गेट क्लोजर

Submitted by दाद on 11 October, 2012 - 20:28

गेट क्लोजर...
काय फंडा आहे...

नक्की कशा कशावर कंट्रोल आहे आपला म्हणायचा... म्हणून गेट क्लोजर?
कधीतरी अख्खं आयुष्यच झपाटून टाकणारं, काहीतरी गवसतं.... आयुष्यात आल्याचं कळतं. आपलाच एक भाग बनून जातं. त्याच्याविना आयुष्यं अधुरं, अपुरं वाटेल असं काहीतरी. त्याविना दु:खं अधिक गहिरं अन आनंदही कोमेजलेला असतो. त्याच्या मनातलं हसू आपल्या जिवणीवर झुळझुळतं, त्याची काळजी आपल्या काळजाचं पाणी होऊन भळभळते.... अन तिथं ओघळल्या सरीनं आपलं जग चिंब होतं.
नक्की कधी हे झपाटलेपण आयुष्यात आलं, कळतच नाही... आपण कुंपणं तयार करतो मनाच्या परिघांमधून... अगदी कवाडंही असतात. का कळत नाही मग हे अलवार, चाहुलीविना येऊन संगतीनं झुलणारं कुणी... आपल्याच मनाच्या मातीत कुणी रुजावं...
आपला अगदी कसलाच कंट्रोल कसा नाही?
स्वप्नं कधी सुरू होतं ते कळतं का? आपण एकदम स्वप्नातच असल्याचं लक्षात येतं... तसंच हे सुद्धा.
आपल्या हातातच नाही ह्यातलं काहीही.
स्वप्नं पडण्यावर आपला कंट्रोल नाही...

नको नको म्हणताना... स्वप्नं तुटतात... तसंच, हे ही.
निघून जातं... हे ही... तटकन तोडल्यासारखंच.
’चला... वेळ झाली, निघायला हवं’ असं दहा वेळा म्हणत, चौदा वेळा वळून निरोप घेण्याची तयारी नाही.
पुन्हा पुन्हा थांबून..., एकदा उठून उभं रहात, मग उंबरठ्यापाशी, मग कुंपणापाशी.... आपलं असलेपण असं कणाकणानं आवरत, हलके हलके जीव गोळा करून घेत नाही...
पुन्हा एकदा झपाट्यानंच...
आत्ता होतं आत्ता नाही असं. सट्टाकाकन... एकदम जातंच निघून.

आपल्या हातात नाहीच ह्यातलं काहीही. स्वप्नं पडणं नाही... ते धरून ठेवणं तर नाहीच नाही...

मग कुणी म्हणालं ना... "गेट क्लोजर... मूव्ह ऑन...." की... की...
कुणीतरी चारचौघात फाडकन कानफटात मारल्यासारखं झण्णं होतं... रक्ताचा कणन कण दाणदिशी डोक्याकडे धावतो, कानातून वाफा येतात, मुठी बळतात....
आपण मोठ्ठ्याने किंचाळतो... हाऊ? हाऊ कॅन आय? मूव्ह ऑन?... माझं.... माझं आयुष्यं होतं ते... जिवाच्या आकांताने आतडं पिळवटून, घसा खरवडून... आपण ओरडतो...
पण मनात!
अगदी बंद मुठींनी सगळं गच्चं आवळून, आवरून धरीत आपण किंचाळतो... पण मनातच.

चेहर्‍यावर मात्रं समजुतदारपणा लिंपून मान हलवतो... ’कबूल... खरंय...’ अशी...केविलवाणी.

अशा वेळी ’लेट गो’ म्हणजे काय? आपलं अस्तित्वं एक निव्वळ जडत्वं म्हणून उरलंय, त्यातलं चैतन्यं निघून गेलय... आता काय लेट गो?
विस्कटलेली रांगोळी बघितलीये? तसा प्रत्येक कणाला स्वत:चा म्हणून रंग असतोच... पण रांगोळीत्वं हरवून बसलेला कण... अर्थं नाही.
आपलं आयुष्यही तसंच... श्वास घेतो, भूक लागली की खातो, कामं करतो... आहोत आपले जिवंत...
अर्थं नाही.
अगदी हलक्या फुंकरीनंही... रांगोळी, कण कण विखरून विरून जाते... तसं विस्कटून जावं असं अत्यंत वाटूनही... आपण जगतो... जगत रहातो. आपलं विस्कटणं लिहिलेल्या त्या फुंकरीची हताश वाट बघत.
मग, मनाला लेपून राहिलेले त्याचे संदर्भं... वेढून राहिलेला त्यांचा सुगंध, त्यांचा रंग हे सगळं काळाबरोबर हल्लक होऊ नये, फिकटू नये म्हणून पुन्हा पुन्हा जगतो आपण... त्याच्याबरोबरचे आठवतील तितके, आठवतील ते ते क्षण... पुन्हा पुन्हा रेखतो आपण त्या आठवणींची रांगोळी.... मनातच.... पुन्हा पुन्हा...
प्रत्यक्षात मात्रं.... कणाकणानं विस्कटत रहातो आपण.... पुन्हा पुन्हा.

.... हलकट... हलकट आहे आयुष्यं.... कोलाज, सालं. कुठलेही तुकडे उचलून फेकले तरी बघणारा म्हणणार... "व्वा छान!"... किंवा "असूदे... चालेल!"... छान काय... चालेल काय?... काय कळतय ह्या चित्रातलं?
आभाळफाटल्या चित्राच्या मनाचा विचार केलाय कधी?
त्यानं रंगवलं म्हणून रंग,
त्याच्या चाहुलीनं गंध,
त्यानं गुणगुणलं म्हणून सुरेल,
त्यानं मांडलं म्हणून नीट...
त्यानं धस लावला तर तीट...
हो... असंच होतं... अगदी इतकच होतं..

हे हल्लक, हळवं, पोकळ, निरर्थक फोलपटाचं आयुष्यं... क्षणाक्षणानं अन कणाकणानं चिवडत बसलेल्याला कसं काय म्हणवतं?...
गेट क्लोजर...

आपल्या असण्याच्या प्रत्येक क्षणाला अन कणाला
नव्याने अर्थं देत बसावं लागतं तेव्हा होतात,
त्या, वांझोट्या प्रसुतीच्या वेदना...
अस्तित्वाचा हरेक कण अन जन्माला आलेला पुढला प्रत्येक क्षण
स्वत:च चाटुन-पुसुन स्वच्छ करतो... आपण नुक्ती चढवली अर्थाची चांबट कात...
अनर्थाचा चिखल होऊन बसतात कण अन क्षणही...
कशावर कंट्रोल आहे आपला?
त्यांचं चालूच... अजून एक कण... पुन्हा एक क्षण...
पुन्हा तेच रिकामं नासणं...
पुन्हा जन्मं...
पुन्हा... गेट क्लोजर!

जस्ट... गेट क्लोजर!

समाप्तं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे... पुन्हा वाचावं लागणार.. प्रतिक्रीया वाचुन थोडं थोडं येतयं डोक्यात... पण तरीही रिलेट होत नहिये..

असो.. बाकी दाद तुमच्या, दुसर्‍याच्या मनातल्या भावना खोलवर आत पोहोचून शब्दांत मांडण्याच्या कौशल्याला सलाम!

@दाद,
मी सांगायचा प्रयत्न करतोय पण नक्की शब्दात मांडता येत नाहीये.
इतर कुठलंही लेखन (गद्य असो , कविता असो) , एक लेखन म्हणून त्याच्याकडे पाहता येतं. त्या लेखकाला/कवीला आलेली अनुभूती कशी असेल याच्या जवळ जाता येतं. थोडक्यात एक कलाकृती म्हणून थोडं तटस्थपणे पाहता येतं. त्या त्या व्यक्तिरेखांच्या चष्म्यामुळे त्या आपल्यापुरत्या प्रामाणिक असतात. पण लेखातल्या नायिकेची अवस्था कल्पनेतली आहे कि वास्तवात चष्मा फुटल्यामुळे आहे हे ठरवणं अवघड पडतंय (मला तरी). आणि त्याबद्दलची चर्चा देखील एक कलाकृतीबद्द्लची चर्चा म्हणून न राहता वास्तव/कल्पना/मानसिक आरोग्य यांच्या सीमांवर फिरत राहते. आणि चष्मा फुटला असेल तर फुटपट्टी लावली तरी तिचा काय उपयोग?

सॉरी अजय, मला अजूनही नाही कळत तुम्हाला नक्की काय म्हणायचय.
<<थोडक्यात एक कलाकृती म्हणून थोडं तटस्थपणे पाहता येतं. त्या त्या व्यक्तिरेखांच्या चष्म्यामुळे त्या आपल्यापुरत्या प्रामाणिक असतात. पण लेखातल्या नायिकेची अवस्था कल्पनेतली आहे कि वास्तवात चष्मा फुटल्यामुळे आहे हे ठरवणं अवघड पडतंय (मला तरी)>>

म्हणजे लेखातली नायिकाच कल्पनेतली आहे की वास्तवातली असा तुमचा प्रश्नं आहे का? तर मग तो प्रश्नं गौण आहे.

नायिकेच्या मनाच्या अवस्थेबद्दल म्हणाल तर...
ह्या लेखातल्या नायिकेची अवस्था तिच्यापुरती तरी वास्तव आहे.
तिच्या मनोभूमिकेतून बघू शकणार्‍यांसाठी, सह-अनुभूती घेऊ शकणार्‍यांसाठी "कदाचित कल्पना" आहे.
ते ही न करू शकणार्‍यांसाठी "इतकं कोसळणं शक्यंच नाही... काहीही लिहिलय" असंही आहे.

"माझ्याकडे सगळं सुशेगाद आहे... सखीच्या मनोभूमिकेत शिरायचा प्रयत्नं आहे".... हे मी लिहिलं नसतं तर तुमचा अभिप्राय वेगळा असता का?

दाद मस्त लिहिलं आहेस. आवडलं पण का कुठे, कुणास ठाऊक, धुळीत उडणार्‍या पाचोळ्यासारखं भिरभिरतं वाटलं. कदाचित माझी विचारांची कुवतच कमी असावी समजून घ्यायला. Happy

आवर्जून प्रतिसाद दिलात... सगळ्यांचे आभार.
धनश्री, <<कदाचित माझी विचारांची कुवतच कमी असावी समजून घ्यायला>>.
नाही... हे ललित बरिक फसलेलंच दिसतय Happy
"धुळीत उडणार्‍या पाचोळ्यासारखं भिरभिरत" जे म्हणते आहेस तसंही असण्याची शक्यता आहेच. हे ललित एका, रिअ‍ॅलिटी, रॅशनॅलिटी, लॉजिक सुटलेल्या मनाचं भिरभिरणं शब्दांत पकडण्याचा प्रयत्नं (फक्तं). बर्‍यापैकी फसलेला दिसतोय.

> गेट क्लोजर...
> नक्की कशा कशावर कंट्रोल आहे आपला म्हणायचा...

म्हणुनच अनेकांची बहुदा 'रिमोट' कंट्रोल वर श्रद्धा असते.

Pages