मी सोडले

Submitted by श्रावण१८ on 3 November, 2012 - 12:35

रंगविल्या चेहऱ्यांचे सत्य जाणणे सोडले
मी उडत्या पाखरांचे पंख मोजणे सोडले

हे विष देहात ज्यांचे रोज वाहते माझिया
त्या जहरी श्वापदांचे डंख मोडणे सोडले

घाव शरीरी नखांनी जे करी स्वत: आपुल्या
मी जखमांना तयांच्या मीठ चोळणे सोडले

ते रडगाणे तयांचे रोज तेच गाती उगा
मी फुकटे सांत्वनाचे शब्द बोलणे सोडले

कोमलशा भावनांचे ना कुणी इथे सोयरे
आज कुणा 'श्रावणा'ने जीव लावणे सोडले
@ 'श्रावण' (शंकर पाटील) - ०१/११/२०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अजिबातच लयीत नाही वाचता येत आहे ही रचना त्यामुळे मजा येतच नाहीये..
नाही आवडली क्षमस्व !!

असो ....खूप दिवसनी तुमची उपस्थिती पाहून बरे वाटले धन्यवाद

अर्थपूर्ण रचना आहे. पण ही आपण 'कवित' सदरात सादर करावयास हवी होती. गझलेत अक्षरछंद नसतो.

-----------

रंगविल्या चेहऱ्यांचे सत्य जाणणे सोडले
मी उडत्या पाखरांचे पंख मोजणे सोडले

घाव शरीरी नखांनी जे करी स्वत: आपुल्या
मी जखमांना तयांच्या मीठ चोळणे सोडले

ते रडगाणे तयांचे रोज तेच गाती उगा
मी फुकटे सांत्वनाचे शब्द बोलणे सोडले

>>>>> ह्या द्विपदी विशेष आवडल्या.

श्रावण १८ जी : अष्टाक्षरी छंदात गझल नसते हे अनेक जाणकारांचे अन गझलेच्या अभ्यासकांचे मत आहे
माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर माझे सार्वत्रिक मतही तेच असले तरी व्यक्तिगत मत अजिबात तसे नाही
मी स्वत: अश्या गझला करतो असे करायला मला खूप आवडते

कालच ... माझ्या आगामी गझलेसाठी , जी अष्टाक्षरी नाहीये ; एका शेरात मी अष्टाक्षरी छंदाचे एक वैशिष्ट्य जे मला जाणवते ते मांडले आहे ............हा पहा माझा प्रयत्न ........

गझलच्या आकृतीबंधात अवघड दोन ओळी मी
सरल अष्टाक्षरी छंदात अनवट बोलगाणी ती

आता गझलेतल्या अष्टाक्षरी छंदाबाबत माझी निरीक्षणे सांगतो वेळ व इंटरेस्ट असेल तर जरूर वाचा !!

१)सर्वात आधी.... सहसा गझलेत आपण लोक ज्यास अष्टाक्षरी म्हणतो तो नसतोच मुळी!! ....एका ओळीत १६ अक्षरे असतील तर त्यास अष्टाक्षरी कसे म्हणायचे १६ अक्षरी का नाही ??? Happy
असो.......

२).......................
-आठ अक्षरान्चा छंद आहे हा!.. यात त्या आठ अक्षरात आपले शब्द बसवायचे आहेत
- मराठीत शब्द सर्वंसाधारणपणे १ ते ७ अक्षरी असतात त्यापेक्षा जास्त अक्षरे असलेले शब्द फार तुरळक आहेत असे निरीक्षण मी एके ठिकाणी वाचले होते
- आता त्यातही माझे निरीक्षण की २ ते ५ अक्षरी सर्हास वापरले जातात १ ,६ ७ अक्षरी जरा कमीच आहेत (ह्या प्रतिसादातल्या शब्दांवरून पडताळू शकता !!)
-या नुसार एका ओळीत ८ अक्षरे हवीत तर ती कशी बसवायची ?
...... २+२+२+२
.......२+२+४
........२+३+३
........२+१+५ / २+५+१

-अजूनही अनेक वारंवारीता आहेत
.......पण २ अक्षरी शब्दापासून सहसा सुरुवात करावी असे काही अष्टाक्षरी लिहिणार्या जाणकारांचे मत मलाही मान्य आहे म्हणून वरील मुद्द्यात मी तसे हिशेब करून दाखवले आहेत ३/४ अक्षरी शब्दापासून सुरुवात होवू शकते

......३+३+२
.........४+४

यातही ४ अक्षराच्या शब्दाची सुरुवात सहज वाटते (सहज म्हणजे एक फ्लो येतो वाचताना )

-१ अन ५ अक्षरी शब्दाची सुरुवात का टाळायची तर ते अगदी सरळ अन अनवट वाटत नाही असे निदान मलातरी जाणवते

३)अष्टाक्षरी छंदास वाचताना प्रत्येक अक्षर गा सारखे दीर्घ वाचायचे असते मग लय आपोआप मिळते ती लय कृत्रिम असली तरी ती जास्तीत जास्त सहज वाटावी अशी रचना करण्याचा प्रयत्न असावा याच साठी बहुधा मुद्दा क्र २ मध्ये जे लिहिले ते सहसा अनेकजण पाळताना मी पाहिले आहे आणि त्यावरूनच मी ती निरीक्षणे करू शकलो

४) आता तुमच्या रचनेतला एखाद-दुसरा शेर तसा बदलून दाखवतो पहा कसे वाटते ते .... असे .....

विष देहात हे ज्यांचे रोज वाहते माझिया
श्वापदांचे त्या जहरी डंख मोडणे सोडले

रडगाणे ते तयांचे रोज तेच गाती उगा
सांत्वनाचे मी फुकटे त्याना बोलणे सोडले

(>>> शब्द पेक्षा त्याना असे केल्याने मला शेरातला राबता स्पष्ट वाटतो आहे )

५) १६ अक्षराच्या एका ओळीत ८ ,८ अक्षरांचे २ खंड पाडले आहेत ....याचे कारण त्यास यतीसारखे ट्रीट करणे हे आहे या ८व्या अशारावर शब्द पूर्ण होत नसेल तर तेही कसनुसे वाटते यतिभंग झाल्यासारखे ..ज्याने अष्टाक्षरीची सरलता गमावून बसली असे प्रकर्षाने वाटू शकते (हेही वैयक्तिक मत असले तरी .अनुभवजन्यही )

६) माझ्या एका अष्टाक्षरी गझल /रचनेची लिंक देतो आहे रचना व त्यावर आलेल्या प्रतिसादातून झालेली चर्चा जरूर वाचा (हा प्रदीर्घ प्रतिसाद वाचून कंटाळला नसाल तरच बरका उघाच जास्त त्रास नका करून घेवू !! Wink ;))

http://www.maayboli.com/node/34774

टीप :सर्व मते , काही निरीक्षणे वैयक्तिक!!..........हे निष्कर्ष निहित !!.........व्यक्तिगत चिन्तनाच्या पातळीवर का होईना माझे संशोधन अजून चालू आहे..!!

आपली मतेही असतीलच तीही लिहा ...आग्रह !

आपला स्नेह-लाभार्थी !!
वैवकु

कुलकर्णी साहेब, आपला अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून आनंद तर झालाच, माझ्या ज्ञानातही निश्चितच भर पडली. उर्दू फारशी गझलेचा इतिहास दीड दोनशे वर्षांचा असताना बरेचसे नियम मान्य केले जात नाहीत. आपली मराठी गझल फक्त चाळीस पन्नास वर्षांची! आपण अलिखित नियम बरेच पाळू लागलो आहोत. असे माझे वैयक्तिक मत आहे.

अलिखित नियम>>

होय राव !!अशा अलिखित नियमान्ची एक यादी एखाद्या जुन्याजाणत्या गझलकाराने लिहून काढायला हवी असे मला अनेक दिवसापासून वाटते आहे

श्रावण१८, वैभवा!
अष्टाक्षरी व गझल यांबाबतीत थोडेसे बोलतो!
कवितांचे अनेक आकृतीबंध असतात.
जसे मुक्तछंद, ओवी, अभंग, वृत्तबद्ध कविता, विडंबन, गीत इत्यादी.....
प्रत्येक आकृतीबंधाचा एक डौल/नखरा कायदा वा संकेत असतात.
पाळणे न पाळणे व्यक्तीसापेक्ष असते.
या संकेतांना का? असे विचारायचे नसते.
गझल हा एक सर्वांगसुंदर रचनाप्रकार आहे, जो अतिशय कर्मठ असतो.
गझलेच्या अंतरंगाचे व बहिरंगाचेही काही नखरे असतात, ताल असतात, जे लीलया शायराने पेलायचे असतात.
अष्टाक्षरीत ८ अक्षरे असतात, ते अक्षरवृत्त आहे.
आता अक्षरवृत्तात कितीही अक्षरे असू शकतात, जसे ६/८/१२/१६ वगैरे.
पण अशा वृत्तात लिहिलेली रचना फारफार तर गझलसदृश असू शकेल गझल नाही!(संकेतांमुळे)
वृत्त सोडल्यास उरलेले सर्व गझलेचे ताल सांभळून गझलसदृश रचना/शेर लिहिता येतात......उदाहरणार्थ............
अष्टाक्षरीत लिहिलेले आमचे २/३ शेर
(मतल्याचे नव्हे ) खालीलप्रमाणे.......
कोण जाणे कोण माझ्या श्वासाश्वासात वावरे?
काळजाचा उंबरा का क्षणाक्षणाला थरारे?

ओठांवरी झुळकीच्या रुळे ओळखीचे गाणे!
जणू काही वारा मला घाले लाघवी उखाणे!!

वाटेतल्या पाषाणांचे झाले लकाकते तारे....
अवतरले आकाश वाटे भुईवर सारे!
..............प्रा.सतीश देवपूरकर
टीप: वर दिलेले सुटे शेर आहेत.
वैभवा! गझलेच्या अलिखित नियमांची यादी दिली तर लोक म्हणतात आम्ही ते कोळून प्यालो आहोत. सबब आम्ही त्या फंदात पडत नाही तूर्तास तरी!

छान आहे !
श्रावण असा आयडी आणि "मी सोडले" असे शिर्षक त्यामुळे आधी अभक्ष्य भक्षण, अपेयपान, इ. सोडले की काय असे वाटले.

या संकेतांना का? असे विचारायचे नसते.>>>>> मी हे कधीच मान्य करू शकत नाही !!!नवे सन्शोधन कसे होणार मग ??????

प्रा. साहेब माझ्या मते आपण एक हाडाचे प्राध्यापक असल्याने असे बोलत आहात ...पुस्तकात आहे तेच शिकवायचे पाट्या टाकायच्या असे काहीसे म्हणतात आमच्या गावाकडे

मीही ३-४ वर्षापूर्वी फार्मसी कॉलेजात डिप्लोमाच्या विद्यार्थ्याना शिकवायचो मग मी ते सोडून रीसर्चमधे शिरलो कारण मला जाणवले की मी हाडाचा सन्शोधक माणूस आहे (क्लिनिकल रीसर्च ) जे जमते जे आवडते .तेच केले पाहिजे ............

असो !!

मी व्यक्तिशः तुमचे ते वक्तव्य कधीच मान्य करणार नाही यावर मी ठाम आहे !!

सर तुमचे अष्टाक्षरीतले तीनही मतले छान आहेत आवडले

धन्यवाद !!

संकेत जरूर पाळावेत. पण त्यामागे शास्त्रीय नसला तरी तर्कशास्त्रीय आधार जरुर असावा. मांजर आडवे गेले म्हणून तीन पावले उलटे चालणे हा जसा अंधश्रद्धात्मक संकेत काही लोक पाळतात अगदी तसेच गझलेतील काही संकेत पळताना वाटते. का म्हणून विचारायचे नसते, हा अट्टाहास योग्य वाटत नाही. संशोधनात्मक विचारसरणीने नवीन येणाऱ्या वृत्तांचा किंवा छंदांचा आपण किमान विचार केला पाहिजे. नवीन ते सर्व वाईट असे वाटता कामा नये.

आपण सर्व श्रेष्ठीजणांनी माझ्या गझलेच्या निमित्ताने आपले विचार मांडलेत, हे मी माझे भाग्य समजतो. सर्वांचे मनापासून आभार.

खयाल स्वच्छ आणि आशयघन असावेत हेही एक बघता येईल, एवढी चर्चा झालीच आहे तर माझे एक बारीक पिल्लू आपले दिले सोडून.

शास्त्रीय संगीतात, प्रत्येक रागाचे स्वर असतात. आरोह-अवरोह असतात. (कुठल्या स्वरनंतर कुठला स्वर लागायला हवा, कुठला स्वर कुठल्या स्वरानंतर निषिद्ध, ई.) त्या-त्या रागाच्या वेळाही ठरलेल्या असतात. ते तसं का? ह्या प्रश्नाला काहीही अर्थ नाही. अ‍ॅट द सेम टाईम, कुठल्याच रागात नसलेलं गीतही संगीत म्हणवलं जातंच, पण त्याला शास्त्रीय म्हणण्याचा अट्टाहास करावा का? संगीताचे शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम असे प्रकार होऊ शकतात. तसेच लेखनाचेही आहेत, ह्यात गैर काय? गझल हा काव्यप्रकार अक्षरछंदात लिहिला जात नाही, म्हणून गझलच्या आकृतिबंधात अक्षरछंद हाताळूच नये, असं नाहीये. पण तश्या रचनेला 'गझल' म्हणवण्याचा अट्टाहास कशाला? 'कविता' म्हटल्याने तिचं महत्व कमी होतं का? माझ्या मते, नाही!

जर एखाद्याचा देवावर विश्वास नसेल, तर त्याने मंदिरात जाऊच नये! मंदिरात जाऊन तिथे दर्शनास आलेल्यांना काही तरी सांगण्यापेक्षा फार तर इतरत्र आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत की. माणूस झाला म्हणून मंदिरात जाणे बंधनकारक नाही ना? तसेच कवी झाला म्हणून गझल लिहिणेही बंधनकारक नाही.

माझ्या मते अगोदर तो काव्यप्रकार डिमांड करीत असलेल्या आकृतीबंधात व्यवस्थित लिहायला शिकावे आणि मग नावीन्याचा विचार करावा.

सुरूवातीपासूनच नावीन्याचा अट्टाहास करणारा एक कवी माझ्या पहाण्यात आहे ज्याला आजतागायत गझल कधीच लिहीता आली नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे ह्याचीही नोंद घ्यावी.

वैभवा!
या संकेतांना का? असे विचारायचे नसते.>>>>> मी हे कधीच मान्य करू शकत नाही !!!नवे सन्शोधन कसे होणार मग ??????
<<<<<<<<<<<<

काही गोष्टी या
arbitrary/conventional असतात.
म्हणजेच त्या परंपरेने चालत आलेल्या असतात, रिवाजाने आलेल्या असतात. सामान्य माणसे रिवाज पाळतात. रिवाज धुडकावूनही लावले जावू शकातत. रिवाज पाळणारे वा न पाळणारे कुणीच कुणावर कसलेही बंधन घालू शकत नाही.
वैभवा तुझे नाव वैभवाच का ठेवले रे? असा प्रश्न कुणी विचारतो का?
तसेच आहे हे!
संशोधनातही पूर्वज्ञान महत्वाचे असते. गृहितकेही असतातच ना?
नवे संकेतही आणता येतात, पण त्यांस तितके अनुयायीही मिळायला हवेत!
उद्या कुणी म्हटले की, आम्ही मुक्तछंदात गझल लिहिणार, तर काय बोलणार? लिही बाबा.
रसिकमायबाप व काळच त्याचा फैसला करेल.
मुक्तछंदातही जर रसरसलेले काव्य असेल, व अंगात गझल मुरली असेल तर निश्चितच मुक्तछंदातही गझल लिहिली जावू शकेल.
............प्रा.सतीश देवपूरकर

चांगली पोस्ट आहे प्रोफेसर साहेब.

या शिवाय, नुसतेच एखाद्याच्या नव्या प्रयोगाला अनुयायी मिळूनही उपयोग नाही. अनुयायी मिळण्याची इतर अनेक कारणे असू शकतात जी गझलबाह्यही असू शकतात (येथे गझलेचा विषय आहे म्हणून). पण हे कारण महत्वाचे आहे की गझलेचे सर्वमान्य व शतकानुशतकांचे स्वीकारले गेलेले तंत्र योजून खयाल खुलवणे हे आव्हान पेलणे व गझल करणे यात गझल या काव्यप्रकाराचे बरेचसे महत्व समाविष्ट झालेले आहे. निव्वळ प्रयोग म्हणून अष्टाक्षरीत गझल करणे, एक मिसरा उर्दू एक मराठी रचणे, अगदी लहान बहर मुद्दाम घेणे, जुलकाफिया गझल करत बसणे या सर्व बाबी विरंगुळा, मनोरंजनाच्या आहेत. खयालांचा नैसर्गीक प्रवाहीपणा गझलतंत्रात बसवणे यातही मजा असते.

मग भले असे होवो:

नियमांच्या भीतीने बुजली खरी गझल
करत राहिली यमकांची चाकरी गझल

पदर यायचा आहे अजून अर्थाला
माझी आहे अजूनही परकरी गझल

कधीकधी वाचतात ते सांगतील की
कधीकधी 'बेफिकीर' करतो बरी गझल

-'बेफिकीर'!

'तरही गझल' हा प्रकारही त्यातच येतो, मात्र त्यात सर्व गझलकारांचे कसब एकाच गझलेच्या जमीनीवर तौलनिकदृष्ट्या समजते व त्यात गंमत येते म्हणून तो उपयुक्तही ठरतो व रंजकही ठरतो.

विशेषकरून तरही गझल ह्या प्रकाराने गझल शिकू इच्छिणार्‍यांना खूप उपयोग होतो.

बेफिकीर,
सतीशजींचे >>> मुक्तछंदातही जर रसरसलेले काव्य असेल, व अंगात गझल मुरली असेल तर निश्चितच मुक्तछंदातही गझल लिहिली जावू शकेल. <<<

हे म्हणणे आपल्याला पटते का? मला पटत नाही.

गझल हे एक छंदात्मक काव्य आहे. त्यामुळे मुक्तछंदी गझल असू शकत नाही.

मुक्तछंदी गझल असे म्हणता येईल या आकृतीबंधाला
या प्रकारच्या कवितेत गझलेचे अंतरंग, गझलेचा आत्मा, गझलेचे सर्व गुणविशेष असतील, फक्त गझलेचे बहिरंग थोडेसे बदललेले असेल. म्हणजे इथे काफिया/रदीफ/मतला/मक्ता सर्वकाही असणार, फक्त अभिव्यक्ती छंदोबद्ध नसणार!

आता वृत्ताचे बंधन नसल्याने बरीच मोकळीक कवींना मिळेल. असेही ब-याच जणांना वाटेल की, चला आता आपल्यालाही गझललेखनाची हौस भागवता येईल.

पण, मला वाटते तरीही गझलेचा आत्मा/अंतरंग साभाळून कविता लिहिणे, हेही काम सोपे नव्हे!
वाटल्यास पहा प्रयोग करून........

.............प्रा.सतीश देवपूरकर

चर्चा छान चालू आहे धन्यवाद सर्वाना

गझलेचे गझलेचे अंतरंग= माझ्यामते गझलीयत! ही , एखादी कविता अथवा गद्य (काव्यात्मक गद्य) यातही असू शकते त्यासाठी गझलच हवी असे मलातरी नाही वाटत!

_____गझल आधी की गझलीयत आधी(प्राधान्यक्रम /महत्त्व अशा अर्थाने ) अशाप्रकारचे एक विधान सुचते आहे .....:)

गझलेचा आत्मा= माझ्या मते काफिया/ कवाफी केवळ !!

गझलेचे सर्व गुणविशेष = गझलियतभरा खयाल+ वृत्त + काफिया + रदीफ (असेल तर) याने युक्त अश्या दोन ओळी (एक शेर) ..अश्या किमान पाच कविता एकत्र !!...यापेक्षा वेगळे असते काय गझलेत ?????

यात गझलियत नेमके कशास म्हणायचे हे सर्वत्रिकपणे ठरले आहे का याबबत मला माहीत नाही

...कवितेत जसे कवित्व असते त्याच्यापेक्षा गझलियत ही वेगळी सन्कल्पना नसावी असे मला वाटते

आकृतीबनधाशिवाय गझलेत एखादी अशी कोणतीही भावनेला हाताळण्याची खास पद्धत ( खासियत) नाही जी फक्त गझलेत आहे कवितेत नाही.वगैरे .....म्हणजे गझलेचा आकृतीबन्ध सोडला तर गझल कवितेपेक्षा अजिबातच वेगळी नसते

उदा: ढवळे सरान्ची कालपरवाची कविता .......

कधी काळ आपला नाही म्हणून
कधी लोक आपले नाहीत म्हणून.

कधीकधी वाट्ते एखादी रचना 'गझल' असते म्हणून तिच्यातील कवित्वगुणाना लोक गझलियत असे म्हणत असावेत की काय

असो!!

________________________________

मुक्तछंदी गझल असे म्हणता येईल या आकृतीबंधाला>>>>>>>>>> यावरून काही मुद्दे.....

अक्षरछन्दात फक्त लगावली नसते याचा अर्थ तो मुक्तछ्न्दआहे का? ....नाही!! त्यास अक्षरसन्ख्येचे बन्धन आहे..जे खरे पाहता नियमानुसार अक्षरगणवृत्तानाही असतेच (... कुणी पाळत नाही तो भाग वेगळा Wink मात्र हुशार लोकानी यापूर्वीच अशा प्रकाराना सूट घोषित केल्याने ते चालते म्हणे :राग;..... Happy )

छन्द्शास्त्राच्या उगमापूर्वीपासून अक्षरछन्द पाळले गेले आहेत

काव्यात वापरले जाणारे छन्द याची व्याख्यादेखील अक्षरछन्दावरूनच अन् अक्षरछन्दातच करणार्‍याला सुचली असणार !!

अक्षरछन्द आद्य आहेत ,.पुरातन आहेत .शाश्वत आहेत ते अत्यन्त नैसर्गिक आल्हाद देतात .

जगात काव्याची सुरुवात अक्षरछान्दातच झाली आहे ....

एका ऋषीने गण शोधून काढले .....नाव विसरलो....नन्तर ते जास्त प्रचलित झाले अक्षरछन्द मागे पडले [....गण ही अक्षरसन्ख्येवर आधारित एक सन्कल्पना आहे , ग्ण ; अक्षरान्चा समूह...३/४/५ ते ७ अक्षरी गण प्रचलित !!.}

पारशी व झेन्द भाषेत सन्स्कृत प्रमाणेच अक्षरछन्द वापरले गेले आहेत ...नन्तर गझलेचा उगम झाला त्यावेळी ति़अडेही असेच अरकान आधारित छन्द पडले असतील प्रचलीत झाले असतील व लोक जुन्या छन्दाना विसरले असतील ...

मराठीतही विपुल लेखन / सन्तकाव्ये अक्षरछन्दातच आहेत .......

अक्षरछन्द दुरर्‍या प्रकारचे छन्द आहेत दुसर्‍या दर्जाचे नक्कीच नाहीत............मुक्तछन्द मात्र तिसर्‍याचच प्रकारचा व चौथ्याच दर्जाचा प्रकार आहे .....अर्थात वाईट मुळीच नव्हे बरका Happy

असो .........हाय काय नाय काय !!....................मरूद्या !
बाकी मुद्दे वाद घालावा असे नाहीत वाटत .

धन्यवाद !!

वैभव,
तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांशी मी सहमत आहे. पूर्वी अक्षरछंदाबाबत अशीच चर्चा रंगली होती. मी अक्षरछंदात फारसे लिहीत नसलो तरी, अक्षरछंद दुय्यम नाही हे तुमचे म्हणणे योग्य.

तुम्हाला एक गंमत सांगतो,

साधारण ४-५ वर्षांपूर्वी, मात्रावृत्तात लिहिलेली एक रचना मी पुण्यातील एका ज्येष्ठ कवीला दाखविली. त्याने ती चुकीची आहे असे सांगितले. कारण विचारता कळले की यात अक्षरे बसत नाहीत. मी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत होतो की हे अक्षरवृत्त नाही तर मात्रा वृत्त आहे. पण, हे महाशय ऐकायला तयारच नव्हते. इतका त्यांच्यावर अक्षरवृत्ताचा परीणाम आणि केवळ अक्षरे मोजण्याची सवय. मी पुढे त्यांच्याकडे जाणे सोडूनच दिले.

धन्यवाद जोशी साहेब

माझ्या मते आजवर कुणी अक्षरछान्दात गझल लिहिली नाही हे वाक्य गझल शिकताना पाठ केल्याने लोक तसे म्हणत असतील ...
आता मल सान्ग मात्रा वॄत्ते अशीच कधीतरी उगम पावली असतील पण नक्कीच अक्षर्छान्द व अक्षरगणवॄत्ते यान्च्या कितीतरी नन्तर...तरीही गझलेला चालतात मग अक्षरछान्दान्नी काय पाप केले आहे ????
असो पुनश्च धन्यवाद

Pages