जिव्हाळ्याचं बेट

Submitted by दाद on 12 September, 2012 - 19:13

"... मी सिडनीत कामासाठी येणारय... भेटायला जमेल?" म्हणालास. नुस्तीच नेटवरली पत्रं भेट आपली. मला धास्तीच जास्तं. नकोच वाटलं प्रत्यक्षं भेटणं. आडाखे चुकले तर वाईट वाटण्याइतकेही आपण मैत्रं नव्हतो... तरीही. (नथिंग अबाऊट यू... इट्स, मी.)
तुझं तेव्हा येण्याचं बारगळलं... पण मी फारसा प्रतिसाद दिलाच नव्हता हे तुझ्या लक्षात आलं का रे?

पुन्हा एकदा तूच नेट लावलास. तुझं लिहिलेलं वाचून माझे "यत्किंचित अभिप्राय" अन मी लिहिलेलं वाचून तुझे "किंचिततरी अभिप्राय" इतक्या जुजबी भांडवलावर, प्रत्यक्षं भेटीचं आवताण... पुन्हा एकदा तुझ्याचकडून. ह्यावेळी वरमून मी कबूल झाले.
आलास, दिवसभर आमच्यात काढलास, मी रांधलेलं सुखे जेवलास.... माझ्या लेकाबरोबर, नवर्‍याबरोबरच अधिक गप्पा झाल्या तुझ्या. मी नुस्तीच ताटाभोवतीच्या रांगोळीसारखी, उल्हासात.
मी घरातलं आवरत असताना, लेकाबरोबर दुसरी पेटी काढून बसलास. अनेक दिवसांनी मुलगा मनापासून वाजवतोय असं माझ्याच लक्षात आलं... सूर जुळलेच जुळले, त्याचे-तुझे. इतके की, संध्याकाळी त्याचा कार्यक्रम होता तर तो जायला कबूल होईना... "इथेच... हेच चालू ठेऊया नं..." इथवर गुंतला, तो.

संध्याकाळी मी अन मुलानं वाजवलेला घरगुती कार्यक्रम ऐकलास... कुमार, मल्लिकार्जुन, अख्तरीबेगम ऐकून भरून पावलेला, तू. शेवटी उत्साहानं हसत हसत टाळ्या वाजवताना तुझा चेहरा... अभिमानानं फुलुन आलेला वाटला, मला आपला.
रात्री तुला परत सोडताना काय म्हणून भरून आलं असेल?... पुन्हा कधी निवांत असा भेटतोयस म्हणून, की आपण बोललोच नाही फारसे म्हणून की...
...कुणास ठाऊक काय ते...
पूर्वी कधी वाचलेल्या, अन हरवलेल्या एखाद्या अप्रतिम पुस्तकाशी पुन्हा एकदा चुटपुटती नजरभेट व्हावी.. तसं काहीसं?

दुसर्‍या दिवशी सिडनी सोडण्यापूर्वी तुझा फोन. इकडम-तिकडम बोलून झाल्यावर मी म्हटलच शेवटी, "... आपलं असं बोलायचं राहिलच की रे... नवर्‍याशी अन लेकाशीच गप्पा झाल्या तुझ्या..."
त्यावर .." दोन मित्रं एका झोपाळ्यावर येऊन बसतात अन झुलतात मजेत, बोलत काहीच नाही... आपापल्या वाटेनं जातात तेव्हा एकच विचार असतो दोघांच्याही मनात... that was the best conversation we had.." ही तुझी मल्लिनाथी आणि मी नि:शब्दं.

आपली मैत्री नक्की कशी? कुणास ठाऊक...
मैत्री म्हणजे खरतर आज्जीनं जपून ठेवलेला जुना, औषधी मुरावळा... असं मला आपलं मॅडसारखं वाटतं.
कधीतरी जीभ खवळली म्हणून दुपारी सगळ्या मोठ्यांचा डोळा चुकवून वाटीत घेऊन बोट घालून घालून... अगदी एकट्यानं चाटायचा... आंबट, गोड... किंचित तुरट... त्यानंतर साधं पाणीसुद्धा कसलं गोडुलं लागतं...
किंवा मग अगदी जीभेला चव नाही, आजारून तोंड उतरून गेलेल्या उन्हाळ्याच्या दिवसात आईनं किंवा खुद्दं आज्जीनं स्वहस्ते औषध म्हणून काढून दिलेला.... वर आणखी खाताना पाठीवरून फिरणारा सुरकुतला, मायेचा हात... अगदी त्या मुरावळ्यासाठी आजारी पडावं वाटू लावणारा...

सच्च्या मैत्रीला मुरायला दोन्ही आयुष्याची सगळीच्या सगळे उन्हं लागावी लागतात, म्हणे... कधी दाखवली रे उन्हं आपण?
मग? आपलं मैत्रं मागच्या जन्मीचं पुढच्या पानावर चालू का काय?

आपल्याकडला सगळाच्या सगळा कुमार माझ्या हातावर ठेवलास. ते ऐकून कुमार मला कळलेच नाहीत ह्यावर माझं तरी दुमत नाही. निर्गुणाच्या भक्तीसारखा नेति नेति म्हणत... कुमार ऐकायचा. ह्यावर माझं शिक्कामोर्तब. त्यांच्यावर लिहायला घेतलेली गानभुली परत बासनात ठेवली मी.
आणि मधेच कधीतरी तुझा फोन, तुझ्या रात्री दिडेक वाजता... कुमारांनी तुकाराम, मीराबाई आणि कबीर ह्यांच्या साठी चाली बांधताना कसा बेगवेगळा विचार केला असेल ते सांगण्यासाठी. "... माझ्या डोक्यातून ते जायच्या आधी तुला सांगितलं" हे वर सांगून तू निवांत झोपला असणारेस.
अन मी पुन्हा कुमार नावाचं कोडं सोडवण्याच्या फंदात!

मधे एकदा एक जीवाभावाचा मित्रं भरल्या मैफिलीतून सट्टाककन उठूनच गेला. सटपटलेली मी... त्याच्या बायकोला काय मदत केली तर आपल्याला असहाय्यं वाटणार नाही? असल्या अतिमूर्खं प्रश्नाचं भूस पाखडीत असताना.. तुझा फोन.
"... असं नस्तं, अगं. तुला वाटेल ते तू कर.. तिला पटेल ते, तिला हवं ते तिला मिळेल... निष्काम कर्मयोग हाच. रात्री मधेच जाग येऊन वाटलं की, अरे... हे करायला हवं... तर ते ही कर... करणं फक्तं तुझ्या हातात आहे. तिला मिळायचं तेच मिळणारय..." वर आणखी, ".. मी गेलोय ह्यातून... तू ही पार होशील, डोन्ट वरी"

एक गाणं आणि वाचन सोडल्यास आपण काय्येक शेअर करत नाही. तरीही "तू आहेस" हेच पुरेसं कसं काय आहे?

तुझ्यामाझ्यासाठी आपलं मैत्रं हे "फक्तं दुसर्‍यासाठी असण्याचं" नाव आहे, असं मी ठरवून टाकलय.
हे असणं ही एक निवांत अनुभूती आहे. त्यासाठी आपण दोघांनीही काहीही करण्याची गरज नाही... अशी...

आयुष्यं समृद्धं करणारी जी काही स्थानं आहेत... त्यात तू म्हणजे एक जिव्हाळ्याचं बेट आहेस. कधीही माझ्या सोबत असण्याची गरज नाही. तुझ्याशी बोलण्याचीही गरज नाही. दिवसेनदिवस आपला-तुपला पत्रव्यवहारही नाही... तरीही "तू आहेस" इतकंच पुरेसं आहे.

जिव्हाळ्याच्या बेटाची अक्षांश-रेखांश असत नाहीत... जिव्हाळ्याच्या बेटाचं नेमकं स्थान म्हणजे आपल्या मनातला स्थळ-काळाचा प्रत्येक छेद... हे बेट आपल्याला शोधत जावं लागत नाही... ते "बेटं" असतंच, आपल्या सोबत. मनाला येईल तेव्हा नांगर टाकावा... लाटांवर, वार्‍यावर... भरकटणार्‍या, थकल्या तारूला मग विसावा शोधत हिंडावं लागत नाही. "तो असतोच".
वयानं मोठ्ठे आहोत म्हणजे भांडणार नाही असं नाही... तू समजुतदार वगैरे आहेस त्यामुळे, मीच बहुतेक नंबर लावीन. नांगर ओढून चालू पडेन...

जिव्हाळ्याच्या बेटाची अक्षांश-रेखांश असत नाहीत... नांगर टाकेन तिथं बेट असेलच... हे माहीत असल्यानंच, बहुदा!

समाप्तं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

काय लिहितेस ग दाद! व्वा! तुझ्या मित्र परिवाराचा हेवा वाट्तो तुझ्यासारखी मैत्रीण मिळाल्याबद्दल! Happy

मसतच ... जिव्हाळा वाटताना चाळणी नेल्याने असेल पण अनेक बेटे भेटुनही 'जिव्हाळ्याच बेट' ह्याचा एकत्रित अनुभव कमीच .... कोणासाठि बेट होण हे जमण अवघडच ...

वाचून प्रश्न पडला की "जिव्हाळ्याचं बेट" intangible असतं का?

पत्र-व्यवहार नाही, भेट नाही, भेट झाली तर फारसं बोलणं नाही मग जिव्हाळ्याचं बेट हेच हे कसं काय कळणार?

(हा कॉन्सेप्ट कदाचित मला नीट कळला नसावा बहुतेक ..)

दाद ,अप्रतिम !!! किती सुंदर लिहीतेस. अर्थात तुझे सुंदर मन, सुंदर विचार म्हणुनच हे असे सुंदर लिखाण होते तुझ्याकडुन.

सगळ्यांचे आभार. हा माझा मित्रं बर्‍यापैकी ताजाच म्हणायचा Happy
आपल्या मनाला एकच कवाड अन कुंपण नसतं... परिघा मागून परिघांची अनेक कुंपणं अन त्याला अनेक कवाडं.
खूपदा रोजच्या भेटीतली माणसं अगदी बाहेरल्या परिघात रहातात... अन कधी कधी काही जण एका भेटीत अगदी आपल्या आतल्या कुंपणातल्या अंगणात... शिळभरल्या पक्षांसारखी उतरतात.
सूर जुळतात...
तसच हे ही.
सशल, गाणं अन वाचन ह्यावर आम्ही अजून बोलतो. प्रत्यक्षं भेट पुन्हा कधी कुणास ठाऊक... पण ह्या पक्षाची शीळ खूप खूप जुन्या ओळखिच्यातली आहे ही खूण मनोमन पटलीये...

अशक्य सुंदर लिहिलयस दाद!

तुझ्या मित्र परिवाराचा हेवा वाट्तो तुझ्यासारखी मैत्रीण मिळाल्याबद्दल<<, ++१

जिव्हाळ्याच्या बेटाची अक्षांश-रेखांश असत नाहीत... नांगर टाकेन तिथं बेट असेलच... हे माहीत असल्यानंच, बहुदा!

..................जिओ!!

खुप अप्रतिम लिहिलयस दाद....
सकाळी सकाळी माझा दिवस साजरा केलास .....
खुप खुप धन्स..

किंवा मग अगदी जीभेला चव नाही, आजारून तोंड उतरून गेलेल्या उन्हाळ्याच्या दिवसात आईनं किंवा खुद्दं आज्जीनं स्वहस्ते औषध म्हणून काढून दिलेला.... वर आणखी खाताना पाठीवरून फिरणारा सुरकुतला, मायेचा हात... अगदी त्या मुरावळ्यासाठी आजारी पडावं वाटू लावणारा...>>>

Sad Sad
Sad

पण ह्या पक्षाची शीळ खूप खूप जुन्या ओळखिच्यातली आहे ही खूण मनोमन पटलीये...>>>> कसं शब्दात उतरतं गं हे सगळं?? अगदी हेच वाटलं वाचुन..
काही तरी ओळखीचं.. पण न बघता पडुन राहीलेलं. आणि मध्येच लक्ष जाउन उचललं.. आणि लगेच ओळख पटली असं....
बर्याच लोकांबद्दल वाटतं..
काय म्हणावं याला?

"जिव्हाळ्याचं बेट" Happy Happy

जिव्हाळ्याच्या बेटाची अक्षांश-रेखांश असत नाहीत... जिव्हाळ्याच्या बेटाचं नेमकं स्थान म्हणजे आपल्या मनातला स्थळ-काळाचा प्रत्येक छेद... हे बेट आपल्याला शोधत जावं लागत नाही... ते "बेटं" असतंच, आपल्या सोबत. मनाला येईल तेव्हा नांगर टाकावा... लाटांवर, वार्‍यावर... भरकटणार्‍या, थकल्या तारूला मग विसावा शोधत हिंडावं लागत नाही. "तो असतोच". >>>>>>>>>>>
सुरेखच!!
माझ्याही 'जिव्हाळ्याच्या बेटांची' याद जागवलीस बघ! त्यातल्या काहींची तर गेली कित्येक वर्षे गाठ-भेट नाही.... पण 'ती' आहेतच! आणि म्हणूनच मनातला ओलावा पण टिकून आहे! आता तर त्यांना भेटावं-बोलावं असंही वाटत नाही.... आठवण आली की आपल्यातच बुडी मारावी अन् जीव गार करणारा वाळ्याचा थंडावा अनुभवावा!

आयुष्यं समृद्धं करणारी जी काही स्थानं आहेत... त्यात तू म्हणजे एक जिव्हाळ्याचं बेट आहेस. कधीही माझ्या सोबत असण्याची गरज नाही. तुझ्याशी बोलण्याचीही गरज नाही. दिवसेनदिवस आपला-तुपला पत्रव्यवहारही नाही... तरीही "तू आहेस" इतकंच पुरेसं आहे. >>>>>>>> दॅट्स इट.....

सुरेख!!
हे असं जिव्हाळ्याचं बेट खरंच असू शकतं का आपल्या आयुष्यात... काही समजत नाहीय.. मे बी तुम्ही म्हणता तसं "आतल्या कुंपणातल्या अंगणात" अजून कोणी उतरलंच नसावं... पण हे दुर्मिळ मैत्र तुम्ही इतक्या अप्रतिम रितीने उलगड्लंय की शेवटच्या वाक्याशी सहमत व्हावंसं वाटतंय. Happy

मैत्री म्हणजे खरतर आज्जीनं जपून ठेवलेला जुना, औषधी मुरावळा... असं मला आपलं मॅडसारखं वाटतं.
कधीतरी जीभ खवळली म्हणून दुपारी सगळ्या मोठ्यांचा डोळा चुकवून वाटीत घेऊन बोट घालून घालून... अगदी एकट्यानं चाटायचा... आंबट, गोड... किंचित तुरट... त्यानंतर साधं पाणीसुद्धा कसलं गोडुलं लागतं...
किंवा मग अगदी जीभेला चव नाही, आजारून तोंड उतरून गेलेल्या उन्हाळ्याच्या दिवसात आईनं किंवा खुद्दं आज्जीनं स्वहस्ते औषध म्हणून काढून दिलेला.... वर आणखी खाताना पाठीवरून फिरणारा सुरकुतला, मायेचा हात... अगदी त्या मुरावळ्यासाठी आजारी पडावं वाटू लावणारा...>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> क्या बात है ..मस्त मस्त Happy Happy खुप आवडल Happy

दाद, नेहमीप्रमाणेच मस्त! शब्दांचं झाड आहे का तुझ्या घरी ? तुझ्या भावना पर्फेक्ट वर्णन करणारे शब्द नेहमीच कसे सापडतात गं तुला Happy

माझ्या बाबतीत म्हणायचं तर जिवाभावाचे मित्रमैत्रिणी अनेक वर्षांनी भेटले की मला मात्र असं नि:शब्द राहणं जमत नाही Proud

Pages