विश्व कोणते गाठावे या विश्वानंतर - जुनी गझल

Submitted by बेफ़िकीर on 29 September, 2012 - 01:05

नमस्कार! Happy

ही गझल माझ्या 'बेफिकीरी' या गझलसंग्रहात समाविष्ट आहे. रसप यांच्या गझलेवरून ही आठवल्यामुळे येथे देण्याचा मोह होत आहे. सांभाळून घ्यावे अशी विनंती

-'बेफिकीर'!

================================================

जीवन असते हे जीवन संपवल्यानंतर
असुदे किंवा नसुदे पाहू मरणानंतर

'कसे चालले आहे' म्हणुनी पुढे निघालो
बोलवेचना पुढचे इतक्या दिवसानंतर

हयात जाताना प्रश्नाचे उत्तर कळुदे
उभा न ठाको प्रश्न पुन्हा या प्रश्नानंतर

खूप माणसे मनात होती उगीच साठुन
किती मोकळे वाटत आहे रडल्यानंतर

तुझ्या विचारांमधे येतसे तुझाच व्यत्यय
असेच होते जीव तुझ्यावर जडल्यानंतर

प्रवास नुसता, अस्थैर्याचे गुलाम सारे
विश्व कोणते गाठावे या विश्वानंतर

वसंत थोडे दबकत दबकत वागत होते
'बेफिकीर' झाले तेसुद्धा माझ्यानंतर

==========================

प्रथम प्रकाशित - मनोगत

पुनर्प्रकाशित - बेफिकीरी

==========================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली !

जीवन असते हे जीवन संपवल्यानंतर
असुदे किंवा नसुदे पाहू मरणानंतर

हयात जाताना प्रश्नाचे उत्तर कळुदे
उभा न ठाको प्रश्न पुन्हा या प्रश्नानंतर

खूप माणसे मनात होती उगीच साठुन
किती मोकळे वाटत आहे रडल्यानंतर

तुझ्या विचारांमधे येतसे तुझाच व्यत्यय
असेच होते जीव तुझ्यावर जडल्यानंतर

हे शेर जब्बरदस्त वाटले.

===========================================

लहान तोंडी मोठा घास.............. काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा नव्हे, खात्री वाटते.
र्‍हस्व-दीर्घाबाबत प्रोफेसर साहेबांनी माझ्या गझलेवर काही उपदेश केला आहे. आपल्या ह्या गझलेत सुद्धा अनेक ठिकाणी र्‍हस्व-दीर्घाची अदलाबदल केलेली आढळते (असुदे, नसुदे, कळुदे, साठुन.. ई.) मला वैयक्तिक पातळीवर ह्यात काहीच गैर वाटत नाही. उच्चारानुरूप अशी अदलाबदल करणे उलटपक्षी मला अधिक योग्यही वाटते.

आपले ह्याबाबत काय मत आहे ?

जीवन असते हे जीवन संपवल्यानंतर
असुदे किंवा नसुदे पाहू मरणानंतर.....ग्रेट!

'कसे चालले आहे' म्हणुनी पुढे निघालो
बोलवेचना पुढचे इतक्या दिवसानंतर........आह!

हयात जाताना प्रश्नाचे उत्तर कळुदे
उभा न ठाको प्रश्न पुन्हा या प्रश्नानंतर......व्वा!

खूप माणसे मनात होती उगीच साठुन
किती मोकळे वाटत आहे रडल्यानंतर.....आहाहा..नेमक मांडलत आपण !

तुझ्या विचारांमधे येतसे तुझाच व्यत्यय
असेच होते जीव तुझ्यावर जडल्यानंतर...वा क्या बात!

प्रवास नुसता, अस्थैर्याचे गुलाम सारे
विश्व कोणते गाठावे या विश्वानंतर.........खरयं!

मक्त्यातला वसंत खटकला ( तुमच्या शेरात असे शब्द वाचायची सवय नसल्याने बहुदा !)

धन्यवाद!

मक्त्यातला वसंत खटकला ( तुमच्या शेरात असे शब्द वाचायची सवय नसल्याने बहुदा !)<<<

तो वसंत मलाही नेहमी खटकतो म्हणूनच तो शेर केला आहे Happy

वसंत ऋतूवर 'य' शेर झाले मराठीत आणि बहुतेक सगळेच कंटाळवाणे! इतके कंटाळवाणे की त्या शेरांचा रागच यावा. म्हणून असे म्हणालो आहे की मी मेल्यानंतर पुन्हा हे वसंत (वगैरे ऋतू) धीट झाले, बेफिकीर झाले, मी हयात असेतोवर माझ्या भयाने ते गझलेत येत नव्हते Happy

सर्वांचा आभारी आहे

-'बेफिकीर'!

बेफिकीरी अनेकदा वचलीये
ही गझल इतक्यावेळा वाचून झाल्यावरही आता पुन्हा वाचताना एक सत्य प्रकर्षाने जाणवले ...........
कितीही वाचा प्रत्येकवेळी नवी वाटते बेफिकीरी .!!!
नित्यनूतन !!

__________/\_____________

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - --- -- - - - - - - - - - -

...बेफिकीरी अनेकदा वाचायचे एक कारण असेही की आमच्याकडे इतर कुठलेही गझलेचे पुस्तक नाहिच्चेय मुळी
म्हणून मी बेफीजीना नेहमी म्हणत असतो ..........दुसरा गझलसन्ग्रह कधी म्हणून ?
बेफीजीपण नुसते "होहो नक्की पाविन!!" असे म्हणतात !! Happy
आता समस्त माबोकरानीही बेफीना विनन्ती/आग्रह /हट्ट जे जमेल ते करून हा बेफिकीरी पार्ट दोन आपल्या झोळीत कसा पडेल ते पहायला हवेय !!;)

<<<<वसंत ऋतूवर 'य' शेर झाले मराठीत आणि बहुतेक सगळेच कंटाळवाणे! इतके कंटाळवाणे की त्या शेरांचा रागच यावा. म्हणून असे म्हणालो आहे की मी मेल्यानंतर पुन्हा हे वसंत (वगैरे ऋतू) धीट झाले, बेफिकीर झाले, मी हयात असेतोवर माझ्या भयाने ते गझलेत येत नव्हते >>>

अस्सय होय......मग १०१ % सहमत!

खूप माणसे मनात होती उगीच साठुन
किती मोकळे वाटत आहे रडल्यानंतर

तुझ्या विचारांमधे येतसे तुझाच व्यत्यय
असेच होते जीव तुझ्यावर जडल्यानंतर

कसे चालले आहे' म्हणुनी पुढे निघालो
बोलवेचना पुढचे इतक्या दिवसानंतर

सुरेख शेर आहेत..खूप आवडले...

सुंदर गझल..
शुभेच्छा..

'कसे चालले आहे' म्हणुनी पुढे निघालो
बोलवेचना पुढचे इतक्या दिवसानंतर

खूप माणसे मनात होती उगीच साठुन
किती मोकळे वाटत आहे रडल्यानंतर

हे दोन्ही शेर अफाट आवडले. ह्या वेळी भारतात / पुण्यात येईल तेव्हा तुम्हाला भेटायची इच्छा आहे. तुमचे गझल संग्रह विकत घ्यायचे आहेत .. अर्थात तुमच्या सही सकट.

आकाश

अनेकदा आपल्याकडून ही गझल ऐकलेली आहेच. प्रत्येकवेळी आवडली आहे.

खूप माणसे मनात होती उगीच साठुन
किती मोकळे वाटत आहे रडल्यानंतर

अप्रतिम शेर!!

भूषणराव!
छान आहे तुमची गझल! आवडली!
काही ठिकाणी, काही गोष्टी खटकल्या/सुचल्या!...............
त्यांचा प्रथम निर्देश करतो व मग थोडे बदल करून आम्ही आपली गझल कशी वाचली ते लिहितो.
भूषणराव! हे शेर पर्यायी नव्हेत.
फक्त आस्वादासाठी व निखळ चर्चेसाठी देत आहे.
गैरसमज नसावा!
आपला आदर मनात कायम ठेवून आम्ही हे लिहीत आहोत.
काही चुकीचे बोललो असल्यास माफ करावे!

मला खटकलेल्या/सुचलेल्या गोष्टी अशा आहेत.............

१)असु दे, नसु दे ..............असू दे, नसू दे किंवा तत्सम असे हवे होते. हे सहज करता यावे.

२)दिवसानंतर...........दिवासांनंतर हवे, कारण आधी इतक्या असे आहे. पण, मग अलामत थोडी बिघडते.

३)कळु दे..............कळू दे असे हवे.

४)शेवटच्या शेरातील, ‘माझ्यानंतर’ शब्द थोडा अस्पष्ट व कमजोर वाटला. शेराची अभिव्यक्ती अजून प्रभावी करता आली असती, असे वाटून गेले!

वर दिलेल्या बाबी विचारत घेवून, आम्ही आपली गझल कशी वाचली ते देतो.....

जीवन असते, हे जीवन संपवल्यानंतर!
असेल किंवा नसेल, पाहू....मरणानंतर!!

‘कसे चालले आहे?’ म्हणुनी पुढे निघालो..........
बोलवेचना पुढचे इतक्या काळानंतर!

हयात सरण्याआधी देतो उत्तर प्रश्ना!
उभा न ठाको प्रश्न पुन्हा, या प्रश्नानंतर!!

किती माणसे डोळ्यांमध्ये तरळत बसली;
किती मोकळे वाटत आहे रडल्यानंतर!

समोर तू, अन् तुझ्याच स्वप्नामधे चूर मी!
असेच होते, जीव तुझ्यावर जडल्यानंतर!!

काम दिल्यासारखे लोक ते धावत होते......
विश्व कोणते गाठणार या विश्वानंतर!

‘बेफिकीर’ तो वसंतसुद्धा झाला मजसम!
भेट वसंताची अन् माझी झाल्यानंतर!!

..........प्रा.सतीश देवपूरकर

सुचली होती ओळ तुझ्यावर दशकानंतर

हा तुमचा मिसरा ह्या गझलेतला नाही का बेफि? मला सारखा तोच लक्षात येतो आहे ही गझल वाचताना.

सुचली होती ओळ तुझ्यावर दशकांनंतर
लक्षच नव्हते काय असावा बोलत पुढचा

(गझल: "दशकांनंतर" ; 'बेफिकीरी'मधील पहिलीच गझल )

बेफि.. " हेच गुढश्या " ऐकवली सरांना.
जाम आवडली त्यांनाही.

आणि माझं विचाराल तर तुमच्या अप्रतिम गझलांतली सर्वात वरची ... पु.ले.शु

>>रसप यांच्या गझलेवरून ही आठवल्यामुळे येथे देण्याचा मोह होत आहे.

बेफिकीर,
जुनी आहे तरी(च) छानच आहे Happy

काही 'नंतर'चे पडाव ( जसे की जीवनानंतरचे जीवन,प्रश्नांनंतरचे प्रश्न. विश्वानंतरचे विश्व ) या गझलेला भव्यता देतात..
काही 'नंतर'च्या घटना ( खूप दिवसांनंतरची भेट,रडल्यानंतरचे मोकळेपण ,जीव जडल्यानंतरचे गोड व्यत्यय) या गझलेला सूक्ष्मता देतात..
शेवटची द्विपदी वेगळी पडते, एक हलकीशी विनोदाची झुळूक,सगळ्याच आशयघनतेवर बेफिकीर उतारा..

काव्यानुभव मननीय. 'बेफिकिरी' वाचली पाहिजे.

हयात जाताना प्रश्नाचे उत्तर कळुदे
उभा न ठाको प्रश्न पुन्हा या प्रश्नानंतर

तुझ्या विचारांमधे येतसे तुझाच व्यत्यय
असेच होते जीव तुझ्यावर जडल्यानंतर

अ फा ट

पुन्हा वाचली पुन्हा आवडली !

"बेफिकीरी" ची प्रत कुठे मिळु शकेल? मलाही हवीय....:-)

-सुप्रिया.

सुप्रिया,

अजयजी त्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत तेव्हां त्यांच्याकडे तर असणारच असणार.

बेफि,

गझलेव्यतिरीक्तच्या चर्चेबद्दल क्षमस्व!

माझ्याकडे दोन आहेत..............>>>>+१
स्वतः बेफिकीरांकडेही असणारच ....................>>>+१
अजयजी त्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत तेव्हां त्यांच्याकडे तर असणारच असणार...................>>+१

माझ्याकडेही आहे एक!!!!! Happy

<<<अगदीच नाही मिळाली तर माझ्याकडे दोन आहेत सुप्रिया.>>>>

मग त्यातली १ आता माझी झाली विदिपा Happy

<<<नाशिकपेक्षा पुणे जवळ आहे हे मात्र खरे >>>

मी दोन्ही ठिकाणी तळ ठोकून असते...सो नो प्रॉब्लेम .....कुठनही मिळो पण मिळो Happy

उपलब्ध करुन देण्या-याचे आधीच आभार मानते.

-सुप्रिया.