वाट कोणी देत नसतो, वाट व्हावे लागते!

Submitted by सतीश देवपूरकर on 2 October, 2012 - 05:57

तीन मुक्तछंद..........
सावली होती तोवर, माणसात वाटला गेलो!
वाटेत येताच, झाडासारखा छाटला गेलो!
आजही, अद्याप, मी याच एका पेचात आहे....
आकाशातून मीच कसा अवचित काटला गेलो!
...................................................................
किती लवकर माणसे आपला चेहरा बदलतात!
घटकेत आपली, घटकेत, परकी परकी वाटतात!!
...................................................................
प्रेताच्या सजण्याला उभारी म्हणत नाहीत!
पाचोळ्याच्या उडण्याला भरारी म्हणत नाहीत!!
...................................................................
.............प्रा.सतीश देवपूरकर

गझल
वाट कोणी देत नसतो, वाट व्हावे लागते!
गाठण्यासाठी किनारा लाट व्हावे लागते!!

कुंपणापाशी नदी पण, शेत आहे कोरडे;
दु:ख शेताचे कळाया, पाट व्हावे लागते!

कौतुकाची थाप ऎशी ना मिळालेली बरी;
जी मिळाया आपल्याला भाट व्हावे लागते!

तोंडचा काढून त्यांना घास मी माझा दिला!
आज त्यांच्या चोचल्याचे ताट व्हावे लागते!!

आडवाटा, चोरवाटा लोपती वाटेमधे!
गाठ शिखरांशी पडाया घाट व्हावे लागते!!

>-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाठण्यासाठी किनारा लाट व्हावे लागते!!

गाठ शिखरांशी पडाया घाट व्हावे लागते!! ... छान ओळी.

कुंपणापाशी नदी पण, शेत आहे कोरडे;
दु:ख शेताचे कळाया, पाट व्हावे लागते!

तोंडचा काढून त्यांना घास मी माझा दिला!
आज त्यांच्या चोचल्याचे ताट व्हावे लागते! ....... सुंदर शेर.

गद्यही पद्यात्मक असू शकते
काही पद्यात्मक गद्य ओळी.......
.... ही comment तशी अनावश्यक आहे सर.. कारण मुक्तछंदातील गद्य काव्य आपल्याकडील साहित्यात भरपूर आहे/ असते.

सावली होती तोवर, माणसात वाटला गेलो!
वाटेत येताच, झाडासारखा छाटला गेलो! ... हे अफलातून Happy

आजही, अद्याप, मी याच एका पेचात आहे....
आकाशातून मीच कसा अवचित काटला गेलो! ... याचा संदर्भ स्पष्ट होत नाही. कदाचित माझे अज्ञान असेल.

किती लवकर माणसे आपला चेहरा बदलतात!
घटकेत आपली, घटकेत, परकी परकी वाटतात!! .... ही दुसरी ओळ फारसे काही सांगत नाही, इथे पहिल्या ओळीच्या संदर्भानुसार काहीतरी भिडणारे हवे होते असे वाटते.

प्रेताच्या सजण्याला उभारी म्हणत नाहीत!
पाचोळ्याच्या उडण्याला भरारी म्हणत नाहीत!! .... छान.

सुधाकर!
तू म्हटल्याप्रमाणे पहिली commentसंपादित केली आहे. निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

आजही, अद्याप, मी याच एका पेचात आहे....
आकाशातून मीच कसा अवचित काटला गेलो!
<<<<<<
पहिल्या ओळीतील ‘पेच’ शब्द फार महत्वाचा आहे. त्याला अनेक छटा आहेत........
पेच म्हणजे पीळ, वळसा, वेढा
लाक्षणीक अर्थ.....खुबीची लपेट, शक्कल, कुस्तीतील डाव.
पेच म्हणजे.....कोडे, डाव, वक्रता, कपट
पेच म्हणजे......त्रास, संकट, दु:ख, पंचाईत, गोंधळ
पेच म्हणजे समज, भाषणातील खोच, खुबी
पेच म्हणजे....कूट, गूढ, इत्यादी.
पेचदार..........गुंतागुंतीचा, घोटाळ्याचा.
पेचपाच/पेचपाड........डावपेच
लाक्षणीक अर्थ......त्रासदायक धोरण, कारस्थान, छक्केपंजे, संकट, अडचण वगैरे.

आता सोप्या गद्यात अर्थ असा..................

आजही, अद्याप म्हणजे आतापर्यंत मी याच एका पेचात आहे, म्हणजेच मला एक कोडे पडले आहे, एक दु:ख, एक त्रास मला वाटत आहे, माझ्या मनाचा गोंधळ उडाला आहे, माझी पंचाईत झाली आहे, मला काहीही समजेनासे झाले आहे, मला एक कूट, गूढ प्रश्न पडला आहे, मी बुचकळ्यात/घोटाळ्यात पडलोआहे.

कोणते कोडे पडले आहे?

काय मला गूढ वाटत आहे?

कशामुळे मला त्रास, दु:ख होत आहे?

कशामुळे माझा गोंधळ उडाला आहे? माझी पंचाईत झाली आहे?

मला काय समजत नाही?

मी का घोटाळ्यात पडलो आहे?

उत्तर आहे दुसरी ओळ.....................जी म्हणते..............

आकाशतून मीच का म्हणून व कसा अवचित/ एकाएकी/अकस्मात काटला गेलो?
/छाटला गेलो/ पत्ते वाटण्यापूर्वी त्यातील काही काढून ठेवतात तसे काटला गेलो/कापला गेलो/कमी केला गेलो वगैरे.

इथे आकाश हा शब्द प्रगतीचे/उंचीचे प्रतिक आहे.
पेच शब्द वरती वापरला, तेव्हा पतंगाच्या खेळातील पेच घेणे हे माझ्या डोळ्यासमोर आले. ज्याचा मांजा भारी, तो दुस-या पतंगाचा मांजा काटून टाकतो. तेव्हा आपण म्हणतो अमुक अमुक पतंग काटला/कटला गेला. नंतर त्या पतंगाचे काय होते ते सर्वश्रुतच आहे(कटी पतंग).

त्या उंच पतंगासारखा मी आकाशात विहार करत होतो व अचानक मीच कसा काटला गेलो?
असा कुणी मला पेच दिला होता हेच मला समजत समजत नाही, म्हणून मी पेचात आहे, असे म्हटले आहे.

टीप: इथे पतंगाची प्रतिमा अव्यक्त आहे.
पण, पेच व काटणे या प्रतिमा पतंगाच्या प्रतिमेस डोळ्यापुढे आणतात व काटलेल्या/कटलेल्या कटीपतंगासारखी माझी अवस्था झाली, हे दु:ख/शल्य ताबडतोब ध्वनीत होते.

किती लवकर माणसे आपला चेहरा बदलतात!
घटकेत आपली, घटकेत, परकी परकी वाटतात!!
<<<<<<<<

(इथे सरडा जसे आपले रंग बदलतो), तसे माणसे चेहरे बदलतात, चेहरेपालट/रंगपालट करतात असे म्हटले आहे.

चेहरा ही माणसाची ओळख असते.
साधारणपणे सभ्य माणसांच्या चेह-यावरचे भाव त्यांच्या अंतरंगाचे दर्शन घडवतात.

इथे आपलेपणाचा भाव व परकेपणाचा भाव असे सारेच एकसारखे पालटत असतात माणसांच्या चेह-यावर! म्हणून आम्ही म्हणतो घटकेत काही चेहरे आपले वाटतात तर घटकेत ते परके परके वाटतात, कारण रंग पालटणारे चेहरे, म्हणजेच चेहरेपालट.
मला वाटते माझ्या मनातील अर्थ मी पूर्ण सांगितला आहे. पण, तरीही दुसरी ओळ अजूनही तुला जर अप्रस्तुत वाटत असेल, तर पर्यायी ओळ सुचव!

...............प्रा.सतीश देवपूरकर
...............................................................................

देवसर मला तुमच्यासारख्या पर्यायी ओळी सुचण्याचे भाग्य लाभले असते तर मी प्रतिसादात फार काही लिहीत बसलो नसतो सरळ तो पर्यायच लिहीला नसता का? पण म्हणतात ना की सोनाराचे काम सोनारानेच करावे.
असो पण आमच्या अल्प बुध्दीला तसा कधी साक्षातकार झाला तर नक्कीच लिहीन.

आकाश हा शब्द प्रगतीचे/उंचीचे प्रतिक आहे.
टीप: इथे पतंगाची प्रतिमा अव्यक्त आहे. ... या गोष्टी अज्ञात असल्यानेच मला त्या ओळींचे स्पष्टीकरण झाले नव्हते.

---- स्पष्टीकरण दिल्याबध्दल धन्यवाद.

छान...
मस्त लिहिलय
कुणावरही टिका न करता लिहिले, बरे वाटले वाचुन. कुत्रे, धुसफुस असही काही नाही, तेही छानच

रच्याकने
किती लवकर माणसे आपला चेहरा बदलतात!
हे वैवकुला पाहुन तर सुचले नाही ना?
इथे गरजुनी दिवे घ्यावेत

..............चिखल्या
अहमदनगर, गप्पागोष्टी, टेक्सास, मायबोली
फोन नंबर: ---(----)----