वर्तुळ..गती..परीघ .. एक कथा

Submitted by शब्दमेघ on 25 February, 2008 - 23:59

आज्जी ऽऽ मीनल आत येतच गोड सुरात बोलली. आज्जी आई नाही का आली अजून कामावरून ? पण मी म्हणते काय गरज आहे ओव्हरटाइम करण्याची जेवढे आहे त्यात सुखी आहोत न आपण.

अग पोरी बरोबर आहे गं तुझे किती काम करत असते अनुराधा दिवस रात्र फक्त काम काम आणि काम दुसरे काही नसतेच.
आजी बघ ना आजच आमच्या कॉलेजला मराठीच्या पेंडसे सरांनी एक कथा सांगितली संदर्भ आजचे आयुष्य आणि गती. पण नंतर लादलेली गती वगैरे सांगायला सुरुवात केली, ते इतके छान सांगतात म्हणून सांगू तुला, पण माझ्या मनात वेगळेच विचारांचे काहूर उठले होते अन त्यामध्ये माझे मन कधी हरवून गेले कळलेच नाही मला.

मीनू काय असे विचारांचे वादळ उठाव तुझ्या मनात काही कळत नाही बघ, विचार माणसास हरवून टाकतो असे मला पण वाटते आता.

अग आजी तसे नाही गं पण आई खूप काम करते गं आणि सकाळ पासून रोज तेच तेच, कंटाळत असेल कदाचित पण आपल्या मुळे सगळे सहन करते असे वाटते. मीनू तसे नाही गं, तू लहान आहे नाही कळणार तुला काही ..

काय गं आजी मी आता मोठी आहे काय नाही कळणार ? बरं जाऊदे सर म्हणत होते ,

" गती, ऐकायला जरी छान वाटत असेल तरी ती जर लादलेली असेल तर गतीची चक्रे उलटी फिरतात." आणि रोजच्याच वर्तुळात, त्याच परिघात वाहवून घेतल्याने आधार घ्यावा लागतो कदाचित आपलाच आपण."

मीने कार्टे काय बोलतेस तू ते तुला तरी कळते आहे का गं ? मी आपली अडाणी, आणि असले काय सांगत आहे वर्तुळ गती परिघ मस्करी तर करत नाही ना काही.

अग आजी आपण ज्या वसुंधरे वर राहतो ना तिलाच बघ तिलाही गती आहे पण लादलेली म्हणूनच कदाचित आसाभोवती वाकलेली.

माझी आई श्रीमती अनुराधा पाणसे अशीच आयुष्याच्या चक्रात गतिमान झालेलं व्यक्तिमत्व बाबा गेल्यापासून तर उसंतच नाही काही तीच्या आयुष्यात. बरं चहा झालाय का गं मस्त पैकी ?
ताई साहेब चहा तयार आहे आणि गुड-डे तुमची वाट पाहत आहे संध्याकाळी ही --आजी उत्तरली

टिंग टॉंग, दारावरची बेल वाजली

अनुराधा असावी बहुतेक , दरवाजा उघडून आजीने अनुराधाच्या हातातील बॅग घेतली. काय मीनू कशी चालली आहे तयारी नाटकाची ? अनुराधा ने आत येतच विचारले.
नाटक ! आई तुला गं कसे कळले कोणी सांगितले तुला प्रियंका भेटली होती का ? पण मी सांगणार नव्हतेच मुळी आता, शी बाबा सगळी मजा गेली. अग त्यात काय एवढे तुझे सर भेटले होते तुझे कौतुक करतातच कायम अभ्यासा बाबत, आज प्रॅक्टिस बद्दल बोलत होते.
आता कळले आहे तर माझी वेशभुषाकार मम्मी ....
हा हा राहूदे मीनू कळले नवीन ड्रेस हवा आहे ना देते बाई बाकी नाटक कुठे आहे.

बाल गंधर्व .. मीनल चहा-बिस्किट संपवून आपल्या रूम मध्ये अगदी मजेत गेली.
अनु अग किती उशीर गं आज, घे चहा, आई अहो तुमचा आधार एवढा आहे की कसला त्रास जाणवतच नाही, तुम्हाला पाहिले की सारा ताण कुठल्या कुठे पळून जातो आणि उरतो तो तजेला.
तू बाई अशी आहे ना बोलण्यात कधी आवरली आहेस का कोणाला. पण काय गं अनु तू आधी खूप लिखाण करायचीस कविता करायची आता काही करत नाहीस का ? कसले आई ह्या गडबडीत विसरले आहे सगळे. हो पण अभंग केले आहेत काही , एक सांगू का ?
अग सांग ना पटकन विचारतेस काय ?

आई तुझाच आधार
या जीवनात बहार
तूच हक्काचे माहेर
माझ्यासाठी !!

अनुराधेला जवळ घेत एक ओला शुभ्र थेंब हळूच डोळ्यातून ओघळला अनुराधेच्या डोक्यावर, जणू अभिषेक होता तो वात्सल्याचा.
चला आई काय बोलत राहिलो आहोत आपण स्वयंपाक करायचा आहे मला अजून, आज मस्त पैकी भरली वांगी करते झणझणीत.

---

आज मीनूचे नाटक आहे, ऑफिस मधील सगळे काम पटकन आवरून साहेबांची परवानगी घेऊन मी लवकरच निघाली. बालगंधर्व ऽऽ रिक्षावाल्याला म्हणत मी रिक्शात बसली. बाल गंधर्व नाट्यगृह म्हणजे माझ्या मनातील एक हळवा कोपरा, आज त्याला नवीन रंग मिळणार होता एवढेच माझ्या लाडक्या लेकीचे पहिले नाटक याच नाट्यगृहात आहे म्हटल्यावर किती आनंद झाला आहे मला आज.

नाटकाचे दोन्ही अंक संपल्यावर प्रेक्षकांची विशेषता कॉलेजच्या मुला-मुलींची ही तोबा गर्दी होती त्यातून मार्ग काढत मी पुढे जात होती, इतक्यात मीनल चे लक्ष गेले आणि तिने जोराने हाक मारली आई ऽऽ कसे झाले नाटक ? आनंदाच्या भरात काहीच बोलली नाही मी . आई थांब हा मी एक ओळख करून देते तुला आणि मग आपण बाहेर जेवायला जातो आहे, आजी ला फोन करून सांगितले आहे मी, म्हणत मीनल आतल्या रूम कडे गेली.

अनुराधा जी आपली मुलगी खूप पुढे जाणार आहे हा.. अनुराधाचे सर बोलले, खूप धन्य वाटले मला, एकदम वडिलांच्या वळणावर गेली आहे त्यांना नाटक आवडायचे आणि मला कविता. याच नाट्यगृहात आमची पहिली भेट झाली होती. इतिहासाच्या पानांच्या फडफडीत मीनल कधी जवळ आली कळलीच नाही. आई हा श्री माझा मित्र आणि ही माझी स्वीट ममा.

श्री आपण समोरच्याच गंधर्व हॉटेल मध्ये जाऊ या, मस्त पैकी. श्री ने हसून संमती दिली आणि आम्ही हॉटेल मध्ये गेलो.
गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलेच नाही, इतक्यात मीनलची कुजबूज सुरू झाली. काय गं काय झाले मी विचारले.
आई.. आई.. श्री बोलला माझे आणि मीनल चे प्रेम आहे एकमेकांवर तुमची काही हरकत नसेल तर ..

अरे माझी कसली हरकत, पण जरा घरी वडिलधाऱ्या माणसांशी बोलते आणि मग बोलू. तुझ्या घरी तयार आहेत का सगळे ? मी एकदम असे का विचारले कळले नाही, कदाचित श्री चांगला वाटला मला.
हो मी कधीच सांगितले आहे घरी त्यांना मीनू खूप आवडते. मीनू कडे एक हसत कटाक्ष टाकत अनुराधाने पुढे आलेले बिल दिले, आई हे काय मी देतो आहे बिल श्री बोलला. अरे राहूदे रे तुम्ही लहान आहात अजून.

मीनू छान आहे हो श्री मला आवडला, घरचा बिझनेस पण आहे चांगला म्हणजे काळजी नाही. फक्त आईंना विचारते म्हणजे झाले, बाकी काही नाही गं तुझ्या खुशीत आमची खुशी. आणि मुलगा ही किती गोड आहे. लाजता नाही येत तरी या वेळेस मीनल लाजली.

---

मीनल चे लग्न होऊन १ वर्ष झाले.. जरा घाईतच झाले ना आई लग्न ? अनुराधा आईंना बोलली.
हो ना किती घाई केली श्री कडील मंडळींनी, तशी आपली मीनू आहेच गुणी. घर पण किती सोन्या सारखे मिळाले आहे, पण अनु काही करमत नाही गं ती गेल्या पासून..... काय म्हणत होती ग ती त्या दिवशी... म्हणे वर्तुळाला उलटी गती मिळाली तर.... तिनं मात्र आता स्वत:चं वर्तुळ बनवलंय आणि आपण राहिलो आपल्याच परिघात... आपला आपल्यालाच आधार देत!

हो ना आई अगदी बेचैन वाटते आहे हो. ती असताना कसे आपण एकदम तिच्या भोवती फिरत असू. आता एकदम सुनं सुनं वाटत आहे .

मी माझी एक कविता वाचून दाखवते हा.
कवितेचे नाव आहे .. " मी.. तू अन तुझी आजी "

मी.. तू अन तुझी आजी
छोटंसं आपलं ते जग..
सासरी तू गेल्या पासून
बेचैन झाले आहे हे घरटं ..

तुझी ती रूम, तुझी पुस्तके ,
तुझा कॉम्प सार तसंच
अगदी शांत ...
पण आता तुझी कशात लुडबुड नाही
की किलबिलाट तेथे
अगदी निरस वाटते आहे गं पोरी

आठवते मला आता ते
तुझा पसारा पाहून माझे ओरडणे
जास्त काम पडायचे मला
आजीने जवळ घेतले प्रेमाने तुला
तरी रागारागातच सारे आवरणे

रोज सकाळची तुझी ती गडबड
कायम काही तरी विसरणार .. मग
उडालेली ती धांदल, विसरेल कशी मी
हा.. तुझ्या त्या गोंधळात
विसरायची मी नाश्ता करताना
त्यात मीट टाकायचे
अन मग तुलाच कारण धरून ओरडायचे

आता रोज नाश्ता करताना काही मिस नाही होत
तरी पण बरेच काही मिस वाटते आहे

तुझे ते मैत्रिणी बरोबर
घरात धुडगूस घालणे
कार्ट्यांनो SS म्हणत माझं
नेहमीच तुम्हाला रागावणे
पण नाही गं .. आता मला सार परत हवं आहे
पण ..
पण आता ते शक्य नाहीये

रात्री जेवताना .. तुझे लक्ष नसायचे जेवताना
सारखे आपले ते पी. जे. आणि काही नसेल तर
माझ्या वरती हळूच काही कमेंट्स
अन माझे आपले मग पुन्हा ओरडणे
लाडावून ठेवून बिघडवली आहे लेकीला
म्हणत तुझ्या आजीला ही बजावणे..

पण आता सार बदललं आहे. .
कारण लग्न करून तू सासरी गेली आहेस ...
कारण लग्न करून तू सासरी गेली आहेस ...

शांतता ....

-------------------------------- गणेशा

गुलमोहर: 

सुंदर आहे कथा. कथेतील कविताही अर्थपुर्ण. छान.

एक नंबर गणेशराव आवडली कथा छान शब्दरचना

खुप मस्त जमली आहे कथा.

"कधी कधी इतर ताण विसरायला कामाची फार मदत होते. कामाचा त्रास वाटायच्या ऐवजी आधार वाटतो अश्या वेळी.." हा विचार खूप छान मांडला आहे.