चारोळी झाली

Submitted by सुप्रिया जाधव. on 2 September, 2012 - 00:28

इच्छा आकाक्षांना छाटुन सुंदर मोळी झाली
आयुष्यातिल सुख-स्वप्नांची निव्वळ होळी झाली

जीवनातल्या प्रवासात शोधावा कुठे विसावा ?
याच्या-त्याच्या अपेक्षांनीच अवजड झोळी झाली

उरल्या-सुरल्या आठवणींचे काय करावे आता ?
आठव-आठव जोडत बसले अन रांगोळी झाली

तू असताना असण्याची त्या किंमत कळली नव्हती
तू गेल्यावर अस्तित्वाची या खांडोळी झाली

सुख-दु:खांच्या आवेगाने इतके नक्की घडले
कथा-काव्य नाही अवतरले पण चारोळी झाली

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुट्या ओळी छान.

इच्छा आकाक्षांना छाटुन सुंदर मोळी झाली - मी बांधुन असे लिहीले असते.

उरल्या-सुरल्या आठवणींचे काय करावे आता

आठव-आठव जोडत बसले अन रांगोळी झाली

कथा-काव्य नाही अवतरले पण चारोळी झाली

-----------

आपेक्षांनी - अशी सूट कधीच घेऊ नये.

-----------

आपण ज्या परीस्थितीला सामोर्‍या जात आहात त्यावरून मी समजू शकतो पण अलीकडे आपल्या खयालांमधे रीपीटेशन यायला लागले आहे त्याकडे लक्ष राहू द्या.

-----------

गैरसमज नसावा.

धन्यवाद!

विदिपा,
आपल्या सुचनांचा नक्कीच विचार करतेय.

बेफिजी,
गझल केली नाही हो झाली Happy
धन्स ! आपला अभिप्राय कॉम्प्लीमेंटस म्हणून घेते.

आबासाहेब,

सगळ्यांचे आभार!

-सुप्रिया.

छान !!

छान

आवडली.

इच्छा आकाक्षांना छाटुन सुंदर मोळी झाली - मी बांधुन असे लिहीले असते. >>>
छाटून ऐवजी बांधून शब्द घातला तर अर्थ कमालीचा बदलेल की मग!
इच्छा आकाक्षां, स्वप्न इ. गोष्टी आता आयुष्यातून वगळल्या आहेत, त्यांना थारा नाही अशा अर्थाने सुप्रियाने ते लिहिलंय असा माझा कयास. छान शेर जमलाय तोच सर्वात! (हे.मा.म.)

रांगोळी आणि खांडोळी आवडले.
मात्रा बरोबर असल्या तरी "याच्या-त्याच्या अपेक्षांनीच अवजड झोळी झाली" इथे लय गडबडते आहे..
शुभेच्छा!

छानच !