विषय २: भारतीय सिनेमातील बदलती स्त्री-प्रतिमा

Submitted by अश्विनीमामी on 18 August, 2012 - 03:24

भारतीय चित्रपटसॄष्टी अस्तित्वात येऊन शंभर वर्षे झाली.... खरे वाटत नाही. जसे आपल्यालाही अस्तित्वात येऊन आता पन्नास वर्षे व्हायला आली, हे तरी कुठे खरे वाटते? दूरदर्शन काळ्या-पांढर्‍याचे रंगीत, त्रिमित झाले, आपले केस काळ्याचे पांढरे, द्विमित होत चालले. डेस्कटॉपचे लॅपटॉप, टॅब अन हातात मावणारे बारके पॉवरफुल स्मार्ट फोन झाले. आणि आपला साइज? ..... जाऊ द्या झालं! अलका, लिनाचिमं, प्रभात मध्ये कधीमधी चित्रपट बघणारे आपण; आता दर शनिवारी मल्टिप्लेक्सात मूव्ही टाकतो. कागदी कपात पोहता येईल एवढे मोठे पेप्सी मुलांना घेऊन देतो आणि शिळ्या पॉपकॉर्न साठी शंभर रुपये मोजतो. बदलंलय सारं....

अजूनही तिकीट काढून सिनेमाला जाताना मन लहानपणी देवबाप्पा, दुश्मन, हाथी मेरे साथी, मॅकेनाज गोल्ड, जंजीर बघायला जाताना उत्सुकतेने उड्या मारणार्‍या मुलीसारखेच होते. घरी दूरदर्शन संच नसल्याने कधीतरीच बघायला मिळणार्‍या मोठ्या रुपेरी पडद्याचे फार अप्रूप वाटत असे. चित्रपटगृहातील आश्वासक काळा अंधार, ते बघावेच लागणारे एकसुरी आवाजातले बातमी पत्र, मोठ्या पडद्यावरील रंगीत तेला-साबणाच्या जाहिराती... ते गार गार वारे, आतल्या बंदिस्त वतानुकुलित वातावरणाला येणारा एक प्रकारचा सुखवस्तू, ग्लॅमरस, सिगरेट्च्या धुराची पार्श्वभूमी असलेला वास...... सिनेमाला जायचं म्हणजे एक अगदी जपून ठेवायचा, पुन्हा पुन्हा मनात आणून आनंद घ्यायचा अनुभव असे.

पुणेरी, मध्यमवर्गीय संस्कृतीत मोठ्या होणार्‍या माझ्यासाठी सिनेमा हे एक आजूबाजूच्या परिस्थितीतून बाजुला होऊन एका काल्पनिक विश्वात विहरायचे माध्यम होते. जसे ते आजही आहे. तिकीट देऊन तो अंधार दोन- अडीच तासांसाठी विकत घेतला, कि आपण मन मोकळे करून कधी रंग दे बसंती मधली सोहा, नाहीतर मातीच्या चुली मधली सासू व्हायचे, कधी बसंती बनून टांगा हाकायचा तर कधी मिस रोझी बनून पिया तोसे नैना लागे रे वर उत्तम नृत्य करायचे. कधी हम किसीसे कम नहीं मधली काजोल किरण बनून ये लडका हाये अल्ला गायचे तर कधी अमर अकबर अँथनी मधील परवीन सारखे सँड्रा फ्रॉम बँड्रा बनून सूर्यास्ताच्या वेळी समुद्रात विहरायचे.

बर्‍यापैकी, पटेल अशी, गोष्ट, गुंगवून टाकणारे सादरीकरण, आवडीचे संगीत, उत्तम अदाकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कथानकात स्वतःला हरवून टाकण्याची संधी. इतके मिळाले कि सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकाचे पैसे वसूल होतात अन खूष होऊन हे ओझ्याचे बैल परत कामाला लागतात. बुद्धीवादी मनोभुमिकेतून बघायचे महोत्सवी सिनेमे एका जागतिक पातळीवर घेऊन जातात खरे पण जे आतलं अस्सल भारतीयत्व अजून झाकता, मारता येत नाही; ते कधी तरी उसळ्या मारून वर येतंच आणि मग पॉप कॉर्न खात हा प्रेक्षकवर्ग 'चलाओ ना नैनोंके बाण रे' वर ठेका धरू लागतो. जॉनी लिव्हरच्या विनोदांना, अजूनही, हसतो आणि शोलेतल्या गब्बर सिंगच्या एंट्रीच्या आठवणी काढतो. जगणं, मरणं, प्रेम करणं , भावना व्यक्त करणं सगळ्यालाच आपल्या भारतात सैनेमिक संदर्भ असतात. सहज लक्षात येतील असे नसले तर एका आंतरिक पातळीवर नक्की.

हे मजेचं गारूड, हे आभासमय, जादूभरं जग आपल्यासाठी खुलं करून देण्याबद्दल, दादासाहेब फाळके व इतर लेखक, कलाकार व तंत्रज्ञ यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत, तुम्ही सर्वांनी स्टुडिओत उकडून घेत, शूटिंग करत, तासंतास एडिटवर बसून, संगीत, नृत्ये, मारामार्‍या सेट करून, परफेक्ट टेक देऊन हे तीन पैशाचे तमाशे आणले नसते तर जनतेने मनोरंजनासाठी काय केले असते? बाजार मध्ये फारूख शेख म्हणतो तसे," वरना क्या था इस जिंदगी में?"

पुरुष मानसिकतेचे ठळक प्रतिबिंबः
पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब चित्रपटजगतात पहिल्यापासून पडले आहे. कोणत्याही कथेत नायक हे सर्वात महत्त्वाचे पात्र असते. मग तो आलम आरा मधील मास्टर विठ्ठलने साकारलेला राजपुत्र असो कि अगदी परवाच रिलीज झालेला एक था टायगर असो. कथा त्याच्या आयुष्यात घडते, त्याला आई, बहीण, मैत्रीण, बायको, वहिनी असतात. कधी कधी तो रखेल किंवा वेश्येच्या विळख्यातही सापडतो, हातिम ताई किंवा पाताळ भैरवी मध्ये ह्या पात्राचा एक परी/ भूत असा उपप्रकार पण बघायला मिळतो. पण जशी आई दयेची मूर्ती, बहिण शुद्ध व निरागस, मैत्रीण मॉड व कायम नाच-गाणे करायला मोकळी, बायको सती-सावित्री, तशी वहिनी खोडकर दिराला समजावून घेणारी असते. रखेली किंवा वेश्या असली तरी ती अतिशय शुद्ध मनाची, नायकावर प्रेम करणारी, त्याच्यासाठी आपले काम सोडून उपाशी राहणारी अशी असते. त्याच्या आयुष्यात कितीही स्त्रिया येऊन गेलेल्या असतील तरी तिच्या आयुष्यातील मात्र तो शेवटचाच पुरुष असतो. मॉडर्न मैत्रीणही खोडकरपणा करत असली तरी शुद्ध व पवित्रच असते. वहिनी, बहीण मोड मधील व्यक्तिरेखांना तर त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव दाखविण्याची मोकळिक जवळपास नसतेच. आई तर त्यागाची मूर्तीच. १००% ममता. मजा करणारी किंवा आरामात हाय-हुई करत पाणीपुरी खाणारी सिनेमातली आई कधी पाहिली आहे?

याचे मुख्य कारण म्हणजे चित्रपट हा एक आर्थिक व्यवहार आहे. भाव- भावनांचा, कलात्मकतेचा फाफटपसारा बाजुला सारला कि हे व्यवहार सामोरे येतात. एका बाजूला चित्रपट बनविणारे, निर्णयक्षमता असणारे, त्यात पैसा घालणारे पुरुष आणि दुसर्‍या बाजूला तिकिटाचे पैसे टाकून बघणारा प्रेक्षक प्रामुख्याने पुरुष. तेव्हा त्यांना आवडेल, पचेल, रुचेल अश्याच कथा, त्यांच्या मानसिकतेत बसेल असे सादरीकरण ही व्यवसायाची गरज आहे. प्रत्यक्ष जीवनात पिचणारा प्रेक्षक नायकाची व्यक्तिरेखा थोड्या वेळासाठी घालून बघतो तेव्हा ती त्याला चपखल बसायला हवी. ती घालून त्याला एक आत्मविश्वासाचा बूस्टर डोस मिळावा, त्याची करमणूक व्हावी, नाचणारी नटी बघून मनोरंजन व्हावे, भावनांचा काही प्रमाणात निचरा व्हावा असे हे गणित असते.

कार्यालयात वरिष्ठांकडून बोलणी खाऊन पिचणारा साधा प्रेक्षक, गावाकडून तालुक्याला येणारा शेतकरी, बाजारात मोठी ओझी उचलणारा हमाल, चौदा-सोळा तासांची सलग ड्यूटी करणारा वॉचमन, फेसबुकवर स्वतःचे भावविश्व असणारा, प्रत्यक्षात एकाकी जीवन जगणारा माहितीक्षेत्रातील अधिकारी, जिवाचा धोका पत्करून कामे करणारे पोलीस, जवान, सरकारी कंत्राटांच्या निविदा भरणारा कंत्राट्दार, वैतागलेला छोटा उद्योजक, ह्या सर्वांना एक छोटीशी सूट देऊ शकणारा सिनेमा तिकीटबारीवर सोने कमवितो. दबंग, रेडी, बॉडीगार्ड, गोलमाल ( नवी सीरिज) ह्यांच्या यशाचे हे गमक आहे. ३ इडियट्स ने देखील विद्यार्थ्यांची बाजू मांडल्याने त्याला यश मिळाले. त्यातील स्त्री व्यक्तिरेखा पारंपारिक मोल्ड मधून सुरूवात करतात व मग पुढे तो मोल्ड मोडून स्वतःचे मत व्यक्त करतात. ह्या मोठ्या चित्राच्या संदर्भात बघितल्यास दर्जेदार स्त्री प्रतिमा शोधून त्या प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचे काम करणार्‍या दिग्दर्शक, कलाकारांना दाद द्यावीशी वाटते. व्यावसायिक गणिते सांभाळूनही चित्रित झालेल्या सशक्त, तरल, संवेदनशील, खर्‍याच्या जवळ जाणार्‍या स्त्री व्यक्तिरेखांनी आपले जीवन समृद्ध केले आहे. गेल्या शंभर वर्षात ह्या प्रतिमेत अनेक चांगले-वाईट बदल घडून आले आहेत.

आलम आरा चित्रपटात झुबेदाने साकारलेली राजकन्या जिप्सींच्या तांड्यात लहानाची मोठी होते. योगा योगाने तिची तरूण राजपुत्राशी भेट होते. ते चित्रपटीय संकेतांप्रमाणे प्रेमात पड्तात थोड्या त्रासानंतर शेवटी एकत्र येतात.
ह्या साध्याश्या परिकथेत नवबहार व दिलबहार ह्या दोन राण्यांची अस्तरस्वरूप कथाही आहे. ह्यांच्या सवती मत्सरातूनच सिनेमाची कथा पुढे जाते. पहिल्याच देशी सिनेमात ह्या सनातन विषयाला हात घातल्यावर स्त्री प्रतिमा चहु अंगाने बहरत गेल्या. धुवट मध्यमवर्गीय संस्कृतीत कुंडीतील तुळशीसम वाढणार्‍या मराठी, तेलुगु, कन्नड सिनेमांतील नायिकेपासून ते फिअरलेस नादिया पर्यंत तर्‍हेतर्‍हेच्या व्यक्तिरेखा सादर केल्या गेल्या आहेत. यातील काही प्रत्यक्ष जीवनात भेटतात तर काही कल्पनेतील आहेत.

मराठी चित्रपटातील काही महत्त्वाच्या स्त्री-व्यक्तिरेखा:

चित्रपट बनायला सुरूवात झाल्यावर बर्‍याचश्या कथावस्तू पौराणिक, काल्पनिक, कथा, कादंबर्‍या, गूढकथा असत. पहिल्या स्त्री व्यक्तिरेखा देखिल राजकन्या, जिप्सी मुलगी, परी, अश्याच होत्या. १९३७ मधे आलेल्या कुंकू ह्या प्रभात फिल्म कंपनीच्या सिनेमाने समाजाला खडबडून जागे केले. विजोड विवाह, बिजवरास तरूण मुलगी देणे, बालविधवांचे घुसमटून जगणे अश्या अनेक तत्कालीन प्रथांच्या व वास्तवाच्या दु:खद बाजूकडे ह्या चित्रपटाने लक्ष वेधले. शांता आपट्यांची निर्मला/ नीरा जे प्रश्न विचारते त्यांची बरोबर उत्तरे अजूनही समाज शोधतच आहे.

मराठी चित्रपटांची सुरूवातीची वर्षे अशी क्रांतिकारी असली तरी मग चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा एक दोन साच्यांमध्ये अडकल्या,सोज्वळ बहीण, मध्यमवर्गीय सुसंस्कारित मुलगी, ( जिचे लग्न जमणे पैशा अभावी शक्य होत नसे- ताई मोड नाहीतर लाडकी धाकटी बहीण) सोशीक पत्नी, कारुण्यमूर्ती ममतामय आई, कायम पुरुषांना अवेलेबल असलेली लावणी नर्तिका! काही दशकांनी ह्यात टेमिंग द श्र्यू ह्या संकल्पनेभोवती लिहिल्या गेलेल्या व्यक्तिरेखाही आल्या, श्रीमंत आईबाबांची लाडावलेली मुलगी, ( जी फीयाट गाडी चालवत असे. कपड्यांना मॅचिंग फूल व हेअर बँड घालून सारस किंवा तत्सम बागेत नाचत असे. जिला पैशांची घमेंड असे ) नायकाच्या सहवासात येऊन ती सरळ येत असे व निमूटपणे लग्न करत असे. त्याकाळातील पुरुष प्रेक्षकांच्या स्वप्नात व कदाचित जीवनातही अश्या स्त्रीया आल्या असतील. वर्षा उसगावकर अश्या भूमिकांसाठी फिट होती.

स्मिता पाट्लांच्या उंबरठ्यातील भुमिकेने ह्यास छेद दिला. तिथून पुढे प्रायोगिक- वेगळ्या व्यक्तिरेखा मराठी सिनेमात येणे व प्रेक्षकांना भावणे होत गेले. तरीही माहेरची साडी मोड कधीही सुटलेला नाही. सर्व बदल एका समांतर ट्रॅक वरच होत गेले आहेत. सुमित्रा भावेंच्या दोघी सिनेमातील गौरी, सातच्या आत घरात मधील सर्व पात्ररचना, बिनधास्त मधल्या कॉलेज कन्यका, जोगवा मधील मुक्ता बर्वे, तसेच मातीच्या चुली मधील सुनेचे पात्र एक नवी जीवन शैली आणि वास्तव घेऊन आले आहेत. गाभ्रीचा पाऊस मधील पत्नी, दे धक्का मधील नाचरी मुलगी, अगं बाई अरेच्चा मधील अबोल पत्नी आणि भारती आचरेकर ची सायकिएट्रिस्ट हे असेच काही बदललेल्या तरीही आतून भारतीय स्त्री-मानसिकतेचे नमुने. २०१२ मध्ये आलेला काकस्पर्श हा चित्रपटच घ्या. एका अबोध मुलीचे लग्न होते; ते संपल्यावर तिला कोणीही हात लावणार नाही अशी प्रतिज्ञा परभारे तिसराच एक निर्णयक्षम पुरुष करतो. तिला काय हवे आहे याचा विचारही नाही. १०० वर्षांपूर्वीची मानसिकता दाखविली असली तरी हे पुरुषवर्चस्व अंगावर येते.अगं बाई अरेच्चा हा जरी स्त्रीयांना समजून घेणारा सिनेमा असला तरीही नायकाला बार मध्ये पाठवून तिथे सोनाली बेंद्रेंचे आयटम नृत्य घालायचा दिग्दर्शकाचा बिझनेस सेन्स अचूक आहे. हे गाणे झाल्यावर प्रेक्षकांमधले बरेचसे नवरे बायकोला तू उरलेला सिनेमा बघून ये म्हणून निघून गेले असतील बहुतेक.

हिंदी सिनेमातील काही वेगळी पावले
सुहासिनी मुळेंनी साकार केलेली मृणाल सेन दिग्दर्शित भुवनशोममधील अवखळ, तरूण गौरीच बघा.
खेडवळ पण रसरशीत सौंदर्य, वागण्यातील मोकळेपणा आणि अज्ञानात आनंद अशी ही गौरी. फार नंतर आलेल्या लगान मधील गौरीची ही आधीची आवृत्ती वाट्ते. तिच्यासमोरील उत्पल दत्तचे पात्र पन्नाशी उलटलेले विधूर, एकाकी आणि स्वतःच्या रेल्वेबाबू ह्या मानसिकतेत पार अडकलेले. हे किलबिलते पाखरू त्याला खूप काही शिकवून, जीवनाभिमुख करून जाते.

अश्या लेखांमध्ये मदर इंडिया बद्दल चार गौरवाचे शब्द लिहिण्याचे एक फॅशन असते परंतु, ह्या रोबस्ट भारतीय स्त्री प्रतिमेच्या स्टिरिओटाइपशी आताच्या शहरी स्त्रीचे काहीच इमोशनल कनेक्षन नाही. तथापि भारतीय चित्रपटातील ही एक मैलाचा दगड म्हणावी अशीच व्यक्तिरेखा आहे. श्री ४२० मधील गरीब पण शिक्षित अशी सरस्वतीचे स्वरूप असलेली विद्या व तिचा काउंटर पाँइट जणू असलेली नादिराची ग्लॅमरस माया तसेच लेडी केलेवाली ललिता पवार हे त्याकाळातील दिग्दर्शकांचे स्त्रियांना कोणत्या तरी साच्यात बसविण्याचे ढोबळ प्रयत्न वाट्तात. राज कपूरच्या सिनेमात भोळी गावातली मुलगी परदेसी शहरी मुलावर जीव जडविते व त्यासाठी खर्‍या आयुष्यात धक्के खाते. बरसात पासून, सत्यम शिवम सुंदरम, राम तेरी गंगा मैली ते हीना पर्यंत ही अतार्किक स्त्री व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. सत्तरच्या दशकापूर्वी हे पूजनीय स्त्री व वापरण्याची स्त्री हे विभाजन प्रकर्षाने जाणवत असे. हेलन बिंदू प्रभृती, वागायला अ‍ॅग्रेसिव, चंट, मोकळ्या, वेस्टर्न कपडे घालणार्‍या पण बहुतांशी कॅबरे नर्तिका. ह्यांनी कधी दुसरे रोल्स फारसे केले नाहीत. वहिनीचे रोल केले तरी बिंदू त्यातही दुष्टच असे. इंग्रजी बोलणे, केस कापणे, वेस्टर्न कपडे घालणे ही त्यावेळच्या व्हँप्सची व्यवच्छेदक लक्षणे होती. कुछ कुछ होता है मधील अर्चना पूरण सिंगचे विनोदाची डूब दिलेले पात्र हे ह्याच मानसिकतेतून आलेले एक धुवट चित्रण आहे. अश्या स्त्रीला देखील स्वतःची व्ह्लॅल्यू सिस्टिम असते, असू शकते. वगैरे दाखवायचा धोका दिग्दर्शक पत्करत नसत. तीन तासांत ते तरी काय काय करणार?

बँडिट क्वीन ही फूलनदेवीची कहाणी प्रेक्षकांशी भावनिक नाते प्रस्थापित करण्यात अपयशी ठरली. सिनेमा अतिशय परिणाम कारक आहे, पण स्त्री गुन्हेगारीचे ग्लोरिफिकेशन होते आहे असे वाटले. आई- वहिनी-पत्नी मोड मधून बाहेर पडणार्‍या स्त्री प्रतिमेचे हे एक सणसणीत दुसरे टोक आहे. छोट्या गुजराती गावातील दहशत पसरवणारी लेडी डॉनची भूमिकाही शबाना आजमी यांनी एका चित्रपटात दणक्यात केली आहे.

श्याम बेनेगल दिग्दर्शित अंकुर मध्ये शबाना आझमींनी महत्त्वाची व्यक्तिरेखा साकार केलेली आहे. लक्ष्मी ही दलित मोलकरीण स्त्री! डिप्राइव्ड थ्री एक्स!! भारतीय पुरुषांना कितीही सुरेख व छान पत्नी असली तरी घरातील कामवाली ही हक्काचीच वाट्ते. ह्याजागेवर दुसरी पोझिशन गोड, तरूण आणि अनभिज्ञ मेव्हणीची. ह्या मेव्हणी पात्राचा उपयोग करून अनेक विनोदी ( ?! ) चित्रपट निर्माण केले गेले आहेत. स्त्री- मानसिकता दुय्यमच नव्हे तर (अरे देवा!) मूर्ख असते ह्या विचारसरणीतून हे सवंग करमणूकप्रधान चित्रपट बनतात.

अंकुरमध्येही लक्ष्मीचा मालकाकडून वापर करून घेतला जातो, नवर्‍याला मारहाण होते. ह्यात मालकाची दोरसानी पत्नी ही एक प्रतिमा आहे. सुरक्षित, श्रीमंत व भरपूर जात व क्लास-रिलेटेड गंड असलेली अशी ही स्त्री पतीवर मालकी हक्क गाजवते. नायकाच्या वडिलांच्या दोन बायका. त्यातील रीतसर लग्नाची कायम मागे राहते व दुसरी लाडाची बिनधास्त हक्क गाजविते हे चित्रण केले आहे. शेवटी लक्ष्मी नवर्‍याचाच आधार घेते.

गौतम घोष यांचा पार हा एक वेगळा चित्रपट आहे. त्यातील बिहारी मजुराची बायको रमा, गर्भवती असताना
नदी पार करते. अनंत अडचणींचा सामना करताना आपले मूल गेले असे वाटून ती निराश होते. पण नदी पार केल्यावर शेवटी ते जिवंत आहे ते कळून ती एक क्षण सुखावते. अगदी गरीबाच्या जीवनात अभावानेच येणारे सुखाचे काही क्षण आहेत त्यापैकी एक. स्त्री भावनांच्या ह्या छटा व्यक्त करायला शबानाजींसारखी समर्थ व अनुभवी नटी मिळावी हे आपले भाग्य. आता जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे अश्या अस्सल भारतीय व्यक्तिरेखा
पडद्यावर येणे कमीच झाले आहे. तुका म्हणे आता उरलो महोत्सवांपुरता अशी काहीशी स्थिती होते आहे.
माधुरी दिक्षितचा एकमेव आर्ट मुव्ही ( त्यातही तिला लाल भडक मॅचिंग लिपस्टिक लावायचा मोह आवरलेला नाही) मृत्युदंड. ह्यातही शबानाजींनी जन्मभर वांझोटी म्हणून ऐकून घेतलेल्या व मग अपघाताने पुरुष बदलल्यावर, नवर्‍याने संपूर्ण नाकारल्यावरच हं , गर्भवती राहिलेल्या, आंतरिक तॄप्तीने फुललेल्या स्त्रीची भूमिका छान केली आहे.

स्मिता पाटील यांनी साकार केलेल्या भूमिका, मंथन, मिर्च मसाला, उंबरठामधील व्यक्तिरेखाचा आढावा घ्यायचा तर वेगळा लेख लिहावा लागेल. स्वतंत्र होऊ पाहणारी, त्यासाठी झगडणारी, निराश होणारी, पेटून उठणारी स्त्री त्यांनी अनेक अँगल्समधून साकार केली. अर्थ मधील शिझोफ्रेनिक कविता सन्याल तर मला फार आवडते. अर्थमधे शबानाला ऑथर बॅक्ड रोल मिळाला. परंतू स्मिताने दोन सीन्स मध्ये पिक्चर खाउन टाकला आहे. एक पहिला जिथे ती मित्राला आपले मूल कसे असावे ते सांगते तो. आणि दुसरा जिथे ती मित्राच्या पत्नीसमोर येते तो. तुझ्या मंगळसूत्राचे मणी मला टोचतात म्हणते तेव्हा अंगावर काटा येतो. विवाहबाह्य संबंधांबरोबर सत्तरच्या दशका पर्यंत तरी एक प्रकारची अपराधी भावना, लपवायची भावना जोडलेली होती त्याचे ह्या सिनेमात चित्रण आहे. सध्याची ओके टाटा डन, मानसिकता फारच वेगळी आहे.

यांना माध्यम समजले होते
बंगालीच नव्हे तर विश्वचित्रपट इतिहासात फार मानाने घेतली जाणारी नावे म्हणजे सत्यजित रे आणि रितविक घटक. पथेर पांचाली, अपराजितो आणि अपुर संसार ह्या अपू चित्रपट त्रयी मध्ये मुलावर असीम पण घुसमटवून टाकणारे प्रेम करणारी आई, लहानपणीच्या खोड्यांमध्ये सहभागी होणारी, पावसात नाचणारी, आपला छोट्या इच्छा चोरी करून पुर्‍या करणारी अकाली गेलेली बहीण, अकाली वारलेली पत्नी, म्हातारी आत्या अशी स्त्रीचित्रे आहेत. वास्तववादी चित्रपटांचे नवे युग सुरू करणार्‍या रेंच्या सिनेमातील स्त्रिया देखील त्या काळाचे अचूक प्रतिनिधित्व करतात. देवी मध्ये स्वतःला कालीमातेचे रूप समजू लागलेल्या डिल्युजनल स्त्रीची व्यक्तिरेखा शर्मिलाजींनी फार जबरदस्त साकार केली आहे. त्यापुढे आराधनातली वंदना त्यांच्यासाठी अगदी सोपी साधी गेली असणार.

बिमल रॉय यांची दो बिघा जमीन मधली पारो ( निरूपा रॉय! फॉरेव्हर मदर) नवर्‍या- मुलाची काळजी करणारी, सर्व निर्णय त्याच्या हातात सोपवून प्रारब्धाचे भोग निमूट पणे स्वीकारणारी, भावना प्रधान स्त्री आहे. बिरज बहू मधली बिरज ही स्वरूप सुंदर. दुष्ट कंत्राट्दाराची वाइट नजर तिच्या वर पडल्यावर ती स्वतःचे शीलरक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करते शेवटी पतीला भेटून त्याच्याकडून आशिर्वाद घेऊन प्राण सोडते. ऑल धिस इज व्हेरी फाइन पण कोणत्याही परिस्थितीत ती आदर्श भारतीय बहू असल्यामुळे अगदी गरीब, निपुत्रिक नवर्‍याला सोडून दुसरा मार्ग चोखाळत नाही. ते प्रेक्षकांना सहनच झाले नसते ना. त्यांची सुजाता हे अनाथ, दलित मुलीचे चित्रण आहे. अतिशल संवेदनशीलतेने तिची वेदना मांडली आहे. जलते हैं जिसके लिए या गाण्यामुळे माझ्यासाठी तरी ही दलित मुलीची कथा न राहता एक हळुवार प्रेमकथाच राहिली आहे. बंदिनी मध्ये प्रेमासाठीविषप्रयोग करणारी व शिक्षा भोगणारी, मेरे साजन है उसपार ह्या भावनेच्या आधाराने जगणारी कल्याणी खरी वाटते.

रितविक घटक दिग्दर्शित मेघे ढका तारा मधील नीता, स्वतः अविवाहित राहून कुटुंबाचे पोषण करणार्‍या मुलीचे प्रतिनिधित्व करते. ती ज्या तरूण शास्त्रज्ञावर प्रेम करत असते तो तिच्या बहिणीशी विवाह करतो. टीबीची लागण झाल्यावर घरचे तिला शिलाँगला नर्सिंग होम मध्ये टाकून देतात. स्वार्थी आई, स्वकेंद्रित बहीण अशी पात्रे ह्या सिनेमात आहेत. एका पिढीतील मुलींच्या भावना ह्या व्यक्तिरेखेत सामावल्या आहेत. अश्या कित्येक जणी वास्तवात दिसत असत. जागतिकीकरणानंतर जसजशी सामाजिक मूल्ये बदलत गेली तसे घरासाठी आयुष्य भर त्याग करणे ही संकल्पना सातों जनम निभायेंगे ह्या संकल्पनेसारखीच अतिरंजित व खोटी वाटू लागली. आताच्या अनुष्का, प्रियांका खूब पैसे कमायेंगे म्हणतात. स्वतःच्या विकासावरच लक्ष केंद्रित करतात.
ते आताच्या समाजरचनेत फिट देखील होते नाही का?

त्यांची सुवर्णरेखा( १९६२) ह्या चित्रपटातील सीता खालच्या जातीच्या मुलाच्या प्रेमात पडते, पळून जाते पण लगेचच वैधव्य पदरी घेऊन वेश्यावस्तीत येते. तिचे आयुष्य कंट्रोल करणारा तिचा मोठा भाऊ ग्राहक म्हणून तिच्या समोर येऊन ठाकतो. ते सहन न होउन ती आत्महत्या करते. स्त्रीजीवनातील ही अशी परवड आजही कित्येकींच्या नशिबात येते. पण आता त्यावर चित्रपट निघत नाहीत.

केरळमधील स्त्री जीवनाचे संवेदनशील चित्रणः
१९६५ मधील चेम्मीन हा एक क्लासिक मल्याळी सिनेमा आहे. चेम्मीन ही कोळ्याची मुलगी पेरी कुट्टी ह्या मुसलमान व्यापार्‍याच्या प्रेमात असते. पण आई व परंपरांचे दडपण ह्यामुळे ती वडिलांनी शोधलेल्या जातीतील मुलाशी लग्न करते व मनोभावे संसार करायचा प्रयत्न करते. तरीही गावात तिच्या ह्या प्रेमप्रकरणाची अफवा पसरतेच व तिचे चारित्र्य हनन होते. पेरीकुट्टी अचानक भेटल्यावर ती जुनी प्रेमभावना परत जागृत होते व
ती त्याला भेटते. दोघे जीव देतात. जातीबाहेर लग्नच काय प्रेम करणेही मुलींना जड जाते. आजही परिस्थिती वेगळी नाही. तथापि, मुलगी प्रेम करते आहे ना करू दे की, परंपरा बदलू असा विचारही कोणाच्याच मनात येत नाही. कधीच. आपल्या जिवंत पोटच्या मुलीचे सूख महत्त्वाचे कि परंपरा इत्यादि? संसारात गाडून घ्यायचे नाहीतर जीव द्यायचा हेच दोन ऑप्शन्स काही मुलींच्या नशीबी येतात.

१९७७ मध्ये आलेली कांचन सीता हा चित्रपटातील एक अभिनव प्रयोग आहे. उत्तर रामायणातील सीतेला जंगलात पाठ्वण्याची कथा स्त्रीवादी दॄष्टीकोनातून दाखविली आहे. यात सीता कधीच दिसत नाही. जंगल व पशू पक्ष्यांच्या द्वारे व्यक्त होत राहते. सीतेची कथा सर्व भारतीय सिनेमातून वेगवेगळ्या रुपात दिसत आलेली आहे.

अदूर गोपाल कृष्णन यांचा पहिला चित्रपट स्वयंवरम. ह्यात पळून जाऊन शहरात स्वतःचा संसार उभारू पाहणार्‍या प्रेमात असलेल्या तरूण जोडप्याची कथा सांगतो. यात पतीस पैसा कमविणे हळू हळू अवघड होत जाते व जगणे कठीण. तरीही त्यांचे प्रेम जिवंत असते. पती अचानक गेल्यावर ती तरूण पत्नी व तिचे मूल जगण्यात निर्माण होणारे अनेक प्रश्न समोर घेऊन उभे ठाकतात. चित्रपटाचा शेवट असा अनुत्तरित ठेवणे अदूरच जाणे. डोळ्यातली स्वप्ने व प्रेम हळू हळू विझून जाऊन तिथे जगण्याचे कष्ट व कठोर परिस्थितीची जाणीव येत जाते.

अदुरांचीच मथिलुकल म्हणजे भिंती ही फिल्म स्त्री पात्र विरहित आहे.... नारायणी हे पात्र तुरुंगातील भिंतीआड आहे. बाजूच्या खोलीत बशीर हा कैदी येतो. दोघांचे एक मेकांशी बोलून प्रेम जमते ते भेटायचे ठरवितात परंतू त्या आधीच बशीर सुटतो. शेवटास तो एक गुलाबाचे फूल घेऊन तुरुंगाच्या दाराशी उभा असतो. ते भेटले असतील असे मला उगाचच वाट्ते. प्रत्येक पुरुषाच्या मनात असलेली एक कधी न मिळू शकलेली प्रेयसी अशी ही एक सदाबहार स्त्री प्रतिमा आहे.

इतकी चांगली परंपरा मागे असताना, प्रियदर्शनच्या सध्याच्या शिणुमांमधील स्त्रिया एक मितीय, पोषाखी का बरे असाव्यात? असिन सुंदर दिसते मान्य म्हणून तिने तिच्या अ‍ॅक्टिंग मसल्स बासनात बांधून ठेवाव्यात का?

साठ ते ऐंशीच्या दशकांतील समर्थ स्त्री व्यक्तिरेखा:
गाइड मधील मिस रोझी रोल अत्यंत अवघड! पण वहिदाजींनी ते बेअरिंग समर्थ पणे पेलले आहे. "मार्को मैं जीना चाहती हूं" हा त्यांचा आक्रोश असू दे किंवा दिन ढल जाये गाण्यात देव जवळ परत जाण्याची इच्छा मनात असूनही एक पाउल मागे घेणारी नर्तकी असू दे. त्या हा रोल जगल्या आहेत. एका स्त्रीच्या जीवनात तिला घ्यावे लागणारे असंख्य निर्णय रोझी घेते. तिच्यातील कलासक्त स्त्री नागनृत्यातून एकदम व्यक्त होते. बंधने तिला नकोशी होतात. ह्याहूनही साधासरळ त्यांचा रोल तीसरी कसम मधल्या मुजरेवालीचा आहे. श्वेतश्याम सिनेमात त्यांचे रेखीव सौंदर्य उजळून येते. सर्व असूनही एखाद्या इमोशनली मॅच्युअर स्त्रीला एक " मीता" ची गरज भासते हे त्यांनी अधोरेखित केले आहे.

अरुणा राजे दिग्दर्शित रिहाई सिनेमात हेमा मालिनीने साकारलेली टकुबाई अशीच स्मरणात राहते. संयमी टकुबाई , नवर्‍याचा विरह सहन करत कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाड्त असते. एका गाफीलक्षणी ती स्वतःला गावात शिंदळकी करणार्‍या नसीरुद्दिन शाहला आधीन होते. शरिराची गरज भागविते. पण त्यातून तिला आनंदा बरोबरच पराकोटीचा अपराधी पणाही येतो. ग्लॅमर डॉल, नृत्यांगना हेमाजींनी ह्यात सुरेख संयत अभिनय केला आहे. खुश्बू चित्रपटातही त्या खुलून आल्या आहेत. पण मग गुलजारांची जादू आहे महाराजा. छोटया मास्टर राजूला "पहले मां बोल" म्हणताना तिच्यातले ममत्व अगदी उभरून येते. छोटे छोटे सीन्स अगदी उबदार, प्रेमळ अनुभूती देऊन जातात.

जया भादूरींची बावर्ची मधील कृष्णा हे त्या पिढीतील अनेक मुलींचे करेक्ट चित्रण होते. हे ताई-रिपब्लिक पुढे काही वर्षांनी "रजनी गंधा फूल तुम्हारे" गुण गुणत, पदराशी चाळा करत लग्न होईपर्यंत वाट बघत असे. ह्याचेच एक दुसरे घरगुती रूप म्हणजे, घर चित्रपटातील सुरुवातीची रेखा. पतिप्रेमाच्या ओघात चिंब भिजलेली. ये तेरा घर ये मेरा घर म्हणणारी दीप्ति नवल, चितचोर मधली साधीशी आणि घरोंदा मधील शहरी नोकरदार मुलगी असलेली झरीना वहाब. घरच्यांसाठी स्वतःचे आयुष्य बाजूला ठेवून जगणारी तपस्या मधील राखी देखील समाजात कुठे कुठे दिसून येत असे. काळाच्या ओघात अश्या व्यक्तिरेखा चित्रपटांमध्ये कमी व दूरदर्शन वरील मालिकांमध्ये जास्त दिसून येऊ लागल्या आहेत. भक्ती बर्वेंनी साकारलेली जाने भी दो यारों मधली कावेबाज एडिटर हा एक आयकॉनिक रोल आहे. गृहप्रवेश मधील पतीने दुसरी मुलगी आवड्ते असे सांगितल्यावर आतून तुटून जाणारी शर्मिला, आस्था मधील वाममार्गाला लागलेली व ते आवड्णारी रेखा अमर-मानसी त्रयी मधील मानसी, इजाजत मधील पतीचे दुसर्‍या नवथर मैत्रीणीवरील प्रेम समजून बाजूला होणारी रेखा,
ह्या व्यक्तिरेखा अतिशय छान फुलविल्या गेल्या होत्या. आता इतके खोलात जाऊन केलेले चित्रण अभावानेच आढळते. बचना ऐ हसीनों मधली टॅक्सी चालवणारी, शिकणारी दीपिका आजच्या मुलींचे प्रतिनिधित्व करते.
आपल्याला काय हवे आहे व त्यासाठी काय करायला हवे हे त्यांना माहित असते. ते साध्य करताना त्या भावनांच्या गुंत्यात अडकत नाहीत.

प्रेमरोग मधील अबोध कलिका आणि बॉबी मधील इक्कीसवी सदीकी लडकी ह्या प्रतिमा आता फेसबुकच्या जमान्यात कालबाह्य होत चाललेल्या दिसतात. व्यापारी बॉलिवूडी चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग आता जगभर पसरल्याने, सर्वांना आवडेल अशी बिग मॅक मोल्ड मधील नायिका त्या सिनेमांतून दिसते. आकर्षक, मोहक पण शून्य पोषणमूल्ये असणारी. अश्या सिनेमांतून आई पण स्वप्नातलीच असते.

महत्त्वाच्या स्क्रीन स्त्री-प्रतिमांपैकी, गणिका हे रूपक अनेक तर्‍हांनी वापरले गेले आहे. चंद्रमुखीची अनेक इंटरप्रिटेशन्स! देव-डी मधील चंदा जास्त खरी वाट्ते. भन्सालींचा देवदास अति पोषाखी व पीळ वाटतो कारण त्यात तारे-तारकांनाच जास्त महत्व दिले गेले आहे. कथा तोडून तिचे भजे केले आहे. तरी देखील माधुरीच्या एंट्रीचा सीन उच्च आहे. एका वाक्यात ती चित्रपट ताब्यात घेते व ऐश्वर्याचे फूटेज पार निष्प्रभ करते. रेखाचा ओरिजिनल उमरावजान हा देखील स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ती पूर्ण व्यक्तिरेखा फार तरल आहे. ती ज्या पद्धतीने " कोशिश तो की थी" म्हणते व परिस्थितीपुढे हतबलता व्यक्त करते ते विसरण्यासारखे नाही. सलामे इश्क हा अल्टिमेट मुजरा वाट्तो. एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटावे, तिला आपलेसे करावेसे वाटावे तर तिच्या डोळ्यात एकाच वेळी एक आव्हान आणि एक तू मला प्रोटेक्ट कर हे व्हल्नरेबल फीलिन्ग हवे. ते रेखा अतिशय समर्थ पणे व्यक्त करू शकत असे. त्यामानाने ऐश्वरया रायने कधीही स्वतः मध्ये काही व्हल्नरेबिलिटी आहे हे व्यक्तच केलेले नाही. कायम विश्वविजेतेपणाचे मखर. कजरारे गाण्यांचे क्लोजप्स बघा म्हणजे ते लक्षात येइल. म्हणूनच तिचे सादरीकरण तकलादू वाट्ते. अर्दी, ह्युमन वाटत नाही. भारतीय तर नाहीच नाही. नुसती साडी गुंडाळून भारतीय होता येत असते तर काय पाहिजे होते.

मौसम मधील शर्मिलाचा गणिकेचा रोलही फार धक्कादायक आणि परिणामकारक होता. ही पहाडन आईची, बलात्कारित अनाथ मुलगी, कलकत्त्यात धंदा करणारी. तिच्या एंट्रीचा सीन फार जबरदस्त आहे. हिरो पेक्षा जास्त धक्का आपल्याला बसतो. मंडीतली शबाना पार हैद्राबादी.आणि ओ सो ओरिजिनल होती. मनोरंजन मधील झीनी बेबीचा रोलही असाच विनोदी अंगाने जाणारा पण भारतीय मुलीचा आकांक्षा व्यक्त करणारा होता. ही स्टायलिश गणिका चोरी चोरी सोला सिंगार करून बघते.

उत्सव मध्ये रेखेने सादर केलेला गणिकेचा रोल तर अत्युत्तम. एक तर ते दिसणे, ते दागिने आणि ते बेअरिंग. चारुदत्ताच्या ( शेखरसुमनच्या नव्हे. हरगिज नहीं ) प्रेमात पडलेली अभिसारिका, व शेवटी परत कामाला लागणारी रिझाइन्ड स्त्री. ह्या व्यक्तिरेखेत खूप शेड्स आहेत. निखळ स्त्रीत्व. अभिजात आणि भारतीय सौंदर्याचा उत्तम आविष्कार. ही व्यक्तिरेखा गणिकेची असूनही बिभत्स वाट्त नाही. कारण शीअर रेखा सेन्स! ह्यातच अनुराधा पटेल ची चारुदत्ताच्या पत्नीची भूमिका आहे. वसंतोत्सवाच्या वेळी पतीने गाडी पाठवून मैत्रीणीस बोलाविले. आपल्याला नाही याबद्दलची विषण्णता एका दॄष्यात फार सुरेख व्यक्त केली आहे तिने. न बोलता.
उत्तम पत्नी असूनही मन रिझवायला पुरुषाला दुसरी स्त्री लागू शकते, एवढेच नाही तर ते समाज मान्यही आहे,
या सोशल कंडिशनिंग बद्दल आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता हा स्त्री असण्याचा एक दु:खद भाग आहे. इथे तो हळूवारपणे व्यक्त होतो.
किरण खेरची सरदारी बेगम ही एक ताकदीची गायिका पण वैयक्तिक आयुष्यात धक्के खाल्लेली.
मुलीला जपणारी प्रौढा. ह्यातील ठुमर्‍या पण अतिशय सार्थ आणि उत्तम सादर केलेल्या आहेत. ही एक ट्रीटच.
मुस्लीम समाजातील महिलांचे उत्तम व खरे चित्रण श्याम बेनेगल यांच्या हरी भरी, तसेच झुबेदा मध्ये आहे.

फायर मधील शबाना व नंदिता दास यांच्यातील अनुबंध अतिशय प्रामाणिक पणे तपासले जावेत असेच मला वाट्ते. जजमेंट पास करणारे आपण कोण? नंदिता मला खूप जवळची वाटते. त्या चित्रपटाच्या सुरुवातीला
शबाना तिला नवरा कुठे गेला आहे असे विचारते तेव्हा ती चेहरा सरळ ठेवून तो मैत्रिणी कडे गेला आहे असे सांगते. तो सीन बघताना मन अस्वस्थ होते. पण किती स्त्रिया असे निर्णय मोकळेपणी घेऊ शकतात? आपण भारतात राहतो हे कधीच विसरता येत नाही. ही टिप्पणी समलिंगी संबंधांवर नाही. एकूणच स्त्रियांच्या निर्णयक्षमतेवर येणार्‍या सामाजिक बंधनांवर आहे. हे कृपया लक्षात घ्यावे. स्त्री प्रतिमांच्या आढाव्यात हा एक महत्त्वाचा टप्पा होता. अपर्णा सेन यांची पारोमा अशीच मनात बसलेली. नवर्‍याचा संसार ओढताना स्वतःला विसरलेली. राहुलच्या मिठीत ते स्वत्व शोधणारी, व शेवटी सर्व हरवून स्वत्व सापडलेली. त्याच सिनेमातील एक खोलीत बंद करून ठेवलेल्या मावशीचा उल्लेख जिवाचा थरकाप उडवितो.

१५ पार्क अवेन्यू , श्री. व सौ. ऐय्यर मधील कंकणाने रंग भरलेल्या व्यक्तिरेखा पण सच्च्या आणि जवळच्या वाटतात. बोलण्याची तमिळ ढब तर अगदी नैसर्गिक जमली आहे. १५ पार्क अवेन्यूतही नवरा अजूनही आजारी मैत्रीणीसाठी अस्वस्थ होतो, स्वतःला जबाबदार मानतो हे कळल्यावर स्वतःच्या सुरेख संसारात रमलेली शेफाली उद्ध्वस्त होते. हे एक स्त्री दिग्दर्शिकाच टिपू जाणे. शेफालीचा एकच आरश्या समोरचा सीन आहे. जरूर बघा.

चित्रपटमाध्यमातील भारतीय स्त्री प्रतिमा बदलल्यासारखी वाट्ते पण ती प्रत्यक्षात बदलत नाही. तेच तेच स्टीरिओटाइप्स नव्या साड्यांत, मिनिस्कर्टस मध्ये येत राहतात. मिर्च नावाच्या चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा
लग्नाच्या सुरक्षीततेच्या आड शारिरीक सूख शोधत राहतात. मे बी इट वर्क्स फॉर देम. पण निराशाजनक वाट्ते. काल्पनिक व्यक्तिरेखां मध्ये अनुष्का शेट्टीने रंगविलेली अरुंधती ( तेलुगु) अगदी मजबूत व सशक्त आहे. निर्भय आणि जबाबदार. हा भूतपट आहे हे बाजूला ठेवून सिनेमा बघावा.

नव्या शतकात बघायचे झाले तर देव-डी मधील माही/ पारो, सायकल वरून गादी घेऊन शेतात जाणारी, शेवटी लग्न करून गायब. मित्रास परत भेटल्यावर त्याचे कपडे धूते, खोली आवरते. आता तरी भारतीय पुरुषांना हे स्वतः करता यायला हवे नाही का? असे वाट्ते. जब वी मेट मधील गीत. सुंदर, आत्मविश्वासाने रसरसलेली, स्वतःची व्हॅल्यू सिस्टिम असलेली, अनडिझर्विंग मुलासाठी स्वतःचा वेळ वाया घालवते. दु :खी होते. बँड बाजा ब्राइड मधील अनुष्का - नो प्यार इन व्यापार म्हणून मग स्वतःच प्रेमात पडणारी- मिक्स्ड सिग्नल्स देते. रंग दे बसंती मधील सोहा सध्याच्या कॉलेज शिक्षण पूर्ण केलेल्या धडपड्या, जागरूक तरीही मनाने हळुवार असलेल्या मुलीचे चित्रण आहे. " तेरा घोडा आया है" म्हणणारी तनू वेडस मनू मधील कंगना, लाइफ इन अ मेट्रो मधील धर्मेंद्रच्या प्रेमात असलेली म्हातारी नफीसा अली, प्यार के साइड इफेक्ट्स मधली मल्लिका शेरावत. गुरू मधील ऐश्वरया राय, आणि हो उत्तरायण मधील नीना कुलकर्णीची व्यक्तिरेखा देखील आजच्या स्त्रीयांची विविध रूपे दाखवितात.

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई मधील कंगना आणि प्राचीच्या ( खर्‍या बॉबीपेक्षा सरस.) व्यक्तिरेखा, राजनीतीमधील कत्रिना ह्या ही विचार करायला लावतात. शिल्पा शेट्टीची एड्स पेशंटची भूमिका आजच्या काळातील एक दु:स्वप्न समोर आणते. फॅशन मधील प्रियांका, तिची मेंटर आणि मैत्रीण, बॉसची बायको ह्या देखील बदलत्या तरिही अंतरंग खास भारतीय असलेल्या. वी आर ऑल दॅट अँड सम मोअर असा विश्वास देणार्‍या.

करण जोहर, अक्षय कुमार, अजय देवगण, सलमान यांच्या सिनेमांतील एक हिरॉइन पब्लिकला पाहिजे
केवळ ह्या गणितातूनच आलेल्या, फसलेल्या, अतिच्च परफेक्ट सद्गुणी, फेक मेकप करून गोर्‍या, बारीक, सर्जिकली परफेक्ट पण पोकळ व्यक्तिमत्त्वाच्या, भारतीय संस्कृतीचा झेंडा परदेशातही मिरविणार्‍या नायिका चित्रपटगृहातून बाहेर पडले कि प्रेक्षक विसरून जातात. पण वाट्तं अरे थोडीशीच जास्त मेहनत केली, व्हिजन रुंदावली तर एक शक्तिशाली माध्यम यांच्या हातात आहे ते कुठून कुठे नेऊ शकेल. गल्ला भरतोच आहे पण थोडीशी खर्‍या जीवनाशी बांधिलकी जपली तर?

कधी पैसे मिळालेच तर गौरी देशपांड्यांच्या कथांतील नायिकांना पडद्यावर जिवंत करण्याचे माझे स्वप्न आहे.
कारण शेवटी परिस्थिती बदलायची तर आपणच सुरूवात केली पाहिजे. भारतीय चित्रपटाच्या शंभराव्या वर्षात माझी तरी हीच अपेक्षा आहे कि स्त्री - प्रतिमा सत्याशी निगडित, काही बेसिक जीवनमूल्ये जोपासणारी अशी व्यक्त व्हावी. लाइट, साउंड, कॅमेरा आणि अ‍ॅक्शन. वन पॉपकॉर्न प्लीज.

सूचना:
या लेखा साठी विकिपेडिया.ऑर्ग व इजंपकट.ऑर्ग या संकेतस्थळावरील माहितीचा संदर्भ घेतलेला आहे. शब्दशः मराठीत भाषांतर कोठेही केलेले नाही. रितविक घटकांच्या सिनेमांचे स्टिल्स फार उत्तम आहेत पण ते प्रताधिकार मुक्त नाहीत. संस्थळी जाऊनच बघावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, हॅट्स ऑफ!
खूप मोठा आवाका नी पसारा असलेला विषय निवडलात. त्याबद्दल अभिनंदन! या लेखाला अजून वाढवला तर याचा ग्रंथ होवु शकतो. असे असूनही कुठेही 'थांबणे' किंवा 'रमणे' ना होता, हा लेख प्रवाही लिहीला आहे. खूप्पच छान!

छान लेख आवडला. माझ्या दुसऱ्या पोस्टवरची प्रतिक्रिया वाचताना तुमचे लेखन पाहिले आणि हा लेख आवडला. मला आवडलेल्या काही भूमिका आणि त्या साकारणाऱ्या नायिकांबद्दल लिहिले होते, या लिखाणाला जोडणी म्हणून इथे देते.

हुतुतू, चीनी कम आणि हेराफेरीतली तब्बू - तिन्ही वेगळ्या व्यक्तिरेखा. चीनी कम मध्ये आपल्या वयाहून दुप्पट असलेल्या अमिताभशी जुळवून घेताना, सब लडके मिले थे अब तक । असे म्हणत त्याच्या विक्षिप्तपणाला हसून उत्तर देणारी, हट्टी बापाच्या धमकीला घुश्शात, ' तो कब जा रहे हो ' अशी विचारणारी पण नंतर त्याच्या काळजीने कळवळणारी, स्वतंत्र, मिश्किल आणि तेव्हडीच सह्रदय. जोहर सह्गलची आईची भूमिकाही अफलातून होती या सिनेमात

रंग दे मधली वहिदापण छानच -- तिच्या जुन्या सिनेमातील भूमिका बघितल्या की तिच्याइतकी इतकी graceful अजून कोणी नाही.

श्याम बेनेगलचा हरी भरी ग्रामीण मुस्लिम कुटुंब आणि मुख्यतः कुटुंब नियोजानासारख्या प्रश्नावर पण अतिशय वास्तवदर्शी असा सिनेमा यात नंदिता दासची अल्लड छोट्या जावेची भूमिका, नवऱ्याने ऑपरेशन कारण आला म्हणून रुसून घर सोडून जाणारी आणि मध्येच थबकून परत येणारी हा प्रसंग गोडच. बांद्र्याच्या थिएटरात बघायला गेलो होतो तेव्हा सगळ्या बायकाच होत्या आत.

हजारो ख्वाइशे ऐसी मधली चित्रांगदा, साठीच्या दशकातील विद्यार्थी आंदोलनाचा कॉलेजात असलेला प्रभाव, तिचं उच्चवर्गीय राहणीमान, आंदोलनातल्या मित्रावर जीव तोडून प्रेम, त्याच्यासाठी सुखाचा संसार सोडून त्याच्या कामात झोकून देणे आणि नंतर तो सोडून गेला तरी ते काम सुरु ठेवणे. अतिशय बोलका अभिनय आणि त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून जाणाऱ्या अनेक आव्हानांना तोंड देत तोंड देत अल्लड मुलगी, असहाय्य प्रेमिका आणि एक प्रगल्भ स्त्री असा प्रवास तिने सुंदर दाखवला होता.

समय मधली सुश्मिता सेन -- ही वाटली होती IB officer

फिर भी दिल हिंदुस्तानी मधली काहीही करून टॉपला राहणारी वार्ताहर जुही आणि तीन दिवारे मधली जुही -दोन वेगळ्या व्यक्तिरेखा. तीन दिवारेमध्ये जेव्हा नवरयाला आता यापुढे असा अत्याचार करत राहिलास तर तू झोपलेला असताना जाळून टाकेन असं धमकावणारी आणि आपल्या बहिणीच्या खुनाचा अतिशय थंड डोक्याने तपास लावणारी पण त्याचबरोबर तुरुंगात घडणाऱ्या चांगल्या कामाला हातभार लावणारी. संवेदनशील पण करारी जुही आवडली होती.

लज्जा मधली मनीषा आणि माधुरी दोघी - रस्त्याच्या कडेला लघवीला बसणारी, शीळ घालणारी आणि रंगमंचावर प्रियकराला जाब विचारणारी माधुरी अफलातूनच होती. देढ ईश्कीया बघायचाय अजून . खामोशीमधली मनीषा

कहाणी, नोवन किल्ड जेसिका, डर्टी पिक्चर, पा, ईश्कीया मधली विद्या बालन. ईश्कीय मध्ये ती नसरुद्दिनला खड्सावते -- कौन हो तुम मेरे पती, यार … तो प्रसंग आणि अगदी थंड डोक्याने निर्णय घेणारी, दोघां मामू भातीज्यांच्या प्रेमात आपल्याला हवे तेच शोधणारी ।

सुमित्रा भावेने चाकोरी म्हणून एक छोटी फिल्म केली होती -- त्यात काम केलेली मुलगी आणि व्यक्तिरेखा. नवऱ्याने टाकून दिलेली मुलगी, छोट्या भावाच्या मदतीने सायकल शिकते व गावात चाललेल्या कामात सहभागी होते. छोटीशी पण त्या मुलीची जिद्द दर्शवणारी आणि सायकल शिकणे ह्या छोट्या गोष्टीमुळे तिच्या आयुष्यात किती फरक आला- शेवटच्या प्रसंगात ती सायकल चालवताना सायकलीचे फिरणारे चाक आणि त्याचवेळेस तिच्या पायातले पडणारे पैंजण/ साखळी असा सुरेख शेवट अजून डोळ्यासमोर दिसतो.

डोर मधली गुल पनाग, बंदी नवऱ्याच्या सुटकेसाठी शेकडो मैल दूर येउन ज्याच्या खुनाचा आरोप आहे त्याच्या विधवेस मदतीचे सांगाडे घालणारी, या दोघींची फुलणारी मैत्री आणि गुलचा आयेशावरचा प्रभाव यामुळे घरात आणि गावात उठणाऱ्या तरंगांना दोघींनी दिलेला प्रतिसाद.

फ़िजां मधली करिष्मा - तिचा हा एकच सिनेमा मी पाहिलाय -- दिसतेही छान आणि व्यक्तिरेखा ही मस्त. करीना असोका मध्ये मादक दिसते, जब वी ची गीत ही छान.

गुजारीश आणि जोधा अकबर मधली ऐश्वर्या -इतका तरल प्रेमानुभव डोळ्यातून व्यक्त केला आहे.

बर्फी मधली प्रियांका चोप्रा -- आणि Black मधली राणी मुखर्जी, सदमामधली श्रीदेवी --त्या भूमिकांचे सोने केले आहे

चक दे मधली कोमल, बंटी और बबली मधली राणी, लज्जा मधली माधुरी -- बंडखोर आणि धमाल जगणाऱ्या या व्यक्तिरेखा फारच आवडतात.

तलाश मध्ये मुलगा गमावलेली आणि नवऱ्याचे वागणे समजाऊन घेत नव्या अनुभवास सामोरी जाणारी राणी मुखर्जी

धोबी घाटमध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या आणि मुंबईत एकट्या पडलेल्या मुलीच्या दृष्टीकोनातून मुंबई रंगवणारी यास्मीन - कीर्ती मल्होत्रा

जाने तू न जाने ना - मधली रतना पाठक -- माझ्या खूप फेमिनीस्ट मैत्रिणींची आठवण करून देणारी -- काय जेवूयात मग scrambled egg on toast -- सिंगल मदर घरातील ओळखीचा प्रसंग वाटला, वर वर hilarious वाटणाऱ्या अनेक प्रसंगातून आपल्या मुलाला वेगळे बनवण्याची- स्वतःची तत्वे, मुल्ये आपल्या मुलास देण्याची तिची धडपड सुरेख होती. इम्रानने रंगवलेल्या त्या भूमिकेत हुशार आणि EQ ने काम करणारी अशा सिंगल मदरची मुले मला तरी आठवली होती.

शबानाजी धन्यवाद. सर्व पोस्ट बद्धल अगदी अगदी. ह्या लेखाचा दुसरा भाग लिहीला पाहिजे. इतक्या नव्या
व्यक्तिरेखा आल्या आहेत. शिवाय निशांत मं डी मधील शबाना च्या रोल्स बद्दलही लिहायचे आहे.

शेवटचा पॅरा एकदम मस्त. रत्ना पा ठक शेव्टी हताश हो उन वो अपने बाप का बेटा है म्हणते ते फारच
मजेशीर आहे.

Pages