काही मजेशीर पोर्तुगीज म्हणी व वाक् प्रचार आणि त्यांचे शब्दार्थ

Submitted by दिनेश. on 30 October, 2012 - 06:38

म्हणी म्हणजे कसा भाषेचा अलंकार असतो. अनेक वर्षांचे अनुभवाचे संचित, निरिक्षण, शहाणपण, मोजक्या
चटपटीत आणि बहुदा, यमक अनुप्रासाने युक्त अशा शब्दात ते मांडलेले असते. अनेकदा अनेक शब्दांचे काम,
ते मोजके शब्द करु शकतात.

शेवटी जगभरचा माणूस एकच ना, त्यामूळे अनुभवही तसेच असतात. अनेक भाषांत, ते समान रित्या, म्हणींत
गुंफलेले असतात. पण मला पोर्तुगीज भाषेतल्या काही अनोख्या म्हणी सापडल्या.

अनोख्या अश्यासाठी कि त्याला समांतर अशा, आपल्याकडच्या म्हणी आठवत नाहीत. शिवाय शब्दार्थ जरी
कळले ( ते देतोच आहे ) तरी गर्भित / लाक्षणिक अर्थ कळत नाहीत. या म्हणी मूळच्या ब्राझिलियन पोर्तुगीज
भाषेतल्या आहेत ( अंगोलात तीच बोलतात ) पण माझे इथले मित्र, काही त्यांचे अर्थ मला सांगू शकत नाही.

पण माझ्या मायबोलीकर मित्रमंडळींचे तसे नाही ना, त्यांच्या कल्पनेची भरारी तर गगनालाही भेदणारी आहे,
तर मंडळी, चालवा डोकं... शिवाय काय आहे ना, मी (कुठल्याच विषयामधला ) प्राध्यापक नसल्याने, यमकं
जुळवणे तर मला, याजन्मी शक्य नाही. मूळ भाषेत जी यमके आहेत ती मला शाब्दीक भाषांतरात, आणता
आलेली नाहीत.. तर तेवढं पण कराच

१) A fome é o melhor tempero.

भूकेसारखी फोडणी नाही.. म्हणजे साधारण खायला कोंडा, निजेला धोंडा असा प्रकार. पण इथे जरा वेगळा अर्थ
दिसतोय. म्हणजे आहे ते अन्न, चवदार करण्याचा प्रयत्न !

२) A ocasião faz o ladrão. 

संधी चोर निर्माण करते, किंवा संधी सापडली तर सगळेच चोर असा अर्थ.

३) Águas passadas não movem moinhos. 

वाहून गेलेले पाणी, चक्की चालवत नाही.. असा अर्थ. वाहत्या पाण्याचा उपयोग करुन, किंवा पवनचक्की
वगैरे वापरुन, धान्य दळायची प्रथा, आपल्याकडे कधी नव्हतीच का ? अशी कुठलीही मराठी म्हण,
मला आठवत नाही. वाहिली ती गंगा, राहिलं ते तीर्थ.. चा अर्थ अगदीच वेगळा आहे.

४) Cada macaco no seu galho. 

ही म्हण मात्र आपल्या सर्वांना आवडेल अशी. प्रत्येक माकड आपापल्या फांदीवर.. असा त्याचा अर्थ.
बाकी तूम्ही जाणताच.

५) Cão picado por cobra, tem medo de linguiça. 

साप चावलेला कुत्रा, सॉसेजेस ना तोंड लावत नाही.. म्हणजे साधारण दूधाने तोंड पोळल्यावर, माणूस ताक पण
फुंकून पितो.. असा अर्थ. पण साप, कुत्रा आणि सॉसेज.. हे जरा वेगळं. आणि गोवन लोकांना देखील, सोर्पाटेल
किती प्रिय, ते जाणताच.

६) De cavalo dado não se olham os dentes. 

भेट मिळालेल्या घोड्याचे, दात मोजू नयेत.. याला समांतर म्हण कुठली असेल बरं ? ज्याचं करावं भलं, तो म्हणतो आपलंच खरं, यात हा अर्थ नाही.

७) Dos males o menor. 

(अनेक शक्यतांपैकी,) जी सर्वात कमी नुकसान करणारी होती, ती घडली. ही साधारण, होतं ते चांगल्यासाठीच, अशा अर्थाची.

८) É melhor pingar do que secar. 

अगदीच सुकं असण्यापेक्षा, गळकं असलेलं बरं.... Happy

९) É trocar seis por meia dúzia. 

सहा देऊन अर्धा डझन घेतले.. अशीही काही समांतर अर्थाची म्हण मला आठवत नाही. आवळा देऊन कोहळा
घेतला.. याला वेगळाच अर्थ आहे. आगीतून फुफाट्यात.. याच पण अर्थ वेगळाच.

१०) Errar é humano, continuar no erro é burrice. 

टू अर इज ह्यूमन अँड टु फर्गिव्ह इज डिव्हाईन, या इंग्रजी म्हणीपेक्षा बराच वेगळा अर्थ आहे. एकदा चूक झाली, ते ठिक पण परत परत केली तर तो मूर्खपणा असतो.. आपण सगळे तेच करत असतो, ना !

११) Esmola demais, o santo desconfia 

जास्त देणग्या दिल्या तर संताना संशय येतो... एकंदर संत हे प्रकरण या देशांत भारीच ( कुठे हो गेला यांचा
एकेश्वर वाद ? ) असो तरीही, देणग्यांवरुन संशय घेणारे, म्हणजे खरोखरीचे संत, नाहीतर आपले महाराज.
नाही, म्हणजे त्यांनाही संशय येतोच, म्हणजे मला एवढे देतोय, तर याच्याकडे किती असतील, असा संशय येतो, त्यांना.

१२ ) Ladrão que rouba ladrão tem 100 anos de perdão. 

चोराकडे चोरी केल्यास, शंभर वर्षे माफी मिळते ( शिक्षा होत नाही ).. साधारण चोरावर मोर, किंवा तेरी भी चुप,
मेरी भी चुप.. असा अर्थ.

१३) Macaco velho não mete a mão em cumbuca. 

म्हातारी माकडे, बरणीत हात घालत नाहीत.. ब्यूटीफूल पीपल हा चित्रपट बघितला असेल, तर हे जाणवेल
झाडाच्या ढोलीत वगैरे हात घालताना माकडे, हात आवळून घालतात, पण बाहेर काढताना हाताचा पंजा
मोकळा सोडतात. त्यामूळे हात अडकतो. हात आवळून बाहेर काढणे, सहज शक्य असते, पण त्यांच्या डोसक्यात ते शिरतच नाही. हे शहाणपण येईपर्यंत, त्यांचे वय झालेले असते.

१४) Não cutuque a onça com vara curta. 

बिबट्याला डिवचायचे तर काठी लहान घेऊ नये.. याचा थेट अनुभव मीच घेतला आहे. जाळीच्या दुसर्‍या
बाजूला मजेत लोळत पडलेल्या बिबट्याचा फोटो काढण्यासाठी, मी कॅमेराचे लेन्स जाळीच्या आत घातले,
तर लगेच धावत आला ना बाब्या.. अर्थात असा थेट अर्थ नाही या म्हणीचा.

१५) O olho do dono engorda o porco. 

मालकाला आपले डुक्कर, मोठेच दिसते.. याचा संबंध बाजारात नेऊन डुक्करे विकण्याशी असावा.
पण मलाच का बोलता, माझे लेखन अजिवात जातीयवादी नाही, असे अ‍ॅडमिन साहेबांना, सुनावताना आपला
पण पवित्रा, हाच असतो कि नाही ?

१६) O pior cego é aquele que não quer ver. 

खरा आंधळा तो, ज्याला बघायचे नसते. मला हा अर्थ आवडला. अनेकदा खरोखरीचे डोळ्याने अंध, डोळस माणसाला लाजवतील, असे वागताना / वावरताना आपण बघतोच.

१७) Para quem sabe ler, um pingo é letra. 

वाचायचेच असेल, तर एका बिंदूत पण अक्षर दिसते... हाही अर्थ सुंदर आहे.

१८) Pimenta nos olhos dos outros é refresco. 

दुसर्‍याच्या डोळ्यात गेलेली मिरपूड, आपल्याला थंडावा देते..परदु;:ख शीतल, पेक्षा जरा मजेशीर अर्थ आहे हा.

१९) Pra comer e coçar é só começar. 

खाण्यासाठी आणि खाजवण्यासाठी, फक्त सुरवात करावी लागते.. जरा वेगळाच अर्थ आहे हा. म्हणजे सुरवात
करायचाच काय तो संकोच, पुढे थांबणे अवघड होते, असा अर्थ असावा. पण खाणे आणि खाजवणे, यांची
तूलना मजेशीर वाटली.

२०) Quem conta um conto, aumenta um ponto. 

गोष्ट सांगणारा, आपली भर घालतोच / आपल्या बाजूनेच सांगतो. चार लहान मूलांना साप दिसला, तर
प्रत्येकाला वेगवेगळे विचारून बघा, केवढा मोठा साप होता, असे !

२१) Quem é vivo sempre apareçe... 

जिवंत असतील ते ( नातेवाईक ) पाहुणे म्हणून येणारच.. अचानक टपकायची पाहुण्यांची खोड, तिथेही आहे
म्हणायची.. पण खास करुन दक्षिण अमेरिकेत, पितरांचे कौतूक बघता, जिवंत नातेवाईकांचा, उपहास का
असावा ?

२२) Santo de casa não faz milagre. 

घरचे संत काही चमत्कार करत नाहीत. परत संत / चमत्कार आलेच. पण चमत्कार हे फक्त बाहेरच्या लोकांवर
प्रभाव पाडण्यासाठी. घरच्यांना त्यातली मेख माहित असते किंवा चमत्काराने काही पोट भरत नाही, असाही
अर्थ असेल.

२३) Se conselho fosse bom, não se dava, se vendia. 

ही म्हण, आपल्यासाठी चांगलीच बोचरी आहे. सल्ल्यांना जर काही किंमत असती, तर ते विकले गेले असते ( फुकट नसते मिळाले ).. जास्त काही लिहिण्याची गरजच नाही..

आणि हि शेवटची, पण मला सर्वात जास्त आवडलेली...

पण त्याआधी एक प्रसंग लिहितो.

आम्ही कॉलेजमधे असताना, वाङ्मय मंडळाने एका प्रख्यात शास्त्रीय गायिकेचा कार्यक्रम ठेवला होता.
आम्हा ज्यूनियर लोकांना, जबरदस्तीने श्रोते म्हणून बसवले होते. ती नाखुषी होतीच. शिवाय बाईंना,
श्रोत्यांचा अजिबात अंदाज आला नाही. आधी सा लावण्यात आणि मग अतिविलंबित लयीत बाईंनी
राग पिळ पिळ पिळला.. शेवटी ताल बदलण्यासाठी आणि छोट्या खयालाला सुरवात करण्यापुर्वी, बाईंनी
पाव सेकंदाचा ब्रेक घेतला, त्यावेळी आम्ही लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता..

आता म्हण लिहितो.

२४) Quem sabe, sabe. Quem não sabe, bate palmas. 

ज्यांना कळते त्यांना कळते.... बा़किचे टाळ्या वाजवतात..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१५) O olho do dono engorda o porco.

मालकाला आपले डुक्कर, मोठेच दिसते.. याचा संबंध बाजारात नेऊन डुक्करे विकण्याशी असावा.

>>>आपला तो बाब्या, दुसर्‍याचं ते कार्ट, असा अर्थ असु शकेल का?

मस्त आहेत म्हणी.

Errar é humano, continuar no erro é burrice.
>>> यावरून एक बार गलती करे वो इन्सान. दोबार वही गलतीकरे वो नादान, बार बार वही गलती करे वो पाकिस्तान असा एसेमेस फिरायचा त्याची आठवण झाली.

De cavalo dado não se olham os dentes.
>>> हाच अर्थ असलेली एक कानडी म्हण आहे. आत्ता लगेच आठवत नाहीये पण आईला विचारून बघते.

३) उथळ पाण्याला खळखळाट फार किन्वा barking dogs never bite, empty vessels make noise सारख काहीतरी..

८) दगडापेक्षा वीट मऊ---- ???

गिरिश.....
>>>आपला तो बाब्या, दुसर्‍याचं ते कार्ट, असा अर्थ असु शकेल +१००००

१५) पहिल्यान्दा केली तर ती चूक असते पण परत परत केली तर त्याला मात्र सवय म्हणतात अस काहीस....

१६) न करत्याचा वार शनिवार ----अस असू शकेल का?

१७) पिन्डात ब्रह्माण्ड------ ??

१५) O olho do dono engorda o porco.

मालकाला आपले डुक्कर, मोठेच दिसते..
>>>
आपला तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे
किंवा विरुद्ध अर्थाने
दुसर्‍याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.

२२) Santo de casa não faz milagre.

घरचे संत काही चमत्कार करत नाहीत.
>>>
घर की मुर्गी दाल बराबर! Uhoh
किंवा
रोज मरे त्याला कोण रडे! (थोडक्यात रोजच एखादी गोष्ट होतेय तर तिचे कौतुक/ सोयर सुतक वाटेनासे होणे!)

३) ला ही असू शकते ना : लंकेत सोन्याच्या वीटा. (त्यांचा काही उपयोग नाही या अर्थी)
६) पदरी पडले पवित्र झाले.
मजा आली वाचतांना Happy

८) É melhor pingar do que secar.

अगदीच सुकं असण्यापेक्षा, गळकं असलेलं बरं....
>>>

दिनेशदा, उदाहरण देऊन सांगा ना हे जरा. अर्थ रीलेट नाही झाला Uhoh

३) Águas passadas não movem moinhos.

वाहून गेलेले पाणी, चक्की चालवत नाही
>>>

"जो बीत गया सो बीत गया" (जुने जाऊद्या मरणालागुनी/ जुनी/ गाडली गेलेली मढी उकरून फायदा नाही!) असा अर्थ असेल का?

चक्की चालवायला पाणी उंचावर आहे, तोपर्यंतच चक्र फिरेल, एकदा ते खाली पडून वाहून गेले, तर त्याचा ( चक्की फिरवण्यासाठी ) उपयोग नाही.

त्या ओल्या सुक्याचा अर्थ मलाही लागत नाही, पण नक्कीच एका खाद्यपदार्थासाठी आहे. कदाचित तंदुरीसारखे जे यांचे प्रकार असतात त्यासाठी. ते जर भाजून अगदीच कोरडे केले तर वातड होतात, त्यापेक्षा थोडे ओलेच बरे, असा असणार अर्थ.

बाकी या म्हणी आणि आपले बाफ, यांच्या जोड्या लावायला पाहिजेत.

आणि जेवढी डुकरात चरबी जास्त, तेवढी किम्मत जास्त ना, म्हणजे विकणार्‍याला बाळसेदार तर घेणार्‍याला, वाळके दिसणार. मग किम्मत कशी ठरवायची ?

घोड्याचा आणि दाताचा काहीतरी नक्कीच संबध आहे. घोडा घेताना तो दात मोजूनच घेतात. पण जर भेट म्हणून मिळाला असेल, तर ती चिकित्सा करु नये, असा अर्थ असणार.

सहीच!

४) प्रत्येक माकड आपापल्या फांदीवर..
... म्हणजे अपनी गलीमे कुत्ताभी शेर का?

६) भेट मिळालेल्या घोड्याचे, दात मोजू नयेत.
... don't look a gift horse in the mouth, पण मराठीत काय? बहुतेक आपल्याकडे अशी प्रथाच नसावी Happy आपल्याकडे म्हणजे भेट मिळालेल्या घोड्याचे दात लाउड्स्पिकर वरून सगळ्यांना सांगायचे!!

१६) खरा आंधळा तो, ज्याला बघायचे नसते
... सुंदर

२२) घरचे संत काही चमत्कार करत नाहीत.
... घरकी मुर्गी दाल बराबर?

२४) ज्यांना कळते त्यांना कळते.... बा़किचे टाळ्या वाजवतात..
... Lol

प्रत्येक माकड आपापल्या फांदीवर..
>>>>>>>>>>>>>>
१) हर कुत्ता अपने गली मे शेर
२) आपापल्या चड्डीत राहायचे. जास्त उडायचे नाही.

काय अर्थ घ्यायचा ?

भेट मिळालेल्या घोड्याचे, दात मोजू नयेत.. याला समांतर म्हण कुठली असेल बरं ? ज्याचं करावं भलं, तो म्हणतो आपलंच खरं, यात हा अर्थ नाही.

>>>>>>>>

भिकारी को भीक... जितनी मिली ठीक.. Happy

मस्त माहिती दिनेशदा

भेट मिळालेल्या घोड्याचे, दात मोजू नयेत.. याला समांतर म्हण कुठली असेल बरं ? ज्याचं करावं भलं, तो म्हणतो आपलंच खरं, यात हा अर्थ नाही. >>>> खल्ल्या घरचे वासे मोजु नयेत ?? अस काहितरी

भेट मिळालेल्या घोड्याचे, दात मोजू नयेत.. याला समांतर म्हण कुठली असेल बरं ? ज्याचं करावं भलं, तो म्हणतो आपलंच खरं, यात हा अर्थ नाही. >>>> खल्ल्या घरचे वासे मोजु नयेत ?? अस काहितरी

>>> घोडा विकत घेताना दातांवरुन त्याची परिक्षा करतात. म्हणुन भेट मिळालेल्या वस्तुचा दर्जा विकत घेतलेल्या वस्तुप्रमाणे तपासुन भेटीमागच्या भावनेचा अपमान करु नये असा काहिसा अर्थ असावा.

बेगर हॅज नो चॉईस... गाय बैल घोडा यांचे आयुष्य दातांच्या आरोग्यावर अवलंबून असते.. दात मजबूत असले तर ते भरपूर खातात आणि तगडे होतात... जर दातच किडके, गेलेले असतील, तर ते खाणार कसे? म्हणून असली जनावरं खरेदी करताना दात बघतात म्हणे! ( अरेरे, आधी हे समजले असते, तर बायको आणताना हेच लॉजिक उलटे नस्ते का वापरले? Sad )

पण दान म्हणून मिळाले तर तिथे हा चॉइस नसतो.. किंबहूना दान करताना, आपल्याकडील बाद घोडाच द्यायची पद्धत रूढ असेल ..

आपल्याकडेही ही सिचुएशन आहे.. सत्यनारायणाच्या पूजेला किडक्या सुपार्‍या, कडू बदाम आणि अळ्या असलेल्या खारका मुद्दाम स्वस्तात आणून देतात. आमचा दुकानदारच विचारतो, सुपारी? कोणती ? खायची का पूजेची?

घोडा घ्यायला गेलं की दुकानदार विचारणार. कशाला हवा? बसायला? का दान द्यायला? Proud

>>निंबुडा | 30 October, 2012 - 07:36 नवीन
८) É melhor pingar do que secar.

अगदीच सुकं असण्यापेक्षा, गळकं असलेलं बरं....
>>>

दिनेशदा, उदाहरण देऊन सांगा ना हे जरा. अर्थ रीलेट नाही झाला <<

आमच्या कोकणात एक म्हण आहे.... एखाध्या घरात सुन सारखी कुरकुर/तक्रारी करायला लागली कि...

"पादांदे, पण नादांदे..." Happy

मस्त. मजा आली वाचायला Happy

अगदीच सुकं असण्यापेक्षा, गळकं असलेलं बरं.... >>> काहीच नसण्यापेक्षा एखादी गोष्ट उतू जाण्याइतकी असेल तर केव्हाही चांगलं ( उदा. पैसा ) असा अर्थ असेल का ?

'भुकेसारखी फोडणी नाही' ही म्हण खूप आवडली Happy

एक नंबर आहे हे.

म्हणीं / वाक्प्रचारांची गंमतच असते. त्या त्या प्रदेशातल्या जगण्याच्या संस्कृतीच्या त्या रूपकं होऊन बसलेल्या असतात. त्यामुळे इतर प्रदेशांतल्या म्हणी ऐकून भारी गंमत वाटते, संदर्भ समजले नाही तरी. 'भाकरी मिळत नसेल तर केक खा' हे आपल्याकडे अनेक जणांना रिलेट होणार नाही, पण 'भाकरी नाही मिळत? पुरणपोळी खा!' असं काहीतरी नक्की होईल. त्या पाश्चिमात्य 'टू बी ऑर नॉट टू बी' ला लक्ष्मणराव देशपांड्यांनी पार फिरवून उलटंपालटं करून अगदी खाली आणून ठेऊन 'कस्सं होईल, क्काय होईल..' केलं असावं.

अगदीच सुकं असण्यापेक्षा, गळकं असलेलं बरं
>>>
एखाद्याचं घर गळत असतं समजा, आणि तो वैताग नको म्हणून पाऊस नको येऊ देत म्हणून प्रार्थना करतो, पण तो खरंच येत नाही अन कडक दुष्काळ. मग काय. घर गळू दे बाबा, त्यासोबत खायला तरी मिळेल. - असं असेल.

भिकारी को भीक... जितनी मिली ठीक..
>>
यावरून दोनेक वर्षांपुर्वीची गंमत आठवली. 'नये फकीर को भीक की जल्दी' असं काहीतरी अश्विनीमामी म्हणाल्या होत्या. (एखाद्या नव्याकोर्‍या आयडीने लिहायला सुरूवात केली की प्रतिसादांचं कसं डेस्परेशन असतं, असा त्यात संदर्भ होता. Proud हे सहज आठवलं. कृपया कुण्या नवीन / जुन्या आयडीने पर्सनल घेऊ नका.)

'खरा आंधळा तो, ज्याला बघायचे नसते', 'वाचायचेच असेल तर एका बिंदूत पण अक्षर दिसते' आणि 'भूकेसारखी फोडणी नाही'- हे फार गोड आहे.

'काम नही काय करू.. नवं लुगडं दांडे करू!' अशी अहिराणीतली म्हण आठवली. याचा अर्थ अन संदर्भ सांगा बघू

बेळगव जिल्ह्यात असताना काही अशाच आपल्याला थेट संदर्भ न लागणार्‍या (पण मराठीच), आणि उत्सुकता चाळवणार्‍या अशा म्हणी नि शब्दप्रयोग ऐकले होते, ते आठवण्याचा प्रयत्न करतो आहे.

साजिरा, त्या गळक्या / सुक्याचा अर्थच मला लागत नाही... पण आता इतर भाषांचा विषय निघालाच आहे तर, माझीही एक भर.. ( इथे अनेकांना आवडेल )

नया नया मुल्ला, बहुत अल्ला अल्ला !

Pages