मागे राहून गेलंय काहितरी....

Submitted by मुग्धमानसी on 31 October, 2012 - 06:30

असं वाटतंय जणू फार फार महत्वाचं काहीतरी फार फार मागे राहून गेलंय...

किंवा जणू मीच नकळत चालता चालता फार लांब येऊन पोचलेय आणि ते ठिकाण... जिथं मला पोचायचं होतं... ते कधीच मागे पडलंय.

विश्वास बसत नाही... इतकी वर्ष झाली! किंवा विश्वास बसत नाही... 'इतकीच' वर्ष झाली!! असं वाटतंय जणू एक जन्म उलटून गेला!!

मागच्या जन्मातलं आता काहीच आठवत नाही.

जे आठवतंय ते इतके धूसर... कधीकाळी वाचलेल्या एखाढ्या छानश्या कादंबरीतलं एखादं बिन महत्त्वाचं पात्र आठवावं तसं!

विश्वास बसत नाही!!

पण विश्वास ठेवायला हवा. मी ठेवला... त्यांनी ठेवला... म्हणून तर आज मी इथे आहे! नाहीतर...

नाहीतर दुसरीकडे असली असतीस. या जर- तर च्या फंदात सापडलीस तर मात्र आत्ताही कुठलीच राहणार नाहीस!!!

पण मग काय करू मी त्याचं जे मागे राहून गेल्यासारखं वाटतंय? काय आहे ते?... तेही आठवत नाही! आठवलं तरीही कुणाला सांगता येणार नाही. मागता येणार नाही. सांगितलं, मागितलं तरी कुणीही मला ते देऊ शकणार नाही. काय भयंकर चमत्कारिक अगतिकता आहे हि!

पुन्हा मागे जाता येणार नाही का मला आता? कुठल्यातरी मागल्या वळणावर वळले आणि पुढचं पाऊल एकदम नव्याच देशात पडलं. ते वळण कुठलं होतं तेही आता आठवत नाही.

माझ्यातलं हवं- नको बांधून सोबत घेताना खरोखरच झाली होती थोडी गडबड. उडाला होतं माझा बराचसा गोंधळ. काय घ्यावं, काय सोडावं... स्वतःत स्वतःला पुन्हा एकदा नव्याने मांडताना... अंमळ घाईच उडाली होती माझी. त्या गोंधळातच राहिलंय काहीतरी महत्वाचं मागे! नक्कीच!!

मी तरी काय... किती हलगर्जी!!! स्वतःच्या जगाची मांडामांड नीट जमली नाही.. आणि कुणा वेगळ्याचेच जग सजवायला निघाले होते, सज्ज होत होते!! किती लांबवर चालून आले त्या उत्साहाच्या भरात! ते वेगळं जग मनापासून सजवलं पण... स्वताच्या जगाकडे पहायचे लक्षातच नाही आलं! किती लांबवर चालून आले... मागे राहिलंय काहीतरी याची जाणीव अजूनही झालीच नसती... तो उत्साह अजूनही टिकला असता तर!!!

पण आता हि अस्वस्थता आणि बेचैनी काय करू?

कुणीतरी दुरून साद घालून आर्त स्वरांनी मला बोलावतंय असा सारखा भास होतो. पण कुठून? कुठल्या दिशेतून? मी कशी पोहोचू तिथे? कशी पोहोचू मी.... माझ्याच कुठेतरी खूप खोल खोल आत....

राहिलंय खरं काहीतरी महत्त्वाचं मागे.

माझा विश्वास, माझी श्रद्धा.. हे तर आलेच होते स्वतःहून माझी मागोमाग.. सावलीसारखे.

माझं धैर्य आणि संयम.. होतां नव्हता तेवढा तोही घेतलेला गोळा करून.

माझी जीवापाड जपलेली तत्त्व आणि सांभाळलेल्या निष्ठा... त्या तर पहिल्यांदा घेतल्या सोबत!

आणि हो... माझी जिद्द .. ती तर माझ्या अंगभूतच!!! ... मग काय बरं राहिलं?

माझा अहं... तो स्वतःहूनच सोडत होते मागे... पण पाय निघेना तेव्हा सोबतीला थोडा तोही घेतलाच.

सोबत संस्कार घेतले तेंव्हा जोडीला तो स्वाभिमान घेतल्याचं आठवतं का गं?

उमेद घेतली तेंव्हा सोबत शक्तीही नक्की घेतली ना आठवणीने?

आणि हो... माझी जिद्द.. माझी अंगभूत जिद्द... ती गृहीतच धरली ना मी? कदाचित तीच तर...

छे!!! भयंकर आहे हे !!! भीती वाटायला लागलीये आता!!!

असं वाटू लागलंय जणू.... जणू मीच राहिलेय मागे... !!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!

ब्लॉग वरही वाचलं होतंच... थोडा बदल केलास वाटते...छान आहे!

माबोवर स्वागत!

पुलेशु! Happy (पुढील लेखनास शुभेच्छा!!)

छान, खूप सुंदर लिहिलं आहे, असेच काही विचार मनात सुरु होते त्यामुळे अगदी पोचलं, काय लिहू तेच समजत नाही....पुन्हा एकदा "छान!"...

Happy