फेक आनंद .. ??

Submitted by अंड्या on 22 October, 2012 - 07:40

दुकानाचा माल आणण्यासाठी बरेचदा माझे दादरला जाणे होते. परवाही गेलो होतो. दादर स्टेशनजवळ काही मुलांचा ग्रूप दिसला. नवरात्रीच्या निमित्ताने हिरव्या रंगात नटलेला कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रूप. फोटोसेशन चालू होते. अर्थात, नटलेल्या अवस्थेत आजकाल हेच जास्त चालते. कारण संध्याकाळी हेच फोटो फेसबूक वर अपलोड करून इतरांची वाहवा जी मिळवायची असते. वरवर पाहता धमाल चालू आहे असे वाटत असले तरीही प्रत्येकाचे लक्ष मौजमजा करण्यापेक्षा फोटो कसा चांगला येईल याकडे लागले होते. मागेही रंगपंचमीच्या दिवशीही मला असेच द्रूष्य पाहायला मिळाले होते. मुलांचा ग्रूप एकमेकांना रंग लावायच्या पोजमध्ये फोटो काढत होता. रंग लावायचा, लाऊन घ्यायचा आनंद लुटण्यापेक्षा त्यांना फोटोमध्ये आपण एंजॉय कसे करतोय हे फोटो पाहणार्‍याला दिसले पाहिजे याची जास्त काळजी होती. जेणेकरून जेव्हा ते फोटो इतर जण बघतील तेव्हा बोलतील, "वाह, क्या मजा किया यार तुम लोगोंने...."

कुठे पिकनिकला गेले आजकाल तरी हेच होते. निसर्गाला डोळ्यात नाही तर कॅमेर्‍यात कैद केले जाते. निसर्गसौंदर्याला स्वताच्या फोटोंच्या बॅकग्राऊंडवर सजवून आपण त्या जागी जाऊन आलो हेच लोकांना दाखवायचे कौतुक असते.

फोटोवरून आठवले, बाकी विवाहाचे फोटो तर असावेतच.. आयुष्यभराची आठवण आहे ती.. परवडत असेल तर विडीओ शूटही असावा..
पण फोटो काय कसे काढायचे आणि काय टिपायचे हे फोटोग्राफरवर सोडून देणे उत्तम ना.. जर नवरा नवरी फेरे घेताना, हार घालताना, पाया पडताना, जेवताखाता जर फोटोसाठी पोज द्यायला लागले किंवा फोटो व्यवस्थित अँगलने खेचला जातोय की नाही याकडेच लक्ष द्यायला लागले तर आयुष्यातील सर्वोत्तम दिवस किती ठोकळेबाज पद्धतीने साजरा होईल त्यांना ना...

इतर छंदांचेही तेच झालेय. गाणी ऐकण्याचा छंद घ्या. कधीतरी शांत मूडमध्ये निवांत पडून गाण्यांचा लुफ्त घेण्यापेक्षा ट्रेन-बसच्या खडखडाटात शोऑफ म्हणून महागातले आयपॉड आणि हेडफोन लाऊन गाणी ऐकली जातात, सोबतीला गप्पा चालू असतात, तेरे पास कौनसा गाणा है याचे डिस्कशन. तर कधी गृहपाठाचा अभ्यास लिहिता लिहिता कानावर ती गाणी आदळत असतात.

मोबाईलगेमसारखा कृत्रिम आनंद जगात दुसरा नसावा. त्यावर न बोललेलेच बरे. फार तर फार चार बाय सहा ईंचाच्या स्क्रीनवर बसल्याबसल्या डोळे फाडत स्वताचेच रेकॉर्ड मोडत बसायचे..

या आणि अश्या बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या माझ्याच वयाच्या किंवा काही वर्ष कमी वयाची मुले आजकाल सर्रास करताना दिसतात. करताना त्यांच्या चेहर्‍यावर एक आनंद दिसतो, नक्कीच दिसतो. पण का माहीत नाही मला तो कृत्रिम भासतो. याला खरेच निर्मळ आनंद म्हणावे का की फेक आनंद म्हणावे की जमाना बदल गया है माँ जी बोलून चालवून घ्यावे.

- आनंद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर आहे.. हेच दिसुन येतय सगळीकडे... निखळ आनंद घ्यायचा ते नाहीच.. उगाच शो-ऑफ पणा बस्स..

हम्म खरं आहे... फेसबुक चे वेड तर इतके सगळ्यांना लागलेय की माझी एक मैत्रीण फोटो काढताना म्हणते 'ए माझा प्रोफाईल फोटो काढ'
निसर्गाचे उदाहरण तर अगदी पटले.

लेख आवडला. कुणाकडे लक्ष द्यायला वेळ नसलेली आजकालची लोकं आसुसली आहेत, स्वतःची कुणीतरी दखल घ्यावी म्हणून.

>>एक मैत्रीण फोटो काढताना म्हणते 'ए माझा प्रोफाईल फोटो काढ' Happy
अंजली_१२ >>+१

अगदी अगदी....लोकांचे फेसबुकवरचे फोटो पाहून असे वाटते की तिथे टाकायला फोटो पाहिजेत म्हणून हे लोक ट्रीप्स, पिकनिक्सला जात असावेत...
ज्याच्याकडे कॅमेरा आहे त्याचा निम्मा वेळ सगळ्यांचे फोटो काढण्यातच जातो....

पटलं नाही ..

ह्या लॉजिकने मूळात "फोटो काढणं" ही फेकच होईल ना? मायबोली सारख्या व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये विचार मांडणंही?

सशल नाही फोटो काढणं फेक होत नाही....त्याला किती महत्व द्यायचे यावर हा लेख आहे असे मला वाटते...
त्या क्षणांची आठवण म्हणून फोटो काढणे आवश्यक आहे याबाबत कुणाचेच दुमत नसावे..पण फोटो काढण्याच्या नादात ते क्षणच आपण अनुभवणार नसू तर केवळ फोटोत दिसणारा आनंद हा नक्कीच खोटा म्हणता येईल...
कॅमेरा तरी काय करणार बापडा...

विचार चांगले आहे...
लेख कमी वाटला..
आजकाल च्या फास्ट जगात व्हर्चूअल जग हे महत्वाचे झाले आहे वेळेअभावी या ईतर कारणांनी जे करणे जो आनंद घेने राहून जातो तो आपण व्हर्चूअल जगातून मिळविण्याचा प्रयत्न करतो..

निरिक्षण बरोबर असलं तरी लेख आणि बहूतेक प्रतिसाद थोडया प्रीजुडाईसने लिहिल्यासारखे झालेय.

ईलेक्ट्रॉनिक मिडिया चा अतिरिकी वापर होतो आहे हे मान्य पण तो त्या वयोगटानुसार त्या मॅचुरिटीला धरूनच असणार. सध्याच्या लोकांची मॅचुरिटी आणि सॅच्युरेशन वाढेल तेव्हा ते दुसरा मार्ग शोधतील (गिर्यारोहणाला जातील, पुणे फेस्टीवलला जातील), पण त्यांची सध्याची जागा घ्यायला पुन्हा लोक येतील.
तुम्हाला रोजच्या प्रवासात, कामाच्या जागी हेच लोकं दिसत असल्याने तुमचा तसा समज झाला आहे.
काही अंशी तो बरोबरही आहे.
अमेरिकेत घराची मुख्य दारं आत ऊघडतात,जपानमधल्या घरांची बाहेर ऊघडतात त्यात कुठली पद्धत चूक-बरोबर असे काही नाही. तो फक्त फरक आहे.

कुस्तीची जागा क्रिकेट ने घेतली आणि रेडिओ सिलोनची आयफोनने, कालाय तस्मै नमः म्हणायचं.
चूक बरोबर काही नाही. मॅचुरिटी लेवलचा फरक आहे, ती लेवलही ही कमी जास्त नाही तर फक्त वयानुसार वेगळी आहे ईतकंच. हेच आयफोन वापरणारे 'हार्ट फाऊंडेशनसाठी रन आयोजित करतात, खेड्यांअमध्ये जाऊन श्रमदान करतात, सोशल ईश्यूंना घेऊन संस्था काढतात.'

ह्या जमान्यात प्रत्येकाला(बहुतेकांना) आपलं ब्रँड-एस्टॅब्लिशमेंट साधायचं आहे. आरशात बघून तुम्ही 'मी चांगला दिसतोय' म्हणता आणि चालू लागता. एखाद्याला हेच अजून चार जणांना 'मी बघा काय छान दिसतोय' हे सांगायचं असेल तर तो चुकीचा किंवा त्याचं वागणं कृत्रिम कसं?

उठल्या बसल्या काही लोक फोटो टाकत असतात तेव्हा वाटते वरील लेख सारखे ..

पण कधी चमन म्हणतो तसे ही वाटते आपल्या लोकांनी ,मित्रांनी पाहायला हवेत फोटो तेव्हा चांगले फोटो आवर्जून टाकले जातात ..माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलीच्या वाढदिवसाचे फोटो टाकले होते .फार गोड दिसत होती तिची लेक .तिचा निर्व्याज आनंद फोटो काढताना टिपला आणि पाहणाऱ्या पर्यंत पोहोचला !
<<मॅचुरिटी लेवलचा फरक आहे>> हे मात्र सोळा आणे खरे !

मस्तच... सहज मनात आले.. सुचले.. लिहावेसे वाटले.. लिहून इथे टाकावेसे वाटले... आणि या अश्या छान छान प्रतिक्रिया... छान छान म्हणजे केवळ लेख छान आहे किंवा विचार पटले या पठडीतल्या नाही... तर विचार अगदीच काही नाही पटले किंवा आपापला दृष्टीकोन वगैरे वगैरे प्रतिक्रियाही भावल्या.. भावल्या कारण मी जे सहज लिहिले ते इतरांशीही रीलेट झाले.. त्यांनाही विचार करावासा वाटला आणि जो काही विचार केला तो इथे शेअर करावासा वाटला.. अगदी माझ्यासारखेच.. आता मी लिहिताना हे सहजपणेच लिहिले म्हणून मला हा आनंद मिळतोय.. जर हे लिहितानाच मी मुद्दे एकदम मुद्देसूद झाले पाहिजेत, लोकांना आवडलाच पाहिजे लेख, भरभरून प्रतिक्रिया आल्या पाहिजेत असे काही डोक्यात ठेऊन लिहिले असते तर एवढा सहज आनंद मला कदाचित मिळालाही नसता..

इथे आतापर्यंत छान प्रतिसाद आलेच.. अजूनही आले तर वाचायला आवडतील.. लिखाणाची भूक तर भागली.. वाचनाचीही मिटेल..

काही जणांना हे फार छोटे लिहिले असे वाटले असेल.. पण त्याचक्षणी जे सुचले तेच आणि तेवढेच लिहिले.. आठवून आणखी यात जोडायला मला जमले नसते कारण माझी लेखनमर्यादा.. आणि एकदा ते जमत नाही असे जाणवले असते तर उगाच जे लिहिले ते ही घरच्या कागदावरच राहिले असते..

असो, फोटो काढण्यावरून अजून काही आठवले ते देखील आपले प्रतिसाद हीच आपली परवानगी समजून इथे जोडतो..

मुळात फोटोसेशनमध्येही कोणी आनंद घेत असेल तर त्यात काही वावगे नाही, जर खरेच एखाद्याला आनंद येत असेल तर त्याने तो घ्यावा.
मुद्दा हा आहे की फोटोच्या नादात तो क्षण, त्या खर्‍याखुर्‍या क्षणात घडणारी मजा जी तेव्हाच घ्यायची असते त्याकडे दुर्लक्ष होते किंवा त्याला बॅकफूटवर टाकले जाते.

गंमत म्हणजे आजकाल नाचतानाही नाचाचा आनंद घ्यायचा सोडून कोणी कॅमेरा सरसावला की तिथे बघून हात वर केले जातात. आणि जेव्हा जेमतेम अर्ध्या तासाचाच वेळ नाचायला असेल आणि अर्धा तास कोणी फोटोग्राफर तिथे कडमडत असेल तर सर्वांचे ध्यान तिथेच.. Happy

मुळात फोटोसेशनमध्येही कोणी आनंद घेत असेल तर त्यात काही वावगे नाही, जर खरेच एखाद्याला आनंद येत असेल तर त्याने तो घ्यावा.
मुद्दा हा आहे की फोटोच्या नादात तो क्षण, त्या खर्‍याखुर्‍या क्षणात घडणारी मजा जी तेव्हाच घ्यायची असते त्याकडे दुर्लक्ष होते किंवा त्याला बॅकफूटवर टाकले जाते.>> तुमच्या दोन्ही वाक्यांमधे विरोधाभास आहे. त्यांना नाचाचा आनंद घ्यायचा नसून फोटोचा आनंद घ्यायचा आहे तेंव्हा जे तुमच्या द्रुष्टीने अधिक आनंदाचे आहे ते त्यांच्या द्रुष्टीने नाही नि जे त्यांच्या द्रुष्टीने अधिक आनंदाचे आहे ते तुमच्या द्रुष्टीने नाही.

मुद्दा हा आहे की फोटोच्या नादात तो क्षण, त्या खर्‍याखुर्‍या क्षणात घडणारी मजा जी तेव्हाच घ्यायची असते त्याकडे दुर्लक्ष होते किंवा त्याला बॅकफूटवर टाकले जाते.>> तुमच्या दोन्ही वाक्यांमधे विरोधाभास आहे. त्यांना नाचाचा आनंद घ्यायचा नसून फोटोचा आनंद घ्यायचा आहे तेंव्हा जे तुमच्या द्रुष्टीने अधिक आनंदाचे आहे ते त्यांच्या द्रुष्टीने नाही नि जे त्यांच्या द्रुष्टीने अधिक आनंदाचे आहे ते तुमच्या द्रुष्टीने नाही.

>> नाही, अनेकदा त्यांना त्याचाही आनंद घ्यायचा नसतो (एक निरिक्षण). फक्त सवय. फोटो काढून फेबुवर टाकणे, बसल्या उठल्या फेसबुक वर स्टेटस टाकणे - something is missing boss. Unless you are really using it as a facility to reach/to promote, they are using you.

ह्या जमान्यात प्रत्येकाला(बहुतेकांना) आपलं ब्रँड-एस्टॅब्लिशमेंट साधायचं आहे. आरशात बघून तुम्ही 'मी चांगला दिसतोय' म्हणता आणि चालू लागता. एखाद्याला हेच अजून चार जणांना 'मी बघा काय छान दिसतोय' हे सांगायचं असेल तर तो चुकीचा किंवा त्याचं वागणं कृत्रिम कसं?
>> you can call me judgemental, but whoever needs to prove something to the outside world (without other ulterior, clever motives) - नक्की काहीतरी चुकतय.
तसं म्हटलं तर, आम्हाला त्यांचं चुकीचं वाटलं तर ते चुकीचं कसं? असलेही प्रश्न विचारता येतील. NOM

आपण प्रत्यक्षात, वर्तमानात किती वावरतो? आत्ता जो काही क्षण आहे तो... "सर्वथा" जगण्याकडे आपलं किती लक्षं असतं?
त्या क्षणाची आठवण... ती मनातून पुसली गेली तर?... पुन्हा मनातल्या मनात का होईना पण जगण्यासाठी कॅमेरॅत टिपलेले क्षण म्हणजे फोटो असं मला वाटतं.
त्याचाच दुसरा भाग म्हणजे तो क्षण, तो अनुभव किंचित का होईना पण दुसर्‍याशी वाटून घेता येण्याचं एक साधन म्हणजे फोटो.
पण क्षण जगणं सोडून... तो "भविष्या"साठी कॅमेर्‍यात टिपण्याच्या "अट्टाहासावर" हा लेख आहे असं मला वाटतं.

मला फोटोसाठीच गरबा, रंगपंचमी खेळायचीये, लग्नातले विधी... ते काय ते फोटोत टिपलेत ते सगळेच्या सगळे आठवतात, फोटो बघताना... आत्ता फोटो काढला नाही तर दाखवणार काय मित्र-मैत्रिणींना... काय काय धमाल केली ते...
ह्याच विचारातून क्षण जगण्याचा उद्देश असेल तर... हरकतच नाही.

पण ज्यांचा नसेल अन त्या दिशेनं चुकुन प्रवास घडत असेल तर...
तर हा लेख डोळे उघडणारा आहे असं मला वाटतं.

आनंद, उत्तम जमलाय लेख.

you can call me judgemental, but whoever needs to prove something to the outside world (without other ulterior, clever motives) - नक्की काहीतरी चुकतय. >> हो तुम्ही जगाच्या बदलत्या नियमांना 'वेड' म्हणता आहात ते चुकतंय. त्याला 'पॅशन' म्हणा.

मुळात फोटोसेशनमध्येही कोणी आनंद घेत असेल तर त्यात काही वावगे नाही, जर खरेच एखाद्याला आनंद येत असेल तर त्याने तो घ्यावा.>>>

आनंद, छान जमुन आलाय लेख. कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा याचं भान ठेवलं की मग हा प्रश्न समोर उभा ठाकत नाही. फोटो हवेतच कारण ते काही वर्षांनी जुन्या आठवणींना उजाळा द्यायला उपयोगी पडतात. पण फोटोच्या नादात प्रवासाचा मुळ हेतुच विसरून जाणे मुर्खपणाच आहे. माझ्याकडे पण मी जिथे जाईल तिथे माझा कॅमेरा असतो. पण तो बाहेर मात्र येतो, भोवतालच्या निसर्गाची सगळी मजा मनसोक्त उपभोगून झाल्यावर. Happy

आवडेश !

पटलच ! मला वाटतं दाद ने योग्य शब्दात मांडलय.
मला फोटोसाठीच गरबा, रंगपंचमी खेळायचीये, लग्नातले विधी... ते काय ते फोटोत टिपलेत ते सगळेच्या सगळे आठवतात, फोटो बघताना... आत्ता फोटो काढला नाही तर दाखवणार काय मित्र-मैत्रिणींना... काय काय धमाल केली ते...
ह्याच विचारातून क्षण जगण्याचा उद्देश असेल तर... हरकतच नाही.

पण ज्यांचा नसेल अन त्या दिशेनं चुकुन प्रवास घडत असेल तर...
तर हा लेख डोळे उघडणारा आहे असं मला वाटतं.>>>>+१

छान लेख आणि प्रतिक्रिया पण! Thought provoking!! तसे सगळ्यांचेच बरोबर आहे म्हणा. प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो. समोरच्याचे मत आपल्यासारखे असावे अशी अपेक्षा नसावी. ज्यांना ज्यात आनंद वाटतो त्या गोष्टी ते करतात.

पण फोटोबाबत माझेही काही असेच मत आहे. माझ्या मित्राच्या लग्नात तर फोटोग्राफर आणि गुरुजींमधेच जुंपली होती! त्यात त्याला कळेना कोणाची बाजू घ्यावी Wink !! कॅमेरा आणि मेमरीच्या स्वस्ताइमुळे बरेच जण फिरायला गेल्यावर एका दिवसामागे शेकडो फोटो काढतात आणि त्याउपर सरसकट सगळे फोटो upload करतात Sad त्यामुळे फोटो काढण्याचा आणि upload करण्याचा आनंद त्यांना मिळाला तरी ते फोटो बघण्याच्या आनंद मला मिळत नाही Happy आणि असे हजारो फोटो एकदा संगणाकावर घेतल्यातर परत कधी बघणंही होत नाही असा स्वानुभव आहे.

जे फोटोच्या आनंदाबाबत, तेच प्रवासाच्या देखिल. एक शहर बघायच्या बर्‍याच तर्‍हा आहेत हे पॅरिस बघायला आलेल्यांना बघुन माझ्या लक्षात आलं. अगदी दोन दिवसच असताना, त्यातला एक दिवस Disney Land मधे घालवणारे देखिल आहेत. ते आयफेल टॉवर आणि मोनालिसा (लूव्र नाही... फक्त मोनालिसा) बघुन खुश असतात. त्यामुळे हा विषय अतिशय subjective आहे.

चमन म्हणतो तसं 'त्या वयोगटानुसार त्या मॅचुरिटीला धरूनच [वागणं] असणार'. याबद्दल एक उदाहरण अठवतं, विदेशात 'टीनएजर्स' चे कपडे काही आगळेच असतात. स्वतःचा वेगळेपण ठसवण्याच्या नादात सगळे टीन्स टिपकल एकसारखे दिसतात! पण हे त्या वयोगटालाच लागू होते. त्या फेज मधुन गेल्यावरच बहुतेक प्रत्येकाला आपली खरी आवड कळत असेल.

Pages