वळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू?

Submitted by रसप on 30 October, 2012 - 01:21

वळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू?
सरूनही पायी घुटमळणाऱ्या रस्त्यांचे काय करू ?

दुरून माझ्या प्रश्नाचे उत्तर डोळ्यांनी तुझ्या दिले
आज तुझ्या स्पर्शाने पडलेल्या प्रश्नांचे काय करू ?

एक गुन्हा केला प्रेमाचा, दुसरा हा की सांगितले
तुला भेटलो पुन्हा पुन्हा त्या अपराधांचे काय करू ?

तुझ्या सोबतीने सुचलेल्या कवितांना विसरुन झाले
विरहाच्या दु:खातुन फुलणाऱ्या गझलांचे काय करू ?

स्वप्नामधले अनेक क्षण अवतरले होते खरेखुरे
अजून डोळ्यावर फिरणाऱ्या मोरपिसांचे काय करू ?

खळकन तुटता पापणीमधे पाण्यासोबत स्वप्न झरे
काळजात रुतलेल्या खुपणाऱ्या काचांचे काय करू ?

आजकाल मी महत्प्रयासाने नजरेला आवरतो
मनामधे दाटुन येणाऱ्या उचंबळांचे काय करू ?

असे एकटे जगणेसुद्धा अशक्य नाही, कठिण जरी
गजबजलेल्या घरात 'जीतू', एकांतांचे काय करू ?

....रसप....
२९ ऑक्टोबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/10/blog-post_30.html

============================

टीप:-
समांतर/ पर्यायी एखाद-दुसरा शेर चालेल. अख्खी गझल देण्याचा आगाउपणा कृपा करून करू नये. हे आधीच सांगतो आहे कारण नंतर कंटाळवाण्या चर्चांची गुर्‍हाळं सुरू होतात, जी मला माझ्या गझलेवर नको आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक मिसरे त्यातल्या सहजतेमुळे आवडले.

काय करू ही रदीफ वेगळी व कठीण असल्यामुळे बर्‍याच शेरांत सानी मिसरा हा उला मिसर्‍यापासून तुटल्यासारखा वाटत आहे.

शुभेच्छा!

स्वप्नामधले अनेक क्षण अवतरले होते खरेखुरे
अजून डोळ्यावर फिरणाऱ्या मोरपिसांचे काय करू ?........... खूपच सुंदर

असे एकटे जगणेसुद्धा अशक्य नाही, (कठिण जरी) म्हणतो पण
गजबजलेल्या घरात 'जीतू', एकांतांचे काय करू ?,,,,,,,,,,,,, वाह!

आवडलीच!

स्वप्नामधले अनेक क्षण अवतरले होते खरेखुरे
अजून डोळ्यावर फिरणाऱ्या मोरपिसांचे काय करू ? >>>>

जबरदस्त ! फारच सुन्दर !!

असे एकटे जगणेसुद्धा अशक्य नाही, कठिण जरी
गजबजलेल्या घरात 'जीतू', एकांतांचे काय करू ?<<<

वा वा

गजबजलेल्या घरात 'जीतू', एकांतांचे काय करू ?<<< दुसरी ओळ फारच आवडली.

बहुतेक सर्व सानी मिसरे आवडले. अनेक शेरात राबता किंचित कमकुवत वाटला हे वैयक्तीक मत!

पुढील गझल लेखनाच्या प्रतीक्षेत

-'बेफिकीर'!

सर्वांचे मनःपूर्वक आभार !

------------------------------

बेफिजी,

>>अनेक शेरात राबता किंचित कमकुवत वाटला<<

हे नीट समजलं नाही. जरा उलगडून सांगाल का ?

माझ्या मते फक्त सम्बन्धच असे नाही तर अवलम्बित्व असाही एक अर्थ मी पर्सनली काढत असतो
..... किन्वा मग मनात असलेला अर्थ जसाच्यातसा लावता येण्यासाठी दोन्ही ओळी १००% परस्परपूरक व अनिवार्य वाटायला हव्यात या दृष्टीने त्या एकमेकीवर 'अवलम्बून' असणे
त्या दोघीत तशी 'घनिष्टता'.असणे /अनुभवता येणे ......एकजीवपणा की काय ते तसे !!

फार बोललो ना!! ......सॉरी.........:)
चुकीचे असल्यास मफ कराच
...........व बरोबर काय ते प्लीज मलाही सान्गा !!

आपला अज्ञानी.अन् जिज्ञासू
-वैवकु

रणजित,

सुरेख गझल केली आहेस...या गझलेतील बहुतेक शेर मुसलसल गझलेचे झाले आहेत

दुरून माझ्या प्रश्नाचे उत्तर डोळ्यांनी तुझ्या दिले
आज तुझ्या स्पर्शाने पडलेल्या प्रश्नांचे काय करू ?

सही....

एक गुन्हा केला प्रेमाचा, दुसरा हा की सांगितले
तुला भेटलो पुन्हा पुन्हा त्या अपराधांचे काय करू ?

शेर मस्त आहे...पण 'अपराधाचे' असे हवे ना ??? कारण एकच अपराध पुन्हा पुन्हा केला गेला आहे...

स्वप्नामधले अनेक क्षण अवतरले होते खरेखुरे
अजून डोळ्यावर फिरणाऱ्या मोरपिसांचे काय करू ?

बहोत खूब...

मस्त गझल दिलीस...

शुभेच्छा...

खूप आवडली Happy नेहमीप्रमाणेच हृदयस्पर्शी.

तुमचं कवीला आवश्यक असलेलं संवेदनशील मन तुमच्या रचनांमध्ये नेहमीच दिसतं. ते तसंच राखा.. उगाच कुठल्याही काव्यांवरच्या वादांमध्ये सहभागी होऊन नको तिथे एनर्जी वाया घालवू नका. कधी कधी शब्दांची, त्यांच्या रचनेची अभ्यासाच्या नावाखाली अती चिरफाड केली गेली तर भावनांचं प्रकटीकरण उगाचच सपक वाटू लागतं. त्यामुळे तुम्ही जी तळटीप दिली आहे ती योग्यच आहे Happy

छान

वैभव,

नेहमी एकाच 'प्रकारचा' अपराध घडला आहे; 'एकच' नाही... असा विचार केल्यास अनेक अपराध होतील ना! Wink

----------------------

अश्विनी के,

अगदी खरं बोललात.. धन्यवाद!!

-------------------------

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!

>>>

तुझ्या सोबतीने सुचलेल्या कवितांना विसरुन झाले
विरहाच्या दु:खातुन फुलणाऱ्या गझलांचे काय करू ?
>>
गझलीयत!!! Wink