कण्हतोस, छताला तुझिया काचेचे झुंबर नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 19 October, 2012 - 00:18

गझल
कण्हतोस, छताला तुझिया काचेचे झुंबर नाही!
ते पहा घराला त्यांच्या केव्हाचे छप्पर नाही!!

गळफास बसावा तैसे आयुष्य लटकते माझे;
जमिनीस पायही नाही, हाताशी अंबर नाही!

वेशीवर वार्धक्याच्या मन भरून आले माझे.....
कनवटीस माया आहे, मायेची पाखर नाही!

पसरून वळकटी माझ्या देहाची, झोपी गेलो;
पसरून हात कोणाला मागितली चादर नाही!

फेकून दिले अन् आता लागले मला धुंडाळू....
बहुतेक जाणले त्यांनी...मी म्हणजे कंकर नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली गझल आहे. कण्हतोस या शब्दाऐवजी काही वेगळे हवे होते असे वाटून गेले.

गळफास व लटकणे यावरून माझा फारच जुना शेर आठवला.

स्त्रीने गळ्यात हार घातला की हाराचा गळ्यापासचा भाग तिला अगदी चिकटून असतो आणि टोकाचा भाग लटकत राहतो यावर तो शेर केला होता मी:

घाले गळ्यात ती त्या हारापरीच मीही
आधी विलास... नंतर लटकून जन्म गेला

धन्यवाद भूषणराव! मतल्याबद्दल बोलला नाहीत काही?

भूषणराव! धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
नोव्हेंबर १९९३ मधे लिहिलेली ही आमची गझल, आज वाचनात आली.
एकही शब्दाचा फेरफार न करता व कोणताही अतिरिक्त शेर न करता, ही गझल जशी होती, तशीच इथे पोस्ट केली!
कारण नवीन लिहिलेला शेर या उंचीचा होईल की, नाही ही खात्री नव्हती आम्हाला, म्हणून मोहास मुरड घातली!

वाचता वाचताच ‘कण्हतोस’ या शब्दावरच आमचे चिंतन सुरू झाले.
‘म्हणतोस’ म्हणून पाहिले. पण आम्हासच ते सपाट वाटले.
म्हणून ‘कण्हतोस’ असेच ठेवले. फक्त कण्हतोस ऎवजी दुसरे काही सुचल्यास जरूर कळवा.
तुमचा हाराचा शेर खूपच सुंदर आहे.

तो शेर आम्ही असा वाचला................

होतो तिच्या गळ्याचा जात्याच हार आम्ही!
आधी विलास....नंतर लटकून जन्म गेला!!

................प्रा.सतीश देवपूरकर