तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला (तरही गझल)

Submitted by रसप on 20 September, 2012 - 00:10

अशक्य शक्य मानण्यात मस्त वाटते मला
(तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला)

'मला नसे फरक' असे म्हणून तोडलेस तू
तुझी नजर तरी विचारग्रस्त वाटते मला

असेल उंच बंगला तुझ्यासमोर बांधला
तुला गमावले म्हणून ध्वस्त वाटते मला

सरे अशीच रात रोज पाहतो छतास मी
पहाटवेळ रोजचीच अस्त वाटते मला

सुखे कुलूप लावुनी 'उघड कवाड' सांगती
विचित्र मस्करीमुळेच त्रस्त वाटते मला

तुझ्या सजावटीत तू स्वत:च लुप्त ईश्वरा
विनायका, तुझी कृपाच स्वस्त वाटते मला

उदंड आठवांत एकटाच रंगतो 'जितू'
रितेपणात आजकाल व्यस्त वाटते मला

....रसप....
१९ सप्टेंबर २०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशक्य शक्य मानण्यात मस्त वाटते मला
(तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला) ..................... सुंदर

'मला नसे फरक' असे म्हणून तोडलेस तू
तुझी नजर तरी विचारग्रस्त वाटते मला... मस्त अंदाज

मक्ता बढिया ..

पु. ले. शु.

.......................................

इतर गप्पा टाळुयात दोस्तांनो... चांगल्या गझला येत आहेत.

वा... छान गझल.

अशक्य शक्य मानण्यात मस्त वाटते मला
(तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला)

'मला नसे फरक' असे म्हणून तोडलेस तू
तुझी नजर तरी विचारग्रस्त वाटते मला...............हे दोन्ही शेर मस्त झालेत. Happy

तुझ्या सजावटीत तू स्वत:च लुप्त ईश्वरा
विनायका, तुझी कृपाच स्वस्त वाटते मला

उदंड आठवांत एकटाच रंगतो 'जितू'
रितेपणात आजकाल व्यस्त वाटते मला<<<

चांगले शेर