रिय झाल्या व सर डॉयल लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले.

तसे बघायला गेले तर त्यांनी फक्त गुप्तहेर कथाच लिहिल्या असे नाही, तर काही ऐतिहासिक सत्यकथा, प्रेमकथा, इतर साहसकथा, वैद्यकीय कथा, काल्पनिक व सत्य विज्ञानकथा असे इतरही बरेच लेखनप्रकार हाताळले. परंतु शेरलॉक होम्स ह्या एकाच व्यक्तिरेखेने त्यांना अमाप प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे उत्तम अॅथलीट, नाविक, कवी, इतिहासज्ञ, युद्ध काळातील वार्ताहर हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतर पैलू जनसामान्यांसमोर कधीच ठळकपणे उठून दिसले नाहीत. होम्स ह्या पात्राला तर जगभरातल्या वाचकांनी इतके डोक्यावर घेतले होते की सर डॉयल ह्यानी 'द फायनल प्रॉब्लेम' (The Final Problem) ह्या १८९३ सालच्या प्रकाशित कथेत अंत केलेल्या होम्स ला कालांतराने त्यांना पुन्हा जिवंत करावे लागले होते. ह्या पात्राला घेऊन केलेले लिखाण 'आता पुष्कळ झाले' असे वाटून कंटाळून डॉयल ह्यांनी उपरोल्लिखित कथेत प्रोफेसर मॉरीयार्टी बरोबरच्या लढतीत होम्स चा शेवट लेखनबद्ध केला होता. वाचकांना ते रुचले नाही. जगभरातून ह्यावर प्रतिक्रिया उठू लागल्या. वाचकांच्या पत्रांचा डॉयल व प्रकाशकांकडे ओघ सुरु झाला. सर्वांचे म्हणणे एकच होते की 'आमच्या लाडक्या होम्स ला पुन्हा संजीवनी द्या!' वाचकांच्या प्रेमाला अव्हेरू न शकलेल्या सर डॉयल ह्यांनी मग आपल्या ह्या अपत्याला १९०१ मध्ये 'द हाऊंड ऑफ द बास्करव्हील्स' (The Hound of the Baskervilles) ही कादंबरी व १९०३ मध्ये 'द रीटर्न ऑफ शेरलॉक होम्स' ह्या कथासंग्रहातून पुन्हा जिवंत केले. पैकी 'द हाऊंड ऑफ द बास्करव्हील्स' ही कादंबरी 'द फायनल प्रॉब्लेम' ह्या कथेच्याही आधी लिहिली होती पण प्रकाशित झालेली नव्हती. होम्सच्या पात्राभोवती त्यांनी एकुण ५६ लघुकथा व ४ कादंबर्‍या इतके लिखाण केले.

'सर आर्थर कॉनन डॉयल' कुटुंबासमवेतः
170px-Sir_Arthur_Conan_Doyle_and_family.jpg

१८८५ साली जिच्याशी लग्न झाले ती पथम पत्नी १९०६ मध्ये निवर्तल्यानंतर त्यांनी १९०७ मध्ये दुसरा विवाह केला. दोन्ही पत्नींपासून त्यांना पाच अपत्ये झाली. १९३० साली वयाच्या ७१ व्या वर्षी क्राऊनबरो, ससेक्स पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.

तळटीपः
१) शेरलॉक होम्स ह्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडल्यानंतर 'शेरलॉक होम्स - द कंप्लीट नॉव्हेल्स अँड स्टोरीज' चे दोन्ही खंड झपाट्याने वाचून काढले होते. तेव्हा पासून ह्या व्यक्तिरेखेचे जनक असलेल्या सर आर्थर कॉनन डॉयल ह्या लेखका विषयी आंतर्जालावरून जमेल तितके वाचन केले होते. विकीपीडीयावरून मिळालेली माहिती व वर उल्लेख केलेल्या पुस्तकाच्या सुरुवातीला करून दिलेला कॉनन डॉयल ह्यांचा परिचय ह्यांना गुंफून हा लेख लिहिला आहे.

२) प्रस्तुत लेखाचा उद्देश सर डॉयल ह्यांचा लेखक म्हणून परिचय करून देण्याचा नसून व्यक्ती म्हणून परिचय करून देण्याचा आहे. त्या अनुषंगाने त्यांचा जीवन कालखंड विचारात घेतला आहे. शेरलॉक होम्स सोडून त्यांचे अन्य लिखाण वाचलेले नसल्याने एक लेखक म्हणून त्यांच्या लेखनशैली चा परामर्श घेणे शक्य झाले नाही.

३) सर्व प्रचि आंतर्जालावरून साभार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम काम केलेस निंबे.

शेरलॉक होम्सची मोहिनी एकदा मनावर पडली की आयुष्यभर ती भूल उतरत नाही.

२२१ बी, बेकर स्ट्रीट या पत्त्यावर अजूनही पत्रं जातात म्हणे.

मला पण शेरलॉक होम्स च्या गोष्टी खूप आवडतात. लहानपणी भा रा भाग्वातांनी केलेले सगळे अनुवाद वाचले होते. गेल्या वर्षी स्कॉटलंड ला गेले होते तेव्हा एका संध्याकाळी तर शेरलॉक होम्स च्या पुस्तकांची फारच आठवण आली. आत्ताच्या भारत वारीत परत तो सगळा संच घेऊन आले आहे. परत वाचायला. आता निवांत क्रिसमस च्या सुट्टीत बाहेर बर्फ पडत असताना घरात छान ती सगळी पुस्तके वाचणार आहे. Happy

फार सुंदर लेख. धन्यवाद.

ज्याना पुस्तक वाचायचा कंटाळा आहे त्यांच्यासाठी युट्युब वर शेरलॉक होम्स चे सगळे चित्रपट आहेत पण सर डॉयल यानी लिहिलेले नॅरेशन वाचणे हा काही विलक्षणच अनुभव आहे. "रेड हेडेड लीग" आणि "ब्लु कारबंकल" माझे आवडते.

माझ्या एका रुमीकडे शेरलॉक होम्सचे एक जाडजुड पुस्तक होते. ते मी वाचायला घेतले पण मला लवकर बोध नव्हता होत म्हणून मी ते खाली ठेवले. आणि त्यावेळेस मी मास्टर्स करत होतो त्यामुळे मला इतर काही झेपत नव्हतं. भारांनी शेरलॉकच्या कथांचा अनुवाद केला हे मला माहिती नव्हते.

मी हि अजून शेरलॉक एकदाही वाचलेलं नाही. पण परवा शेरलॉकचा सिनेमा पाहताना ती तो अजागळ शेरलॉक आणि त्याचा तो अभिनय पाहिला. तोही थोडकाच. निंबीचा हा लेख वाचल्यावर आता शेरलॉक वाचायलाच हवा. निंबे, छान परीचय.

>>>शेरलॉक होम्सची मोहिनी एकदा मनावर पडली की आयुष्यभर ती भूल उतरत नाही.
>>>>=१०० Happy
निंबुडा छान लेख.
सूकी अरे आधी वाच सगळे, मस्त प्रेमात पडशील त्याच्या Happy

बाबु, लिहीच Happy
मलापण एक सविस्तर काहीतरी लिहावं अशी उर्मी आली होती, पण कामाच्या इतर रेट्यात ते एवढ्यात शक्य होणार नाही हे लक्षात आल्याने गप बसले

फार सुंदर लेख.
शेरलॉक होम्स च्या कथा आवडतातच.
त्याच्यावरचे दोन्ही सिनेमे आम्ही चक्क २-३ वेळा थेटरात जाऊन पाहिलेत.
बी.बी.सी. वरही एक मालिका लागायची, त्यातला होम्स जरा आधुनिक आहे, पण छान वाटतो.

आता शेरलॉकच्या व्यक्तिरेखेवर लिहावंच लागेल >>
मलापण एक सविस्तर काहीतरी लिहावं अशी उर्मी आली होती, पण कामाच्या इतर रेट्यात ते एवढ्यात शक्य होणार नाही हे लक्षात आल्याने गप बसले
>>

अगदी अगदी! खरं म्हणजे शेरलॉक वरच लिहायचे होते. २ वर्षांमागे इथे शेरलॉक होम्स नावाने नुसताच धागा चालू केला. नंतर लिहायला मुहूर्तच सापडेना! Sad मग हल्ली हल्लीच नव्याने पुन्हा पहिला खंड वाचायला घेतला आहे. म्हटलं सर डॉयल ह्यांच्यापासून श्रीगणेशा करू! Happy

आज्काल BBC Entertainment वर नवीन serial येते शेर्लोक!
बघाच.. माझी कधीच वेळ जमत नाही.. पण आताच्या शेर्लोक मूवी पेक्षा सरस आहे!

आज्काल BBC Entertainment वर नवीन serial येते शेर्लोक!
बघाच.. माझी कधीच वेळ जमत नाही.. पण आताच्या शेर्लोक मूवी पेक्षा सरस आहे! >> +१

आज्काल BBC Entertainment वर नवीन serial येते शेर्लोक!
बघाच.. माझी कधीच वेळ जमत नाही.. पण आताच्या शेर्लोक मूवी पेक्षा सरस आहे! >> +१
त्याची पहिली सिरिज पाहिलि होति मी २०१० मधे ३-४ च भाग होते, पण एकदम मस्त आहेत, मॉडर्न आहे हा शेरलॉक.
दुसरा भाग कधिपासुन सुरु झाला?

फार सुंदर लेख. होम्सच्या माझ्या आवडत्या कथा - The Red Headed League, Silver Blaze, The Speckled Band, The Problem of Thor Bridge, The Man with Twisted Lip.
किती वेळा पारायणं झाली आहेत काही गणतीच नाही Happy

हा लेख खूप छान लिहीला गेला आहे. लहानपणीच्या कितीतरी आठवणी गोळा झाल्या होम्सच्या ! त्या काळी डॉ. वॅटसनचंही कौतुक असायचं. शाळेतल्या इंग्रजीच्या मास्तरांनी हाऊंड ऑफ बास्करव्हिले मुद्दामून घरी दिलेलं वाचायला (तोपर्यंत इंग्रजी वाचन शून्यच होतं). ती कथा प्रचंड भीतीदायक वाटली होती (आणि डिक्शनरी कशी वापरायची असते हे ही समजलेलं). त्याचवेळी होम्सच्या चातुर्याची चुणूक जाणवलेली. तोपर्यंत असं दर्जेदार लिखाण रहस्यकथांमधे असू शकतं हेच माहीत नव्हतं. खरंच धन्यवाद या सर्व आठवणींसाठी.

>> आणि पडद्यावरचा शेरलॉक फक्त एक आणि एकच - जेरेमी ब्रेट...
+१
मूव्ही/नवीन सिरियल बघण्याची इच्छा होत नाही - त्यात जेरेमी ब्रेट नसल्यामुळे.

लहानपणी एखादे पुस्तक वाचलेसे आठवतेय शेरलॉक होम्सचे... नाव आठवण्याचा प्रश्नच येत नाही..

आता वाचायचे ठरवल्यास मराठी भांषांतरीत असतील ना ही पुस्तके ? ईंग्लिश बाबा काही आपल्याला झेपणार नाही.

जेरेमी ब्रेट >>> +११११११!!! शेरलॉक होम्सची मीही पंखा. लहान असताना मराठीतील अनुवाद वाचले, नंतर मूळ भाषेतील पुस्तके वाचली, सिरियलचे भाग, चित्रपट पाहिले.... त्या शेरलॉकची मोहिनी मनावरून उतरत नाही हेच खरं!

आता वाचायचे ठरवल्यास मराठी भांषांतरीत असतील ना ही पुस्तके ? >>>
अंड्या,

वर अनघा दातार ह्यांनी लिहिलंय म्हणून मला कळलं की भा.रा. भागवतांनी अनुवाद केलाय शेरलॉक च्या सर्व गोष्टींचा. हा अनुवादीत संच कुठे मिळेल का ते पहा. माझ्या वर एका प्रतिसादात नमूद केलेल्या धाग्यावर मंजुडीने ही अनुवादीत कथासंच तिच्याकडे असल्याचे लिहिले होते. काही होम्स कथांचे अनुवाद मनोगत ह्या मराठी संकेतस्थंळावर आहेत. तुम्हाला हवे असल्यास देऊ शकेन!

पण इतके मात्र खरे की बर्‍याचदा अनुवादापेक्षा मूळ ज्या भाषेत कथा लिहिली आहे तीत वाचणे हा जास्त आनंददायी अनुभव असतो. प्रत्येक भाषेची आपली सौंदर्यस्थळे असतात. तसेच त्या देशाच्या संस्कृतीशी, त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचे संदर्भ त्या कथेत असतात. मूळ भाषेतच कथा जास्त खुलून येते त्यामुळे.

काही होम्स कथांचा मराठीत अनुवाद करण्याचा मानस आहे. आत्ता पर्यंत मायबोलीवर २ कथा अनुवादित करून टंकल्या आहेत. इथे त्यांचे दुवे देत आहे.

अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य
कॉपर बीचेसचे रहस्य