'दरजा'

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

पुर्वप्रसिद्धी- 'माहेर' दिवाळी अंक २०११.
इथे माझ्या ब्लॉगवर (रंगीबेरंगीवर) पुन्हा प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल माहेरच्या कार्यकारी संपादक सुजाता देशमुख यांचे आभार.

***
***

खिरूजाच्या वड्यांसारख्या आमच्या चिरीच्या दगडी सुबक चौकोनी पायर्‍या उतरून खाली अंगणात आलो की एकदा उजव्या आणि एकदा डाव्या बाजूला बघून गाडी कुठे न्यायची ते ठरायचं. आमच्या पायाला चाकं लागायची, तोंडातून ब्रूऽऽम ब्रूऽऽऽऽम ह्यर्रऽऽऽन्ग असे आपोआप आवाज निघून डाव्या हातातला काल्पनिक गियरचा भला मोठा दांडा मागे पुढे करून कुठचा गियर की काय तो पडायचा आणि मग हाताने जवळजवळ एस्टीच्या चाकाएवढे भलेमोठे काल्पनिक स्टिअरिंग तोलत सांभाळत आम्ही पायाच्या चाकांनी जे सुसाट सुटायचो ते पुढचं गाव येईपर्यंत. पुढचं गाव आलं की आमची काल्पनिक एस्टी धुस्सफुस्सहाश्श करत इंजिनातून वाफा निघाल्यागत आवाज करत थांबायची.

पुढची गावं अर्थातच दरवेळी वेगवेगळी असायची. अंगणातून उजवीकडे वळलं, की थोडं पुढे गेल्यावर उतार होता. त्या उतारावर जोरातच चाललेल्या आमच्या एस्टीला ब्रेक्स लावताना दमछाक व्हायची. पावसाच्या दिवसात आमची गाडी तिथे अनेक वेळा भुईसपाट झाल्याने जरा जास्तच काळजी घ्यावी लागायची, पण वेगाचा मोह काही टाळता यायचा नाही. उतारावर अख्ख्या गाडीचा तोल सावरताना मग पायांची चाकं वेडीवाकडी पडायची, इतकंच काय पण हातातल्या स्टिअरिंगच्या चाकाचा आकारही आपोआप लहानमोठा व्हायचा. उतारावर असलेल्याने तोंडातून आपोआप खरीखुरी एस्टी गाडी उताराला असताना हऽऽर्रूऽऽम्म्म असा आवाज काढते तसा निघायचा. उतार संपला की अमृतअण्णांचं घर यायचं. तिथल्या ओट्यावर अर्धं मिनिट गाडी चक्क बसायची, मोठा प्रवास करून आल्यानंतर इंजिनातून निघतात, तशा वाफा तोंडातून काढत. हे एक महत्वाचं गाव होतं. कारण अण्णांच्या ओसरीत चारपाच तरी वर्तमानपत्रे काम संपल्यावर फेकून दिल्यागत बेवारशी अवस्थेत पडून असायची. ती इतस्ततः पसरलेली पाने माझीच वाट बघत असल्यागत वाटायचं, आणि मग कुणाकडेही न बघता, कुणाला न विचारता ती पाने मायाळूपणे चुकचूकत गोळा करायचो आणि एकेक करत समजेल तेवढं वाचून काढायचो. मी रोजचाच आणि घरचाच असल्यागत कुणी माझ्याकडे ढुंकूनही बघायचं नाही. पण एखाद्या दिवशी गेलो नाही तर नेमाने रोज राममंदिराकडे जाणारी यशोदाआजी जाताना आईला आवर्जून माझ्याबद्दल विचारायची.

अंगणातून उजवीकडे वळलं, की त्यानंतरचा प्रवास जास्तच भारी. आमच्या हायस्कूलात शिपाई असलेल्या केवळमामाच्या घरापर्यंत रस्ता सपाट आणि चांगला असल्यामुळे पायाची चाकं एकसारख्या वेगात पळवता यायची आणि हातातल्या स्टिअरिंगचा आकारही एकच ठेवता यायचा. स्टिअरिंग हातात घट्ट पकडून तोंडातून ब्डुऽऽऽर्र असा आवाज काढला की एकसारख्या वेगाने चाललेल्या एस्टीत बसल्यावर होते तशी ओठांची आणि शिवाय कानाच्या खूप आतमध्ये थरथर व्हायची. ही थरथर वाढली की मजेदार गुदगुल्या व्हायच्या. मग खूप पराक्रमी एस्टी ड्रायव्हर असल्यागत वाटायचं ते थेट अहिरेवाड्यापर्यंत.

अहिरेवाड्याजवळ रस्त्याला वळण होतं. त्यामुळे एस्टीचा वेग कमी करावा लागायचा. आणखी एक कारण म्हणजे वाड्याच्या भिंतीला लागूनच एक छोटा चौकोनी, पण खूप खोल असा आड होता. त्याची आम्हाला भारीच भिती वाटे. कधीकधी दांडगट मध्या अहिरे आम्हाला मानगुट पकडून त्याच्या काठावर घेऊन जायचा, आणि आडाच्या त्या छोट्या चौकोनात डोकावून टारझनसारखी आरोळी ठोकायचा. मग तो आड त्या आरोळीला मध्यापेक्षाही भयंकर राक्षसी आवाजात तस्साच प्रतिसाद द्यायचा. खूप लहानपणी तर त्यात चक्क राक्षसच राहतो की काय असंच आम्हाला वाटायचं. पण ते तसं नाही हे नंतर लक्षात आलं, पण तरी त्याच्या खोलीची, आतमध्ये दिसणार्‍या अंधाराची आणि त्याच्या पाण्याची भिती वाटायचीच.

अहिरेवाड्याजवळचा रस्ता त्या आडाच्या दिशेने थोडा डावीकडे वळायचा आणि मग पुन्हा उजवीकडे वळून आडाला समांतर जाऊन पुढे राममंदिराकडे. आमच्या एस्टीला एकदा वळण घेऊन पुन्हा दुसर्‍यांदा वळण घेता आले नाही तर अख्खी एस्टी आडात कोसळण्याच्या भितीनेही तिचा वेग कमी होत असेल. पण अशा वेळी एकदम एखाद्या घाटात मोठ्या कौशल्याने त्या भल्या मोठ्या गाडीचा डोलारा सांभाळत असलेला पराक्रमी एस्टी ड्रायव्हर असल्यासारखंच आम्हाला वाटत असायचं.

हे आडाचं वळण सोडलं, की तोंडातून पुन्हा इंजिनाची फुरफुर वाढायची, आणि गाडीला पुन्हा वेग यायचा. कारण पुढे मंदिरापर्यंत पुन्हा किंचित उताराचा मस्त मोठा रस्ता. हातातलं स्टिअरिंग किंचित उंचावून त्यातून बरोबर समोर दिसत असलेल्या मंदिरातल्या रामाच्या मुर्तीच्या दिशेने नेम धरत पुन्हा सुसाट शर्यत. जो आधी पोचेल त्याने पटकन आपल्या एस्टीला पायर्‍या चढवत मुर्तीपर्यंत घेऊन जायचं आणि भक्तीभावाने नमस्कार करत रामाला बक्षिस द्यायचं. तोपर्यंत इतर एस्टीगाड्या मंदिराखालीच फुर्रफुऽऽर्र असे इंजिनांचे मोठ्ठे आवाज करत थांबणार. हे सारं उरकलं, की मग संपूर्ण काटकोनात वळून पुन्हा भिन्नाट, पायांच्या चाकांना भिंगरी लागल्यागत. आता तर 'मुंबई सेंट्रल समोरच दिसत असल्याने सर्व एस्टीगाड्या जोरातच असायच्या.

थोडं पुढे गेल्यावर रस्त्याची रूंदी तिप्पट-चौपट व्हायची. इथं पंचायतीच्या ओट्याला लागून लांबलचक प्लॅटफॉर्मसारख्या पायर्‍या होत्या. पायर्‍या संपल्यावर खाली गाड्या लावण्यासाठी चौकोनी दगडांच्या खुणा केलेल्या. तिथं एकापाठोपाठ आमच्या गाड्या लागायच्या. या बर्‍यापैकी उतार असलेल्या संपूर्ण मैदानावर फरशी बसवल्यागत दगड बसवले होते. हे दगडांनी उभ्या-आडव्या रांगांत कवायतीला बसल्यागत भास होणारं छोटं मैदान, म्हणजे ग्रामपंचायतीचं आवार. ते संपलं, की मग एक मोठी कमान होती- गावाचं आणि ग्रामपंचायतीचं नाव मोठ्या अक्षरांत लिहिलेली.

याला आम्ही 'दरजा' म्हणायचो. पण या शब्दाचा अर्थ शोधण्याच्या भानगडीत आम्ही कुणी कधीच पडलो नव्हतो.

पण ग्रामपंचायतीची ती जागा म्हणजे 'दरजा' नव्हे. ते कवायती शिस्तीतलं छोटं दगडी मैदान किंवा ती भलीमोठी कमान म्हणजे 'दरजा' नव्हे. अलीकडची पलीकडची मंदिरं, सतराशे प्रकारची दुकानं, शिवाजी महाराजांचा पुतळा, समोरचं प्रचंड मोठं आठवडी बाजाराचं किंवा वेळोवेळी सभा वगैरे होत असलेलं मैदान म्हणजेही 'दरजा' नव्हे.

पण या सार्‍यांमिळून जे काय तयार होत असेल, त्याला 'दरजा' असं नाव पडलं असावं. किंवा 'दरजा' म्हणजे ते वरचं बरंच काय काय असलेलं सारं एकत्र.

आणि सर्वात महत्वाचं- हा 'दरजा' म्हणजेच आमचं 'मुंबई सेंट्रल'.

***

तर तो 'दरजा' म्हणजेच आमचं 'मुंबई सेंट्रल' कसं झालं, त्याचीही एक गंमतच. गणपती उठले, की सुशोभीकरणासाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या बाहुल्या, सैनिक, गाड्या इत्यादी सामान आम्हाला खेळण्यासाठी उपलब्ध व्हायचं. एक दिवस आमच्या एका अतरंगी मित्राला, म्हणजे आवल्याला भन्नाटच कल्पना सुचली. मग सार्‍यांच्या गाड्या एकत्र गोळा केल्या, आणि एस्टी-डेपो आणि गाड्यांचा खेळ खेळायचं ठरलं. आता या नाजूक कचकड्याच्या गाड्या, त्यांची इवलीशी प्लास्टिकची चाकं आणि घरासमोरचे छोटेमोठे खड्डे, दगडगोटे आणि माती असलेलं उंचसखल अंगण आणि रस्ता- यांचा ताळमेळ काही जमेना. आवल्या मला म्हणाला, 'तुमच्या मागल्यादारी भरपूर मोठी जागा आहे. आणि आता घरातही कुणीच नाही तुमच्या. मस्त होईल आपल्याला खेळायला.'

मग गाड्यांच्या ताफ्यासकट सारे कुशल ड्रायव्हर ऐटीत आमच्या परसदारी. मी बारीक चिठ्ठ्यांवर वेगवेगळ्या गावांची नावं लिहून सर्व गाड्यांच्या डोक्यावर त्या टाचण्यांनी अडकवल्या. ड्रायव्हरची ड्युटी बदलली, की गाडी बदल, गाडीच्या डोक्यावरची पाटी पण बदल- अशी कल्पना. एका कडेला पाटा-वरवंटा होता, तिथे बसडेपो तयार झाला. सार्‍या गाड्या डौलाने रांगेत उभ्या राहिल्या.

आवल्याला मग पुन्हा एक कल्पना सुचली. त्याने खडू आणले, आणि बसडेपोपासून निघणारा एक हमरस्ता काढला. पुढे त्या हमरस्त्याला उपरस्ते काढले. ते उपरस्ते पुढे आणखी दुसर्‍या मोठ्या हमरस्त्याला मिळताना दाखवले. माहिती असलेल्या बर्‍याच गावांची नावं मध्येच मोठे गोल-चौकोन आकार काढून त्यांत लिहिली. परसदारी एका कडेला जिथं गुलबक्षी आणि दोनचार फुलझाडं लावली होती, तिथे 'मुंबई सेंट्रल' अशी मोठी पाटी लावली. या जागेला लागूनच मोरी, पाण्याचे दोन-तीन माठ आणि न्हाणीघर होतं. म्हणजे काय, जवळजवळ समुद्रच. अरबी समुद्र.

हे सारं रस्ते, उपरस्ते, हमरस्ते, गावं, शहरं, वाड्या यांचं जाळं बघून मला आमचं परसदार म्हणजे मस्त मोठाच्या मोठ्ठा महाराष्ट्रच वाटू लागला. थोडा अभिमानही वाटलेला. तमाम भन्नाट आयडिया नेहमी आवल्यालाच सुचत असतात, यावर सार्‍यांचं एकमत झालं. आणि मग त्यानंतर खेळ रंगात आला.

त्यानंतर किती तास गेले त्याचं आम्हाला भानच राहिलं नाही. बसडेपोपाशी चुलीची फुंकणी तोंडासमोर धरून डेपो-कंट्रोलरच्या थाटात सगळ्या ड्रायव्हर लोकांसाठी निरनिराळ्या गावांच्या ड्युट्या मोठ्या आवाजात पुकारत असलेला आवल्या जरा जास्त मोठ्याने ओरडला तेव्हा आम्हाला भान आलं. बघितलं तर आवल्याच्या हातातली फुंकणी नुकत्याच घरात आलेल्या आईकडे होती, आणि ती आवल्याच्याच पाठीत जोरात बसली होती.

आमच्या सगळ्या गाड्या मोडतोडून बाहेर फेकून देत 'सकाळीच शेणानं लख्ख सारवलेलं माझं अख्खं परसदार भुरं घाणेरडं केलंत मेल्यांनो, चांडाळांनो!' असं ओरडत तीच फुंकणी उगारत आई आमच्यावर चाल करून आली, तेव्हा आम्हाला परिस्थितीचं गांभीर्य समजलं.

आम्ही सारे खरपूस मार खाऊन घराबाहेर पडलो, तेव्हा चिरीवरून उतरताना आवल्या म्हणाला, 'आता पुढल्या गणपतीशिवाय आपल्याला गाड्या-बिड्या कोणी घेऊन देणार नाही, ते सोडा. पण 'मुंबई सेंट्रल'ची आयडिया कशीये?'

***

गावातला कुणीही पुरूष गावात असूनही आपल्या घरात नसला, तर तो हमखास या दरजातच असणार. पण आमच्या आयांनी बाबा लोकांना शोधण्यासाठी पिटाळल्यावर आपापल्या बाबांना या दरजात शोधणं म्हणजे काय खायचं काम नसायचं. कारण हा दरजा खूप मोठा होता. अगदी मुंबई सेंट्रलसारखा.

अगदी सुरूवातीला राममंदिर आणि त्याच्या समोरचा फरसबंदी ओटा. या ओट्याच्या एका कडेला भलामोठा वड आणि दुसर्‍या कडेला मंदिराशी काटकोनात असलेलं वाचनालय. वाचनालयाच्या बाजूनेच आणखी थोड्या पायर्‍या चढून गेलं की वरच्या मजल्यावरचं सोसायटीचं ऑफिस. राममंदिराच्या बरोबर समोर रेशनचं दुकान आणि जिल्हा सहकारी बँक. हे सारं दगड बसवून तयार केलेल्या उतारावरच्या शिस्तीतल्या छोट्या मैदानाच्या अलीकडे.

ते दगडी मैदान खरं तर रस्ताच. पण तिथला रस्ता मस्त चौकोनी दगडांनी बांधल्याने, शिवाय रस्त्याची रूंदी तिथं खूप जास्त झाल्याने आणि तिथंच ग्रामपंचायतीसमोरची, सततची वर्दळ असल्याने ते मैदानच भासायचं. या दगडी मैदानाच्या एका बाजूला पोस्ट ऑफिस आणि टकले डॉक्टरांचा दवाखाना. दुसर्‍या बाजूला ग्रामपंचायत, आणि तिच्यामागे दोन भलीमोठी गोडाऊनं.

हे दगडी मैदान आणि त्याचा उतार संपे तिथंच मोठी कमान. मग त्यापुढे जवळपास आमच्या शाळेत होतं तेवढं मोठं आठवडी बाजाराचं मैदान जे चालू होई, ते थेट गावात होणार्‍या सभा आणि नाटकांसाठी कायमस्वरूपी उभारलेल्या स्टेजजवळ संपे. या स्टेजवर उभं राहून ओरडलं, की पुढार्‍यांसारखं आम्हालाही अख्ख्या गावाला उद्देशून भाषण केल्यागत वाटे. या मैदानाच्या एक बाजूला पाण्याची भलीमोठी टाकी आणि सरकारी दवाखाना. तर दुसर्‍या बाजूला पिंपळाच्या झाडाभोवतीचा प्रशस्त मारूतीचा पार आणि उंबराच्या सावलीत विसावलेलं शंकरजीचं देऊळ.

दगडी मैदानासारखंच या मोठ्या मैदानाला आठवडी मैदान नाव ठेवलं होतं. दगडी आणि आठवडी मैदानांमध्ये गायब झालेला रस्ता ती संपल्यावर पुन्हा प्रकट होई आणि सतराशे प्रकारच्या दुकाना-टपर्‍यांच्या साथीने तो पुढे स्टँडपर्यंत जाई. तिथल्या खर्‍याखुर्‍या एस्टीगाड्या येतजात असलेल्या मोठ्या रस्त्याला जाऊन मिळे.

सोमवारी, म्हणजे आठवडी बाजाराच्या दिवशी या सार्‍या मुंबई सेंट्रलच्या साम्राज्याला निराळंच रूप येई. बघावं तिकडे अख्खा दरजा माणसांनी फुलून गेलेला. शिवाय कापडी आणि नॉयलॉनच्या पिशव्या घेऊन बाजारात फिरणार्‍या गिर्‍हाईकांसमोर आपल्या शेतमालाचं गळे मोडून गाणी म्हणत कौतुक करणार्‍या आणि जागेसाठी एकमेकींशी मोठ्या आवाजात भांडणार्‍या शेतकरणी आणि त्यांची कुटुंबं.

इतर दिवशी दरजात कुठेही बसून लंब्याचवड्या गप्पा करणारी मोठी पुरूष मंडळी आम्हाला जितकी बहाद्दर वाटायची, तितक्याच बहाद्दर बाजाराच्या दिवशी त्या 'रांडेच्चे! माझी जागा हे ही. सास्वेच्या सास्वेपास्नं माल विकतेय इथ्थं ते काय उगाच तुझं बस्तान बसवायला?' असं म्हणून तावातावाने बाजारातल्या आपापल्या जागेचा इंचइंच लढवणार्‍या शेतकरी बायकाही वाटायच्या.

एकूणच 'दरजात बसणं' हे कुठच्या कावच्यामावच्याचं काम नसून मोठ्या बहाद्दरांचंच काम, असं आमचं पक्कंच मत झालेलं.

***

आमची शाळा म्हणजे जीवन शिक्षण मराठी विद्यामंदिर. शाळेत जाण्याचा रस्ताही दरजातूनच जायचा. मंगळवारी सकाळी शाळेत जाताना मात्र दरजाकडे बघून खूपच वाईट वाटायचं, कारण सोमवारच्या बाजाराचा अख्ख्या दरजाभरून कचरा पडलेला असायचा.

तशा दरजामध्ये मला कधीच न आवडणार्‍या अनेक वाईट गोष्टी होत्याच. मारूतीच्या पारावर कितीही खेळ रंगला तरी आम्ही मारूतीच्या मागे असलेल्या खूप जुन्या आणि छोट्या झोपडीसारख्या असलेल्या शनिमंदिरात कधीच फिरकत नसू. एकतर तिथे खूप मोठ्ठं दाढीचं जंजाळ असलेले भयानक चेहर्‍याचा एक साधूबुवा नेहमी बसलेला असायचा. बघावं तेव्हा दोरी बांधलेली लांब काठी घेऊन कुठची कुठची डुकरं पकडत असलेल्या गावातल्या वडार लोकांची भाषा आणि तो बोलायचा. त्या साधुबुवाइतकीच भितीदायक तिथल्या शनिदेवाची काळीकुट्ट मूर्ती होती. लोकांनी सारखे तेल ओतओतून ती आणखीच जास्त वाईट करून टाकली होती.

शंकरजीच्या देवळामागे आणि दरजातल्या स्टेजमागे आमच्या आवल्यापेक्षाही मोठी मुलं विड्या पीत असायची, आणि आम्ही चुकून तिथं गेलो, की आम्हाला धमक्या द्यायची. बर्‍याचदा तर आम्हाला तिथं दारूच्या बाटल्याही दिसायच्या, पण हे सारं आम्ही घरी कधीच सांगितलं नाही. ते घरी कळतं, तर आमचं दरजात जाणंच बंद झालं असतं.

दरजातली आणखी एक अजिबात न आवडणारी गोष्ट म्हणजे भिकामामाचं दुकान. जुलुमजबरदस्तीनं तो त्याच्या दुकानात कत्तल केल्यासारखे आमचे जे केस कापायचा, त्यामुळे टीव्हीवरच्या बातम्यांमधले 'दहशतवादी' असेच काहीसे असतील, असं आम्हाला वाटायचं. केस कापताना मानच काय, पण सारं अंग तो इतकं आखडून ठेवायचा, की त्याचं काम संपल्यावर आमच्या अंगाभोवती कित्येक तास बांधलेल्या असंख्य बळकट दोर्‍यांतून सुटका झाल्यागत वाटायचं. आमच्या केसांची पार चप्पी करून टाकताना स्वतः मात्र आपली मोठमोठी झुलपं सतत सावरत असायचा. तो पिक्चरमधल्या शशीकपूरसारखा दिसतो असं आवल्या नेहमी म्हणायचा, पण तरीही मला तो कधीच आवडला नाही. त्याच्या दुकानातून अख्खा दरजा दिसत असल्याने दरजात आम्ही काय, कुठे नि कुणासोबत खेळत होतो, ही बातमी आपोआप घरपोच झाली, की आमची कंबख्ती ठरलेलीच. उतारावरच्या दगडी मैदानातल्या दगडांत चप्पल अडकून मी बर्‍याच वेळा पडायचो. असा पडलो, की तो 'आजही आमच्या जावईबापूंनी नमस्कार घातला!' असं दात विचकून दादांना सांगत असे. मग घरी येऊन माझी 'अजागळ', 'अळणामचक', ढिल्लाढसक', 'भान्या' अशा नाना विशेषणांनी पूजा होई. त्यामुळे त्या दगडांत पडलो, की कपडे झटकत उठताना कावरंबावरं होत भिकामामा बघतोय का, ते बघण्याची सवय मला लागली ती कायमची.

असंच एकदा, दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी न विकली गेल्याने झेंडूच्या फुलांचे छोटेमोठे ढीग ते विकणारे लोक दरजामध्ये तसेच सोडून गेल्याचं आम्हाला दिसलं. शाळेत जाताना सोबत चालत असलेल्या सुवर्णाला मी म्हणालो, 'एकतर झेंडूचं फुल मला आवडतच नाही. ते फारसं चांगलं दिसतही नाही, आणि त्याला वासही नाही. त्यात हे कचरा झालेले हे ढीग म्हणजे आणखीच वाईट.' तर तिने मला थांबवून एक टपोरं फूल हातात घेऊन त्याच्या पाकळ्या, पाकळ्यांखालचं हिरवं बुड, त्याखालचा देठ हे सारं वेगवेगळं करायला सांगितलं. तर आतून चक्क एक करंगळीच्या नखाएवढी, टिंबांची सुंदर नक्षी असलेली गोल वाटी निघाली. ती तिने खायला सांगितली, तर ती चक्क खोबर्‍याच्या वाटीइतकीच गोड लागली. मग तेव्हापासून टाकून दिलेल्या, पण ताज्या झेंडूच्या फुलांच्या वाट्या काढून गोळा करण्याचा नादच मला लागला. फूल आवडत नसलं, तर त्यात ही एक सुंदर गोष्ट आहे, हे नीटच कळलं, आणि मग झेंडूचं फुलही मला आवडू लागलं.

आमच्या दरजाचं असंच काहीसं असावं. नावडत्या गोष्टींबरोबरच भरपूर काही चांगलं आणि आवडणारं असायचंच. खरंतर चांगल्या बर्‍याच गोष्टींसोबत थोड्या वाईट गोष्टीही येणार म्हणजे येणारच, असं वर्गात कापसे गुरूजींनी शिकवल्यागत दरजा आम्हाला शिकवत असावा.

***

खरं तर दरजातल्या तमाम वाईट गोष्टी एका पारड्यात टाकल्या, तरी तिथल्याच 'वाचनालय' या एकाच भारी गोष्टीचं पारडं जड झालं असतं. त्यामुळे आम्ही मुलांनी वाईट गोष्टींचा जास्त विचार करण्यापेक्षा वाचनालयात वेळ घालवणं खुद्द दरजालाच जास्त आवडलं असावं. कारण काय असेल ते असो, पण वाचनालयात आम्हा काही मुलांना मुक्त प्रवेश होता.

झुंजार आणि फास्टर फेणेची चित्तथरारक साहसं डोळे मोठे करून श्वास रोखून छातीत भरून घेतल्यानंतर आमचेही हात शिवशिवत. कुठूनतरी कुणालाही माहिती नसलेली काही गुप्त बातमी शोधून काढावी, असं वाटे. हे असं बर्‍याच जणांना वाटू लागल्यावर आम्ही गावातल्या सार्‍या पडक्या, भितीदायक आणि कुणीच राहत नसलेल्या घरांची पोटात होणारं पाकपूक हातांनी सांभाळत छाननी केली. पण मोठमोठे सरडे, घुशी, मुंगूस आणि एका ठिकाणी पैसे लावून पत्ते खेळणारी अनोळखी माणसं बघून आम्ही जवळजवळ प्रत्येक ठिकाणाहून धूम ठोकली. या गावात पडक्या घरांत काही फारसं सापडणार नाही, असं एकमत झाल्यावर आम्ही तो नाद सोडला.

मग दरजातल्या मोठ्या माणसांच्या चर्चा लक्षपूर्वक ऐकायच्या, असं ठरलं. पण त्यांच्या समोर थेट उभं राहून ते ऐकायची कुणाची टाप नव्हती. मग एकेकाने सहज तिथून जात असल्याचं भासवत गप्पा ऐकायच्या असं ठरलं. पण यातूनही काहीच हाती लागेना. एकतर बर्‍याच गप्पा कळायच्याच नाहीत. जवळजवळ सगळ्या मोठ्या लोकांना राजकारणावर तावातावाने बोलण्याची वाईट खोड होती. हे बोलणं इतकं मोठ्या आवाजात असायचं, की त्यासाठी जवळ जाऊन ऐकायचीच गरज नव्हती. बाकी काही गप्पा कुजबुजत होत, त्यांत नक्कीच काहीतरी खाद्य आम्हाला सापडणार, असं मात्र आम्हाला वाटे.

एक दिवस आमच्यातल्या हंप्याने बातमी आणली- 'भाऊसाहेब युरिया विकून आता सोन्याची कौलं चढवणार बहुतेक!' असं कुणीतरी गप्पांमध्ये म्हटलं होतं.

आमच्यातल्या गुप्तहेरांचं डोकं चावी दिल्यागत सुरू झालं. गंभीर होऊन आम्ही हळू आवाजात पारावर चर्चा करू लागलो. सोन्याची कौलं, म्हणजे काय सोपी गोष्ट नव्हतीच.

आम्हाला माहिती असलेले गावातले एकूण 'भाऊसाहेब' आम्ही मोजले, तर ते चार निघाले. भाऊसाहेब सावकार हे एक श्रीमंत गृहस्थ होते. त्यांनी सोन्याची कौलंच काय, पण सोन्याचे दरवाजे खिडक्या केल्या, तरी त्यात झुंजार किंवा फास्टरफेणेने शोधकाम करण्यासारखं काहीच नव्हतं. हायस्कुलातले क्लर्क भाऊसाहेब पाहून त्या बिचार्‍यांचा सोन्याशी कधी संबंध आला असेल, असं कधीच कुणाला वाटलं नसतं. वाचनालय सांभाळणारे भाऊसाहेबही असेच गरीब, धार्मिक आणि प्रेमळ. ते सदासर्वकाळ सार्‍या मंदिरांत मागत असलेल्या देवाच्या कौलांचा सोन्याच्या कौलांशी काही संबंध नाही असं आवल्याने ठासून सांगितलं. सोसायटीतल्या भाऊसाहेबांचं घर कौलारू नसून लाकडी धाब्याचं होतं, आणि ते गळू नये म्हणून दरवर्षी त्यावर चिकट पिवळ्या खार्‍या चिकनमातीचा थर टाकत असत.

आम्ही सचिंत होऊन विचार करत बसलो. बर्‍याच वेळात हंप्याच ओरडला, 'अरे! ते सोसायटीचे भाऊसाहेब ज्या गोडाऊनमध्ये काम करतात, तिथं युरियाची पोती ठेवली आहेत की!'

आम्ही हंप्याकडे कौतुकाने बघू लागलो. हंप्या म्हणजेच आमचा फास्टरफेणे, यावर एकमत झालं, आणि हंप्यानेही खुश होऊन 'ट्टॉक्क!' असा आवाज तोंडातून काढला.

मग गंभीर चर्चा होऊन पुढचं खोदकाम सुरू झालं. या भाऊसाहेबांची गावात कुठं शेतीभाती नव्हती, त्यामुळे सोन्याची कौलं तिथं लपवून ठेवायचा प्रश्नच नव्हता. त्यांचा मुलगा, चंदन आमच्यात खेळायला असे, पण त्याला या हेरगिरीचा पत्ता लागू न देता त्यांच्या घरात लपाछपीचा खेळ खेळण्याच्या निमित्ताने घरातले सांदीकोपरे, फडताळं, घडवंच्या, पलंग, कपाटं तपासून झाली. इतकंच काय, पण 'भूक लागलीय, काही खायला आहे का रे?' असं विचारत आवल्याने भाऊसाहेबांच्या घरातलं दुधाचं कपाटही तपासून टाकलं. कुठूनतरी शिडी आणून धाब्यावर चढून झालं. शेवटी युरियाची पोती ठेवलेलं भलंमोठं गोडाऊनही चंदनच्या वशिल्याने पाहून झालं, आणि हताश होऊन पुन्हा पारावर बैठक जमली.

'आयडिया!' थोड्या वेळाने आमचा फास्टरफेणे ऊर्फ हंप्या चित्कारला, 'आपण गोडाऊनचीच कौलं तपासू या का?'

इतक्या उंच कौलांवर चढायचं कसं- हा प्रश्न आवल्याने सोडवला. वाचनालयाच्या मागल्या दरवाजाने बाहेर पडलं, की सोसायटीच्या ऑफिसच्या गच्चीवर जाता येत असे. तिला कठडे असले, तरी त्यावर चढून गोडाऊनच्या कौलारू छतावर हलकेच उतरायचं!

मग वाचनालयातून पुस्तके घेऊन मागल्या गच्चीत बसून वाचतो असं सांगून आम्ही मागे गेलो, आणि दरवाजा हलकेच बंद करून टाकला. गच्चीच्या कठड्यावर चढून गोडाऊनच्या उलट्या 'व्ही'सारख्या कौलारू छताची एकच बाजू दिसत होती. हातापायांना खरचटवून घेत आम्ही तिथे उतरलो, तेव्हा हिरकणी असल्यागतच आम्हाला वाटलं.

एका बाजूची सारी कौलं नीट निरखून झाली, पण छे! सारी आपली साधीच मंगलोरी की काय तशी कौलं होती. आता उलट्या 'व्ही'ची दुसरी बाजू तपासण्यासाठी पलीकडे जायचं ठरलं. वरती टोकावर जाताच हंप्या ओरडला, 'अरे! खरेच आहेत की सोन्याची कौलं!'

आम्ही उत्साहाने पण दबकत आणि रांगत 'व्ही'च्या कळसावर गेलो, आणि संध्याकाळच्या उन्हात चकाकणारी सोनेरी कौलं बघून आमचे डोळेच दिपले.. एक-दोन नाही, तर तब्बल चार मोठी सोन्याची कौलं!

आवल्या मात्र काहीतरी शंका येऊन म्हणाला, 'ती सोन्याची नाही वाटत आहेत मला. सोनं पिवळं असतं. काचेसारखं पांढरं नाही काही.' आम्ही सोनेरी कौलांच्या जवळ जाऊ लागलो, तसं आवल्याच्या बोलण्यात तथ्य आहेसं वाटू लागलं. संध्याकाळच्या उन्हात लांबून सोनेरी दिसत असलेली ती कौलं जवळ गेल्यावर काचेसारखी दिसू लागली.

पण जवळ जाताना मात्र एक घोटाळा झाला. आवल्याच्या वजनाने एक कौल फुटलं, आणि मग त्याच्या आजूबाजूची कौलं आपापली जागा सोडून खाली सरकू लागली. कौलांखालच्या लाकडी दांड्याला तो लोंबकळला नसता, तर थेट खाली युरियाच्या पोत्यांत पडला असता!

आवल्या ओरडू लागला, तसं आम्हीही घाबरलो. काय करावं तेच कुणाला सुचेना. आवल्या मात्र तशाही परिस्थितीत तसाच लोंबकळत गोडाऊनच्या आतमधल्या एका खांबापर्यंत गेला आणि त्यावरून खली उतरून पोत्यांच्या राशीवर हाश्शहुश्श करत बसून राहिला. हंप्या वरच आवल्याला धीर देत थांबला, आणि आम्ही खाली धूम ठोकली. भाऊसाहेबांच्या घरून त्यांना लगेच बोलावून आणलं. मग त्यांनी गोडाऊनची चावी आणून सुटका केली, पण त्याआधी सर्वांना धपाटे दिले. सर्वांच्या घरीही हे कळलंच. पुन्हा सार्‍यांना रीतसर शिक्षा झाली.

संध्याकाळी आपापल्या एस्टीगाड्या दरजात नेऊन आम्ही पारावर विचार करत बसलो, तेव्हा फास्टरफेणे म्हणाला, 'मला तर वाटतं, ती कौलं सोन्याचीच असावीत, आणि कुणाला कळू नये, म्हणून त्यांवर काचेची नाहीतर प्लास्टिकची आवरणे घातली असावीत. असं इतकं सोनं कुणी उगाच उघड्यावर, सार्‍यांना दिसेलसं ठेवेल होय?'

***

एक दिवस दरजाचं अचानकच रूप पालटून गेल्यागत दिसलं. ग्रामपंचायतीच्या, पोस्टाच्या, सोसायटीच्या, वाचनालयाच्या वगैरे दरजातल्या असतील नसतील तेवढ्या भिंतींवर चुना फासून त्यावर निळ्या अक्षरांतल्या घोषणांसारखं काय काय दिसू लागलं. 'हातात रुमणं, एकच मागणं, शेतीमालाला रास्त भाव', 'शेतीमालाला भाव नाय, भ्रष्ट सरकार करतंय काय?', 'गेल्या काही वर्षांत किराणा मालाचे भाव किती वाढलेत? शेतीमालाचे भाव न वाढवणारे कशाने माजलेत?' असं बरंचसं वाचून आम्ही त्याचे अर्थ लावत राहिलो.

मोठ्या माणसांच्या गप्पांवरून लक्षात आलं, हे सारं म्हणजे शेतकर्‍यांच्या कसल्याशा संघटनेचं काहीतरी आहे.

पुन्हा नंतर एक दिवस दरजात भरपूर पोलिस गाड्या आल्या. काळेकरडे सफारी कपडे घातलेले एसआरपी लोकांचे घोळके अवतरले. त्यांच्या हातातल्या लाठ्याकाठ्या आणि बंदूका बघून आम्ही बावरूनच गेलो. शेजारच्या कुठच्या तरी गावात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर लाठीमार झालेला, त्यात बरेच शेतकरी जखमी झालेले. आणि आता शरद जोशी म्हणून कुणी मोठे नेते आमच्या गावात सभा घ्यायला येणार होते. गावातल्या पुढार्‍यांचीही प्रचंड धावपळ चालली होती. शेजारच्या अनेक गावांतून ट्रक आणि ट्रॅक्टरं भरभरून सभेसाठी माणसं येऊ लागली. जिकडेतिकडे घोषणा, पताका, पत्रकं, हँडबिलं दिसू लागली. दरजातल्या पांढर्‍या कपड्यांतल्या लोकांच्या, पोलिसांच्या, गाड्यांच्या गर्दीत आमच्यासारखी लहान मुलं पार दिसेनाशी झाली.

ते मोठे नेते आल्यावर एकदम धीरगंभीर वातावरण तयार झालं. आम्हीही चिडीचूप होऊन भाषणे ऐकू लागलो. सारे नेते तावातावाने मोठ्या आवाजात बोलत होते, आणि लोकांच्या गर्दीतून त्यांच्या आणि संघटनेच्या नावाचा जयजयकार होत होता. मध्येच गर्दीतल्या कुणीतरी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. आणि मग पोलिसांनी चिडून लाठीमार सुरू केला, शिवाय धुराची नळकांडीही फोडली. बर्‍याच लोकांना त्यांनी पोलिसगाड्यांत भरून तुरूंगात नेलं.

आम्ही भेदरून घरी पळालो. संध्याकाळी कळलं, की दरजात कुणीही जायला पोलिसांनी मनाई केली आहे. इतकंच काय, पण गावात कुठेही घोळक्याने गप्पा मारायलाही मनाईच. बघावं तिकडे पोलिसांच्या गस्ती आणि घराघरांमध्ये मोठ्या माणसांच्या कुजबुजत्या आवाजातल्या संघटनेच्या, सरकारच्या, पोलिसांच्या आणि राजकारणाच्या गप्पा. काही दिवस आम्हाला शाळेला सुटीही मिळाली.

त्या दिवसांत खिन्न मनाने आम्ही सारे वाचनालयाच्या मागच्या गच्चीतून रखरखीत वाळवंटागत निपचित पडलेल्या दरजाकडे पाहत राहायचो. निपचित आणि शांत दिसत असला, तरी आतून अस्वस्थ होऊन खदखदत असल्यागत, त्याला काहीतरी सांगायचं असल्यागत वाटायचा.

हा असा अबोल, खंतावलेला दरजा आम्हाला अनोळखीच. आमच्या मनातला दरजा वेगळाच होता.

आकाशात बरोब्बर डोक्यावर चंद्र असताना आम्ही त्याच्याकडे बघत रस्त्याने चालत असू, आणि तोही आमचा हात धरून मित्र असल्यागत आमच्यासोबत चालायचा. आम्ही थांबलो, पळू लागलो, तर तोही आमच्यासोबत थांबे, पळे. आमच्या मनातला, आठवणींतला दरजा असाच काहीसा होता.

मित्रासारखा. चंद्रासारखा. गळ्यात गळे घालून आमच्यासोबत चालणारा. आम्ही थांबलो, तर तोही आमची वाट बघत थांबणारा.

***

तुरूंगात कोंडलेले गावातले नेते बाहेर आले, आणि त्यांनी कसा तुरूंगवास सहन केला, पोलिसांनी त्यांचे कसे हाल केले- अशा गप्पा सार्‍या गावभर सुरू झाल्या. शिर्‍या तर सारखा तुरूंगवासाच्या बातम्यांचा कुठूनतरी खजिनाच आणायचा. सार्‍या कैद्यांना म्हणे रांगेत उभं केलं जायचं. आणि प्रत्येकासमोर एकेक हंटर टांगलेला असायचा. हे सारे हंटर एका मशिनला जोडलेले. आणि त्याचं बटन दाबलं, की सारे हंटर सटासट सार्‍या कैद्यांना आपोआप फटके देऊ लागायचे. बटन बंद की फटके बंद. ही त्यातली एक गोष्ट. अशा अनेक गोष्टी.

सारं गाव संघटनामय झालं. तुरूंगात गेलेल्या नेत्यांना खूप भाव आला. गावातले सारे शेतकरी एकदम आपल्यावरच्या अन्यायाबद्दल बोलू लागले. ही अशी जनजागृती की काय ती- याआधी कधीच घडली नव्हती, असं सारे म्हणू लागले, म्हणजे ते बरंच खरं असणार. कारण आमची नजर पुरत नसे तिथवर, लांबच लांब हिरवीगार आणि मोजता येणार नाही, इतकी जास्त शेतं असलेले पण जागे झाले.

त्याचवर्षी पंचायत समितीची आणि दोन्ही साखर कारखान्यांच्या निवडणुका होत्या. मग भाषणे, सभा, पत्रके, राजकारणावरच्या चर्चा पुन्हा जोरातच सुरू झाल्या. निवडणुका लढवायला संघटनेचं पॅनेल तयार झालं. आजूबाजूच्या गावांमध्येही आमच्या गावातले सारे पुढारी सभा आणि भाषणांसाठी जाऊ लागले. तिन्ही ठिकाणी पॅनेल जिंकून आलं, तेव्हा दरजा फुलून गेला. आता खरी गावाची प्रगती होणार, असं सारे म्हणू लागले. दरजाच्या आजूबाजूला अनेक मोठी बांधकामं झाली. ते मात्र आम्हाला फारसं आवडलं नाही, कारण आमचा दरजा चहुबाजूंनी वेढला गेल्यागत, कोंडला गेल्यागत झाला. लहान दिसू लागला.

मराठी शाळेच्या पाठीमागे गावातल्या भिल्ल, महार, मांग, वडार इत्यादी लोकांची वस्ती होती, त्याला सारे 'राजवाडा' म्हणत असत. या राजवाड्यातले अनेक बायका पुरूष शेतकर्‍यांच्या शेतात मजूर म्हणून आणि घरांमधूनही कामाला होते. आम्ही राजवाड्यात अनेक वेळा खेळायला, आमच्या तिथल्या दोस्तांना दरजात बोलावण्यासाठी जात असू.

राजवाड्यात खास तिथल्या लोकांसाठी आमच्या पुढारी लोकांनी एक मोठा 'बुद्धविहार' नव्याने बांधून दिला. या छान, सुंदर, मोठ्या आणि बाग वगैरे असलेल्या 'बुद्धविहार' बद्दल आमचं मत फारसं चांगलं झालं नाही कारण आमच्या राजवाड्यातल्या दोस्तांचं आमच्यातलं खेळणं हळूहळू कमी झालं, ते या बुद्धविहारमुळेच, असं शिर्‍या आणि हंप्या आम्हाला नेहमी सांगायचे. इतकंच काय, पण आमच्याकडे माझ्या जन्माच्याही आधीपासून कामाला येणार्‍या 'रूपाबोय' नावाच्या म्हातार्‍या आजीलाही ते बुद्धविहार वगैरे फारसं आवडायचं नाही. 'सारे वेगवेगळे राहा. भिंती बांधा मोठाल्या. मुडदे नेले या पुढार्‍यांचे मस्नात.. पोटल्या भरण्यासाठी गावाची गव्हांद तोडू लागलेत हे!' असं आणि असलंच काय काय ती बोलत असायची नेहमी, पण ते फारसं आम्हाला काय कळायचं नाही.

रूपाबोय काय बोलत होती, ते मग सावकाश गावालाच काय, पण आमच्यासारख्या लहान मुलांनाही लवकरच समजलं. कारखान्यात आणि जिल्हा परिषदेत, पंचायत समितीतही आमच्या गावाच्या पुढार्‍यांनी पैसे खाल्ल्याची कुजबुज सुरू झाली. पण त्यानंतरही पुढार्‍यांची भाषणे संपत नव्हती. मग गावात जिकडेतिकडे होणारं पुढार्‍यांचं कौतुक हळूहळू कमी झालं. दरजात रोज जमून गप्पा करणारे लोक उघडउघड गावातल्या बड्या लोकांविरूद्ध बोलू लागले. अनेक वेळा दगडी आणि आठवडी मैदानांतच बाचाबाची झाली. शेवटी एक दिवस कारखान्यातल्या मोठ्या लोकांना एकाच वेळी अटक झाल्याची बातमी आली. जे कारखान्यात नव्हते, त्यांना पकडण्यासाठी पोलिस गावात आले आणि दरजातूनच त्यांना गाडीत बसवून नेलं.

दरजातल्या गप्पांना पुन्हा जोर आला. आणि आम्हीही नेहमीप्रमाणे खेळू लागलो. पण मग हंप्या नेहमीच म्हणायला लागला, 'दरजाची शान पुर्वीसारखी राहिली नाही!'

त्यावर आवल्या म्हणे, 'अरे, आपणही मोठे झालो ना थोडे. खूप लहान असताना खेळायचो, तसे खेळ आपण तरी खेळतो का? दरजा तसाच आहे. गाव बदललं असेल. दरजातली माणसंही बदलली असतील आणि आपण, आपले मित्रही. त्यामुळे तसं वाटतंय.'

हे मात्र आम्हाला थोडंफार पटायचं. आभाळातला चंद्र सतत आपल्या सोबत चालत, पळत असला म्हणून काय झालं? तो बदलतो थोडाच? तो खूप हजार वर्षे तसाच राहतो की आपल्या डोक्यावरच.

तसंच दरजाचं देखील असेल.

***

जिल्ह्याच्या गावात राहणारे सुरेशकाका एकदा नंतर आमच्याकडे पाहुणे आले, तेव्हा आमच्या घरी पुन्हा पुढार्‍यांच्या, गावाच्या आणि आम्हाला अजिबात न आवडणार्‍या राजकारणाच्या गप्पा रंगल्या. ते म्हणत होते, 'शेकडो गावांची पुढारकी करणारं गाव होतं तुमचं. सार्‍यांचा विश्वास होता तुमच्या पुढार्‍यांवर. पण सारं चागलं असेतोवर. लोकांना फसवून सोन्याची कौलं चढवली तुमच्या धेंडांनी. असं शंभर वेळा जिथंतिथं शेण खाल्लं की मग कुणी संगत करत नाही सोडा. कुणाचं काही फारसं बिघडलं नाही. नाव वाईट झालं तुमच्या गावाचं. गावाची इज्जत दरजाला टांगली तुमच्या मोठ्या लोकांनी..!'

मला खूप वाईट वाटलं. मित्रांना कुणालाच सोबत न घेता आणि एस्टी न चालवता मी हळूहळू चालत दरजात गेलो, आणि वाचनालयाच्या पायर्‍यांवर बसून समोरच्या दरजाकडे बघत राहिलो.

आता मला 'दरजा' या शब्दाचा अर्थ मला नीटच समजल्यासारखं वाटत होतं.

***
***

प्रकार: 
शब्दखुणा: 

साजिर्‍या, मागेच सांगितल्याप्रमाणे -
अफाट जमलीये.. असाच लिहित जा. आणि आधी अपूर्ण पडलेलं लेखन पूर्ण कर Happy

वॉव फार अप्रतिम शब्दचित्र आहे. प्रत्येम जागा, प्रत्येक भावना, प्रत्येक अनुभुती शब्दांबरोबर मनात साकारत होती. आडातला प्रतिध्वनी, ब्रुम ब्रुम करताना कानात होणार्‍या गुदगुल्या अगदी अनुभवल्या. फार फार छान लिखाण आहे. मलाही लंपनची आठवण झाली.

(लंपन आठवला नाय का कुणाला माझ्यासारखा?>> मला आठवला पण एकाच वाक्यापुरता. ("ते सोडा" ला) Happy

बाकी मात्र साजिरा सिग्नेचर स्टाइल.

आणि सर्वात महत्वाचं- हा 'दरजा' म्हणजेच आमचं 'मुंबई सेंट्रल'.

***

इथपर्यंतची कथा सॉलिड पकड घेते.. नंतरची कथा छाने पण ती मज्जा नाये.

मस्त लिखेल शे आबा,
दरजा म्हन्जे गावनी शान ह्रास, आब्रु ह्रास, खर शे बठ्ठ.