दिवाळी अंक लेखन मालकीहक्क (Copyright)

Submitted by संपादक on 28 September, 2012 - 06:12

मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा:

हितगुज दिवाळी अंकाच्या वाढत्या लोकप्रियतेला लक्षात घेता आम्हाला दिवाळी अंकासाठी आपण पाठवत असलेल्या कुठल्याही प्रवेशिकेच्या मालकीहक्काविषयी ( Copyright information ) स्पष्टीकरण आपल्या संरक्षणासाठी देणे महत्त्वाचे वाटते. यासाठीचे नियम खालीलप्रमाणे असतीलः

येणार्‍या प्रत्येक प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क ती प्रवेशिका पाठवणार्‍या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. परंतु पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी, तुम्ही मायबोली प्रशासनाला त्या प्रवेशिकेला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.
"दिवाळी संवाद"चे सर्व हक्क मायबोलीकडे रहातील.

याचा अर्थः

* प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क तुमचे असतील व तुम्ही त्या प्रवेशिका इतरत्र प्रसिद्ध करु अथवा तुमच्या वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकता.
* परंतु मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)
* भविष्यात ती प्रवेशिका मायबोलीवरुन अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावी असे तुम्हाला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधिल राहणार नाही. (कायमस्वरुपी परवाना)
* तुम्ही तुमची प्रवेशिका इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ती प्रवेशिका मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)

यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया संपादक मंडळाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद.

Copyright of the work submitted to maayboli remains with the respective author or artist. By submitting your work, you are giving an unlimited, perpetual and irrevocable license to maayboli to publish on maayboli.com or wherever maayboli.inc wants to use it in any other medium.
"Diwali Sanwad" is a copyright of maayboli.

What it means:
* The copyright and ownership remains with the author/artist and they are free to use it in any way that they desire; such as sell or publish their work etc.
* However, by submitting their work, the author/artist has given the right to maayboli to publish on Maayboli web site or through any other media such as PDF, CD etc. in future. (unlimited)
* Maayboli is not obligated to remove the work from it's web site or any other media that has been used, though the author may want it done in future. (perpetual)
* Even though an author sells his/her copyright to a new owner, the new owner cannot ask maayboli to remove the work from maayboli web site. (irrevocable)

If you have any further questions related to the copyright issues, please e-mail the Sampadak Mandal. Thank you.

विषय: 

परंतु मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. >>> माय्बोली इंक ही फॉर प्रोफिट संस्था आहे. तेंव्हा जे साहित्य मागवले जाते ते फोर प्रोफीट कामाकरता वापरले जाण्याची शक्यता किती आहे?

इतर कुठल्याही माध्यमात <<
हे फार गोंधळ निर्माण करणारे आहे. मायबोली INC च्या अखत्यारीत येणार्‍या आणि नॉन प्रॉफिट असलेल्या विविध स्वरूपात असे म्हणायला हवे ना?

इतर कुठल्याही माध्यमात असे म्हणताना... दिवाळी अंकातील कथेवर कुणाला चित्रपट करावासा वाटला तर ती परवानगी मायबोली INC देऊ शकते असा अर्थ होऊ शकतो. आणि आय एन सी असल्याने आर्थिक व्यवहाराची शक्यताही नाकारता येत नाही.

तसा हेतू नाही ह्याची पूर्ण खात्री आहे.
गेल्या वर्षीही हेच म्हणणे होते की गोंधळ नको म्हणून या शब्दातली जी अ‍ॅम्बिग्वीटी आहे ती दूर करा.

मायबोलीकडे एकदा साहित्य पाठवल्यावर ते त्याचे संबंधित साहित्यिकाच्या परवानगीशिवाय काहीही करू शकतात...हे अजिबात पटले नाही.
मायबोली त्यातून जर काही आर्थिक लाभ करून घेणार असेल तर तो संबंधित साहित्यिकावर निश्चितच अन्याय ठरेल....त्यामुळे अशा वेळी संबंधित साहित्यिकाची परवानगी घेणे आणि फायद्यातील काही वाटा त्याला देणे हे नैतिकतेला धरून होईल.

जर काही आर्थिक लाभ करून घेणार असेल तर तो संबंधित साहित्यिकावर निश्चितच अन्याय ठरेल....>>>

ह्या सगळ्याच जर-तरच्या गोष्टी आहेत. दिवाळी अंक साहित्य वापरातून मायबोलीला आर्थिक लाभ होईलच, तो सगळा १००% लाभ मायबोली स्वतःकडेच ठेवेल, लेखकावर अन्यायच होईल इत्यादी गृहितकं मांडण्यात काही अर्थ नाही. आत्तापर्यंतचे अनुभव बघता मायबोली आणि मायबोली प्रशासन योग्य तेच करेल असा विश्वास निदान आम्हाला तरी नक्कीच वाटतो.

आत्तापर्यंतचे अनुभव बघता मायबोली आणि मायबोली प्रशासन योग्य तेच करेल असा विश्वास निदान आम्हाला तरी नक्कीच वाटतो. <<
अर्थातच.
मुद्दा तो नाहीच आहे.

नियमावलीतल्या शब्दरचनेत कुठेही लूपहोल राहू नये, गैरसमजांची शक्यता राहू नये एवढेच म्हणणे आहे.

कलाकाराने पूर्ण हक्क मायबोली प्रशासनाला द्यावे असे मला वाटते, आणि स्वतः जर त्याचा इतरत्र उपयोग करायचा असेल, तर मायबोलीवर पूर्वप्रकाशित असा स्पष्ट उल्लेख करावा, अशी अट असावी.

मला पामराला खालील दोन विधानांमधील विरोधाभासातील मुळात फरकच समजला नाही.

विधान १ - येणार्‍या प्रत्येक प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क ती प्रवेशिका पाठवणार्‍या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. <<<

विधान २ - परंतु पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी, तुम्ही मायबोली प्रशासनाला त्या प्रवेशिकेला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.<<<

मला समजलेला / ले अर्थः

१. प्रवेशिका नुसतीच पाठवण्यात आली तर सर्व हक्क लेखक / कलाकाराचे

२. प्रवेशिका संपादक मंडळाने स्वीकारली व प्रकाशित केली तर पुढे ती पुनर्प्रकाशित कुठे व किती वेळा करायची याचे हक्क मायबोलीचे

आता माझ्या शंका:

१. प्रवेशिका पाठवणार्‍या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील.

यात 'यथायोग्य' म्हणजे काय? या विशेषणाचे महत्व काय?

२. प्रशासनाने या संदर्भात अशी अतिशय ठाम भूमिका घेणे हे समजण्यासारखे वाटते कारण नंतर सदस्यांकडून कोणत्याही प्रकारचे कायदेशीर हरकत घेणारे मुद्दे निघू नयेत म्हणून! पण ह्याच ठाम भूमिकेचा एक हाही अर्थ होत नाही का की अश्या साहित्याबाबत प्रशासनाची भविष्यात काही उद्दिष्टे आहेत व त्यांच्या पूर्ततेत अडथळे येऊ नयेत म्हणून आत्ताच ही नोंद केली जात आहे?

चुकीचे बोललो असल्यास क्षमस्व

तुमच्या सर्व प्रश्नांची संपादक मंडळाने दखल घेतली आहे. या दिवाळीअंकामधील साहित्यासंदर्भात मालकीहक्कासंबंधी कोणत्याही कायदेशीर समस्या भविष्यात निर्माण होऊ नयेत आणि त्या संबंधीचे नियम शक्य तितके स्पष्ट असावेत अशी संपादक मंडळाची देखील इच्छा आहे. त्यामुळे मायबोली प्रशासकांशी चर्चा करून, तुम्हा सर्वांच्या प्रश्नांना लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न संपादक मंडळ करेल.

सर्वसाधारणतः इतर ठिकाणी सर्वहक्क प्रकाशकास्वाधीन असतात. (काही ठिकाणी मुद्दाम कुठले हक्क कुणाकडे आहेत आणि कुठले नाहीत याचा उल्लेख असतो, पण त्यांची संख्या तुलनेत अजूनही कमी आहे.) त्यामुळे कुठल्याही माध्यमात काहीही करण्याअगोदर त्यांची परवानगी आवश्यक असते. मायबोलीने जाणीवपूर्वक तसे केलेले नाही. सगळे हक्क लेखक/कलाकाराकडेच राहू दिले आहेत. त्यामुळे मायबोलीची कुठलीही परवानगी न घेता ते लेखक्/कलाकार स्वत:च्या कलाकृतीचे हवे ते करू शकतो.

मायबोलीकडे नुसता परवाना असल्याने उद्या जर कुठल्या तिसर्‍याच संस्थेने मायबोलीवरचे लेखन कुठल्याही माध्यमात वापरायची परवानगी मागीतली तर मायबोली परस्पर ती परवानगी देऊ शकत नाही/देणार नाही. हक्क आणि परवाना यातला फरक यातून स्पष्ट व्हावा.

"९ वर्षापूर्वीच्या मायबोलीच्या दिवाळी अंकात प्रकाशीत झालेली माझी कलाकृती/कथा आता काढून टाका, कारण आता ती मी दुसर्‍याना दिली आहे" अशा मागण्याही आम्हाला येतात. इतर कुठल्याही नियतकालिकांकडे अशी मागणी करता येत नाही हे इथे लक्षात घेतले पाहिजे. जसे जसे मायबोलीवरचे जुने लेखन वाढत जाईल तसे अशा मागण्या मान्य करणे अशक्य होते आहे. कायम स्वरूपी आणि अनिर्बंध परवाना लागण्याची गरज यातून स्पष्ट व्हावी.

भविष्यात मायबोली स्वतःच, लेखन/कलाकृती आर्थिक फायद्यासाठी परवानगी शिवाय वापरेल का?
या प्रश्नाचे उत्तर काळ्या/पांढर्‍यात हो/नाही देणे अवघड आहे. दोन उदाहरणे देतो म्हणजे हे का अवघड आहे हे समजावे.
उदा. १: जेंव्हा मायबोलीने नुकत्याच वाचनखुणा काढल्या तेंव्हा संबंधित कवींची परवानगी घेऊन त्या काढल्या. इतकंच नाही तर त्या कविंच्या इतर लेखनाचीही वाचकांना ओळख व्हावी असा प्रयत्न केला कि त्यातून त्या त्या कविचे चाहते वाढवायला मदत व्हावी. ज्या कविंनी परवानगी दिली नाही त्यांचा तो निर्णय पूर्णपणे मान्य केला. कायद्यावर बोट ठेवून पुढे गेलो नाही. म्हणजे इथे उत्तर, परवानगी विचारली जाईल असं आहे.

उदा: २. आतापर्यंत मायबोली स्वत:च्या खर्चाने जुन्या दिवाळी अंकांचे जतन करते. त्यातून मायबोलीला काहीच मिळत नाही. उलट जुन्या लेखकांना नवीन वाचकवर्ग वर्षानुवर्षे मिळत रहातो. पण भविष्यात असे दिवाळी अंक जतन करण्याचा खर्च कमी करण्यासाठी , त्यावर जाहिराती ठेवायची गरज भासली, तर गेल्या १० वर्षातल्या सगळ्या लेखकांची परवानगी घेऊनच मग ते करणे शक्य नाही. (आता इतकी वर्षे खर्च केल्यावर मग जाहिराती घेतल्यावर नक्की कधीपासून आर्थिक फायदा/Break even होणार आणि तेंव्हापासून परवानगी घ्यायची किंवा कसे वगैरे प्रश्न आणखीनच अवघड) म्हणजे इथे उत्तर, परवानगी विचारली जाणार नाही असं आहे.

"कुठल्याही माध्यमात" या शब्दांवरही काही आक्षेप/शंका आहेत की हे पुरेसे स्पष्ट नाही. तंत्रज्ञानामुळे Format आणि Medium यातल्या सीमारेषा धुसर होत चालल्या आहेत. १६ वर्षांपूर्वी ऑनलाईन व्हिडीयो फारसा कुणाला माहित नव्हता. अजून १० वर्षांनंतर आपण हे लेखन एखाद्या व्हिडीयो प्लेअर मधून बघत असू असं सहज शक्य आहे. आणि कदाचित त्या माध्यमाला भलतेच काही नाव असेल. त्यामुळे आताचे निकष भविष्यात लावता येणार नाही. मायबोलीचा इतिहास पाहिल्यावर पुढच्या ५० /१०० वर्षांबद्दलही विचार करायची गरज आहे.

आमच्या परीने जितके शक्य आहे तितके स्पष्ट केले आहे. यापेक्षा कितीही अधिक खोलात गेलो तर नवनवीन फाटे पडतील आणि स्पष्ट होण्याऐवजी कायदेशीर संज्ञांमधे अडकून ते अधिकाधिक क्लिष्ट आणि अस्पष्ट होत जाईल.

मी ही प्रतिक्रिया एक व्यक्ती म्हणून लिहतो आहे. मायबोली प्रशासनाशी याचा काहीही संबंध नाही.
गेली २० वर्षे ( Netscape/ HTML उदयाला यायच्या अगोदरपासून) मी इंटरनेटवर थोडं काही अनुभवलं आहे. काही व्यक्ती खूप यशस्वी झालेल्या जवळून पाहिल्या आहेत. आणि वर असलेली चर्चा वाचल्यावर हे लिहावंस वाटलं. या सगळ्या गोष्टी आंतरजालावरच्या कुठल्याही साईटला/ब्लॉगला/फोरमला लागू पडतील. आणि हे मराठी भाषेपुरतं नाही.

जे काही कलाकार/लेखक्/वक्ते मी आज इंटरनेटवर यशस्वी झालेले पाहतो, त्या व्यक्ती दोन प्रकारचे लेखन्/कलाकृती तयार करतात. ऑनलाईन् आणि ऑफलाईन. आणि या दोन्ही प्रकारांकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन भिन्न असतो.

त्यांच्या ऑनलाईन लेखनाच्या/कलाकृतींच्या मालकी हक्कांबद्दल ते अजिबात आग्रही नसतात. ते त्या ऑनलाईन लेखनाकडे/कलाकृतींकडे आपले चाहते वाढवण्याचा अजून एक मार्ग ( Marketing Tactics/Marketing Channel) म्हणून पहातात. जो पर्यंत त्या लेखकाचे/कलाकाराचे नाव योग्य ठिकाणी दिले आहे , तो पर्यंत ते लेखन जितक्या जास्त मार्गाने , जितक्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत कसे पोहोचेल याचाच ते विचार करतात. नुकत्याच एका लेखकाच्या ऑनलाईन लेखनावरून एक विद्यापीठाने त्याच्या परवानगी शिवाय अभ्यासक्रमात त्याच्या लेखांचा समावेश केला. विद्यापीठाला मिळणार्‍या फी मधली काही रक्कम मला रॉयल्टी म्हणून मिळावी असा विचार एखाद्या लेखकाने केला असता. पण याने असे काहीही न करता , त्या विद्यापीठात १ दिवस फुकट, त्या अभ्यासक्रमात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शिकवायची तयारी दाखवली.
संगीताच्या क्षेत्रात काही कलाकार मुद्दाम त्यांची गाणी फु़कट डाऊनलोड करण्यासाठी ठेवतात. काही वक्ते त्यांची भाषणे , ईपुस्तके फुकट वाटतात. हे सगळे आपल्या परवानगी शिवाय पसरणार आहे किंवा दुसराच कुणितरी याचा फायदा करून घेणार आहे हे त्यांना पूर्ण माहिती असते. उलट असा कुणी फायदा करणारा सापडला तर त्याचा आणखी फायदा होण्यासाठी ते मदत करतात.

या उलट त्यांचे काही लेखन ते कधीच , कुठेच ऑनलाईन ठेवत नाही. त्या लेखनाच्या मालकी हक्कांबद्दल मात्र ते खूप जागरुक असतात. आणि ते कधीच त्यांनी ऑनलाईन ठेवले नसल्यामुळे , त्याच्या हक्कभंगाचा मागोवा घेणेही सोपे जाते. हे ऑफलाईन लेखन्/ही कलाकृती यातून ते पैसे मिळवतात. उदा. अशा लेखनाचे ते पुस्तक काढतात. आणि त्यांचा वाचकवर्ग/चाहते तयार झालेले असल्यामुळे त्यांच्यापर्यंत ते पुस्तक विक्रिमार्फत पोहोचवणेही सोपे असते. वर दिलेल्या उदाहरणातल्या लेखकाच्या दूरदृष्टीमुळे , विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांना तो माहिती झाला आहे. आणि तो जेंव्हा एकच दिवस शिकवायला येतो तेंव्हा त्याचे विद्यार्थी त्याची इतर पुस्तके आवर्जून घेतात.
जे कलाकार असतात ते त्यांची आधी कुणीही न ऐकलेली गाणी फक्त त्यांच्या संगीत सभेत ऐकवतात आणि त्यांचे चाहते आनंदाने त्या संगीतसभेला तिकीट काढून जातात. वक्ते तिकीट लावून भाषणे ठेवतात. थोडक्यात ऑनलाईन कलाकृती/लेखन हे वाचकवर्ग/चाहते निर्माण करण्यासाठी आणि ऑफलाईन कलाकृती/लेखन हे पैसे मिळवण्यासाठी हे Business Model त्यांना जमलेले दिसते.

तुम्ही जर नवोदित लेखक असाल तर अमुक माध्यमातल्या तमुक हक्कांबद्दल विचार करण्याअगोदर जास्तित जास्त लोकांपर्यंत माझे लेखन जाऊन माझा वाचकवर्ग कसा तयार होईल याचा विचार करणे जास्त योग्य होईल. तुमचे नाव झाले असेल तर , नवीन वाचक मिळवण्यासाठी मधून मधून मुद्दाम ऑनलाईन लेखन पण भविष्यात मोबदला मिळवण्याच्या दृष्टिने ऑफलाईन लेखन असे करता येईल.

अजय,
वरील संपूर्ण पोस्ट ला अनुमोदन...

वैयक्तीक मलाही असेच वाटते (माझ्या ईथल्या गेल्या १० वर्षाच्या अनुभवावरून) की मुळात मायबोलीवर जेव्हा एखाद्या लेखकाकडून कुठल्याही स्वरूपात साहित्य दिले जाते तेव्हा ते जास्ती जास्त वाचकांपर्यंत पोहचावे असाच विचार असतो. त्यात "आर्थिक फायदा वा वापर" हा विचार बहुतांशी नसतो- पुनः हे माझे मत! (मायबोली शीर्षकगीत हे एक ऊत्तम ताजे ऊदाहरण)
त्यामूळे जरी "थेट" आर्थिक फायदा नाही मिळाला तरी आपले साहित्य विश्वभरात निव्वळ "एक क्लिक" मध्ये सर्वापर्यंत थेट पोचण्याची संधी मायबोलीने (फुकट) ऊपलब्ध करून दिली आहे हेही लेखकाने विसरता कामा नये- आणि त्याचे फायदे निवळ आर्थिक तराजूत मोजणे अशक्य/अव्यवहार्य आहे.

मला वाटते, हे ज्यांना पटते ते मालकीहक्क वगैरे बद्दल फार बाऊ करणार नाहीत... Happy

तरिही, मायबोली प्रशासन या बाबतीत ईतर अनेक माध्यमांपेक्षा अतीशय जागरूक व संवेदनशील आहे हे सांगण्यात मला आनंदच होईल.

रच्याकने: तुमच्या संगणकावर वा तुमच्याकडे किती गाण्याच्या फाईल्स या "मूळ प्रत" नसून कॉपी (cd copy, mp3, unauthorized downloads, crack versions..) आहेत? Happy . असो तो एक वेगळाच विषय आहे.. पण बरेच वेळा मालकी हक्क व कॉपीराईट बद्दल जाब विचारताना व्यवहारात आपण ते किती पाळतो हाही विचार करणे गरजेचे ठरते!

मला वाटते, हे ज्यांना पटते ते मालकीहक्क वगैरे बद्दल फार बाऊ करणार नाहीत <<<
हे जरा जास्त वैयक्तिक पातळीवर होतंय. कोणी कशाचा बाऊ करायचा ज्याचं त्याला ठरवूद्या. ते योग्य का अयोग्य ज्याचं त्याच्यापाशी.

मुळात मुद्दा शब्दांमधे क्लॅरिटी असावी इतकाच होता. त्याबद्दल उत्तर मिळाले. धन्यवाद.

नवीन लेखकांनी काय नि कसे करावे हे जो तो जाणतोच की.

>>हे जरा जास्त वैयक्तिक पातळीवर होतंय.

अर्थातच! अख्खी पोस्टच वैयक्तीक पातळीवरची आहे.. Happy
असो.

अजय, पोस्ट खुपच आवडले आणि पटलेही.

जे कलाकार व्यावसायिक आहेत आणि ज्यांना त्यांच्या कलेतून आर्थिक लाभ मिळवायचा आहे, त्यांनी आपल्या
कलाकृती मायबोलीच काय कुठेही नेटवर प्रकाशित करु नयेत असे मला वाटते, कारण कुठल्याही साईटवरुन त्या
उतरवून घेणे, आता अशक्य नाही.

इथे किंवा कुठल्याही साईट्वर काही प्रसिद्ध केले, तर त्याला मिळणारा थेट प्रतिसाद आणि इतर मार्गाने मिळणारी प्रसिद्धी, हाच मोबदला समजावा.

तरी मायबोलीने आता कठोर व्यावसायिक व्हावे, असे मला मनापासून वाटते. एखादा स्टेपिंग स्टोन म्हणून, मायबोलीचा वापर होऊ नये, असेही वाटते.

>>>इथे किंवा कुठल्याही साईट्वर काही प्रसिद्ध केले, तर त्याला मिळणारा थेट प्रतिसाद आणि इतर मार्गाने मिळणारी प्रसिद्धी, हाच मोबदला समजावा.
दिनेशदा, मायबोली काय किंवा अन्य संकेतस्थळं काय....सदस्यांशिवाय त्यांना महत्त्व मिळणार नाही...त्यामुळे हा परस्पर पूरक असा प्रकार आहे...संकेत स्थळामुळे सदस्य की सदस्यांमुळे संकेतस्थळ...नावारूपाला येण्यात/आणण्यात दोघेही सामील आहेत असं मला वाटतं.
मी स्वत: साहित्यिक,कलाकार वगैरे नाहीये..त्यामुळे वैयक्तिक पातळीवर फारसं काही बोलू शकत नाही....पण मायबोली किंवा अन्यत्र जे लेखक,साहित्यिक आज नावारूपाला आले आहेत त्यांना जशी ही संकेतस्थळं एक व्यासपीठ म्हणून लाभली तसेच ह्या नामाकित झालेल्या लोकांभोवतीच्या प्रसिद्धी वलयाचाही फायदा त्या त्या संकेतस्थळांना होतोच आणि होईल.

त्यामुळे मुद्दा हा होता की अशा लोकांच्या साहित्याचा/कलेचा व्यावसायिक वापर एखाद्या संस्थळाला करायचा असेल तर तो परस्पर न करता त्यांची(संबंधित सदस्यांची) परवानगी घेणे हे रितीला धरून होईल इतकंच म्हणणं होतं....अर्थात आता अजयने त्याबाबत केलेल्या स्पष्टीकरणामुळे बरेचेसे कितु-परंतू दूर झालेत असे म्हणायला हरकत नाही....त्याबद्दल अजयला मन:पूर्वक धन्यवाद!

>>तरी मायबोलीने आता कठोर व्यावसायिक व्हावे एखादा स्टेपिंग स्टोन म्हणून, मायबोलीचा वापर होऊ नये, असेही वाटते.

दिनेशदा,
हे मात्र नाही कळले...
खरे तर ईथे लिहीणारे/वा ईतर साहित्य पाठवणारे आपल्या वेळेचा, मेहेनतीचा वा कामाचा कुठलाच आर्थिक थेट मोबदला माबो कडून घेत नाहीत मग नक्की कठोर व्यावसायिक कुणि व्हायचे आहे? लिहीणारे व वाचक (आणि वाचकांच्या वेळेचं काय? ) Happy आहेत म्हणून मायबोली चा प्रचार, प्रसार, विस्तार हे देखिल वाढत आहेच ना, ते खुद्द प्रशासकही नाकारणार नाहीत? तेव्हा नाण्याच्या दोन्ही बाजुंचा समतोल विचार अपेक्षित आहे. ईथेच नेमकी मला वटते "कायम सवरूपी, रद्द न करता येणारा परवाना" वगैरे तत्सम "कठोर" शब्द वापरामूळे गोंधळ ऊडालेला दिसतोय..

अगदीच स्पष्ट आहे: ईथे लोकं लिहीतात, नव्हे तर अतीशय दर्जेदार साहित्य वेग वेगळ्या स्वरूपात पेश करतात, परिणामी वाचक वर्ग वाढतो, साईट चा देखिल व साहित्याचा देखिल (पर्यायाने साहित्य निर्मीती करणार्‍यांचा).. ही नाण्याची एक बाजू- दुसरी बाजू जी वर अजय ने दिली आहे.

"स्टेपिंग स्टोन" मला वाटते या ईथल्या इकोसिस्टिम मध्ये कुणीच नाही.. हा "गुलमोहर" आहे.. प्रेमाने पाणी घाला, गुलमोहराचा बहर वाढवा, दोन घटका त्याच्या छायेखाली बसून विरंगुळा घ्या, आनंद घ्या! Happy

(ऊद्या- माझ्या फांद्याखाली बसून ज्या गप्पागोष्टी करता त्यावर माझा मालकी हक्क आहे असे गुलमोहर म्हणाला तर आपण दुसर्‍या झाडाखाली बसायला जाऊ ना?) Happy

>>संकेत स्थळामुळे सदस्य की सदस्यांमुळे संकेतस्थळ...नावारूपाला येण्यात/आणण्यात दोघेही सामील आहेत असं मला वाटतं
काका, अगदी!

योग,
वरती उदाहरण दिलेच आहे, पुर्वीचे लेखन काढून टाका म्हणून, आलेल्या विनंतीबाबत.. त्याबाबतीत म्ह्णायचे आहे मला हे.

सध्या तर अ व्यक्तीचा मूळ लेख, ब व्यक्तीची परवानगी घेऊन, क सभासद इथे पोस्ट करतोय, अशी उदाहरणे घडताहेत. याबाबतीत, हि परवानगी मायबोली प्रशासनाकडे आहे ? मग उद्या या बाबतीत घोळ झाला तर ?

सध्या तर अ व्यक्तीचा मूळ लेख, ब व्यक्तीची परवानगी घेऊन, क सभासद इथे पोस्ट करतोय, अशी उदाहरणे घडताहेत<<<
कुठे?
अ व्यक्तीचा मूळ लेख, ब व्यक्तीची परवानगी घेऊन, क सभासद दिवाळी अंकात देत नाहीये ना? हे सर्व नियम दिवाळी अंकातल्या लिखाणाबद्दल आहेत.
मायबोलीत गुलमोहरात प्रकाशित होणार्‍या लिखाणाबद्दल नाहीत.

संपादकांनी दिलेली मूळ पोस्ट कळली ( बहुतेक ) आणि ती पटली. जोपर्यंत मी केलेले लेखन / गाणी माझ्या नावानेच पुढे जात आहेत आणि इथे प्रकाशित झाल्यावर मला ते दुसरीकडे प्रकाशित करण्यावर आडकाठी नाहीये तोपर्यंत हा परवाना मला योग्यच वाटतो Happy
वरच्या पोस्टमध्ये ह्याबाबत लिहिलेलं नाही पण उद्या इथले लेख / गाणी मी दुसरीकडे प्रकाशित केली तरी 'मायबोली ह्या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित' असं लिहायला, मायबोलीला श्रेय द्यायला मला आवडेल. जसं सादर करणार्‍याला त्याचं श्रेय मिळायलाच हवं तसं व्यासपीठालाही श्रेय द्यायलाच हवं Happy

नी, हे इथेच रोखायला हवेय, गुलमोहोरावर पण तशी सूचना असून तसे केले जातेय. तिथे चालते मग दिवाळी अंकात का नको, अशी विचारणा होईलच.

अगो, अगदी योग्य.

> मायबोली काय किंवा अन्य संकेतस्थळं काय....सदस्यांशिवाय त्यांना महत्त्व मिळणार नाही...त्यामुळे हा परस्पर पूरक असा प्रकार आहे...संकेत स्थळामुळे सदस्य की सदस्यांमुळे संकेतस्थळ...नावारूपाला येण्यात/आणण्यात दोघेही सामील आहेत असं मला वाटतं.

यात सदस्य म्हणजे कोण याच्या व्याखेवर खूप अवलंबून आहे. इथे जर सदस्य म्हणजे फक्त नियमीत लिहणारे असे तुम्हाला अपेक्षीत असेल तर मी याच्याशी सहमत नाही. माझ्यामते या सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाचा घटक म्हणजे वाचक . मग वाचक म्हणा, प्रेक्षक म्हणा, मायबाप रसिक म्हणा ते नसतील तर काहीच राहणार नाही. त्यांच लक्ष वेधून घेणं आणि ते टिकवून ठेवणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. काही उत्कृष्ट संकेतस्थळे तयार होतात, त्यावर अतिशय चांगल्या दर्जाचे लेखन होते पण वाचक नसल्यामुळे ती पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही चांगलं लिहा वाचक आपोआप येतील असे असते तर किती बरे झाले असते. पण ते होत नाही. बरं तुम्ही चांगले सुंदर संकेतस्थळ/व्यासपीठ काढा वाचक/लेखक आपोआप येतील असेही होत नाही. हे मायबोलीपुरते नसुन कुठल्याही लोकप्रिय व्यासपीठाला/वेबसाईटला/कार्यक्रमाला/टीव्ही सिरीयलला लागू पडते. त्यामुळेच फक्त चांगले लिहणारा नाही तर "माझे लेखन हे तुमच्यासाठी कसे चांगले आहे," किंवा "मी तुम्हाला आवडते ते लिहतो" हे जो वाचकांना पटवू शकतो तोच आजच्या जगात यशस्वी होतो आहे. जो पर्यंत एखादा कलाकार वाचकांकडे/चाहत्यांकडे/प्रेक्षकांकडे आदराने पाहतो तोपर्यंतच तो जगतो. यात मी नवीन काहीच नाही सांगत नाहीये पण आंतरजालावरच्या आभासी दुनियेत हे फार लवकर विसरायला होऊ शकतं.

मालकीहक्कासंबंधी आणि त्याविषयीच्या मायबोली प्रशासकांच्या धोरणाविषयी वेबमास्तरांनी लिहिलेलेच आहे.

यात 'यथायोग्य' म्हणजे काय? या विशेषणाचे महत्व काय?
>> संपादक मंडळाच्या मते आणि समजूतीनुसार 'यथायोग्य' हा शब्द corresponding or respective author या अर्थाने वापरला आहे.
या विशेषणाचा 'लेखनाची, लेखकाची योग्यता' या बाबींशी कोणताही संबंध अभिप्रेत नाही.

मायबोलीचा एक Stepping Stone म्हणून उपयोग करायला हरकत नाही उलट तुमच्या प्रगतीच्या मार्गात तो झाला असेल तर आम्हाला आनंदच आहे. आणि त्यासाठीच सगळे मालकी हक्क लेखकाकडे असतात. आणि एकदा तुमचे नाव झाले आणि इतरत्र जर तुम्हाला जास्त पैसे/मान/सन्मान जास्त मिळत असेल तर तुम्ही मायबोलीवर न लिहता इतर लिहणे साहजिकच आहे. यात काहीच चुकिचे नाही.

मात्र जेंव्हा काही दिवसांनंतर (वर्षांनंतर) तुम्ही तुमचे मायबोलीवरचे पूर्वी लिहलेले लेखन काढून टाकता, तेंव्हा मायबोलीला/मायबोलीकरांना वाईट वाटतंच पण तो भावनेचा भाग असतो. त्याही पेक्षा तो लेखक्/कलाकार असं करून स्वतःच्या पायावर मोठा धोंडा पाडून घेतो.
याचं कारण असं की नुसता वाचकवर्ग मिळवून थांबता येत नाही तर तो टिकवून ठेवावा लागतो. तुम्ही पूर्वी केलेले लेखन इथे ठेवले असेल तर मधून मधून तुम्हाला नवीन वाचक मिळत राहतात ज्यानी तुमचं आधी कधी वाचलं नसेल. तसंच तुम्ही तुमच्या वाचकवर्गाच्या डोळ्यासमोर (एक लेखक्/कलाकार म्हणून राहतात). तुमचं लेखन इथे दिसलं नाही तर तो वाचक दुसर्‍या कुणाचं तरी वाचायला लागतो.
दुसरं नुकसान आंतरजालाशी निगडीत आहे. तुमच्या लेखनाबद्दल कर्णोपकर्णी एकून काही वाचक तुमच्या लेखनाचा सर्च ईंजिनवर शोध घेत इथे येतात. तुमचं लेखन सापडलं नाही तर त्यांना दुसर्‍या कुणाचं तरी इथे सापडतं ते त्याचे चाहते होतात. तुम्ही जरी तुमच्या ब्लॉगवर लिहले असले तरी तुमचा ब्लॉग लोकप्रिय नसेल तर तो नेहमीच सर्च मधे वरती येईल असे नाही. आणि जर तुमचा ब्लॉग खूपच लोकप्रिय असेल आणि तो नेहमीच सर्च मधे वर येत असेल तर तुम्हाला मायबोलीचीच काय कुठल्याच संकेतस्थळाची गरज नाही.

मायबोलीच काय किंवा इतर लोकप्रिय मराठी संकेतस्थळे काय , ती तशी का आहेत, ब्लॉगपेक्षा या संकेतस्थळांवर नेहमीच का जास्त प्रतिसाद मिळतात याची काही मूलभूत कारणे आहे. त्या कारणांचा स्वतःसाठी फायदा करून घ्यायचा का नाही हे शेवटी लेखकांना/कलाकारांनाच ठरवायचं आहे.

वर मायबोलीचं नाव उदाहरणादाखल दिले आहे. इतर कुठल्याही लोकप्रिय संकेतस्थळाला ते सारखंच लागू पडेल. फक्त मायबोलीचे महत्व म्हणून हे लिहलेले नाही.

होय अजय...मी सदस्य असा मोघम शब्द वापरला असला तरी त्याचा अर्थ आपण म्हणताय तसा व्यापकच आहे...मलाही तेच अभिप्रेत आहे....लेखक-वाचक,कलाकार-रसिक/आस्वादक अशा जोड्या नसतील तर सगळंच फोल आहे...ह्या सगळ्यांना व्यासपीठ देतं ते संकेतस्थळ....तेही तेवढच महत्वाचं आहे....म्हणूनच संकेतस्थळाच्या भरभराटीचा विचार करायचा असतो तेव्हा हे सगळे घटक आणि त्यांचा सक्रिय सहभाग ह्याचा विचार करावाच लागतो ...सगळेच एकमेकांना पूरक आहेत...इथे सगळ्यांचीच गरज आहे...

त्याच वेळी हेही लक्षात ठेवायला हवे की कुणीही कुणाला गृहित धरू नये...उदा... मी छान लिहितो म्हणून मला वाचक नक्की लाभतील,माझ्यासारख्या लेखकांमुळे हे संकेतस्थळ चालतंय....माझं संकेतस्थळ व्यासपीठ देतंय म्हणून मी काहीही अटी घालेन....मी वाचतोय,प्रतिक्रिया देतोय म्हणून ह्या लेखनाला/लेखकाला किंमत आहे...वगैरे वगैरे

थोडक्यात, असे सगळे घटक एकमेकांची गरज ओळखून आणि एकमेकांना योग्य ते महत्त्व देऊन राहिले तरच त्याचा फायदा सगळ्यांनाच होऊ शकतो.

Pages