राजु

Submitted by शाबुत on 8 October, 2012 - 01:45

राजुनं स्कुलबॅगचं भलंमोठं ओझ पाठीवर ठेवलं, गर्दीच्या रेटारेटीत तो एकदाचा सिटीबसमधे चढला. दररोज बसमधे गर्दी पाचीलाच पुंजलेली होती, आजच्या सारखी बस वेळेवर आली आणि तिच्यामधे फ़क्त चढायला जरी मिळालं ना, तरी शाळेतला अख्खा दिवस चांगला जातो, असा राजुचा आजवरचा अनुभव होता. एवढ्या गर्दीत पाठीवरच्या पुस्तकाच्या ओझ्याकडे पाहुन कोणी जागा दिली तर "सोने पे सुहागा", शाळेपर्यंत उभचं जावं लागलं तर हाच "आखरी रास्ता". कधीतरी एखाद्या कंड्याक्टरने रोजचेच प्रवास करणारे म्हणुन "इकडे जा रे, तिकडे जा रे" असं म्हटलं तर "किस्मत का मारा". राजुचा असाच विनोदी संवाद कधीतरी मनाशीच चालायचा, त्यावत तो कधीतरी एकटाच खळखळुन हसायचा.

काल संध्याकाळी राजु त्याच्या वडीलांना वैतागुन म्हणाला, "मला दहावीचा किती अभ्यास असतो, आता घड्याळात बघा, किती वाजले ..... सात! माझी शाळा पाच वाजताच सुटली, नंतर दीड तास मी सिटीबसच्या स्टॉपवर उभा होतो, येणाऱ्या प्रत्येक बसमधे एवढी गर्दी असायची की चढायला ही जागा मिळायची नाही."
"असं होतं कधीतरी!" राजुचे वडील नेहमीच्या सुरात म्हणायले.
"कधीतरी नाही, आता नेहमीचचं झालय, या बसच्या प्रवासानं मी घरी आल्यावर हातात पुस्तक घेण्याचं त्राणच राहत नाही, मग अभ्यास कधी करायचा?"
"मग काय करायचं?"
"बाबा, माझ्या सगळ्या मित्रांनी रिक्षा लावल्या आहेत, मीही जात जाईन त्यांच्या सोबत!"
"बेटा, आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते परवडणात नाही."
"मला माहीती होतं, तुम्ही असच काहीतरी बोलणार म्हणुन" राजु वडीलाच्या बोलण्यावर जाम वैतागला.
"सामान्य माणसाला हे परवडत नाही, सामान्य माणसाला ते परवडत नाही, काल मॅडम वर्गात म्हणाल्या की दहावीत किमान पंच्याशी टक्क्यांच्यावर पास व्हा, नाहीतर तुम्ही सामान्यांच्या वर येऊच शकणार नाही!"
"अस्स"
"बाबा, तुमचं वाक्य मॅडमच्या तोंडुन ऐकुन, मी तिथचं डोक्याला हात लावला."
राजुनं परत डोक्याला हात लावला, पण तो हात पाहायला त्याचे वडील त्या खोलीत नव्हते. ते घरातल्या दुसऱ्या खोलीतल्या कपाटावरुन एक जुनी डायरी काढत होते.

ती जुनी डायरी राजुच्या हातात देत ते म्हणाले, " हे बघ, या डायरीत मी माझ्या तरुणपणात लिहलेली सामान्य माणसाची काही लक्षने आहेत, अजुनही ती डायरी पुर्ण नाही." डायरी राजुच्या हातात देवुन ते घराच्या बाहेर निघुन गेले, नंतर राजु ती डायरी वाचु लागला.
- सगळेच करतात म्हणुन मीही करावं, ही सामान्य माणसाची एकमेव विचारश्रेणी.
- त्याच्याकडे निर्णयक्षमता मुळीच नसते, चार माणसांना विचारुन, चार लोक आजपर्यंत करत आले त्याच पध्दतीनं काम करतो, तसचं त्याचं कोणतही काम चार माणसांनी चांगलं म्हणावं अशीही अपेक्षा तो ठेवतो.
- त्याचं असं असतं की थोडक्यात त्याचं समाधान होत नाही, जास्त मिळालं तर त्याला त्याची किमंत राहत नाही.
- त्याला कोणत्याही सुखसुविधा दिर्घकाळ सुखी ठेवु शकत नाहीत, त्याला जिवनात नेहमीच बदल हवा असतो, म्हणुन त्याच्या मानसिकतेवरच बाजारपेठांची गणितं रचल्या जातात.
- सामान्य माणुस उत्सवप्रिय असतो, त्याच्या नेहमीच्या कंटाळवाण्या जगण्यातला तो क्षणीक सुखाचा उंचवटा असतो, त्यातुन त्याला जगण्याचा नवा हुरुप मिळतो, आयुष्यात काहीतरी केल्याचं समाधान मिळतं.
- एकानं काही नवीन केलं की त्यामागे दुसरा, नंतर तिसरा, पुढचा काही विचार न करता सगळेच त्याच्यामागे धावतात ते म्हणजे मेंढीपळण. हे सामान्य माणसाचं महत्वाचं लक्षण.

जुन्या ग्रंथात बर्‍याच गोष्टींची उत्पत्ती ही सामान्य माणसासाठीच झाली.
सगळ्यांच इच्छा पुर्ण करणारा - कल्पतरु
मागेल ती स्वादिष्ट अन्न देणारी - कामधेनु
क्षणात लोखंडाचा सोने करणारा - परीस
या जगात असंही काही असु शकतं, आपल्या हवं ते क्षणात साध्य होऊ शकतं, या विचाराणंही तो कसा बहरुन जातो.

जसं,
पावसाळ्या सुवातीला पाऊस पडल्यानंतर शेतकरी शेतात पेरणी करतो, बियांण्याची रोपं उगवता, नंतर आकाशातुन पाऊसच पडत नाही.
तेव्हा, जमिनीतुन वर आलेली रोपं दुपारच्या उन्हात माना खाली टाकतात. त्यांच्या कडे पाहीलं की वाटतं, पाण्याअभावी मेली सगळी.
पण तसं होत नाही, रात्रीच्या गार वाऱ्यानंही ती सकाळीपर्यत हिरवीगार होऊन उठतात, जगण्याचं नवं बळ अंगात घेऊन. कल्पतरु, कामधेनु, परीस अशा कल्पनांची निर्मितीही सामान्य बुध्दीच्या माणसासाठीच झाली, जिवनातल्या भर उन्हाळ्यातही पंख्याच्या थंड हवेवर जगविण्यासाठी.

त्याच्या पाठीवर शाबासकीचा हात जरी पडला तर छाती वितभर पुढे फ़ुगते.
पोटावर लाथ बसली तर त्याच्या डोळ्यातुन धारा येतात.
त्याच्यावर अन्याय झाला तर सहन करण्याव्यतिरिक्त त्याच्या पुढे काही पर्यायच नसतो.

सामान्य माणसाचं असंही असतं की त्याला दिलेल्या सवलती, नंतर त्या हक्क होऊन बसतात, मग देण्याऱ्यालाही प्रश्न पडतो की यांना आणखी काय द्यावं, किती द्यावं, परत द्यावं की नाही द्यावं, कारण आधीच देवुन काही चुक नाहीना केली.
म्हणुन ज्याच्या गरजा कधीच पुर्ण होत नाही ....... तो सामान्य.
मग होतं काय?
त्याच्या गरजाचं राजकारणाला इंधन मिळतं, त्यातुन नवं समाजकारण घडु पाहतं.
यांना हे द्यायला पाहीजे, त्यांना ते द्यायला पाहीजे, यावर मोठी भाषणं होतात. त्यात गंमत अशी की राजकारणी ही आपला हिस्सा अगदी हक्कानं काढुन घेतात.

कोणतीही राजवट येवो, ज्याच्या सामान्य गरजाही कधी सुटत नाहीत. "रोटी, कपडा और मकान" एवढंही मिळवण्यासाठी त्याला दिवसरात्र जिवाचा आटापिटा करावा लागतो. कधी आपलं गाव, कधी देश सोडावा लागतो, तरीही दररोजची तडजोड काही केल्या त्याची पाठ सोडत नाही.

तरीपण, असे हे सामान्य आपलं जिवन, काहीतरी असामान्य निर्मितीसाठी घालवितात, पण त्या निर्मितीवर त्यांचा हक्क नसतो. त्यांनी फ़क्त फ़ळबाग फ़ुलवायची नंतर फ़ळावर त्यांची मालकी सांगायची नाही.

"राजु, चल जेवुन घे, ताट वाढलय!" आईने स्वयंपाक घरातुन आवाज दिला. "हो, जगायचं म्हटलं की जेवलं पाहिजेचं." राजु ताटावर बसता-बसता बोलला. आधीच ताटावर बसलेले त्याचे वडील म्हणाले "अरे, असं नुसतं बोलतोस काय? तर तुलाही आलेले अनुभव, त्यातुन सुचलेले विचार त्या डायरीत लिहुन ठेव."
"काही डायरी-फ़ायरी नाही लिहायची, शाळेतला निट अभ्यास केला तरी पुरे!" राजुची आई ताटात पोळी आपटत बोलली.
"अग अशी काय बोलतेस, आपलं राहलेलं काम आपल्या पोरानं पुर्ण करावं, अशीही सामान्य माणसाची इच्छा असते." असं राजुचे वडील बोलले तेव्हा सारं घर हसायला लागलं.

जेवनानंतर राजु लगेच झोपला, आज त्याला अभ्यासाचीही आठवण राहली नाही. दुसऱ्या दिवशी त्याला जाग आली ती वडिलांची राहलेली वाचुन काढण्याच्या विचाराने. त्याने ती डायरी उघडली, ते पाहुन आई त्याच्यावर जोरात ओरडली, "फ़ेक ती डायरी, शाळेतलं अभ्यासाचं पुस्तक वाच, ते वाचुन नोकरी तरी मिळेल." तेव्हाच राजुच्या डोक्यात विचार उमटला, "सामान्य माणसाच्या मुलाने शाळेत जायाचं ते शिकुन नोकरी करण्यासाठी, ज्ञान मिळविण्यासाठी नाही."

राजूनं एकदाची डायरी बंद केली, स्कुलबॅग अभ्यासाचं एक-एक पुस्तक बाहेर काढु लागला, इतक्या पुस्तकामधुन आता कोणतं पुस्तक बाहेर काढायचं, हे ठरविण्यासाठीच अर्धा तास गेला, कारण त्यातलं ज्ञान फ़क्त वर्षाच्या शेवटी पेपर देऊन मार्क मिळविण्यासाठी उपयोगाचं होतं. जिवन जगायला ते प्रत्यक्ष मदत करणारं नव्हतं, परिक्षासंपली की हे सगळे पुस्तक बांधुन माळ्यावर रद्दीसाठी टाकुन द्यायचे. उन्हाळ्याची सुटी मजेत घालवायची, नंतर पुढच्या वर्गासाठी बाजारातुन परत नवीन पुस्तकांचा गठ्ठा बाजारातुन विकत आणायचा.

दुसर्‍या दिवशी लाईनीत उभा राहुन राजु सिटीबसमधे चढला. आताही पुस्तकाच्या ओझ्यानं त्यांची पाठ दुखु लागली. आता त्याला वाटत होतं, काल बाबांनी रिक्षासाठी होकार दिला असता तर आजपासुन या गर्दीपासुन मुक्ती मिळाली असती, पण तसं काही झालं नाही. आज तो उभा असलेल्या ठिकाणी सिटीबस रिकामी झाली होती म्हणुन त्याला बसायला सिट मिळाली, त्यावर राजु बसला, लगेच त्यानं वडीलांची डायरी बाहेर काढली.

सामान्य माणसाच्या सुखाच्या कल्पनाही नेहमी आपल्या मित्राशी, शेजाऱ्याशी, नातेवाईकाशी तुलना करुनच ठरतात. त्याच्याकडे हे आहे, आपल्याकडे नाही, म्हणजे तो आपल्यापेक्षा सुखी. त्यामुळे तो जास्तीत जास्त वस्तु गोळा करण्यामागेच लागतो, जसं काही वस्तुमधेच त्याचं सुख दडलेलं आहे, असाच त्याचा काहीतरी समज असतो.

चारचौघात बोलतांना तो आपलंच घोडं पुढे नेतो, तो आपण खुप काही महत्वाचं बोलतो आहोत असा आव आणतो, आपल्या बाजुच्यांना नैतिकनेचे धडे ऐकवितो. याने असं वागायला पाहीजे, त्याने तसं वागायला पाहीजे, दुसऱ्यांनी कसं जगायला पाहीजे याविषयी त्याच्याजवळ भाराभर कल्पना असतात, मात्र स्वत: काय करावं यासाठी त्याच्याकडे एकही विचार नसतो.

आता असा प्रश्न पडतो की एवढे मोर्चे निघतात, बंद पाडले जातात, रस्त्यावर आंदोलनं होतात, ह्या सगळ्या गोष्टी कोणासाठी.
हा सामान्य माणुस नेहमीच आपल्या वितभर पोटासाठी, आपल्या दिन हातांनी काम करतो किंवा आपलं एक डोकं झिजवत असतो. तसच बदलत्या परिस्थीतीशी जुळवुन घेत असतो, तेही अगदी निमुटपणे.
मग हे सर्व कोणासाठी चाललेलं आहे?

शेवटच्या प्रश्नचिन्हावर बोट ठेवुन राजुची डायरी वाचून संपली, तिची पुढची पानं कोरी होती म्हणुन त्यानं ती मिटवुन ठेवुन दिली. त्यानंतर त्याला त्या वडील आठवले, "बापाचं राहलेलं काम पोरानं पुर्ण करावं!" नंतर आई आठवली, "डायरी लिहुन पोट भरत नाही!"

राजुला वाटलं, आईचं म्हणणं खरचं आहे म्हणा, आधी पोट भरण्याचं साधन बघायला पाहीजे नंतर वेळ मिळाल तर आयूष्याच्या अनुभावावर या डायरीत लिहायला पाहीजे.

शेवटी वर्गातल्या मॅडम आठवल्या, "सामान्यतुन वर यायचं म्हणजे .............." या गोष्टीचा निर्णय राजुला घेता येत नव्हता.

सिटीबसच्या कंड्याटरने बेल मारली, शाळेच्या स्टॉपवर बस थांबली. राजुनं आपली स्कुलबॅग पाठीवर चढवली, रोडवरच्या गर्दीतुन वाट काढीत तो शाळेकडे सरकु लागला.

**********************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं, विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

चांगली लिहिली आहे, पण अधिक उत्तम रितीने लिहिता येणे शक्य आहे असे वाटते.

sundar ahe pan ardhawat watali..shewat wegla hawa hota asa watun gela. Baki samanya mansache wichar agadi jasechya tase ale ahet Happy