जिम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसन - खरेखुरे सुपरहिरोज...

Submitted by आशुचँप on 15 September, 2012 - 13:21

जिम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसन या दोन नावांनी अगदी लहानपणापासून म्हणजे वाचायची गोडी लागल्यापासून माझ्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याकाळी जेव्हा जंगलात आत्ताच्या पन्नासपटींनी वाघ आणि इतर जंगली प्राणी होते. अक्षरश शेकडोंनी मनुष्यहत्या करणारे नरभक्षक होते (चंपावत, ठाकचा नरभक्षक आणि पानारचा बिबट्या यांनी प्रत्येकी तीनचारशे बळी घेतल्याची नोंद आहे), माजावर आलेले मस्तवाल रानहत्ती होते. अशा वेळी कुठल्याही क्षणी आपल्या प्राणावर बेतू शकते याची पूर्ण जाणीव असतानाही हातात एक साधी दुनळी बंदूक घेऊन पायी जंगलात फिरणारे हे दोघे म्हणजे माझ्यासाठी सुपरहिरोज होते...
खरेखुरे सुपरहिरोज...

पोवळगडचा ब्रम्हचारी आणि जीम कॉर्बेट

या दोघांमध्ये विलक्षण साम्य होते. (दिसण्यात नव्हे)..दोघेही ब्रिटीश पण आयुष्याचा बराचसा काळ भारतात राहीलेले. नुसते राहीलेच नाहीत तर इथल्या जमिनीशी, इथल्या लोकांशी ते अस्सल भारतीयाप्रमाणे समरस झाले. आख्खे आयुष्य जंगलात गेल्यामुळे गरजा कमीत कमी होत्या, स्थानिक भाषेची चांगली जाण होती आणि महत्वाचे म्हणजे इथला अदिम रहिवासी अदिवासी त्यांचा जंगलशाळेचा गुरु होता. दोघांनीही त्याचा वेळोवेळी उल्लेख केलाय. दोघेही वाघाचा आवाज हुबेहुब काढू शकत. (अँडरसनने असा आवाज काढायला आपला गुरु बैरा पुजारी याने शिकवल्याचे लिहीले आहे) आणि दोघांनाही निसर्गाबद्दल आत्यंतिक प्रेम होते. नरभक्षकाचा अंत करताना त्यांनी कुठेही दयामाया दाखवली नसली तरी अन्य वाघांची कधीही हौस म्हणून शिकार केली नाही. या भारतीय जंगलाच्या राजाला त्यांनी नेहमीच आदराने वागवले आहे. दोघेही वाघाचा सभ्य पुरुष म्हणून उल्लेख करतात. उतारवयात दोघांनीही बंदूक टाकून निसर्गरक्षणाचा वसा घेतला.

दोघेही अतिशय अनुभव समृद्ध आयुष्य जगले. नुसते जगलेच नाही तर ते लेखणीद्वारे अजरामर केले. शिकारकथा हा लेखनप्रकारच मुळात अतिशय रोमांचकारक आहे...आज जंगले नावाला उरलेली आहेत आणि वन्यजीवांच्या शिकारीवर कडक बंदी आहे (अनधिकृत चालते ती सोडून द्या) पण तरीही आजही या दोघांचे लिखाण वाचताना जो काही थरार अनुभवयाला मिळतो त्याला तोड नाही..

चुका नरभक्षक

सर्वप्रथम वाचनात आले ते जीम कॉर्बेटचे कुमाँउचे नरभक्षक हे पुस्तक.....
मुंबईला माझ्या आत्याकडे गेलो असताना हातात पडले आणि एका दमात वाचून काढले...आणि त्यानंतर जी काही टरकली होती ती आजही आठवून हसू येते. आत्याच्या घरी जायला एक अरुंदसा जीना होता तिथे अनेकदा लाईट नसायचा आणि मग संध्याकाळी तिथून जाताना थरकाप उडायचा...मुंबईसारख्या वर्दळीच्या ठिकाणी कुठला वाघ आणि बिबट्या येणार हा प्रश्नसुद्धा मनात यायचा नाही...
ठाकचा नरभक्षक आणि चंपावतचा नरभक्षक या दोन कथांमध्ये जीमने जी काही वातावरणनिर्मिती केलीये त्याला तोड नाही...आणि त्याची शैलीपण फार मस्त आहे...तो असे बोलता बोलता आपल्यासमोर चित्र काढतो...
म्हणजे असे समजा की तुमच्यासमोर एक आयताकृती मैदान आहे..मैदानाची रुंदी ४० यार्ड आणि लांबी ७० यार्ड आहे.. मैदानाच्या इशान्येकडून खुरट्या झुडपांनी वेढलेल्या डोंगररांगा सुरु होतात..पूर्वेकडून एक बारमाही वाहणारा एक ओढा वाहत येतो आणि मैदानाला बरोबर मध्यभागी दुभागते...उजवीकडचा भाग दाट झाडीने आच्छादला आहे..काही अंतर गेल्यानंतर थोडा मोकळा भाग सुरु होतो तिथून पुढपर्यंत चराऊ कुरण आहे...
असे...काय बिशाद आहे तुमची की तुमच्या डोळ्यासमोर तिथल्या परिस्थितीचे चित्र उभे राहणार नाही...जीमला ही सवयच होती. त्याने अनेक कथांमध्ये शब्दांच्या रांगोळीने अशी चित्रे काढली आहेत.
त्यामुळे कितीही भीती वाटत असली तरी कुमाँऊच्या नरभक्षक पुस्तकाची पारायणे केली...मोहनचा नरभक्षक अशा एकसे एक कथा...त्यानंतर पुढच्या मुंबईवारीत अजून एक पुस्तक हातात पडले...रुद्रप्रयागचा नरभक्षक...जीमचे पुस्तक म्हणल्यावर मी तातडीने त्यावर झडप घातली...आणि पुन्हा एकदा टरकण्याचा अनुभव घेतला...
रुद्रप्रयागच्या नरभक्षकाने जोरदार प्रसिद्धी मिळवली होती. जीमच्याच शब्दात पानारच्या बिबट्याने चारशे बळी घेऊनही त्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी रुद्रपयागच्या नरभक्षकाला दिडशे बळी घेऊन मिळाली. याचे कारण त्याचा वावर ज्या भागात होता त्या भागातून भारताच्या कानाकोपर्यातून आलेले यात्रेकरू प्रवास करत. हिंदूची पवित्र श्रद्धास्थाने याच भागात होती.
या नरभक्षकावर लिहीताना जीमने अक्षरश त्याचे लेखनकौशल्य पणाला लावल्यासारखे वाटते...बाकी नरभक्षकांच्या तुलनेत कमी बळी घेऊनसुद्धा अतिशय चर्चेत असलेला हा नरभक्षक कसा मेला याची उत्सुकता सगळ्यांनाच होती आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात जीमने कुठलीही कसर सोडली नाही. ज्या बारकाईने आणि तपशीलवार त्याने ही सगळी कथा सांगितली आहे ती जबरदस्त...
हॅट्स ऑफ....

रुद्रपयागचा नरभक्षक आणि जीम कॉर्बेट

या दोन पुस्तकांनी शिकारकथांची जी काही मोहीनी घातली ती आजवर कायम आहे...यातूनच मग अधिकाधिक शिकारकथांची पुस्तके हुडकत गेलो आणि मग त्यातून हाताला गवसला केनेथ...

बाप्पा रे...हा माणूस तर जीमपेक्षा और होता..जीमचे कार्यक्षेत्र उत्तरेकडे तर हा दक्षिणेचा मानकरी...
असं असतं जंगल, शिवानीपल्लीचा काळा चित्ता (त्याकाळी आपले भाषांतरकार लेपर्ड आणि पँथर हे दोन्ही वेगवेगळे प्राणी समजत आणि पँथरला चित्ता आणि लेपर्डला बिबट्या असे काहीसे समजत...त्यामुळेपण त्यांच्या समजूतीने मला त्याकाळी फार गोंधळात टाकले होते. चित्ता हा मोकळ्यावर वावरणारा, सर्वात वेगवान असा प्राणी इतपत जुजबी माहीती होती पण मग तो असा दबा धरून किंवा चक्क घरात शिरून माणसे कसा मारायचा हे कोडे खूप दिवस उलगडले नव्हते) ही पुस्तके वाचून वाचून पाठ झाली...नंतर मग कर्नल पॅटर्सनच सॅव्होचे नरभक्षक सिंह आणि कॅरिंग्टन टर्नरचे मॅन-इटर अँड मेमरीज हेही वाचून काढले..पण जी मज्जा जीम आणि केनेथच्या शिकारकथा वाचताना यायची त्याच्या दशांशाने देखील इतर कथा वाचताना आली नाही.
आणि मग नंतर इंग्रजी वाचनाचीही आवड निर्माण झाली तसे पहिले काम केले ते म्हणजे या दोघांची पुस्तके मूळ भाषेतून वाचण्याचे...दोघांच्याही लिखाणातले साम्य म्हणजे अतिशय साधी सोपी भाषा..उगाचच डामडौल नाही..क्लिष्ट वाक्यरचना नाही...जसे ते दोघे होते..रांगडे आणि मनाने खूप साधे तसेच त्यांचे लिखाणही..
त्यामुळे केनेथ अँडरसनचे दोन्ही ऑम्नीबस (सगळ्या लिखाणाचे एकत्रीत संकलन) आणि नाईन मॅनइटर्स अँड वन रॉग, जीम कॉर्बेट ऑम्नीबस, माय इंडीया असे सगळे वाचून काढले.
त्यातून मग नकळत मनात तुलना सुरु झाली...दोघेही आपापल्या परिने सर्वोत्तम असले तरी दोघांमध्ये काही फरक आढळलेच...
जीम कॉर्बेट अतिशय धाडसी असला तरी जीवावर बेतणारे उद्योग त्याने फारसे केल्याचे आढळत नाहीत...तालादेस नरभक्षकाचा अपवाद वगळता...त्यामानाने अँडरसनने बरेच असे अचाट प्रसंग अनुभवले आहेत...नरभक्षकाला रात्री आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विहीरीचा रहाटाचा आवाज करणे, रात्री गावातून मोठमोठ्याने गप्पा मारत जाणे, कुत्र्याचे भुंकणे ऐकल्यावर नरभक्षकाच्या दिशेने रांगत जाणे, अंधारात चुकुन वाघाच्या पायावर हात टेकवणे, अशा एक से एक लीला त्याने केल्या आहेत आणि तितक्याच भयंकत अनुभवातून सुटला देखील आहे...जमिनीत खड्डा खणून नरभक्षकाची वाट पाहत बसलेला असताना वाघानेच त्याला शोधून काढून मारण्याचा प्रयत्न करणे, झाडावर बसलेला असताना वाघाने उंच झेप घेऊन ओरबाडणे, खुनशी हत्तीबरोबर झालेला पाठलागाचा प्रसंग असे प्रकार वाचताना जीवाचा अगदी थरकाप उडतो..पण केनेथ त्या अगदी प्रांजळपणे मांडल्या आहेत...
त्याने एक भला मोठा लेख त्याला आलेल्या अमानवीय अनुभवांवर लिहीला आहे..त्याबद्दल वेगळ्या लेखात लिहीन...
त्यामुळे कॉर्बेटपेक्षा अँडरसनचे लिखाण अत्यंत वैविध्यपूर्ण आणि रंजक झाले आहे. त्याने एका वाघाच्या बछड्यापासून नरभक्षकापर्यंतच प्रवासही वनराज बाघ मध्ये मांडला आहे की आपण अगदी त्याला पाहतो आहोत असे वाटावे. तिमोर आणि सिताचा मुलगा बाघ जन्माला आला तेव्हा कसा असतो, मग आईशी भांडण होऊन निघून जाणे, बहिंणीशी फारकत, मग वयात येणे, शिकारीचे अनुभव, त्यात झालेल्या चुका, त्यातून घेतलेले धडे आख्खा जीवनपटच....
पण कॉर्बेटला जितकी प्रसिद्धी मिळाली तितकी अँडरसनला नाही. अर्थात कॉर्बेटने आपल्या लिखाणात सगळ्या नोंदी तपशीलवार केल्या आहेत. कुठल्या तारखेला नरभक्षकाने कुठे बळी घेतला ते या वर्षात किती, कुठल्या गावात किती ही सगळी माहीती तो पुरवतो...आणि त्याने मारलेले नरभक्षकांनी किमान १००पेक्षा जास्त बळी घेतलेले आहेत.
त्यामानाने अँडरसन फार तपशीलात जात नाही. त्याला तपशील देण्यापेक्षा कथा रंगवण्यात जास्त रस होता...वालाईथोथूचा स्वामी हे त्याचे अतिशय चपखल उदाहरण..आणि आयाळ असेलला छोर्डीचा वाघ आणि हैद्राबादचा हत्यारा सोडला तर त्याच्या नरभक्षकाने फारसे बळी घेतल्याची पण नोंद नाही...
अर्थात, काही अँडरसनप्रेमींनी त्याचे स्पष्टीकरण देताना म्हणले आहे की नरभक्षकाची एखादी घटना जरी ऐकली तरी अँडरसन तातडीने जाऊन तो मोठ्या प्रमाणावर माणसे मारायच्या आतच त्या नरभक्षकाचा खातमा उडवत असे..अँडरसनने मारलेल्या वाघांची आणि बिबट्यांची संख्या पाहता ते कदाचित खरेही असावे...
पण आपल्याला वाचक म्हणून त्यात फारसे पडण्याचे कारण नाही. या दोघांनी आपले वाचन समृद्ध केले आणि जंगलाची गोडी लावली हेच पुरेसे आहे...त्यासाठी या दोघा सुपरहिरोजना मनापासून धन्यवाद....

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्ता आणि बिबट्या हेही दोन वेगळे प्राणी असल्याचा त्यांचा समज होता. >>

तूमचा लेख आवडला. मात्र हे वाक्य बरोबर नाही. चित्ता आणि बिबट्या हे दोन्ही वेगळेच प्राणी आहेत. फक्त भारतीय चित्ता १९४० च्या दरम्यान नामशेष झाला आहे.

आवडला लेख.

चित्ता आणि बिबट्या हेही दोन वेगळे प्राणी असल्याचा त्यांचा समज होता. >>

तूमचा लेख आवडला. मात्र हे वाक्य बरोबर नाही. चित्ता आणि बिबट्या हे दोन्ही वेगळेच प्राणी आहेत. फक्त भारतीय चित्ता १९४० च्या दरम्यान नामशेष झाला आहे.
<<<<<<<<<< अनुमोदन

ते वाक्य लिहीताना माझी चूक झाली...त्याकाळी पँथरला चित्ता आणि लेपर्डला बिबट्या असे समजत असे मला म्हणायचे होते...त्यामुळे सगळ्या ठिकाणी सर्रास चित्ता शब्द वापरला जायचा..कहर म्हणजे अँडरसनच्या अनुवादित पुस्तकामध्ये बिबट्याचा फोटो टाकून त्यावर दबा धरून बसलेला चित्ता अशी कॅप्शन आहे....

वाक्य संपादित केले आहे...

भारी लिहिलंय आशुचॅम्प.
<<फक्त भारतीय चित्ता १९४० च्या दरम्यान नामशेष झाला आहे>>
आता भारत १८ चित्ते नामिबियातून आणवतोय म्हणे.

मस्त आशुचँप... जीम कॉर्बेटची सगळी पुस्तके वाचली आहेत आणि संग्रहात ही आहेत. नैनिताल ला जाताना कुमांउ ला 'कोर्बेट नॅशनल पार्क " आणि जिम च्या घरातही गेले आहे.

आता केनेथ ची पण वाचणार. खरेतर मागे एका प्रदर्शनात दिसली होती. आता घेवुन वाचते...

केनेथ च्या अमानविय लेखा बद्दल कधी लिहिणार?.... प्रतिक्षा करते आहे....

केनेथ च्या काही पुस्तकांची नावे टाकणार का? म्हणजे मराठी आणि मूळ इंग्रजी.. कारण याच्या बद्दल कधीच काही ऐकले नाही..मिळवुन वाचायलाच पाहिजेत आता

आशुचँप
छान आहे लेख. मी मधे एक जिम कोर्बेट वर पुस्तक वाचल होतं, त्यात त्यांच्या २ पिढ्या आधीपासुन सगळी कहाणी होती. जिमच्या जन्मापासुन ते त्याच्या केनियातील म्रूत्युपर्यंत. त्याला कुमाऊचे लोक बहुतेक 'कार्पेट्बाबा' म्हणत Happy

केनेथ च्या अमानविय लेखा बद्दल कधी लिहिणार?.... प्रतिक्षा करते आहे.... > +१

मृनिश,
'Nine Man Eaters and One Rogue' हे एक केनिथ अँडरसन चे पुस्तक आहे बहुतेक

येस्स्स!!!
कॉर्बेटची तीनही पुस्तके अगणित वेळा वाचून झाली आहेत. केनेथ अँडरसनचे ऑम्निबस वाचले आहेत.. दरवेळी तेच थ्रिलिंग अनुभवायला मिळते.. Happy

जिम कॉर्बेटची बरीच पुस्तके (मराठी अनुवाद) वाचलीयेत - फारच अप्रतिम लिहितो हा साहेब....

केनेथचे नाव ऐकून आहे, अजून वाचली नाहीयेत - पण आता वाचणारच.. तुझ्याकडून स्फूर्ती घेऊन...

पण दोस्ता - ते टायटलचे बघ ना जरा काही - मी कित्येक दिवस हा लेख टाळतच होतो ते टायटल बघून - त्यात जरा या दोघांची नावे टाकशील का ?

लेखनशैली सुर्रेख आहे रे तुझी........

मस्तच. काही पुस्तके वाचली आहेत.
दोघांच्या सगळ्या पुस्तकांची लिस्ट करा ना इथे. म्हणजे ती वाचता येतील.
टायटल बद्दल पुरंदरेंना अनुमोदन.

सर्वांना खूप खूप धन्यवाद...मी थोडा बिचकतच होतो हा लेख टाकताना..की आत्ता कशाचा काही संबंध नसताना एकदम का लेख टाकला असे विचारतील म्हणून...
पण तुमच्या प्रतिसादांनी हुरुप वाढला....
खरेतर या दोघांबद्दल मला इतके लिहायचे होते ना...पण किती लिहू याचा अंदाज नाही आला...

चिखल्या - माझ्याकडे दोन पुस्तकांच्या आहेत. नाईन मॅन इटर्स, आणि मॅन इटर्स ऑफ कुमाऊ...मला संपर्कातून इमेल कळवा...मी पाठवतो...

झकासराव - शिकारकथा होती का टायगर इन टनेल होती...ती रस्कीन बॉन्डची आहे...ती होती आम्हाला दहावीला...

आता भारत १८ चित्ते नामिबियातून आणवतोय म्हणे.
हो वाचली ती बातमी...चांगले आहे..अतिशय स्वागतार्ह निर्णय....पण मुळातच आता माळराने संपुष्टात येत असताना या चित्त्यांना ठेवणार कुठे हा मोठा प्रश्न आहे...

नैनिताल ला जाताना कुमांउ ला 'कोर्बेट नॅशनल पार्क " आणि जिम च्या घरातही गेले आहे.
मी तर आवर्जून जाऊन बघून आलो होतो...मला आठवतयं मी अगदी भारावून गेलो होतो तेव्हा...त्याचे शिकारीचे दिवे बाकी साहित्य अजून सांभाळून ठेवलेय..बंदूक मात्र नव्हती...किंवा मला बघितल्याचे आठवत नाही...

मृनिश - केनेथची ३-४ पुस्तके आहेत..मी मराठीमध्ये अनुवादित वाचली होती ती असं असतं जंगल, शिवानीपल्लीचा काळा चित्ता. इंग्लिशमध्ये मी डायरेक्ट ऑम्नीबस वाचले...फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत...तीन चारशे रुपयांना...याशिवाय नाईन मॅन इटर्सपण आहे....

मी मधे एक जिम कोर्बेट वर पुस्तक वाचल होतं, त्यात त्यांच्या २ पिढ्या आधीपासुन सगळी कहाणी होती. जिमच्या जन्मापासुन ते त्याच्या केनियातील म्रूत्युपर्यंत. त्याला कुमाऊचे लोक बहुतेक 'कार्पेट्बाबा' म्हणत
कार्पेटसाब का...अशाच नावाचे एक पुस्तक आहे...ते अजून वाचायचे राहिले आहे

कॉर्बेटची तीनही पुस्तके अगणित वेळा वाचून झाली आहेत. केनेथ अँडरसनचे ऑम्निबस वाचले आहेत.. दरवेळी तेच थ्रिलिंग अनुभवायला मिळते.
येस्स...तुच रे..तुझ्यामुळेच मला ती पुस्तके मिळाली....

केनेथ च्या अमानविय लेखा बद्दल कधी लिहिणार?...
लवकरच टाकतो...:)

पुस्तकांची यादी
जीम कॉर्बेट
Man-eaters of Kumaon
The Temple Tiger and More Man-eaters of Kumaon
The Man-eating Leopard of Rudraprayag
Jungle Lore
Tree Tops
My India

केनेथ अँडरसन
Tales from the indian jungle
Man-eaters and jungle killers
The call of the man-eater
He black panther of Sivanipalli
The tiger roars
Jungles long ago
Nine man eaters and one rogue
This Is The Jungle

ही सर्व पुस्तके फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत...अॅमेझॉन, इबे, स्नॅपडीलवर सुद्धा असण्याची शक्यता आहे..पाहिले नाही...
पुण्यात डेक्कनला मिळतात....

छान लेख! मी पण कॉर्बेटची पारायणं केली आहेत. अँडरसन मात्र नाही वाचलेला! कॉर्बेटच्या काही पुस्तकांचं मराठीतून भाषांतर पण झालेलं आहे. पण मला ते आवडलं नाही. मला एक प्रश्न नेहमीच पडतो की कॉर्बेटच्या लिखाणावर कुणी एखादी टिव्ही सिरीयल का नाही काढली?

चिमण - त्याच्या मँन इटर्स ऑफ कुमाऊँवर एक चित्रपट निघालेला...पण तो फारच भीषण होता...खुद्द कॉर्बेटने उत्सुकतेने हा चित्रपट पाहिला आणि त्यात फक्त वाघाचेच काम चांगले झाले आहे असे उद्गार काढले होते...:)

खरेतर या दोघांबद्दल मला इतके लिहायचे होते ना... >>>> जरुर लिहिणे - ते सगळे वाचायला आवडेलच....... बर्‍याच जणांचे आवडते आहेत हे सुपर हिरोज......

आवडलं नाही. मला एक प्रश्न नेहमीच पडतो की कॉर्बेटच्या लिखाणावर कुणी एखादी टिव्ही सिरीयल का नाही काढली? >>> मध्यंतरी बहुतेक डिस्कव्हरी चॅनेलवर कॉर्बेटसाहेबांवर एक फिल्म दाखवली होती (एका नरभक्षक बिबळ्याच्या संदर्भात) - मला तरी ती आवडली.

झकासराव - शिकारकथा होती का टायगर इन टनेल होती...ती रस्कीन बॉन्डची आहे...ती होती आम्हाला दहावीला.>> अरे हिंदीत होती. आता नीट आठवत नाहिये. पण वाघ वस्तीत घुसलेला असतो. एका घरात. तिथे एक लहान मुलही अडकलेलं असतं.
त्यात स्टोरीत मराठी डायलोङ होता "दादा लौकर मारा वाघाला"

सुंदर लेख!

माझी इंग्रजी वाचनाची सुरुवात झाली ती ए जे क्रोनिन, अर्थर कॉनन डॉयल आणि जिम कॉर्बेटचं बोट धरून. अतिशय सोपी भाषा, आणि चित्र तुमच्यापुढे उभं करण्याची जबरदस्त हातोटी यामुळे मी त्याच्या प्रेमात पडले. जंगल वाचावं तर जिम कॉर्बेटनी, असं वाटायचं. आणि त्या जंगलाबद्दलचं आणि जंगलात राहणार्‍या लोकांबद्दलचं त्याचं प्रेम पुस्तकाच्या पानापानातून दिसायचं.`रुद्रप्रयागचा नरभक्षक' वाचतांना आपल्या छाताडावर नरभक्षक बसलाय असं स्वाप्न पडून दरदरून घाम यावा आणि झोपेतून जाग यावी हे तर मला वाटतं त्याच्या प्रत्येक वाचकाचं होत असेल.

अंडरसनविषयी माहिती नव्हती. आता त्याची पुस्तकं मिळवून वाचली पाहिजेत.

Pages