उत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी

Submitted by नरेंद्र गोळे on 7 September, 2012 - 09:54

ऑगस्ट क्रांती राजधानी

मी आजवर कुठल्याच राजधानी गाडीने कधीही गेलेलो नव्हतो. विमानात मिळते तशी खानपान सेवा मिळते हे ऐकून होतो. आमच्या प्रवासाकरता जलद आणि स्वस्त उपाय शोधत ऑगस्ट क्रांती राजधानीच्या निवडीप्रत पोहोचलो होतो. मात्र, रेल्वेचे आरक्षण मिळाल्याशिवाय सहल निश्चितच करायची नाही हे पक्के असल्याने, आधी जाण्यायेण्याचे आरक्षण केले आणि ते चांगलेच झाले. वस्तुतः सचिनतर्फे, आरक्षण करून देण्याचे मुळीच पैसे घेणार नव्हते. पण ज्यांनी ते सचिनतर्फे केले त्या अनेकांना प्रतीक्षा यादीवर राहण्याची पाळी आली. काहींनी मग विमानाने जाणे पत्करले. म्हणून आम्हाला आमच्या निर्णयाचा खूप आनंद झाला.

प्रत्यक्ष प्रवास सुरू व्हायचा तर, मुंबई सेंट्रलला जायला हवे. त्याकरता तवेरा गाडी ठरवलेली होती. दोन वाजताच घरून निघालेलो होतो म्हणून बरे, एरव्ही गाडीच चुकली असती. कारण गाडीवानास मुंबई सेंट्रल म्हणजे सी.एस.टी. वाटत असल्याचे नंतर उघडकीस आले. पुढे रस्ता शोधता शोधता गर्दीत अडकतो की काय असेही क्षणभर वाटून गेले. पण अखेरीस मुंबई सेंट्रल स्थानकावर सुखरूप पावते झालो. गाडी फलाटावर उभी दिसली. पण ती होती राजधानी. आमची ऑगस्ट क्रांती राजधानी ही तिच्यानंतर सुमारे तासाभाराने सुटणार होती. राजधानी गाडी देखणीच होती. संपूर्ण वातानुकूलित गाडी प्रस्थान ठेवते त्यापूर्वी काही काळ तिचे वातानुकूलन सुरू करतात. मग प्रवाशांची गाडी पकडायची लगबग, फलाटावरच्या विक्रेत्यांचे आवाज, मोडके पंखे, तुटके नळ ह्या सगळ्यांचे आवाज लोप पावतात आणि एकच नाद फलाटावर घुमू लागतो, तो म्हणजे वातानुकूलनाचा! मग गाडी सुटली आणि ती निघून गेल्यावर हुश्श झाले.

जरा शांत झाले, आणि दिसू लागला फलाटावरील कचरा, सलू लागले रुळांवरील सांडपाणी, खुपू लागला साचलेल्या घाणीचा वास! बाळया गेल्या आणि भोकं राहिली, तसा फलाट ओकाबोका वाटू लागला. मग आमची गाडी आली. इतर गाड्यांतून प्रवास करणार्‍यांत आणि राजधानीने प्रवास करणार्‍यांत एक महत्त्वाचा फरक जाणवला, तो म्हणजे इथे प्रवासी आपापले सामान स्वतःच चाकांनी चालवत आणत होते. हमालाला क्वचितच वाव होता.

आम्हाला काय माहीत? आम्ही नेहमीप्रमाणे गाडीत खायला, प्यायला स्वतःजवळ असावे म्हणून आणलेले खाऊन संपवतो न संपवतो तोच, विमानातल्याप्रमाणे मग गाडीतही सरकारी खाद्यपेयांची रेलचेल सुरू झाली. उगाच खाऊन टाकले स्वतःजवळचे! मग सरकारी पदार्थांतील काय काय सोबत बांधून घेता येईल हा विचार सुरू झाला. हे घेऊ का ते घेऊ असे झाले. ठेवायला सामान पुरे ना. फलाटावर पाणी, चहा मिळवण्याकरता केलेले सव्यापसव्य व्यर्थच गेल्याची जाणीव झाली. कारण इथे मागायच्या आतच पदार्थ पाठोपाठ हजर होत होते. अंधार पडला. म्हणजे बाहेर हं! आत, सदैव एकसारखेच धृवीय वातावरण सज्ज करून ठेवलेले होते.

मग तपासनीस आला. (म्हणजे राजधानीत हे लोक येत असावेत!). हळूहळू परिस्थिती स्पष्ट होत गेली. जवळपास दर पाच-सहा प्रवाशांगणिक एक-एक दोन-दोन प्रवासी अधिक आलेले होते. त्यांचे कुठेच आरक्षण नव्हते. तपासनीस त्यांना काहीच विचारत नव्हता. आरक्षणे असलेल्यांचीच तिकिटे, ओळखपत्रे तपासून तो अंतर्धान पावला. जिसका कोई नही, उसका तो खुदा है यारो! त्यांची स्थिती निश्चित नव्हती तेंव्हा ते अधिकृत प्रवाशांप्रमाणेच आपले सामान यथास्थित पसरून बसलेले होते. ते प्रवासी आता दबक्या आवाजात उभे राहायला, बसायला, झोपायला जागा मागू लागले. ते कुठेही जाणार नव्हते. त्यांना बेकायदेशीर ठरवून कुणी घालवूनही देणार नव्हते. स्वस्तात मस्त प्रवास करायला सरावलेले ते नेहमीचे प्रवासी होते. अधिकृत प्रवाशांनीच मग परिस्थितीशी जुळवून घ्यायचा अपरिहार्य निर्णय (?) घेतला. होता होता, साध्या द्वितीय वर्ग प्रवासी यानांप्रमाणेच नेहमीची शयन-व्यवस्था अंमलात आली.

उशा, चादरी, टॉवेल, पांघरुणे वाटली गेली. खरे तर ती ठेवू कुठे अशीच परिस्थिती होती. सुट्टीचे दिवस असल्याने आरक्षण पूर्ण. प्रवासी सगळे एकतर नेहमीचे, किंवा स्वस्तात मस्त प्रवास करू पाहणारे विमानी प्रवासी. त्यामुळे सामान भरमार. ठेवायला जागा अपुरी, कारण डबा होता थ्री-टायर-ए.सी. त्यात हे सामान. म्हटल्यावर आडवे होण्याखेरीज पर्यायच न उरल्याने लवकरच निजानीज झाली.

सकाळ आरामातच झाली. आन्हिके उरकायला ही ऽ ऽ ऽ गर्दी. कुठे पाणी नाही. कुठल्या संडासातून पाणी वर येऊ लागलेले. रुळांवर घाण सोडून न देणारी नवी व्यवस्था होती इथे. मग डब्याला बसणार्‍या प्रत्येक हिसक्यासरशी ती बाहेर बाहेरच येऊ पाहे. चुकून तिथेच जाऊन किंवा अपरिहार्यतेने तिथेच सांडपाण्याची, घाणीची भर करणारेही, ती आपापल्या परीने करतच होते. लवकरच स्वर्गाचा नर्क होणार अशी मला भीती वाटू लागली. ह्या सगळ्या दुरावस्थेला जबाबदार होती रेल्वेस अनावर झालेली प्रवाशांची गर्दी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक अतिरिक्त प्रवासी विनातिकीट नव्हते. त्यांचे केवळ आरक्षणच नव्हते. पण मग अशी तिरपांगडी व्यवस्था देणारी रेल्वे, ग्राहकास कबूल केलेली सेवा देत नव्हती हे सत्यच अधोरेखित होत होते. आम्ही कुठलीही तक्रार कुणाजवळही केली नाही.

ये दिल्ली है, ये दिल्ली है

यथावकाश दिल्ली गाठली. हजरत निजामुद्दिनला उतरवून घेण्यास सचिनची बस आलेली होती. आम्ही लवकरात लवकर बसमध्ये दाखल झालो. मात्र सावकाश येणार्‍या प्रवाशांतील शेवटचा प्रवासी आल्यावरच बस सुटली. वस्तुतः संध्याकाळी अक्षरधाम पाहायला जायचे असल्याने, हॉटेल दक्षिण दिल्लीतच कुठे तरी असायला हवे होते. पण सचिन ट्रॅव्हल्सने त्यांच्या आर्थिक सोयीकरता ते पहाडगंजमध्ये ठेवलेले. याचे तोटे दोन. पहिला म्हणजे दूर जाण्यास लागणारा वेळ आणि संध्याकाळी पुन्हा दक्षिण दिल्लीतच अक्षरधामला परत येण्याकरता तितकाच वेळ खर्ची जाणार, हा. दुसरा म्हणजे हॉटेलवर लवकर जाऊ. ताजेतवाने होऊ. हा विचार विलंबित खयालच ठरला, हा. असो.

पहाडगंजच्या बकाल वस्तीतील त्या ले-रॉय नावाच्या हॉटेलजवळ बस पोहोचूच शकत नव्हती, म्हणून मग दहा मिनिटांची पदयात्रा. खोल्या तरी चटकन द्याव्यात. पण छे! तीन तीन महिने आधी, नाव-पत्त्या-निशी आरक्षण करणार्‍यांच्या, नावपत्त्यांची लिखापढी पुन्हा करायला लागली. त्यात आपापली ओळख पटविणेही आलेच. हॉटेलचा खाक्या असा की, ते ओळखपत्रे काढून घेऊन स्वतःजवळ ठेवून घेत होते. नंतर म्हणे झेरॉक्स काढून घेऊन तुम्हाला परत करू. मला हे आश्वासन काही विश्वासार्ह वाटेना. विशेषतः तिथल्या व्यवस्थापनाचा सावळा गोंधळ पाहून! सुदैवाने मी प्रत्येकाच्या ओळखपत्राची झेरॉक्सही घेऊन फिरत होतो. मी त्यांना ताबडतोब त्या देऊ लागलो. तर कळले की ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड चालत नाही. अजबच म्हणायचे! असो. आम्हाला ही शंकाही होतीच. आमच्याजवळ प्रत्येकाचे पर्यायी ओळखपत्र, त्याची झेरॉक्स इत्यादी तयारच होत्या. आमची नोंदणी लवकर झाली. पण काय उपयोग? सगळ्यांची नोंद होईस्तोवर खोल्यांची वाटणी करेनात. खूप वेळ गेला. भरपूर मनस्ताप झाला. नंतर सगळ्यांना खोल्या दिल्या. आम्हाला म्हणाले, तुमच्या खोलीतील पाहुणे आताच निघाले आहेत, तेव्हा थोडे थांबा. थांबलो बापडे थोडा वेळ. दहा मिनिटे.... पंधरा मिनिटे... मग माझी सहनशीलता अंतास पोहोचली. मी दुसरी खोली द्यावी अशी मागणी केली. त्यांनीही लगबगीने दुसरी किल्ली दिली. वेटर सामान घेऊन चालूही लागला. वर पोहोचलो तर खोली उघडेना. मग संताप. आरडाओरडा. यथासांग सगळे झाल्यावर खोली मिळाली बुवा एकदाची!

उन्हाळ्यात मे महिन्यातील रविवारची संध्याकाळ. चहापाणी करून बसमध्ये बसून आम्ही अक्षरधामला निघालो. पुन्हा सकाळ-इतकाच वेळ गमावून तिथे पोहोचलो. वस्तुतः दक्षिण दिल्लीत हजरत निजामुद्दिन स्टेशनहून अक्षरधामला जायचे, तर फक्त यमुना नदीच काय ती ओलांडावी लागते. दक्षिण दिल्लीत हॉटेल असते तर तासाभरात आवरून आम्ही दुपारी दोन पर्यंतच अक्षरधामला पोहोचू शकलो असतो. गर्दीही मग कमीच राहिली असती. पण नियोजनातील घोडचुकीमुळे सचिनने आम्हाला इथे आणून उभे केलेले होते आणि इथे तर काय, प्रचंड मोठी रांग आमची प्रतीक्षाच करत होती. दोन तास रांगेत उभे राहून मेटाकुटीस आल्यावर प्रवेश मिळाला. संध्याकाळी सातचा सुमार होता.

अंधार पडायच्या आत मग दर्शन पदरात पाडून घ्यायची आमची धडपड सुरू झाली कारण लवकरच प्रकाश-संगीतावर थिरकणारी कारंजी असलेला खेळ सुरू होणार होता. भारतात काय पाहू नये, ते सर्व पाहत पाहतच आम्ही मुंबईहून इथवर आलेलो होतो. त्यात जवळजवळ संपूर्ण चोवीस तास आम्ही खर्चलेले होते. त्यापेक्षा मुंबईच बरी ह्या निष्कर्षाप्रत आम्ही आधीच पोहोचलेलो होतो. आता भारतात काय आवर्जून पाहावे, ते आमच्या समोरच उभे होते आणि केवळ पंधरा मिनिटांत आम्हाला ते घाईघाईने पाहायचे होते. सहलीचे नियोजन कसे असू नये ह्याचा हा आदर्श वस्तुपाठ होता. असो.

अक्षरधाम मंदिर

अक्षरधाम मंदिर खरोखरीच अप्रतिम आहे. मी यापूर्वीही एकदा इथे संपूर्ण दिवस घालवून उत्तम दर्शन घेतलेले होते. बायको-मुलास हे भारतीय वैभव दाखवावे म्हणून तर मी त्यांना इथे घेऊन आलो होतो. मात्र वेळ अपुरा मिळाला होता, हे दुर्दैव खरेच. खैर! त्यामुळे काही अक्षरधामाचा अक्षर महिमा कमी होत नाही. तो वाचायचा तर http://nvgole.blogspot.in/2008/11/blog-post_15.html#links हे अवश्य वाचा. आता, तरीही उपलब्ध वेळात त्या वैभवाचे दर्शन स्वकीयांना करवण्यात मी कसलीही कसर ठेवली नाही, की दाखवत असता वर्णन करतांना माझे तोंडही थकले नाही. अप्रत्याहत, सुंदर शिल्पकारीचे ते मनोहारी कर्तब पाहून मन प्रसन्न होऊ पाहत होते. आता मागल्या वेळेस मी जे पाहू शकलो नव्हतो, ते पाहण्याचा योग मलाही नव्यानेच मिळत होता. संध्याकाळच्या छाया-प्रकाश-संगीत-कारंजाचा खेळ. मग आम्ही सर्व त्या कारंजाभोवती जमा झालो. जागा पकडून बसलो. सगळे वालुकाश्माचे दगडी बांधकाम. उन्हाळ्यातली तप्त संध्याकाळ. दगड तापलेले. मन निराशाजनक अनुभवांनी त्रस्त झालेले. पण मग ज्या क्षणाची आम्ही सर्वच आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, तो आला.

खेळ सुरू झाला. स्वामीनारायणांचे चरीत्र उजागर करणारी कथा, सुमधूर संगीत, उत्तुंग उचंबळून हवेत दिमाखदार गिरक्या घेणारी शेकडो कारंजी, वाढत्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर कारंजांच्या पाण्यावर रंगांची मुक्त उधळण सुरू झाली आणि मग आम्ही सर्वजण आतापर्यंतचे सर्व क्लेश विसरून त्या अपूर्व सोहळ्यात मनःपूर्वक सामील झालो. सोहळा उत्तरोत्तर रंगतच गेला. यमुना नदीचे पात्र जवळच आहे. जसजसा अंधार पडत होता, तसतसे पात्रावरून गार वारेही वाहू लागले. अनुभव उत्तरोत्तर उत्कट आणि सुखदच होत गेला. पंधरा मिनिटे हा, हा, म्हणता निघून गेली. सोहळा संपला सुद्धा. पण मनावर त्याने सोडलेली छाप आमच्या सहलीतील एक अविस्मरणीय अनुभव ठरला!

मनोर-हाऊस, नैनीताल

दुसर्‍या दिवशी, मे महिन्याच्या उन्हाळ्यात दिल्ली ते नैनीताल सुमारे ३०० किलोमीटरचे अंतर पार करून संध्याकाळी नैनीतालला पोहोचण्याचा दिवस होता. बस वातानुकूलित होती. म्हणून आम्ही फारसा त्रास न होता सुखरूप पोहोचलो.

१४ मे च्या संध्याकाळी आम्ही नैनितालमध्ये दाखल झालो. सचिन ट्रॅव्हल्सने आमच्याकरता योजलेले हॉटेल होते “मनोर-हाऊस” (अ-हेरिटेज-प्रॉपर्टी). जुन्या कौलारू खानदानी इमारतीनुरूप दिसणार्‍या त्या वास्तूचे दर्शनीय रूप मन प्रसन्न करणारेच होते. रंगीबेरंगी फुलांच्या वेष्टणात सजलेली ती इमारत सुरेख दिसत होती. आतही, अपरूप वाटेल अशी बैठकीची साधने (फर्नीचर), लाकडी स्पर्शाची, ऊब देणारी पायतळीची जमीन, कपाटाचीच दारे वाटावी अशी खोल्यांची दारे, भव्य स्नानगृहे आणि जुन्या धरतीच्या संरंजामांनी परिपूर्ण अशा लाल रुजाम्यांनी मढवलेला जिना व सुव्यवस्थित सांभाळ केलेली, काळजीपूर्वक निगा राखलेली अंगणातील बाग. प्रथम दर्शनी आवडली म्हणता येईल अशी ती निवासाची व्यवस्था होती. इथल्या हॉटेलच्या अनुभवाने, दिल्लीचा विदारक अनुभव जणू पुसूनच टाकला.

संदर्भः

१. २००८ मध्ये मी केलेले अक्षरधामचे वर्णनः अक्षरधामचा महिमा
http://nvgole.blogspot.in/2008/11/blog-post_15.html#links
२. अक्षरधामची विस्तॄत माहिती या संस्थळांवर सहज उपलब्ध आहे.
http://www.akshardham.com/
.
http://nvgole.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षरधामचे फोटो सुंदरच असतात.

दिल्लीत आणि पहाड्गंज मधल्या हॉटेल्सचा मनस्ताप वाढलाच आहे म्हणायचा, आणि ऑगस्ट क्रांतीचे पण बारा वाजवले कि !

गोळे काका....

खुपच मनस्ताप झाला म्हणायचा!!!! त्या मानाने आम्ही पहाटेचं चीप फ्लाइट घेवुन गेलो. तिकिट साधारण ३५००/- माणशी. आणि ट्युलिप ने पहिल्या दिवशी दिल्ली मुक्कामाची भानगड ठेवली न्हवती. त्यांनी सरळ एका हॉटेलात सगळ्या ग्रुप ला फ्रेश व्हायला नेलं, जे दिल्ली स्टेशन च्या अगदी जवळ होतं. आणि गाडी सरळ कॉर्बेट कडे नेली. पहिला मुक्काम कॉर्बेट. अप्रतिम रीसॉर्ट होतं. प्रत्येकाला कॉटेजेस होती. छोटे छोटे बंगले. तिकडे दोन रात्री राहुन मग आम्ही नैनीताल ला गेलो. त्या मुळे एकदम नैनीताल चा प्रवास झाला नाही. ताण कमी पडला.

एकदाही सकाळी लौकर उठवलं नाही. एकदम आरामात प्रवास. ज्यांना हरिद्वार वगैरे जायचं होत ते लोक त्या दिशेने गेले. आम्ही हरिद्वार ला अनेकदा गेलो असल्याने ( नवर्‍याचं घराण निजाम शाहीत वतन मिळालेलं आहे. आमचे हरिद्वार ला पर्सनल घाट आहेत. ब्रीटीश काळात त्या घाटाचं उत्पन्न आम्हाला येत असे. एक अशीच आठवण रच्यकने...) ह्या प्लेझर ट्रीप मधुन ते वगलले.

बहुतेकदा ट्युलिप वाले फ्लाईटचं बल्क बुकिंग करतात त्या मुळे खुप कमी तिकिट पडतं ( ३ ट्रीप चा अनुभव). सचिन चा आमचा अनुभव खुप भयानक आहे त्या मुळे तिकडे फिरकतच नाही. केसरी वाले खुप पैसे काढु झाले आहेत ( १९९९ पासुन २००९ पर्यंत आम्ही आणि सासु सासरे ह्यांनी मिळुन व स्वतंत्र अशा ८ ट्रीप केल्या त्यांच्या आधाराने केलेले विधान)

रच्याकने.... ट्युलिप ही एक्स- केसरी वाल्या सीनीयर लोकांनी काढलेली कंपनी आहे. त्यांच्या कडे केसरीत / राजा मधे १५-२० वर्ष (म्हणजे स्क्रॅच पासुन) कामाचा अनुभव आहे.

वस्तुतः संध्याकाळी अक्षरधाम पाहायला जायचे असल्याने, हॉटेल दक्षिण दिल्लीतच कुठे तरी असायला हवे होते. पण सचिन ट्रॅव्हल्सने त्यांच्या आर्थिक सोयीकरता ते पहाडगंजमध्ये ठेवलेले. याचे तोटे दोन. पहिला म्हणजे दूर जाण्यास लागणारा वेळ आणि संध्याकाळी पुन्हा दक्षिण दिल्लीतच अक्षरधामला परत येण्याकरता तितकाच वेळ खर्ची जाणार, हा. >>>

नरेंद्र गोळेजी, अक्षरधाम हे दक्षिण दिल्लीमध्ये येत नसुन पूर्व दिल्लीमध्ये येते - नॉयडाच्या रस्त्यावर जाताना यमुनेवरचा ब्रिज क्रॉस केला की लगेचच अक्षरधाम येते. तसेच ह्जरत निजामुद्दिन पासुन कनॉट प्लेस, प्रगती मैदान वगैरे उच्च्भ्रु भागात ३/४/५ तारांकीत हॉटेल्स आहेत. त्यामानाने पहाडगंज, करोल बाग वगैरे भागात थोडी स्वस्त हॉटेल्स आहेत. तसेच ह्जरत निजामुद्दिन ते करोल बाग व करोल बाग ते अक्षरधाम ही दोन्ही अंतरे साधारणतः ५/६ कि.मी. आहेत. हे कारण असावे. - माझे राजधानीमध्ये बर्‍याचदा जाणे होते म्हणून लिहिले आहे. आपला अनुभव कदाचित वेगळा असू शकेल. Happy

सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

@ दिनेशदा
ऑगस्ट क्रांतीचे पण बारा वाजवले कि !>>> अगदी खरंय.

@ मोहन कि मीरा
सचिन चा आमचा अनुभव खुप भयानक आहे त्या मुळे तिकडे फिरकतच नाही. >>> कळला तर आवडेल.

@ अतुलनीय
अक्षरधाम हे दक्षिण दिल्लीमध्ये येत नसुन पूर्व दिल्लीमध्ये येते >>>
खरे तर ते दिल्लीच्या आग्नेयेला आहे. म्हणून तुम्ही म्हणता आहात ते खरेच आहे.

थोडी स्वस्त हॉटेल्स आहेत. >>>
त्याचा लाभ सचिनला, आणि अंतर व त्यामुळे व गर्दीच्या भागात शिरावे लागल्याने होणार्‍या ट्रॅफिक जाममुळे सहलीचा अवधी घटण्याचे नुकसान प्रवाशांना! असा हा मामला आहे खरे तर.

सचिन चा आमचा अनुभव खुप भयानक आहे त्या मुळे तिकडे फिरकतच नाही. >>> कळला तर आवडेल.>>>

मागे माझे साबा आणि साबु दोघे सचिन बरोबर सिमला कुलु मनालीला गेले होते. तिकडे सगळी हॉटेल्स अगदी बेक्कार होती. तसेच दोन बस भरुन माणसे होती. म्हणजे साधारण १००. त्यांन्ना मिळुन दोन टुर मॅनेजर होते. अनेक हॉटेल्स मधे पाणी आणि गरम पाण्याची बोंब होती. साबांना जरा धाप लागते. म्हणुन शक्यतो लिफ्ट असलेले हॉटेल किंवा निदान पहिल्या मजल्यावरची रुम देण्याची विनंती बुकिंग करताना आणि दिल्ली ला पहिल्यांदाच भेटल्यावर केली होती. पण एकदाही त्याची पुर्तता झाली नाही. शेवटच्या मुक्कामात साबांनी अगदीच असहकार पुकारल्यावर मग खुप हुज्जत घालुन त्यांना पहिल्या मजल्या वरची रुम दिली. रुम नव्हत्या असं नाही, पण नीट अ‍ॅलॉट न केल्या कारणाने खुप बाचाबाची झाली. सह प्रवाश्यांशी ही बाचाबाचीचा प्रसंग आला. अशा वेळी खरं तर टुर लिडर ने सांभाळुन घ्यायला पाहिजे, पण झालं उलटच... तसच जेवणाचं... खुप लोकं असल्याने जिथे तिथे लांबच लांब रांगा. जेवायला, टॉयलेट ला, त्यातही ज्यांचे अंतर्गत ग्रुप आहेत त्यांची ग्रुप बाजी!!!! खुप मनस्ताप झाला. परत विमानाने जाणारी दोन तीनच कुटुंबं होती. सगळं प्लॅनींग त्या मुळे रेल्वे वर आधारीत केलं होतं. त्या नुसार परतीला त्यांनी दिल्ली रेल्वे स्थानका पर्यंत गाडीच्या वेळेला नेउन सगळ्यांना एकदाचे आपटले. पुढ्चं तुमचं तुम्ही पहा... त्या नुसार दिल्ली एअर पोर्ट साठी टॅक्सी करुन हे बीचारे दुपारी १ वाजताच तिकडे येवुन बसले. विमान संध्याकाळी ६.३० चं ... एकंदर मजा येण्या पेक्षा खुप त्रास झाला.

त्यांचा असाच अनुभव आमच्या स्नेह्यांना आला होता. त्यांच्या वेळी लँड स्लाइड झाली होती. त्या मुळे ते लोक रस्त्यावर २४ तास अडकले होते. सगळ्या प्रवाश्यांना सोडुन टुर लीडर पुढे निघुन गेला एका बाइक वाल्या बरोबर. सगळे प्रवासी अडकलेले. करणार काय. त्या टुर लिडर चा मोबाइल बंद!!! मग जेंव्हा २४-२५ तासां नंतर ते मुक्कामी पोहोचले तेंव्हा सगळे इतके चिडले होते की त्या टुर लिडर वर आफतच आली. सगळी व्यवस्था करायला पुढे आलो अशी गुळमुळीत कारणे द्यायला लागला. त्याला मार पडता पडता वाचला. सचिन च्या ऑफिस मधे तक्रार करुन वेगळा टुर लिडर द्या नाहीतर असहकार करतो. अशी धमकी द्यावी लागली. पण त्या लोकांनी काही दखल घेतली नाही. पुढची सगळी टुर प्रवाशातल्या जाणत्यांनीच नीभावुन नेली.

आपण पैसे टाकतो, पण त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही. कधी कधी त्यांचा ही नाइलाज असतो, काही दुर्गम ठीकाणी खरच सोइ नसतात. तेंव्हा समजुन येते. पण जिथे व्यवस्थीत सोइ आहेत पण तुमची ओरबाडायची व्रुत्ती कमी नाही, अशा ठीकाणी मात्र चीड येते. दोन तीन बस.. १०० + माणसे... मग सगळ्या सुविधांवर ताण!!!

त्या नंतर कानाला खडा लावला. आपण बिग २ कडे जायचच नाही... सरळ आपल्या अटीत बसेल असे लोक शोधले. आता समाधानी आहोत. साबा, साबु आणि माझी आई जे ६०+ आहेत ते ट्युलिप पसंद करतात... छोटा ग्रुप असतो. कमी ताण, त्या मुळे कमी दगदग... आम्हाला (मी, नवरा, मुलगी) स्वतः अ‍ॅरेंज करुन जायला आवडते. त्या मुळे तसे करतो किंवा काही काही ठीकाणी ग्रुप हवासा वाटला की त्यांच्या बरोबर जातो.

तुमचा अनुभव वाचतेच आहे....