पहाट

Submitted by आनंदयात्री on 5 September, 2012 - 07:59

उजाडताना दिसू लागली उजाड फसवी वाट
हूल देऊनी दूर उगवली मोहक धुंद पहाट

घटिका साऱ्या बोलत होत्या अंधाराची भाषा
मनात जागी तरी उद्याच्या उजाडण्य़ाची आशा
खरीच होतील स्वप्ने ऐसी समीप आली वेळ
त्या वेळेची वाट पहाती तळहातीच्या रेषा
परंतु बहुधा ठाऊक तिजला माझे भग्न ललाट
हूल देऊनी दूर उगवली मोहक धुंद पहाट

प्रवास थोडा तरिही होती सहवासाची आस
कुणी सावली बनून होता एक सभोती भास
वाट विलगण्य़ापूर्वीच गेला अलगद सुटुनी हात
मागे उरली आठवणींची ठसठसणारी रात
राहिलाच दूर किनारा, मी तहानलेली लाट
हूल देऊनी दूर उगवली मोहक धुंद पहाट

नव्या प्रवासा निघण्यापूर्वी सहज वळवली मान
मनात दाटून आले सारे, क्षणात आले भान
पहाटवेळा अनेक येतील, प्रवास आहे ध्येय
नवीन किरणे घेऊन आली प्रगल्भतेचे दान
समोर होती खुणावणारी नवीन कोरी वाट
पुढे स्वागता निघून गेली मोहक धुंद पहाट

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/08/blog-post_9121.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय छान कविता.

प्रवास थोडा तरिही होती सहवासाची आस
कुणी सावली बनून होता एक सभोती भास
वाट विलगण्य़ापूर्वीच गेला अलगद सुटुनी हात
मागे उरली आठवणींची ठसठसणारी रात.----------------> व्वा, सुरेख.

नचिकेत,
प्रवास थोडा तरिही होती सहवासाची आस>> हे कडवं अतिप्रचंड सुंदर झालंय..

शेवटाचा स्वतःला सावरून पुढील प्रवासाचे मार्गक्रमणाचा निर्णय दाखवून जाते.
अगदी शेवटची ओळ मला अस्थायी असल्यासारखी जाणवतेय, अर्थात माझा रग्र आकलनक्षमता दोष..

आवडलीच!!

क्या बात है.......

पहाटवेळा अनेक येतील, प्रवास आहे ध्येय
नवीन किरणे घेऊन आली प्रगल्भतेचे दान >> विशेष आवडले...

मस्तच Happy

व्वा!!

पहाटवेळा अनेक येतील, प्रवास आहे ध्येय
नवीन किरणे घेऊन आली प्रगल्भतेचे दान>>>>

सारीच कविता सुंदर Happy

वाह.............. फारच सुंदर नचिकेत.......... Happy
<<राहिलाच दूर किनारा, मी तहानलेली लाट
हूल देऊनी दूर उगवली मोहक धुंद पहाट >>
अप्रतिम..............