एक मेघ

Submitted by अमेलिया on 5 October, 2012 - 07:58

ढग मग येतात आभाळाची कावड भरून
हवेत एक हळवा गारवा हलकेच देतात पसरून

आत्ममग्न थेंबांची आवर्तने होत राहतात काही काळ
हिरवेलेसे गढूळ पाणी साचत जाते सभोवताल

मौनात शांत थरथरत झाडं जगून घेतात हिरवेपण
धुरकट हवेत चुकार शीळ ओलावलेले पंख पण

पिवळ्या प्रकाशाची नक्षी आता ढगांच्याही पाठीवर
निथळणाऱ्या क्षितिजाच्याही पल्याड घुमते एक सर

टिपून घेतो काचेवरचा एक थेंब अस्पर्शसा
एक मेघ आत दडलेला बरसाया आतूरसा

Group content visibility: 
Public - accessible to all site users